आंतरजातीय विवाह... लोक काय म्हणतील!!!

Submitted by आरुश्री on 17 December, 2019 - 12:49

"जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी"
हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेलच, पण जेव्हा ही गोष्ट "आंतरजातीय विवाह" यावर येते तेव्हा मध्ये येतो तो सर्वात मोठा शत्रू म्हणजे "समाज".
एका रिसर्च नुसार भारतात फक्त 5% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात आणि बाकीचे 95 % लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून 3 ते 4 परिवार बरबाद करतात. कारण बहुतेक पालकांना आपल्या मुलांना काय वाटतं यापेक्षा समाज काय म्हणेल, समाजातील ती चार लोक काय म्हणतील, लोक तोंडात शेण घालतील, स्वतःच्या जातीतली सोडून दुसऱ्याच्या जातीतली पोरगी घरी आणली तर समाजाला तोंड कसं दाखवणार?" हे आणि असे खुप सारे illogical प्रश्न पडलेले असतात ज्यामुळे पालकांना इंटरकास्ट मॅरेजेस मध्ये प्रॉब्लेम असतो.
भारतामध्ये सर्वात पहिला आंतरजातीय विवाह 4/फेब्रुवारी/1889 मध्ये यशवंत आणि राधा यांचा झाला होता. यशवंत म्हणजे जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांचा मुलगा आणि राधा म्हणजे ज्ञानोबा कृष्णा ससाने यांची मुलगी. आणि ह्या गोष्टीला जवळपास एकशे तीस वर्षे उलटून गेली तरी आपले बुरसटलेले विचार अजून तिथल्या तिथेच आहेत हि खंत.
So Dear Parents,
मान्य आहे की तुम्हाला तुमच्या मुलांपेक्षा तुमची इज्जत आणि समाज काय म्हणेल हे जास्त महत्त्वाच आहे, मान्य आहे की तुम्ही ज्या समाजात लहानपणापासून वाढलात, मोठे झालात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे सगळं नाही accept करू शकत. पण तुम्ही त्यांना सोबत घेऊन चला जे आज तुमच्या सोबत आहेत, त्यांचा विचार करत बसू नका जे कधी तुमच्यासोबत नव्हतेच.
समाज आणि त्या समाजातील लोक हे तर महत्त्वाचे आहेतच... पण सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तुमचे आई बाबा.
आणि जर तुम्हाला असं वाटतंय की कोणी तुम्हाला चुकीचं समजेल, तुमच्या मुलांना चुकीचं समजेल, तुमची खिल्ली उडवतील , तर विचार करा हे असल्या कसल्या प्रकारचे मित्र, लोक, किंवा समाज आहेत जे आज तुम्हाला नाव ठेवतायेत, उद्या दुसरं कोणाला तरी नाव ठेवतील, तर परवा तिसरच कोणीतरी असेल. आणि ह्या अशा लोकांसाठी तुम्ही तुमच्या मुलांना आयुष्यभरासाठी का त्रासात टाकायचं.
ते म्हणतात ना " सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग". खरं तर ह्या लोकांना तुमच्याशी काही देणं-घेणं नसतंच. पण तुम्हाला कायम भीती असतेच, की लोक काय म्हणतील!. आणि हे कसलं logic झालं की' "स्वतःच्या जातीतल्या गाढवासोबत लग्न झालेलं चालेल, पण दुसऱ्याच्या जातीतला घोडा सुद्धा नको".
म्हणून तुम्ही बळजबरीने तुमच्या मुलांचे लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून दिलं जिथे तुमचा समाज हे accept करेन आणि तुमच्या मुलांनी सुद्धा हे बळजबरीच लावून दिलेल लग्न मान्य केलं तर नंतर पुढे काय?... तुम्ही काय गॅरंटी देऊ शकता की पुढे जाऊन तुमची मुलं खूश राहतीलच आणि समोरची व्यक्ती चांगली निघेलच. मग का आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळायचं, ते पण फक्त समाजासाठी आणि तो पण असा समाज जो कधी तुमचा नव्हताच.
अशी लोकं एक दिवस तुमच्या मुलांच्या लग्नाला येतील, डोक्यावर चार अक्षदा टाकतील, नंतर चर्चा रंगवतील की मुलगा - मुलगी काय करते, त्यांचं खानदान कसये, तुम्ही लग्नात किती खर्च केला आहे, किती तोळे दिलेत, कशी कपडे घातलीत... आणि या सगळ्या गोष्टींवर तोंडसुख घ्यायला जर काही कारण नाहीच भेटले तर घरी जाऊन ते म्हणणारच आहेत की " भाजीत जरा मीठ कमीच होत बर का..!"
