एकटीच @ NorthEast India दिवस २

Submitted by सुप्रिया राज जोशी on 30 December, 2019 - 11:11

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

51467565_10156852228407778_3182175109653725184_n.jpg

7th फेब्रुवारी 2019

प्रिय पूर्वा,
कितीतरी तास बसून काढले पण जेव्हा झोप अगदी अनावर झाली तशी शिवाजीने आणून दिलेली रेल्वेची पातळ चादर अंथरून जमिनीवरच निजून घेतलं. गारेगार जमीन अंगाला बोचत होती. रात्री टॉयलेट च्या फेऱ्या घालणारे चादर तुडवत चालायचे. एक अवलिया तर मला मध्ये ठेऊन दोन बाजुनी पावले टाकत इकडून तिकडे गेला. संकटकाळी काही न सुचून आपण थिजून जातो तशी निपचित पडून राहिले होते. खरतर निपचित वगैरे नाहीच. रात्रभर खोकल्याची ढास लागत होती त्यामुळे डोळे बंद असले तरी चाळवाचाळव चालूच होती. एकदा डोळे उघडले तर बाजुच्या स्लीपरवरच्या प्रवाशाने चपलाचा जोड झोपायच्या चादरी वर माझ्या डोळ्यासमोरच उतरवला होता. Askoril चा डबल डोस घेऊन मेल्यासारखं झोपावं अस कितीही वाटलं तरी ते शक्य नव्हतं कारण माझं सामान शिवाजी ने AC मध्ये ठेऊन घेतलं होतं.

माई तीन च्या सुमारास ट्रेनमधून उतरली. पहाटेचा पहिला चहा घेऊन आला त्याच्या चहाच्या पिंपाचा नळ गळत होता. जसे मला ओलांडून तो पुढे गेला तसे माझ्या अंगावर उकळत्या गरमागरम चहाचे थेंब थेंब पडले. सकाळी टॉयलेटची वर्दळ वाढली तशी रात्रभर मुकाट सहन केलेल्या साऱ्या प्रकाराची किळस असह्य होऊन मी उठून बसले. रेल्वेच्या चादरीची तर अशी गत अशी झाली होती की रेल्वे कर्मचाऱ्यालाही आपली चादर ओळखता येणार नाही आणि समजा ओळखायला आलीच तरी तो मलाच ती धुऊन द्यायला सांगेल. लागा चुनरीपे दाग छुपाऊ कैसे|.या गाण्याचा माझ्या परिस्थितीशी फक्त ओढून ताणूनच संबंध जोडता येईल तरी सारखे सारखे तेच गाणे डोक्यात वाजत होते. या चादरीचे काय करावे काही सुचेनासे झाले तसे मी त्या चादरीचा बोळा केला आणि एका सीटखाली सरकवला.

दिवस उजाडला पण या दिवसाची सुरुवात कशी करावी, ते ठरत नव्हते. प्रवासाचे अजून 24 तास बाकी होते. निदान हक्काची एक सीट तरी हवी. त्या TC ला काही कामधंदा नाही का? एवढ्या तासात फिरकला सुद्धा नाही, की काल कशी ती नेमकी त्याची माझी चुकमुक झाली? आता सर्वात आधी एकेक कोच धुंडाळून त्याला शोधुन काढायचेच असे ठरवले. सहा स्लीपर कोच,एक पँट्री, सारे AC कोच दोनदा फिरून झाले शेवटी पठ्ठा सापडला फर्स्ट क्लास मध्ये. E केबिनमध्ये बसून खादडत होता. म्हणतो कसा, "नागपूरला मी उतरेन नि दुसरा चढेल, तोच तुला सीट देईल."

