सावधान, ड्रिंक आणि ड्राईव्हचा गुन्हा गांभिर्याने घ्या (माझा कटू अनुभव) : पूर्वार्ध

Submitted by Parichit on 25 December, 2019 - 19:54

नाताळ झाला. अजून काही दिवसांनी ३१ डिसेम्बर येईल. दारूच्या पार्ट्या झडतील. मायबोलीवर "दारू कशी पिता" अशा धाग्याला शेकडो प्रतिसाद येतात. अर्थातच इथे ड्रिंक घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हा धागा त्यांनी व इतरांनी सुद्धा वाचवा म्हणून मुद्दामहून लिहित आहे.

प्रकटीकरण: जे जसे घडले तसे सांगत आहे. शहराचे नाव व बाकी व्यक्तिगत तपशील सांगत नाही कारण त्याची आवशक्यता नाही. ("केवळ प्रतिसाद मिळवण्यासाठी केलेले खोटेनाटे सनसनाटी लिखाण" असे आरोप ज्यांना करायचे आहेत त्यांनी हे लिखाण वाचले नाही तरी माझी हरकत नाही)

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. त्या दिवशी शुक्रवारी ऑफिस करून संध्याकाळी घरी जायला म्हणून ऑफिसच्या पार्किंगमध्ये आलो. गाडी सुरु करणार तोच एका घनिष्ट मित्राचा फोन आला. म्हणाला, "येतोस का? बसूया. आज शुक्रवार आहे. माझी एक नवीन मैत्रीण येणार आहे. तुलापण तिची ओळख करून देतो". आता, केवळ शुक्रवार आहे म्हणून आणि फक्त दारू पिण्यासाठी म्हणून संध्याकाळच्या गच्च ट्राफिक मधून घीरघीर पिंपी काचकीच करत इतक्या लांब त्याच्याकडे जाण्याइतकी मित्रप्रेमाची भरती मला नक्कीच आली नव्हती. पण त्याचे शेवटचे वाक्य ऐकल्यानंतर मी नाही म्हणू शकलो नाही. जीवनात नवीन मैत्रिणीचा योग असेल तर कधीच नाही म्हणू नये.

झाले. घराकडे न्यायची गाडी मी त्याच्या ऑफिसजवळ असलेल्या बार कडे वळवली. तिथे पोहोचायला पाउण-एक तास लागला. या बारला आम्ही आजवर कितीतरी वेळा बसलो आहे. त्यामुळे नेहमीच्या सरावाने मी तिथे बारच्या बाजूला चिंचोळ्या गल्लीत पार्किंग शोधले. शुक्रवार असल्याने पार्क केलेल्या गाड्यांनी गल्ली पूर्ण भरली होती. अखेर गल्लीच्या जवळजवळ दुसऱ्या टोकाला पार्किंग मिळाले. बार पासून तसे दूरच. पण त्याला आता पर्याय नव्हता.

बारमध्ये आल्यावर हे दोघे आधीच तिथे माझी वाट पाहत बसून होते. आम्ही भेटलो. हाय हेलो झाले. त्याने आपल्या मैत्रिणीची ओळख करून दिली. मग आम्ही खूप गप्पा मारल्या. हास्यविनोद केले. ती मैत्रीण आणि ती संध्याकाळ दोन्हीही खूपच सुरेख असा तो योग होता. दिवसभराचा शिणवटा कसा निघून गेला कळले नाही. मी काही हेवी ड्रिंकर नाही. सोशल होण्यासाठी म्हणून एखादी माईल्ड बिअर घेतो इतकेच. मला तितकेच प्रिय आहे. त्या संध्याकाळी तर अल्ट्रा घेतली, कि जी माईल्डहून अधिक माईल्ड असते (जे 'घेत' नाहीत त्यांच्यासाठी हि माहिती). ती सुद्धा एकच घेतली. कारण मनसोक्त खळखळत्या गप्पा झोडणारी मैत्रीण बरोबर असेल तर मला नशेसाठी ड्रिंक जास्त घ्यावी लागतच नाही. त्या धुंद वातावरणात गप्पांच्या ओघात दोन तीन तास कसे गेले कळले पण नाही. रात्रीचे अकरा वाजले तसे आम्ही उठलो. एकमेकाला बाय बाय केले आणि आपापल्या घराचे रस्ते धरले. इतकी सुखद संध्याकाळ झाल्याने मी तरंगतच गाडीपर्यंत गेलो.

