एकटीच @ North-East India दिवस १

Submitted by सुप्रिया राज जोशी on 28 December, 2019 - 00:54

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

51400241_10156849898272778_7204750704953524224_n.jpg

6th फेब्रुवारी 2019

प्रिय प्रतिमा,

घरातून निघायच्या आधी संध्याकाळी सात वाजता सपाटून भूक लागली होती. पण ठरवलं की ट्रेनमध्ये एकदा स्थिरस्थावर झालं की मगच डब्बा उघडून गरमागरम खाऊन घ्यायचं. एक नाही दोन नाही तर तीन जेवणांची सोय बरोबर घेतली. घरचे डब्बे…. सारे माझे आवडते खाद्यपदार्थ .. तांदळाच्या भाकऱ्या, खोबऱ्याची झणझणीत चटणी, दोन राईस्प्लेटस्, कोंबडी रस्सा आणि तू दिलेलं खमंग कुळथाचे पिठलं! स्वतः आजारी असताना केवढ्या मायेने माझ्या प्रवासासाठी शिदोरी बांधुन दिलीस. निघताना तू माझ्या हातात कुळथाच्या पिठल्याचा डब्बा दिलास तसे तोंडाला पाणी सुटले.

व्हेजबिर्यानी…अंडाबिर्यानी असं काहीबाही ओरडत रेल्वे कर्मचाऱ्याने चार फेऱ्या मारल्या पण ज्याला घरच्या शिदोरीची भूक , त्याला ते विकतचे घेऊन खायची इच्छा कशी होईल? त्यामुळे आज उपाशी रहायची वेळ येणार हे मला कळून चुकले.

म्हणजे झाले असे की माझी शिदोरी भरून घेतली ती पिशवी गर्दीतून ट्रेन मध्ये चढतानाच्या ओढाओढीत तुटून पडली. मी जोरजोरात ओरडत होते पण गर्दीने कसेतरी ट्रेनमध्ये लोटले तेव्हा माझ्या हातात फक्त हँडल राहिलं होतं. मी पुन्हा बाहेर पडू पहात होते पण पाठी गर्दीत माझी दुसरीही बॅग अडकली. गाडी फक्त दोन मिनिटं थांबून सुरू झाली. तसे माझा खाऊ मला आता मिळणार नाही हे मला कळून चुकले. ट्रेनमध्ये इतकी चेंगराचेंगरी चालू होती की किंचित सरकायलाही जागा नव्हती. अशा अवस्थेत 36 तासांचा प्रवास करायचा कसा, या विचाराने खिळून मी उभीच राहिले.
अगदी सर्वसामान्य माणसासारखा प्रवास करायचा म्हणून स्लीपर क्लासचं तिकीट काढलं. ते शेवटपर्यंत confirm झाले नाही. कोणी सांगितलं TC भेटेल तेव्हा तो काहीतरी सोय करेलच त्या भरवशावरच निघाले होते.

जवळजवळ शंभरएक लोक एकाच परिस्थितीला तोंड देत होते म्हणजे परिस्थिती सामान्य असायला हवी! पण ती माझ्या अपेक्षांशी जुळत नाही निव्वळ या कारणाने मला त्रास होत असावा. अशा प्रवासाकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नसते, तेव्हाच तो आनंददायक होतो.. मागच्या solo ट्रिप मध्ये शिकलेला धडा पुन्हा एकवार गिरवला. बाहेरच्या गर्दीत आणि मनातल्या विचारात गटांगळ्या खात असताना कोणीतरी माझ्यासाठी ओरडू लागले की, "अरे ..लेडीज है वो तो देखो।" तशी मी भानावर आले. अबला समजून कोणी माझ्यासाठी जी सहनुभूती दाखवली त्यानेच मला माझ्या स्त्रीशक्तीचीही पुन्हा एकदा प्रबळ जाणीव झाली.

