लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

Submitted by कुमार१ on 1 January, 2020 - 09:12

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
.........

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..

सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणीही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय (स्वीकार/नकार) लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा:

बौद्धिक श्रमांचे औद्योगिक जगातले मूल्य याहून कितीतरी जास्ती असते हे आम्ही जाणतो. परंतु, आमच्या आर्थिक मर्यादेत आम्ही इतकेच मानधन देऊ शकतो. तथापि आपणास ही रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास निर्णय कळवू”.

अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश, आभाराचे पत्र आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......

आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था तत्त्वनिष्ठ कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.

अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे स्पष्ट आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. पत्रात खाडाखोड करून लेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........

पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका पुस्तकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
........

आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा. अन्यथा लेखकांना ‘गृहीत’ धरण्याची प्रकाशकांची वृत्ती वाढीस लागते.
…………………………

आता एका दैनिकाचा अजब अनुभव. त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर आहे. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहितात – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देतात. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाला आणि छपाक >> हिंदी चित्रपट
मूळ लेखकाने दिलेली कथा त्यांना श्रेय न देता वापरली असा वाद आहे.

साद आणि अनु,
मला काय वाटत सांगते
• ब्लॉगवरचा लेख लेखकाने स्वतःहून आधीच पब्लिक डोमेनमधे फुकटात वाचायला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे त्याला त्यातून मानधन मिळवायची आशा/अपेक्षा नव्हती असा अर्थ निघतो.
• खास, केवळ तो लेख कागदी पानांवर वाचायचा म्हणून कोणी ते मासिक विकत घेणार नाहीय. म्हणजे प्रकाशकांना त्या पर्टिक्युलर लेखामुळे वेगळा ग्राहक मिळणार नाहीय.

नाटकाचे प्रयोग, जाहिरात मॉडेल हे लॉजीक इथे लागत नाही (बहुतेक).

समजा एका नाटकसंचाने त्यांचे एक नाटक युट्युबवर स्वतःच टाकले. नंतर दुसऱ्याएका नाटकप्रेमी मंडळाने ५ नाटकांचा शो आयोजित केला. त्यात ४ लाइव्ह नाटकांसोबत हे १ युट्युबवरचे नाटकदेखील दाखवले. तर सगळ्यांना समान मानधन द्यायचे का? ५ नाटकांच्या शोसाठी तिकीट आहे.

मनस्वीता , धन्यवाद.

फक्त छापील जमान्यातील एक आठवण:
तेव्हा प्रकाशकांचा लेखकावर वरचष्मा असायचा. तेव्हा विंदा करंदीकर असे म्हणायचे,

"आमचे प्रकाशक आमच्या हस्तलिखितांवर इतके प्रेम करतात, की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना सहन होत नाही !"

एमी,
>>नाटकाचे प्रयोग, जाहिरात मॉडेल हे लॉजीक इथे लागत नाही (बहुतेक).>>>

असहमत. नाटक काय किंवा लेखन काय , बौद्धिक संपदा हाच मुद्दा आहे.
शाळा-कॉलेजमध्ये संमेलनात जरी ते नाटक केले (अव्यावसायिक), तरी देखील त्या लेखकाची परवानगी घेणे व मानधन द्यावेच लागते.

बुलेट वाला पहिला पॉईंट पटला नाही.दुसरा वाला पटतोय.
ब्लॉग/फेसबुकवर/मराठी साईट वर लिखाण हा बिटा व्हर्जन चा प्रकार असू शकतो(आपले लिखाण लोकांना कितपत आवडतंय हे ब्लॉग/साईटवर आजमावून नंतर प्रोफेशनल लिखाण.)

ब्लॉगवरच्या लेखात फेरफार करून, तो अधिक चांगला बनवून देतो, जवळपास नवीन असल्यासारखाच. मग मानधन द्याल का?
∆ असे विचारावे मग लेखकाने प्रकाशकला.

किंवा इतरांच्या ४०-५०% मानधन द्याल का असे विचारावे.

इतरांच्याइतकेच मानधन मागणे बरोबर नाही. असे मला वाटते.

