Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट

Submitted by Adm on 23 December, 2019 - 01:38
croissant
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

नुकत्याच झालेल्या पॅरीस ट्रीपच्या आधी वेगवेगळ्या फोरम्समध्ये "Top 10 things to do in Paris" शोधत असताना एकाने लिहिलं होतं की वेळ असेल तर एखादा बेकींगचा क्लास करा. टुरीस्टांसाठी कमी वेळाचे क्लास असतात. गेल्या वर्षभरात बेकींगचं भूत चढलेलं असल्याने ही आयडीया एकदम आवडली आणि मग इंटरनेटवर शोधाशोधी केली. एका बेकींग स्कूलमध्ये "Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट" तयार करण्याचा क्लास माझ्या वेळेत उपलब्ध होता. मग लगेच रजिस्टर करून टाकलं. Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट हा फ्रेंच ब्रेकफास्टचा अविभाज्य घटक. अमेरीकेतही बेकर्‍यांमध्ये तसच स्टारबक्स सारख्या ठिकाणी क्रुसाँट मिळतो. ह्याचा उच्चाराची जरा मजाच आहे. मी आधी क्रॉसाँ हा फ्रेंच उच्चाराच्या जवळ जाणारा उच्चार ऐकला होता. पण अटलांटात तसं म्हंटलं की लोकं "ओह, यू मिन क्रॉईसंट ?" अस अगदी तर्खडकरी उच्चारात विचारायचे. नंतर मग वेस्ट कोस्टला क्रुसाँट बरेच ठिकाणी ऐकलं. फ्रान्समध्ये ह्यात कोणाला "र" उच्चारताना ऐकलं नाही. (तसही ते शब्दातली अर्धी अक्षरं उच्चारत नाहीत!) तर त्या क्लासमध्ये शिकलेली आणि नंतर जरा ट्रायल अँड एरर करून जमलेली ही रेसिपी.

पीठासाठी (Dough)
१. २ कप केक फ्लोअर. (पॅरीसमध्ये T45 अश्या काहितरी श्रेणीचं पीठ मिळतं ते सगळ्यात चांगलं. इथे मी "केकसाठी चालेल" असं लिहिलेलं पीठ आणलं.
२. १ टीस्पून मीठ
३. ५ ग्रॅम इंस्टट यीस्ट
४. अर्धा कप पाणी
५. १ टेबलस्पून वितळवलेलं बटर.
६. ३ टेबलस्पून साखर

बटरब्लॉकः
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर

- १ अंड
- शुगर सिरप साठी अंदाजे साखर आणि पाणी.

क्रमवार पाककृती: 

Dough:
१. इंस्टंट यीस्ट अर्धाकप कोमट पाण्यात घालावं. त्यात चमचाभर साखर घालून ढवळावं आणि बाजूला ठेऊन द्यावं. सुरुवातीला थोडासा फेस येतो.
२. Dough बनवण्यासाठी लागणारे सर्व कोरडे घटक (पाणी आणि बटर सोडता) एकत्र करून घ्यावे. मधे खोलगट खड्डा करून त्यात बटर आणि पाणी ह्याचं मिश्रण ओतावं. थोडं थोडं एकत्र करून मग त्यात यीस्ट घालावं. यीस्टचा फेस आतापर्यंत दुप्पट झाला असेल.

C_Start.jpg

३. सगळं मिश्रण चांगलं मळून घ्यावं. सुरूवातीला ते पिठूळ असतं पण जवळ जवळ १५ मिनीटे चांगलं मळल्यावर मिश्रण ताणलं जायला लागतं ( elastic mix) आणि छान मऊ होतं. ह्या पिठाचा गोळा करून तो प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून किंवा घट्ट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेऊन द्यावं. तयार पीठ अजिबात बाहेर ठेऊ नये नाहीतर ते लगेच फुगायला लागतं. आत्ता ते फुगवायचं नाहीये. ही मिश्रण सुमारे सहातास फ्रीजमध्ये ठेवावं.

