आंतरजातीय विवाह... लोक काय म्हणतील!!!

Submitted by आरुश्री on 17 December, 2019 - 12:49

"जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी"
हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेलच, पण जेव्हा ही गोष्ट "आंतरजातीय विवाह" यावर येते तेव्हा मध्ये येतो तो सर्वात मोठा शत्रू म्हणजे "समाज".
एका रिसर्च नुसार भारतात फक्त 5% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात आणि बाकीचे 95 % लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून 3 ते 4 परिवार बरबाद करतात. कारण बहुतेक पालकांना आपल्या मुलांना काय वाटतं यापेक्षा समाज काय म्हणेल, समाजातील ती चार लोक काय म्हणतील, लोक तोंडात शेण घालतील, स्वतःच्या जातीतली सोडून दुसऱ्याच्या जातीतली पोरगी घरी आणली तर समाजाला तोंड कसं दाखवणार?" हे आणि असे खुप सारे illogical प्रश्न पडलेले असतात ज्यामुळे पालकांना इंटरकास्ट मॅरेजेस मध्ये प्रॉब्लेम असतो.
भारतामध्ये सर्वात पहिला आंतरजातीय विवाह 4/फेब्रुवारी/1889 मध्ये यशवंत आणि राधा यांचा झाला होता. यशवंत म्हणजे जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांचा मुलगा आणि राधा म्हणजे ज्ञानोबा कृष्णा ससाने यांची मुलगी. आणि ह्या गोष्टीला जवळपास एकशे तीस वर्षे उलटून गेली तरी आपले बुरसटलेले विचार अजून तिथल्या तिथेच आहेत हि खंत.
So Dear Parents,
मान्य आहे की तुम्हाला तुमच्या मुलांपेक्षा तुमची इज्जत आणि समाज काय म्हणेल हे जास्त महत्त्वाच आहे, मान्य आहे की तुम्ही ज्या समाजात लहानपणापासून वाढलात, मोठे झालात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे सगळं नाही accept करू शकत. पण तुम्ही त्यांना सोबत घेऊन चला जे आज तुमच्या सोबत आहेत, त्यांचा विचार करत बसू नका जे कधी तुमच्यासोबत नव्हतेच.
समाज आणि त्या समाजातील लोक हे तर महत्त्वाचे आहेतच... पण सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तुमचे आई बाबा.
आणि जर तुम्हाला असं वाटतंय की कोणी तुम्हाला चुकीचं समजेल, तुमच्या मुलांना चुकीचं समजेल, तुमची खिल्ली उडवतील , तर विचार करा हे असल्या कसल्या प्रकारचे मित्र, लोक, किंवा समाज आहेत जे आज तुम्हाला नाव ठेवतायेत, उद्या दुसरं कोणाला तरी नाव ठेवतील, तर परवा तिसरच कोणीतरी असेल. आणि ह्या अशा लोकांसाठी तुम्ही तुमच्या मुलांना आयुष्यभरासाठी का त्रासात टाकायचं.
ते म्हणतात ना " सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग". खरं तर ह्या लोकांना तुमच्याशी काही देणं-घेणं नसतंच. पण तुम्हाला कायम भीती असतेच, की लोक काय म्हणतील!. आणि हे कसलं logic झालं की' "स्वतःच्या जातीतल्या गाढवासोबत लग्न झालेलं चालेल, पण दुसऱ्याच्या जातीतला घोडा सुद्धा नको".
म्हणून तुम्ही बळजबरीने तुमच्या मुलांचे लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून दिलं जिथे तुमचा समाज हे accept करेन आणि तुमच्या मुलांनी सुद्धा हे बळजबरीच लावून दिलेल लग्न मान्य केलं तर नंतर पुढे काय?... तुम्ही काय गॅरंटी देऊ शकता की पुढे जाऊन तुमची मुलं खूश राहतीलच आणि समोरची व्यक्ती चांगली निघेलच. मग का आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळायचं, ते पण फक्त समाजासाठी आणि तो पण असा समाज जो कधी तुमचा नव्हताच.