थोडक्यात सांगायचं काय तर ज्या लोकांना नाव ठेवायची आहे ती लोक कशाही प्रकारे ती ठेवणारच आहेत. मग तुम्ही कितीही आणि काहीही करा. तर मग कशाला स्वताला ह्या असल्या परिस्थितीत टाकून घ्यायचं जिथे लोक तुम्हाला judge करतील.
खूप साऱ्या पालकांच म्हणंण हे असं असतं की "आमच्या जमान्यात तर असं नव्हतं, आई-बाप पसंत करायची आणि आम्ही डायरेक्ट बोहल्यावर जाऊन उभे राहायचो. आमचे कुठे संसार मोडलेत, चाललेच आहेत की चांगले. I agree, पण आज-काल जमाना बदलाय तशी लोकही बदललीच आहेत की.. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आजकाल आपण आपल्या मुलांना शाळेत घालायचं असेल तर काय पाहतो, तिथे कॉम्प्युटर आहेत का, लायब्ररी आहे का, सायन्स लॅब आहे का, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात का? या आणि अशा कितीतरी गोष्टी. आता तसं पहायला गेलं तर तुमच्या जमान्यात कदाचित शाळांमध्ये हे सर्व नसेलही पण आत्ता आपण आपल्या मुलांना शाळेत घालताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करतोच ना, कारण काय तर आत्ता आपल्याकडे ऑप्शन आहेत, आयुष्य अजून चांगलं जगण्यासाठीचे. असं नाही की तुमच्या जमान्यात हे सर्व नव्हतं म्हणून तुम्ही खूष नव्हते किंवा शिकलेच नाहीत, पण आता ते सर्व ऑप्शन आहेत ज्यामुळे तुम्ही जास्त चांगलं काहीतरी मिळवू शकता आयुष्य अजून चांगलं सोपस्कर होण्यासाठी. नवीन जमान्यानुसार आपण बदललो ना. मग अशीच पद्धत तिकडेही का लागू होत नाही.
पालकांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे " आमच्या जमान्यात डिव्होर्स कमी व्हायचे किंवा व्हायचेच नाहीत" तर मला अशा लोकांना एवढेच सांगायचे आहे की असं नाहीये की तुमच्या जमान्यात लोक जास्त खुश होते. ते फक्त समाजासाठी, जे आहे त्यात ॲडजस्ट करून कसेबसे जगत होते. "पदरी पडलं अन पवित्र झालं" असंच काहीसं. पण आजकालच्या जमान्यात लोक एवढं सहन करत बसतच नाहीत. पटत नाहीत तर दोघे वेगळे होतात divorce घेतात आणि पुन्हा आपल्या लाईफमध्ये आपापल्या पद्धतीने जगतात.
शेवटी एक विचार नक्की करा की जेव्हा उद्या आपण ह्या जगातून निघून जाऊ, तेव्हा ती आपली स्वतःचीच मुलं असतील जी त्यांच्या मुलांना आपल्याबद्दल गोष्टी सांगून आपल्याला जिवंत ठेवतील तो तो समाज नव्हे ज्याला आपण आता इतके महत्व देतोय.
आणि मुलांसाठी सांगायचं म्हणाल तर तुम्ही स्वतः आधी शिका, मोठे व्हा, नोकरीला लागा, फायनान्शिअली सेटल व्हा. म्हणजे उद्या तुमच्या घरच्यांनी हा विचार नक्की करावा कि इंटरकास्ट मॅरेज आहे तर ठीक आहे पण दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत, काबिल आहेत, तर आपण पुढचा विचार करायला काही हरकत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बोलवलं लग्नाला तरी वाकड्यात जाणार नाहीत याची शाश्वती आहे का
आणि ही कसली जबरदस्ती की लग्नाला बोलावलं नाही म्हणूं वाकड्यात
आशा लोकांना मग कुठंच बोलावू नये
ना लग्नाला ना कुठल्या समारंभाला

कोण वाकड्यात जाईल की नाही याची मी आयुष्यात कधीही फिकीर केलेली नाही.मी माझे आयुष्य माझ्या अटींवर जगत आलो आहे आणि अजून तरी त्याबद्दल पश्चात्ताप करण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही

पण जी लग्न ठरवली जातात ती जाती मध्येच ठरवली जातात दुसऱ्या जाती मधील मुलगा किंवा मुलगी बघायला आणि तसे लग्न ठरवायला अजुन तरी समाज तयार नाही .
ठरवून आंतरजातीय विवाह झाल्याचे एक सुधा उदाहरण नसेल >> हे सरसकट चित्र नाही .

