मला बाबा बनायचंय

Submitted by हाडळीचा आशिक on 6 January, 2020 - 16:25

"मला बाबा बनायचंय"

साईंच्या दर्शनबारीत बायकोसोबत रांगेला ऊभा होतो. भल्यामोठ्या लांबलचक रांगा बघून, दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी दोनतीन तास सहज लागतील याचा अंदाज आला. पैसे भरून विआयपी पास घेण्याची माझी तयारी होती पण व्यवहारशून्य ही डोळे वटारून नाही म्हणाली. एकतर आधीच वैतागलेलो; बाहेर पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानदाराने आणि त्याच्या एजंटने पाच-सहाशे रुपयांना टाकलं होतं. त्यावेळी 'हे कशाला' असं विचारल्यावर मला म्हणाली, "साईंसाठी!"
आत्ता घेतलेलं हे हारतुरादी मटेरियल मंदिरात जाऊन थोड्यावेळाने पुन्हा दुकानात येणार होतं. पुन्हा विकलं जाणार होतं. कधीकाळी आवडतं म्हणून अर्थशास्त्राची बहिस्थ विद्यार्थिनी बनलेल्या बायकोला पूजासाहित्याचं वरील अर्थशास्त्र समजावलं तर तुच्छ कटाक्ष टाकून केलेला 'इतक्या लांबून आलोय आपण..तू खिशाकडे बघू नकोस' असा उपदेश ऐकावा लागला..
..आणि आता हे असलं ताटकळत रांगेत उभं राहणं!

काही वर्षांआधी कॉलेजला असताना मित्रांसोबत पहिल्यांदा साईंकडे आलो त्यावेळी चारसहा तास रांगेत थांबूनही कंटाळा आला नव्हता. उलट दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत ऊभं राहण्याची तयारी होती कारण नजरेस पडणारी हिरवळ! आता मात्र ती सोय नव्हती. गपगुमान हिच्यापुढे चेहऱ्यावर कमालीचे सात्विक भाव आणून उभा राहीलो. कासवगतीनं रांग पुढे सरकत होती.

साईंच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतेवेळी 'बाबू! ते बघ बाबा' म्हणणारा एक बाबा नजरेस पडला. त्याच्या कडेवर गोड चिमुकली होती. बापानं बोट करून दाखवलेल्या साईंच्या मुर्तीकडे बघून ती खळखळून हसत होती. लहान मुलांचं निरागस हसणं बघत राहावं इतकं विलोभनीय असतंच. तिचं हसणं बघून दोनतीन तासांचा सर्व शीण गेला.
समोर बघून तिनं मंजुळ स्वरात उच्चारलेला 'बाsबाss' शब्द स्पर्शून गेला. तो ऐकून मनात आलं, बस झालं करीयरमागे धावणं.. आता 'बाबा बनूयात!' Happy

गेल्या आठवड्यातील गुरुवारी तिनचार वर्षांनतर आम्ही पुन्हा एकदा साईंच्या दर्शनबारीत ऊभे होतो पण फक्त काही मिनिटांसाठी! कारण यावेळी बायकोनं स्वत:हून शॉर्टकट वापरण्याचा निर्णय घेतला होता, माझ्या मनात शुद्ध सात्विक भाव असूनही.
बड्डेगर्ल असलेली बाबू कडेवरून साईंच्या मुर्तीकडे पाहून गोड हसत होती. Happy

यावेळी वाचलेला वेळ साईंचं 'वैभव' बघण्यात गेला. ते बघत असताना मनात सहज विचार आला, 'बस झालं हे मरमर करीयर.. आता 'बाबा' बनूयात!'

जनहो!
आता मला 'बाबा' बनायचंय. प्लिज मार्गदर्शन करा. माझ्यासारखे आणखी काहीजण असतील त्यांनाही हा धागा उपयोगी ठरेल. Proud

मला पडलेले काही बेसिक प्रश्न

१) बाबा बनण्यासाठीची प्राथमिक तयारी काय असते? त्यासाठीचा काही फौंडेशन कोर्स वगैरे असतो का?
२) नाव काय घ्यावं?
३) वेशभूषा कशी असावी?
४) प्रचार आणि प्रसार कसा करावा?
५) चमत्कार कसे दाखवावेत?
६) परदेशातल्या संधी?
७) आधुनिक तंत्रज्ञान?