C_Dogh.jpg

बटरब्लॉकः
१. बटरपेपरची साधारण ८ इंच बाय ६ इंचाची घडी करून त्यात बटरची स्लॅब ठेवावी लाटण्याची ठोकून आणि लाटून बटरची आयताकृती स्लॅब बनवावी. बटर अजूनही बटरपेपरच्या आतच आहे. कडांपर्यंत बटर जायला हवं. ही स्टेप बटर फ्रीजमधून काढून लगेच करावी आणि ठोकून / लाटून झाल्यावर बेटरपेपरसकट पुन्हा फ्रीजमध्ये टाकावं.

मुख्य कृती:
१. पिठाचा गोळा फ्रीजमधून बाहेर काढून आयताकृती लाटावा. आतापर्यंत पीठ थोडसं फुगलं असू शकतं पण अगदी दुप्पट वगैरे होत नाही. पीठ एकदम सरसर लाटलं जातं आणि खूप ताणलं जातं. चांगलं फूट-दीड फुटापर्यंतही लाटता येऊ शकतं.
२. बटरब्लॉक फ्रीजमधून बाहेर काढून बटर पेपरची घडी उघडावी. (बटर काढू नये). आता बटरची बाजू लाटलेल्या पीठाच्या खालच्या कडेला जूळवून बटरपेपर उपडा टाकावा आणि वरून अलगद काढून घ्यावा. म्हणजे बटर हाताला न लागता बटरब्लॉक पीठावर लावला जाईल.

C_Doug_Butter.jpg

३. आता आयताकृती पीठाच्या बटरसकट, लांबीच्या बाजूने अर्ध्या घड्या घालाव्या आणि मध्यातून दुमडून घ्यावं. म्हणजे आता बटर आणि पीठ मिळून ५ थर तयार झाले.

C_Fold.jpg

४. आता पुन्हा हे आयताकृती लाटून घ्यावं. लाटताना जरा हलक्या हाताने लाटावं म्हणजे बटर पिठातून बाहेर येणार नाही. आकार आधीच्याच पिठाएव्हढा करून पुन्हा मघासारख्या घड्या घालाव्या. आता एकूण १० थर झालेत.

५. हे पीठ पुन्हा प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून साधारण अर्धातास फ्रिजमध्ये ठेवावं. (इतकं लाटल्याने बटर मऊ होऊन पिठातून बाहेर येऊ शकतं त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. नाहीतर मग ह्याच स्टेपला क्रुसाँटला आकार द्यायला सुरुवात करावी.)

६. पीठ फ्रिजमधून बाहेर काढून पुन्हा आयाताकृती लाटावं आणि वरच्या प्रमाणे घड्याकरून परत लाटावंं. आता एकूण २० थर झाले असतील. ***

७. चाकूने ह्या लाटकेल्या पीठाचे उंच निमुळते त्रिकोन करून घ्यावे. ह्या त्रिकोणाच्या बेसला छोटी खाच पाडावी (हा झाला आयफेल टॉवरचा आकार Proud ). आता ह्या आयफेल टॉवरच्या बेसच्या बाजू धरून वर गुंडाळी करत जावं. हे साधारण गोगलगाईच्या शंखासारखं दिसतं.

C_How to shape.jpg
*
C_Initial shape.jpg

ट्रे
C_Shaped.jpg

८. सगळे क्रुसाँट बेकींग ट्रेमध्ये ठेऊन त्यावर थोडं पाणी शिंपडावं आणि अवन सुरू न करता फक्त दिवा लावून अर्धा तास ठेऊन द्यावे. अवनमधल्या उबदार तापमानामुळे आणि यीस्ट मुळे क्रुसाँट फुगतात आणि आकाराने जवळ जवळ दुप्पट होतात! क्रुसाँटवर पाणी शिंपडायचं नसल्यास एका भांड्यात उकळत पाणी घेऊन ते ही अवनमध्ये ठेवावं. पाण्याच्या वाफेमुळे दमटपणा राहून क्रुसाँट कोरडे पडत नाहीत.