अंग मोडून गेलंय, डोकं भणभणतयं, घसा धरलाय, दर तासाला तंतुवाद्याची सूर बिलकुल उतरलेली गंजकी तार छेडावी तशा आवाजात खोकल्याची उबळ येतेय. तरी आई सांगत होती तुझा खोकला दिवसेन दिवस वाढतोय. फोनवरून औषध विचारण्यापेक्षा एकदा पूर्वा ला प्रत्यक्ष दाखवून ये. पण आजपर्यंत आपली तपासणी आणि उपचार सारे फोनवरून झाले आहे ना? कधी सहजी तुला contact झाला नाहीच तरी तू त्या त्या परिस्थितीत काय करायला सांगशील हे मी फक्त आठवते नि माझेमला उपचार सुचतात. माझा तुझ्यावर आंधळा विश्वास आहे हेच खरं! आताही फोनची रेंज नाही पण तुझी आठवण झाली म्हणून तुला पत्रच लिहायला घेतले. पण मला वाटते की तू म्हणशील, "प्रदूषणाहून दूर मोकळ्या हवेत गेल्यावर आपोआप जाईल खोकला, तोपर्यंत जमल्यास गरम पाण्याच्या गुळण्या कर."

नागपूर आलं तशी नवीन TC ला शोधायची माझी मोहीम सुरू झाली. तो दोन तासांनी दुसऱ्याच एका बोगीत तिकीट चेक करताना सापडला. त्याचे मन दयेने भरून यावे म्हणून माझी दुखभरी कहाणी सांगताना माझे वेटिंगचे तिकीट मोबाईल वर जसे काही दाखवले, लागलीच त्याचा आवेशच बदलला. इतका वेळ जो माझ्या बडबडीकडे चक्क कानाडोळा करत होता तो माझा मोबाईल घेऊन निवांत सीटवर बसला. त्याने मला सांगितले की unconfirmed e-ticket हल्ली आपोआप कँन्सल होते आणि म्हणून मी कालपासून अवैध तिकीटावर प्रवास करत आहे. झाले? म्हणजे आ बैल मुझे मार! माझी चूक होती तर याने मला हुडकून शोधून काढायचे ते सोडून कालपासून मी याला शोध शोध शोधते आहे आणि आता एकदाचा तावडीत सापडला तर उलटी याने मला रिसीट फाडून दिली. पण असू दे. तेवढ्याने मला एक फायदा तर झाला. त्या TC ने बोलता बोलता म्हटले "ये सीट पर बिलासपूर तक कोई नही आएगा" …. आणि पुढच्या 5-6 तासांसाठी पाठ टेकायची माझी एकदाची सोय झाली.

ट्रेन मध्ये शिरल्यापासून अठरा तासानंतर मी धड पाठ टेकली त्याक्षणी अंग असह्य ठणकत होतं. पुढच्या पाचच मिनिटात कस ते नेटवर्कही मिळाल नि नेमका राजचा, रोशनचा खुशाली विचारायला फोन आला. त्यांचे आवाज ऐकून मला भरून आले. हाताची कमान डोळ्यावर ठेऊन मी डोळे झाकून घेतले आणि डोळ्यातून हवे तेवढे दुः:ख वाहू दिले.

आपल्या बरोबर आपले कोणी नसते तेव्हा मन आपोआप जास्त सतर्क आणि संवेदनशील होत असावे. अशा वेळी नकळत आपण फक्त वर्तमान काळात राहू लागतो. एक एक क्षण परिपूर्ण जगू लागतो, तो तसाच आपल्या मनावर कोरला ही जातो. नंतर त्याच आयुष्यातल्या सर्वात सुंदर शिकवणी नि आठवणी बनून रहातात. हाच सोलो प्रवासाचा सर्वात मोठा इनसेंटिव्ह आहे.

थोडा वेळ काय गेला तेवढ्यात इथल्या सहप्रवाशांबरोबर माझा मस्त मेळ जमला. पाच राज्यातले प्रवासी होते. महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, प.बंगाल नि ओरिसा! दोघे दोघे एकेका स्लीपर झोपायला लागले पण कुणालाच त्यात काही गैरसोय वाटली नाही. आम्ही आमच्या जवळचे लिमिटेड रिसोर्सेस आणि अनलिमिटेड गप्पा एकमेकांबरोबर शेअर करत खूप मस्त प्रवास केला.
51654904_10156852228892778_6229632170567139328_n.jpg

ट्रेन साडेतीन तास लेट होती त्या हिशेबाने जवळ जवळ चाळीस तासांचा स्लिपर क्लास चा प्रवास आटोपुन, 8 फेब्रुवारीला अंदाजे सकाळी 10 वाजता मी कलकत्ता स्टेशन वर उतरले. थोडे फोटो जोडून पत्र पोस्ट करते. पत्र वाचलस की उत्तर नक्की दे.