आणखी प्रश्न, मुद्दे असतील तर भर घालून मला परीपूर्ण बाबा बनण्यासाठी मदत करा.

_हाडळीचा आशिक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर 'बाबा' ऐवजी 'भोंदुबाबा' हा बदल करा! >>+११११

एखाद्या प्रिंटींग व्हेंडर पण असु द्या हाताशी, नामजपाची वही छापायला Proud

तूम्ही खरे की भोंदू हे लोकांना ठरवू देत. बाबा बनण्याची पहिली पायरी अलिप्तता. एकटे रहायला सुरुवात करा. शक्यतो मौन धारण करा.‌ कमीत कमी गरजा म्हणजे दोन वेळेस मिळेल ते जेवण ( शाकाहारी) घ्यायचं. कुणाकडून कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. अपमान केला तरी सहन करायचा. दाढी वाढलेली, सफेद किंवा भगवे कपडे घालून रहायचं. विशेष म्हणजे क्रोधावर पुर्ण ताबा ठेवायचा. काही महिने सराव केला की झालेच तुम्ही बाबा!
सज्जन रहायचं की भोंदू बनून लोकांना लुबाडायचं ते तुम्हीच ठरवा.

काही मुद्दे मांडतो.
सर्वप्रथम प्रायॉरिटीज ठरवा, आपलं व्हिजन आणि मिशन ठरवा. तुम्हाला पुढच्या पाच वर्षात कुठे पोहोचायचं, हे मनाशी पक्के ठराव.
१. कमीत कमी १ वर्ष घरातून गायब व्हा. कुठेही जा, पण तुमचा थांगपत्ता लागत कामा नये.
२. या १ वर्षात लोकल साधू बनायचं असेल तर तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध इ. नीट वाचून ठेवा. काही वेळा भविष्यात रेफरन्स म्हणून यातल्या ओव्या फार कामात येतात. इंडिया लेवल ला जायचं असेल तर भगवद्गीता मस्ट... अजून पुढे जायचं असेल तर मग बायबल, कुराण इ. यांचे रेफरंस घ्या.
३. एक वर्षाने घरी अवतार घ्या. महिनाभर मौन व्रत मस्ट. पण हिमालय, काशी इ.मधून आलोय, आणि काही सिद्धी मिळाल्या आहेत, याची बातमी कर्णोपकर्णी होईल याची काळजी घ्या.
४. आता हळूहळू थोडेबहुत शंकित जीव तुमच्याकडे येतील. त्यांना नीट वेळ द्या. रेफ्रन्सस मधून भारी वाक्ये फेका.
५. लोकांना ज्योतिषाची फार आवड. यावेळी फक्त चांगलं सांगा, पण थोडस बॅलेन्स करून.
उदा.परीक्षेत भरपूर यश मिळेल, पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
चांगलं स्थळ मिळेल, थोडासा वेळ लागेल.
६. यात तुम्ही सांगितलेलं ५०% जरी खरं ठरलं तरी डोन्ट वरी... ते तुमचे कायमचे भक्त बनणारच.
७. हळूहळू थोडी लाईन वाढली, कि छोटासा सत्सन्ग ऑर्गनाईज करा. (वक्तृत्व कला मस्ट)
८. इथेच एखादी छोटीशी फाउंडेशन वगैरे स्थापन करा . (धार्मिक नावाने केलीत तर अतिउत्तम)
९. हळूहळू सत्सन्ग वाढवा. सुपारी घेणं चालू करा. तुम्हाला आता कॉर्पोरेटर, MLA कडून आमंत्रण येतील, तिथे चार्जेस घेऊ नका (का ते पुढे सांगतो), आणि तो भक्त बनेल असं बघा.
१०. बिजनेस क्लास कडून जास्त पैसे आकार. म्हातारा बिजनेसमन असेल तर त्याच्या छोट्या नातवाच्या नशिबात राजयोग वगैरे वर्तवा. याला स्पेशल ट्रीटमेंट द्या. (का ते पुढे सांगतो.)
११. कम्युनिटी वाईज संतांची नावे पाठ ठेवा.
१२. थोडी प्रतिष्ठा लाभली कि, आश्रम स्थापनेकडे पाऊल टाका.
यापुढचा प्लॅन खरोखर हवा आहे का? हवा असेल तर सांगतो.