जसे मी मघाशी सांगितले हि काही माझी इथे येण्याची पहिली वेळ नव्हती. यापूर्वी अनेक वर्षे कितीतरी वेळा मी इथून अगदी अशाच प्रकारे गाडी पार्क करून ड्रिंक घेऊन असेच रात्रीचे ड्रायव्हिंग करत घर गाठले आहे. त्यामुळे सगळे नेहमीच्या सवयीचे. पण ती रात्र काही क्षणातच आजवरच्या रात्रींपेक्षा वेगळी ठरणार होती याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती. गाडी जवळपास गल्लीच्या दुसऱ्या टोकापाशी असल्याने अर्थातच मी मागे न येता तशीच पुढे दामटली. आणि गल्ली संपवून मुख्य रस्त्याला डावीकडे वळायचे असा विचार करतोय तोच गल्ली संपते तिथे समोर मुख्य रस्त्याला पांढरा शर्ट खाकी प्यांट आणि डोक्याला मफलर गुंडाळून "मामा" साहेब हजर! आईचा घो. ट्राफिक पोलीस आणि ह्या वेळी? मी मनात चरकलो. तिथच माझी थोडी उतरली. गल्ली अरुंद असल्याने गाडी पट्कन यूटर्न घेऊन उलट दिशेने पळून जायला सुद्धा वाव नव्हता. गाडी जवळ येत त्याने मला अत्यंत प्रेमाने विचारले, "तोंडाने जरा हा हा करून हवा सोडा पाहू?". मी समजून चुकलो. आता इथे ड्रामा करण्यात अर्थ नव्हता. ट्राफिक पोलिसांशी मी आजवर कधीच ड्रामा किंवा हुज्जत घातलेली नाही. कारण त्याचा काहीएक उपयोग होत नसतो हे मला खूप पूर्वीच कळून चुकले आहे. म्हणून मी थेट सांगूनच टाकले. म्हणालो "हे पहा साहेब मी थोडी घेतली आहे. पण अल्ट्रा माईल्ड घेतली आहे. कायद्याच्या मर्यादेत बसते ती", मी ठोकून दिली. "चला या. गाडी साईडला घ्या", तो शांतपणे म्हणाला. अल्ट्रा माईल्ड वगैरे शब्दांना त्याने धत्त करून किंमत पण दिली नाही. आपल्या सहायकाला (त्यांच्या हाताखालचा ट्राफिक हवालदार) त्यांनी बोलवून घेतले. तो आला आणि माझ्या शेजारी पुढील सीटवर बसला. गाडी साईडला घेण्याचा बहाणा करत वाहनचालक पळून जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतात हे लोक. अर्थात त्यांच्यासाठी ते नेहमीचेच असते. मी मुकाट्याने गाडी बाजूला घेतली. किल्ली त्याच्याकडे सुपूर्द केली. इतक्या सुंदर संध्याकाळची पार वाट लागायला सुरवात झाली होती. पण ती वाट पुढे कल्पनेच्याही पलीकडे लागणार आहे याची मला सुतरामदेखील कल्पना नव्हती. कारण "होऊन होऊन काय होईल? थोडेफार पैसे जातील" असा विचार मी केला होता व पैसे देण्याची तयारी ठेवून त्यांच्या मागोमाग गेलो. दहाएक मिनिटात सेटलमेंट करून आपण मोकळे होऊ अशी माझी कल्पना होती. पाहतो तर तिथे आधीच एक सभ्य गृहस्थ उभे होते. वय साठीच्या पुढेमागे असावे. उच्चभ्रू घरातील वाटत होते. तिथे जवळपासच राहत असावेत हे त्यांच्या पेहरावावरून जाणवत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे काम सुरु होते. तोवर मला तिथे बाजूला उभे राहायला सांगितले. मुख्य साहेब आणि त्याच्या हाताखाली दोन चार ट्राफिक हवालदार असा तो लवाजमा होता. रात्रीच्या वेळी तिथे उभे राहून बार मधून ड्रायविंग करत येणाऱ्याना पकडायचे पुण्यकर्म सुरु होते.

मी तिथे हाताची घडी घालून उभा राहून निमूटपणे ते सगळे बघू लागलो. त्या उच्चभ्रू गृहस्थाने खूप विदेशी हार्ड ड्रिंक घेतली असावी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत करून घेतली. अल्ट्रा माईल्ड बिअरवर माझा गाढा विश्वास होता. "अहो साहेब मी घरीच थोडी घेतली होती. ती सुद्धा दुपारी. त्याला आता किती तास झाले बघा ना", ते गृहस्थ अजिजीच्या सुरात बोलत होते. पण ट्राफिक इन्स्पेक्टरवर त्याचा काहीएक परिणाम होत नव्हता. "हे बघा आमच्या हातात काही नसते. तुम्ही घेतली का नाही किंवा किती घेतली ते सगळे हे मशीन आपल्याला सांगेल. तुम्ही फक्त हि नळी तोंडात धरा आणि त्यात फुंका. मशीनवर आकडा दिसेल. तो मर्यादेपेक्षा कमी आला तर तुम्ही बिनधास्तपणे निघून जा ना. आम्ही थोडेच अडवून धरणार मग तुम्हाला?". त्या साहेबांनी या गृहस्थाना प्रोसिजर समजवून सांगितली. व त्यांना त्या मशिनची नळी तोंडात धरून त्यात फुंकर मारायला सांगितले. त्या उच्चभ्रू गृहस्थांनी आज्ञेचे पालन करत तशी फुंकर मारली. त्यासरशी मशीनवर दिसणारा आकडा सत्तरच्या आसपास घुटमळला. "हे बघा. आकडा साठच्या पुढे जाणे बेकायदेशीर आहे. तुमचे नाव सांगा... जाधव यांचे समजपत्र तयार कर". साहेबांनी हाताखालच्या हवालदारला फर्मान सोडले. (इथे जाधव हे आडनाव काल्पनिक आहे. केवळ कथनाच्या सोयीकरिता वापरले आहे). "अहो हे काय करताय? कसे शक्य आहे?" ते गृहस्थ आर्जवाने बोलू लागले. पण त्यांचे ते शब्द जणू हवेतच विरले. त्यांच्यावर पोलीसकेस करायच्या कामाला सुरवात झाली. मग नाव गाव पत्ता लायसन नंबर अमुक तमुक सगळे डीटेल्स लिहून घेण्याचे सोपस्कार सुरु झाले. एकदा मोबाईल मध्ये आणि एकदा पेनाने कागदावर. एकच माहिती अशी दोन दोन वेळा रट्टायचे काम सुरु होते. हे काम करणारे हाताखालचे हवालदार डोक्याने माठ होते. मोबाईलवर टाईप करायची साधी अक्कल त्यांना नव्हती. मराठी टायपिंग त्यांना जमत नव्हते. केवळ नाव लिहायलाच त्याने दहा मिनिटे लावली. त्याच्या हातून मोबाईल हिसकून भराभर त्यांना लिहून द्यावे असा मनातला एक आक्रमक विचार मी मनातच दाबला. त्यात आणि भरीस भर म्हणून या उच्चभ्रू गृहस्थांचे ड्रायविंग लायसन्स त्यांच्याजवळ नव्हते. ते आणण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला. हे सगळे होईतोवर मला का विनाकारण उभे करून घेतले आहे? मी काही हेवी ड्रिंक केली नाही. थोडेफार पैसे घेऊन सोडून द्या ना. असे काहीबाही विचार करत मी जाम वैतागून उभा होतो. कुठल्याकुठे झक मारली आणि इकडे आलो असे होऊन गेले होते. एव्हाना साडेअकरा वाजून गेले होते. माझी पूर्ण उतरली होती.