तुझी लाडकी
सुप्रिया.

वाचकांसाठी नोट्स
पूर्वा - ती डॉक्टर आहे आणि नात्याने माझी वाहिनी लागते
आई - माझी सासू
राज - माझा नवरा
रोशन - माझा मानलेला भाऊ

एवढा कठीण प्रवास मी स्लीपर क्लास ने का करावा? आणि असे अनेक प्रश्न वाचकांना पडतील म्हणून ...

नवरा आणि मुले यांच्याबरोबर प्रवास करायचा तर ट्रीप ची रुपरेषा, सुखसोई, ऐशोआराम सारे विचारात घेउनच होत असत. पण त्यापेक्षा वेगळा प्रवास करणाऱ्यांचा एक प्रकार आहे. सर्वसाधारणपणे लोकांना जरी ते माहित नसतील तरी जगभर अशी भटकंती करणारे अनेक लोक आहेत. हे backpackers आजवर आपल्या ट्रीप मध्ये आपल्याला दिसले नसतील कदाचित पण स्थानिक लोकांना मात्र यांची चांगली ओळख असते. एक sack भर सामान पाठीवर घेउन ते हिंडतात. कौटूम्बिक ट्रीप च्या तुलनेत ह्यांची ट्रीप लांबीने मोठी असते. हे एकटे - दुकटे किंवा ग्रुप मध्ये जरी असतील तरीही सामान्य मार्गानेच प्रवास करतात त्यात stunts करावेत हा हेतू नसतो पण त्यामागे वेगळ्या स्तरांवरचे अनुभव गोळा करायची प्रेरणा असते. फार पूर्वीपासून अनेक परदेशी backpackers आपल्या देशात हिमालयन प्रदेशात फिरायला येत आहेत. पण आता चित्र वेगळे आहे. आपल्याच देशातले लोक अगदी तरुण मुली सुद्धा आताशा आपल्या देशात आणि परदेशातही खुशाल backpacking करतात.

ही माझ्या backpacking चीच गोष्ट आहे त्यामूळे अनेकदा ती अनेकांच्या प्रवासाच्या कल्पनेच्या चौकटीत बसणार नाही. शिवाय माझे प्रवासाचे बेत फक्त चारेक दिवस आधी झाले तेव्हा राखीव बोगीत तिकीट मिळत नव्हते. मी लेखात म्हटले आहे की कोणीतरी मला सल्ला दिला की स्लीपर क्लास चे तिकीट काढणे हा एकच उपाय आहे आणि मी तसे करून पाहिले.

51795596_10156852229602778_2516907370110517248_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एसी कोचातल्या चादरी हरवल्या किंवा प्रवाश्याननी चोरल्या तर डब्याच्या अटेंडटकडून पैसे वसूल करतात. शिवाजीने परस्पर तुम्हाला दिलेली चादर कोण्या गरिबाला महागात पडली असणार.

छान ! Happy

चिनुक्स, बरोबर आहे.
बॅकपॅकिंग कधी केलं नाही. त्यात एकट्यानी म्हणजे फारच धाडस हवं.
आम्ही पडलो लिमिटेड धाडसी, सावध प्रकृती मंडळी. त्यामुळे तुमचे वर्णन वाचताना आश्चर्य आणि कौतुक वाटतं आहे.
माझ्या बाबांच्या शिस्तीत अनरिझर्वड् प्रवास बसत नाही. पुणे ते कल्याण इतकंच जायचं असलं तरी रिझर्व्हेशन हवं म्हणजे हवंच. तुमच्या प्रवासाचं वर्णन ऐकून त्यांची प्रतिक्रिया काय होईल, ह्या कल्पनेने हसू येतंय. मी अशी कल्पना मांडली, तरी ते बहुधा अंगठे धरुन उभं करतील!

