लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

Submitted by कुमार१ on 1 January, 2020 - 09:12

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
.........

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..

सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणीही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय (स्वीकार/नकार) लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा:

बौद्धिक श्रमांचे औद्योगिक जगातले मूल्य याहून कितीतरी जास्ती असते हे आम्ही जाणतो. परंतु, आमच्या आर्थिक मर्यादेत आम्ही इतकेच मानधन देऊ शकतो. तथापि आपणास ही रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास निर्णय कळवू”.

अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश, आभाराचे पत्र आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......

आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था तत्त्वनिष्ठ कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.

अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे स्पष्ट आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. पत्रात खाडाखोड करून लेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........

पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका पुस्तकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
........

आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा. अन्यथा लेखकांना ‘गृहीत’ धरण्याची प्रकाशकांची वृत्ती वाढीस लागते.
…………………………

आता एका दैनिकाचा अजब अनुभव. त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर आहे. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहितात – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देतात. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ बे - डर,

डॉ. कुमारांसारखे प्रश्न मलाही पडले होते, तुमच्यामुळे 'इन्सायडर व्ह्यू' मिळाला, अनेक आभार !

थोडक्यात पूर्णवेळ 'लेखक' म्हणून पुरेशी अर्थप्राप्ती होऊन जीवन जगणे शक्य नाही असाच निष्कर्ष निघतोय Happy

>>>थोडक्यात पूर्णवेळ 'लेखक' म्हणून पुरेशी अर्थप्राप्ती होऊन जीवन जगणे शक्य नाही असाच निष्कर्ष निघतोय >>>
त्रिकालाबाधित सत्य....
पूर्वी प्रथितयश लेखकही नोकरी करत होते...
आता परिस्थिती अजून खराब असावी...जे थोडके वाचक उरलेत तेही e-data वाचत असावेत. खूप कमी लोक परंपरागत पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्र वाचत असावेत...
बे-डर यांचे अनुभव वाचल्यावर कुठलाही स्वाभिमानी लेखक आपला स्वाभिमान या बेमुर्वतखोर लोकांकडे गहाण टाकणार नाही...
बौद्धिक संपदेच्या युगात हे घडतंय याचं वाईट वाटतं.

द सा +१११
......
हौशी लेखकांना मिळणारे मानधन म्हणजे विडीकाडीचा खर्च असे गमतीने म्हणतात !

गेल्या ३० वर्षात मला दोन, तीन व चार अंकी रुपयात मानधन मिळाले. आम्ही कौटुंबिक पातळीवर ती रक्कम एका दिवसात संपवून आनंद कसा मिळवायचो ते सांगतो.

दोन अंकी मिळत होते तेव्हा त्या रकमेतून दोघांचा एक चित्रपट पाहाणे व्हायचे.

तीन अंकी मिळू लागले तेव्हा मुले शाळेत होती. ती रक्कम त्यांच्या हातात देऊन त्यांना हवा तो खाऊ आणा असे सांगायचो.

चार अंकीच्या वेळेस संपूर्ण कुटुंबाचे एखाद्या मनपसंत हॉटेलमध्ये छान भोजन व्हायचे.

माझे लोकसत्ता ( लोकरंग वास्तुरंग आणि चतुरंग ) मध्ये लेख प्रकाशित झाले आहेत. आणि मी न मागता त्याच मानधन मला मिळालं आहे. ते अगदीच प्रतिनिधीक आहे. पण मिळालं आहे.

माझा तुळशीच्या लग्ना वरचा लेख फेसबुक वर वाचून एका नियत कालिकाने प्रसिद्ध करू का म्हणून विचारले , मी "काही मोबदला देणार असाल तर करा " सांगितले . त्यानी ही इमाने इतबारे चेक दिला.

मी अगदीच हौशी, स्वतःच्या आनंदासाठी लिहिणारी असल्याने , तसेच मला उत्पन्नाचं दुसरं साधन असल्याने मिळालं त्यात खुश झाले पण लेखन व्यवसाय म्हणून करणे खूप कठीण असेल असे वाटतेय.

