वाचून झाल्यानंतर …

Submitted by कुमार१ on 11 November, 2019 - 23:45

नुकताच इथे एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकाचे काय करावे? अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली.

साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात. या लेखात फक्त पुस्तकांचा विचार करू.
छापील पुस्तके वाचणारे वाचक ते खालील प्रकारे मिळवू शकतात:
१. नवीन विकत घेणे
२. वाचनालयातून
३. रद्दीच्या दुकानातून
४. दुसऱ्याचे उधार घेणे !

वरीलपैकी पहिल्या ३ प्रकारातली निवड मुख्यतः एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केली जाते. तर चौथा प्रकार हा पूर्णपणे मनोवृत्तीशी निगडित आहे. काही चोखंदळ वाचक पाहिले तीनही पर्याय पुस्तकानुसार निवडणारे असू शकतात.
वरच्या पर्याय २ किंवा ४ ची जे निवड करतात त्यांना त्या पुस्तकाच्या साठवणीचा प्रश्न नसतो; वाचून झाले की ते परतच करायचे असते.

आता नवीन पुस्तक विकत घेणाऱ्यांबद्दल बघू. हे खरे पुस्तक शौकीन असतात. पूर्ण विचारांती ते पुस्तक विकत घेतात. त्याचे मनसोक्त वाचन करतात. पुढे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. मग या नव्याचे नवेपण ओसरते आणि ते पुस्तक घरच्या कपाटात जाते.

वाचनाची आवड म्हणून नियमित पुस्तके घेतली जातात. स्वतःचा संग्रह वाढत जातो. त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात. जसे की त्यांत धूळ साठणे, वाळवी लागणे. एखाद्या सदनिकेत किती पुस्तके साठवावीत याला अखेर मर्यादा येते. दर्शनी भागात राहतील आणि मनात आले की पुस्तक पटकन काढता येईल असे भाग्य मोजक्या पुस्तकांना लाभते. बाकीची मग बॅगेत बंद होतात तर इतर काही माळा, पलंगाखालचा कप्पा अशा ठिकाणी बंदिस्त होतात. या पुस्तक संग्राहकांचा एक बाणा असतो, " मी ते पुस्तक विकत घेतलंय ना, मग रद्दीत अजिबात देणार नाही". उगाचच कुणाला भेट देण्यात अर्थ नसतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची घेणाऱ्याला सहसा किंमत नसते. त्यामुळे हा घरचा साठा वाढतच राहतो. कालांतराने असे होते की या साठ्यातील कित्येक पुस्तकांना १० वर्षांत हात सुद्धा लावला जात नाही.

आता माझा याबाबतीतला अनुभव लिहितो. जोपर्यंत स्वतः कमवत नव्हतो,तोपर्यंत वाचनाची आवड ही वाचनालायवर भागवावी लागली. जेव्हा कमावता झालो तसे हळूहळू पुस्तक खरेदी सुरू झाली. सुरवातीच्या आर्थिक परिस्थितीत ती मर्यादित होती. तेव्हा २-३ मित्रांमध्ये मिळून एकमेकांची पुस्तके फिरवली जात. त्यामुळे वैयक्तिक साठा कमी होता. पुस्तकाची निगा चांगली राखली जाई. तेव्हा विकत घेतलेले पुस्तक घरी आयुष्यभर ठेवायचे आहे हाच विचार होता. जणूकाही ती एक संपत्तीच होती. हळूहळू चढत्या कमाईनुसार पुस्तक खरेदी वाढू लागली. जसा घरचा साठा वाढू लागला तसा पुस्तके जपण्यात हयगय होऊ लागली. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागली. एखादे जुने पुस्तक पुन्हा काढून वाचणेही कमी झाले. तसेच संग्रहात नक्की कुठली पुस्तके आहेत याचेही विस्मरण होऊ लागले.

दरम्यान काही वर्षे परदेशात वास्तव्य झाले. तेव्हा दर सहा महिन्यांनी भारतभेट होई. परदेशात मराठी साहित्य मिळणार नव्हते. तेव्हा ऑनलाइन मागवणे हाही प्रकार सुरू झाला नव्हता. मग दर भेटीत इथल्या पुस्तकप्रदर्शनात जाई आणि अधाशासारखी पुस्तके विकत घेई. परतीच्या प्रवासात बरोबर पुस्तकांची एक वेगळी बॅग असे. या खरेदीत एक प्रकार झाला. प्रदर्शनात जी उपलब्ध असंत त्यातलीच घाईने उचलली गेली. त्यामुळे ती सर्वच कायम संग्रही ठेवावी अशी नव्हती. जेव्हा परदेशातील मुक्काम संपला तेव्हा ती सर्व घेऊन भारतात परतलो. आता मात्र साठा काहीसा आवाक्याबाहेर गेला होता.

