ती, मी आणि बरंच काही :२ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 31 December, 2019 - 02:52

ती, मी आणि बरंच काही :२ . . .

दुपारी १.३२च्या झपाझप येणाऱ्या ट्रेनच्या आवाजाने ती पुन्हा भानावर आली. बॅग उचलून घरी निघून गेली.
मी मात्र विचारात तिथेच हरवून बसलो.

ती सांगते तशी किंवा तेवढी खराब स्थिती नव्हतीच तिच्या घरी, मी चार पाच वेळा तिच्या घरी सगळ्यांना भेटून बोलून आलोय. सुधारित विचारांची आहेत ती, आई प्रेमळ असली तरी कडक शिस्तीची आणि वडील बोल घेवडे.
भांडणाचं कारण दोघांची मतं एकमेकांना पटत नाहीत, किंवा पटवून घेत नाहीत, अगदीच छोट्या छोट्या गोष्टीवरून एखादं भांडण शिगेला पेटायचं. बाकी मनाने सगळे साफ वाटले.
आई गायची पारंपरिक, हिला खूप आवडायचं, पारंपरिक वरून शास्त्रीय कडे वळली आणि गुंतली. हिच्या मनाच्या तारा शास्त्रीय संगीतात जुळल्या. . .

हिचं कसं झालं सांगू, अपेक्षा माणसाला दुखावतात तेच काहीतरी झालं हिच्या बाबतीत अगदीच लहान पणापासून.
एकूण ३ भावंडं, मोठा भाऊ मग हि आणि नंतर लहान बहीण. पहिलाच मुलगा म्हणून त्याचे खूप लाड झाले, आणि सगळ्यात लहान म्हणून लहान बहिणीचे. मधल्या मध्ये हि गुरफटली. त्याचं इतकं काही नव्हतं. जरा मोठे झालो कि ते सगळं ठीक होणार होतं तोच आईची मैत्रीण शेजारी राहायला आली, आई प्रेमळ असल्याने आणि मैत्रिणीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना मदत वैगेरे करायची.
मैत्रिणीची एकच मुलगी ती आता ह्या तीन भावंडांत हक्काने राहायला लागली.
हिच्यापेक्षा एखाद वर्षानेच लहान असावी ती, त्या वेळेस हि तिसरी चौथीत असावी.
काही खाऊ आणलं कि आधी तिला वाटा, ह्यांना काही आणलं कि तेच तिलादेखील आणायचं, हिच्यालेखी तिच्या वाट्याचं प्रेम तिच्याकडे गेलं होतं.
त्यात त्या मुलीचे वडील नेहमीच हिला चिडवायचे तुला गौरावरून( कचऱ्यातून) शंखेतुन(शेण गोळा करायच्या खड्ड्यातून) उचलून आणली आहे, उगीच नाही तुझी आई त्या दोघांना जास्त प्रेम करते. आतातर पिंकीला (त्या मुलीला) पण प्रेम करते.
ते नेहमी हसण्यावारी असायचं पण ते सगळं मनात खोलवर खूप खोल दडत गेलं, साठत गेलं. मग ते मूक रडणं आणि खरोखरच आपल्यावर ती प्रेम करत नाही हे मनात ठसठसत गेलं. त्यात आई ज्यांना आवडत नव्हती त्यांनी देखील संधी साधून हिचं मन अजून कडू करून सोडलं.
ती प्रेम करत नाही मग त्यातून उपाय काय तर आईची मदत करायची आणि तिला जमेल तितकं खुश ठेवायचं. मुळात त्या प्रेमळ असल्या तरी कडक शिस्तीच्या होत्या.
हिचं आईवर खूप प्रेम, त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असायची ती. झाडलोट, अंथरून उचलणे, भांडी घासणे, कपडे धुणे, हळूहळू स्वयंपाक करायला प्रयत्न करू लागली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सातवी पर्यंत ती घरातील स्वयंपाक एकटीने करायला शिकली. दिसायला सावली असली तरी खूप सुंदर आणि हुशार.
तिसरीत असताना चाचणीत गणित विषय गेला तेव्हा आपल्यामुळे बाई आईला ओरडल्या ती गोष्ट तिने इतकी मनावर घेतली होती कि पुढच्या प्रत्येक वर्षी ती वर्गात पहिलीच यायला लागली आणि गणितात पूर्ण शाळेत पहिली यायची.
जे काही करायची सगळं आईसाठी पण तिचं हुशार असणं, मदत करणं, समजूतदार दिसणं गृहीत धरलं गेलं चुकून.
का तर हिच्यापेक्षा इतर दोघांवर लक्ष द्यायची जास्त गरज आहे असं समजून.
चुलत काकाचं किंवा शेजाऱ्यांचं लहान बाळ कधी घरी आणलं कि त्याला सगळे खूप प्रेम करायचे, आई तर खूपच तिला लहान मुलं खुप आवडायचे, मग हि त्यांच्याकडे पाहत बसायची, वाईट वाटायचं, आपण इतकं करून देखील आपल्याला ती तितकं महत्वाचं समजत नाही म्हणून आतल्याआत कुढत बसायची.

