एकटीच @ North-East India दिवस - ७

Submitted by सुप्रिया राज जोशी on 8 January, 2020 - 22:40

अनुक्रमाणिका >> https://www.maayboli.com/node/72984

12 फेब्रुवारी 2017

प्रिय फादर,

सिक्कीमचा एक वेगळाच चार्म आहे. टुरिस्टस् साठी इथे प्रेक्षणीय स्थळे आहेतच. पण माझ्यासारखा स्वतः चा शोध घेत जो वाटसरू इथे पोहोचतो त्याला इथे प्रेरणा नि दिशा मिळेल याची मोठी शक्यता आहे. एकूणच इथल्या वातावरणातच नीती, भक्ती, शांती याचा हृदयाला जाणवेल इतपत मेळ जुळला आहे, असे मलातरी वाटले. सिक्किमी लोकांना ज्याने जवळून पाहिले त्यांना मी काय लिहिले ते जाणवेल. सिक्कीम मधील मॉनेस्ट्री मधे मनन चिंतन करायला ज्याचे मन रमले त्यांना मी काय लिहिले ते कळेल.

आजचा दिवस शक्य तेवढे मौन पाळायचे असे ठरवले. माझ्याच प्लान ला घेऊन सकाळपासून इतकी जोशात होते, की एरव्ही पहाटे परमिट ऑफिस ला फेरी घालून त्यांच्याशी हुज्जत घातल्याशिवाय गंगटोक चा माझा दिवस सुरू होत नाही पण आज परमिट ऑफिस कडे ढुंकूनही पाहिले नाही.

ते काय मला सांगणार 'नो परमिट', आता मलाच परमिट नको आहे. एकदा का रस्ते उघडले की प्रवासी लोकांचे लोंढेच्या लोंढे तिथे जायला निघतील. मला अशा गर्दीत मुळीच जायचे नाही. इतक्या दिवसात गंगटोक चा आनंद कसा घ्यायचा, हे मला चांगलेच कळले आहे. म्हणून मी आज रबॉंगला जायचे ठरवले.

51979927_10156863162197778_174794839550853120_n.jpg

रबॉंग हा सिक्कीमचा केंद्र मानला जातो तिथे 7000 ft उंचीवर, बर्फाच्छादित Mt. Narsing च्या पार्श्वभूमीवर, Tathagata Taal हे नितांतसुंदर भक्तीस्थान आहे. मी भर थंडीत थंड पाण्याने अंघोळ करून 7 वाजता शेअर जीप च्या तिकीट काउंटर वर पोहोचले. कागदावर ठिकाणचे नाव लिहून घेऊनच गेले होते. म्हणजे विसरायला नको हे एक झाले आणि शिवाय माझ मौन चालू होते ना?

60 टन तांबे वापरून बनवलेली 98 फुटांची गौतम बुद्धांची मूर्ती आहे. कमळाच्या आसनावर ध्यानस्थ मूर्तीचा चेहरा शुद्ध सोन्याच्या धातूने घडवला आहे. हे सारे प्रवाशांना आकर्षित करते. पण मला गाभाऱ्याच्या आतले वातावरण भावले. मी तिथेच बसून एकेकाला आठवून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर जीवन-मरण-आयुष्य याबद्दलचे गहन विचार करत मिटल्या डोळ्यांनीच नुसतीच शांत बसून राहिले. मन शांतच होते असे काही नाही, पण वाईट विचार सरून हळू हळू चांगले विचार डोक्यात येऊ लागले. मला कुणीही उठवायला आले नाही. डोळे उघडले तर प्रसन्न वाटत होते. काही काही वास्तूमधले वातावरणच प्रभावी असते. त्यानंतर मी परिक्रमा केली आणि समोरच्या हिरव्या गवताच्या मैदानावर शांत झोपून गेले.
संध्याकाळी निघाले तसे कळले की गंगटोक ला जाणारी शेवटची गाडी निघूनही गेली. मग काय Hitchhiking झिंदाबाद!

प्रवाशांनी फुल भरलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला हातवारे करून थांबवले व ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून गंगटोक ला निघाले. हे जे करावे लागले ते आजच्या दिवसातले पहिले संभाषण. आदल्या रात्री ब्रदर जॉयस्टन ला पत्र लिहिले होते. त्याचा फोन आला. मग मला नाही रहावले. मौन वगैरे सोडून दिले नि त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. अशा ट्रिप मध्ये आपल्या कोणाशी फोनवर बोलायला मिळाले की मला हवे असते.