मग शांतपणे विचार केला. संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती. अजून एक जाणवले. आपल्या वयाच्या प्रत्येक दशकानंतर आपली वाचनाची अभिरुची बदलत राहते. कॉलेजच्या वयात भयंकर आवडलेले एखादे पुस्तक २० वर्षांनी हातात सुद्धा घेवत नाही. आता माझ्याकडची जेमतेम १० पुस्तके अशी वाटली की जी कायम जवळ बाळगावीत. मग उरलेल्यांचे काय करावे ? प्रथम रद्दीचा विचार देखील नकोसा वाटला. मग जवळच्या वाचनालयात गेलो. त्याचे सभासदत्व घेतलेच होते. तिथे काही दिवस निरीक्षण केले. माझ्याकडे असलेली आणि तिथे नसलेली अशी फारच थोडी पुस्तके होती. मग हळूच तिथल्या ग्रंथपालांना विचारले की अशी काही पुस्तके त्यांना भेट देऊ का ? त्यांचा प्रतिसाद तसा थंड होता. 'बघू, ठरवू', या प्रकारचा. मग मी तो नाद सोडला. मग काही वाचनप्रेमी मित्रांना घरी बोलावले आणि माझा संग्रह दाखविला. त्यांनी न वाचलेली अशी मोजकी ३-४ पुस्तके निघाली. ते ती नेण्यास उत्सुक होते. मग ती मला बिलकूल परत न करण्याचा अटीवर त्यांना देऊन टाकली ! अर्थात उरलेला साठा अजूनही बराच होता. एका लहान गावातील वाचनालयाचे वृत्तपत्रात निवेदन आले होते. त्यांना वाचून झालेली पुस्तके भेट चालणार होती. त्यासाठी पोस्टाच्या रांगेत उभे राहायची माझी तयारी नव्हती. म्हणून एक कुरियर गाठले. लहान गावी पाठवाल का म्हणून विचारले. ते प्रयत्न करतो म्हणाले. मग मी ५ पुस्तके त्यांना दिली. मात्र ती इच्छित ठिकाणी काही पोचली नाहीत. मी पण त्यांचेकडे पोच मागण्याचा नाद सोडला. ज्या कोणाच्या हाती पडतील त्याला जर वाटले तर तो ती वाचेल, असा विचार करून विषय सोडून दिला.

या दरम्यान दोन साहित्यिकांचे या संदर्भात लेख वाचण्यात आले. एक होता विजय तेंडुलकरांचा. त्या लेखातील प्रसंगातला एक माणूस विचित्र आहे. तो मुंबईच्या बसने प्रवास करतो आहे आणि एकीकडे पुस्तक वाचतो आहे. एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, त्याचा बोळा करतो आणि खिडकीतून तो चक्क फेकून देतो ! या प्रकाराने चकित होऊन लेखक त्याला याचे स्पष्टीकरण विचारतो. तो सांगतो की त्याचे बरेच ओळखीचे लोक फुकटे वाचक आहेत. ते त्याच्याकडचे एखादे पुस्तक निःसंकोचपणे मागतात आणि नंतर परत करायचे विसरून जातात. अशा प्रकारे त्याची बरीच पुस्तके गायब झाली होती. त्यानंतर तो सध्याच्या निष्कर्षावर आला होता. वाचून झाले की फाडुनच टाकायचे, म्हणजे घरी संग्रह नको आणि कुणी फुकट मागायला पण नको ! पुढे जाऊन तो लेखकाला बजावतो, " मुला, अरे जगातील कित्येक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात, तिथे एका पुस्तकाचे काय घेऊन बसलास?"
तें नी रचलेला हा प्रसंग नक्कीच बाळबोध नाही. त्याच्या गाभ्यातील अर्थ काढायचे त्यांनी आपल्यावर सोडून दिले आहे. माझ्यापुरता मी असा अर्थ काढला. पुस्तक एकदा वाचून झाले की बास, त्याचे जतन करायची खरंच गरज असते? हा मुद्दा वादग्रस्त आहे हे कबूल. पण माझ्या बदलत्या विचार आणि परिस्थितीत मी माझ्यापुरता हा अर्थ काढला. त्यामुळे, एखादे वाचलेले पुस्तक जर कायम ठेवावेसे वाटत नसेल तर रद्दीत विकायला काय हरकत आहे, अशी ठिणगी मनात पडली.