अपेक्षा काही मोठया नव्हत्या, आईने छोटी सारखं मलाही जवळ घ्यावं माझ्या केसांत तेल घालावं, तिच्या लहानसहान गोष्टीकडे लक्ष देते तसं आपल्याकडेही द्यावं. दादाने नेहमीपेक्षा एक दोन टक्के जरी जास्त मिळवले कि आई किती खुश होते पण आपण नेहमीच पहिले येतो तर ती म्हणते ती आहेच हुशार, ती पहिली येणारच.
पण मी तुझ्यासाठी पहिली येते, माझी हुशारी इतरांना नाही तुला दाखवायला पहिली येते, बाई तुला ओरडल्या म्हणून मी त्या गणितात शंभरपैकी नव्वदच्या खाली येत नाही, तू माझ्यामुळे आनंदी व्हावी म्हणून सगळं करते पण तिचं सगळं गृहीत धरलं गेलं चुकून.

लहान कोवळं मन ते, जे समजेल तसं मनात बसवत गेलं, ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त वैगेरे तिला काहीच नको होतं, तिला वैयक्तिक स्वतंत्र आई तिचं प्रेम आणि तिची जवळीकता हवी होती.
त्यांना देखील शेतातील कामं, घरातील कामं, इतर खूप कामं असायची, हि स्वतःला नीट संभाळतेय, स्वतः अभ्यास करतेय, घरचं कामं करतेय, त्यामुळे तिच्यावर इतरांपेक्षा कमी लक्ष देण्यात आलं,
त्यांचं काही चुकलं नाही ह्यात पण तिने केलेल्या सगळ्या कामांचं कौतुक मात्र करायला त्या विसरल्या माझ्या लेखी हे खूप महत्वाचं कारण असावं तिच्या ह्या मनस्थितीचं.

माझी आणि तिची पहिली ओळख प्रतिस्पर्धी म्हणून झाली. क्लासमध्ये नवीन मुलगी आली होती, तिच्या विषयी कुजबुज करण्याचं कारण एकच कि तिला गेल्या वर्षी गणितामध्ये शंभरपैकी सत्याण्णव मिळाले होते.
माझ्यासारखी टॉपर म्हणून मिरवणारी पाच सहा टाळकी काही प्रमाणात आतून खदखदत होती. जास्त भाव खाल्ला तर चांगलाच पाणउतारा करू वैगेरे ठरवून बसलो होतो आम्ही पण ती काहीतरी वेगळीच होती.
बोलेल त्याच्याशी मनापासून बोलायची नाहीतर गप्प ती गप्पच. शांत निव्वळ शांत.
ती सगळ्या विषयांत पुढे असायची पण तिला त्याचं काही घेणंदेणं नसायचं ती फक्त गणितात हवे तितके मार्क्स मिळालेत कि नाही तेच पाहायची.
तिची खूप प्रशंसा व्हायची पण साधी हसायची फक्त. जसं आम्हाला गड जिंकल्याची भावना व्हायची ना तशी तिच्या तोंडावर कधीच नसायची. अकरावी बारावी आम्ही सोबतच होतो.
तेव्हापासून आवडायची कि नाही माहित नाही पण क्लासमध्ये सगळ्यात आधी तिला शोधायला लागलो होतो. मैत्री आहे म्हणण्या इतकी ती बोलायची पण मग बारावी नंतर कॉलेज बदलले.
सहा सात महिने संपर्क नाही, दिसली नाही, मी हि विसरून गेलो होतो तिला. आणि अचानक एकदा स्टेशनवर दिसली एकटीच डोळे बंद करून कानात कॉर्ड घालून कडेला बसलेली.

