लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

Submitted by कुमार१ on 1 January, 2020 - 09:12

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
.........

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..

सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणीही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय (स्वीकार/नकार) लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा:

बौद्धिक श्रमांचे औद्योगिक जगातले मूल्य याहून कितीतरी जास्ती असते हे आम्ही जाणतो. परंतु, आमच्या आर्थिक मर्यादेत आम्ही इतकेच मानधन देऊ शकतो. तथापि आपणास ही रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास निर्णय कळवू”.

अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश, आभाराचे पत्र आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......

आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था तत्त्वनिष्ठ कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.

अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे स्पष्ट आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. पत्रात खाडाखोड करून लेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........

पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका पुस्तकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
........

आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा. अन्यथा लेखकांना ‘गृहीत’ धरण्याची प्रकाशकांची वृत्ती वाढीस लागते.
…………………………

आता एका दैनिकाचा अजब अनुभव. त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर आहे. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहितात – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देतात. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले अनुभव आहेत.
माझे लेखन खूप जास्त नाही, कथा लिहीत नाही(लिहिता येत नाहीत ☺️☺️) पण आलेले काही अनुभव असे:
१. बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्या तरी मोठ्या वाढदिवसानिमित्त( ते असताना) एका पेपर मध्ये लेख लिहायला ऑफर होती.खूप भारी वाटलं.त्यात 500 रु मिळाले होते.त्यावर असलेली सही आणि ते 500 इतके भारी वाटले की तो चेक वटवलाच नाही.अजून संग्रही आहे.
२. एका पेपर मध्ये ब्लॉग वरचा एक लेख आला होता.त्याचे काही मिळाले नाहीत.
3. श्री व सौ मासिकात हिरवे कुरण नावाचा लेख आला होता.त्याचे काहीतरी मिळाले होते.आता आठवत नाहीत.
4. हेमा मालीनी संपादिका वाल्या मासिकात शिऱ्या चा बायकोशोध आला होता.त्यावेळी मानधनाचे विचारले असता 'लेख ब्लॉगवर आहे, त्यामुळे आम्ही छापला तर पैसे देणार नाही' असे स्पष्ट सांगितले होते.(मग नवाकोरा लिहून देऊ का, पैसे द्याल का असे विचारायला हवे होते.)☺️
5. मायबोली ओळखीतून एका प्रोजेक्ट साठी लिखाण केले होते.पण त्याचे पुढे काही झाले नाही.बहुतेक फायनान्स चा प्रश्न आला असावा.ते झाले असते तर बरेच बरे वाटले असते.
6. एका व्हॉट्सअप ग्रुप वरून एका इको फ्रेंडली साबणाची जाहिरात लिहायचे काम मिळाले होते.पण ते लोक आधी 'पैसे मिळतील' म्हणून नंतर 'आमचे इको फ्रेंडली प्रोजेक्ट आहे, प्रत्येक जण छोटा बिझनेसमन आहे, सर्वानी सर्वाना समजून घेतले पाहीजे' म्हणून पैसे देण्याची जबाबदारी झटकायला लागले.सुदैवाने त्यावर अगदी थोडेच काम केले असल्याने ते काम 'सांभाळून घेणाऱ्या' इतर दुकानदारांना हस्तांतरीत करून कल्टी मारली.
7. एका चांगल्या मैत्रीणी कडून एका पक्षासाठी प्रचार मटेरियल लिहायचे काम मिळाले असते पण त्यांचा बिबवेवाडीत रोज येऊन काम करावे आग्रह असल्याने कल्टी मारली.
एकंदर 'पोटासाठी लेखन' 'पोटाला पुरेल इतकी कमाई करून देणारे लेखन' 'लेखन हा एकमेव व्यवसाय' हे असिधाराव्रत असावे.ज्यांना चांगले जमते त्यांना माझा मनापासून सलाम.