दुसरा लेख वाचला तो रवींद्र पिंगेंचा. त्यात सुरवातीस साहित्यिकांचे अहंकार वगैरेचे चर्वितचर्वण होते. पुढे लेखाला एकदम कलाटणी दिली होती. त्यांनी असे म्हटले होते. ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक, या सर्वांत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, या सर्वांची पुस्तके कधीनाकधी पदपथावर विक्रीस येतात. म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते . तिथे या सर्वांचीच पुस्तके अगदी मांडीला मांडी लावून शेजारी बसतात ! ( इथे मला ' Death is the greatest equaliser' या वचनाची आठवण झाली).
या लेखातील मिश्किलपणा भावला पण त्याचबरोबर विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. लहानपणापासून मी पदपथावरचे पुस्तक विक्रेते पाहत आलो आहे. तिथून कधी एखादे पुस्तकही विकत घेतले आहे. किंबहुना काही दुर्मिळ पुस्तकांसाठी असे पदपथ धुंडाळणारे शौकीन असतात. तर मुळात एखादे पुस्तक पदपथावर येतेच कसे? अर्थातच कुणीतरी आपल्या संग्रहातील पुस्तक रद्दीत विकल्यामुळेच ! अशा जुन्या पुस्तकांची विक्री करून कुणीतरी आपला चरितार्थ करत आहेच ना. तेव्हा आपल्याकडील पुस्तक रद्दीत विकताना फार अपराधी का वाटावे? शेवटी त्या मार्गे ते कुठल्यातरी वाचकांपर्यंतच पोचते.

अशी वैचारिक घुसळण झाल्यानंतर आता मी माझ्याकडची काही पुस्तके नियमितपणे रद्दीत देऊ लागलो. असे करताना त्या पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही. आता कपाटातील जागा रिकामी होऊन तिथे नव्याने घेतलेल्या पुस्तकासाठी जागा उपलब्ध होते. या प्रकारची पुस्तकी-उलाढाल आनंददायी आहे. पुस्तके रद्दीत देण्याचा निर्णय पटकन घेता येतो आणि ते दुकान घराजवळ असल्याने अंमलबजावणीही झटकन होते. याउलट पुस्तके दान करण्याचा निर्णय खूप वेळकाढू ठरतो. त्यासाठी योग्य व्यक्ती/संस्था शोधा, त्यांचे कार्यालयीन सोपस्कार हे सर्व आपल्याला बघावे लागते.

अजून एक मुद्दा. आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. त्या पुस्तकांवर तर आपले आयुष्यभराचे पोटपाणी अवलंबून आहे. तिथे जर आपण रद्दीचा निर्णय सहज घेतो तर मग साहित्यिक पुस्तकांबद्दलच आपण फार भावनिक का असतो ?

गेल्या काही वर्षांत काही पुस्तकवेड्या संग्रहकांबद्दल लेख वाचनात आले. या मंडळींनी घरी प्रचंड पुस्तके साठवली आहेत. त्यांचा संग्रह बघून असा प्रश्न पडतो की त्यांच्या घरात पुस्तके आहेत, की तेच पुस्तकांच्या घरात राहताहेत ! या व्यासंगी लोकांबद्दल मला आदर वाटतो. मी मात्र त्यांच्यासारखे व्हायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले. आपण वाचनातले 'मध्यमवर्गीय' असल्याने आपला संग्रह हा आटोपशीर असलेलाच बरा, हा माझा निर्णय.

खूप मोठा संग्रह जर आयुष्यभर बाळगायचा असेल तर कालानुरूप आता बदलावे लागेल. छापीलच स्वरूपात सर्व साठवायचा हट्ट धरून चालणार नाही. फार जुन्या आणि जीर्ण पुस्तकांची इ फोटो-आवृत्ती करून घेणे हितावह आहे. तसे प्रयत्न काही लोक करीत आहेत हे नक्कीच स्तुत्य आहे.

