सावधान, ड्रिंक आणि ड्राईव्हचा गुन्हा गांभिर्याने घ्या (माझा कटू अनुभव) : पूर्वार्ध

Submitted by Parichit on 25 December, 2019 - 19:54

नाताळ झाला. अजून काही दिवसांनी ३१ डिसेम्बर येईल. दारूच्या पार्ट्या झडतील. मायबोलीवर "दारू कशी पिता" अशा धाग्याला शेकडो प्रतिसाद येतात. अर्थातच इथे ड्रिंक घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हा धागा त्यांनी व इतरांनी सुद्धा वाचवा म्हणून मुद्दामहून लिहित आहे.

प्रकटीकरण: जे जसे घडले तसे सांगत आहे. शहराचे नाव व बाकी व्यक्तिगत तपशील सांगत नाही कारण त्याची आवशक्यता नाही. ("केवळ प्रतिसाद मिळवण्यासाठी केलेले खोटेनाटे सनसनाटी लिखाण" असे आरोप ज्यांना करायचे आहेत त्यांनी हे लिखाण वाचले नाही तरी माझी हरकत नाही)

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. त्या दिवशी शुक्रवारी ऑफिस करून संध्याकाळी घरी जायला म्हणून ऑफिसच्या पार्किंगमध्ये आलो. गाडी सुरु करणार तोच एका घनिष्ट मित्राचा फोन आला. म्हणाला, "येतोस का? बसूया. आज शुक्रवार आहे. माझी एक नवीन मैत्रीण येणार आहे. तुलापण तिची ओळख करून देतो". आता, केवळ शुक्रवार आहे म्हणून आणि फक्त दारू पिण्यासाठी म्हणून संध्याकाळच्या गच्च ट्राफिक मधून घीरघीर पिंपी काचकीच करत इतक्या लांब त्याच्याकडे जाण्याइतकी मित्रप्रेमाची भरती मला नक्कीच आली नव्हती. पण त्याचे शेवटचे वाक्य ऐकल्यानंतर मी नाही म्हणू शकलो नाही. जीवनात नवीन मैत्रिणीचा योग असेल तर कधीच नाही म्हणू नये.

झाले. घराकडे न्यायची गाडी मी त्याच्या ऑफिसजवळ असलेल्या बार कडे वळवली. तिथे पोहोचायला पाउण-एक तास लागला. या बारला आम्ही आजवर कितीतरी वेळा बसलो आहे. त्यामुळे नेहमीच्या सरावाने मी तिथे बारच्या बाजूला चिंचोळ्या गल्लीत पार्किंग शोधले. शुक्रवार असल्याने पार्क केलेल्या गाड्यांनी गल्ली पूर्ण भरली होती. अखेर गल्लीच्या जवळजवळ दुसऱ्या टोकाला पार्किंग मिळाले. बार पासून तसे दूरच. पण त्याला आता पर्याय नव्हता.

बारमध्ये आल्यावर हे दोघे आधीच तिथे माझी वाट पाहत बसून होते. आम्ही भेटलो. हाय हेलो झाले. त्याने आपल्या मैत्रिणीची ओळख करून दिली. मग आम्ही खूप गप्पा मारल्या. हास्यविनोद केले. ती मैत्रीण आणि ती संध्याकाळ दोन्हीही खूपच सुरेख असा तो योग होता. दिवसभराचा शिणवटा कसा निघून गेला कळले नाही. मी काही हेवी ड्रिंकर नाही. सोशल होण्यासाठी म्हणून एखादी माईल्ड बिअर घेतो इतकेच. मला तितकेच प्रिय आहे. त्या संध्याकाळी तर अल्ट्रा घेतली, कि जी माईल्डहून अधिक माईल्ड असते (जे 'घेत' नाहीत त्यांच्यासाठी हि माहिती). ती सुद्धा एकच घेतली. कारण मनसोक्त खळखळत्या गप्पा झोडणारी मैत्रीण बरोबर असेल तर मला नशेसाठी ड्रिंक जास्त घ्यावी लागतच नाही. त्या धुंद वातावरणात गप्पांच्या ओघात दोन तीन तास कसे गेले कळले पण नाही. रात्रीचे अकरा वाजले तसे आम्ही उठलो. एकमेकाला बाय बाय केले आणि आपापल्या घराचे रस्ते धरले. इतकी सुखद संध्याकाळ झाल्याने मी तरंगतच गाडीपर्यंत गेलो.