सुंदर लेख... भन्नाट अनुभव...लेखकाला योग्य मोबदला मिळावा यात दुमत नाही पण पुर्वीपासून लेखक पुर्णवेळ लेखक का बनत नाहीत ? कारण मिळणारा मोबदला पोटापुरता असेलच असे नाही. याला प्रथितयश लेखकही अपवाद नाहीत. हल्ली तर वाचकच घटलेत. झटपट जमाना. पेपर देखील ई-पेपर आहेत. बरेच लोक फुकट काही मिळालं तर वाचतात किंवा स्वस्तात कुठे मिळेल असाही एक दृष्टीकोन असतो.
नुकतेच "अक्षरधारा" मासिक खपा अभावी बंद पडले. त्यांची सभासद संख्या विचारात घेऊन मासिक चालू झाले. पण खूप कमी सभासदांनी मागणी नोंदवली. मासिक छपाई खर्च ७५००० रुपये. तेवढा देखील मिळू नये. कारण घटलेली वाचक संख्या. आता ते फक्त दिवाळी अंक काढणार आहेत.

याबाबतीत मानधन मिळेल किंवा न मिळेल पण भिडस्तपणामुळे जास्त गोंधळ होतो. अशा बाबतीत अगदी फटकळ नाही पण स्पष्टपणे आधीच क्लिअर केलेले चांगले.
(अ) मानधन मिळणार की नाही, (ब) ते सांगितल्याइतके आणि वेळेत मिळणार का यातली पारदर्शकता, आणि (क) मुळात त्याची अपेक्षा आहे का - या तीन गोष्टींची अनेक कॉम्बिनेशन्स होतात. हा प्रॉब्लेम बराचसा "ब" मुळे होत असावा Happy

काही लेखकांना तर लेखन न करण्याचे पण मानधन मिळू शकेल. मराठी आंतरजालावर आहेत असे काही जण.

माझ्या चार लेख / कथा छापून आल्यात.
छोटेसेच दोनेक पानांचे लिखाण असल्याने ५००/७००/७००/८०० असे मानधन मिळाले.
सोबत दरवेळी अंकही फुकट मिळाला.
पहिल्यांदा जेव्हा मानधन आले तेव्हा काय तो आनंद वर्णावा. कारण अपेक्षाही नव्हती आणि मानधनाबाबत काही बोलणेही झाले नव्हते. एके सकाळी फोन आला. छापू का विचारले. मी झोपेतच छापा म्हणालो. लिखाणातून पैसे वगैरे मिळणे म्हणजे टू मच होते माझ्यासाठी.

असो,
मला वाटते जसे क्रिकेटमध्ये पैसा आहे पण ईतर खेळात नाही याचे कारण तिथे तेवढा प्रेक्षकवर्ग नाही. तसेच ईथेही वाचकवर्ग नाही तर कोण लेखकाला पैसे देणार?

तरी पैसे हवे तर मग चेतन भगत प्रमाणे बनायला बघावे. अन्यथा ऑफिसात तासभर एक्स्ट्रा काम केले तर पाचशे रुपये ओवरटाईम मिळतो. ते सोडून कोण तासभर लिखाण करायला घरी पळणार...?

2005 साली पुढारी , तरुण भारत वगैरत आरोग्य लेख लिहायचो, तेंव्हा 80 रु मानधन मिळायचे,

आता असे लेख लिहीत नाही, ते 80 रु वारले

रोचक लेख आणि प्रतिसाद! आत्ता कुठे कळतंय मला लिहिण्यात आनंद मिळतोय ते. अशा प्रकारचा अजुनतरी अनुभव नाही. पण जाणकारांचे प्रतिसाद वाचायला आवडतील. Happy

80 रु वारले>> काय आहे काय हे??! Biggrin

वरील सर्वांना धन्यवाद !
..........
दैनिकांतील वाचकांचा पत्रव्यवहार या संबंधीच्या १९९५ पूर्वीच्या काही आठवणी रोचक आहेत:

१. दै. केसरीमध्ये या सदरातील दरमहा १ पत्र हे बक्षीसपात्र ठरवले जाई. बहुतेक ५० रु. देत असावेत. मग त्या पत्रलेखकाचा फोटो, परिचय इ. प्रसिद्ध होई. मी त्या आशेने केसरीकडे नियमित लिही पण, बक्षिसाचा योग काही आला नाही !