माझ्या कुटुम्बापूरतंं बोलायच झालं तर - मी(माहेरची) , माझा नवरा , माझ्या सख्या नणंदेचा नवरा , त्याची आई (माहेरची) , माझ्या नवर्याच्या सख्या मावशीची सून -- आम्ही सगळे वेगवेगळ्या जातीचे आहोत . आणि सगळ्यांचे ठरवून केलेले आंतरजातीय विवाह आहेत .
आणिही काही जावई आणि सूना दूसर्या दूसर्या जातीच्या आहेत , पण ते प्रेमविवाह

पण त्यामुळे मज्जा असते . बरेचसे समारंभ वेगवेगळ्या पद्धती ने साजरे केले जातात .
माहेरी साखरपूडा , सासरी वेणी बर्फी , सासरच्या पद्धतीने हळद , माहेरच्या पद्धतीने पाच परतावणं , माहेरच्या पद्धतीने लेकाची पाचवी पूजली , साबानी सांगितलं तसं बारसं केलं , नणंदेच्या साबानी सांगितलं म्हणून लेक चालायला लागला तेन्व्हा पूरणपोळ्याच्या पायघड्या घालून चालवलं , नणंदेने तिच्या हौसेने माझ्या लेकाचं बोरन्हाण केलं .. नुसती धमाल .

माझ्या नवर्याच्या तमिळ मित्राने ठरवून मराठी मुलिशी लग्न केलं . दोघांच छान चाललं आहे.

माझा प्रेमविवाह आंतरजातीय आहे.. माझ्या आई वडिलांना समजावून छोटासा लग्न केला अगदी सुबोध खरे यांनी लिहल्या प्रमाणे केलं.
<<जवळचे नातेवाईक आणि अत्यंत जवळची मित्रमंडळी एवढीच माणसे दुपारी २ वाजता लग्नाच्या कार्यालयात जमलो. दोन तासात धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक असलेले तीन विधी( कन्यादान, सप्तपदी आणि मंगळसूत्र) केले. ते सोडून बाकी सर्व रूढींना फाटा मारला होता. संध्याकाळी ४.२२ चा मुहूर्त. >>
फक्त reception मोठा ठेवला 4 दिवसांनी. त्यावेळेस सगळे ओळखीचे बोलवले.
आई वडील भाऊ सोडून माझ्या लग्न व reception ला दुसरे नातेवाईक नव्हते. त्यांना मान्य नव्हता म्हणून. लग्नाला 2 वर्ष झाल्यावर बोलायला लागले बाकीचे.
परंतु काय फरक पडतो? काय करतात हे नातेवाईक? माझ्या लग्ना आधी तरी किती विचारत होते? किती मिळून राहत होते? मग अंतरजातीय लग्न केलं हे कारण त्यांच्या पथ्यावर पडला..
आपण खरंच संकटात असतो तेव्हा पाठीशी उभे राहणारे,
सुख दुःखात साथ देणारे असतील नातेवाईक तर जरूर मनधरणी करावी. नुसत्या चांभार चौकश्या करणारे असतील तर रामराम म्हणायचे. अशा नातेवाईकांचा मला लग्ना आधीही फरक नव्हता पडत आणि आताही नाही. बाकीचे ओळखींचे तर दूरच मग!
कालच एक msg वाचला
"अपने वो नहीं होते,
जो 'तसवीर' में साथ खडे होते हैं!
अपने वो होते हैं,
जो 'तकलीफ' में साथ खडे होते हैं!"

कुणी काही बोलत नाहीत, फक्त टाळतात.

श्रीमंतांना जात नसते, ते कसेही काहीही पैशाच्या जोरावर घडवतात. त्यांना कुणाच्या बोलण्याची फिकिर नसते.