या प्रवासाला निघायची माझी तयारी खऱ्या अर्थाने तेव्हाच पूर्ण झाली जेव्हा हे वरचे दोन धडे मी डोक्यात फिट केले. सारेजण डाव्या हाताला स्लिपर कोच मध्ये जाण्यासाठी धडपडत असताना मी गर्दीतून उलटी वाट काढत उजव्या हाताला 3-tire AC कोच मध्ये घुसले. तिथले चित्र अगदी वेगळे होते. सारे हाय क्लास (?) प्रवासी गुण्या गोविंदाने आपापल्या सीट वर नांदत होते. मोकळ्या जागेत पाठीवरचे ओझे जमिनीवर ठेऊन उभ्याउभ्याच माझे मन क्षणभर विसावले.

ट्रिप ची सुरवात ही अशी झाली.

थोडा वेळ सरला असेल, नाही म्हटलं तरी मन थोडं मलूल झालंच होतं, डोळ्यात एक दोन अश्रू दाटू पहात होते.. अचानक पाठून कोणी ओळखीची हाक दिली, "ताई"... डोळ्यातला अश्रू टपकन खाली पडला, मी दचकून पाठी पाहिले. एक अनोळखी तरुण होता, त्याने मला सीटवर बसायची विनंती केली. मी त्याची विनंती नाकारली. "माझे तिकीट स्लीपर कोच चे आहे आणि कोचमध्ये शिरायची गर्दी कमी पर्यंत फक्त मी इथे उभी आहे" हे स्पष्ट केले. पण तो ऐकेनाच तसे त्याच्या विनंतीला मान देऊन मी घटकाभर सीटवर बसून घेतले.

थोडा वेळ सरला असेल, मी माझे समान उचलून स्लीपर क्लास मध्ये जाऊ लागले पण तो तरुण मला बिलकूल तिथे सोडेना. दोन घास बरोबर खाऊन मगच पुढचे काय ते बोलूया अशी त्याने गळ धरली. मी नको नको म्हणत असताना जेवणाच्या ताटातील पहिला घास तोडला व माझ्या हातात बळेबळे सोपवित मला सांगितले की, "माझी ताई हा घास खात नाही तोवर मी अन्नाला शिवणार नाही", मग काय ते विकतचे जेवण ही घरच्या शिदोरीइतके रुचकर वाटू लागले. खरच का, कोणी प्रेमाने खाऊ घातलेल्या घासाला मिठापेक्षा मायेची चव येत असावी? माझ्याजवळ मी काही फळे घेऊन निघाले होते, अंजीर, द्राक्ष, डाळिंब, मी सारी फळे काढून टेबलावर ठेवली आणि आजूबाजूच्या चार प्रवाशांना फलाहार करायची विनंती केली. सर्वांनी एकत्र सहभोजन आटपले.
51577556_10156849898372778_1260391645166174208_n.jpg

मला तो तरुण नको नको सांगत असताना अट्टाहासाने मी माझे समान घेऊन स्लीपर कोचमध्ये गेले. तिथचे चित्र भयंकर होते. जिथे जागा मिळेल तिथे प्रवाशांनी बस्तान मांडले होते. अशी परिस्थिती हाताळायची माझी पहिलीच वेळ! एरव्ही मला रिझर्वड कोच मध्ये शिरून प्रवास करणारे महाभाग खूप त्रासदायक वाटतात. TC च्या पाठी पाठी फिरतात आणि त्याने दाद दिली नाही तर सरळ लेकाचे आपल्या पायाशीच बसतात. रात्रभर आपल्याला मात्र पाय दुमडून झोपावे लागते. पण आज मात्र मिडल नि लोअर बर्थच्या मधल्या जागेत रात्रभर पाठीची मानेची कमान करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व्यथा मला कळत होती.

