वाचून झाल्यानंतर …

Submitted by कुमार१ on 11 November, 2019 - 23:45

नुकताच इथे एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकाचे काय करावे? अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली.

साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात. या लेखात फक्त पुस्तकांचा विचार करू.
छापील पुस्तके वाचणारे वाचक ते खालील प्रकारे मिळवू शकतात:
१. नवीन विकत घेणे
२. वाचनालयातून
३. रद्दीच्या दुकानातून
४. दुसऱ्याचे उधार घेणे !

वरीलपैकी पहिल्या ३ प्रकारातली निवड मुख्यतः एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केली जाते. तर चौथा प्रकार हा पूर्णपणे मनोवृत्तीशी निगडित आहे. काही चोखंदळ वाचक पाहिले तीनही पर्याय पुस्तकानुसार निवडणारे असू शकतात.
वरच्या पर्याय २ किंवा ४ ची जे निवड करतात त्यांना त्या पुस्तकाच्या साठवणीचा प्रश्न नसतो; वाचून झाले की ते परतच करायचे असते.

आता नवीन पुस्तक विकत घेणाऱ्यांबद्दल बघू. हे खरे पुस्तक शौकीन असतात. पूर्ण विचारांती ते पुस्तक विकत घेतात. त्याचे मनसोक्त वाचन करतात. पुढे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. मग या नव्याचे नवेपण ओसरते आणि ते पुस्तक घरच्या कपाटात जाते.

वाचनाची आवड म्हणून नियमित पुस्तके घेतली जातात. स्वतःचा संग्रह वाढत जातो. त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात. जसे की त्यांत धूळ साठणे, वाळवी लागणे. एखाद्या सदनिकेत किती पुस्तके साठवावीत याला अखेर मर्यादा येते. दर्शनी भागात राहतील आणि मनात आले की पुस्तक पटकन काढता येईल असे भाग्य मोजक्या पुस्तकांना लाभते. बाकीची मग बॅगेत बंद होतात तर इतर काही माळा, पलंगाखालचा कप्पा अशा ठिकाणी बंदिस्त होतात. या पुस्तक संग्राहकांचा एक बाणा असतो, " मी ते पुस्तक विकत घेतलंय ना, मग रद्दीत अजिबात देणार नाही". उगाचच कुणाला भेट देण्यात अर्थ नसतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची घेणाऱ्याला सहसा किंमत नसते. त्यामुळे हा घरचा साठा वाढतच राहतो. कालांतराने असे होते की या साठ्यातील कित्येक पुस्तकांना १० वर्षांत हात सुद्धा लावला जात नाही.

आता माझा याबाबतीतला अनुभव लिहितो. जोपर्यंत स्वतः कमवत नव्हतो,तोपर्यंत वाचनाची आवड ही वाचनालायवर भागवावी लागली. जेव्हा कमावता झालो तसे हळूहळू पुस्तक खरेदी सुरू झाली. सुरवातीच्या आर्थिक परिस्थितीत ती मर्यादित होती. तेव्हा २-३ मित्रांमध्ये मिळून एकमेकांची पुस्तके फिरवली जात. त्यामुळे वैयक्तिक साठा कमी होता. पुस्तकाची निगा चांगली राखली जाई. तेव्हा विकत घेतलेले पुस्तक घरी आयुष्यभर ठेवायचे आहे हाच विचार होता. जणूकाही ती एक संपत्तीच होती. हळूहळू चढत्या कमाईनुसार पुस्तक खरेदी वाढू लागली. जसा घरचा साठा वाढू लागला तसा पुस्तके जपण्यात हयगय होऊ लागली. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागली. एखादे जुने पुस्तक पुन्हा काढून वाचणेही कमी झाले. तसेच संग्रहात नक्की कुठली पुस्तके आहेत याचेही विस्मरण होऊ लागले.

दरम्यान काही वर्षे परदेशात वास्तव्य झाले. तेव्हा दर सहा महिन्यांनी भारतभेट होई. परदेशात मराठी साहित्य मिळणार नव्हते. तेव्हा ऑनलाइन मागवणे हाही प्रकार सुरू झाला नव्हता. मग दर भेटीत इथल्या पुस्तकप्रदर्शनात जाई आणि अधाशासारखी पुस्तके विकत घेई. परतीच्या प्रवासात बरोबर पुस्तकांची एक वेगळी बॅग असे. या खरेदीत एक प्रकार झाला. प्रदर्शनात जी उपलब्ध असंत त्यातलीच घाईने उचलली गेली. त्यामुळे ती सर्वच कायम संग्रही ठेवावी अशी नव्हती. जेव्हा परदेशातील मुक्काम संपला तेव्हा ती सर्व घेऊन भारतात परतलो. आता मात्र साठा काहीसा आवाक्याबाहेर गेला होता.