फुगलेले:
C_Expanded.jpg

ह्या फोटोत थर दिसतायत.
C_Layers.jpg

९. अवन २०० डीसेला प्रिहीट करायला लावावं आणि तोपर्यंत एक अंड फेटून ब्रशने फुगलेल्या क्रुसाँटना लावावं.
१०. क्रुसाँट १५ ते २० मिनीटे सोनेरी रंगावर बेक करून घ्यावे.
११. एकीकडे शुगर सिरप तयार करून ठेवावं. मी मायक्रोवेवमध्ये केलं. अंदाजानेच केलं.
१२. तयार क्रुसाँट अवन बाहेर काढून लगेच त्यावर शुगर सिरप लावावं. ह्याच उद्देश केवळ चमक येण्यासाठी. आपल्याला पाकातले क्रुसाँट करायचे नाहीयेत. ह्या शुगर सिरपची गोड चव लागता कामा नये. "शुगर सिरप लगाया भी और पता भी नही चला" इतपतच गोड आणि तितकच लावायचं.

C_Ready.jpg
*
C_Ready 2.jpg

१३. ताजे ताजे क्रुसाँट कॉफीबरोबर ब्रेकफास्टला खायला घ्यावे. एक दिवस टिकतात. फक्त गार झाल्यावर त्यातलं बटर घट्ट होतं. त्यामुळे गार झालेले खायला घेताना अवन किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे. ताजे खाताना त्याचा वरचा थर कुरकुरीत लागतो पण शिळे मऊ लागतात. चवीत फार फरक वाटला नाही.

** - इथपर्यंत तयार केलेलं पीठ दोन दिवस फ्रिजमध्ये राहू शकतं किंवा त्यापेक्षा अधिक डीपफ्रिजरमध्ये राहू शकतं.

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात साधारण १२-१३ होतात.
अधिक टिपा: 

१. जरा खटाटोप आहे. पण गरम गरम क्रुसाँट अत्यंत भारी लागतात! बटरी चव आणि वरून कुरकुरीत आणि आतून हलकं, मऊ, विरघळणारं टेक्श्चर एकदम अहाहा! लागतं.
२. ह्यात बरेच वेरीएशन्स करता येतात पण बटर क्रुसाँट हेच खरे 'क्रुसाँट'. तसच हा गोगलगाईचा आकार फक्त बटर क्रुसाँटलाच देतात. बाकी सगळे चौकोनी आपल्या पॅटीस सारखे करतात. ह्यात व्हॅनिला क्रिम, चोकोलेट चिप्स, बदाम / पिस्ते / आक्रोड ह्यांची पेस्ट, पेस्तो सॉस, बारीक चिरलेले कांदे, काय वाट्टेल ते भरुन वेगवेगळ्या चवी आणता येतात. आम्ही क्लासमध्ये बरेच प्रकार केले होते. पण मी घरी अजून केले नाहीत.
३. बटर वापरण्यात काटकसर करू नये. हवतर थोडा जास्त व्यायाम किंवा जरा जास्त आयएफ करावं.
४. अमेरीकन ब्रँडचं बटर वापरू नये, कारण त्यात फॅट कमी असतं म्हणे. शक्यतो युरोपीयन ब्रँडचं बटर चांगलं.
५. लाटताना बटर वितळून बटर बाहेर यायला लागू शकतं. तसं झालं तर घड्या घालून पटकन फ्रीजमध्ये टाकावं. नाहीतर पीठ आणि बटरचे थर नाहीसे होऊन सगळा लगदा होतो.
६. वेळेत फ्रिजींग / प्रुविंगचा वेळ धरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
बेकींग क्लास आणि माझ्या ट्रायल अँड एरर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच रे अडमा !

( संजीव कपूर बनून तू कॉम्प्लेक्स देणार आता Wink )

खुपच यम्मी पाकृ आहे, वाचता वाचता अर्धी खाल्ली जणू!

करून बघेन की नाही ते माहीती नाही, पण उत्तम झालं इथे दिलीत ते. धन्यवाद Happy

फोटो तर अहा! आहेत Happy

मस्त

उत्तमच दिसत आहेत. व तुमच्या कौशल्याला सलाम. माझा फार आवडीचा पदार्थ आहे. कोठेही गेले की पहिले ब्रेकफास्ट काय असेल तो चापून शेवटाला एक क्रसां घेउन तो मधून तोडून त्यात ऑरंज मार्मलेड घालून खायचे. जबरी लागते. ऑरेंज नसलेच तर कोणतेही फ्रूट मार्मलेड जाम चालसे. तुम्ही म्हटलात ते बरोबर फिलिन्ब्ग वाले क्रसां किंवा चॉको लेट वाले पण येतात पण बटर वाला तोच खरा. कॉफी बरोबर दोन खाल्ले की जेवणाचे काम होते माझे तर.