या दरम्यानच्या काळात मुख्य साहेबाना अजून एक सावज मिळाले. तो एक रिक्षावाला होता. पकडल्यानंतर तो फारच गयावया करू लागला. बिचारा पॅनीक झाला. "देशी मारली असणार. होणार आता केस याच्यावर सुद्धा" असा विचार मी केला. इतरांवर केस होईल. पण अल्ट्रा माईल्ड बिअर असल्याने आपल्यावर केस होणे शक्य नाही असा मला फाजील विश्वास होता. तो रिक्षावाला फारच काकुळतीला येऊन विनवणी करू लागला. हा गुन्हा किती गंभीर आहे याची बहुतेक त्याला कल्पना असावी (कि जी तोपर्यंत मला नव्हती). ह्या रिक्षावाल्याने नंतर बरीच करमणूक केली. सदगृहस्थांवर केस करायचे काम सुरु असताना मी शांतपणे उभा होतो. पण याचे मात्र सुटकेसाठी विविध शकली लढवायचे निकराचे प्रयत्न सुरु होते. "अहो जाऊ द्या साहेब. त्यांची बायको बाळंत होणार आहे. दवाखान्यात घेऊन चाललोय त्यांना", रिक्षावाल्याने रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडे हात करून साहेबाना सांगायचा प्रयत्न केला. "गप्प रे. येडा बनवतो का आम्हाला? सगळी नाटकं माहित आहेत तुमची" साहेब त्याच्यावर खेकसले. "अहो खरंच सांगतोय साहेब. विचारा तुम्ही त्यांना" निर्ढावलेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या खेकसण्याला जुमानले नाही. "कानाखाली हाण रे त्याच्या. गप्प उभारता येत नाही का बे तुला? पुन्हा काय बोललास तर थापडीन तुला मी इथंच" साहेब जोरदार डाफरले. त्याबरोबर रिक्षावाला मांजरासारखा शांत झाला. पण त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते. एव्हाना त्या उच्चभ्रू गृहस्थांशी मी जुजबी संवाद साधायला सुरु केली. "मी इथेच जवळपास राहतो. घरीच अगदी थोडीशी घेतली होती दुपारी", वगैरे वगैरे ते सांगत होते. आम्ही बोलत असताना थोड्या वेळाने मागून हवालदारचा जोरात गुरगुरण्याचा आवाज आला "ए... लांब उभा राहा. माझ्या अंगाला हात लाऊ नकोस. पोलीस आहे मी. पोलिसच्या अंगाला हात लावायचा नसतो समजलं का?". पाहतो तर लक्षात आले कि रिक्षावाल्याने हवालदाराशी सलगी करायच्या नादात त्याच्या खांद्यावर हात टाकायला प्रयत्न केला होता. ते पाहताच तशाही परिस्थितीत मला हसायला आले. किती चिवट होता रिक्षावाला. पुढे तर त्याने हद्दच केली. थोडा वेळ जाऊ दिला आणि मग त्याने थेट ट्राफिक पोलीस साहेबाचे पायच धरले. ते पाहून मी अवाक् झालो. परिस्थितीपुढे माणूस किती अगतिक होऊ शकतो. पण त्याला इतके गयावया करायचे कारण तरी काय हे कळेना. थोडेफार पैसे देऊन यातून सुटता येते अशी माझी कल्पना असल्याने ते पैसे सुद्धा रिक्षावाल्यांसाठी खूप असतात म्हणून कदाचित इतक्या विनवण्या करत असेल अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली. पाय धरूनही साहेब नरमले नाहीत. "काय करतो रे तू? येडा झाला का?" बाजूला सरकत ते म्हणाले. "अहो मी आत गेलो तर बायकापोरं उपाशी मारतील माझी" रिक्षावाला रडकुंडीला येऊन म्हणाला. "अरे पण हि आमची ड्युटी आहे. रात्री बेरात्री इथं रस्त्यावर येऊन उभं रहायला वेड लागलंय का आम्हाला? घरात निवांत बसलो असतो ना मी? पण काय करणार, तुला सोडलं तर आमची नोकरी जाईल आणि आमची बायकापोरं उपाशी मरतील" ट्राफिक इन्स्पेक्टर साहेब त्याला उलट उत्तरादाखल बोलले. तो निरुत्तर झाला. थोड्या वेळाने हळूच म्हणाला, "अहो जाऊ द्या साहेब. भाजपचा कार्यकर्ता आहे मी". (यात काहीएक माझ्या मनाचे मी लिहित नाही. तो अक्षरशः हे असे बोलला). आता मात्र साहेबांना हसू आवरले नाही. मोठ्याने हसत ते दोन तीन वेळा म्हणाले, "बस्स. एवढच एक ऐकायचं बाकी राहिलं होतं बघ"

एव्हाना बारा वाजले. साहेबांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. पुन्हा तेच सारे. मशीनची काचेची नळी माझ्या तोंडासमोर धरली आणि त्यात फुंकायला लावले. मागचापुढचा फार विचार न करता मी सुद्धा अतिआत्मविश्वासाने काचेच्या नळीत हवा फुंकली. आकडा त्रेसष्ठ वर गेला. "साठच्या वर आहे. यांचे समजपत्र बनवायला घे". मी हादरलो. काय? कसे शक्य आहे?

"अहो पण मी नेहमी येतो इथे. आजसुद्धा माझ्याबरोबर कितीतरी लोक ड्रिंक घेत होते त्या हॉटेलमध्ये. मलाच का पकडले? जायचे कसे लोकांनी घरी?"