मग शांतपणे विचार केला. संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती. अजून एक जाणवले. आपल्या वयाच्या प्रत्येक दशकानंतर आपली वाचनाची अभिरुची बदलत राहते. कॉलेजच्या वयात भयंकर आवडलेले एखादे पुस्तक २० वर्षांनी हातात सुद्धा घेवत नाही. आता माझ्याकडची जेमतेम १० पुस्तके अशी वाटली की जी कायम जवळ बाळगावीत. मग उरलेल्यांचे काय करावे ? प्रथम रद्दीचा विचार देखील नकोसा वाटला. मग जवळच्या वाचनालयात गेलो. त्याचे सभासदत्व घेतलेच होते. तिथे काही दिवस निरीक्षण केले. माझ्याकडे असलेली आणि तिथे नसलेली अशी फारच थोडी पुस्तके होती. मग हळूच तिथल्या ग्रंथपालांना विचारले की अशी काही पुस्तके त्यांना भेट देऊ का ? त्यांचा प्रतिसाद तसा थंड होता. 'बघू, ठरवू', या प्रकारचा. मग मी तो नाद सोडला. मग काही वाचनप्रेमी मित्रांना घरी बोलावले आणि माझा संग्रह दाखविला. त्यांनी न वाचलेली अशी मोजकी ३-४ पुस्तके निघाली. ते ती नेण्यास उत्सुक होते. मग ती मला बिलकूल परत न करण्याचा अटीवर त्यांना देऊन टाकली ! अर्थात उरलेला साठा अजूनही बराच होता. एका लहान गावातील वाचनालयाचे वृत्तपत्रात निवेदन आले होते. त्यांना वाचून झालेली पुस्तके भेट चालणार होती. त्यासाठी पोस्टाच्या रांगेत उभे राहायची माझी तयारी नव्हती. म्हणून एक कुरियर गाठले. लहान गावी पाठवाल का म्हणून विचारले. ते प्रयत्न करतो म्हणाले. मग मी ५ पुस्तके त्यांना दिली. मात्र ती इच्छित ठिकाणी काही पोचली नाहीत. मी पण त्यांचेकडे पोच मागण्याचा नाद सोडला. ज्या कोणाच्या हाती पडतील त्याला जर वाटले तर तो ती वाचेल, असा विचार करून विषय सोडून दिला.

या दरम्यान दोन साहित्यिकांचे या संदर्भात लेख वाचण्यात आले. एक होता विजय तेंडुलकरांचा. त्या लेखातील प्रसंगातला एक माणूस विचित्र आहे. तो मुंबईच्या बसने प्रवास करतो आहे आणि एकीकडे पुस्तक वाचतो आहे. एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, त्याचा बोळा करतो आणि खिडकीतून तो चक्क फेकून देतो ! या प्रकाराने चकित होऊन लेखक त्याला याचे स्पष्टीकरण विचारतो. तो सांगतो की त्याचे बरेच ओळखीचे लोक फुकटे वाचक आहेत. ते त्याच्याकडचे एखादे पुस्तक निःसंकोचपणे मागतात आणि नंतर परत करायचे विसरून जातात. अशा प्रकारे त्याची बरीच पुस्तके गायब झाली होती. त्यानंतर तो सध्याच्या निष्कर्षावर आला होता. वाचून झाले की फाडुनच टाकायचे, म्हणजे घरी संग्रह नको आणि कुणी फुकट मागायला पण नको ! पुढे जाऊन तो लेखकाला बजावतो, " मुला, अरे जगातील कित्येक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात, तिथे एका पुस्तकाचे काय घेऊन बसलास?"
तें नी रचलेला हा प्रसंग नक्कीच बाळबोध नाही. त्याच्या गाभ्यातील अर्थ काढायचे त्यांनी आपल्यावर सोडून दिले आहे. माझ्यापुरता मी असा अर्थ काढला. पुस्तक एकदा वाचून झाले की बास, त्याचे जतन करायची खरंच गरज असते? हा मुद्दा वादग्रस्त आहे हे कबूल. पण माझ्या बदलत्या विचार आणि परिस्थितीत मी माझ्यापुरता हा अर्थ काढला. त्यामुळे, एखादे वाचलेले पुस्तक जर कायम ठेवावेसे वाटत नसेल तर रद्दीत विकायला काय हरकत आहे, अशी ठिणगी मनात पडली.