मला त्यांची व्यथा कळली तशी माझी व्यथा तिथेच जमिनीवर बसून घेतलेल्या एका बाईला कळल्यागत ती म्हणाली, "अशी किती वेळ उभी राहशील? बसतेस तर बसून घे.", क्षणभर आईने हाक दिल्यागत वाटलं आणि काहीच विचार न करता आपसुख मी तिच्या अंथरलेल्या गोधडीवर बसून घेतले. विचार न करता असेच म्हणायचे कारण की, एरव्ही बोगीच्या टोकाचा बर्थ मिळाला तरी नाक मुरडणारा आपला क्लास (?) आहे, तिथे ही म्हातारी तिथेच टॉयलेट च्या बाहेर जिथे दाराशी बसली होती, मला तिथे बसायची लाज नाही वाटली नि घाण नाही वाटली. पाठच्या दाराच्या कुठल्याशा फटीतून थंड वाऱ्याचा मारा होत होता. मला खोकल्याची ढास लागली तशी तिने तिची शाल माझ्याभोवती गुंडाळून धरली. खोकतच तिच्याकडे पहाताना तिला माझ्या डोळ्यात कृतज्ञता दिसली असावी. तिने माझ्या चेहऱ्यावरून तिचा सुरकुतलेला हात फिरवत म्हटले, "रंगाचा काय तो फरक आहे, नाहीतर तू माझ्या लेकीसारखीच आहेस" ...तो जो काही फरक तिला तिच्यामाझ्यात जाणवला ती वर्णभेदाची जाणीव माझे काळीज चिरत गेली. मी ठरवलं आता आजची रात्र तरी या माईच्या काढायची.

तासभर उलटला असेल माझा शोध घेत तो AC class चा तरुण त्याच्या ताईला शोधत समोर टपकला. तो माझ्यासाठी रेल्वे ने त्याला दिलेली चादर शर्टात लपवून घेऊन आला, बरोबर स्टेशनवरून एक चिक्कीही विकत घेतली. त्याचे उपद्व्याप बघून मी डोक्याला हात लावला. मी अशा अवस्थेत प्रवास करत असेन याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. आता त्याने माझ्यापाठी नवीनच लकडे लावले की तू माझ्या बर्थ वर आराम कर.
मी निक्षून नकार दिला तसा माझ्या काळजीने तो तिथेच जमिनीवर बसला. मी त्याला सांगत होते, "मला ताई म्हणतोस तर माझं ऐक". माझे शब्द ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत तो माई ला सांगत होता, "कसा प्रवास करावा लागेल ह्याची काही कल्पना नसताना एवढ्या लांबच्या प्रवासाला निघाली मग काळजी वाटणार नाही तर काय?"
51765988_10156849898547778_3894421356099403776_n.jpg

मी मधेच म्हटलं, "खरंच, एवढ प्रेम नको देऊ, मी तुमची कोणी नाही", त्यावर तो काहीच बोलला नाही माईला मात्र सार कळल्यासाररखं वाटलं, "तिच्या गावाला दुष्काळ पडला आहे, घरची परिस्थिती कठीण आहे, मग कडीलिंबाचा पाला विकायला विदर्भातून रात्रभर प्रवास करून आठवड्यातून दोनदा ती मुंबईला येते, घरी मुले, सुना सारे आहेत पण आपण भुईला भार होऊ नये एवढी काळजी घ्यायची. इथपासून सुरवात करून मग नातीगोती, आयुष्य, माणुसकी याबद्दल ती बरंच बोलत राहिली.

नासिक आले तसा मी त्या तरुणाने स्वतः च्या बर्थ वर परत जावे म्हणून हट्ट धरला, माईने ही त्याला समजावले तसा तो परत गेला. त्याचें नाव शिवाजी होते असे मला true caller ने सांगितले. रात्रभरात त्याने तीनदा फोन केला. पहाटे पहाटे मलकापूर ला उतरून माई तिच्या घरी गेली, सकाळी बडनेरा ला उतरून शिवाजी अमरावती ला त्याच्या घरच्या वाटेवर निघाला तसा ट्रेन मधला माझा एकटीने प्रवास सुरु झाला.