"ड्रायवर ठेवा किंवा रिक्षा करून जा", ते शांतपणे बोलले.

"अहो ह्याला काय अर्थ आहे का? आता पुढे काय प्रोसेस आहे?", मी असहायपणे विचारले.

"सांगतो न सगळी प्रोसेस. काळजी करू नका. तुमची कागदंपत्रं काढून तयार ठेवा. लायसन्स, इन्शुरन्स, पीयूसी, आरसीटीसी सगळं आहे का?"

मी सगळ्या कागदांची झेरॉक्स गाडीत ठेवली होती ती दाखवली. लायसन्स मात्र आजकाल स्मार्टफोनवर सरकारच्या डीजीलॉकर एप मध्ये असते. तेच अधिकृतरीत्या चालत असल्याने ओरिजिनल लायसन्स मी आजकाल जवळ बाळगतच नव्हतो. मी त्यांना तसे सांगितले.

ते म्हणाले, "आम्हाला ओरिजिनल लागते"

मी म्हणालो, "अहो लायसन्स डीजीलॉकर मधले ओरिजिनलच असते. डीजीलॉकर सरकारी एप आहे. आतापर्यंत जेंव्हा केंव्हा अडवले तेंव्हा तेच दाखवले आहे. तुम्हीच पहिल्यांदा ओरिजिनल मागणारे मी बघत आहे".

त्यावर त्यांनी माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय गुन्हा केलाय तो? हा काही नेहमीचा किरकोळ गुन्हा नाही. डीजीलॉकर तिथे चालते. इथे फौजदारी दाखल करावी लागते आम्हाला तुमच्या विरोधात. मूळ लायसन्स जप्त करावे लागते".

"नाहीये माझ्याकडे मूळ लायसन्स"

"मग घेऊन या किंवा कुणालातरी घेऊन यायला सांगा"

"कोणीही येऊ शकत नाही. घरी कोणी नाही माझ्या"

"ते काय ते तुम्ही बघा. लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी सोडता येणार नाही"

आता मात्र हे सगळे प्रकरण किती खोल गर्तेत चालले आहे हे मी कळून चुकलो. चार पैसे घेऊन सोडून द्यायचे तर हे विनाकारण आपल्याला त्रास देत आहेत असे वाटू लागले. प्रचंड चिडचिड झाली.

"अहो पण आजकाल सगळे डिजिटल झाले आहे. तुम्ही सिस्टीममधून रद्द करा न लायसन्स माझे. तो कागद आणण्यासाठी त्रास का देत आहात मला?"

"तुम्ही मुकाट्यानं लायसन्स काढता का मी मार्शल्स बोलवू?", साहेबाने धमकी देऊन मी लायसन्स काढतो का पाहिले. मग मात्र माझा तोल सुटला.

"हे पहा मी खोटे सांगत नाही. मीच प्रामाणिकपणे तुम्हाला मी दारू प्यायलो आहे म्हणून सांगितले आहे सुरवातीला. त्याची हि शिक्षा देत आहात का मला?"

"हो तसेच समजा. प्रामाणिकपणाला शिक्षा असते असे समजा"

"ह्याला अर्थ आहे का? मी लायसन्स देऊ शकत नाही. घरी कुठे ठेवले आहे ते हि मला माहित नाही. कारण डीजीलॉकर मध्ये लायसन्स आल्यापासून त्याची आवश्यकता नाही असे आरटीओनेच सांगितले आहे" मी इरेला पेटून बोललो.

इथे हवालदाराने मला बाजूला घेतले आणि म्हणाला, "अहो शांतपणे घ्या. साहेब शक्य ती मदत करतील. पण ते चिडतील असे काय करू नका. अगोदरच तुमच्यावर फौजदारी होत आहे. त्यात अजून त्यांनी रागाने तुम्च्याविरोशात कमीजास्त काही लिहिले तर पुढे तुम्ही खूप अडचणीत याल. तेंव्हा त्यांच्याशी शांतपणे बोला"

पण मी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. काहीही भयंकर गुन्हा नसताना नाहक कुठल्या कुठे प्रकरण जात आहे असे वाटल्याने प्रचंड चरफड सुरु होती. रागाने मी काही बोलणार तितक्यात साहेबांनी हातातला वॉकीटोकी उचलला. बटने दाबली आणि बोलले,

"मार्शल्स पाठवून द्या. बिगर लायसन्स दारू पिऊन गाडी चालवताना पकडले आहे आणि वर दंगा करत आहे. ताबडतोब दोन मार्शल्स पाठवून द्या"

हे ऐकताच नाही म्हटले तरी मी घाबरलोच. पण मी वरवर तसे दाखवून दिले नाही. शांतपणे म्हणालो, "लायसन्स नाही माझ्याकडे. मी ते आणूसुद्धा शकत नाही. हि वस्तुस्थिती आहे. आता जे काय करायचे ते करा".

नव्हतेच माझ्याकडे लायसन्स तर मी तरी काय करू शकत होतो? जे आहे त्याला सामोरे जाणे आवश्यक होते.

इतक्यात उच्चभ्रू गृहस्थांच्या धर्मपत्नी देवीजी, त्यांचे लायसन्स घेऊन हजर झाल्या. ट्राफिक साहेबांनी ते लायसन्स ठेऊन घेतले आणि त्यांना कोर्टात जायला सांगितले. जाता जात त्या उच्चभ्रू गृहस्थांनी सुद्धा माझी बाजू त्या साहेबाला सांगायचा प्रयत्न केला

"तुमचे मान्य आहे. पण त्यासाठी कशाला त्यांना त्रास देता. ते डीजीलॉकर मधून त्यांचे लायसन्स दाखवत आहेतच कि. त्यांचे घर इथून बरेच लांब आहे. इतक्या रात्री कसे जातील? एक विनंती म्हणून सांगतो आहे कि निदान माणुसकीच्या नात्याने तरी काही पर्याय निघतो का बघा नि जाऊ द्या त्यांना"

"अहो लायसन्स जप्त करायला लागते नियमानुसार. लायसन्स त्यांच्याकडेच राहिले तर कोर्टात कशाला जातील ते? आणि शिवाय आमचे साहेब आम्हाला हाकलून देतील त्याचे काय?"