पाश्चात्य देशात जे लोकं backpacking करतात त्याचं त्या संदर्भात देखील प्लॅंनिंग असतं असा अनुभव आहे... म्हणजे चार दिवस आधी ठरवून लांबच्या प्रवासाला निघालेले बॅकपकर्स अजूनतरी भेटले नाहीत. ते असो.
चिनुक्स +१

वाचतोय.

या अशा प्रवासाची मला कल्पनाही करवत नाही. जे करतात त्यांच्याबद्दल कुतूहल, कौतुक असं बरंच काय काय वाटतं.

वाचतोय. आवडतय का ते कळत नाहीये. (पण पुढचे सगळे भाग नक्की वाचेन) Happy

संकटकाळी काही न सुचून आपण थिजून जातो तशी निपचित पडून राहिले होते. खरतर निपचित वगैरे नाहीच >>>> संकट मुद्दाम ओढवून घेऊन मग ते कसं हाताळलं हे सांगणारे लेख लिहिलेत की काय असं काहीतरी वाटलं! दुसर्‍या धाग्यावर कोणीतरी लिहिलेय तसं बॅकपॅकर्स प्रवास करताना व्यवस्थित शोधाशोधी, तयारी वगैरे करून करतात. त्यांचा कार्यक्रम आखिव रेखिव नसतो. बॅकपॅकींग म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात / त्रासात / संकटात घालणे असं कुठल्याही ब्लॉग, ट्रॅव्हलॉगमध्ये माझ्या वाचनात आलेलं नाही.

शिवाय लेखनासाठी पत्रलेखन हा प्रकार निवडलेला असताना वाचकांसाठी नोट्स द्यायला लागत असतील तर लेखन फसलय असं मला वाटतं. हे म्हणजे विनोद समजावून सांगण्यासारखं झालं.
उदा. पूर्वा ही मैत्रिण आहे की बहिण की वहिनी किंवा आई म्हणजे आई की सासूबाई हे तपशील समजले नसते तर मुळच्या 'गोष्टीत' मलातरी काही फरक पडला नसता. तसच ही पत्र बॅकडेटेड आहेत म्हणजे लोकं प्रवासात खरच लिहितात तसा लाईव्ह ब्लॉग नाहीये. कदाचित तेव्हा थोडीफार
ड्राफ्ट लिहिली असतील आणि आत्ता प्रकाशित करत असाल. असं असतना थोडफार संस्कारण करून नोट्समधले तपशील मुळ लेखातच घालता आले असते असं मला वाटतं.

प्रवास आवडतोय.पुभाप्र. एसीने प्रवास करनारा जर जनरलने प्रवास करायला गेला तर जी गोची,त्रास होईल तोच या लेखात दिसतोय,बाकी जिवन मरनाचा प्रश्न असावा असे तर यात काहीच नाही.लेखिकेचा अनूभव त्यांच्या शब्दांमध्ये व्यक्त होतोय आणि छान होतोय.

Throwing yourself into untested waters is one way of adventure! I travel for joy so this is not my kind of thing. पण (घरच्या उबदार पांघरूणात बसून) तुमचे अनुभव वाचायला मजा येते आहे. पुभाप्र!

प्रामाणिकपणे केलेलं लिखाण आवडतंय
माझ्याकडून सोलो नाही पण अशा प्रकारचा प्रवास केला गेलाय परतही होईल एखादवेळी पण असे इतके निखळ प्रामाणिक लिखाण होईल की नाही हे सांगता येत नाही.

चिनुक्स Sad
पराग प्रवासात खरेच लिहिलेली पत्र आहेत. त्यात आता इथे टाकताना मला बदल नाही करायचाय. प्रतिक्रियेत अनेक जण प्रश्न विचारतात त्याचे उत्तर तिथेच दिले तर थोडेच वाचतील पण मूळ लेखातील अशा नोट्स ने वाचकांना विषय समजायला मदत होईल असे मला वाटते.
अनया डोळ्यासमोर चित्र आले Lol

अनेकांनी शुभेच्छा दिल्या ... अनेकांनी मनापासून प्रतिक्रिया लिहिल्या... मला चांगले वाटले. धन्यवाद!