इथेच स्लीपर क्लासमधील लोकांच्या पायवाटेमधेच बसून तुला पत्र लिहून पूर्ण केले. आजकाल पोस्टाची झंझट नाही म्हणून इंटरनेट वरून पत्र लग्गेच पोहोचेल असा उगीच आपला भ्रम असतो. पुन्हा पुन्हा check करते आहे, अजून तुला हे पत्र पोहोचलेले दिसत नाही. हे पत्र तुला मिळेल तस इतर वाचकांना ही मिळेल. तुझं पत्र सर्वच वाचतील तसच पुढे कोणाकोणाला लिहिलेली सारी पत्रे तू वाचत रहा. घरचे मात्र पत्र वाचतील न वाचतील, त्यांना खुशाली नक्की कळव, जमल्यास पत्राचे उत्तर लिही.

तुझी मैत्रीण
सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोयीचं तेवढं लिहिले आहे. मला असंही वाटलं की दुसऱ्यांना सहानुभूती वाटावी म्हणून लेखिकेने काहीतरी केलं असेल.

छान सुरवात आहे.

तिकडे जाणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी असते हे माहीत असूनही ह्या डब्ब्यात प्रवास का करावा हे मात्र कळले नाही. लोकांचा अनुभव घेणे वगैरे ठीक आहे पण 36 तासांच्या प्रवासात झोप, नैसर्गिक हाक इ. शारीरिक गरजाबाबत त्रास का काढावा हा प्रश्न पडला. असो. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

Sadhana plus one. Also eating food offered by complete strangers . Major security risk. Please take care.

धन्यवाद
जे मला ओळखतात त्यांना पत्र लिहिताना जे मला ओळखत नाहीत त्यांना असे प्रश्न पडू शकतात हे लक्षात आलंच नाही. पण हे प्रश्न विचारले ते चांगले झाले. पुढच्या लेखापासून जे प्रश्न वाचकांना पडतील त्याबद्दल सुद्धा लिहायचा प्रयत्न करेन. प्रवास समजायला अधिक मदत होईल.

सोलो प्रवास करावासा वाटतो पण असंही वाटतं की बोर होईल का, कंटाळा तर येणार नाही ना एकटीला. बाई म्हणून एकटीने प्रवास करायची तर फारच भीती वाटते. इथे दादर किंवा कुठल्याही गर्दीच्या स्टेशनला गर्दीमध्ये ईतके वाईट अनुभव येतात की इतका लांब प्रवास करायचा विचारही करवत नाही. भारतात तरी सुरक्षित वाटत नाही, परदेशातचं माहित नाही. सोलो प्रवास करणाऱ्यांना हॉटेल्स रूम देत नाहीत असेही वाचले आहे, अगदी ऑनलाईन बुक केली असेल तरी.
अनुभव घेणं वगैरे ठीक आहे पण कोणती किंमत मोजून हे प्रत्येकाचे स्वतःचे मापदंड असतात. एकवेळ पैशाची चोरी परवडते पण बाई म्हणून कोणी नको त्या चौकशा केलेल्या नको वाटतात. तुझा अनुभव वाचायला आवडेल.

सोलो रूम्स चा काही प्रॉब्लेम नाही, मी राहिलेली आहे एकटी.
पुढच्या भागाची वाट पाहते आहे. कधीतरी असा प्रवास करायचा आहे पण माझं मला का? च उत्तर मिळत नाहीये. तसंच मी उगीच हालअपेष्टा करुन नाही प्रवास करणार.

मी अनेकवेळा रात्रीचा लोकल प्रवास करताना अनोळखी लोकांच्या म्हणजे बायकांच्या (कारण लेडीज डब्यातून प्रवास) offering ना नाही म्हंटले आहे Happy काहीजणी चेंगट असायच्या प्रसाद आहे खा, मग मी उपास आहे सांगायचे!

मला एक कळत नाही की मध्यमवर्गीय व्यक्ती जर 3rd AC तिकीट काढून जाऊ शकते तर उगाच कुठल्या तरी whims साठी आधीच गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊन जास्त गर्दी करण्यात काय हशील आहे?