जसे मी मघाशी सांगितले हि काही माझी इथे येण्याची पहिली वेळ नव्हती. यापूर्वी अनेक वर्षे कितीतरी वेळा मी इथून अगदी अशाच प्रकारे गाडी पार्क करून ड्रिंक घेऊन असेच रात्रीचे ड्रायव्हिंग करत घर गाठले आहे. त्यामुळे सगळे नेहमीच्या सवयीचे. पण ती रात्र काही क्षणातच आजवरच्या रात्रींपेक्षा वेगळी ठरणार होती याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती. गाडी जवळपास गल्लीच्या दुसऱ्या टोकापाशी असल्याने अर्थातच मी मागे न येता तशीच पुढे दामटली. आणि गल्ली संपवून मुख्य रस्त्याला डावीकडे वळायचे असा विचार करतोय तोच गल्ली संपते तिथे समोर मुख्य रस्त्याला पांढरा शर्ट खाकी प्यांट आणि डोक्याला मफलर गुंडाळून "मामा" साहेब हजर! आईचा घो. ट्राफिक पोलीस आणि ह्या वेळी? मी मनात चरकलो. तिथच माझी थोडी उतरली. गल्ली अरुंद असल्याने गाडी पट्कन यूटर्न घेऊन उलट दिशेने पळून जायला सुद्धा वाव नव्हता. गाडी जवळ येत त्याने मला अत्यंत प्रेमाने विचारले, "तोंडाने जरा हा हा करून हवा सोडा पाहू?". मी समजून चुकलो. आता इथे ड्रामा करण्यात अर्थ नव्हता. ट्राफिक पोलिसांशी मी आजवर कधीच ड्रामा किंवा हुज्जत घातलेली नाही. कारण त्याचा काहीएक उपयोग होत नसतो हे मला खूप पूर्वीच कळून चुकले आहे. म्हणून मी थेट सांगूनच टाकले. म्हणालो "हे पहा साहेब मी थोडी घेतली आहे. पण अल्ट्रा माईल्ड घेतली आहे. कायद्याच्या मर्यादेत बसते ती", मी ठोकून दिली. "चला या. गाडी साईडला घ्या", तो शांतपणे म्हणाला. अल्ट्रा माईल्ड वगैरे शब्दांना त्याने धत्त करून किंमत पण दिली नाही. आपल्या सहायकाला (त्यांच्या हाताखालचा ट्राफिक हवालदार) त्यांनी बोलवून घेतले. तो आला आणि माझ्या शेजारी पुढील सीटवर बसला. गाडी साईडला घेण्याचा बहाणा करत वाहनचालक पळून जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतात हे लोक. अर्थात त्यांच्यासाठी ते नेहमीचेच असते. मी मुकाट्याने गाडी बाजूला घेतली. किल्ली त्याच्याकडे सुपूर्द केली. इतक्या सुंदर संध्याकाळची पार वाट लागायला सुरवात झाली होती. पण ती वाट पुढे कल्पनेच्याही पलीकडे लागणार आहे याची मला सुतरामदेखील कल्पना नव्हती. कारण "होऊन होऊन काय होईल? थोडेफार पैसे जातील" असा विचार मी केला होता व पैसे देण्याची तयारी ठेवून त्यांच्या मागोमाग गेलो. दहाएक मिनिटात सेटलमेंट करून आपण मोकळे होऊ अशी माझी कल्पना होती. पाहतो तर तिथे आधीच एक सभ्य गृहस्थ उभे होते. वय साठीच्या पुढेमागे असावे. उच्चभ्रू घरातील वाटत होते. तिथे जवळपासच राहत असावेत हे त्यांच्या पेहरावावरून जाणवत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे काम सुरु होते. तोवर मला तिथे बाजूला उभे राहायला सांगितले. मुख्य साहेब आणि त्याच्या हाताखाली दोन चार ट्राफिक हवालदार असा तो लवाजमा होता. रात्रीच्या वेळी तिथे उभे राहून बार मधून ड्रायविंग करत येणाऱ्याना पकडायचे पुण्यकर्म सुरु होते.

मी तिथे हाताची घडी घालून उभा राहून निमूटपणे ते सगळे बघू लागलो. त्या उच्चभ्रू गृहस्थाने खूप विदेशी हार्ड ड्रिंक घेतली असावी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत करून घेतली. अल्ट्रा माईल्ड बिअरवर माझा गाढा विश्वास होता. "अहो साहेब मी घरीच थोडी घेतली होती. ती सुद्धा दुपारी. त्याला आता किती तास झाले बघा ना", ते गृहस्थ अजिजीच्या सुरात बोलत होते. पण ट्राफिक इन्स्पेक्टरवर त्याचा काहीएक परिणाम होत नव्हता. "हे बघा आमच्या हातात काही नसते. तुम्ही घेतली का नाही किंवा किती घेतली ते सगळे हे मशीन आपल्याला सांगेल. तुम्ही फक्त हि नळी तोंडात धरा आणि त्यात फुंका. मशीनवर आकडा दिसेल. तो मर्यादेपेक्षा कमी आला तर तुम्ही बिनधास्तपणे निघून जा ना. आम्ही थोडेच अडवून धरणार मग तुम्हाला?". त्या साहेबांनी या गृहस्थाना प्रोसिजर समजवून सांगितली. व त्यांना त्या मशिनची नळी तोंडात धरून त्यात फुंकर मारायला सांगितले. त्या उच्चभ्रू गृहस्थांनी आज्ञेचे पालन करत तशी फुंकर मारली. त्यासरशी मशीनवर दिसणारा आकडा सत्तरच्या आसपास घुटमळला. "हे बघा. आकडा साठच्या पुढे जाणे बेकायदेशीर आहे. तुमचे नाव सांगा... जाधव यांचे समजपत्र तयार कर". साहेबांनी हाताखालच्या हवालदारला फर्मान सोडले. (इथे जाधव हे आडनाव काल्पनिक आहे. केवळ कथनाच्या सोयीकरिता वापरले आहे). "अहो हे काय करताय? कसे शक्य आहे?" ते गृहस्थ आर्जवाने बोलू लागले. पण त्यांचे ते शब्द जणू हवेतच विरले. त्यांच्यावर पोलीसकेस करायच्या कामाला सुरवात झाली. मग नाव गाव पत्ता लायसन नंबर अमुक तमुक सगळे डीटेल्स लिहून घेण्याचे सोपस्कार सुरु झाले. एकदा मोबाईल मध्ये आणि एकदा पेनाने कागदावर. एकच माहिती अशी दोन दोन वेळा रट्टायचे काम सुरु होते. हे काम करणारे हाताखालचे हवालदार डोक्याने माठ होते. मोबाईलवर टाईप करायची साधी अक्कल त्यांना नव्हती. मराठी टायपिंग त्यांना जमत नव्हते. केवळ नाव लिहायलाच त्याने दहा मिनिटे लावली. त्याच्या हातून मोबाईल हिसकून भराभर त्यांना लिहून द्यावे असा मनातला एक आक्रमक विचार मी मनातच दाबला. त्यात आणि भरीस भर म्हणून या उच्चभ्रू गृहस्थांचे ड्रायविंग लायसन्स त्यांच्याजवळ नव्हते. ते आणण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला. हे सगळे होईतोवर मला का विनाकारण उभे करून घेतले आहे? मी काही हेवी ड्रिंक केली नाही. थोडेफार पैसे घेऊन सोडून द्या ना. असे काहीबाही विचार करत मी जाम वैतागून उभा होतो. कुठल्याकुठे झक मारली आणि इकडे आलो असे होऊन गेले होते. एव्हाना साडेअकरा वाजून गेले होते. माझी पूर्ण उतरली होती.

