वाचून झाल्यानंतर …

Submitted by कुमार१ on 11 November, 2019 - 23:45

नुकताच इथे एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकाचे काय करावे? अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली.

साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात. या लेखात फक्त पुस्तकांचा विचार करू.
छापील पुस्तके वाचणारे वाचक ते खालील प्रकारे मिळवू शकतात:
१. नवीन विकत घेणे
२. वाचनालयातून
३. रद्दीच्या दुकानातून
४. दुसऱ्याचे उधार घेणे !

वरीलपैकी पहिल्या ३ प्रकारातली निवड मुख्यतः एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केली जाते. तर चौथा प्रकार हा पूर्णपणे मनोवृत्तीशी निगडित आहे. काही चोखंदळ वाचक पाहिले तीनही पर्याय पुस्तकानुसार निवडणारे असू शकतात.
वरच्या पर्याय २ किंवा ४ ची जे निवड करतात त्यांना त्या पुस्तकाच्या साठवणीचा प्रश्न नसतो; वाचून झाले की ते परतच करायचे असते.

आता नवीन पुस्तक विकत घेणाऱ्यांबद्दल बघू. हे खरे पुस्तक शौकीन असतात. पूर्ण विचारांती ते पुस्तक विकत घेतात. त्याचे मनसोक्त वाचन करतात. पुढे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. मग या नव्याचे नवेपण ओसरते आणि ते पुस्तक घरच्या कपाटात जाते.

वाचनाची आवड म्हणून नियमित पुस्तके घेतली जातात. स्वतःचा संग्रह वाढत जातो. त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात. जसे की त्यांत धूळ साठणे, वाळवी लागणे. एखाद्या सदनिकेत किती पुस्तके साठवावीत याला अखेर मर्यादा येते. दर्शनी भागात राहतील आणि मनात आले की पुस्तक पटकन काढता येईल असे भाग्य मोजक्या पुस्तकांना लाभते. बाकीची मग बॅगेत बंद होतात तर इतर काही माळा, पलंगाखालचा कप्पा अशा ठिकाणी बंदिस्त होतात. या पुस्तक संग्राहकांचा एक बाणा असतो, " मी ते पुस्तक विकत घेतलंय ना, मग रद्दीत अजिबात देणार नाही". उगाचच कुणाला भेट देण्यात अर्थ नसतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची घेणाऱ्याला सहसा किंमत नसते. त्यामुळे हा घरचा साठा वाढतच राहतो. कालांतराने असे होते की या साठ्यातील कित्येक पुस्तकांना १० वर्षांत हात सुद्धा लावला जात नाही.

आता माझा याबाबतीतला अनुभव लिहितो. जोपर्यंत स्वतः कमवत नव्हतो,तोपर्यंत वाचनाची आवड ही वाचनालायवर भागवावी लागली. जेव्हा कमावता झालो तसे हळूहळू पुस्तक खरेदी सुरू झाली. सुरवातीच्या आर्थिक परिस्थितीत ती मर्यादित होती. तेव्हा २-३ मित्रांमध्ये मिळून एकमेकांची पुस्तके फिरवली जात. त्यामुळे वैयक्तिक साठा कमी होता. पुस्तकाची निगा चांगली राखली जाई. तेव्हा विकत घेतलेले पुस्तक घरी आयुष्यभर ठेवायचे आहे हाच विचार होता. जणूकाही ती एक संपत्तीच होती. हळूहळू चढत्या कमाईनुसार पुस्तक खरेदी वाढू लागली. जसा घरचा साठा वाढू लागला तसा पुस्तके जपण्यात हयगय होऊ लागली. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागली. एखादे जुने पुस्तक पुन्हा काढून वाचणेही कमी झाले. तसेच संग्रहात नक्की कुठली पुस्तके आहेत याचेही विस्मरण होऊ लागले.