> शाळा-कॉलेजमध्ये संमेलनात जरी ते नाटक केले (अव्यावसायिक), तरी देखील त्या लेखकाची परवानगी घेणे व मानधन द्यावेच लागते. > परवानागी घ्यावी लागते आणि श्रेय द्यावं लागतं. मानधन कुठून देणार? नको मग राहुदेत तुमचं नाटक दुसऱ्या कोणाचतरी बघतो म्हणतील. कोणीनं कोणी भेटेलच फक्त नाव-प्रसिद्धीसाठी काम करणारं.

मानधन कुठून देणार? >>>

काही नाटकांच्या पुस्तकाच्या पहिल्या पाना मागे अशी टीप मी वाचली आहे:
* या नाटकाचा कुठेही प्रयोग करण्या आधी या पत्त्यावर रुपये **** मानधन पाठवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल .

अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल .

असं लिहूनही काहीही होत नाही. कारण मिळणारं मानधन इतकं कमी असतं कि कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलाला एक अभेटीची पैसे त्यापेक्षाजास्त असतात. आपल्या न्यायव्यवस्थेत बरीच वर्षे आणि पैसा घालवून अगदी भरपाई मिळाली तरी एकंदर हिशेब केवळ त्या माणसाला धडा शिकवला एवढेच मानसिक समाधान( सूडाचे) सोडले तर हाती काहीही लागत नाही.

ब्लॉगवरचा लेख लेखकाने स्वतःहून आधीच पब्लिक डोमेनमधे फुकटात वाचायला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे त्याला त्यातून मानधन मिळवायची आशा/अपेक्षा नव्हती असा अर्थ निघतो.

हे पटले नाही

मानधन का म्हणतात त्याला? मोबदला किंवा लेखाची किंमत वगैरे का नाही? मानधन नेहमी कमीच असत न, अन शिवाय तेही देणाऱ्यावर अवलंबून?

फार मोठा मान देऊन फारच थोडे धन देतात. म्हणून मानधन म्हणत असावेत. पवना काठचा धोंडी मध्ये पगार आणि नजराणा चा भेद फार सुंदर सांगितला आहे.

रॉनी,
तुमचा मुद्दा बरोबर आहे. माझा अंदाज सांगतो:
१. औद्योगिक क्षेत्रात एखाद्याने बौद्धिक श्रम केल्यास त्याचा जो परतावा मिळतो तो दणकून असतो. = मोबदला.

२. कलेच्या क्षेत्रात (विशेषतः लेखन) तशाच प्रकारच्या श्रमांचा परतावा तुलनेने कमीच असतो. = मानधन .

पण,
जेव्हा कलाकार वलयांकित होतो तेव्हा मात्र तो सरळ "मोबदल्याची" मागणी करतो, जी रक्कम बरीच मोठी असते.
अशा काही आंतरराष्ट्रीय लेखकांना पुस्तक लिहायला सुरुवात करण्या आधीच मोठी रक्कम दिली जाते.

माझे पुस्तक छापून द्या, असे म्हणत एखाद्या लेखकाने स्वतःच पैसे खर्च केले (निवडणूक प्रचारासारखे) तर मग त्याला काय म्हणणार? इन्व्हेस्टमेंट?

<<< मानधन कुठून देणार? नको मग राहुदेत तुमचं नाटक दुसऱ्या कोणाचतरी बघतो म्हणतील. >>>
माझ्या सासरी सोसायटीमधील हौशी मंडळी एका वर्षी पु.ल.देशपांडे यांचे १ नाटक करणार होते. तेव्हा ते काहीजण मानधनाचा चेक घेऊन प्रत्यक्ष पुण्याला गेले. तेव्हा सुनीताबाईंनी त्याला नकार दिला होता. मानधन नको, पण तरी जर नाटक केलेत तर केस करीन असे म्हणत अक्षरशः हाकलून दिले. मग त्यांनी दुसरे नाटक केले. असे पण होऊ शकते. (ही सत्य घटना आहे. कदाचित त्यांना ते नाटक फक्त व्यावसायिक हवे होते, हौशी नको होते.)

उपाशी बोका,
बरोबर. प्रस्थापित लेखक आपल्याला हव्या तशा अटी व शर्ती घालू शकतो. वर मोबदलाही मागतो.