अशी लोकं एक दिवस तुमच्या मुलांच्या लग्नाला येतील, डोक्यावर चार अक्षदा टाकतील, नंतर चर्चा रंगवतील की मुलगा - मुलगी काय करते, त्यांचं खानदान कसये, तुम्ही लग्नात किती खर्च केला आहे, किती तोळे दिलेत, कशी कपडे घातलीत... आणि या सगळ्या गोष्टींवर तोंडसुख घ्यायला जर काही कारण नाहीच भेटले तर घरी जाऊन ते म्हणणारच आहेत की " भाजीत जरा मीठ कमीच होत बर का..!"
थोडक्यात सांगायचं काय तर ज्या लोकांना नाव ठेवायची आहे ती लोक कशाही प्रकारे ती ठेवणारच आहेत. मग तुम्ही कितीही आणि काहीही करा. तर मग कशाला स्वताला ह्या असल्या परिस्थितीत टाकून घ्यायचं जिथे लोक तुम्हाला judge करतील.
खूप साऱ्या पालकांच म्हणंण हे असं असतं की "आमच्या जमान्यात तर असं नव्हतं, आई-बाप पसंत करायची आणि आम्ही डायरेक्ट बोहल्यावर जाऊन उभे राहायचो. आमचे कुठे संसार मोडलेत, चाललेच आहेत की चांगले. I agree, पण आज-काल जमाना बदलाय तशी लोकही बदललीच आहेत की.. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आजकाल आपण आपल्या मुलांना शाळेत घालायचं असेल तर काय पाहतो, तिथे कॉम्प्युटर आहेत का, लायब्ररी आहे का, सायन्स लॅब आहे का, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात का? या आणि अशा कितीतरी गोष्टी. आता तसं पहायला गेलं तर तुमच्या जमान्यात कदाचित शाळांमध्ये हे सर्व नसेलही पण आत्ता आपण आपल्या मुलांना शाळेत घालताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करतोच ना, कारण काय तर आत्ता आपल्याकडे ऑप्शन आहेत, आयुष्य अजून चांगलं जगण्यासाठीचे. असं नाही की तुमच्या जमान्यात हे सर्व नव्हतं म्हणून तुम्ही खूष नव्हते किंवा शिकलेच नाहीत, पण आता ते सर्व ऑप्शन आहेत ज्यामुळे तुम्ही जास्त चांगलं काहीतरी मिळवू शकता आयुष्य अजून चांगलं सोपस्कर होण्यासाठी. नवीन जमान्यानुसार आपण बदललो ना. मग अशीच पद्धत तिकडेही का लागू होत नाही.
पालकांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे " आमच्या जमान्यात डिव्होर्स कमी व्हायचे किंवा व्हायचेच नाहीत" तर मला अशा लोकांना एवढेच सांगायचे आहे की असं नाहीये की तुमच्या जमान्यात लोक जास्त खुश होते. ते फक्त समाजासाठी, जे आहे त्यात ॲडजस्ट करून कसेबसे जगत होते. "पदरी पडलं अन पवित्र झालं" असंच काहीसं. पण आजकालच्या जमान्यात लोक एवढं सहन करत बसतच नाहीत. पटत नाहीत तर दोघे वेगळे होतात divorce घेतात आणि पुन्हा आपल्या लाईफमध्ये आपापल्या पद्धतीने जगतात.
शेवटी एक विचार नक्की करा की जेव्हा उद्या आपण ह्या जगातून निघून जाऊ, तेव्हा ती आपली स्वतःचीच मुलं असतील जी त्यांच्या मुलांना आपल्याबद्दल गोष्टी सांगून आपल्याला जिवंत ठेवतील तो तो समाज नव्हे ज्याला आपण आता इतके महत्व देतोय.
आणि मुलांसाठी सांगायचं म्हणाल तर तुम्ही स्वतः आधी शिका, मोठे व्हा, नोकरीला लागा, फायनान्शिअली सेटल व्हा. म्हणजे उद्या तुमच्या घरच्यांनी हा विचार नक्की करावा कि इंटरकास्ट मॅरेज आहे तर ठीक आहे पण दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत, काबिल आहेत, तर आपण पुढचा विचार करायला काही हरकत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी एक विचार नक्की करा की जेव्हा उद्या आपण ह्या जगातून निघून जाऊ, तेव्हा ती आपली स्वतःचीच मुलं असतील जी त्यांच्या मुलांना आपल्याबद्दल गोष्टी सांगून आपल्याला जिवंत ठेवतील तो तो समाज नव्हे ज्याला आपण आता इतके महत्व देतोय. >>> +१

(ग्रुप चुकलाय, ललित लेखन मध्ये हलवा)

Hmmm..

