दिवस तुझे ते ऐकायचे....

Submitted by कुमार१ on 12 February, 2020 - 21:26

नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ सर्वांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित विशेष दिनाचीच ओळख करून देत आहे.

हा दिन कुठल्याही व्यक्तीसंबंधी किंवा नात्यासंबंधी नाही, हा कुठलाही उत्सव नाही. एखाद्या चळवळ, शारीरिक वा मानसिक दुर्बलता किंवा जागरुकतेसंबंधीही नाही. एखाद्या कटू स्मृतीबद्दल देखील नाही. जागतिक पातळीवरील न्याय, अन्याय किंवा शांतता यांचाही याच्याशी संबंध नाही. बर मग साहित्य, कला, क्रीडा किंवा पर्यावरण किंवा संशोधन यांचा तरी काही संबंध?

नाही !
मग, आहे तरी कसला हा दिन?
ठीक आहे, आता उत्सुकता अधिक ताणत नाही, सांगतोच....

तर १३ फेब्रुवारी हा ‘जागतिक रेडीओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने आपल्यावर अधिराज्य केले होते. किंबहुना तो आपला जीवनसाथी होता. आपल्यातील काहींचे संपूर्ण शालेय जीवन हे रेडीओच्याच संगतीने पार पडले आहे. तेव्हा त्यावरील शांत बातम्या, माहिती, निवेदने आणि करमणुकीचे विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असायचे. कुटुंबातील अनेकांच्या सकाळच्या आवरायच्या वेळा या रेडीओवरील कार्यक्रमांशी घट्ट निगडीत होत्या. सकाळी सातच्या बातम्या देणारा निवेदक हा तर सर्व श्रोत्यांच्या कुटुंबाचाच सदस्य मानला जाई ! कित्येक तरुण कुटुंबे ही विविध भारतीचा ‘बेला के फूल’ हा रात्रीचा गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यावरच झोपी जात. घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! अनेक व्यावसायिकांना आणि गृहिणींना आपले काम करता करता रेडीओची साथसोबत मोलाची वाटत असे; किंबहुना आजही वाटते.

पूर्वी रेडीओवर सादरीकरण करणाऱ्या अनेक कलाकारांना ‘रेडीओ-स्टार’ ही उपाधी आदराने लावली जात असे. तमाम भारतीयांना प्रिय असणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे त्या काळचे रेडीओवरचे धावते समालोचन तर अगदी कान आणि मन लावून ऐकले जाई. इंग्लीश, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांतले क्रिकेट समालोचक अगदी लोकप्रिय होते. संध्याकाळी ७.०५ चा सैनिक बांधवांसाठी असलेला ‘जयमाला’ हा गीतांचा कार्यक्रम म्हणजे तर आपल्या रेडीओची आजही शान आहे ! विविध भारतीवर दोन गाण्यांच्या दरम्यान ज्या मंजूळ जाहिराती ऐकवल्या जात त्यादेखील लोकांच्या अगदी ओठावर असायच्या. महत्वाचे म्हणजे या जाहिरातींनी कधी मुख्य कार्यक्रमावर कुरघोडी केली नाही.

Radio-philips-capella_hg.jpg

प्रसारमाध्यमांच्या इतिहासात डोकावता रेडिओने दीर्घकाळ आपले ‘युग’ गाजवले. त्यानंतर टीव्ही, संगणक आणि आंतरजाल अशी दृक्श्राव्य माध्यमांची प्रगती झाली आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तरीसुद्धा आजही रेडीओवर प्रेम करणारे शौकीन बरेच आहेत. डोळ्यांना ताण नाही आणि आपले काम करतानाही तो एकीकडे ऐकता येणे, ही त्याची वैशिष्ट्ये खासच आहेत. आजच्या टीव्हीवरच्या झगमगाटाशी तुलना करता तर रेडीओची ‘शांत’ प्रवृत्ती अधिकच भावते. किंबहुना गेल्या दोन दशकांत रेडीओने देखील कात टाकून श्रोत्यांना अधिक आपलेसे केले आहे. अजून एक मुद्दा. अतिरिक्त टीव्ही अथवा जाल करमणुकीचे व्यसन हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रेडीओपासून मात्र तसा धोका नाही ! तो कितीही ऐका, मुळात त्याचे ‘व्यसन’ लागत नाही.