यावर उच्चभ्रू गृहस्थ सुद्धा निरुत्तर झाले व निघून गेले. मग मी साहेबाशी थोड्या सलगीने बोललो,

"साहेब माझ्याकडे खरेच लायसन्स नाही. शप्पथ मी खोटे नाही बोलत. काय सेटलमेंट होते का बघा ना. अहो तुमच्याच गावचा आहे मी"

मी अंदाजाने ठोकून दिले. त्यावर साहेबाने चमकून माझ्यकडे बघितले व विचारले, "कोणते गाव?"

मी गावाचे नाव सांगताच ते म्हणाले,

"अहो मग हे आता सांगताय? तोंडात नळी पकडायच्या आधी सांगायचे ना? तेंव्हा काहीतरी करता आले असते. आता काही करता येण्यासारखे नाही. मशीनवर एकदा डिजिटल रेकॉर्ड झाले कि पुढचे आमच्या हातात नसते"

"अहो मला वाटले अल्ट्रा माईल्ड बियर व ती सुद्धा थोडीशीच प्यायली असल्याने मशीनवर जास्त आकडा येणार नाही. म्हणून मी निर्धास्त होतो"

"फौजदारी गुन्हा आहे हा. दहा हजार रुपये दंड आणि कधीकधी सहा महिन्यांपर्यंत कैदसुद्धा देतात याला", साहेब शांतपणे बोलले.

काहीही काय? असे थोडेच असते? इतके पण भयंकर गुन्हा नाहीये हा. मी काय कुणाचा खून केलेला नाही. घाबरवण्यासाठी काहीही सांगत आहेत.... मी मनातल्या मनात स्वत:ची समजूत घातली.

"पण आता काय करायचे?" मी विचारले

माझ्या हातात समजपत्र देत ते म्हणाले, "हे घ्या आणि त्यात दिलेल्या तारखेनंतर चार दिवसांनी कोर्टात जा. तिथे काय शिक्षा होईल त्यावर पुढच्या गोष्टी"

"अहो पण मी आता इथून इतक्या लांब घरी कसे जाणार? ह्यावेळी रिक्षा तरी मिळेल का मला?"

"गाडी आमच्या पोलीस चौकीत ठेवावी लागेल. सकाळी लायसन्स घेऊन या आणि गाडी घेऊन जा", ते शांतपणे म्हणाले.

हे भगवान! हे जरा अतीच होतेय असे मला वाटले. मी विविध प्रकारे त्यांना समजवून सांगायचा प्रयत्न केला. पण सगळे व्यर्थ. केवढ्याश्या गोष्टीचा हा हा म्हणता किती मोठा बाऊ केला होता. जसे काय मी दारू पिऊन झोकांड्या देत गाडी चालवत होतो.
मला आता सगळा प्रकार संशयास्पद वाटू लागला. ते मशीनसुद्धा खोटे आहे असे वाटू लागले. अजूनही मला ती शंका आहे. टार्गेट अचिव्ह करण्यासाठी म्हणून त्या मशीनवर एखादे छुपे बटन दाबून तो आकडा मुद्दाम वाढवून एखाद्याला अडकवत असतील असा मला जाम संशय अजूनही आहे. पण मी मनातल्या मनात चरफडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो.

"चला चला लवकर. उशीर झालाय. अरे त्यांच्या गाडीत बसून त्यांना चौकीत घेऊन जा", साहेबाने फर्मान सोडले. मला त्याचा मनस्वी राग आला होता. नक्कीच त्याने मला नाहक अडकवले होते ह्यात.

मग एक हवालदार गाडीत बसला. आणि रात्री साडेबारा वाजता आम्ही ट्राफिक पोलीसच्या तिथल्या ट्राफिक पोलीसचौकीत आलो. येताना मी त्या हवालदाराला विनवणी करत होतो कि कशाला प्रकरण इतके वाढवले आहे? काय सेटलमेंट होते का बघा अजूनही. त्यावर त्याने असमर्थता दर्शविली. वर आणि मला सल्ला दिला कि तुम्ही शांतपणे सगळे साहेबांचे सगळे ऐकून घ्या. काय मदत करू शकले तर तेच करतील. आम्ही काहीच करू शकत नाही. घटनास्थळा पासून चौकीपर्यंतच्या त्या छोट्या प्रवासात त्याने मला दोन तीन वेळा "तुम्ही काय करता? घरी कोण कोण असते?" असे व्यक्तिगत प्रश्न विचारले. या दोन्ही प्रश्नांची खरी उत्तरे देण्याचे मी टाळले. किती पैसे उकळता येतील याचा 'अंदाज घेणे' हा एकच हेतू असतो हे मला अनुभवाने माहित होते. अन्यथा 'तुम्ही काय करता' हा प्रश्न विचारण्याचे कारण काय?

ट्राफिकपोलीस चौकीत आम्ही आल्यावर आमच्या पाठोपाठ साहेब पण आले. मी त्यांना पुन्हा विचारले काही करता येऊ शकते का. तर चिडून म्हणाले आता काहीच करू शकत नाही गाडी ठेवून जा म्हणून सांगितले आहे. मी अधिक काही बोललो नाही. गाडी इथे रात्रभर कशी ठेवणार हि माझी काळजी हवालदारने ओळखली. "गाडीची काळजी करू नका गाडी सुरक्षित राहील. सकाळी दहा वाजता लायसन घेऊन या" त्याने मला सांगितले.