धन्यवाद सुप्रियाताई, तुमचा TED talk पाहिला होता. त्या विषयावर देखील लिहिणार आहात का? किंवा आधी कुठे लिहिलं असेल तर लिंक share केलीत तरी चालेल.

मी पण काही वर्षांपूर्वी नॉर्थ ईस्ट चा सोलो प्रवास केला होता
फक्त जाताना ट्रेन बुकिंग केले होते
उर्वरित सगळीकडे काहीही प्लॅन न करता हिंडलो सार्वजनिक वाहनाने
कधीतरी लेखमाला लिहावी असा विचार केला होता पण आळस केला
हे वाचून मजा आली, आपल्यासारखे कोणी आहेत बघून

Mazya natyatalya eka vyaktila atishay sabhya asha disanarya mulane biscuit cha puda bacon phodun pravasat offer kela. There was no reason to suspect.
This uncle was drugged and looted. Found on one station in a very bad condition. Kunala tari sanshay ala ki to darudya nahiye, so he was hospitalized and traced.

So please take care if someone offers u food.

मी कोणीतरी स्पेशल आहे आणि मी करीन ती पूर्व अशा प्रकारची खुदपसंद लोकं काही तरी चमत्कारिक वागून समाजाचं लक्ष वेधून घेण्याचे केविलवाणे प्रयोग करत असतात. गिरे तो भी टांग उपर अशी हेकट विचारसरणी या लोकांची असते.

मि इथे वाचन मात्र असते हल्ली...पण एक pattern इकडे बोकाळताना दिसतोय आणि तो म्हणजे कोणी काही लिहिले रे लिहिले की ट्रोल करायचं च!
भले कोणी जेन्युइनली लिहिले , कोणी टी आर पी मिळवायला लिहिले... लिहू दया की!
तुम्हाला आवडले नही लेखन नका रिप्लाय करू पण इतके हीन कमेंट करून लिहिणाऱ्याचा अपमान कशासाठी करायचा??? कसे का असेना, लेखकाने वेळ शक्ति खर्च करून लिहिलेले असते निदान त्याचा तरी मान ठेवावा.. सॉरी मला राहावले नाही म्हणून ही पोस्ट लिहिली....

आपापल्या अनुभूती नुसार प्रतिक्रिया येतात. खूप भिन्न भिन्न विचारांचा वाचक वर्ग आहे. त्यामुळे चांगल्या वाईट प्रतिक्रिया येणारच. पण वाचक वर्ग आहे हे हि नसे थोडके Happy
धन्यवाद

कबालि, ते अनुभव अजून नाहि लिहिले.

तुफान गर्दी असते हे माहीत असूनही ह्या डब्ब्यात प्रवास का करावा हे मात्र कळले नाही. >>> साधना, 'क्लास' सोडून 'मास'चे अनुभव घ्यायचे असतिल तर हे करावे लागेल ना? 'मास'ला काय काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते हे "जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे".

सुप्रिया, असे काही करायला खूप हिम्मत लागेल, ती आहे तुमच्यात - तिला सलाम!

मुंबईत वर्षानुवर्षे सेकंड क्लासमधून प्रवास केला की सगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात. लगेज डब्यातून (अजुन असतो का?) प्रवास केला की अजून next level.

प्रवास म्हणून interesting आहे. आटापिटा काही कळला नाही.

चंपा, राजसी, साधना ... तुमचे अनुभव / प्रश्न फक्त तुमचे नाहीत साऱ्या स्त्रियांचे आहेत.
पत्र पुढे सरकतील तशी अनेक उत्तर मिळतीलच. पण नाहीच तरी सर्वात शेवटी जे प्रश्न रहातील त्यांना प्रतिक्रिया देऊन मी माझ्या परीने प्रयत्न करेन की कुठच्याच स्त्रीच्या हातात माझ्या लेखनामुळे चुकीचा धागा मिळू नये आणि पुढे जावून तिच्यावर चुकीचे प्रसंग पार करायची वेळ येउ नये.