भारतामध्ये सर्वात पहिला आंतरजातीय विवाह 4/फेब्रुवारी/1889 मध्ये यशवंत आणि राधा यांचा झाला होता.>>>>>
ऑsss

खंडोबा आणि बाणाईचा झालेला न्..
शिवाय प्रेमविवाह Lol

लेखाचा रोख चर्चा घडवणे आहे का?
किंवा ज्यांचा झाला आहे त्यांच्या आईवडील, भा्ऊबहीण यांनी कसं वागावं इत्यादी?
-------------
नातेवाईक त्यांना शक्यतो टाळतात पण सुप्तपणे. का कसे सांगता येत नाही पण दूरच राहतात.

चार लोक काय म्हणतील याची चिंता करूच नये

कारण चार लोक फक्त एवढंच म्हणतात

रामनाम सत्य है

चार माणसे...

हयातीत असावीत जोडलेली चार माणसे
मयतिला काय करायचीत हजारो माणसे

सुखात असावी सहभागी चार माणसे
दुःखांत काय करायचीत मुखवट्याची माणसे

माहेर सोडून येते जेव्हा मायेची चार माणसे
पाठीशी असावीत घरातील चार माणसे

सद्वर्तनं असावे तर नावाजतील चार माणसे
अथवा बोलतील माघारी चार माणसे

राजेंद्र देवी

चार लोक काय म्हणतील याची चिंता करूच नये

कारण चार लोक फक्त एवढंच म्हणतात

रामनाम सत्य है

नवीन Submitted by सुबोध खरे on 17 December, 2019 - 23:49

सहमत. आणि तीही वेळप्रसंगी कुठल्याही जातीची असू शकतात कारण मेल्यावर खांदे द्यायला लोकांमध्ये चढाओढ लागते तेच जिवंतपणी खांद्यावर हात ठेवायला आपले सुध्दा महाग होतात.

चांगलं लिहिलंय... आज ही उच्चशिक्षित लोक इंटरकास्टला ठाम नकार देतात. लोक काय म्हणतील ह्या भीतीने.
माझ्या एक अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं असंच झालं .इंटरकास्ट होतं म्हणून नकार होता दोन्हीकडून.
तिचं नंतर arrenged मॅरेज झालं.
पण ती आज आहे त्यापेक्षा कैक पटींनी जास्ती सुखी राहिली असती असं तिनी मला बऱ्याचदा बोलून दाखवलं.
माझ्या मामींनी तिच्या दोन्ही मुलींना ठणकावून सांगितलं होतं की love मॅरेज करायचं असेल तर आपल्याच जातीतला बघून प्रेमात पडा.
Intercast नको
असं ठरवून प्रेमात पडता येत का??

> माझ्या मामींनी तिच्या दोन्ही मुलींना ठणकावून सांगितलं होतं की love मॅरेज करायचं असेल तर आपल्याच जातीतला बघून प्रेमात पडा.
Intercast नको
असं ठरवून प्रेमात पडता येत का?? >
पडतात की बरेचजण Wink
म्हणजे मला जे 'लव मॅरेज केलं' असं लाजत लाजत सांगणारे भेटलेत त्यातले बरेचजण स्वतःच्या जातीतल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले दिसलेत.
मग मी स्वतःच समजून घेते की हे 'सेल्फ अरेंज्ड' लग्न आहे.
===

> पालकांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे " आमच्या जमान्यात डिव्होर्स कमी व्हायचे किंवा व्हायचेच नाहीत" तर मला अशा लोकांना एवढेच सांगायचे आहे की असं नाहीये की तुमच्या जमान्यात लोक जास्त खुश होते. ते फक्त समाजासाठी, जे आहे त्यात ॲडजस्ट करून कसेबसे जगत होते. "पदरी पडलं अन पवित्र झालं" असंच काहीसं. पण आजकालच्या जमान्यात लोक एवढं सहन करत बसतच नाहीत. पटत नाहीत तर दोघे वेगळे होतात divorce घेतात आणि पुन्हा आपल्या लाईफमध्ये आपापल्या पद्धतीने जगतात. >
त्याकाळात बायका शिकलेल्या, आर्थिक स्वतंत्रदेखील फारशा नसायच्या. आर्थिक परावलंबी असणे हे एक मेजर कारण आहे/होतं घटस्फोट न घेण्याचं.
+
नवऱ्याने टाकलेली बाई असा शिक्का लागायची, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता जास्त.

चांगलं लिहिलंय... आज ही उच्चशिक्षित लोक इंटरकास्टला ठाम नकार देतात.> > > धन्यवाद... खर आहे... अशा वेळेस खरच प्रश्न पडतो की एवढ शिकून काय उपयोग.... जर माणसाला माणसासारखं वागवू नाही शकत..

लेखाचा रोख चर्चा घडवणे आहे का?
किंवा ज्यांचा झाला आहे त्यांच्या आईवडील, भा्ऊबहीण यांनी कसं वागावं इत्यादी?> > > चर्चा घडवणे असं काही नाही. मी माझं मत मांडलं. यातून जर ज्यांचा झाला आहे त्यांच्या आईवडील, भा्ऊबहीण यांनी कसं वागावं हे त्यांना समजलं तर चांगलंच आहे की...

चार माणसे...

हयातीत असावीत जोडलेली चार माणसे
मयतिला काय करायचीत हजारो माणसे> > > खूपच छान

पण आज काल अरेंज मॅरेज ही अंतर जातीय होतात .माझ्या चुलत बहिणीच अरेंज मॅरेज आहे तेही अंतर जातीय ;सुधारणा होतेय पण हळूहळू
लेख सुंदर आणि नेमक्या समस्येवर बोट ठेवणारा आहे

>>एका रिसर्च नुसार भारतात फक्त 5% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात आणि बाकीचे 95 % लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून 3 ते 4 परिवार बरबाद करतात.<<
इंटरेस्टिंग. कुठल्या काळांत हा रिसर्च केला होता हे कळुन घ्यायला आवडेल. कारण हल्ली इंटरकास्ट तर सोडाच, इंटरस्टेट, इंटररिलिजन, इंटररेस लग्न सर्रास होतात. हे वरचं वाक्य बदलुन असं लिहिलंत तर आश्चर्य/अतिशयोक्ति वाटणार/होणार नाहि...

भारतात फक्त ९५% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात, आणि बाकीचे ५% लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून ३ ते ४ परिवार बरबाद करतात... Happy

कारण चार लोक फक्त एवढंच म्हणतात
रामनाम सत्य है
>>>>

कोणती ४ माणसे भेटतात यावर अवलंबून आहे..
अन्यथा जहा ४ यार मिले वही रात गुजर जाये सुद्धा असतेच की...

भारतात फक्त ९५% लोक अशी असतील ते इंटरकास्ट मॅरेजेसला परवानगी देतात, आणि बाकीचे ५% लोकं बळजबरीने अरेंज मॅरेज करून ३ ते ४ परिवार बरबाद करतात... Happy
>>>>

जेवढा भारत शहरात आहे त्याच्यापेक्षा जास्त तो गावखेड्यात आहे.
मुलगी झाली की नाराज होणारा समाज आंतरजातीय विवाहाला परवानगी देत असेल का?

IT मधले बरेच तरुण तरुणी एका प्रोजेक्ट मध्ये असतील तर एकत्र onsite ला जावं लागतं. बऱ्याचदा ते तिकडेच प्रेमात पडतात.
इकडे येऊन पालकांना सांगतात असं असं आहे.
पालकांनी होकार दिला तर ठीक नकार दिला तरी लग्न करतात आणि परदेशात कायमचे स्थायिक होतात.
इकडचे लोक काय म्हणतील हा प्रश्नच येत नाही.
त्यांचे आई वडील आणि कुटुंबीय हे दुःखी कष्टी होतात.
आई वडिल जास्ती.