या दरम्यानच्या काळात मुख्य साहेबाना अजून एक सावज मिळाले. तो एक रिक्षावाला होता. पकडल्यानंतर तो फारच गयावया करू लागला. बिचारा पॅनीक झाला. "देशी मारली असणार. होणार आता केस याच्यावर सुद्धा" असा विचार मी केला. इतरांवर केस होईल. पण अल्ट्रा माईल्ड बिअर असल्याने आपल्यावर केस होणे शक्य नाही असा मला फाजील विश्वास होता. तो रिक्षावाला फारच काकुळतीला येऊन विनवणी करू लागला. हा गुन्हा किती गंभीर आहे याची बहुतेक त्याला कल्पना असावी (कि जी तोपर्यंत मला नव्हती). ह्या रिक्षावाल्याने नंतर बरीच करमणूक केली. सदगृहस्थांवर केस करायचे काम सुरु असताना मी शांतपणे उभा होतो. पण याचे मात्र सुटकेसाठी विविध शकली लढवायचे निकराचे प्रयत्न सुरु होते. "अहो जाऊ द्या साहेब. त्यांची बायको बाळंत होणार आहे. दवाखान्यात घेऊन चाललोय त्यांना", रिक्षावाल्याने रिक्षात बसलेल्या प्रवाशाकडे हात करून साहेबाना सांगायचा प्रयत्न केला. "गप्प रे. येडा बनवतो का आम्हाला? सगळी नाटकं माहित आहेत तुमची" साहेब त्याच्यावर खेकसले. "अहो खरंच सांगतोय साहेब. विचारा तुम्ही त्यांना" निर्ढावलेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या खेकसण्याला जुमानले नाही. "कानाखाली हाण रे त्याच्या. गप्प उभारता येत नाही का बे तुला? पुन्हा काय बोललास तर थापडीन तुला मी इथंच" साहेब जोरदार डाफरले. त्याबरोबर रिक्षावाला मांजरासारखा शांत झाला. पण त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते. एव्हाना त्या उच्चभ्रू गृहस्थांशी मी जुजबी संवाद साधायला सुरु केली. "मी इथेच जवळपास राहतो. घरीच अगदी थोडीशी घेतली होती दुपारी", वगैरे वगैरे ते सांगत होते. आम्ही बोलत असताना थोड्या वेळाने मागून हवालदारचा जोरात गुरगुरण्याचा आवाज आला "ए... लांब उभा राहा. माझ्या अंगाला हात लाऊ नकोस. पोलीस आहे मी. पोलिसच्या अंगाला हात लावायचा नसतो समजलं का?". पाहतो तर लक्षात आले कि रिक्षावाल्याने हवालदाराशी सलगी करायच्या नादात त्याच्या खांद्यावर हात टाकायला प्रयत्न केला होता. ते पाहताच तशाही परिस्थितीत मला हसायला आले. किती चिवट होता रिक्षावाला. पुढे तर त्याने हद्दच केली. थोडा वेळ जाऊ दिला आणि मग त्याने थेट ट्राफिक पोलीस साहेबाचे पायच धरले. ते पाहून मी अवाक् झालो. परिस्थितीपुढे माणूस किती अगतिक होऊ शकतो. पण त्याला इतके गयावया करायचे कारण तरी काय हे कळेना. थोडेफार पैसे देऊन यातून सुटता येते अशी माझी कल्पना असल्याने ते पैसे सुद्धा रिक्षावाल्यांसाठी खूप असतात म्हणून कदाचित इतक्या विनवण्या करत असेल अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली. पाय धरूनही साहेब नरमले नाहीत. "काय करतो रे तू? येडा झाला का?" बाजूला सरकत ते म्हणाले. "अहो मी आत गेलो तर बायकापोरं उपाशी मारतील माझी" रिक्षावाला रडकुंडीला येऊन म्हणाला. "अरे पण हि आमची ड्युटी आहे. रात्री बेरात्री इथं रस्त्यावर येऊन उभं रहायला वेड लागलंय का आम्हाला? घरात निवांत बसलो असतो ना मी? पण काय करणार, तुला सोडलं तर आमची नोकरी जाईल आणि आमची बायकापोरं उपाशी मरतील" ट्राफिक इन्स्पेक्टर साहेब त्याला उलट उत्तरादाखल बोलले. तो निरुत्तर झाला. थोड्या वेळाने हळूच म्हणाला, "अहो जाऊ द्या साहेब. भाजपचा कार्यकर्ता आहे मी". (यात काहीएक माझ्या मनाचे मी लिहित नाही. तो अक्षरशः हे असे बोलला). आता मात्र साहेबांना हसू आवरले नाही. मोठ्याने हसत ते दोन तीन वेळा म्हणाले, "बस्स. एवढच एक ऐकायचं बाकी राहिलं होतं बघ"

एव्हाना बारा वाजले. साहेबांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. पुन्हा तेच सारे. मशीनची काचेची नळी माझ्या तोंडासमोर धरली आणि त्यात फुंकायला लावले. मागचापुढचा फार विचार न करता मी सुद्धा अतिआत्मविश्वासाने काचेच्या नळीत हवा फुंकली. आकडा त्रेसष्ठ वर गेला. "साठच्या वर आहे. यांचे समजपत्र बनवायला घे". मी हादरलो. काय? कसे शक्य आहे?