छान लेखन. आणि जरी पत्राचा फॉरमॅट असला तरी शेवटी टीपा लिहील्या तर काय झालं..? मला तर अगदी यथार्थ वर्णन वाचल्या सारखे वाटले........
अशा खाली बसलेल्या प्रवाशांच्या बाजूने , त्यांना शिव्या देत देत, कधीतरी आपणही गेलोच आहोत ना टॉयलेट मधे /बेसिन पाशी?

लिही गं तू......मनापासून केलेलं असलं की भावतंच काहीही.....लेखन असो की स्वयंपाक....! Happy

लिही गं तू......मनापासून केलेलं असलं की भावतंच काहीही.....लेखन असो की स्वयंपाक....! >> आंबट गोड नाव आणि प्रतिक्रिया वाचून असं वाटलं की तुम्ही स्वयंपाक छान आणि मनापासून बनवत असणार. आंबटगोड छुंदा आठवला मला आणि तोंडाला पाणी सुटल.

छान लिहिले आहे.

टीसीला शोधत निघाला तेव्हा वाटले तुम्हाला रेल्वेचे सगळे नियम माहीत आहेत. टीसीसोबत मांडवली करून तिकीट मिळवणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमी आदर वाटतो कारण मला ते जमत नाही.

पण नेटवर काढलेले वेटलिस्टेड तिकीट घेऊन गाडीत चढलात हे वाचल्यावर भ्रमनिरास झाला. मला एकदा कुठल्याही परीस्थितीत जायचेच होते आणि तिकिटे मिळत नव्हती तेव्हा मी स्टेशनवर जाऊन वेट लिस्टड तिकीट काढले होते. असे तिकीट घेऊन गाडीत चढता येते व मांडवली जमली तर सीटही मिळून जाते. मला मांडवली जमली नाही कारण गाडी खरेच फुल होती. पण 3rd एसीचे तिकीट असूनही सुदैवाने स्लीपरमधून एका लहान मुलासोबत सीट शेअरिंग मिळाली. नाहीतर तुमच्यासारखाच प्रवास करावा लागला असता Happy Happy

बेधडक टाइपचे व्यक्तिमत्व आहे तुमचे. जबरदस्त अनुभव आणि कथनही.
तुम्ही आजारी असल्याने तुम्हाला या सार्या भवताल चा आनंद घेता आला नाही , उलट ते सारे असह्य वाटत राहिले.
माझ्या स्वभावानुरूप न मागितलेला पण न राहविल्यामुळे दिलेला सल्ला ....
अंधारात उडी मारणे धोक्याचेच असते. पुढे काय मांडून ठेवलेले असू शकते याचा अंदाज घ्या , तयारी करा , त्यातल्या हार्डशिप्स ची माहिती करून घ्या , आणि मग त्यात उतरा... म्हणजे बॅकपॅकरशिप चा पुरेपूर आनंद घेता येइल.

आम्ही पडलो लिमिटेड धाडसी, सावध प्रकृती मंडळी. त्यामुळे तुमचे वर्णन वाचताना आश्चर्य आणि कौतुक वाटतं आहे.
माझ्या बाबांच्या शिस्तीत अनरिझर्वड् प्रवास बसत नाही. पुणे ते कल्याण इतकंच जायचं असलं तरी रिझर्व्हेशन हवं म्हणजे हवंच. >>>>
अनया यांच्या पोस्टला मम! फक्त बाबांच्या जागी नवरा! प्रवासाचेच नव्हे तर रात्रीच्या निवाऱ्याचेही बुकींग हवेच्च्च!! मग उपाशी रहायला लागले तरी हरकत नसते.