बिच्चारे हौशी लेखक - त्यांना मानही नाही अन धनही नाही !
Bw

@BLACKCAT
इथे मुद्दा चोरीचा नाहीये, तर योग्य मानधन न मिळण्याचा आहे.
मुळात लेखक प्रकाशकांकडे जातात का? आजच्या जगात स्वतःचे लेखन स्वतः प्रकाशित करणे सहज शक्य आहे. शिवाय त्यामुळे लेखनाचा प्रताधिकार मूळ लेखकाकडेच राहील, तो प्रकाशकाला विकायची गरजपण उरणार नाही.

<<<
• ब्लॉगवरचा लेख लेखकाने स्वतःहून आधीच पब्लिक डोमेनमधे फुकटात वाचायला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे त्याला त्यातून मानधन मिळवायची आशा/अपेक्षा नव्हती असा अर्थ निघतो.
>>>
जे लेखन करून पैसे कमवायचे आहेत, ते आंतर जालावर टाकू नये कारण तिथून होणारी उचलेगिरी थांबवणे अशक्य आहे. अर्थात कुठलेही लिखाण ब्लॉगवर जरी टाकले तरी त्याचा प्रताधिकार लेखकाकडेच असतो, त्यामुळे ब्लॉगवर टाकले म्हणजे ते फुकटच हे अ‍ॅमीतैंचे म्हणणे चुकीचे आहे.

<<<
• खास, केवळ तो लेख कागदी पानांवर वाचायचा म्हणून कोणी ते मासिक विकत घेणार नाहीय. म्हणजे प्रकाशकांना त्या पर्टिक्युलर लेखामुळे वेगळा ग्राहक मिळणार नाहीय.
>>>
नाहीतरी तुमचे ग्राहक मासिक घेणारच आहेत आणि तुम्हीपण छापणारच आहात तर एखादा लेख घुसवा त्यात फुकटात, असे सांगण्यासारखे झाले.

> त्यामुळे ब्लॉगवर टाकले म्हणजे ते फुकटच हे अॅमीतैंचे म्हणणे चुकीचे आहे. > काय चुकीचं आहे त्यात कळाल नाही. इंटरनेट असणाऱ्या सगळ्या वाचकांना 'फुकटात वाचायला उपलब्ध' आहेच ना ते ब्लॉगवरच लेखन?
===

ब्लॉगवरचा लेख लेखकाने स्वतःहून आधीच पब्लिक डोमेनमधे फुकटात वाचायला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे त्याला त्यातून मानधन मिळवायची आशा/अपेक्षा नव्हती असा अर्थ निघतो. ->
अनु आणि ब्लॅककॅट दोघांना हे पटले नाहीय.
का पटले नाही कारण सांगू शकाल का?

> इथे मुद्दा चोरीचा नाहीये, तर योग्य मानधन न मिळण्याचा आहे. > +१ मूळ लेखकाची परवानगी घ्यायला हवी, त्याला श्रेय द्यायला हवे मान्य.

पण आधी इतरत्र कुठेही प्रकाशित न झालेल्या लेखा'इतकेच' मानधन त्याला मिळायला हवे ही अपेक्षा का?
===
ता.क. पब्लिक डोमेन ऐवजी पब्लिक स्पेस शब्द वापरायला हवा होता बहुतेक मी

'लेखन फुकट वाचायला उपलब्ध असणे' आणि 'लेखन फुकट उपलब्ध असणे आणि लोकांना ते त्यांच्या कमर्शियल व्हेंचर मध्ये एक भाग म्हणून फुकट वापरून पैसे कमवायला परवानगी असणे' हा तो फरक आहे.प्रथितयश लेखकाकडून पत्र लिहून मागवलेल्या नव्या लेखाइतके नसले तरी 'मानधन मिळावे' ही अपेक्षा असणे चुकीचे नाही.
यापैकी दुसरी परवानगी बरीच ओपन सोर्स सॉफ्टवेअर पण देत नाहीत.
कोणताही चांगला/मध्यम/वाईट पण अर्थ कळणारा ए4 साईझ चा लेख लिहायला वेळ , मेहनत आणि नीट कल्पना तयार होईपर्यंत विचार याची गुंतवणूक असते.तो फुकट साईटवर टाकला म्हणजे 'मानधनाची अपेक्षा नाही/लायकी नाही/हक्क नाही' असा होत नसावा.