"अहो पण मी नेहमी येतो इथे. आजसुद्धा माझ्याबरोबर कितीतरी लोक ड्रिंक घेत होते त्या हॉटेलमध्ये. मलाच का पकडले? जायचे कसे लोकांनी घरी?"

"ड्रायवर ठेवा किंवा रिक्षा करून जा", ते शांतपणे बोलले.

"अहो ह्याला काय अर्थ आहे का? आता पुढे काय प्रोसेस आहे?", मी असहायपणे विचारले.

"सांगतो न सगळी प्रोसेस. काळजी करू नका. तुमची कागदंपत्रं काढून तयार ठेवा. लायसन्स, इन्शुरन्स, पीयूसी, आरसीटीसी सगळं आहे का?"

मी सगळ्या कागदांची झेरॉक्स गाडीत ठेवली होती ती दाखवली. लायसन्स मात्र आजकाल स्मार्टफोनवर सरकारच्या डीजीलॉकर एप मध्ये असते. तेच अधिकृतरीत्या चालत असल्याने ओरिजिनल लायसन्स मी आजकाल जवळ बाळगतच नव्हतो. मी त्यांना तसे सांगितले.

ते म्हणाले, "आम्हाला ओरिजिनल लागते"

मी म्हणालो, "अहो लायसन्स डीजीलॉकर मधले ओरिजिनलच असते. डीजीलॉकर सरकारी एप आहे. आतापर्यंत जेंव्हा केंव्हा अडवले तेंव्हा तेच दाखवले आहे. तुम्हीच पहिल्यांदा ओरिजिनल मागणारे मी बघत आहे".

त्यावर त्यांनी माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय गुन्हा केलाय तो? हा काही नेहमीचा किरकोळ गुन्हा नाही. डीजीलॉकर तिथे चालते. इथे फौजदारी दाखल करावी लागते आम्हाला तुमच्या विरोधात. मूळ लायसन्स जप्त करावे लागते".

"नाहीये माझ्याकडे मूळ लायसन्स"

"मग घेऊन या किंवा कुणालातरी घेऊन यायला सांगा"

"कोणीही येऊ शकत नाही. घरी कोणी नाही माझ्या"

"ते काय ते तुम्ही बघा. लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी सोडता येणार नाही"

आता मात्र हे सगळे प्रकरण किती खोल गर्तेत चालले आहे हे मी कळून चुकलो. चार पैसे घेऊन सोडून द्यायचे तर हे विनाकारण आपल्याला त्रास देत आहेत असे वाटू लागले. प्रचंड चिडचिड झाली.

"अहो पण आजकाल सगळे डिजिटल झाले आहे. तुम्ही सिस्टीममधून रद्द करा न लायसन्स माझे. तो कागद आणण्यासाठी त्रास का देत आहात मला?"

"तुम्ही मुकाट्यानं लायसन्स काढता का मी मार्शल्स बोलवू?", साहेबाने धमकी देऊन मी लायसन्स काढतो का पाहिले. मग मात्र माझा तोल सुटला.

"हे पहा मी खोटे सांगत नाही. मीच प्रामाणिकपणे तुम्हाला मी दारू प्यायलो आहे म्हणून सांगितले आहे सुरवातीला. त्याची हि शिक्षा देत आहात का मला?"

"हो तसेच समजा. प्रामाणिकपणाला शिक्षा असते असे समजा"

"ह्याला अर्थ आहे का? मी लायसन्स देऊ शकत नाही. घरी कुठे ठेवले आहे ते हि मला माहित नाही. कारण डीजीलॉकर मध्ये लायसन्स आल्यापासून त्याची आवश्यकता नाही असे आरटीओनेच सांगितले आहे" मी इरेला पेटून बोललो.

इथे हवालदाराने मला बाजूला घेतले आणि म्हणाला, "अहो शांतपणे घ्या. साहेब शक्य ती मदत करतील. पण ते चिडतील असे काय करू नका. अगोदरच तुमच्यावर फौजदारी होत आहे. त्यात अजून त्यांनी रागाने तुम्च्याविरोशात कमीजास्त काही लिहिले तर पुढे तुम्ही खूप अडचणीत याल. तेंव्हा त्यांच्याशी शांतपणे बोला"

पण मी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. काहीही भयंकर गुन्हा नसताना नाहक कुठल्या कुठे प्रकरण जात आहे असे वाटल्याने प्रचंड चरफड सुरु होती. रागाने मी काही बोलणार तितक्यात साहेबांनी हातातला वॉकीटोकी उचलला. बटने दाबली आणि बोलले,

"मार्शल्स पाठवून द्या. बिगर लायसन्स दारू पिऊन गाडी चालवताना पकडले आहे आणि वर दंगा करत आहे. ताबडतोब दोन मार्शल्स पाठवून द्या"

हे ऐकताच नाही म्हटले तरी मी घाबरलोच. पण मी वरवर तसे दाखवून दिले नाही. शांतपणे म्हणालो, "लायसन्स नाही माझ्याकडे. मी ते आणूसुद्धा शकत नाही. हि वस्तुस्थिती आहे. आता जे काय करायचे ते करा".

नव्हतेच माझ्याकडे लायसन्स तर मी तरी काय करू शकत होतो? जे आहे त्याला सामोरे जाणे आवश्यक होते.