दरम्यान काही वर्षे परदेशात वास्तव्य झाले. तेव्हा दर सहा महिन्यांनी भारतभेट होई. परदेशात मराठी साहित्य मिळणार नव्हते. तेव्हा ऑनलाइन मागवणे हाही प्रकार सुरू झाला नव्हता. मग दर भेटीत इथल्या पुस्तकप्रदर्शनात जाई आणि अधाशासारखी पुस्तके विकत घेई. परतीच्या प्रवासात बरोबर पुस्तकांची एक वेगळी बॅग असे. या खरेदीत एक प्रकार झाला. प्रदर्शनात जी उपलब्ध असंत त्यातलीच घाईने उचलली गेली. त्यामुळे ती सर्वच कायम संग्रही ठेवावी अशी नव्हती. जेव्हा परदेशातील मुक्काम संपला तेव्हा ती सर्व घेऊन भारतात परतलो. आता मात्र साठा काहीसा आवाक्याबाहेर गेला होता.

मग शांतपणे विचार केला. संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती. अजून एक जाणवले. आपल्या वयाच्या प्रत्येक दशकानंतर आपली वाचनाची अभिरुची बदलत राहते. कॉलेजच्या वयात भयंकर आवडलेले एखादे पुस्तक २० वर्षांनी हातात सुद्धा घेवत नाही. आता माझ्याकडची जेमतेम १० पुस्तके अशी वाटली की जी कायम जवळ बाळगावीत. मग उरलेल्यांचे काय करावे ? प्रथम रद्दीचा विचार देखील नकोसा वाटला. मग जवळच्या वाचनालयात गेलो. त्याचे सभासदत्व घेतलेच होते. तिथे काही दिवस निरीक्षण केले. माझ्याकडे असलेली आणि तिथे नसलेली अशी फारच थोडी पुस्तके होती. मग हळूच तिथल्या ग्रंथपालांना विचारले की अशी काही पुस्तके त्यांना भेट देऊ का ? त्यांचा प्रतिसाद तसा थंड होता. 'बघू, ठरवू', या प्रकारचा. मग मी तो नाद सोडला. मग काही वाचनप्रेमी मित्रांना घरी बोलावले आणि माझा संग्रह दाखविला. त्यांनी न वाचलेली अशी मोजकी ३-४ पुस्तके निघाली. ते ती नेण्यास उत्सुक होते. मग ती मला बिलकूल परत न करण्याचा अटीवर त्यांना देऊन टाकली ! अर्थात उरलेला साठा अजूनही बराच होता. एका लहान गावातील वाचनालयाचे वृत्तपत्रात निवेदन आले होते. त्यांना वाचून झालेली पुस्तके भेट चालणार होती. त्यासाठी पोस्टाच्या रांगेत उभे राहायची माझी तयारी नव्हती. म्हणून एक कुरियर गाठले. लहान गावी पाठवाल का म्हणून विचारले. ते प्रयत्न करतो म्हणाले. मग मी ५ पुस्तके त्यांना दिली. मात्र ती इच्छित ठिकाणी काही पोचली नाहीत. मी पण त्यांचेकडे पोच मागण्याचा नाद सोडला. ज्या कोणाच्या हाती पडतील त्याला जर वाटले तर तो ती वाचेल, असा विचार करून विषय सोडून दिला.

या दरम्यान दोन साहित्यिकांचे या संदर्भात लेख वाचण्यात आले. एक होता विजय तेंडुलकरांचा. त्या लेखातील प्रसंगातला एक माणूस विचित्र आहे. तो मुंबईच्या बसने प्रवास करतो आहे आणि एकीकडे पुस्तक वाचतो आहे. एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, त्याचा बोळा करतो आणि खिडकीतून तो चक्क फेकून देतो ! या प्रकाराने चकित होऊन लेखक त्याला याचे स्पष्टीकरण विचारतो. तो सांगतो की त्याचे बरेच ओळखीचे लोक फुकटे वाचक आहेत. ते त्याच्याकडचे एखादे पुस्तक निःसंकोचपणे मागतात आणि नंतर परत करायचे विसरून जातात. अशा प्रकारे त्याची बरीच पुस्तके गायब झाली होती. त्यानंतर तो सध्याच्या निष्कर्षावर आला होता. वाचून झाले की फाडुनच टाकायचे, म्हणजे घरी संग्रह नको आणि कुणी फुकट मागायला पण नको ! पुढे जाऊन तो लेखकाला बजावतो, " मुला, अरे जगातील कित्येक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात, तिथे एका पुस्तकाचे काय घेऊन बसलास?"
तें नी रचलेला हा प्रसंग नक्कीच बाळबोध नाही. त्याच्या गाभ्यातील अर्थ काढायचे त्यांनी आपल्यावर सोडून दिले आहे. माझ्यापुरता मी असा अर्थ काढला. पुस्तक एकदा वाचून झाले की बास, त्याचे जतन करायची खरंच गरज असते? हा मुद्दा वादग्रस्त आहे हे कबूल. पण माझ्या बदलत्या विचार आणि परिस्थितीत मी माझ्यापुरता हा अर्थ काढला. त्यामुळे, एखादे वाचलेले पुस्तक जर कायम ठेवावेसे वाटत नसेल तर रद्दीत विकायला काय हरकत आहे, अशी ठिणगी मनात पडली.