आमच्यात सूर्यास्तानंतर सोडायची काही काही व्रत असतात, तसेच सूर्यास्त होऊ घातला तसे मौन दिले सोडून आणि त्या ड्रायव्हर बरोबरही धतींग मज्जा केली. हॉस्टेल ला पोहोचले तर अजून दोन नवीन बॅग पॅकर्स आले होते. गप्पा रंगात आल्या होत्या पण मी थकले होते. यांच्याशी हायहेलो फक्त केले, बाकी दोस्तीदुनियादारी सारे उद्या पाहूया. तूर्तास ब्लॅंकेट मध्ये घुसून एकीकडे हे पत्र लिहून पूर्ण केले नि डोळा लागेपर्यंत पडून त्यांच्या गप्पा नुसतीच ऐकत राहिले.

Father, I know it is unusual that suddenly I write a letter to you. I have high regards for you as the most righteous Priest I have met. When I want to know the correct way of doing something, I completely believe in your way of handling the situation.

Someday I wish to share the learnings and reflections I earned in the trip to seek your opinion. But today as I experienced powerful influences to my thoughts and emotions, I strongly remembered you and then could not think of anyone else whom I could address the letter to.
Respect & Prayers
सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वेगळाच पैलू आहे तुमच्या प्रवासातला.

<माझ्याच प्लान ला घेऊन सकाळपासून इतकी जोशात होते,>
हे वाक्य हिंदीत विचार करून लिहिल्यासारखं आलंय.

मेरेही प्लान को लेकर मैं...

भरत मला खर तर कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. पत्र आणि प्रवास संपतील तसे अनेक उलगडे होतीलच पण ह्याच दिवसात (१२ फेब्रुवारी) व्हायचे ते परिवर्तन झाले होते. ते तसे मी शब्दात मांडून शेअर करण्याआधीच ओळखणे म्हणजे विशेष आहे!

मी आधी लिहिलं तसं तुम्ही करता तसा प्रवास करण्याची कल्पनाही मी करू शकत नाही . साधं बोरिवलीहून डोंबिवलीला जायचं असलं तर त्याचं नीट प्लानिंग करण्यात मी डोकं आणि वेळ खर्ची घालतो आणि तो प्रवास करून आल्यावर काहीतरी दिव्य केल्यासारखं वाटतं. Lol
म्हणजे पहा मला प्रवासाची किती आवड आहे ते. अर्थात माझी लोकल प्रवासाची सवय सुटून दोन दशकं झालीत. पण तेव्हाही रूटीनपेक्षा वेगळा प्रवास करायचा म्हणजे डोक्यात बारकासा का होईना ताण असायचाच.

बॅग पॅकर्स बद्दल असे लोक असतात यापेक्षा जास्त काहीच माहीत नाही. त्यांच्याबद्दल बात म्या होतात त्याही काही चांगल्या कारणासाठी नाही.

पण मुंबैकर नोकरदार ऑफिस गाठण्यासाठी लोकलमागे धावतो त्याच सहजतेने तुम्ही हा प्रवास करताय.

ज्यांना याबद्दल फार माहिती नाही, त्यांना प्रश्न पडणं साहजिक आहे. मलाही पडतात. पण बर्‍याच प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जाताहेत.

बॅग पॅकर्स + / हिच हायकर्सबद्दल एक जनरल लेख लिहिता आला तर पहा.

<माझ्याच प्लान ला घेऊन सकाळपासून इतकी जोशात होते,>
हे वाक्य हिंदीत विचार करून लिहिल्यासारखं आलंय.

मी तर त्याही आधी 'हृदयाला जाणवणार्‍या मेल' पाशीच अडखळलो होतो पण बृहन्मराठी विशेषतः हिंदी पट्ट्यातील माणसांच्या मराठीची सवय आहे त्यामुळे लगेच ओलांडून पुढे जाऊ शकलो.

भारतातल्या माझ्या भटकंतीच्या (तोकड्या) अनुभवानुसार, मला स्वतःला नीती, भक्ती, शांती यांचा संगम कुठल्याही निसर्गाच्या जवळ खडतर आयुष्य जगायला लागणार्‍या माणसांच्या गावा-खेड्यात आढळला आहे. हिमालयात कुठेही जा बहुतेकवेळा चांगले अनुभव येतातच.

जुन्या अनेक सुंदर आठवणी जाग्या होताहेत. पत्रं वाचायला आवडत आहेत.

सुप्रिया, तुमच्या लिखाणाची रोज वाट बघितली जाते. नवीन भाग आला की अधाश्यासारखं वाचलं जातं. गेल्या पत्रपासून जे काही deep thinking लिहिताय ते एकदम डोक्यावरून जातंय Happy मला एका वाक्यात एवढं कळतंय की तुम्हाला छान वाटतंय आणि मजा येते आहे.
स्वतः चा शोध म्हणजे काय?