लेख सुंदर आणि नेमक्या समस्येवर बोट ठेवणारा आहे.>> धन्यवाद ....खरं आहे सुधारणा होत आहे....पण खूप हळू हळू

इंटरेस्टिंग. कुठल्या काळांत हा रिसर्च केला होता हे कळुन घ्यायला आवडेल. कारण हल्ली इंटरकास्ट तर सोडाच, >>>> कदाचित। तुमच्या आजूबाजूला तस वातावरण असेल. पण जर खेड्या सारख्या ठिकाणी गेलात. तर हीच सध्याची परिस्थिती आहे. आणि शहरात देखील याहून वेगळे काही नाही.

IT मधले बरेच तरुण तरुणी एका प्रोजेक्ट मध्ये असतील तर एकत्र onsite ला जावं लागतं. बऱ्याचदा ते तिकडेच प्रेमात पडतात.>>>> अशा वेळी आई वडिलांच्या दुःखी कष्टी होण्यापेक्षा. थोडं सुज्ञ होऊन योग्य तो निर्णय घ्यावा. शेवटी जर त्यांचा निर्णय हा शेवटचा असेल. तर उगाच ना चा पाढा लावण्यात काही तथ्य आहेस मला तरी वाटतं नाही. अशाने ते स्वतः तर दुःखी होतातच आणि मुलांनाही नाराज करतात. त्यापेक्षा जर त्यांनी राजी खुशीने लग्न लावून दिले. तर मुलेही खुश आणि ते स्वतःही आनंदी राहू शकतात. शेवटी लोकांना जवळच मानायचं कि आपल्या स्वतःच्या मुलांना हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल.

आमच्या गावात जर कोणी आंतरजातीय विवाह केला तर लोकं अशी काय चर्चा करतात की विचारू नका.>> >> खर तर अशाच लोकांमुळे पालकांना लोक काय म्हणतील हा प्रश्न पडत असावा. पण त्यांनी अशा लोकांना चपराक म्हणून मुद्दामहून त्यांच्याकडे कानाडोळा करून. आपल्या कुटुंबाचा आणि मुलांनाच विचार करून निर्णय घ्यायला हवा.

अरेंज मॅरेज करणारे आणि लव मॅरेज करणारे मला वाटते हे दोन सेपरेट क्लास आहेत>>>> या बाबतीतला तुमचा अभ्यास छान आहे आणि खरा सुद्धा..

जवळचे नातेवाईक आणि अत्यंत जवळची मित्रमंडळी एवढीच माणसे दुपारी २ वाजता लग्नाच्या कार्यालयात जमलो. >>>>खूप छान.. उगाचच पाण्यासारखा पैसा लग्नकार्यात खर्च करण्यात काही एक अर्थ नाहीये. त्यापेक्षा हे अगदी उत्तम आहे.

काही ठिकाणी अगदी नवरा नवरी ची हत्या करण्या पर्यंत सुद्धा मजल जाते.>>>> अजूनही अशा विकृत मानसिकतेचे लोक आहेत याचीच खंत वाटते..

तुम्हाला काही फरक पडत नाही पण त्यांना पडू शकतो .
नंतर ते नेहमीच तुमच्या शी वाकडे वागू शकतात.
ही पण शक्यता असतेच ना>>>>अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हाच एक उपाय आहे.

कोण वाकड्यात जाईल की नाही याची मी आयुष्यात कधीही फिकीर केलेली नाही.मी माझे आयुष्य माझ्या अटींवर जगत आलो आहे आणि अजून तरी त्याबद्दल पश्चात्ताप करण्याची माझ्यावर वेळ आलेली>>>> खर्च छान... असाच attitude सर्वांनी ठेवला तर आयुष्यात कधी दुःखी होण्याची वेळ नाही येणार..

आम्ही सगळे वेगवेगळ्या जातीचे आहोत . आणि सगळ्यांचे ठरवून केलेले आंतरजातीय विवाह आहेत>>> असा योग येणे दुर्मिळच म्हणावे लागेल... पण खरंच मस्त विचार आहेत family चे.

"अपने वो नहीं होते,
जो 'तसवीर' में साथ खडे होते हैं!
अपने वो होते हैं,
जो 'तकलीफ' में साथ खडे होते हैं!">>> मस्त ... त्यासाठी घरच्यांचे विचार तेवढे प्रगल्भ असायला हवेत.

कुणी काही बोलत नाहीत, फक्त टाळतात.