दुसरा लेख वाचला तो रवींद्र पिंगेंचा. त्यात सुरवातीस साहित्यिकांचे अहंकार वगैरेचे चर्वितचर्वण होते. पुढे लेखाला एकदम कलाटणी दिली होती. त्यांनी असे म्हटले होते. ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक, या सर्वांत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, या सर्वांची पुस्तके कधीनाकधी पदपथावर विक्रीस येतात. म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते . तिथे या सर्वांचीच पुस्तके अगदी मांडीला मांडी लावून शेजारी बसतात ! ( इथे मला ' Death is the greatest equaliser' या वचनाची आठवण झाली).
या लेखातील मिश्किलपणा भावला पण त्याचबरोबर विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. लहानपणापासून मी पदपथावरचे पुस्तक विक्रेते पाहत आलो आहे. तिथून कधी एखादे पुस्तकही विकत घेतले आहे. किंबहुना काही दुर्मिळ पुस्तकांसाठी असे पदपथ धुंडाळणारे शौकीन असतात. तर मुळात एखादे पुस्तक पदपथावर येतेच कसे? अर्थातच कुणीतरी आपल्या संग्रहातील पुस्तक रद्दीत विकल्यामुळेच ! अशा जुन्या पुस्तकांची विक्री करून कुणीतरी आपला चरितार्थ करत आहेच ना. तेव्हा आपल्याकडील पुस्तक रद्दीत विकताना फार अपराधी का वाटावे? शेवटी त्या मार्गे ते कुठल्यातरी वाचकांपर्यंतच पोचते.

अशी वैचारिक घुसळण झाल्यानंतर आता मी माझ्याकडची काही पुस्तके नियमितपणे रद्दीत देऊ लागलो. असे करताना त्या पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही. आता कपाटातील जागा रिकामी होऊन तिथे नव्याने घेतलेल्या पुस्तकासाठी जागा उपलब्ध होते. या प्रकारची पुस्तकी-उलाढाल आनंददायी आहे. पुस्तके रद्दीत देण्याचा निर्णय पटकन घेता येतो आणि ते दुकान घराजवळ असल्याने अंमलबजावणीही झटकन होते. याउलट पुस्तके दान करण्याचा निर्णय खूप वेळकाढू ठरतो. त्यासाठी योग्य व्यक्ती/संस्था शोधा, त्यांचे कार्यालयीन सोपस्कार हे सर्व आपल्याला बघावे लागते.

अजून एक मुद्दा. आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. त्या पुस्तकांवर तर आपले आयुष्यभराचे पोटपाणी अवलंबून आहे. तिथे जर आपण रद्दीचा निर्णय सहज घेतो तर मग साहित्यिक पुस्तकांबद्दलच आपण फार भावनिक का असतो ?

गेल्या काही वर्षांत काही पुस्तकवेड्या संग्रहकांबद्दल लेख वाचनात आले. या मंडळींनी घरी प्रचंड पुस्तके साठवली आहेत. त्यांचा संग्रह बघून असा प्रश्न पडतो की त्यांच्या घरात पुस्तके आहेत, की तेच पुस्तकांच्या घरात राहताहेत ! या व्यासंगी लोकांबद्दल मला आदर वाटतो. मी मात्र त्यांच्यासारखे व्हायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले. आपण वाचनातले 'मध्यमवर्गीय' असल्याने आपला संग्रह हा आटोपशीर असलेलाच बरा, हा माझा निर्णय.

खूप मोठा संग्रह जर आयुष्यभर बाळगायचा असेल तर कालानुरूप आता बदलावे लागेल. छापीलच स्वरूपात सर्व साठवायचा हट्ट धरून चालणार नाही. फार जुन्या आणि जीर्ण पुस्तकांची इ फोटो-आवृत्ती करून घेणे हितावह आहे. तसे प्रयत्न काही लोक करीत आहेत हे नक्कीच स्तुत्य आहे.