पाकृ मस्त आहे व लिहिली सुद्धा मस्त.

मागे नेटवर वाचून मुंबईत भर उन्हाळ्यात हा प्रकार करायचा प्रयत्न केला होता आणि तो बराचसा फसला कारण बटर लगेच नरम पडायला लागते.. फुल्ल एसी सोडून करण्याजोगा प्रकार वाटला.

माझा अतिशय आवडता प्रकारात “होता” अमेरीकेत असताना पण वाढते वजन लक्षात घेवून बंद केला.
मी रेडीमेड पीठ आणून बरेच प्रकार केले.
-गरम तयार क्रांसां मध्येच कापून सनीसाईड एग्ग्स आणि क्रांसां
-गरम चहा आणि क्रांसां थंडगार करून बटर-क्रीम भरलेलं, मग एक बाईट ह्याचा, एक घोट चहाचा .. ते ही थंडीत.
-मध्येच कापून मग पाईनपल जॅम आणि भरपूर बटर भरून,
-ब्लूबेरी-क्रीमचीज किंवा चॉकलेट भरून.

-हाईट म्हणजे, रोल करताना मोदकाचं सारण भरलेलं आणि मग बेक केलेलं पील्स्बरीचं रेडीमेड पीठ आणून. दुसर्यांदा पुरण्पोळीच सारण
भरून केलेलं ... मस्तच लागलेलं.

गेले ते दिवस...

Full ac. >>Totally agree. Same with royal icing. My royal icing melted all over the cupcakes.

Bharich ahe pakru...ajun khalla nahi crosso...pan mast lagat asnar...

वा, एकदम भारी. गरम ताजे क्रॉसाँ मस्तच लागले असणार.
कॉस्कोचे क्रॉसाँ आम्हांला अतिशय प्रिय आहेत.

यंदाच्या मास्टर शेफ ऑस्ट्रेलियामध्ये हा प्रकार पाहिला. तेही प्रेशर टेस्टमध्ये.
तो पदार्थ करून पाहिला हेच ग्रेट आहे. जमला हे त्याहून.
मधून कट करून आतले पदर दाखवणारा फोटो हवा होता.

तिसर्‍या पायरीतल्या फोल्ड्सना लेटर फोल्ड म्हणतात बहुतेक.

गेल्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत चर्चगेट स्टेशनच्या शेजारी एशियाटिकच्या मागे croissant नावाचं बेकरी शॉप उघडलं होतं. त्याचा उच्चार तेव्हा आम्ही (हे आ.ब. नाही, अ.व.आहे) क्रॉयसंट्स असा करत असू. इतकं कठीण नाव आणि त्यात आपल्यापेक्षा अनेकपट स्मार्ट विक्रेते पाहून तिथे पाय ठेवायचं राहून गेलं.

अरे वा! सहीच. हा म्हणजे एकदम 'प्रो' बेकर ने करण्याचा प्रकार दिसतो आहे!! मी बेकिंग चॅलेन्ज्ड असल्याने जास्त कौतुक वाटले!
कॉस्कोमधले क्रॉसाँ हीच आमची मजल Happy

चर्चगेटच्या इथले क्रोसां आता नाहीय काय? कित्येक वर्षात गेले नाहीय त्या बाजूला.... तसली हाय फाय दुकाने बाहेरून बघूनच धसकल्यासारखे होते, आत पाय ठेवणे म्हणजे भारीच...

फोटोत दिसताहेत तसे क्रोसां बनणे व ते बाहेरून कुरकुरीत आणि आत मऊ बनणे हे मास्टरशेफचेच काम आहे. कुठल्याही येरागबाळ्याचे काम नाही. लेखक त्या लेव्हलला नक्कीच पोचला असणार ...

मी इथे जे क्रोसां खाल्लेत ते सगळे एकजात आतून पावासारखे दिसत होते आणि चवीला एकदम डल.... त्यामुळे माझे क्रोसांबद्दल भरपूर गैरसमज झालेले आहेत.