हर्षेन ... आपल्या नावातील पोटफोड्या श यायला थोडा वेळ गेला ... कधी कधी ल आणि ळ च तसं होत आणि लिहिताना आपल्या लक्षातच येत नाही ... मी पण आताच मेल पाहिला Lol आणि त्याचा मेळ केला. Lol

राजसी, हो खर आहे. जरी कळत नकळत आपल्या मनातही गहन विचार चालू असतात तरीही deep thinking शब्दात मांडल की अपरिचित वाटतच.
स्वत:चा शोध ... मी कोण आहे? आयुष्याकडून काय शोधते आहे? ... सर्अवसाधारणपणे अशा प्रकारचे प्रश्न ... हे का पडत होते ते तपशील वयैक्तिक असले तरी पडत होते हे खरे आहे! आपण वाहनात बसलो असलो की त्याची दिशा, वेग याची जाणीव बोथट असते नाही का? माझा अनुभव असा आहे की रोजच्या आयष्यात गुंतले असताना आयुष्य कुठच्या दिशेने, काय वेगाने चालले आहे ते समजायला सुद्धा तसेच कठीण जाते.

धन्यवाद

स्वत:चा शोध म्हणजे स्वतःला शोधायचं . जनरली सगळ्यांचंच आयुष्य पहिल्यांदी शिक्षण मग नोकरी /लग्न / मुलं बाळ संसार अशा चाकोरीतच जात . त्यानंतर काही एका काळानंतर तुम्हाला वाटायला लागत अरे आता पर्यत आपण समाजरीतीप्रमाणे आपलं आयुष्य जगलो आता आयुष्यात स्थिर स्थावरता ( मानसिक आणि आर्थिक ) आली आहे मग आता स्वतःला जस आवडत तस वागूया . . मग मला काय आवडत किव्वा काय करायला आवडेल याचे विचार डोक्यात घोळायला लागतात . मला असं मुक्तपणे फिरायला आवडेल असं एकदा ठरलं कि मग तस करून बघूया कि . स्वतःच्या मनःशांतीसाठी . स्वतःच्या मनाला सुखावण्यासाठी . आता आपण थोडं चाकोरी बद्ध जीवनातून बाहेर पडून तस करून बघू असं वाटण म्हणजे स्वतःचा शोध असावा. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे . मला काय वाटत/ माझ्या मनाला काय वाटत त्याप्रमाणे वागणं . जो विचार शोध बऱ्याच लोकांना काही एका विशिष्ट वयानंतर करावासा वाटतो . काही जण तरुणपणीसुद्धा मनःशांतीसाठी हिमालयात निसर्गाच्या सानिध्यात जातात .
काही जण उशिरा च्या वयामध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात . स्वतःच शोध घेण्याचा प्रत्येकाचा स्वभाव /परिस्थिती /वय हे वेगवेगळं असत माझ्या मते किंवा माझ्या विचाराप्रमाणे Happy

साधं बोरिवलीहून डोंबिवलीला जायचं असलं तर त्याचं नीट प्लानिंग करण्यात मी डोकं आणि वेळ खर्ची घालतो आणि तो प्रवास करून आल्यावर काहीतरी दिव्य केल्यासारखं वाटतं. Lol>>अगदी अगदी.
छानच प्रवास सुरू आहे तुमचा सुप्रिया..

वाचतेय...
सुजा, फार पर्फेक्ट लिहीलंस .... अगदी माझ्या मनातलं...

ही लेखमाला आवर्जून वाचतोय पण अजूनही दार वेळी वेगळ्याच कोणाला लिहिलेल्या पत्रातून उलगडणे आवडत नाहीये. अर्थात हा माझ्या वैयक्तिक आवडीचा भाग आहे.
जास्त प्लॅनिंग न करता लांबचा प्रवास करायचा आहे कधीतरी.

मस्त लिहिताय.. भरमसाठ निरिक्षण असणार्या रटाळ प्रवासवर्णनांपेक्षा पत्र वाचायला आवडताएत.. पुभाप्र!

पत्रांच्या फॉर्म मधे लिहिलेले वेगळ्या तर्‍हेचे प्रवास (मनाचा न शरीराचा) वर्णन वाचताना एकदम झक्कास वाटतेय.

साधं बोरिवलीहून डोंबिवलीला जायचं असलं तर त्याचं नीट प्लानिंग करण्यात >> भरत हा प्रवास तेव्हढाच झक्कीचा असल्यामूळे त्यावर तुम्ही ही एक मालिका लिहू शकाल Happy

मी ही मालिका आवडीने वाचते आहे. पत्राचा फॉर्मॅट आवडला. कदाचित यापुढे प्रवासात जास्ती ओपन माइंड ठेउन लोकांवर विश्वास ठेउन नवे अनुभव घेतले जातीलही.