> 'लेखन फुकट उपलब्ध असणे आणि लोकांना ते त्यांच्या कमर्शियल व्हेंचर मध्ये एक भाग म्हणून फुकट वापरून पैसे कमवायला परवानगी असणे' हा तो फरक आहे. > ओके. समजलं. 'व्यावसायिक कारणासाठी वापर आणि त्यातून इतरांनी पैसे कमावणे' यावर आक्षेप आहे.

पण त्यातले किती पैसे या पर्टिक्युलर लेखामुळे कमावलेत हे कसं कळणार? वरचा दुसरा बुलेट पॉइंट
• खास, केवळ तो लेख कागदी पानांवर वाचायचा म्हणून कोणी ते मासिक विकत घेणार नाहीय. म्हणजे प्रकाशकांना त्या पर्टिक्युलर लेखामुळे वेगळा ग्राहक मिळणार नाहीय.
+
आधी इतरत्र कुठेही प्रकाशित न झालेल्या लेखा'इतकीच' या पूर्वप्रकाशित लेखाची किंमत नसणार आहे.
===

> प्रथितयश लेखकाकडून पत्र लिहून मागवलेल्या नव्या लेखाइतके नसले तरी 'मानधन मिळावे' ही अपेक्षा असणे चुकीचे नाही. >
हे ठीक आहे. यावर दोन उपाय सुचवले आहेत मी
१. ब्लॉगवरच्या लेखात फेरफार करून, तो अधिक चांगला बनवून देतो, जवळपास नवीन असल्यासारखाच. मग मानधन द्याल का? असे विचारावे मग लेखकाने प्रकाशकला.
२. किंवा इतरांच्या ४०-५०% मानधन द्याल का असे विचारावे.
३. किंवा वर उपाशी बोका म्हणताहेत तसं > जे लेखन करून पैसे कमवायचे आहेत, ते आंतर जालावर टाकू नये >
४. किंवा मानधन मिळणार नसेल तर माझा लेख वापरू नका सांगणे.
===

मानधन मिळायची 'लायकी नाही/हक्क नाही' <- असं मी म्हणलं नाहीय. प्रकाशकांच्या (आणि वाचकांच्या) दृष्टीने पहिल्यास 'पूर्वप्रकाशित' लेखनाची किंमत 'अप्रकाशित'पेक्षा कमीच असणार आहे.
===

मासिकात किंवा वर्तमानपत्रात प्रकाशीत झालेला लेख आंतरजालावर 'किती काळाने' टाकायला परवानगी देतात प्रकाशक?
===

१. एका मासिकात प्रकाशित झालेला लेख दुसर्या मासिकातदेखील टाकता येतो का?
२. किती काळाने?
३. त्या पूर्वप्रकाशित लेखाचा किती मोबदला मिळतो?

बादवे सध्या काय रेट चालूय? किती मानधन मिळतं
१. वर्तमानपत्रातील एका लेखासाठी?
२. वर्षभर चालणाऱ्या लेखमालिकेसाठी?
३. मासिकसाठी?

> नाहीतरी तुमचे ग्राहक मासिक घेणारच आहेत आणि तुम्हीपण छापणारच आहात तर एखादा लेख घुसवा त्यात फुकटात, असे सांगण्यासारखे झाले. > Lol Lol
लेखक जर मानधनावर अडून बसला तर "नको मग राहुदेत तुमचा लेख, दुसऱ्या कोणाचातरी बघतो" म्हणतील प्रकाशक. कोणीनं कोणी भेटेलच फक्त नाव-प्रसिद्धीसाठी काम करणारं.

पर्याय दोघांकडे आहेत. ज्याला जो योग्य वाटेल त्याने तो निवडावा.

मी कमर्शियल ला चालेल असं रिलेव्हन्ट (कथा/कादंबरी) खूप कमी लिहिते, त्यामुळे सध्याचा रेट मासिकात वारंवार कथा पाठवणारे सांगू शकतील.
मुद्दे पटतात.

यापैकी दुसरी परवानगी बरीच ओपन सोर्स सॉफ्टवेअर पण देत नाहीत.
>>
"काही" ओपन सोर्स सॉफ्टवेअर सुद्धा देत नाहीत, असे म्हणायचे असावे बहुदा.....??
किंवा तुम्हाला creative commons म्हणायचे असावे?

Pages