नवलेखक होण्यासाठीची नवसूत्रे

Submitted by याकीसोबा on 10 December, 2019 - 22:28

नवलेखक होण्यासाठीची नवसूत्रे

नुकताच म्हणजे अगदी नुकताच या फोरमचा सदस्य झालो. ह्यामागचं मूळ कारण केवळ आणि केवळ वाचन एवढंच असलं तरी बरीच वर्ष मनात सुप्तावस्थेत असलेला 'कधीतरी काहीतरी लिहून पाहायला पाहिजे' हा विचार जरा जास्तच डोकं वर काढू लागला. अगदीच काही नाही पण चार वर्षांपूर्वी चार परिच्छेद लिहिलेही होते, पण ते फेसबुक आणि व्हॉटसॅप वगैरे वर फिरवून 'वा, वा','अरे, तू पण लिहितोस का' किंवा 'अरे, तू लिहितोस पण का' यांसारख्या प्रतिक्रिया मिळवून तिथेच लिखाणाची सांगतादेखील झाली. कवितांमध्येही हातपाय मारायचा थोडा प्रयत्न झाला परंतु आमच्या कविता म्हणजे 'ट' ला 'ट' आणि 'म' ला 'म' जोडण्यात सुरू होऊन तिथेच संपायच्या. मुळात यमक नसेल तर त्या कविताच नाहीत असा समज मनात फार आधीपासूनच होता (आहे ?). यमक नसलेल्या कविता म्हणजे केवळ लेख लिहिताना चुकून जास्त वेळा 'एंटर' प्रेस झाल्यामुळे बनलेल्या असतात आणि मग लेखकाने (सून टू बी कवी) कीबोर्ड वरून समोर बघितल्यावर 'अरेच्च्या, कविता झाली होय' हे समजल्यामुळे खाली लेखक ऐवजी कवी म्हणून आपलं नाव टाकलेलं असतं हाही फार पूर्वीपासून चालत आलेला माझा समज होता (आहे ?). असो. तर अश्या अनेक समज गैरसमजांमुळे होऊ घातलेले आमच्यासारखे अनेक नवलेखक एखाद दोन लेख आपापल्या मोबाईल, लॅपटॉपवर लिहून ते कोणालाच न दाखवता आपली प्रतिभा लपवून ठेवत असल्यामुळे अस्मादिकांनी नवलेखक होण्यासाठीची नवसूत्रे हा लेख लिहून आमच्या नवलेखनाची सुरुवात करायचं ठरवलं आहे. तर ही नवसूत्रे खालीलप्रमाणे.

१. नवलेखक होण्यासाठी आधी तुम्ही निरनिराळ्या फोरम्स अथवा ब्लॉग्सचे वाचक किंवा किमान एक नववाचक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्हाला नवलेख लिहिण्याची नवस्फूर्ती ही निरनिराळे लेख वाचूनच मिळू शकते. हे लेख दोन्ही प्रकारचे असू शकतात. म्हणजे एखादा लेख वाचून आपल्याला 'वा, असं काहीतरी लिहिता आलं पाहिजे' असं वाटतं किंवा एखादा लेख वाचून 'ह्यापेक्षा आपण बरंच बरं लिहू' असंही वाटू लागतं. त्यामुळे एका नवलेखकाने मिळेल तो लेख तेवढ्याच उत्साहाने वाचल्यास त्यालादेखील लिहिण्याची प्रेरणा मिळू शकते.

२. एक चाणाक्ष नवलेखक लेख नुसते वाचत नाही तर त्यातल्या त्यात चांगल्या (म्हणजे जास्त लाईक्स आणि कमेंट्स असलेल्या) लेखांचा अभ्यासही करतो. बरेचदा अश्या लेखांमध्ये त्याला विशिष्ट असे शब्दही सापडतात जे वापरून कदाचित त्या लेखाचा लेखक आपण नवलेखक नसून एक मुरलेले लेखक आणि मराठीप्रेमी आहोत असे दाखवू इच्छित असतो. उदा. रच्याकने, अस्मादिक, पक्षी (उडणारे नव्हे). नवलेखकाने अश्या शब्दांची एक यादी बनवून नंतर वेळ मिळेल तसे त्या शब्दांचे अर्थ शोधावेत आणि ते शब्द आपल्या लेखात बेमालूमपणे वापरायचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. नीट निरीक्षण केल्यास वरील शब्द या लेखातही सापडतील.