मी कितीतरी वेळ तिच्या समोर बसलो होतो, तिला पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत, थोडी बदलली होती ती.
पहिल्यापेक्षा बारीक झाली होती पण सुंदर दिसत होती. आधी होते त्यापेक्षा भरपूर लांब केसं वाढली होती, राहणीमान तसंच साधं, नट्टाफट्टा नाही सिम्पल आणि स्वीट.

वीसेक मिनिटांनी तिने डोळे उघडले, मला समोर पाहून हादरलीच. स्वतःहून बोलली खूप माझ्याशी.
ती पुन्हा गवसली, कॉलेज वेगळे असले तरी दोघेही ह्याच स्टेशनवर उतरायचो. आणि हल्ली ह्याच स्टेशनवर भेटायला लागलो होतो.

जुनीच मैत्री नव्याने फुलली, फोन नंबर मिळाले, मेसेजवर बोलायचो, मी नकळत तिला मनाच्या खूप जवळ करून बसलो होतो आणि मित्र म्हणून तिनेही मला जवळ केलं.
तिच्या मनात प्रेम क्रश वैगेरे काहीच नव्हतं, ती क्लिअर होती आईला दुखावणार नाही, ती सांगेल तिथेच सांगेल तेव्हा लग्न करायचं.
हळूहळू घरच्या विषयी कळायला लागलं, तिच्या मनातलं बोलायला लागली.
गावी इतर मुलींना जितकं स्वातंत्र्य असतं त्यापेक्षा हिला जास्त होतं. शिक्षणाला बंदी नव्हती, स्वतःचा मोबाइल होता, कॉलेजला एकटी ये जा करायची.
पण तिच्या मनातली ती लहानपणाची सल अगदीच ताजी आणि जिवंत होती. एव्हाना तिचं मन हे मानून बसलं होतं कि दूर गेल्याशिवाय त्यांना तिच्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही, तिची किंमत कळणार नाही.
मग त्यासाठी ती लग्न देखील करायला तयार होती.

सावली असल्याने वेळेत चांगलं स्थळ आलं तर करूयात लग्न असं सगळ्यांना वाटत असल्याने आईने देखील स्थळं पाहायला होकार दिला होता. तसेही गावात सावळ्या मुलींच्या आई वडिलांपेक्षा शेजाऱ्यापाजाऱ्यांना अवाजवी काळजी असते त्यांच्या लग्नाची. वेळेत उरका, राहिली कि राहिलीच, रंगाने अशी आहे म्हणून आपलं सांगतोय वैगेरे वैगेरे. आई वडील देखील बिचारे काळजीने मग घाई करतात.

एव्हाना अभ्यासाच्या निमित्ताने मी तिच्या घरी तीन चार वेळा येऊन आलो होतो, घरी ओळख झाली होती.
तिच्या सांगण्यानुसार भांडणं अजूनही होतंच होती घरात त्यामुळे हि खूप डिस्टर्ब् राहायची. सतत लांब लांब राहावसं वाटायचं तिला.
पण १.३२ला वेळेत ट्रेनने घरी जायचीच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो. बऱयापैकी Happy

तिचं-आईचं जे ताणलेलं नातं दाखवलंय आणि त्यामागचं कारण, तो भाग रोचक वाटला मला.

>>>>माझी आणि तिची पहिली ओळख प्रतिस्पर्धी म्हणून झाली. क्लासमध्ये नवीन मुलगी आली होती, तिच्या विषयी कुजबुज करण्याचं कारण एकच कि तिला गेल्या वर्षी गणितामध्ये शंभरपैकी सत्याण्णव मिळाले होते.>>>>

या परिच्छेदाआधीचा जो भाग लिहिला आहे तो निव्वळ एमी यांनी मागील भागात उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून लिहिल्यासारखा वाटतोय. त्या लिखाणात तुमची इतर ठिकाणची सहज मांडणी (शैली) दिसत नाहीये, घाईगडबड केल्यासारखी वाटतेय.

कथा छान चाललीय. Happy