पुस्तकसंग्रहाबद्दलचे हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही अनुभव जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच्यावरून आठवलं.
सगळ्यांनी लग्न जरूर करा. जर चांगली बायको मिळाली, तर तुम्ही सुखी व्हाल. जर वाईट मिळाली, तर तुम्ही तत्वज्ञ व्हाल.
“By all means, marry. If you get a good wife, you’ll become happy; if you get a bad one, you’ll become a philosopher.”

आजकाल वाचनाची आवड कमी झालेली असून युवकवर्ग , निवृत्त वर्ग आंतरजालावर जास्ती रमलेला आहे असे वाटते

सहमत.
तरीही जातिवंत वाचकांना अजूनही छापील पुस्तके आकर्षित करतात.
तसेच सध्याच्या निवृत्तांपैकी बरेच जण पूर्वी छापीलचे वाचक होते आणि त्यांचा ग्रंथसंग्रह बऱ्यापैकी असतो.

मराठीतील इ-पुस्तके वाढतील तसे हा प्रश्न सुटेल.

अजुनतरी आवडलेली निवडक पुस्तक जमवायला सुरवात केलेली नाही.. पण संग्रह करायचा मानस आहे. Happy

इ-बुक्स,ऑडीओ बुक्स हे प्रकार अजुनही तितकेसे आवडले नाहीयेत. पण तिकडे हळुहळु वळायचा प्रयत्न करत आहे. (पाहिजे ते पुस्तक. पाहिजे तेव्हा वाचता येण्याची सोय असल्याकारणाने फक्त)

तरीही जातिवंत वाचकांना अजूनही छापील पुस्तके आकर्षित करतात. >>>>>>>>> +++++१११११११११ मी जातिवंत वाचकांन्ची सभासद आहे. Lol जी मजा छापील पुस्तके वाचण्यात, हाताळण्यात असते, ती मजा ई- बुक्स मध्ये नाही. मी अजूनही छापील पुस्तके विकत घेते.

प्रत्येकाने पुस्तके विकत घेऊन संग्रही ठेवायचा ठरवलं तर किती पुस्तकांच्या प्रति छापाव्या लागतील?....
त्यामुळे मला वाटते की वाचनालयातून पुस्तके आणून वाचली जावी, कारण त्याने एक तर वृक्ष तोड कमी होईल, आणि घरी साठवायची गरजच उरणार नाही. कित्येक पुस्तके अशी असतात की ती आपण एकदाच वाचू शकतो. आधीच घरात अभ्यासाची पुस्तकांनी भरलेले असते (माझ्या घरात नवऱ्याचे आणि मुलींचे भरपूर अभ्यासाची पुस्तके आहेत तेच आवरणे नीट नेटके ठेवणे अवघड आहे त्यामुळे मी वाचनालय, ebooks, माबो, मिपा ला प्राधान्य देते)

पुस्तकांच्या ओळी असलेली घर आवडतात. घरी पुस्तक आहेत पण भरपुर. पण आता किंडल किंवा ऑडिओ बुक वापरण होत बर्‍यापैकी.
जुनी मराठी पुस्तक जी अ‍ॅमेझॉन वर उपल्ब्ध आहेत , त्यातली दमा आणि शंकर पाटलांची सगळी पुस्तक विकत घेतली आहेत.
दिवाळी अंक वगैरे मासिक किंडल स्वरुपात आली तर खुप बर होईल. फोन लार्ज साईझ असेल तर बुक रिडर पण लागत नाही.
युनाईटेड वगैरे फ्लाईट ने आता छान सोय केली आहे. बोर्डींग करु पर्यंत भरपुर मासीके फ्री डाउनलोड उपलब्ध ठेवली आहेत.

पुस्तक रद्दीत देण्यापेक्षा डोनेट करावीत असच वाटत.

'आवाज' विनोदी दिवाळी अंक वाचायचा होता पण यावर्षीचा नाही मिळाला. लास्ट यीअरचा आहे उपलब्ध कुणाला घ्यायचा असेल तर.