इतक्यात उच्चभ्रू गृहस्थांच्या धर्मपत्नी देवीजी, त्यांचे लायसन्स घेऊन हजर झाल्या. ट्राफिक साहेबांनी ते लायसन्स ठेऊन घेतले आणि त्यांना कोर्टात जायला सांगितले. जाता जात त्या उच्चभ्रू गृहस्थांनी सुद्धा माझी बाजू त्या साहेबाला सांगायचा प्रयत्न केला

"तुमचे मान्य आहे. पण त्यासाठी कशाला त्यांना त्रास देता. ते डीजीलॉकर मधून त्यांचे लायसन्स दाखवत आहेतच कि. त्यांचे घर इथून बरेच लांब आहे. इतक्या रात्री कसे जातील? एक विनंती म्हणून सांगतो आहे कि निदान माणुसकीच्या नात्याने तरी काही पर्याय निघतो का बघा नि जाऊ द्या त्यांना"

"अहो लायसन्स जप्त करायला लागते नियमानुसार. लायसन्स त्यांच्याकडेच राहिले तर कोर्टात कशाला जातील ते? आणि शिवाय आमचे साहेब आम्हाला हाकलून देतील त्याचे काय?"

यावर उच्चभ्रू गृहस्थ सुद्धा निरुत्तर झाले व निघून गेले. मग मी साहेबाशी थोड्या सलगीने बोललो,

"साहेब माझ्याकडे खरेच लायसन्स नाही. शप्पथ मी खोटे नाही बोलत. काय सेटलमेंट होते का बघा ना. अहो तुमच्याच गावचा आहे मी"

मी अंदाजाने ठोकून दिले. त्यावर साहेबाने चमकून माझ्यकडे बघितले व विचारले, "कोणते गाव?"

मी गावाचे नाव सांगताच ते म्हणाले,

"अहो मग हे आता सांगताय? तोंडात नळी पकडायच्या आधी सांगायचे ना? तेंव्हा काहीतरी करता आले असते. आता काही करता येण्यासारखे नाही. मशीनवर एकदा डिजिटल रेकॉर्ड झाले कि पुढचे आमच्या हातात नसते"

"अहो मला वाटले अल्ट्रा माईल्ड बियर व ती सुद्धा थोडीशीच प्यायली असल्याने मशीनवर जास्त आकडा येणार नाही. म्हणून मी निर्धास्त होतो"

"फौजदारी गुन्हा आहे हा. दहा हजार रुपये दंड आणि कधीकधी सहा महिन्यांपर्यंत कैदसुद्धा देतात याला", साहेब शांतपणे बोलले.

काहीही काय? असे थोडेच असते? इतके पण भयंकर गुन्हा नाहीये हा. मी काय कुणाचा खून केलेला नाही. घाबरवण्यासाठी काहीही सांगत आहेत.... मी मनातल्या मनात स्वत:ची समजूत घातली.

"पण आता काय करायचे?" मी विचारले

माझ्या हातात समजपत्र देत ते म्हणाले, "हे घ्या आणि त्यात दिलेल्या तारखेनंतर चार दिवसांनी कोर्टात जा. तिथे काय शिक्षा होईल त्यावर पुढच्या गोष्टी"

"अहो पण मी आता इथून इतक्या लांब घरी कसे जाणार? ह्यावेळी रिक्षा तरी मिळेल का मला?"

"गाडी आमच्या पोलीस चौकीत ठेवावी लागेल. सकाळी लायसन्स घेऊन या आणि गाडी घेऊन जा", ते शांतपणे म्हणाले.

हे भगवान! हे जरा अतीच होतेय असे मला वाटले. मी विविध प्रकारे त्यांना समजवून सांगायचा प्रयत्न केला. पण सगळे व्यर्थ. केवढ्याश्या गोष्टीचा हा हा म्हणता किती मोठा बाऊ केला होता. जसे काय मी दारू पिऊन झोकांड्या देत गाडी चालवत होतो.
मला आता सगळा प्रकार संशयास्पद वाटू लागला. ते मशीनसुद्धा खोटे आहे असे वाटू लागले. अजूनही मला ती शंका आहे. टार्गेट अचिव्ह करण्यासाठी म्हणून त्या मशीनवर एखादे छुपे बटन दाबून तो आकडा मुद्दाम वाढवून एखाद्याला अडकवत असतील असा मला जाम संशय अजूनही आहे. पण मी मनातल्या मनात चरफडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो.

"चला चला लवकर. उशीर झालाय. अरे त्यांच्या गाडीत बसून त्यांना चौकीत घेऊन जा", साहेबाने फर्मान सोडले. मला त्याचा मनस्वी राग आला होता. नक्कीच त्याने मला नाहक अडकवले होते ह्यात.

मग एक हवालदार गाडीत बसला. आणि रात्री साडेबारा वाजता आम्ही ट्राफिक पोलीसच्या तिथल्या ट्राफिक पोलीसचौकीत आलो. येताना मी त्या हवालदाराला विनवणी करत होतो कि कशाला प्रकरण इतके वाढवले आहे? काय सेटलमेंट होते का बघा अजूनही. त्यावर त्याने असमर्थता दर्शविली. वर आणि मला सल्ला दिला कि तुम्ही शांतपणे सगळे साहेबांचे सगळे ऐकून घ्या. काय मदत करू शकले तर तेच करतील. आम्ही काहीच करू शकत नाही. घटनास्थळा पासून चौकीपर्यंतच्या त्या छोट्या प्रवासात त्याने मला दोन तीन वेळा "तुम्ही काय करता? घरी कोण कोण असते?" असे व्यक्तिगत प्रश्न विचारले. या दोन्ही प्रश्नांची खरी उत्तरे देण्याचे मी टाळले. किती पैसे उकळता येतील याचा 'अंदाज घेणे' हा एकच हेतू असतो हे मला अनुभवाने माहित होते. अन्यथा 'तुम्ही काय करता' हा प्रश्न विचारण्याचे कारण काय?