३. लेख लिहिताना किंवा प्रतिक्रिया वगैरे देताना शब्द हे थोड्या विचित्र पध्दतीने लिहिल्यास सुद्धा आपण एक मुरलेले वाचक/लेखक आहोत असं भासवता येऊ शकतं. उदा. काहीच्या काही न लिहिता कैच्याकै, फारफार न लिहिता फार्फार, बुवा च्या ऐवजी ब्वॉ वग्रे वग्रे. अर्थात हे लिहिता येण्यासाठी नवलेखकाने मराठी टंकलेखन या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

४. रूढ नसलेले नवनवीन लघुरूप शब्द (शॉर्टफॉर्म्स) बनवणे आणि लेखात/प्रतिक्रियेत वापरणे. उदा. आता रूढ झालेले शॉर्टफॉर्म्स म्हणजे पापु, फेबु, वॉऍ वग्रे वग्रे. नवीन बनवायचे ते याकरता की कमीत कमी दोघातिघांनी तरी तुम्हाला जाहीरपणे किंवा पर्सनल चॅट मध्ये "अमुकअमुक म्हणजे रे काय" असं विचारलं पाहिजे. आणि राहिलेले इतर ज्यांना अर्थही कळला नाहीये पण विचारताही येत नाहीये ते लोक त्या शब्दाकडे 'हा रूढ असेल पण मला माहित नसेल' असं समजून पुढे त्यांच्या लेखात वापरायला लागतात आणि तुम्ही बनवलेले शब्द खरोखरच रूढ होऊ लागतात.

५. सोशल मीडियावर किंवा फोरम्स वर इतरांच्या लेखांना प्रतिक्रिया नक्की द्याव्यात. भले त्या नुसतं 'खुसखुशीत', 'खुमासदार' वगैरे असोत अथवा औपहासिक स्तुती असो. ("सुंदर लेख. दोनदा वाचायला लागला, पण सुरेखच आहे. लिहित राहा." वगैरे टाईप). अश्या प्रतिक्रिया देऊन आपण त्या नवलेखकांना आपण त्यांचा लेख संपूर्ण वाचला आहे असं भासवतोच पण पुन्हा ती व्यक्ती येऊन आपला एखादा लेख वाचून जायची शक्यता वाढते.

६. तुमची साहित्यिक आवड आणि वाचन हे कितीही मर्यादित (व्यक्ती आणि वल्ली व फार्फार तर श्यामची आई. बस्स. इथे आपलं सामान्यज्ञान समाप्त.) असलं तरीही चर्चेत किंवा कुठेही संदर्भ लागण्यासाठी प्रसिद्ध लेखक/ कवी, त्यांची प्रसिद्ध पुस्तकं/साहित्य आणि असल्यास त्यांची टोपणनावं यांची यादी करून ती पुस्तकं वाचणार नसाल तर किमान त्यांची नावं तरी पाठ करा. नाहीतर एखादा स्वयंघोषित साहित्यप्रेमी मित्र तुमची परीक्षा घेताना, "पुलं?" "देशपांडे" "वपु?" "काळे" आणि "बा.भ.?" विचारल्यावर तुम्ही प्रश्नार्थक चेहेऱ्याने तोंडातल्या तोंडात "ळी?" वगैरे म्हणाल आणि तो तिरमिरीत येऊन फान्नकन तुमच्या कानशिलात लावेल. असे प्रसंग टाळण्यासाठी आधी ही सर्व माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

७. कधी कधी नवलेखक एक लेख लिहीत असताना त्याला लेखनासाठी अजून नवनवीन कल्पना येऊ लागतात. खूपच नवखे असलेले लेखक मग त्या सगळ्या 'आयड्या' एकाच लेखात घुसडून एकतर लेखाची पण वाट लावतात आणि सगळे फटाके लक्ष्मीपूजनाला उडवल्याने पाडव्याला जसं इतरांकडे बघत बसायची वेळ येते तसं मग पुढचा लेख सुचेपर्यंत इतरांच्या लेखांवर प्रतिक्रिया देत बसतात. (खुसखुशीत. लोल.) त्यापेक्षा नवीन आयडिया नवीन लेख लिहिण्यासाठी वापरल्यास मूळ लेखही चांगला राहील आणि आपल्याला अधिकाधिक लेख लिहिण्याची संधी मिळेल.

८. बरेचदा आपल्या डोक्यात लेखासाठी काहीतरी भन्नाट शीर्षक येतं. लक्षात घ्या, लेख तयार नसतो की लेखाबद्दल काही कल्पनासुद्धा डोक्यात नसते, केवळ एक शीर्षक डोक्यात येतं (पक्षी: नवलेखक होण्यासाठीची नवसूत्रे). अश्या वेळी थोडा प्रयत्न केल्यास त्या शीर्षकावरून एखादा चांगला लेख लिहिला जाऊ शकतो. थोडेसे मुद्दे घेऊन त्यात वरून हळू हळू पाणी घालत राहिलं की झाला लेख तयार. फक्त आपण पाणी किती घालतोय आणि भरपूर पाणी असलेली खिचडी सरसरीतच कशी छान लागते हा विचार करताकरता त्या खिचडीचं व्हेज क्लीअर सूप होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

९. कधी कधी तुम्हाला लेखात वापरण्यासाठी एखादा नवशब्द सुचतो देखील. पण तो वापरण्यासाठी योग्य जागा सुचत नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण झालेली नसते. अश्या वेळी ती परिस्थिती निर्माण करण्याचं कसब एका कुशल नवलेखकात असायला हवं. उदा. तुम्हाला 'नवसूत्रे' हा शब्द सुचलाय आणि त्यातला 'नव' तुम्हाला नवीन आणि नऊ या दोन्ही अर्थांनी वापरायचा आहे (आपण कैच्याकै भारी आहोत दाखवण्यासाठी). आता त्यातला नवीन हा अर्थ तुम्ही तो शब्द नवलेखक या शब्दाबरोबर वापरत असल्याने तो भाग सर होतो परंतु नऊ या अर्थाने वापरायचा असेल तर तुमच्याकडे नऊ मुद्दे असायला हवेत आणि ते नसतील तर बनवता यायला पाहिजेत.