* वाचनालयातून पुस्तके आणून वाचली जावी, >>> + ११

*बोर्डींग करु पर्यंत भरपुर मासीके फ्री डाउनलोड उपलब्ध ठेवली आहेत.>>> चांगला उपक्रम.

कागद बचत हा महत्वाचा मुद्दा आहे.

'ई बुक'कडे पाठ!
हा वाचनीय लेख इथे आहे :

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/patipencil/readers-not-int...

त्याचा सारांश हा आहे:
अन्य क्षेत्रांवर डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असला, तरी पुस्तकांच्या बाबतीत जागतिक पातळीवर वाचक अजूनही छापील प्रतीच्याच प्रेमात आहेत !

पान उलटण्याचा फील >>>

तशी भावना (अर्थात बिन थुंकीची !) अत्याधुनिक इ-उपकरणांत येते, असे ऐकून आहे. कोणी अनुभव सांगेल का ?
मी अद्याप ते काहीही वापरलेले नाही.

मी बहुतेक पुस्तके लायब्ररीतून आणून वाचते. त्यातून संग्रहात हवेच अशी वाटणारी , वारंवार काढून चाळले जाईल अशा प्रकारातली पुस्तके नंतर विकत घेतली जातात साहाजिकच संग्रह मर्यादित आहे. सुरवातीला जागेची अडचण आणि आर्थिक कारणास्तव पुस्तके विकत घेताना चोखंदळपणा होता. नंतर उगाच पसारा का वाढवा या हेतूने तेच पुढे सुरु ठेवले. मुलासाठी देखील असेच केले. तरी मुलगा हायस्कूलात जाईपर्यंत संग्राह्य अशी १०० पुस्तके साठली होती. ती फॅमिली फ्रेंड्स त्यांच्या मुलांसाठी घेवून गेले. अमेरीकेत नको असलेली पुस्तके गराज सेल, चर्चचे रमेज सेल, क्लब्जचे सेल, हाफ प्राईस बुक स्टोअर, गुडविल अशा मार्गाने काढून टाकणे तसे सोईचे असते. इथल्या लायब्ररीज देखील वार्षिक सेल ठेवतात.
मला सुरुवातीला इ-पुस्तके आवडत नसत पण कडाक्याच्या थंडीत गाडीवरचा स्नो काढा, गाडी गरम करा, गावात जा, लायब्ररीजवळ पार्किंग शोधा या व्यापापेक्षा लायब्ररीची ऑनलाईन सुविधा सोईची होती. त्यामुळे सवय लावली. पुस्तके परत करायला जा , उशीर झाला तर दंड वगैरे भानगड नाही, पुस्तके मुदत संपली की अकाउंट मधून जातात, क्लेम केलेली पुस्तके उपलब्ध झाली की अकाउंटला येतात . त्यामुळे लायब्ररीसाठी इ-पुस्तके पर्याय स्विकारला आहे. मात्र स्वतःसाठी अजून इ-पुस्तक खरेदी केली नाहीये. गेल्या वर्षी संग्रहात हवेच असे वाटणारे पुस्तक हार्डकव्हरमधेच घेतले कारण ते सजावट म्हणूनही वापरता येणार आहे. Happy

@कुमार१
पुस्तक वाचताना पानावरच्या शेवटच्या काही ओळी वाचताना मला ते पान अर्धवट उघडून धरायची सवय आहे. म्हणजे पान वाचून झाले की ते उलटून दुसरे सुरू करता येते. ही सवय ePub पुस्तके वाचतानाही गेली नाही कारण पान उलटण्याचा किंवा अर्धवट उचलू धरण्याचा फिल येतो.
E411FB73-4D27-45D0-8040-D70CFBAC85B1.jpeg

स्वाती ,
छान नियोजन.

*चर्चचे रमेज सेल >>>
यावर थोडा प्रकाश टाकणार ? प्रथमच ऐकले.

*पुस्तके मुदत संपली की अकाउंट मधून जातात, क्लेम केलेली पुस्तके उपलब्ध झाली की अकाउंटला येतात .
>>> रोचक !
इ- पुस्तकाचे पान उलटल्याचा आभास - याबद्दल काही माहिती आहे ?