ट्राफिकपोलीस चौकीत आम्ही आल्यावर आमच्या पाठोपाठ साहेब पण आले. मी त्यांना पुन्हा विचारले काही करता येऊ शकते का. तर चिडून म्हणाले आता काहीच करू शकत नाही गाडी ठेवून जा म्हणून सांगितले आहे. मी अधिक काही बोललो नाही. गाडी इथे रात्रभर कशी ठेवणार हि माझी काळजी हवालदारने ओळखली. "गाडीची काळजी करू नका गाडी सुरक्षित राहील. सकाळी दहा वाजता लायसन घेऊन या" त्याने मला सांगितले.

अशा तऱ्हेने गुन्हा नोंदीच्या दहा मिनिटाच्या कामाला त्यांनी तब्बल दीड दोन तास लावले. नंतर स्वत: आपापल्या घरी जाऊन खुशाल झोपी गेले. मी मात्र रात्री साडेबाराएकच्या दरम्यान रिक्षा कुठे मिळते का शोधत रस्त्यांवरून फिरत होतो. तिथे इतक्या रात्री फार फार क्वचित रिक्षा दिसत होत्या. एखादा भेटला तर तो सुद्धा यायला तयार नसायचा. अखेर अर्ध्या तासांनी एक रिक्षावाला तयार झाला. तो म्हणेल तितके भाडे देऊन घरी आलो.

घरी येऊन पहिल्यांदा नेटवर शोध घेतला. झोप तर पार उडालीच होती. नेटवर ड्रिंक आणि ड्राईव्ह गुन्ह्याविषयी वाचले. आणि नखशिखांत हादरून गेलो. हा खरेच फौजदारी गुन्हा होता व चार ते पाच हजार रुपये दंड शिवाय सहा महिने ते चार वर्षे कैद अशी गंभीर शिक्षा पण होती. त्यातल्या त्यात बरी बाब म्हणजे गुन्हा केलेल्यांपैकी फार कमी जणांना शिक्षा झाली आहे असे जाणवले. पण याचा अर्थ मला तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही असा अजिबात नव्हता. बापरे! अरे कशासाठी? माझा गुन्हा तरी काय? कुणाला नुकसान पोहोचले होते माझ्यामुळे? माझ्या घशाला कोरड पडली. कसेबसे स्वत:ला सावरले आणि अंथरुणात शिरलो. पहाटे कधीतरी डोळा लागला.

सकाळी उठून लायसन्स शोधायला सुरवात केली. सगळी कागदपत्रे धुंडाळली. नशिबाने एके ठिकाणी ते सापडले. डिजिटल लायसन असल्यावर याचा आता उपयोग नाही असा विचार करून मी ते फेकून दिले नव्हते हे नशीबच. ते घेऊन पुन्हा चौकी गाठली. यावेळी ते रात्रीचे साहेब नव्हते. पण जे कोणी होते त्यांनी सुदैवाने फार तकतक न करता लायसन्स ठेऊन घेऊन अखेर माझ्या गाडीची चावी मला परत दिली. एकदाची माझी गाडी मला परत मिळाली. मी हुश्श्य केले, गाडी घेऊन घरी आलो व या महानाट्याचा एक भाग संपला.

पुढे काय झाले? मी कोर्टात गेलो का? कधी गेलो? तिथला अनुभव काय होता? मला काय शिक्षा झाली? तुरुंगवास झाला का? कि निर्दोष सुटलो? लायसन्स कधी व कसे मिळाले? हे सगळे उत्तरार्धात लिहितो. पण या निमित्ताने जे धडे मिळाले आणि जे प्रश्न निर्माण झाले त्याची नोंद करून हा भाग (पूर्वार्ध) संपवतो.

धडे:

१. थोडीसुद्धा दारू अथवा मादक पदार्थ सेवन केला असेल तर चुकुनही ड्रायविंग करू नका. यापूर्वी कधीच पकडले गेला नसाल तर तो अनुभव येण्याची वाट पाहू नका.

२. त्यातूनही चुकून पकडले गेलातच तर दारूचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तोंडात मशीनची नळी द्यायच्या आधीच काही सेटलमेंट करता येते का बघा.

३. डीजीलायसन बरोबर मूळचे कागदी लायसन्स सुद्धा बाळगत जा.

४. वाहतूक पोलिसांबरोबर कधीही हुज्जत घालू नका. गुन्हा केला नसेल तरीही हुज्जत घालण्यात अर्थ नसतो.

प्रश्न:

१. ड्रिंक करून ड्रायविंग करणे हा गंभीर गुन्हा आहे मान्य कारण त्यामुळे इतरांना धोका निर्माण होतो. पण पुरेशी झोप न घेता गाडी चालवणे, आयुष्यात ताणतणाव आल्याने विचलित होऊन गाडी चालवणे, आजारी असताना गाडी चालवणे हे सगळे सुद्धा तितकेच धोकादायक आहे ना? त्यासाठी तेवढीच शिक्षा का नाही?

२. तसे पाहता रस्त्यांची कामे सुमार दर्जाची करणारे कंत्राटदार तर सगळ्यात धोकादायक आहेत. थोड्याश्या पावसाने रस्ते वाहून जातात, पाणी तुंबते. कित्येक हजार जणांचे जीव त्यांच्यामुळे रोज धोक्यात येतात. ड्रिंक अन ड्राईव करणाऱ्याला तुरुंगवास असेल तर त्याच न्यायाने या लोकांना तर कायद्यात थेट फाशीचीच तरतूद असायला हवी ना?

३. गुन्हा केलेल्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक द्यायचा अधिकार पोलीसाना कोणी दिला? त्या रिक्षावाल्याला दिलेली वागणूक असो किंवा मी घरी कसे पोहोचेन याची फिकीर न करता गाडी जप्त करून रात्री बेरात्री मला रस्त्यावर वणवण फिरायला लावायचा अधिकार कोणत्या कायद्यात बसतो? माझ्या ठिकाणी एखादा हार्ट पेशंट असता व तणावामुळे त्याचे बरेवाईट झाले असते तर त्यास जबाबदार कोण?