कुमार १

भन्नाट सेलिब्रेशन होतं की तुमचं...
Happy
हल्ली साहित्य अकादमी अवार्ड किंवा तत्सम पुरस्कार मिळालेली पुस्तकं किती लोक वाचत असावेत ?

द. सा. Happy
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही. पण अभिजात पुस्तकाची एक मजेशीर व्याख्या आहे ती अशी :

"अभिजात म्हणजे जे पुस्तक प्रत्येकाला वाचायची इच्छा असते परंतु प्रत्यक्षात कोणीच वाचत नाही ते !

(मूळ वाक्य इंग्लिश आहे. त्याचा हा भावानुवाद).

<<<"अभिजात म्हणजे जे पुस्तक प्रत्येकाला वाचायची इच्छा असते परंतु प्रत्यक्षात कोणीच वाचत नाही ते !>>>
हसावं की रडावं...
कळत नाही....

आताच्या परिस्थितीत यात थोडा बदल सुचवतो :

अभिजात साहित्य म्हणजे 'माझ्याकडे आहे' हे फक्त मिरवण्यासाठीचे साहित्य. कोणीही न वाचलेले Happy

फार थोडे सन्माननीय अपवाद आहेत.

https://www.maayboli.com/node/13478

ह्या कथेसाठी मला 100 रु बक्षिस उर्फ मानधन मिळाले होते.

तरुण भारत पुढारी इ मध्ये आरोग्य लेख लिहिले की 120 रु मानधन मिळत होते

@ BLACKCAT
खूप सुंदर लिहिलींय कथा...
लिंकसाठी धन्यवाद

अनिंद्य +१

BLACKCAT> सुंदर लिहिलींय कथा

>>
बे-डर यांचे अनुभव वाचल्यावर कुठलाही स्वाभिमानी लेखक आपला स्वाभिमान या बेमुर्वतखोर लोकांकडे गहाण टाकणार नाही...>>> +९९९

प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ९ जून २०२२ रोजी त्यांचा राजहंस प्रकाशनाकडून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एखाद्या लेखकाचा अशा प्रकारे सत्कार-सन्मान करण्याचा हा मराठीतला दुर्मीळ प्रसंग आहे.
https://www.aksharnama.com/client/article_detail/6100

अभिनंदन !!

सध्याचे लेखन-पर्यावरण यावर कोरडे ओढणारा एक लेख:
https://www.aksharnama.com/client/article_detail/6537

त्यातले हे काही निवडक:
मराठीत पूर्णवेळ लिखाण करून जगता येईल, अशी शक्यताच नाही. पुस्तकं विकत घेऊन वाचणारे किती अन् लेखक मानधनातून कमाई करतो किती, याचा काहीही पुरावा नाही. पुणे व मुंबई या दोन शहरांत लेखक म्हणून जगून दाखवणारे मूठभर सापडतील लोक. पण त्यातला कुणी बिनलग्नाचा, कुणी बायकोच्या नोकरीवर टिकून राहिलेला, कुणी वडिलोपार्जित संपत्तीच्या जिवावर, तर कुणी शेतीच्या उत्पन्नावर उभा ठाकलेला.

मोलें घातले खरडाया…
प्रवीण टोकेकर यांचा एक सुंदर लेख

https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?One#currPage=1
आजच्या ( १५ मे ) मुख्य अंकात पानवर आहे.

अमेरिकेच्या हॉलीवुडमधील चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे लेखक सध्या संपावर गेलेले आहेत. मागणी अर्थातच:
तुटपुंजे मानधन वाढवावे
ही आहे !

<< तुटपुंजे मानधन वाढवावे
ही आहे ! >>
काही दिवसांनी Chat GPT मुळे हे लेखक लोक बाराच्या भावात जाणार आहेत. हौस म्हणून ठीक आहे, पण शहाण्याने पूर्णवेळ लेखक बनू नये. नाहीतर उपाशी राहायची खात्री.