धाग्याचे शीर्षक वाचुन
तुम्हाला बाळाचे बाबा व्हायच आहे असंच वाटलं. पण धागा वाचल्यावर समजलं की तुम्हाला भलताच बाबाजी व्हायचं आहे.

@अज्ञातवासी,
Rofl
इथे लिगल फी घेऊन सल्ले द्या

>>>>>>>एखाद्या प्रिंटींग व्हेंडर पण असु द्या हाताशी, नामजपाची वही छापायला Proud>>>>>>> अगदी. त्या प्रिंटरचा उपयोग 'अतार्किक संकेत/भानामती' याविषयाच्या वरचे एखादे पुस्तकच छापायलाही होइलच.

तुम्हाला बाबा ,(संत,पुण्यातमा) बनायचे नाही तर ढोंगी लबाड बनायचे आहे.
ढोंगी लबाड बाबा बनाण्या साठी कसल्याच प्रशिक्षणाची गरज नाही.
थोड्या प्रयत्नाने तुम्ही ती सिद्दी प्राप्त कराल.
खरोखर भक्तीच्या मार्गाने,जावून मन शांती मिळवायची असेल तर ते तुमच्या आवाक्या बाहेरचं आहे त्याचा विचार सुद्धा करू नका.

धाग्याचे शीर्षक वाचून वाटले की मुल जन्माला कसे घालावे ह्याविषयी सल्ला हवा असावा Lol

>>>

मलाही हेच वाटलेले....

आता आलोच आहे तर प्लीज कोणीतरी अज्ञातवसी यांच्यासारखे कोणीयरी यावरही मूद्देसूद सल्ले द्या

आश्रम फेज!

ही फेज प्रचंड महत्वाची. यावरच तुमची भविष्याची दिशा ठरते.

१. ते फुकट ज्ञान दिलेले mla वगैरे इथे कामात येतील. यांच्याकडून फुकट २ ३ एकर जमीन उकळता येते. यांच्याकडे नसेल तरी सहज एखादी सरकारी जमीन हे बरोबर तुमच्या नावावर करू शकतात. जमिनीचा प्रॉब्लेम सुटला
२. आपले ते बिजनेसमॅन... आश्रमासाठी सढळ हाताने देणगी घ्या! भलेही एखाद्या पायरीवर त्यांच्या माताजी पिताजीच नाव घाला. जास्तच पैसा असेल तर भिंतीवर कोरा, पण पैसा घ्याच.
३. MLA/नगरसेवक असेल आणि बिल्डर, वाळूमाफिया यांच्याशी संबंध नसेल, तर तो फाऊल धरला जातो. फुकटात बांधकामाची व्यवस्था करा.
४. हे सगळं करत असताना, ज्योतिष/सत्संग वगैरे जोमात चालू ठेवा, दुर्लक्ष नको....

कटाक्षाने कटाक्षात इतरांबद्दल तुच्छता आणा. भुवया ताणायला शिका. ढगळ कपडे वापरा.

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट!!!

एकटा बाबा सगळं हँडल नाही करू शकत. बाबाच्या मागे प्रॉपर शिष्य असले, तर लोकांनाही बाबा पावरफुल वाटतो. त्यामुळे आता फुल टाइम/पार्ट टाइम शिष्य एम्प्लॉय करा.
शिष्याचे जॉब डिस्क्रिप्शन!
१. बाबाच्या पायाशी, बाजूला किंवा मागे हात जोडून दीन उभे राहणे.
२. बाबाच्या फालतू कोटीला जोरात हसणे
३. बाबाला एखादी ओवी आठवत नसल्यास जोरात रामकृष्ण हरी चालू करणे
४. बाकीच्या भाविकांवर खेकसणे.
५. दान (फळे, धान्य, मिठाई, धातू आणि नगदी रक्कम) याचा योग्य हिशेब ठेवणे.

Qualifications!
१. यासाठी कॅन्डीडेट बिनडोक असावा
२. सांसारिक त्रासात फुल गांजलेला असावा. सांसारिक पाश नसले तर अतिउत्तम
३. तो पूर्णपणे भारावून गेलेला असावा
४. त्याने तुमचे रेफरन्स बुक वाचलेले असावे, पण अर्थ माहिती नसावा
५. घसा फाडून कोरस लावण्यात पटाईत असावा.