२ . दै. सकाळ (पुणे) मध्ये रोज १० तरी पत्रे प्रकाशित होत आणि त्यातले मुख्य पत्र हे ठळक मथळ्यात असे. त्या पत्राच्या लेखकाला अंकाची एक प्रत भेट पाठवली जाई ! तो योग माझ्या पत्राबाबत बऱ्याचदा आला.

हल्ली खूप इ-नियतकालिके सुरू होत असतात. अश्या बर्‍याच मेल्स येतात. आम्ही साहित्य जगतात खूप भरीव असे काम करतो आहोत असाच आव असतो सगळ्यांचा. आणि ही साहित्य सेवा असल्याने मानधन देऊ शकत नाही असे सांगतात. इथवर ठिक. ज्यांना लिहायचे ते लिहितील. पण हल्लीच एक मेसेज आला त्यात मानधन देणार नाही याबरोबरच या इ-मासिकाला लेखन देणे हे कसे उदात्त काम आहे आणि मानधनाशिवाय लेखन देणे हे न्यायाचे आहे अशी एक पुस्ती जोडलेली होती.
बर लेखन द्या हे इतके मोघम असते. अमुक एका अंकासाठी, अमुक एका विषयावर लिखाण असे काही असेल तर एकवेळ ठिक. पण जनरल तुमचे लिखाण पाठवा हे जरा गमतीशीरच वाटते.

हे नवीन लोक म्हणून सोडून देऊ पण सकाळवाले यात सगळ्यात वर आहेत.
एक सोडून तीन अनुभव आहेत सकाळचे.
एकदा तनिश्का पुरवणीतल्या एका ताईंचा फोन आला. त्यांना नाटकासिनेमातल्या ज्वेलरीसंदर्भात काही लिहायचे आहे म्हणून माझ्याकडून माहिती हवी आहे. मी लेख लिहून दिला तरी चालेल असेही सांगितले. मला ते शक्य नव्हते त्यामुळे मी प्रश्न पाठवा, उत्तरे लिहून देते असे कळवले. इमेलने प्रश्न आले. एकदोन गंभीर प्रश्नांबरोबर 'जान्हवीच्या मंगळसूत्राबद्दल तुमचे काय म्हणणे आहे' वगैरे मनोरंजक प्रश्न होते. गंभीर प्रश्नांना गंभीर आणि मनोरंजक प्रश्नांना मनोरंजक उत्तरे इमेलने पाठवली. मग त्या ताईंनी माझ्या ब्लॉगवरचा माझ्या एका कामाबद्दलचा लेख मुलाखतीत घेऊ का विचारले. 'सगळा नको, एखादा तुकडा घ्या आणि तेवढा भाग माझ्या ब्लॉगवरून घेतलाय हे स्पष्ट करा' हे ही सांगितले. मग अचानक एक दिवस कुणाकडून तरी माझी मुलाखत छापून आल्याचे कळते. म्हणजे मी ज्याला आजवर नाटकासिनेमातल्या ज्वेलरीसंदर्भातले फीचर समजत होते त्याचे रूपांतर माझ्या मुलाखतीत झालेले आहे आणि ते छापून आल्याचे मला माहितही नाही. काही उपहासात्मक उत्तरे होती तीही तशीच्या तशी छापलेली. + ब्लॉगवरचा अर्धा लेख जसाच्या तसा कॉपी पेस्ट आणि त्याबद्दल मेन्शन नाही. पण मुलाखतीच्या शब्दांकनाचे श्रेय त्या ताईंचे. आणि अर्थातच मुलाखत असल्याने, माझेच शब्द असले तरी मानधन इल्ले. अंक पाठवणे हे ही नाहीच.