अशा तऱ्हेने गुन्हा नोंदीच्या दहा मिनिटाच्या कामाला त्यांनी तब्बल दीड दोन तास लावले. नंतर स्वत: आपापल्या घरी जाऊन खुशाल झोपी गेले. मी मात्र रात्री साडेबाराएकच्या दरम्यान रिक्षा कुठे मिळते का शोधत रस्त्यांवरून फिरत होतो. तिथे इतक्या रात्री फार फार क्वचित रिक्षा दिसत होत्या. एखादा भेटला तर तो सुद्धा यायला तयार नसायचा. अखेर अर्ध्या तासांनी एक रिक्षावाला तयार झाला. तो म्हणेल तितके भाडे देऊन घरी आलो.

घरी येऊन पहिल्यांदा नेटवर शोध घेतला. झोप तर पार उडालीच होती. नेटवर ड्रिंक आणि ड्राईव्ह गुन्ह्याविषयी वाचले. आणि नखशिखांत हादरून गेलो. हा खरेच फौजदारी गुन्हा होता व चार ते पाच हजार रुपये दंड शिवाय सहा महिने ते चार वर्षे कैद अशी गंभीर शिक्षा पण होती. त्यातल्या त्यात बरी बाब म्हणजे गुन्हा केलेल्यांपैकी फार कमी जणांना शिक्षा झाली आहे असे जाणवले. पण याचा अर्थ मला तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही असा अजिबात नव्हता. बापरे! अरे कशासाठी? माझा गुन्हा तरी काय? कुणाला नुकसान पोहोचले होते माझ्यामुळे? माझ्या घशाला कोरड पडली. कसेबसे स्वत:ला सावरले आणि अंथरुणात शिरलो. पहाटे कधीतरी डोळा लागला.

सकाळी उठून लायसन्स शोधायला सुरवात केली. सगळी कागदपत्रे धुंडाळली. नशिबाने एके ठिकाणी ते सापडले. डिजिटल लायसन असल्यावर याचा आता उपयोग नाही असा विचार करून मी ते फेकून दिले नव्हते हे नशीबच. ते घेऊन पुन्हा चौकी गाठली. यावेळी ते रात्रीचे साहेब नव्हते. पण जे कोणी होते त्यांनी सुदैवाने फार तकतक न करता लायसन्स ठेऊन घेऊन अखेर माझ्या गाडीची चावी मला परत दिली. एकदाची माझी गाडी मला परत मिळाली. मी हुश्श्य केले, गाडी घेऊन घरी आलो व या महानाट्याचा एक भाग संपला.

पुढे काय झाले? मी कोर्टात गेलो का? कधी गेलो? तिथला अनुभव काय होता? मला काय शिक्षा झाली? तुरुंगवास झाला का? कि निर्दोष सुटलो? लायसन्स कधी व कसे मिळाले? हे सगळे उत्तरार्धात लिहितो. पण या निमित्ताने जे धडे मिळाले आणि जे प्रश्न निर्माण झाले त्याची नोंद करून हा भाग (पूर्वार्ध) संपवतो.

धडे:

१. थोडीसुद्धा दारू अथवा मादक पदार्थ सेवन केला असेल तर चुकुनही ड्रायविंग करू नका. यापूर्वी कधीच पकडले गेला नसाल तर तो अनुभव येण्याची वाट पाहू नका.

२. त्यातूनही चुकून पकडले गेलातच तर दारूचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तोंडात मशीनची नळी द्यायच्या आधीच काही सेटलमेंट करता येते का बघा.

३. डीजीलायसन बरोबर मूळचे कागदी लायसन्स सुद्धा बाळगत जा.

४. वाहतूक पोलिसांबरोबर कधीही हुज्जत घालू नका. गुन्हा केला नसेल तरीही हुज्जत घालण्यात अर्थ नसतो.

प्रश्न:

१. ड्रिंक करून ड्रायविंग करणे हा गंभीर गुन्हा आहे मान्य कारण त्यामुळे इतरांना धोका निर्माण होतो. पण पुरेशी झोप न घेता गाडी चालवणे, आयुष्यात ताणतणाव आल्याने विचलित होऊन गाडी चालवणे, आजारी असताना गाडी चालवणे हे सगळे सुद्धा तितकेच धोकादायक आहे ना? त्यासाठी तेवढीच शिक्षा का नाही?

२. तसे पाहता रस्त्यांची कामे सुमार दर्जाची करणारे कंत्राटदार तर सगळ्यात धोकादायक आहेत. थोड्याश्या पावसाने रस्ते वाहून जातात, पाणी तुंबते. कित्येक हजार जणांचे जीव त्यांच्यामुळे रोज धोक्यात येतात. ड्रिंक अन ड्राईव करणाऱ्याला तुरुंगवास असेल तर त्याच न्यायाने या लोकांना तर कायद्यात थेट फाशीचीच तरतूद असायला हवी ना?

३. गुन्हा केलेल्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक द्यायचा अधिकार पोलीसाना कोणी दिला? त्या रिक्षावाल्याला दिलेली वागणूक असो किंवा मी घरी कसे पोहोचेन याची फिकीर न करता गाडी जप्त करून रात्री बेरात्री मला रस्त्यावर वणवण फिरायला लावायचा अधिकार कोणत्या कायद्यात बसतो? माझ्या ठिकाणी एखादा हार्ट पेशंट असता व तणावामुळे त्याचे बरेवाईट झाले असते तर त्यास जबाबदार कोण?

४. "प्रामाणिकपणे गुन्हा कबूल केलात त्याचीच हि शिक्षा आहे असे समजा" ह्या पोलिसाच्या वाक्यातून काय बोध घ्यावा?

(उत्तरार्ध भाग १: https://www.maayboli.com/node/72953)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अतिशय दुर्दैवी आहे.25 डिसेंबर आणि 31 जानेवारी ला पण पोलीस लक्ष ठेवून असतात.
पिण्याचं लायसन्स 50 रु मध्ये मिळवता येतं असं काही मध्ये वाचलं होतं.
कितीही सौम्य ड्रिंक प्यायलं, कितीही चांगला कंट्रोल असला तरी रिक्षा/कॅब करणं किंवा मित्राच्या घरी पिऊन मुक्काम करून सकाळी निघणं पकडलं न जाण्याच्या दृष्टीने सेफ असावं.