पशुपत , हरिहर, देवकी ... अनोळखी वाचकांना सुद्धा आपल्याबद्दल concern असते हे प्रथमच अनुभवायला येत आहे आणि चांगले वाटत आहे.
चंद्रा Lol

अरे पण खरच तो प्रवास खडतर होता तरी नाक मुरडण्यासारखा नव्हता उलट त्यातून खूप शिकायला मिळाले तो योग नशिबात होता असे म्हणावे लागेल नाहीतर एरव्ही ऐकून, वाचून, चर्चा करून फक्त शिकायचे हे सहसा आपल्या नशीबात असते ना? विपश्यनेत सांगतात की सतत सतर्क आणि निरपेक्ष रहा ... धाडसापेक्षा या दोन गोष्टींची गरज जास्त आहे असे मला तरी वाटते. मग भीती वगैरे नाही वाटत.

अनेक संकट अशी असतात की ती सर्व काळजी घेतली तरी यायची ती येतातच नाही का? पण आपला त्यांच्याकडे पहायचा दृष्टीकोन कसा आहे त्यानुसार आपल्यावर त्यांचा परिणाम काय होणार हे ठरत असते.
हे वरचे झाले माझे मत, ते वेगळे असू शकते पण 'अनोजित प्रवासातील संकटे' याबद्दल माझ्या अनुभवांबद्दल बोलायचे झाले तर आता जे मी असे एकटीने सवयीने अनेकदा फिरते त्यातून माणुसकीची जशी जशी ओळख होतेय त्या विश्वासातच पुढच्या अशाच पुढच्या ट्रीप चे बीज रोवले गेलेले असते. कदाचित असेच अनुभव मिळतात हे माझे सुभाग्य असेल. जरा दमाने घे सांगणारे आस्थेने सांगतात ते कळते मला पण अनुभवातून जी घडण झाली त्याचे परिवर्तन शब्दांनी नाही होऊ शकले.

पण खूप धन्यवाद Happy

वाचतेय... खोकला असताना त्यात एकटीने प्रवास मला तरी झेपला नसता... तब्येत सांभाळा...बाकी एक वाटले असे की ट्रेन मधे खाली झोपलेल्या माणसाला पाय लागू नये अशी काळजी आपण घेतोच... त्याच्या तोंडापुढे चप्पल काढणे, चहा सांडत नेणे इ इ प्रकार zale असते तर भांडलेच असते मी त्या लोकांशी....

या अशा प्रवासाची मला कल्पनाही करवत नाही. जे करतात त्यांच्याबद्दल कुतूहल, कौतुक असं बरंच काय काय वाटतं. >>> + १२३

त्याच्या तोंडापुढे चप्पल काढणे, चहा सांडत नेणे इ इ प्रकार zale असते तर भांडलेच असते मी त्या लोकांशी....
Submitted by वेडोबा on 1 January, 2020 - 11:50

नाही वेडोबा असं भांडता येत नाही. त्यांच्या येण्याजाण्याच्या कॉमन स्पेसमध्ये बसणे / झोपणे ही चूक केल्यावर पुन्हा त्याबद्दल वाद घालणे म्हणजे चोराच्या ...

अरे कॉमन स्पेस म्हणजे ती सगळेच वापरू शकतात ना... अडचणीच्या वेळेला ट्रॅव्हल करताना लोक खाली बसून जातात...किमान त्यांना पाय लागू नये एवढी तरी काळजी घ्यायला पाहिजे ना जाताना...

>>>>अरे कॉमन स्पेस म्हणजे ती सगळेच वापरू शकतात ना... अडचणीच्या वेळेला ट्रॅव्हल करताना लोक खाली बसून जातात >>>> जागा जरी सामाईक असली तरी तुम्ही 'राईटफुली युअर्स' अर्थात तुमच्या वाट्याची तेवढीच घ्यायला हवी ना.
हे म्हणजे डेली हडलसारखे झाले. ३० मिनिटाचे डेली हडल मीटिंग) त्यात १० लोक असतात. प्रत्येकाला फक्त ३ मिनिटात स्टॅटस रिपोर्ट द्यायचा असतो पण काही गणंग दुनियाभरचा वेळ असल्यासारखे स्वतःचा रिपोर्ट देत बसतात