दुसरा प्रसंग. मैत्रिणीने विचारले 'सकाळच्या पुरवणीसाठी तुझ्या ब्लॉगवरचे लेखन घेतलेले चालेल का?' 'काही ठराविक लिखाण सोडून बाकीचे घ्यायला हरकत नाही. पण मला तसे कळवा.' असे मी सांगितले. यानंतर साधारण दोनतीन महिन्यांनी एका नातेवाईकांचा फोन आला "अगं तुझा लेख वाचला. फारच सुंदर. वगैरे वगैरे.' मी क्लूलेस. मग त्यांनी तनिष्कामधे तुझा अमुक लेख आलाय हे सांगितले. मुंबईत घरी सकाळ येत नसल्याने कल्पना नव्हतीच. मग मैत्रिणीला विचारले की 'तू सांगितले होतेस ते हेच का?' तर म्हणे 'मी दुसरा सांगितला होता पण त्यांनी हा घेतलेला दिसतोय.' वा म्हणजे कळवणे वगैरे नाहीच. मानधनाचे काय विचारल्यावर ब्लॉगवर पूर्वप्रसिद्ध लेखाला ते देत नाहीत असे उत्तर आले. मग मैत्रिणीला कळवून टाकले की यापुढे ब्लॉगवरचे कुठलेही लिखाण सकाळच्या पुरवण्यांसाठी घेतलेले चालणार नाही.

तिसर्‍या अनुभवाला मात्र मी वेळीच सावध झाले. एका मैत्रिणीकरवी त्यांनी संपर्क केला. 'अमुक एका विषयावर तातडीने लेख हवा आहे. तुमचा विषय आहे तर लिखाण द्या. पुढच्या चार दिवसात.' स्पेसिफिक विषयावर माहितीपूर्ण/ अभ्यासपूर्ण लेख चार दिवसात लिहून द्यावा ही अपेक्षा अतिशय चुकीची आहे. जरी विषयाचा एक्स्पर्ट असला तरी सगळे संदर्भ समोर नसतात. तसेच लेखाच्या फोकसप्रमाणे थोडे आजूबाजूचे संदर्भ बघावे लागतातच. परत लेखाच्या फोकसप्रमाणे लेखाची मांडणी करायला आमच्यासारख्या पत्रकारितेचे शिक्षण न घेतलेल्या लोकांना वेळ लागतो. चार दिवसांचे दोन आठवडे जमत असतील तर विचार करता येईल असे सांगितले मी. ते चालणार होते. मग त्या म्हणाल्या की 'सकाळच्या पुरवणीतल्या कुठल्याही लेखांना मानधन देत नाही.' म्हणजे मी लायब्ररीत जाऊन, संदर्भ ग्रंथ धुंडाळून, चार पाच दिवस घालवून तुमच्यासाठी लेख लिहायचा तो माझा वेळ जात नाही म्हणून? मी नाही सांगून टाकले.

आता सकाळ बद्दल कानाला खडा.

मुळात ब्लॉग वरचा एखादा लेख तुम्हाला तुमच्या मासिकात/पेपर मध्ये घ्यावासा वाटला म्हणजे त्याने तुमच्या पेपरात/मासिकात काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन होते म्हणूनच वाटला असेल ना?
"लेख ब्लॉगवर आहे, त्यामुळे तो नुसता घेऊ पण मानधन देणार नै".(स्वतः पैसे घेऊन मासिक/पेपर विकत देणारे लोक): तुम्ही एका डिश चे सॅम्पल चव घेतली.ती ठीक वाटली.सॅम्पल फ्री आहे.आता तुम्हाला पूर्ण पार्सल घेऊन जाऊन तुमच्या हॉटेलात अजून कोणाला तरी विकायचे आहे.पण सॅम्पल फ्री होते म्हणून तुम्हाला पूर्ण डिश फ्री हवीय.