पुस्तकसंग्रहाबद्दलचे हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही अनुभव जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.

मी देखील अधूनमधून अशी रद्दीत पुस्तकं देते आणि नव्या पुस्तकांसाठी जागा करते.

गेल्या काही वर्षांत 'एकदा वाचण्याजोगी' अशी पुस्तकं ठरवून फुटपाथवरून (किंवा प्रदर्शनांमधल्या सेकन्ड हॅन्ड पुस्तकांच्या विभागातून) स्वस्तात विकत घ्यायला सुरूवात केली आहे.

काहीजण त्यांच्या पुढील पिढीसाठी साठवत असू शकतात ... लहान वयापासून ठरवून मुलांना वाचनाची आवड लावणारे लोकही असतात .. किंवा एकदा वाचून झाल्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी परत तेच पुस्तक आवडीने वाचणारे .. असेही प्रकार वाचकांमध्ये असतात ..

पुस्तक फाडून टाकणे हे पटण्यासारखं नाही .. स्वार्थी किंवा आत्मकेंद्रित वृत्ती वाटते .. मी दमड्या खर्च करून घेतलं आहे कोणाला फुकट का म्हणून देऊ अशी .... जगातील अनेक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात हे खरं आहे , ताजमहाल सारख्या इमारतींची योग्य ती काळजी घेण्याचे नियम योग्य वेळी केले गेले नसते तर तो सांस्कृतिक वारसा आज पडक्या इमारतीच्या रुपात दिसला असता .. आपण वाचलेल्या पुस्तकाने कुणाच्यातरी सांस्कृतिक / कलात्मक अनुभवात एका पैशाची तरी भर पडावी , त्या पुस्तकातून आपल्याला जे काही मिळालं - समजलं ते आणखी कोणालातरीही मिळावं हीच कुठल्याही नॉर्मल वाचकाची इच्छा असते ... संग्रही ठेवण्याची इच्छा असणारी पुस्तकं ढापली जाण्याच्या भयाने नाईलाजास्तव ती देण्यास नकार देणं हे ठीक आहे .. पण नको असणारी पुस्तकं फक्त दुसऱ्याला फुकट मिळू द्यायची नाहीत म्हणून फाडून टाकणं ही कद्रू वृत्ती वाटते ... अर्थात तो काल्पनिक किस्सा आहे , असं करणारे चक्रम लोक खरोखर असतील असं वाटत नाही .

हरपेन, ललिता व राधा,

धन्यवाद!
संग्रहकांचे अनेक प्रकारचे विचार असू शकतात. बरोबर.

*अर्थात तो काल्पनिक किस्सा आहे , असं करणारे चक्रम लोक खरोखर असतील असं वाटत नाही .
>>>> + १

डॉक्टर माझीच स्टोरी लिहिलीत.
माझ्याकडे पण आहे संग्रह. जागेअभावी बॅगेत भरुन सोफ्यात ठेवलीत पुस्तकं. Sad
फाडणं तर शक्यच नाही. रद्दीत द्यावी वाटत नाही. कुणाला वाचायला द्यावी वाटत नाही. खरंतर कुणी मागतच (वाचतच) नाही. Happy
एका माबोकर मैत्रीणीने एक पुस्तक मागवलेलं म्हणुन कुरीयर केलं.
तर ते पुस्तक ना तिला मिळालं ना माझ्याकडे परत आलं. कुरीयर वाले १ महिना गोल्गोल उत्तरं देत राहिले. मग मी नाद सोडला.
पण नंतर पुन्हा ते पुस्तक खरेदी केलं संग्रही असावं म्हणून Lol
आता धुळ खाती पुस्तकं बघवत नाहीत. Sad
आता लेकीचंही वाचन सुरु झालंय. इंग्रजी पुस्तकं जमा होऊ लागलीत घरी.
माझी पुस्तकं गावच्या शाळेच्या लायब्ररीत द्यायचा विचार आहे. एकदा मोह सोडुन हे काम करायला पाहिजे. Happy

वावे, सस्मित,
धन्यवाद !

माझी पुस्तकं गावच्या शाळेच्या लायब्ररीत द्यायचा विचार आहे. एकदा मोह सोडुन हे काम करायला पाहिजे.
>>>>
जरूर करा, शुभेच्छा ! तो अनुभव सुखद येवो ही सदिच्छा.