तर असे हे सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणूनच या विशेष जागतिक दिनाची संकल्पना पुढे आली. प्रथम ती २०११च्या ‘युनेस्को’च्या बैठकीत मांडली गेली. त्यानंतर २०१२ पासून दरवर्षी हा जागतिक दिन साजरा केला जातो. आता १३ फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर १३/२/१९४६ ला संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आपली रेडीओ सेवा चालू केली होती, त्याची आठवण म्हणून.

तर अशा या आजच्या दिनी सार्वजनिक स्तरावर काही कार्यक्रम साजरे होतीलच. माझा हा धागा काढण्याचा उद्देश आता सांगतो.
सन २००५ मध्ये मी जुन्या माबोवर या विषयावर धागा काढला होता. आता त्याला १५ वर्षे झाली. या दरम्यान बरेच जुने सभासद इथून निघून गेलेले दिसतात आणि बऱ्याच नवीन लोकांचीही आता भर पडलेली आहे. तेव्हा ‘रेडीओची पुनर्भेट’ असे या धाग्याचे उद्दिष्ट आहे. जे सभासद ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याजवळ गतायुष्यातील रेडीओच्या कार्यक्रमांच्या अनेक मधुर आठवणी असतील. त्यांची इथे उजळणी आपण करूयात. आजही आपल्यातील काहीजण दिवसाचे काही तास रेडीओ ऐकत असतील. पण आपण जरा पूर्वीच्या काळाचे स्मरणरंजन करूयात. विशेषतः तो काळ, जेव्हा ‘सरकारी रेडीओ’ हेच श्राव्य माध्यम लोकांसाठी उपलब्ध होते. त्याच्या जोडीला रेडीओ ऐकणाऱ्या इथल्या तरुण पिढीने आजच्या सरकारी आणि खाजगी रेडीओ वाहिन्यांबद्दलही लिहायला हरकत नाही.

आता थोडे ‘रेडीओ’ उपकरणांबद्दल. पूर्वी भला मोठा रेडीओ, मग ट्रांझिस्टर, खिशात मावणारा रेडीओ, रेडीओची संकेतस्थळे आणि आता मोबाईलमधले रेडीओ- अ‍ॅप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील. त्याच्या गमतीजमती देखील लिहा. फार पूर्वी व्हाल्वचा रेडीओ नीट ऐकू येण्यासाठी त्याची एरीअल घरातून गच्चीत सोडावी लागत असे. कोणे एके काळी रेडीओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे. तसेच त्याचे वार्षिक नूतनीकरणही पोस्टात जाऊन करावे लागे. हे ऐकून आताच्या तरुणांना चक्क हसू येईल ! माझ्या आठवणीनुसार तो परवाना १९८० –८२ दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आला होता (चू भू दे घे). त्यानंतर खऱ्या अर्थाने रेडीओ-सेवा ही जनतेसाठी ‘फुकट’ उपलब्ध झाली.
....
तर असा आहे या धाग्याचा उद्देश. यावर मोठा लेख मी एकट्याने लिहिण्यापेक्षा आपण सर्वजण मिळून या आठवणी जागवूयात. ते खरे स्मरणरंजन असेल.
याचबरोबर या ‘आकाशवाणी’ वरील माझे निवेदन संपले ! आता तुमच्या आठवणी आणि प्रतिसादांचे स्वागत.
*********************************************

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमारदा, खरच खुप सुंदर लिहिलाय लेख! आवडला.. Happy