> इंटरेस्टिंग. कुठल्या काळांत हा रिसर्च केला होता हे कळुन घ्यायला आवडेल.>
Only 5.8% of Indian marriages were inter-caste, according to Census 2011, a rate unchanged over 40 years.

Inter-caste marriages depend on education level, but not that of the couple

प्रेम प्रकरणामध्ये जे आंतरजातीय जोड्या असतात त्यांना शहरी भागात तरी विरोध कमी झालंय आणि अशी लग्न होत आहेत दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने.
पण जी लग्न ठरवली जातात ती जाती मध्येच ठरवली जातात दुसऱ्या जाती मधील मुलगा किंवा मुलगी बघायला आणि तसे लग्न ठरवायला अजुन तरी समाज तयार नाही .
ठरवून आंतरजातीय विवाह झाल्याचे एक सुधा उदाहरण नसेल

> प्रेम प्रकरणामध्ये जे आंतरजातीय जोड्या असतात त्यांना शहरी भागात तरी विरोध कमी झालंय आणि अशी लग्न होत आहेत दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने. >
No more than 11% of Indians lived in urban areas in 1901, compared to 34% (460 million) in 2018--a figure which is predicted to rise to 600 million by 2030, according to this 2018 United Nations report.

Indeed, metropolitan areas have a lower rate of inter-caste marriages (4.9%), compared to 5.2% in rural areas.

The comparative economic status of both families at the time of marriage also had no effect on the rate of inter-caste marriages, with the rate actually going down as household assets and income levels increase.
Richest households by assets had an inter-caste marriage rate of 4.0%, compared to 5.9% for the poorest.

आमच्या गावात जर कोणी आंतरजातीय विवाह केला तर लोकं अशी काय चर्चा करतात की विचारू नका. बायका जेवण भांडी लवकर आटपून एकमेकींच्या घरी जातात आणि हा विषय मध्यरात्रीपर्यंत चघळतात. पुरुष मंडळी दुपारी पारावर जमतात आणि हे कसं चूक आहे, त्या जोडप्याला कसा त्रास होईल, मुलांना काय त्रास होईल याची महाचर्चा रंगवतात. तसेच त्या मुलाचे आईवडील कुठे भेटले तर त्या मुलीच्या जातीवर विषय कसा येईल हा विचार करून गप्पा मारायला सुरुवात करतात. तरी नशीब समलैंगिक विवाह झाला नाही तो झाला तर बिचार्यांना मेंटल हरासमेंट करून गाव सोडायला भाग पाडतील.

अरेंज मॅरेज करणारे आणि लव मॅरेज करणारे मला वाटते हे दोन सेपरेट क्लास आहेत
लव मॅरेज करणार्‍यात पण २ क्लास आहेत.. एक जातीत आणि एक विजातीत Proud
विजातीत लव मॅरेज करणार्‍यात पण २ क्लास आहेत... एक धर्मात आणि दुसर्‍या धर्मात Proud

एकंदर लव मॅरेज करणारे हे अरेंज मॅरेज करणार्‍या व्यक्तींपेक्षा खुप वेगळी जडणघडण असणारे असतात आणि त्याबरहुकुम त्यांचे विचार असतात. त्यांचे विचार, विचार आमलात आणण्याची खुमखुमी हे अरेंज मॅरेज करणार्‍यांपेक्षा अतिशय निराळी असते असे माझे निरिक्षण आहे.

अरेंज मॅरेज करणार्‍यांना त्यांचे विचार आणि ते आमलात आणण्याची खुमखुमी नसते असे नाही पण ते आपल्या आधी आपल्या आई-वडीलांचा अथवा घरातील/भावकीतील्/पाहुण्यातील सल्ला घेणारे नक्की असतात. ते घरी-दारी-पाहुण्यांत रमणारे असल्यामुळे अरेंज मॅरेज चा मार्ग स्विकारत असावेत असं मला वाटतं.