माझी काही पुस्तके मी एका नवीन मोफत वाचनालयाला दिली. खरंतर ग्रामीण भागात अशी वाचनालयं निघू शकतात. जाणिवपूर्वक घरी ठेवलेली पुस्तके मुलं, नातवंड, पतवंड आदी आवड असल्यास वाचू शकतात.
एकेकाळी मुंबई स्थित हुतात्मा चौकाच्या फुटपाथवर जुनी पुस्तके पाहताना एखादा तास कसा गेला हे कळत नसे. अशा ठिकाणी एखादे दुर्मिळ पुस्तक मिळाल्यावर झालेला आनंद अवर्णनीयच.

आवडले लेखन.
>>>संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती >>>>
नीट विचार केला तर हे पटेल. अक्षर आणि कालातीत वाङ्मय फार थोडे असते.

@ दत्तात्रय साळुंके,
>>>> घरी ठेवलेली पुस्तके मुलं, नातवंड, पतवंड आदी आवड असल्यास वाचू शकतात>>>
नातवंडाचे वेळेसच पुस्तकाची अवस्था जीर्ण झालेली असते. पतवंडाचे वेळेपर्यंत किती दयनीय होईल !

चांगला लेख.
संग्रह आटोपशीर ठेवणे हे बेस्ट.
माझ्याकडच्या पुस्तकांची मी फेबुवरच्या वाचन ग्रूप्स मध्ये लिस्ट दिली आणि ज्यांना हवी आहेत त्यांनी ती स्वतः माझ्याकडून येऊन घेऊन जावीत असे लिहिले. त्यप्रमाणे काही व्यक्तींनी त्यांच्या गावांमधील शाळा-लायब्ररींसाठी पुस्तके नेली.
हे सुचण्याआधी स्थानिक लायब्ररीला विचारले की पुस्तके हवीत का, पण त्यांच्याकडून हो/नाही/विचार करतो वगैरे काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. शहरातल्या लायब्ररींकडे बहुतेक पुस्तके असल्याने त्यांना गरज नसावी.

छापील पुस्तकांच्या बाबतीत कपाटाचा एक आख्खा कप्पा भरल्यावरच पुस्तकं बहिणीला / इतरांना दिलीत.
माझ्यामते इ-बुक्स हा उत्तम पर्याय आहे (जिथे शक्य आहे तिथे वापरल्या जातोच). एकदाच वाचल्या जाणार्‍या आणि संग्रही असाव्या अश्या पुस्तकांकरता तर नक्कीच. क्लाउड स्टोरेज मुळे अजूनच सोपं झालंय हे. इ-बुक्स ची तुलनेनी किंमतही कमी असते.
(बाकी फेबु आणि इतर सोशल मिडिया करता बराच स्क्रीन टाईम घेतोच सगळेजण तर त्यावर पुस्तक वाचणे वगैरे त्रास होतो हा मुद्दा माझ्यामते तरी गौण. आणि अगदी कागदी पुस्तक वाचल्याचा अनुभव देणारे किंडल ही आहेत आता आवाक्याच्या किंमतीत)

ऑडिओबुक्स हा अजून एक अधुनिक अवतार. आपल्या आवडत्या पुस्तकांच नॅरेशन ऐकताना फार मस्त वाटतं.

मराठी ऑदिओबुक्स आणि इबुक्स चं मार्केट तुलनेनं मर्यादित आहे Uhoh

साद, वर्षा, योकु :
धन्यवाद व सहमती.

* मराठी ऑदिओबुक्स आणि इबुक्स चं मार्केट तुलनेनं मर्यादित >>> + ११

बाकी फेबु आणि इतर सोशल मिडिया करता बराच स्क्रीन टाईम घेतोच सगळेजण तर त्यावर पुस्तक वाचणे वगैरे त्रास होतो हा मुद्दा माझ्यामते तरी गौण

>>> हा मुद्दा एकदम पटला.

डॉक, लिंक साठी धन्यवाद.