रोचक लेख आणि प्रतिसाद.

लेखात तुम्ही लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे साहित्यातील ४ घटक नमूद केले आहेत.
असा विचार मनात आला की या चौघात मूलभूत लेखक आहे की वाचक ?
उद्या वाचनच बंद झाले तर कोण सार्वजनिक लिहीत बसेल ?

रोचक

काही लेखकांना तर लेखन न करण्याचे पण मानधन मिळू शकेल. मराठी आंतरजालावर आहेत असे काही जण.>>>> Lol Lol

वरील सर्वांना धन्यवाद !

साद,
"लेखक मूलभूत की वाचक", हा तुमचा प्रश्न विचारात पाडतो खरा. यानिमित्ताने २००८ सालचे नोबेल विजेते फ्रेंच लेखक Jean Le Clezio यांचे अवतरण आठवले:

‘’वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो’’.
…..

आता त्या वाक्यात भर घालतो:
आणि लेखनाला मानधन मिळावे ही तर आमची इच्छा असतेच !! Bw

.... वाचकच नसले तर ? .......
शक्यता अगदीच कमी नाही.

ई-मेल किंवा व्हॅट्सऍपवर आलेले काहीही १०० शब्द किंवा ४-५ ओळींपेक्षा जास्त असेल तर 'लक्षपूर्वक' पूर्ण वाचल्या जाणे दुर्मिळ होत आहे. त्यामुळे जालावरील किंवा पुस्तकातील लेखन वाचणारी जमात आदरास पात्र आहे. ह्यांचीच संख्या रोडावली तर कोण प्रकाशक, कोण संपादक, कोण लेखक अन कसले मानधन.

एक आशादायक बातमी !

नुकतेच दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूण येथे झाले. त्यातील "वाचनसंस्कृती टिकून राहील" या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा इथे :

https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/the-culture-of-reading-w...

रोचक लेख आणि प्रतिसाद.

> या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! > हे काय झेपलं नाही...

> काही लेखकांना तर लेखन न करण्याचे पण मानधन मिळू शकेल. मराठी आंतरजालावर आहेत असे काही जण.> कोणेय ते?? नावं सांगा बरं Proud

> लेख ब्लॉगवर आहे, त्यामुळे तो नुसता घेऊ पण मानधन देणार नै > हे बरोबर वाटतंय मला.ै

> हे काय झेपलं नाही...>>>>>
बरोबर. असा प्रसंग दुर्मिळ असल्याने आपल्याला झेपत नाही खरा. Bw

ते लेखक लैच थोर असल्याने त्यांच्या बौद्धिक श्रमांचा मोबदला आहे तो !

काही लेखकांना तर लेखन न करण्याचे पण मानधन मिळू शकेल. मराठी आंतरजालावर आहेत असे काही जण.<<<

Rofl

> ते लेखक लैच थोर असल्याने त्यांच्या बौद्धिक श्रमांचा मोबदला आहे तो ! >
लेखक कितीही थोर असले तरी तो लेख स्विकारण्याच्या लायकीचा नव्हता.
हा नाकारचा अपमान(?) कमी करायला मलमपट्टी म्हणून पैसे दिले का असे मला (त्या लेखकाच्या जागी असते तर) वाटले असते. मी तो चेक एन्कॅश केला नसता.

प्रकाशकांच्या जागी असते तर इतर नाकारलेल्या लेखांसाठी जी पॉलिसी आहे तिच वापरली असती. लै थोर नाव वगैरे बाजूला ठेवलं असतं.

पूर्वप्रकाशित लेखाला दुसरीकडे छापल्यास मानधन नाही, हा प्रकाशकांचा मुद्दा मला तरी पटत नाही.