बाकी फॉन्ट साईज कमी जास्त करणे, पेजेसचा रंग बदलणे किंवा नाईट मोडमध्ये वाचणे, बुकमार्क करणे, ओळी हायलाईट करणे, शब्दाचा अर्थ तेथेच पहाणे, एखाद्या शब्दावर किंवा ओळीवर नोट काढणे वगैरे गोष्टींमुळे मला ईबुक्स आवडतात.

@ हरिहर,
एकदम सही चित्र. खूप मस्त !

नुकतेच घराचे माळे साफ केले आणि बऱ्याच जुन्या पुस्तकांना रद्दीत दिले. त्यामध्ये ऑक्सफर्ड शब्दकोश, ज्ञानकोश यांचा समावेश होता.

ते जपण्यामागे भावनेचाच भाग होता. गेल्या काही वर्षांत त्यांना हातही लावला नव्हता. गुगलकृपेमुळे आता कोश जपायची गरज नाही.

उत्तम लेख आणि चर्चा . अजून तरी मी online च्या वाटेने गेलो नाहीये, पण एकूण प्रतिसाद बघता त्याकडे जावे कि काय असा विचार आहे. मराठी पुस्तकं किती आहेत ईबुक्स स्वरूपात. कारण मी अजून तरी मराठीच वाचतो .

बुकगंगा वरून ऑनलाइन पुस्तक मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का ?

माझा पहिलाच प्रयत्न फसला. पुस्तकाची ऑर्डर नोंदली गेली पण पैसे स्वीकारले गेले नाहीत (declined). दोनदा प्रयत्न करून मी नाद सोडून दिला आहे.
नुसती ऑर्डर स्वीकारली जाऊन पुस्तक घरपोच दिल्यावर पैसे द्यायचे, असं काही त्यात असतं काय ?

मी अनेकदा मागवली आहेत बुकगंगा वरून. ऑनलाईन पेमेंट करूनच. शेवटली पुस्तके बहुतेक २०१९ मध्ये मागवली.
काही समस्या नाही आली. COD ऑप्शन आहे की नाही माहीत नाही, कधी वापरला नाही.

मानव धन्यवाद

मी अशा पेचात पडलो आहे की पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा पैसे स्वीकारले गेले नाहीत, तर नुसतीच ऑर्डर तीन वेळा नोंदली जाईल का ?
नक्की कळत नाही

तुम्ही तिथे खाते उघडले ना. लॉग इन केल्यावर आपल्या नावावर क्लिक करून Pending orders मध्ये जा.
तिथे ऑर्डर दिसतेय का बघा.
असेल तर त्याच्या पुढे Action खाली काय ऑप्शन येतो बघा- Make payment वगैरे असेल तर तो निवडून प्रयत्न करा.

बुकगंगा या ऑनलाइन दुकानाचा माझा अनुभव अतिशय उत्तम आहे. त्यांच्या दुरध्वनी क्रमांकावर सम्पर्क केला तर तत्पर मदत मिळते.

काही प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत.
जोवर तुमच्या खात्यातून 3 वेळा पैसे जात नाहीत तोवर 3 वेळा ऑर्डर असे मानायचे कारण नाही.
सर्व पेमेंट गेटवे वाल्या साईट वर पेमेंट फेल गेल्यास ऑर्डर हिस्टरी मध्ये रीट्राय पेमेंट दिसते. किंवा ऑर्डर आपोआप सीओडी ला कन्व्हर्ट होते. किंवा ऑर्डर आपोआप रद्द होते.
यापैकी काय झालंय हे ऑर्डर हिस्टरी/पेंडिंग ऑर्डर्स मध्ये कळेल.
तुमचे पेमेंट सारखे फेल जातेय, कनेक्शन स्लो आहे का खूप?
भीम किंवा गुगल पे यु पी आय ने करत असल्यास तुमचा यु पी आय आयडी बदलून दुसऱ्या बँक चा झालाय का हे बघा(असं होतं.माझा आधी okicici होता तो बँक अकाउंट बदलल्यावर त्या बँक कडे स्वतःचे युपीआय नसल्याने okaxis झाला.)

धन्यवाद, बघतो
UPI आयडी अगदी बरोबर आहे
जाल समस्या असू शकेल

मलाही दोनदी चांगला अनुभव। पेमेंट नीट झाले। पुस्तकही लगेच आले। अन नंतर बुकगंगाचा कॉलही आला की पुस्तक नीट पोहेचले ना?

Pages