कॉलेजात असताना मी ऑक्सफर्ड डिक्शनरी, व्याकरणाचे पुस्तक आणि त्या वयात आवडणारी 'खास' पुस्तके असं बरंच काही रस्त्यावरून विकत घेतलंय.
त्या आठवणी जाग्या झाल्या.
पु ले शु

अनुभवकथन आवडले.. आम्ही पुस्तके वाचनालयात जमा केली आहेत.
जी सहज उपलब्ध होण्यासारखी आहेत ती सरळ रद्दी त दिली..
Engineering ला असताना अत्यंत महत्वाची म्हणूज खरेदी केलेली जड जड rrference books अजून आहेत, काहींच्या तर दोन copies आहेत .. नवरा पण same branch चा असल्यामुळे.. आजकाल हे सगळं ज्ञान online tutorials मष्ये सहज उपलब्ध होत असल्यामुळे juiniors आणि आताची जनता ही पुस्तके वाचायला तयार नाही आणि माझा जीव त्यात अडकलाय आणि घरातली जागाही!
काय करावे समजत नाही

* साद,

त्या वयात आवडणारी 'खास' पुस्तके असं बरंच काही>>>
सही ! तसल्या पुस्तकांचे वसतिगृहात झालेले सामुदायिक वाचन आठवले.
....
* किल्ली,
धन्यवाद.

माझा जीव त्यात अडकलाय आणि घरातली जागाही!>>>

लवकर रद्दी चा विचार करा !
माझ्या वैद्यकीय अभ्यासातले मी आतापर्यंत ठेवलेले एकमेव पुस्तक होते ते वैद्यक शब्दकोश. आता तो बाळगणे येडेपणाचे असल्याने ते आताच रद्दीत दिले.

आम्ही आमची पुस्तकं सासऱ्यांनी एक free library किंवा नाममात्र शुल्क (नक्की माहीत नाही) तिथे donate करतो. मुलाचं पूर्ण Geronimo collection पण दिलंय. आमच्या कडे एक बुकशेल्फ आहे . त्यात मावतील तितकी पुस्तकं घरात बाकी वाचनालयात.
पूर्वी इंग्लिश पुस्तकं कोणी घ्यायचं नाही आता इंग्लिश पण घेतात लोकं. सासरे नेहमी शोधात असतात कोणी पुस्तकं देतंय का.

त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात.>>>>> याचमुळे पुस्तक विकत घेणे सोडले.आता असलेली पुस्तके काही वर्षांनी वाचनालयाला दिली पाहिजेत.अजून सोडवत नाहीत.

म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते !>>> अशाप्रकारे चितमपल्लींचे एका मान्यवर समीक्षकाला दिलेले ,पक्षी जाय दिगंतरा हे पुस्तक माझ्याकडे आले.
वि.ल भावे यांचे महाराष्ट्र भागवत हे पुस्तक त्यावेळी पैसे नेले नसल्याने हुकले.

एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, >>>> असा किस्सा शम्मी कपूरच्या बाबत वाचला आहे. आयन रँडच्या पुस्तकाची पाने वाचली की फाडायचा असा काहीसा किस्सा होता.

वरील सर्वांचे आभार.

* देवकी,

असा किस्सा शम्मी कपूरच्या बाबत वाचला आहे. आयन रँडच्या पुस्तकाची पाने वाचली की फाडायचा
>>>
म्हणजे तेंडुलकरांनी रचलेला प्रसंग निव्वळ काल्पनिक नाही तर !

माझीही अगदी हिच समस्या होती. पुस्तकांचा मोह सुटत नव्हता. जवळ जवळ २० वर्षांची पुस्तके साठली होती. गावाकडे मित्राचीही हिच तक्रार ऐकल्यावर आम्ही गावी एक जागा पाहीली. एका मुलाला संध्याकाळी दोन तास बसायला तयार केले व स्वामी विवेकानंदांच्या नावाने ग्रंथालय सुरु केले. दोन वर्ष झाली असतील. उत्तम सुरु आहे. मुले आवर्जून वाचतात पुस्तके. सध्या कोणतेही पुस्तक विकत घेत नाही. पुस्तके देताना गाथा, ज्ञानेश्वरी व इतिहासाचे काही संदर्भग्रंथ बाजूला काढले आहेत. सध्या तेवढे वाचायला पुरते. कथा कादंबऱ्यांमधे तसाही आता जीव रमत नाही.

डॉक, हा धागा जरी पुस्तकांबद्दल असला तरी तुमच्या परवानगीने दिवाळी अंकाबद्दल थोडे लिहितो.