याउलट लव मॅरेज करणार्‍यांत परिणामांची फिकीर न करणारे, आई-वडीलांचा अथवा घरातील/भावकीतील्/पाहुण्यातील सल्ला न आवडणारे असे स्वयंभु गुण असतात.. आपण, आपला जोडीदार आणि आपल्या विचारांना साथ देणारे साथीदार एवढं जग (कदाचित हे घरीदरी रमणार्‍यांपेक्षाही रुंद कक्षेचं असु शकतं..!) सोबत असलं म्हणजे झालं अशा विचारधारेचे ते असतात.

माझ्यासाठी तरी अरेंज मॅरेज करणारे आणि लव मॅरेज करणारे हे दोन्ही समान आहेत... मला त्यांच्या विचारातले बारकावे ज्या पद्धतिने दिसले ते मी मांडले आहेत.. स्थळ, वेळ, काळ याप्रमाणे सामाजिक, आर्थिक स्तरातील तफावतीत ते बदलु शकतात.

ते घरी-दारी-पाहुण्यांत रमणारे असल्यामुळे अरेंज मॅरेज चा मर्ग स्विकारत असावेत असं मला वाटतं.
असं अजिबात नाही.
मला ( आणि माझ्या बायकोला) प्रेम विवाह करायचा होता. पण योग्य किंवा अनुरूप जोडीदार मिळाला नाही म्हणून आम्ही नाईलाजाने ठरवून विवाह केला.
परिणामांची फिकीर न करणारे, आई-वडीलांचा अथवा घरातील/भावकीतील्/पाहुण्/भावकीतील्/पाहुण्यातील सल्ला न आवडणारे
परंतु विवाह कसा करायचा याची माझी एक संकल्पना होती ती मात्र मी माझ्या लग्नात प्रत्यक्षात आणली.
जवळचे नातेवाईक आणि अत्यंत जवळची मित्रमंडळी एवढीच माणसे दुपारी २ वाजता लग्नाच्या कार्यालयात जमलो. दोन तासात धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक असलेले तीन विधी( कन्यादान, सप्तपदी आणि मंगळसूत्र) केले. ते सोडून बाकी सर्व रूढींना फाटा मारला होता. संध्याकाळी ४.२२ चा मुहूर्त. लग्न लागल्यावर बायको ब्युटी पार्लर ला गेली ६ ते ९ स्वागतसमारंभ आणि रात्री १० वाजता आमच्या घरची मंडळी आम्ही दोघे भाऊ आणि वाहिनी आणि आई वडील एवढे सहा लोक घरी आलो.
उगाच वरात, घोडा, वाजंत्री, नाच गाणे, डीजे चा ठणाणा, ओळखीचे, स्नेही, इतर मित्र बागेत भेटणारे इ सर्वाना फाटा मारला होता.
बायकोचे मामा वगैरे मंडळी नाराज झाली होती. असं कुठे असतं का? इ इ
काही फरक पडला नाही. उगाच लुंग्यासुंग्याला जेवायला घालून फुकटचा खर्च करण्यात काहीही हशील नाही.

उगाच लुंग्यासुंग्याला जेवायला घालून फुकटचा खर्च करण्यात काहीही हशील नाही.>> अगदी बरोबर - स्थळ, काळ, वेळ, आर्थिक, सामाजिक स्थितीप्रमाणे तफावत असु शकते.

अंतर जातीय विवाह बाबत दोन परस्पर उदाहरण आहेत काही ठिकाणी मान्य करतात आई वडील नातेवाईक.
काही ठिकाणी अगदी नवरा नवरी ची हत्या करण्या पर्यंत सुद्धा मजल जाते.

इ इ
काही फरक पडला नाही. उगाच लुंग्यासुंग्याला जेवायला घालून फुकटचा खर्च करण्यात काहीही हशील नाही.

ही तुमची बाजू आणि तुमचे विचार झाले.
तुम्हाला काही फरक पडत नाही पण त्यांना पडू शकतो .
नंतर ते नेहमीच तुमच्या शी वाकडे वागू शकतात.
ही पण शक्यता असतेच ना

Pages