श्रीमंतांना जात नसते, ते कसेही काहीही पैशाच्या जोरावर घडवतात. त्यांना कुणाच्या बोलण्याची फिकिर नसते.>>> खरंये.... यात भरडले जातात ते middle class मधले लोक..

श्रीमंत लोकात पारंपरिक जात बघत नसतील पण नवीन निर्माण झालेली जात काठेखोर पने बघितली जाते ती म्हणजे आर्थिक दर्जा.
प्रेम प्रकरण होत असतील पण लग्न हे आर्थिक दृष्ट्या समानतेच्या लेव्हल ला च केली जातात.
आपल्या देशातील श्रीमंत लोकांचा अभ्यास केला तर लक्षात येईल.

लग्न हे आर्थिक दृष्ट्या समानतेच्या लेव्हल ला च केली जातात.>>हो
मलाही सगळ्या श्रीमंतांची लग्न बघितली की हेच वाटत की its nothing more than a business deal.

दिल धडकने दो मध्ये हाच विषय मांडला आहे.
आरूश्री तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे खरंतर मुलांच्या सुखातच आई वडिलांनी त्यांचं सुख मानलं पाहिजे पण तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं नाही.

लग्न हे आर्थिक दृष्ट्या समानतेच्या लेव्हल ला च केली जातात. >>> मला तरी यात काही अयोग्य वाटत नाही.

<<< आत्ता आपल्याकडे ऑप्शन आहेत, आयुष्य अजून चांगलं जगण्यासाठीचे. असं नाही की तुमच्या जमान्यात हे सर्व नव्हतं म्हणून तुम्ही खूष नव्हते किंवा शिकलेच नाहीत, पण आता ते सर्व ऑप्शन आहेत ज्यामुळे तुम्ही जास्त चांगलं काहीतरी मिळवू शकता आयुष्य अजून चांगलं सोपस्कर होण्यासाठी. नवीन जमान्यानुसार आपण बदललो ना. मग अशीच पद्धत तिकडेही का लागू होत नाही. >>>
खरं आहे. आता आई-वडिलांनी मुलांची लग्न ठरवायच्या फंदातच पडू नये. अगदीच काळजी असेल आणि आईने मुलीला लग्नाविषयी विचारले तर भविष्यात संवाद काहीसा असा होणार.
अगं, आता तू ३५ वर्षाची होत आलीस, काही ठरवलं आहेस का लग्नाचं की लिव्ह-इन करणार आहेस?
नाही, बरं मग एखादी मुलगी किंवा मुलगा मनात आहे का कुणी?
कुणीच पसंत नाही, का? कसा मुलगा पाहिजे? आमची काहीच हरकत नाही, हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान, शीख, बौद्ध कुणीही चालेल आम्हाला.
तुला हिंदू पाहिजे, तर कुठल्याही जातीचा, कुठल्याही शिक्षणाचा, कुठल्याही आर्थिक स्तराचा चालेल. आमची काही हरकत नाही. तुम्ही खुश रहा कारण तेच महत्वाचे आहे.
बोलवलं तर लग्नाला येऊ, नाही तर आमचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेतच.

नंतर ते नेहमीच तुमच्या शी वाकडे वागू शकतात.

लग्नाला बोलावले नाही म्हणून कुणी वाकडे वागणार असेल तर अशा "दूरच्या" नातेवाईकांशी मी संबंधच ठेवणार नाही.

आमच्या लग्नात फापटपसारा टाळून फक्त जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले आणि म्हणून अनेक नातेवाईकांनी माझे अभिनंदन केले.

दुर्दैवाने त्यातील बहुतेक लोकांनी गतानुगतिक होऊन आपल्या मुलांच्या लग्नात नको इतक्या लोकांना बोलावून गोंधळ घातला.

आजकाल लग्नाच्या जेवणावळीसाठी खर्च माणशी ८०० रुपये पासून अधिक इतका असतो.

उगाचच लोकांना खुश ठेवण्यासाठी जोडप्याला पंधराशे दोन हजार रुपये खर्च करण्यापेक्षा हा पैसा मी वधूवरांना देणे पसंत करेन.