वा!मस्त दिसत आहेत.
माझा आवडता पदार्थ आहे. पण करून नाही बघणार , कारण जमाणारच नाही Lol
तोक्यो मध्ये हाराजुकूला एक चॉकोलेट क्रॉसाँ चे दुकान होते चोकोक्रो नावाचे, तिथे गेलं की हमखास खाल्ले जायचे. छोटे कुरकुरीत आणि गरमागरम. त्याला आत चॉकोलेट न घालता बनवतोस का असं विचारायची इच्छा व्हायची पण जपान असल्याने कधी विचारलं नाही.

भाहारीही दिसतायत!! Happy
भारी उत्साह पराग तुला! Happy

>>> ३. आता आयताकृती पीठाच्या बटरसकट, लांबीच्या बाजूने अर्ध्या घड्या घालाव्या आणि मध्यातून दुमडून घ्यावं. म्हणजे आता बटर आणि पीठ मिळून ५ थर तयार झाले.
६ नाही का झाले? अर्ध्यात दुमडल्यावर पीठ-बटर-पीठ-पीठ-बटर-पीठ असे थर होतील ना?
(हे आपलं उगाच वेळ आहे म्हणून व्हिजुअलाइज करायचा प्रयत्न करते आहे - रेसिपी तू नीटच लिहिली आहेस.)

(मला बहुधा करून पाहायचं धैर्य होणार नाही, पण घरचा शेफ सुट्टीला आलेला आहे - त्याच्या कानावर पडेल अशा बेताने चर्चा करून पाहीन काही जमतं का. Proud )

सगळ्यांना धन्यवाद. Happy प्रो वगैरे काही नाही. बेकरी पदार्थ करताना रेसिपी तंतोतंत पाळणे आणि घटक पदार्थ जितके सांगितले आहेत तितकेच घालणे एव्हडीच ट्रिक आहे. ह्यावेळी ख्रिसमस केक, कुक्या न करता हेच केले त्यामुळे उत्साह टिकला.

६ नाही का झाले? अर्ध्यात दुमडल्यावर पीठ-बटर-पीठ-पीठ-बटर-पीठ असे थर होतील ना? >>>>> खरच की !! मी पाच कसे काय मोजले मग? की मी काही वेगळी घडी घातली होती? नोट्स आणि फोटो पहातो पुन्हा.

कॉस्कोमधले क्रॉसाँ हीच आमची मजल >>>> कॉस्कोमधले आम्हालाही आवडतात पण कॉस्कोतल्या इतर गोष्टींप्रमाणेच ते ही खूप जास्त मिळतात आणि मग संपवायचं दडपण येतं. त्यामुळे आम्ही स्टारबक्समधले खातो.

मधून कट करून आतले पदर दाखवणारा फोटो हवा होता. >>>> खाण्याच्या नादात काढायचा राहीला ! पुढल्यावेळी काढेन.
तिसर्‍या पायरीतल्या फोल्ड्सना लेटर फोल्ड म्हणतात बहुतेक. >>>> ओह. हे माहीत नव्हतं.

रोल करताना मोदकाचं सारण भरलेलं आणि मग बेक केलेलं पील्स्बरीचं रेडीमेड पीठ आणून. दुसर्यांदा पुरण्पोळीच सारण >>>> ह्या आयडीया भारी आहेत. प्रयत्न करून पाहीला पाहीजे. घरचे कोणी खाणार नाहीत बहुतेक. त्यामुळे एखादा करून बघेन.

फुल्ल एसी सोडून करण्याजोगा प्रकार वाटला. >>>> नक्कीच. इथे एव्हड्या थंडीत केलं तरी बटर मेल्ट व्हायला लागलं होतं.

फार भारी आलेत फोटो , अगदी प्रो दिसतायत . आमची पण मजल पिल्सबरी चे रेडि टु बेक करण्यात किवा कॉस्ट्कोचे विकत आणण्यात.
(पिल्सबरिचे गरम छान लागतात पण फार बटरी असतात नतर अ‍ॅसीडिटि सारख वाटायला लागल तेव्हापासुन बन्द केले ते आणायच)

मस्त रे! फ्रेश जबरी लागतात हे. त्या पिठाच्या त्रिकोणापासून क्रोसाँ चा आकार करा येणार असा प्रश्न पडला होता पण फोटोंमुळे समजले Happy

(आपल्याला पाकातले... ला टोटल लोल)

Pages