उबो - चॅट जीपीटी ने "नवे" लेखक का जातील बाराच्या भावात? उद्या शेक्सपियर, वुडहाउस किंवा अगदी पुलंच्या शैलीत चॅट जीपीटी लेख लिहून देईल. पण नवीन शैली एआय निर्माण करू शकत नाही. म्हणजे हजारो वेगळ्या "शैली" मधे लेखासारखे वाटणारे मजकूर फॅक्टरीसारखे काढू शकेल पण ते जेन्युइनली लेखासारखे होतील का नाही याची काहीच खात्री नाही.

हे वाचले पण तरीही मला वाटत नाही. अर्थात चॅट जीपीटी आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स काय काय करू शकतात हे मला पूर्ण समजले आहे असे अजिबात क्लेम करत नाही. पण जितके वाचले/पाहिले आहे त्यावरून सध्यातरी हे मत आहे.

जेथे संदर्भाकरता डेटा उपलब्ध आहे तेथे अचाट प्रकारे एआय टेक्स्ट निर्माण करू शकेल. उदा: क्रिकइन्फो चे स्कोअरकार्ड वाचून मॅच चे वर्णन ते सहज करू शकेल - जर अशी हजारो स्कोअरकार्ड्स व त्यासंदर्भातील लेख यातून ट्रेनिंग दिले गेले. पण जेथे संदर्भच उपलब्ध नाही तेथे एक माणूस जे पूर्णपणे स्वतःच्या कल्पनाशक्तीतून निर्माण करू शकतो - आधी कोणत्याही प्रकारे आस्तित्वात नसलेले- ते एआय करू शकत नाही.

दुसरे - आणि जास्त महत्त्वाचे- म्हणजे जेव्हा एखादा कलावंत एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा वाचकांना/रसिकांना त्याची जी अनुभूती मिळते - त्यांची संकल्पना परस्पर हे रसिक्/वाचक करून चॅट जीपीटीला "असे काहीतरी लिही" असे सांगणे व त्यातून एआय तसे काहीतरी निर्माण करणे याचीही शक्यता फार कमी आहे. कारण असे काहीतरी वाचायला हवे आहे हे मुळात कोणालातरी सुचायला हवे.

<< जेथे संदर्भच उपलब्ध नाही तेथे एक माणूस जे पूर्णपणे स्वतःच्या कल्पनाशक्तीतून निर्माण करू शकतो >>
मान्य, पण असे शून्यातून विश्र्वनिर्मिती करणारे किती लेखन असते आणि असे किती लेखक लागतील त्याला? बाकीचे अनेकदा खर्डेघाशीच करत असतात.

मला वाटत नाही मानवी भावभावनांची आंदोलने व नात्यातील नाजूक परस्पर संबंध आदि काही व्हेरिएबल्सचा, चॅट्जीपीटी ताळमेळ घालू शकेल. त्याला जर मी सांगीतलं हां एक स्त्री व पुरुष यांच्यात डिव्होर्स झाली व मुलाची फरफट झाली पण मुलाने त्यावर मात केली. तर चॅट्जीपीटी काहीतरी आराखडा बनवु शकेल पण त्यात त्याला रंग कितपत भरता येतील?

उदा १२ अँग्री मेन किंवा 'एक रुका हुआ फैसला' यात किती व्यक्तीचित्रणाचे बारकावे आहेत, अंडरकरंटस आहेत. ते लिहायला लेखकच हवा.