दारू पिवून गाडी चालवणे हे स्वतः साठी आणि इतरांसाठी सुद्धा धोकादायक आहे.
जीव जावू शकतो.
त्या मुळे हा गुन्हा गंभीर च आहे.
दारू पिणाऱ्या माणसाला नेहमीच मी कंट्रोल मध्ये आहे अस वाटत असतं त्यात काही नवीन नाही

एका समारंभाला एक ज्येष्ठ नागरीक पतीपत्नी गेलेले. परतताना यांना टेस्ट करायला लावली. तो माणूस म्हणाला मी पिणाराच नाही तर मी कशाला करू टेस्ट. तरीही सर्वांप्रमाणेच रात्री घरी परतणाऱ्यांची करायची म्हणून टेस्ट करायला लावली ती पॉझटिव आल्यावर वादावादी. मशीन खराब आहे का वगैरे.
शेवटी कळलं की तो माणूस पीतच नाही पण कायकाय खाल्लं ते सांगितल्यावर कळलं की शेवटचे पान रम फ्लेवर्ड होते!!
मशीन बरोबर होते.

अर्थातच इथे ड्रिंक घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे >>>> हे भारी आहे, असो... उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत !

शेवटी कळलं की तो माणूस पीतच नाही पण कायकाय खाल्लं ते सांगितल्यावर कळलं की शेवटचे पान रम फ्लेवर्ड होते!!
मशीन बरोबर होते.

ये बात कुछ हजम नही हुई.

रम फ्लेवर्ड पानात रम किती असणार आणि त्यातील रक्तात किती मिसळणार आणित्यातील उच्छवासातून किती बाहेर पडणार?

नंगा नहायेगा क्या और निचोडेंगा क्या?

कायदा काय म्हणतो ते लक्षात घ्या

https://www.livemint.com/Politics/8yw65SOlOS730HVZmNUceJ/How-to-drink-an...

https://sites.ndtv.com/roadsafety/5-things-know-breathalysers-2061/

ड्रिंक आणि ड्राइव्ह हा गंभीर गुन्हा आहे, एक चुकलेला अंदाज आणि तुम्ही एखादे कुटुंब उध्वस्त करू शकता,
गाडी ऑफिसमध्ये ठेवून कॅब किंवा रिक्षा करणे हेच योग

दारू प्यायल्यामुळे माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटतो परंतु आत्मविश्वास नको इतका वाढतो त्यामुळे बऱ्याच वेळेस वाहन जास्त वेगाने चालवले जाते, ओव्हरटेक शक्य नसताना केले जाते किंवा वळवणे शक्य नसले तरी वळवू असा फाजील आत्मविश्वास वाटतो आणि मध्येच माणूस किंवा वाहन आले तर रिफ्लेक्स हळू झाल्याने ब्रेक मरेपर्यंत झालेला किंचित उशीर सुद्धा अपघातास कारणीभूत होतो.

या सर्व कारणांमुळे दारू प्यायल्यावर वाहन चालवूच नये.

जर आपण हजार दोन हजार रुपये दारू साठी खर्च करता तर पाचशे रुपये देऊन त्या रात्रीपुरता ड्रायव्हर का घेत नाही हा प्रश्न मी सर्वत्र विचारतो.

परंतु "काही होत नाही" असेच उत्तर येते. आणि याचे कारण "सब चलता है" हा आपला ढिला (भारतीय) दृष्टिकोन

टाईम्समधली बंगळुरुची बातमी होती. पान शेवटी खाल्यावर लगेचच टेस्ट तोंडाने केल्यास वाफाऱ्यात अल्कोहोल दाखवणारच. रम फ्लेवर्डमध्ये खरंच रमचा थेंब टाकला असेल. नुसत्या फ्लेवरला अल्कोहोल नसणार.
पण त्यांनी सावधान केलं. पान घरी नेऊन खाता येईल ड्राइविंग करणाऱ्याने.

परस्त्रि च्या नादाला लागलं की असे कटू अनुभव येणारच Lol .
या सगळ्या गोंधळाचं मूळ त्यातच आहे जे त्यांनी स्वत: मान्य केलंय...ते शेवटच्या ओळी ऐकून वगैरे. I think मी मागे पण म्हटलं होतं , obsession. दुसरं काही नाही त्यामुळे लेखाची फक्त पहीली कमेंट महत्वाची वाटली. बाकी चालू द्या Lol Lol .

बऱ्याच देशांत ड्रिंक अँड ड्राईव्ह ‘फेलोनी’ आहे. ओळखीतल्या एकाला कॅनडामध्ये एन्ट्री नाकारली होती. पोर्ट ऑफ एन्ट्री वर. नशिबाने तो अमेरिकेतूनच ड्राईव्ह करून गेला होता सो परत वापस आला. जर परदेशी जाणार असाल तर आधी माहिती काढून जा. काही अडडिशनल कागद पत्र लागतात.


१. ड्रिंक करून ड्रायविंग करणे हा गंभीर गुन्हा आहे मान्य
>>>>

इथेच विषय संपतो.
इतर गुन्हेही गंभीर वाटत असतील पण कायद्याने त्या गुन्ह्यांना दिलेले गांभिर्य कमी वाटत असेल तर ते वाढवण्याची मागणी करा. त्यांचे दाखले देऊन गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची मागणी करू नका.
आदर्श पृथ्वीकर होण्याचा प्रयत्न करत रहा.