दुसरा लेख वाचला तो रवींद्र पिंगेंचा. त्यात सुरवातीस साहित्यिकांचे अहंकार वगैरेचे चर्वितचर्वण होते. पुढे लेखाला एकदम कलाटणी दिली होती. त्यांनी असे म्हटले होते. ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक, या सर्वांत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, या सर्वांची पुस्तके कधीनाकधी पदपथावर विक्रीस येतात. म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते . तिथे या सर्वांचीच पुस्तके अगदी मांडीला मांडी लावून शेजारी बसतात ! ( इथे मला ' Death is the greatest equaliser' या वचनाची आठवण झाली).
या लेखातील मिश्किलपणा भावला पण त्याचबरोबर विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. लहानपणापासून मी पदपथावरचे पुस्तक विक्रेते पाहत आलो आहे. तिथून कधी एखादे पुस्तकही विकत घेतले आहे. किंबहुना काही दुर्मिळ पुस्तकांसाठी असे पदपथ धुंडाळणारे शौकीन असतात. तर मुळात एखादे पुस्तक पदपथावर येतेच कसे? अर्थातच कुणीतरी आपल्या संग्रहातील पुस्तक रद्दीत विकल्यामुळेच ! अशा जुन्या पुस्तकांची विक्री करून कुणीतरी आपला चरितार्थ करत आहेच ना. तेव्हा आपल्याकडील पुस्तक रद्दीत विकताना फार अपराधी का वाटावे? शेवटी त्या मार्गे ते कुठल्यातरी वाचकांपर्यंतच पोचते.

अशी वैचारिक घुसळण झाल्यानंतर आता मी माझ्याकडची काही पुस्तके नियमितपणे रद्दीत देऊ लागलो. असे करताना त्या पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही. आता कपाटातील जागा रिकामी होऊन तिथे नव्याने घेतलेल्या पुस्तकासाठी जागा उपलब्ध होते. या प्रकारची पुस्तकी-उलाढाल आनंददायी आहे. पुस्तके रद्दीत देण्याचा निर्णय पटकन घेता येतो आणि ते दुकान घराजवळ असल्याने अंमलबजावणीही झटकन होते. याउलट पुस्तके दान करण्याचा निर्णय खूप वेळकाढू ठरतो. त्यासाठी योग्य व्यक्ती/संस्था शोधा, त्यांचे कार्यालयीन सोपस्कार हे सर्व आपल्याला बघावे लागते.

अजून एक मुद्दा. आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. त्या पुस्तकांवर तर आपले आयुष्यभराचे पोटपाणी अवलंबून आहे. तिथे जर आपण रद्दीचा निर्णय सहज घेतो तर मग साहित्यिक पुस्तकांबद्दलच आपण फार भावनिक का असतो ?

गेल्या काही वर्षांत काही पुस्तकवेड्या संग्रहकांबद्दल लेख वाचनात आले. या मंडळींनी घरी प्रचंड पुस्तके साठवली आहेत. त्यांचा संग्रह बघून असा प्रश्न पडतो की त्यांच्या घरात पुस्तके आहेत, की तेच पुस्तकांच्या घरात राहताहेत ! या व्यासंगी लोकांबद्दल मला आदर वाटतो. मी मात्र त्यांच्यासारखे व्हायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले. आपण वाचनातले 'मध्यमवर्गीय' असल्याने आपला संग्रह हा आटोपशीर असलेलाच बरा, हा माझा निर्णय.

खूप मोठा संग्रह जर आयुष्यभर बाळगायचा असेल तर कालानुरूप आता बदलावे लागेल. छापीलच स्वरूपात सर्व साठवायचा हट्ट धरून चालणार नाही. फार जुन्या आणि जीर्ण पुस्तकांची इ फोटो-आवृत्ती करून घेणे हितावह आहे. तसे प्रयत्न काही लोक करीत आहेत हे नक्कीच स्तुत्य आहे.

पुस्तकसंग्रहाबद्दलचे हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही अनुभव जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
शेवटी यूपीआयचा नाद सोडून नेट बँकिंग केले आणि जमले.
आता पुस्तकाची वाट बघतो !

महत्वाचा विषय आणि अनुभवप्रक्रिया . असाच प्रवास होतो आपला आणि आपल्या पुस्तकांचा. पण काही पुस्तकं काढल्याची नंतर चुटपूट लागून राहाते.. आउट ऑफ प्रिंट असतात बरीच चांगली पुस्तकं. कालाय तस्मै नमः , दुसरं काय?

Pages