वृथा वृष्टी समुद्रेषु
वृथा तृप्तस्य भोजनं
वृथा दानं समर्थास्य
वृथा दीपो दिवापिच

अर्थात

समुद्रात पाऊस पाडणे
तृप्त माणसाला अधिक खाऊ घालणे
श्रीमंत माणसाला दान देणे
आणि दिवसा दिवा लावणे

हे व्यर्थ आहे

<<< आजकाल लग्नाच्या जेवणावळीसाठी खर्च माणशी ८०० रुपये पासून अधिक इतका असतो. >>>
खरे सर, कृपया गैरसमज नसावा, पण नातेवाईकांना घरी जेवायला मिळत नाही म्हणून ते लग्नाला येत नसतात.

माज सांगायचे झाले तर मी कोणाच्याच लग्नात किंवा तत्सम कार्यक्रमात जेवत नाही .
रांग लावून अन्न घेणे आणि उभे राहून खाणे ह्या दोन्ही गोष्टी वैयक्तिक रित्या मला पटत नाहीत.

गैर समज करू नये ही विनंती.

आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे .
आधुनिक विज्ञान जे आनुवंशिक रोगा विषयी सांगते त्याचा विचार लग्न करताना करावा की नाही

@उपाशी बोका
पण नातेवाईकांना घरी जेवायला मिळत नाही म्हणून ते लग्नाला येत नसतात.

हे तर मान्यच आहे.
मुद्दा असा नाही. बऱ्याच वेळेस लग्नाला इतकी जास्त माणसे येतात कि धड कोणाशीही बोलणे शक्य होत नाही.

आणि एक प्रेमाचा समारंभ म्हणून धड साजराही करता येत नाही. बऱ्याच वेळेस अमुक तमुक स्नेही किंवा ओळखीच्या माणसाने त्याच्या मुलाच्या लग्नात बोलावले म्हणून आपल्याला त्याला बोलवायला पाहिजे असा व्यत्यास( RECIPROCATION) मुळे अनेक लोक बोलावले जातात याचा बोजा बऱ्याच वेळेस वधुपित्यावर पडतो.

माझ्या स्वतःच्या लग्नात आमच्या आईच्या "अनेक मैत्रिणीना" मी लग्नाला बोलावले नाही. ज्यांना मी पुढे आयुष्यात परत कधी भेटलो नाही त्यांच्या भोजनाचा खर्च माझ्या सासर्यांनी का करावा असा माझा विचार होता.

( लग्नाचा खर्च दोघात वाटून घ्यावा असे मी स्पष्टपणे सुचवले होते परंतु मुळात माणसे बरीच कमी झाली त्यामुळं सासऱ्यांच्या खर्च बराच कमी झाला होता म्हणून त्यांनी याला नकार दिला)

माझ्या मुलांच्या लग्नात केवळ जवळचे लोकच बोलवायचे आणि ज्यांना बोलवायचे आहे त्यांच्यावर होणारा खर्च हा हेमलकसा प्रकल्प किंवा टाटा रुग्णालयाला त्यांच्या नावाने द्यावा असा माझा विचार आहे.

अशाच विचाराची व्याही मंडळी मिळाली तर ते शक्य होईल

अन्यथा दरिद्री माणसाच्या मनोरथाप्रमाणे हे विचार हवेत विरून जातील

> आधुनिक विज्ञान जे आनुवंशिक रोगा विषयी सांगते त्याचा विचार लग्न करताना करावा की नाही > प्रेमात न पडता, चेकलिस्ट बनवून जोडीदार शोधणार असाल तर त्यात हादेखील एक क्रायटेरिया असू शकतो.

ठरवून आंतरजातीय विवाह झाल्याचे एक सुधा उदाहरण नसेल >> हे सरसकट चित्र नाही .

माझं स्वतःचं आंतरजातीय लग्न झालंय, रीतसर चहा-पोहे कार्यक्रम करून.

आंतरजातीय विवाह... लोक काय म्हणतील!!!>>>>>>>>>>>>. ह्याने किंवा हिने परजातीत लग्न केलंय एवढंच म्हणतील.

<<<
बाकीचे 95 % लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून 3 ते 4 परिवार बरबाद करतात.
>>>

आंतरजातीय लग्न म्हणजे भारी आणि स्वजातीय लग्न म्हणजे तुच्छ, काहीतरी चूक असा एकंदर सूर वाटला या लेखाचा. जर ठरवूनच लग्न करायचे आहे (प्रेमविवाह नाही) तर स्वजातीय स्थळ बघण्यात काय चूक आहे? (इतर लोक काय म्हणतील हा मुद्दा नसेल तरीही).

Pages