ओळखीतल्या एकाला कॅनडामध्ये एन्ट्री नाकारली होती. पोर्ट ऑफ एन्ट्री वर.
>>
कॅनडामध्ये तुम्ही जर व्हिसावर असाल तर ड्रिंक ड्राइविंग केल्यास तुम्हाला डिपोर्ट केले जाते. तुम्ही जर कॅनेडियन पर्मनंट रेसिडेंट असाल (यूएस ग्रीनकार्ड सारखे) आणि तुम्हाला dui खाली पकडले तर पीआर कॅन्सल देखील करतात तसेच पीआर टू रेसिडेंट हा मार्ग बंद होतो.

युरोपातील अनेक देशात किमान गेल्या 10वर्षांपासून झिरो टोलरन्स आहे. म्हणजे लिमिट वगैरे काही नाही, एक वाईन ग्लास वा बीअर प्यायली असेल तरी गाडी चालवायला बंदी. एकतर टॅक्सी करा किंवा ग्रुपमधील एकाने प्यायची नाही, तो/ती डेसिग्नेटेड ड्राइवर

मुळात लोकांना स्वतःच जीव आणि दुसऱ्याचे आयुष्य
दारू पेक्षा स्वस्त का वाटत.
अगदी ब्लॅक जरी घेतली तर 5500 रुपयाला 750 ml आहे बार मध्ये 7000 ला असेल.
पण तुमचा कोणताही एक अवयव अपघातात निकामी झाला तर त्याची किंमत देशातील
चलनात किती ला असेल ह्याचा हिशोब लावा.

फक्त तोटाच दिसेल.

परिचित
पुढे काय झाले हे कधी सांगणार.

परिचित
पुढे काय झाले हे कधी सांगणार.
Submitted by Rajesh188 on 28 December, 2019 - 09:27
--
उतरल्यावर ??

इतर गुन्हेही गंभीर वाटत असतील पण कायद्याने त्या गुन्ह्यांना दिलेले गांभिर्य कमी वाटत असेल तर ते वाढवण्याची मागणी करा. त्यांचे दाखले देऊन गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची मागणी करू नका. >>> सहमत.

ड्रायव्हिंग हीच ज्यांची नोकरी आहे त्यांच्या विश्रांतीकरता नियम बनवून त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याखेरीज झोप येत असताना गाडी चालवणे, तणावात असताना चालवणे, किंवा एकूणच बिनडोकपणे चालवणे - हे प्रकार हुकमी चेक करता येणे अवघड आहे. तसे भविष्यात काही करता आले तर ते इतक्याच गंभीरपणे करायला हवे. पण तो वेगळा विषय आहे. त्याने दारू पिउन गाडी चालवण्याचे गांभीर्य कमी होत नाही.

सध्याच्या ओला/उबर च्या काळात ती सर्विस घेउन घरी जाण्याचा, आणि अशी गाडी सहजपणे मिळेल अशाच ठिकाणी दारू करता जाण्याचा पर्याय आहेच की.

परिचित याना 6 महिन्याची पोलीस कोठडी झाली असावी बहुतेक.

जेल मध्ये मोबाइल वापरून देतात का .
देत असतील तर ते तिथे सुद्धा myboli वापरू शकतील.

{{{ याखेरीज झोप येत असताना गाडी चालवणे, तणावात असताना चालवणे, किंवा एकूणच बिनडोकपणे चालवणे - हे प्रकार हुकमी चेक करता येणे अवघड आहे. तसे भविष्यात काही करता आले तर ते इतक्याच गंभीरपणे करायला हवे. पण तो वेगळा विषय आहे. त्याने दारू पिउन गाडी चालवण्याचे गांभीर्य कमी होत नाही }}}

नितीन गडकरींचं काही वर्षांपूर्वीचं (बहुदा २०१५ मधील असावं) एक भाषणही अशाच प्रकारचं होतं. दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांपेक्षा मोतीबिंदू झालेले / रातांधळे वाहनचालक जास्त अपघात करतात हे मत त्यांनी मांडलं होतं. अर्थात असे चालक शोधणे अवघड काम आहे. त्याचप्रमाणे असे वाहनचालक हे पोटाकरिता वाहन चालवित असल्याने त्यांच्याकडे सहानुभुतीने पाहिले जाते याउलट दारु पिऊन वाहन चालविणारे हे शौकिन लोक असतात व त्यांनी अपघात करुन कुणाला उडविले तर समाजाच्या दृष्टीने तो जास्त रोषाचा विषय असतो त्यामुळे सरकारला अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावीच लागते कारण हा भावनिक मुद्दा आहे.

मी तर चालत रस्ता ओलांडताना ,रहदारीच्या
रस्त्याने चालताना खूप सावध चालतो.
चालकांची मानसिक टेस्ट driving लायसेन्स साठी सक्तीची करावी असेच माज मत झाले.
कोण कधी lane बदलेल,कोण कधी टर्न घेईल,कोण कधी मुख्य रस्त्यावर गल्लीतून टपकेल,कोण कधी गाडी ला वेग देईल काही काही भरोसा राहिला नाही .
गाडी चालवताना सुद्धा,सर्व mirror,समोर चा रस्ता चारी बाजूला माझे बारीक लक्ष असते.
बेशिस्त ड्रायव्हिंग ही आपल्या देशाचे वैशिष्ट बनू नये म्हणजे झाले.

गाडी चालवताना सुद्धा,सर्व mirror,समोर चा रस्ता चारी बाजूला माझे बारीक लक्ष असते.>>> तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणजे भारत देशाची शान आहे.

बेशिस्त ड्रायव्हिंग ही आपल्या देशाचे वैशिष्ट बनू नये म्हणजे झाले.
Submitted by Rajesh188 on 28 December, 2019 - 18:57

आधीच बनले आहे. वाहन संख्या सर्वाधिक नसतानाही जगात सर्वाधिक अपघातांचा देश म्हणून आपली ख्याती आहे.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_traffic-related_death...

चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे पण आपण मोठ्या फरकाने पुढे आहोत.

Pages