एखाद्या नाटकाचे हजार प्रयोग होतात तेव्हा प्रत्येक प्रयोगाचे मानधन नाटककाराला देतातच ना.
हेच धोरण सर्व लेखकांना हवे.

(माझा नाही, मी इतकी लोकप्रिय वगैरे नाही ) समजा एखाद्या खूप सोशल मीडिया लोकप्रिय लेखकाचा लेख ब्लॉगवर खूप लोकांनी वाचला, त्याना आवडला, आणि या वाचकामध्ये एखाद्या मासिकाचा/वृत्तपत्राचा संपादक असला आणि त्याला हा लेख घेऊन तो विकत असलेल्या(किंवा त्या विक्री च्या प्रॉफिट मधला हिस्सा घेत असलेल्या) मासिकात टाकून त्याची व्हॅल्यू/खप वाढवावा वाटला तर त्याबद्दल ब्लॉग लेखकाला फक्त 'लेख पूर्व प्रकाशित आहे म्हणून' 0 मानधन देणे न्याय्य?

म्हणजे, मला माझ्या ज्वेलरी शोकेस साठी मॉडेल म्हणून ऐश्वर्या राय हवीय.पण ती 5 सेकंदाचे 5 लाख घेते.म्हणून मी सोसायटीत राहणाऱ्या एका सुंदर मुलीला जाहिरात करतेस का विचारले.तर मी तिला 500/5000 न देता फुकट काम करायला लावावे का?
(उपमा चुकतेय का ☺️ जाऊदे.इथे 'मुलीचे सौंदर्य=ब्लॉगवर वाचलेला आणि चांगला वाटलेला एखादा लोकप्रिय लेख/कथा' असा अर्थ लावून घ्या)

१००% सत्य
पण इथे प्रश्न काय येतो तर बहुतेक वेळेस हौशी किंवा नवीदित लेखक फुकट तर फुकट लेख प्रसिद्ध होतोय ना म्हणून अशा संपादकांना लेख प्रसिद्ध करण्याची परवानगी देतात आणि यातूनच बरेच अशा वृत्तीचे संपादक फायदा उपटतात.

बहुसंख्य मराठी लेखक यांचा चरितार्थ त्यावर चालत नसल्याने फारसे पैसे मिळाले नाही तरी त्यांचे नडत नाही.

मग साहित्याची सेवा असा मुलामा देऊन ते होणारा अन्याय सहन करत असतात.

कारण दुर्दैवाने त्यांच्याकडे याला उपाय काहीही नसतो.

धन्यवाद. वरील सर्वांशी सहमत.

नियमित लिहिणाऱ्या हौशी लेखकाने 'मानधन नसल्यास लिहिणार नाही' अशी भूमिका व्यावसायिक प्रकाशकांशी घेणे, हाच यावर उपाय आहे.

सध्याचा सीन अजूनच वेगळा आहे.
बाला आणि छपाक बद्दल येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा तर प्रसिद्ध नसणाऱ्या लेखकांनी आपल्या चांगल्या स्क्रिप्ट वाचायला दिल्या, त्यावर चांगला सिनेमा बनू शकेल या आशेने.आणि प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि कलाकार यांनी याच कथेला मेकअप करून वेगळी कथा वेगळ्या माणसाकडून लिहवून घेऊन वेगळा चित्रपट बनवला.पैसेही कमावले.
आता चांगल्या कथा किंवा साहित्य मीडिया हाऊस कडे घेऊन जाताना बहुतेक लोक आधी एक वेगळीच कथा घेऊन जातील, आणि मग खरोखर त्यांच्या कथेवर त्यांना घेऊन, क्रेडीट्स मध्ये नाव लिहून, पैसे देऊन खात्रीपूर्वक पिक्चर बनणार असेल तेव्हाच पिशवीतून खरी कथा बाहेर काढतील ☺️☺️
खूप गुंतागुंत आहे यात.

Pages