४. "प्रामाणिकपणे गुन्हा कबूल केलात त्याचीच हि शिक्षा आहे असे समजा" ह्या पोलिसाच्या वाक्यातून काय बोध घ्यावा?

(उत्तरार्ध भाग १: https://www.maayboli.com/node/72953)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Road Accident Data.jpg

Over a third of road traffic deaths in low- and middle-income countries are among pedestrians
Low-income countries now have the highest annual road traffic fatality rates, at 24.1 per 100,000, while the rate in high-income countries is lowest, at 9.2 per 100,000

एकंदर पहिले असता दोन गोष्टी प्रकाशाने जाणवतात.

१)गरीब देशात रस्ते अपघात जास्त असतात कारण तेथे पादचाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. ( वाहन न परवडणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसणे )
आणि जुनी पुराणी वाहने रस्त्यावर असणे शिवाय वाहनात बेसुमार माणसे भरणे.

आणि

२) एकंदर क्षेत्रफळात असणारी लोकसंख्या जास्त असणे

युरोप अमेरिकेत (श्रीमंत देशात) रस्त्यावर चालणाऱ्या माणसांचे प्रमाण नगण्य असते त्यातून संध्याकाळी किंवा रात्री तर फारच कमी त्यामुळे अपघात होतात तेंव्हा गाडीतील माणसेच जास्त मरतात रस्त्यावरची नाही.

तेंव्हा हे आकडे गरिबी आणि लोकसंख्येचा स्फोट आणि अपुऱ्या सुविधा दाखवतात,

त्याचा दारू पिण्याशी संबंध नाही. तो संबंध जास्त करून श्रीमंत देशात आहे. जेथे रस्त्यावर माणसे कमी असली तरी दारू मुळे जास्त अपघात होतात
https://www.forbes.com/sites/niallmccarthy/2016/08/11/the-worst-countrie...

सिमुलटर वर ड्राईव्ह टेस्ट घेताना ब्रेन मॅपिंग करण्याचे तंत्र वापरात आणावे लायसेन्स देताना.
टाइम लिमिट मध्ये ठराविक अंतर पार करण्याचे टार्गेट देणे.
आणि मध्ये असंख्य अडथळे आणावेत,
सिग्नल,मध्येच आडवा येणारा पादचारी,कट मारणाऱ्या गाड्या,मध्येच घुसणार घुसखोर वाहन चालक
इत्यादी.
ब्रेन मॅपिंग मध्ये माहीत पडेल रागाच्या भरात हा भावी ड्रायव्हर किती नियम मोडत आहे

शुगर बीपी घरच्या घरी मोजायची छोटी यन्त्रे निघालीत तसे हे दारुसाठी पोलिस वापरतात त्याधर्तीवर आपल्याला स्वताकडे खाजगी वापरासाठी बाळगता येईल असे काही प्रोडक्ट आहे का बाजारात ?? म्हणजे परवा ३१ला आपली आपण एक सैम्पल टेस्ट करून पुढे गाड़ी डामटायला मोकळे .

राजेश इकडे फस्वायचा प्रश्न कुठून आला बरे जरा विस्कटुन सांगणार का ?
घरी बी पी चेक करता तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरना फसवत असता का ?

घरी bp चेक करतो तेव्हा आपण स्वतःला फसवतो bp चेक करणारी यंत्र चुकीची माहिती देतात असे डॉक्टर सुद्धा बोलतात.
Manual पने डॉक्टर कडे bp चेक करण्याची भीती असते चुकीच्या रिझल्ट ची(आपल्या मता नुसार)

तिकडे त्या परिचित भाऊंना पोलीसांनी पकडलं, त्यांची व्यथा राहिली बाजुला आणि इथे चर्चा काय सुरु आहे. ही सगळी चर्चा भाऊंनी पाहिली तर भाऊ ३१ ला पाण्याला पण हात लावणार नाहीत.

{{{ याखेरीज झोप येत असताना गाडी चालवणे, तणावात असताना चालवणे, किंवा एकूणच बिनडोकपणे चालवणे - हे प्रकार हुकमी चेक करता येणे अवघड आहे. तसे भविष्यात काही करता आले तर ते इतक्याच गंभीरपणे करायला हवे. पण तो वेगळा विषय आहे. त्याने दारू पिउन गाडी चालवण्याचे गांभीर्य कमी होत नाही }}}

नितीन गडकरींचं काही वर्षांपूर्वीचं (बहुदा २०१५ मधील असावं) एक भाषणही अशाच प्रकारचं होतं. दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांपेक्षा मोतीबिंदू झालेले / रातांधळे वाहनचालक जास्त अपघात करतात हे मत त्यांनी मांडलं होतं. अर्थात असे चालक शोधणे अवघड काम आहे. त्याचप्रमाणे असे वाहनचालक हे पोटाकरिता वाहन चालवित असल्याने त्यांच्याकडे सहानुभुतीने पाहिले जाते याउलट दारु पिऊन वाहन चालविणारे हे शौकिन लोक असतात व त्यांनी अपघात करुन कुणाला उडविले तर समाजाच्या दृष्टीने तो जास्त रोषाचा विषय असतो त्यामुळे सरकारला अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावीच लागते कारण हा भावनिक मुद्दा आहे.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 28 December, 2019 - 18:2
<<
यार,
या महोदयांना कुणीतरी तारेत गाडी चालवणारे ६०+% प्रोफेशनल ट्रक्/टॅक्सी/बस ड्रायवर दाखवा रे !
लयच पोटासाठी प्रतिसाद टंकत असतंय हे बेणं.