लहान असताना अण्णा म्हणजे माझे आजोबा पहाटे 5 वाजताच रेडिओ सुरु करायचे.. त्याच्यासोबतच देवपुजा, सकाळचा नाष्टा उरकला जायचा. आता तिच सवय ते गेल्यानंतर माझ्या आईला लागलीये.
आम्हा दोघी बहिणींना रेडिओला हात लावायची परवानगी नव्हती. त्यातल्या त्यात ताई माझ्यापेक्षा उंच! तिला जमायच वर उंचावर ठेवलेल्या रेडिओला हात लावायला. ते बघुन माझी चिडचिड झाली कि आजी सांगायची. अण्णांनी रेडिओ त्याकाळी जवळपास २ते ३ वर्ष पगारातले थोडे थोडे पैसे वाचवुन आणलेला.
आता तो जुना झालाय अधेमधे बंद पडतो. आपण तुझ्यासाठी नवा घेऊ. Happy
तो रेडिओ त्याच्या वयानुसार बंद पडायला बघायचा पण अण्णा दिड-दोन महिन्यातुन एकदा खोलुन काहीतरी करायचे. आणि रेडियो परत सुरु व्हायचा..

फोटोतला रेडीओ फारच आवडला. लेख पण छान.
अजूनही आवडीचे गाणे रेडिओवर वाजले की काय विलक्षण आनंद होतो आणि तो दिवस पण छान जातो.
बिनाका गीतमाला, रेडीओवरचे क्रिकेट समालोचन , श्रुतिका हे खूप आवडायचे.

वा खुप सुंदर लेख आहे. लहानपणी गंमत जम्मत, अहो प्रपंच, भावगीते, नाट्यसंगीत , बिनाका गीतमाला असे कार्यक्रम ऐकतच मोठी झालेली आमची पिढी आहे. अजूनही सकाळी ७ ते ८ FM rainbow आणि दुपारी १२ ते २ FM gold, संध्याकाळी ६. १५ ला विविध भारतीवर भावगीते हे रेडिओवरचे कार्यक्रम मी नेहमीच ऐकत आहे. आपण एकटे असलो तरी गाणी साथीला असली कि दिवस खूप मजेत जातो. आता तर प्रसारभारती अँप चालू झाले आहे त्यामुळे कधीही आणि कुठेही गेलो तरी इंटरनेट द्वारे आपण कोणतेहि रेडिओ चॅनेल ट्यून करून आवडत्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. "जागतिक रेडिओ दिनाच्या" सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

छान लेख!
आता तर प्रसारभारती अँप चालू झाले आहे त्यामुळे कधीही आणि कुठेही गेलो तरी इंटरनेट द्वारे आपण कोणतेहि रेडिओ चॅनेल ट्यून करून आवडत्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो.>>> रेडिओ गार्डन हे ॲपहि छान आहे. आम्ही हल्ली तेच वापरतो रेडिओ ऐकायला.. भारतभरातील कुठल्याही शहरातील प्रादेशिक FM वाहिन्या ऐकू शकतो.. अगदी गुगल क्रोम वरही चालते

छान लेख. माझा मामा सैन्यात होता आणि तो बॉर्डरवर असताना दररोज "फौजी भाईयों के लिए" (जयमाला) हा कार्यक्रम ऐकायचा.
माझा आवडता कार्यक्रम म्हणजे "साज और आवाज" ज्यात आधी एखादे गाणे लावायचे आणि मग तेच गाणे वाद्यसंगीत (इंस्ट्रुमेंटल) म्हणून लावायचे. वाद्यसंगीताचा माझा आवडता कलाकार "इनॉक डॅनियल्स" होता, ते आठवले.

धन्यवाद !
रेडिओ गार्डन >>> +११

साज और आवाज माझाही आवडता होता. >>> + १११११, अगदी !

रात्री ९ ते ९.१५ . त्यात दोन गाणी बसायची. इनॉक डॅनियल्स"च्या जोडीला व्हान शिल्पे हेही प्रसिद्ध.
आता हे सगळे यू ट्यूब वर ऐकता येते.