सॅलरी
१. बाबांचा कृपाशीर्वाद
२. मध्येमध्ये एखाद फळ, जास्त आल्यास मिठाई व थोडेफार पैसे देत जावे.

अशा रीतीने सुरुवातीला काही शिष्य गोळा करा.

स्वतःच्या नावाला ला बापू/दादा/स्वामी वगैरे काहीतरी म्हणणारे चमचे ठेवून घ्या... (उदा. आशिक बापू, किंवा हडळस्वामी वगैरे..)

लोकप्रिय गोष्टी अमान्य करून त्यावर उपहासात्मक टीका करता यायला हवी.

जगन्मान्य गोष्टी खोट्या असून आपल्यालाच फक्त खरी आतली गोष्ट माहीत असल्याच्या आविर्भावात तासंतास सत्संग कंडक्ट करता यायला हवा.

उगाच कुठल्यातरी साध्याश्या गोष्टींचा कीस पाडता यायला हवा. उदा. भगवद्गीतेच्या प्रवचनात एखादा तास नुसता 'धृतराष्ट्र उवाच' मधल्या 'धृतराष्ट्रा'वर बोलता यायला हवं. म्हणजे धृतराष्ट्र म्हणजे काय? ध म्हणजे काय? धृ म्हणजे काय? धृत म्हणजे काय? राष्ट्र -र + ष्ट्र वगैरे संधी-समास करणं, सोडवणं मग परत ते पहिले धृ आणी नंतरचे राष्ट्र किंवा नुसतेच ष्ट्र ह्यांच्या जोड्या जुळवून त्यातून चमत्कारिक अर्थांची, त्यातून निर्माण होणार्या सुरस आणी चमत्कारिक गोष्टींची, त्यातून वेगळ्याच कुठल्यातरी (तुलसीदास, कबीर, एकनाथ) महापुरूषांची गोष्ट सांगता यायला हवी. म्हणजे अ‍ॅट द एंड ऑफ द सत्संग, सगळे भक्तगण 'साला, सूं इंग्लिश बोले छे' नजरेनं बघतील आणी 'बाबा, काय सुंदर प्रवचन करतात. इतक्या बारीक-सारिक गोष्टींचा उहापोह करता' अशी आपली प्रतिमा तयार होते.

एखादी सवय/ लकब / व्यसन हे खुलेपणानं करावं म्हणजे ते तुमचं व्यवच्छेदक लक्षण बनून त्याच्याही चमत्काराच्या, स्वानुभवाच्या कथा पसरतील.

धन्यवाद सगळ्यांना.
सगळे प्रतिसाद मार्गदर्शक आहेत.

@ॲमी
भडकमकरांच्या क्लासचा धागा बघितला. धम्माल आहे. Lol

@मन्याSS
बाबा आणि भोंदूबाबा यातील फरक स्पष्ट करून सांगाल का? मला या क्षेत्रातलं काही माहिती नाहीये.

@अज्ञातवासी
तुमचे सगळे प्रतिसाद छान, अभ्यासू आहेत पण चमत्कार कसा करावा याचं मार्गदर्शन करणारा एकही मुद्दा त्यात नाही.
कृपया कोणीतरी प्रकाश टाका. Happy

@परदेसाई
नावं आवडले.
आशिकबापू नाव घेतलं तर लोकं चपलेनं हाणतील आणि हडळस्वामी घेतलं तर दूर पळतील.

>>>>> आशिकबापू नाव घेतलं तर लोकं चपलेनं हाणतील आणि हडळस्वामी घेतलं तर दूर पळतील.>>>>>>> =)) =)) काय तरी नावं!!! कहर आहे.

सध्या एक नाव चांगलंच गाजत आहे म्हणे ! करोडोच्या प्रॉपर्ट्या वगैरे...प्रत्येकी एक्वीस हजार, अक्रा हजार आणि पाच हजाराच्या रांगा लागतात ऐकलंय. जास्त पैशे लव्कर नंबर.
नाव, गाव, आधार नंबरपण सांगतो म्हणे. गावकरी म्हंतात बंगाली गोटा हाये तेच्याकडे.
लै पैशे राव ह्या उद्योगात. आप्ले तर डोळेच दिप्ले Proud

Pages