फा शी सहमत आणि उबोंच्या खर्डेघाशी पोस्टशी पण सहमत.
>> मानवी भावभावनांची आंदोलने व नात्यातील नाजूक परस्पर संबंध आदि काही व्हेरिएबल्सचा, चॅट्जीपीटी ताळमेळ घालू शकेल. त्याला जर मी सांगीतलं हां एक स्त्री व पुरुष यांच्यात डिव्होर्स झाली व मुलाची फरफट झाली पण मुलाने त्यावर मात केली. तर चॅट्जीपीटी काहीतरी आराखडा बनवु शकेल पण त्यात त्याला रंग कितपत भरता येतील? >> असले मानवी भाव-भावनांचे आराखडे आणि रंग भरणे टाईप पैशाला पारसी Lol पासरी कथा कादंबर्‍या सापडतील. डिव्होर्स झालेल्या मुलाची फरफट हे अत्यंत बोरिंग आणि हमखास टिपं गाळू मट्रिल तयार करण्यात चॅटजीपीटीला बिझी ठेवणं असले देसी आंटी अ‍ॅटॅक यावर आत्ताच कॉपीराइट घेऊन टाकतो... बोलेतो... नवे सायबर अ‍ॅटॅक ठरतील. Wink

असलं जगातलं बहुतांश खर्डेघाशी लेखन एआय मॉडेलला सुरुवात आणि शेवट देऊन आणि पुरेसं ट्रेन करुन ते आरामात करेल असं वाटतं.

पाथब्रेकिंग प्रकार लेखनातच नाही यच्चयावत कुठल्याही क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकाच असतो. ते अर्थात एआयला सध्यातरी जमणार नाही. किंवा इव्होल्युशनच्या बेसिक तत्त्वानुसार एआय म्युटेशन्स विल बी कन्सिडर्ड पाथब्रेकिंग थिंगी! थोडक्यात चाकोरी सोडून एआयने काही निर्माण केलं की ती कलाकृती ठरेल. तोवरची निर्मिती वायरल करायला देसी अंकल आहेतच.

हल्ली फेबु, व्हॉअ‍ॅ, इन्स्टा वरच्या एकसुरी कंटेट क्रिएटर्सनी वात आणलाच आहे. त्यांच्या कल्पना आणि एआयच्या चरकातुन निघणार्‍या कल्पना यांत कदाचित एआय मध्ये एक अनसरटंटी असल्याने व्हॉअ‍ॅपेक्षा बरे निबंध निघतील आणि अखिल मानव जात देसी अंकल आंंटींना या व्हॉटॅसअ‍ॅप गर्तेतून बाहेर काढल्याबद्दल दुवा देईल. आमच्या मराठीच्या बाईंना यातलं काहीही न समजल्याने त्या आपल्या एआय शाप की वरदान विषय देऊन मोकळ्या होतील.
फा, >> "असे काहीतरी लिही" असे सांगणे >> हीच 'की' असेल. मला वाटतं. 'असे काही लिही' सांगू शकणारी व्यक्ती लेखक म्हणवून घेईल.

सध्यासुद्धा मूळ कथा एकाची असते. ती फुलवणारे तासावर काम करणारे कारागीर असतीलच ना. ते तासावर काम करणारे जाऊन तिकडे एआय येईल.

पैशाला पारसी कथा कादंबर्‍या सापडतील. >>>
"पैशाला पासरी" ओ, पारशी साहित्याला ओढू नका उगाच यात Wink Proud
एआय शाप की वरदान विषय देऊन मोकळ्या होतील.>>> Lol आणि मी एआय झालो तर.. !

------

झी मराठीच्या मालिका अगदी "यंत्रवत" लिहिलेल्या असतात, चॅट जिपीटीने यात सुधारणा व विविधता येईल. Happy

चांगली चर्चा.

म्हणजे जेव्हा एखादा कलावंत एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा वाचकांना/रसिकांना त्याची जी अनुभूती मिळते -
>>> +१११११११

मराठी पब्लिक आमच्याकाळी कशा घिशापिटया मालिका येत असले फॉरवर्ड करायला आणि ते पुढे ढकलायला कमी करणार नाही ही एक भीती आहेच.
हल्ली नाही का आपण कसे डबा ऐसपैस खेळायचो आणि भाड्याने सायकली आणून चालवायचो आणि नाट्याठोंम म्हणायचो असल्या सिलेंडरचा गॅस पुरवून पुरवून वापरतात तीच गत होण्याची गॅरंटी.

Pages