स्मरणरंजन आवडले.

......घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! ....

रेडिओची वेळ काटेकोर. निवेदिका हमखास "ये आकाशवाणी का XXX केंद्र है. सुबह के (इथे एखादा सेकंद थांबून) दस (हे जरा ठासून) बजे है " म्हणत Happy रेडिओ टाईम !

कर्णकर्कश्य जाहिरातींच्या माऱ्यामुळे आता रेडिओ ऐक(व)त नाही.

वसतीगृहात अभियांत्रीकीला असणा-या मित्राने रुमवर स्वस्तात रेडीओ बनवला होता.

https://qz.com/india/287319/remembering-the-jewish-refugee-who-composed-...

हे ही रोचक आहे. किती लोकांना हे माहित आहे.

अनिंद्य,
कर्णकर्कश्य जाहिरातींच्या माऱ्यामुळे आता रेडिओ >>>
ही 'मिरची मसाला ' वाली मंडळी असावीत !
द सा ,
उपयुक्त दुवा व माहिती
धन्यवाद.

आकाशवाणीबद्दलच्या आठवणी आणि अनुभव याआधी मायबोलीवरच इतर धाग्यांवर प्रतिसादांत लिहिले आहेत म्हणून पुन्हा लिहीत नाही.

मी खाजगी एफेम ऐकूच शकत नाही. किती बोलतात ते आर जे आणि किती जाहिराती. आकाशवाणी मुंबई एफेम गोल्डच्या काही आर जेंनाही ही सवय आहे. यातले काही जण तर प्रत्येक गाण्यानंतर गाण्याची श्रेयनामावली सांगण्याऐवजी बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तसं यह है १००.७ एफेम गोल्ड. आप सुन र हे है फलाना प्रोग्राम और मैं हूं आपकी साथी क्ष य ज्ञ असं बोलत असतात.

एफेम गोल्डवरही कोण आर जे आहे हे बघूनच कार्यक्रम ऐकायचा की नाही ते ठरवतो.
विविधभारतीवरचे निवेदक सुदैवाने स्वतःपेक्षा गाण्याला जास्त महत्त्व देतात.
विविधभारतीवरचे उजाले उनकी यादों के आणि शनिवारची जयमाला . तसंच सोमवराची विशेष गीतगंगा हे कार्यक्रम शक्यतोवर ऐकतो.

वर जाहिरातींबद्दल लिहिलंय. मध्ये विविधभारतीवर सरकारी जाहिरातींचा अतिरेक झाला होता. आणि तेही कसं तर गाण्याबद्दलची उद्घोषणा करायचे आणि गाणं सुरू होतंय तोच जाहिरात वाजायची. मागे गाणं चालू राहायचं. जाहिरात संपेतो मुखडा आणि अर्धा अंतरा झालेला असायचा.

>>घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात<<. +१
सकाळी ११-११:३० वाजता कामगार सभा(?) हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. तो ऐकुन शाळेत जाण्याची वेळ ठरलेली होती. संध्याकाळी ७ वाजता हि असायचा हा कार्यक्रम. लेख नेहेमीसारखा मस्त...

>>> मी खाजगी एफेम ऐकूच शकत नाही. किती बोलतात ते आर जे आणि किती जाहिराती
>>>>
+७८६
मलाही अजून विविध भारतीच प्रिय .

सुंदर लेख. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जेवण झाल्यावर दुपारी लोळायला आवडायचं. तेव्हा उशाशी रेडियो असायचाच! १ वाजता 'एक फनकार' आणि मग १:३० ते २:३० 'मनचाहे गीत' ऐकल्याशिवाय दुपार जायची नाही Happy अनेक उत्तमोत्तम हिंदी गाण्यांशी परिचय त्या दोन कार्यक्रमांतूनच झाला Happy

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
* विविधभारतीवरचे निवेदक सुदैवाने स्वतःपेक्षा गाण्याला जास्त महत्त्व देतात. >>> अगदी !