दरवर्षी नोव्हेंबर अखेर पासूनच हे अंक रद्दी च्या दुकानात दिसू लागतात. २००-२५० रु किंमत न परवडणारा बराच वाचनप्रेमी वर्ग असतो. तो डिसेंम्बर ते जून या काळात अशा रद्दी वाचनालयला नियमित भेट देतो. अंक २० रु ला घ्यायचा आणि वाचून परतीच्या वेळेस १० रु परत मिळतात.
मी पण अधूनमधून इथे डोकावतो.

काही दुय्यम दर्जाचे आणि जाहिरातींनी खच्चून भरलेले अंक इथूनच घेणे ठीक वाटते.

वरील सर्वांचे आभार !

या चर्चेतून लक्षात आले आहे की आपल्यातले बरेच जण संतुलित संग्राहक आहेत. त्या सर्वांना एक विनंती:
तुमच्याकडची कोणती पुस्तके (कमाल ५ ) तुम्हाला आयुष्यभर बाळगावी वाटतील ती लिहिणार का ?
अर्थात हे आजच्या विचारानुसार असेल.

चांगला लेख. माझ्याकडची मुलांची पुस्तके (हॅरी पॉटर टाइप सोडून) इतर मित्रांच्या मुलांना दिली. काही जुने दिवाळी अंक अजून माझ्याकडे आहेत. काही पुस्तकं बाबांनी परत नेली. काही मराठी छोट्या मुलांची पुस्तकं इथल्या मराठी शाळेला दिली. तिथे ते आनंदाने घेतात. काही मला द्यायची आहेत पण एक दोन नातेवाईक मंडळी माहित आहेत ज्यांना दिली तर चालेल. अजून काहीही रद्दीत दिलं नाही.
कोणती पुस्तके ठेवायला आवडतील तर माझ्याकडे व्यं.माडगुळकरांची जी पुस्तकं आहेत ती मला कधीही उघडून वाचायला आवडतात. ती मी नेहमी ठेवेन. आता आधी आवडलेली पुस्तकं शक्य्तो किंडलवर घेतली जातात त्यामुळे त्यांचं काय करावं हा प्रश्न पडत नाही. मी पुर्वी जी पुस्तकं घेतली ती नेहमी आई-बाबांना घेऊन दिली त्यामुळे अजून त्याचा विचार केला नाही.

>>तुमच्याकडची कोणती पुस्तके (कमाल ५ ) तुम्हाला आयुष्यभर बाळगावी वाटतील ती लिहिणार का ?

अनिल अवचटांची पुस्तके! एकेक पुस्तक प्रेरणादायी आहे. खास करुन स्वतःविषयी, आप्त, कार्यरत, मुक्तांगणचे दिवस, छंदांविषयी.

माझी यादी अशी:

१. मृत्युंजय - शिवाजी सावंत
२. काजळमाया - जी ए
३. युगांत - इरावती कर्वे
४. व्यक्ती आणि वल्ली - पु लं
५. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी - ह मो मराठे

वरील सर्वांची यादी उत्तम, धन्यवाद.

माझी यादी :
१. एक शून्य मी - पुलं ( यातील ५ लेखांसाठी)

२. लक्ष्मणझुला - लक्ष्मण लोंढे

३. बनगरवाडी - व्यं मा ( या आवृत्तीत कादंबरी व त्यांनी स्वतः काढलेली चित्रे पण आहेत)

४. एका कोळीयाने - पुलं ( यातून हेमिंगवे व पुलं अशा दोघांची आठवण म्हणून)

५. कोसला - नेमाडे ( यातील पांडुरंग व सुरेश यांच्या भंकस संभाषणापुरतेच).

नुकताच डॉ. राधाकृष्णन (आपले माजी राष्ट्रपती) यांच्याबद्दलचा एक किस्सा वाचला. ते विद्यार्थीदशेत असताना एका वळणावर त्यांना गणित का तत्वज्ञान यांपैकी एकाची निवड करायची होती. पण घरची खूप गरिबी. त्यामुळे ते चिंतेत होते. त्यांचा हा प्रश्न एकाच्या पुस्तकदानाने सुटला !

त्यांचा तो नातलग तत्वज्ञानात पदवीधर झाला होता आणि आता त्याला त्याची पुस्तके बाळगायची गरज वाटली नाही. मग त्याने ती सर्व राधाकृष्णनना फुकट देऊन टाकली. या देणगीमुळेच त्यांची शिक्षणाची दिशा ठरली. अर्थातच पुढे ते जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ झाले.

Pages