ते बेणं तसलंच हाय. ते जिथं राहतं तिथं असलंच सँपल घ्यायचं असतं‌ असं तिथल्या इतर बेदाण्यांनी ठरविलं हाय. सोबत त्याच्यासारख्याच इतर बेण्यांचं म्हणणं मात्र खरं बाकी खोटं असाही एक ठराव हाय.

@Parichit
पुढील भाग कधी टाकताय?

ड्रिंक अँड ड्राईव्ह ला समर्थन नाही ,पण असा गुन्हा दाखल झाला तरी उगाच घाबरुन जाऊ नये , साधारण १५००/- ( एक हजार पाचशे) दंड भरुन केस संपू शकते, ते ही फक्त एकदाच कोर्टात जाऊन . कोणताही वकिल न करता . ( अर्थात गुन्हा पहिल्यांदा दाखल झाला असेल तर)

त्यासाठी काय कराव हे हवे असल्यास विपू मध्ये विचारा

नाशिक ग्रामीण पोलिसांचा कैलास पोपट इंद्रीकर एका खासगी वाहनात, गणवेशातच दारु पित होता. एका अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी त्याच्याकडे धाव घेतली. तेव्हा तिथे खासगी वाहनात दारूच्या बाटल्या आणि खाण्याच्या पदार्थांसह पोलीस कर्मचारी कैलास इंद्रीकर दारु पीत असलेला त्यांना दिसला. संतप्त नागरिकांनी मोबाईलवर या साऱ्या घटनेचं चित्रीकरण करुन ते व्हायरल केलं. मात्र या गंभीर चुकीकरता इंद्रीकरची केवळ बदली करून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

Hya वर्षी
मुंबई,पुणे मधून कोणतीच अप्रिय घटना घडली नाही.
ड्रिंक आणि ड्राईव्ह बद्द्ल पण काही घटना नाही.
ठाकरे सरकार effective kam karat aahe

राजू लै कोलांट्या मारतो.
जे सत्य आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे.
हेच सुजाण नागरिकाचे काम आहे.
आपला शत्रू जरी असेल तरी त्याच्या चांगल्या गुणाचे कौतुक करा.
माझा वैयतीक अनुभव सांगतो माझे पण हद्दी वरून,किंवा कोणत्या कारणं वरून शेजारी राहणाऱ्या लोकांशी भांडण होतात पण चांगल्याला चांगले आणि जे वाईट आहे ते वाईट हा माझा स्वभाव असल्या मुळे माझे विरोधी सुद्धा मला कधीच आरे तुरे करत नाहीत.

मी सुंदरा
नेत्यांच्या मागे आंधळे पने जाणे हे बिनडोक लोकांचे काम आहे.
विरोधी पक्ष शी असेच बिनडोक कार्यकर्ते भांडतात आणि त्यांचाच पक्ष विरोधी पक्षाशी युती करून सत्ता उपभोगतो.
आणि कार्य करते मूर्ख बनतात

गाडी BMW असो
की ड्रिंक महागडे स्कॉच असो..
दारू ती दारूच.

दारू पिली काय किंवा नाही पिली काय.
लोकांना शिस्त नाही.
कसल्या ना कसल्या नशेत असतात.
पैश्याची नशा.
जवानी ची नशा,
बिनडोक पना मधून आलेला अती aatmvishwas.
पोलिस चिरीमिरी दिली की काही करत नाहीत हा अनुभव .
खूप कारण आहेत बेशिस्त गाडी चालवणे chya pathi mage

मी परत येणार
परत परत येणार
किती ही लाथा मारून हाकला .
मी परत येणार

पुढे काय झाले?
धडे म्हणून जे लिहीलय ते खरं तर पालथ्या घड्यावर पाणी असं दिसतय.

>>२. त्यातूनही चुकून पकडले गेलातच तर दारूचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तोंडात मशीनची नळी द्यायच्या आधीच काही सेटलमेंट करता येते का बघा.
दुर्दैवाने एखाद्याने अशी सेटलमेंट केलीच आणि त्याच्या गाडीच्या खाली तुमच्या जवळच्या नात्यातील कुणि अपघातात सापडले तर काय म्हणणे असेल? असे होवू नये हीच प्रार्थना.
दारू/मद्य प्यायल्यावर वाहन चालवू नये ईतका साधा नियम पाळायला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यावर जे ऊलट प्रश्ण विचारले आहेत ते वाचून तर अधिकच संताप आला. सर्वच सुशिक्षीत? लोक असा विचार करू लागले तर अवघड आहे.

मी परत येणार
परत परत येणार
किती ही लाथा मारून हाकला .
मी परत येणार
नवीन Submitted by Rajesh188 o
>> कोणाला ले लाजू?

हरारे च गाढव निर्लज्ज गाढव .
कधी बाई,कधी पुरुष
सर्व आयडी घेवून झाले .तुझा हा पण आयडी
शाहिद होणार
आता छक्खा चा आयडी घे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

अपुरी झोप, तणाव किंवा विमनस्क मानसिकता ह्या तिन्ही गोष्टी ड्रायविंगच्या दृष्टीने "माईल्ड बीअर" पेक्षा कधीपण जास्त धोकादायक आहेत इतकाच माझा मुद्दा आहे. त्या मोजता येत नाहीत आणि दारू मोजता येते केवळ म्हणून शिक्षा कशासाठी? वरच्या एका प्रतिसादात लिहिलेला किस्सा खूपच बोलका आहे. वाईन फ्लेवरचे खाऊचे पान सुद्धा धोकादायक ठरवणारी यंत्रणा आहे आपली. तिचे समर्थन कसे करणार? शिक्षेसाठी जे प्रमाण ठरवले आहे ते नक्कीच योग्य नाही इतकेच सांगावे वाटते.

Pages