* तो ऐकुन शाळेत जाण्याची वेळ ठरलेली होती.
>>> +११
* मनचाहे गीत' ऐकल्याशिवाय >>> आजही मी सहमत !

* बालोद्यान >>> +१११ .
चॉकलेटचा बंगला, मी नाही अभ्यास करणार ..... सगळेच मस्त !

हवामेहेल चा अजुन कुणीच >>>>

मला त्या कार्यक्रमाचे फक्त सुरु होतानाचे संगीत आवडते. ते ऐकले की मी रेडीओ बंद करतो.
"अजि सुनते हो .." असे त्यातले सूर मला तरी नाही रुचत.
अर्थात त्याचा एक रसिक वर्ग आहे याची कल्पना आहे.

विविध भारतीवरील माजी लोकप्रिय उद्घोषक गोपाल शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. एकेकाळी त्यांचा ‘आवाज की दुनिया के दोस्तों’ हा कार्यक्रम रेडिओ सिलोन’वर गाजला होता.

आदरांजली !

खूप छान विषय आणि लेख सुध्दा!!मी लहान असताना आकाशवाणीत जाऊन एक बालगीत म्हणलं होत ते रेडिओ वर ऐकताना मला खूप आनंद झाला होता.या लेखामुळे तो दिवस परत आठवला.

आज पेपर चाळताना पंचेचाळीस वर्षांपूर्वीची एक आठवण एकदम ताजी झाली.

रात्री आठच्या बातम्या रेडीओवर ऐकत होतो. त्यात तत्कालीन राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे सांगितले. त्याचबरोबर इंदिरा गांधींची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवली, अशी पण एक बातमी होती. त्या शाळकरी वयात “आणीबाणी’, “अवैध” या शब्दांचे अर्थ ही फारसे समजत नव्हते.

ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे रेडीओ वर खरखर पण खूप होती. पण घरातील सगळे अगदी कान लावून ते ती बातमी ऐकत होते.

टीव्हीपूर्व काळामध्ये आकाशवाणीच्या युद्ध वार्तांकनाला खूप महत्त्व होते. 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये आकाशवाणीच्या परदेश विभागातील एक संचालक यु एल बरुवा यांनी त्या युद्धाचे सुरेख रेडीओ वार्तांकन केले होते. त्या सर्व वृत्ताचे संकलन करून एक इंग्लिश पुस्तक आता प्रकाशित झालेले आहे:

A Bangladesh war commentary : 1971 radio dispatches
- U L Baruah

काल 'हवा' या विषयावरती विविध भारतीवरती गाणी लागलेली.
- ये रात ये फिझाएं फिर आये या ना आये - https://www.youtube.com/watch?v=x5XCPXWxgvk&list=PLo4u5b2-l-fB-W32CkyJBQ...
- हवाओंपे लिख दो हवाओंके नाम - https://www.youtube.com/watch?v=ma3F6XIFtVk&list=PLo4u5b2-l-fB-W32CkyJBQ...
- ये हवा ये रात ये चांदनी - https://www.youtube.com/watch?v=xQCMe6ZDifs

अक्षरक्षः एका मागे एक अमॄतधारांचा वर्षाव!!
रेडीओ ला पर्यायच नाही. मग युट्युब असो काहीही. कारण किती तरी सुंदर निवेदने, कार्यक्रम ऐकता येतात रेडिओवरती. तसेच एक 'सरप्राईझ' एलिमेन्ट असते.

भारतात रेडिओला‘आकाशवाणी’ म्हणण्याचा उगम असा झाला :

म्हैसूरमधील एम. व्ही. गोपालस्वामी या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आपल्या ‘विठ्ठल विहार’ बंगल्यात १९३६ साली खासगी रेडियो स्टेशन सुरू केले, त्याला ‘आकाशवाणी’ हे नाव दिले.

https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-language-all-india-radio-ma...

Pages