खरंतर ही सूत्रं लिहीत असताना आणखीही बरंच कायकाय डोक्यात येत आहे परंतु त्या गोष्टी नवीन लेख लिहिण्यासाठी रिझर्व्ह मध्ये टाकतो आणि सध्या नऊ मुद्दे झाल्यामुळे इथेच थांबतो. तसेच ही नवसूत्रे सर्व नवलेखकांच्या उपयोगास येतील अशी आशा करून माझा दुसरा लेख संपवतो.

बाय द वे, 'रच्याकने' म्हणजे काय ?

-----------///-------------

(हा लेख खरोखरच (नव)लेखकाचा दुसरा लेख असून चार वर्षांपूर्वी लिहिलेला पहिला लेख पोस्ट करण्याचं धाडस या लेखावरील प्रोत्साहन देणाऱ्या खुसखुशीत प्रतिक्रिया पाहून करण्यात येईल.)

Group content visibility: 
Use group defaults

भारी टिप्स आहेत
शिवाय व्यवस्थित 9च आहेत.
पुलेशु(आता बस गेस करत☺️☺️)

उपरोधाने असे लेख पूर्वी ~ओर्कुटवर मृत्युंजय नावाचा आयडी लिहायचा. त्याचा बाज भारी होता. मिसळपाववर त्याने परीकथेतला राजकुमार या नावाने होतकरू लेखक, मुक्तपीठवर लेखक कसे व्हावे अशा नावाने पुन्हा ते लिखाण टाकले आहे बहुतेक. त्यानंतर त्याची खूप कॉपी झाली. आता नाही वाचवत त्या पठडीतलं. नवं असताना गंमत असते.

Lol

पण यात नवलेखकांना लेखन कसं करावं, याबाबत टिप्स नाहीयेत. नुसतेच शॉर्टफॉर्म्स कसे वापरावेत हेच सगळ्या सूत्रात दिसतंय.

>>> पण यात नवलेखकांना लेखन कसं करावं, याबाबत टिप्स नाहीयेत. <<<
त्या मला माहित असत्या तर मी खराखुरा लेख लिहिला असता की...

नावाचा अर्थ काय

नवीन Submitted by वेडोबा on 11 December, 2019 - 20:07
>>>
सगळे Light 1 घेणार असाल तर,

या: या आयडिने कंटाळा आला
की: की नव्या आयडीने जन्म घेऊन मी माबो
सो: सोडून जाणार नाही
बा: बार बार तुम्हाला भेटायला येणार.

प्रतिसाद खुसखुशीत वाटल्यास पहिला लेख टंकावा.

>>> नावाचा अर्थ काय <<<
>>> सगळे ... टंकावा. <<<

हाहाहा. विश्लेषण आवडलं. याकीसोबा हा एक जपानी खाद्यपदार्थ असून थोडक्यात सांगायचं तर त्याचा अर्थ भाजलेल्या (याकी) नूडल्स (सोबा) असा होतो.

प्रतिसाद नक्कीच खुसखुशीत होता. पहिला लेख टाकतो लवकरच. (काये, जुना असल्याने तो मॅच्युअर आहे की नाही हे एकदा पुन्हा वाचून बघेन म्हणतोय. कधी कधी आपणच केलेलं काहीतरी हे काही वर्षांनी बालिश किंवा अगदीच बेसिक होतं असं वाटतं त्यामुळे हा डिले)

खुसखुशीत झाला आहे लेख! Lol

रच्याकने मला एक शिर्षक सुचले होते पण त्यावर लिहावे काय हे काही सुचत नाहीये.
कुणाला लेख पाडायचा असेल तर पाडा - शीर्षक "एका पक्ष्याचे वैचारीक वृक्षांतर"

कुणाला लेख पाडायचा असेल तर पाडा - शीर्षक "एका पक्ष्याचे वैचारीक वृक्षांतर">>>
पक्ष्याऐवजी प्राणी चालेन का? माणसाचा वंशज? Lol

> (काये, जुना असल्याने तो मॅच्युअर आहे की नाही हे एकदा पुन्हा वाचून बघेन म्हणतोय. कधी कधी आपणच केलेलं काहीतरी हे काही वर्षांनी बालिश किंवा अगदीच बेसिक होतं असं वाटतं त्यामुळे हा डिले) > लिहा ओ बिंदास. एवढा विचार करू नका. इथे सगळे हौशी लेखक आहेत...