भावार्थ दिपिका महात्म्य

Submitted by पुरंदरे शशांक on 26 November, 2019 - 23:40

भावार्थ दिपिका महात्म्य

ज्ञानेश्वरी ग्रंथ । केवळ महान ।
स्वये नारायण । कृपा करी ।।

ओवी नव्हे साच । परी हे दर्पण ।
दाखवाया जाण । आत्मराज ।।

ऐसी थोर कृति । ज्ञानदेवी केली ।
भाविकांसी भली । उद्धराया ।।

तया ग्रंथांतरी । रिघावे सज्जनी ।
मृदुभाव मनी । धरोनिया ।।

त्याही वरी भेटे । अंतरंग ज्ञाता ।
तरी येत हाता । पूर्ण सार ।।

भावार्थ दिपिका । ग्रंथराज थोर ।
लाभतो साचार । पूर्वपुण्ये ।।

जरी कृपालेश । माऊलीचा मिळे ।
तरीच आकळे । भावार्थासी ।।

येई अनुभवा । एक तरी ओवी ।
तरी ते पाववी । श्रीहरीसी ।।

...............................................................................................

ग्रंथांतरी रिघावे ... या ग्रंथाच्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी मृदू व निर्मळ अंतःकरण असणे आवश्यक आहे.

अंतरंग ज्ञाता.... ज्ञानेश्वरीचे अंतरंग जाणणारा कोणी ज्ञाता, महानुभाव, संत, साधु भेटला तरच ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सार लक्षात येईल.
............................................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!

जरी कृपालेश । माऊलीचा मिळे ।
तरीच आकळे । भावार्थासी ।।.....अगदी अगदी.

ओवी नव्हे साच । परी हे दर्पण ।
दाखवाया जाण । आत्मराज ।।
हे अगदी खरं आहे. आता ते तसे संत नाहीत. लोकांना संत वाङमयाचा विसर पडलाय. परिणामी आत वळून पहाणं होत नाही.
...संतवाणी सारखंच सुंदर लिहिलंय.

वाह