परसा-कडे

Submitted by प्राचीन on 13 November, 2019 - 12:11

परसा - कडे (?)
परसदार या विषयावर ममोचा लेख वाचला आणि (या विषयी स्फुरण आलं असं कसं म्हणू ) वाटलं आपलीही एक आठवण सांगावी झालं.. 'अजुनही जागे आहे गोकुळ' या माझ्या मायबोलीवर असलेल्या लेखामध्ये (रिक्षा नाहीये हं, फक्त संदर्भ देतेय) माझ्या आजोळचं, पारपुंडचं वर्णन केलं आहे. तिथे माझ्या आजीच्या तोंडून 'परसाकडला' हा शब्दप्रयोग पहिल्यांदा ऐकला. आधी कळलं नव्हतं म्हणजे काय ते.
आमच्या घराचं परस आहे त्यात परसाकडची' बांधीव' सोय होती. त्यासंबंधी माझी ही एक गमतीदार आठवण. आत्ता 'गमतीदार' म्हणतेय पण तेव्हा 'मती' भांबावून 'दार' गाठावं लागलं होतं. शब्दच्छल पुरे आता आणि नेमका प्रसंग असा घडला..
आमच्या घराचं दार, पुढे दोन पायऱ्या त्यापुढे शेणाचं अंगण (आता फरसबंदी), त्यापुढे झाडोरा.आंबा, चिंच, लिंबू अशा फळझाडांसवे तगर, मोगरा, अबोली अशी फुलझाडांचीही सोबत आहे. . पुढे गोबरगॅसची टाकी.. नि साधारण पंचवीस पावलांवर परसाकडची जागा. दुसऱ्या बाजूला आत्तेचं घर.
मुळात शहरात राहिल्याने असं घराबाहेर 'परसाकडला' जाण्याची सवयही नव्हती आणि इच्छाही.. त्यातून बाहेरच्या हौदातून बादली भरून नेणे हा व्याप आणि 'काटकसर' सुद्धा त्रासदायक वाटायची तेव्हा.
तर काहीशा अनिच्छेने हे सोपस्कार पार पाडून एका सकाळी आमच्या स्वारीने घराकडे परतीचा प्रवास सुरू केला होता. आता सगळंच' हलकं' होतं. नेमका जोरात भुंकण्याचा आवाज आला. ती तर नुसती सलामी होती.. मागोमाग प्रत्यक्ष श्वानाची भयंकर स्वारी अवतीर्ण. मला ताबडतोब अतींद्रिय जाणीव झाली की घराकडे धाव घ्यायला हवीच होती. मी पंचवीस ऐवजी दहाच पावलांत घराचं दार गाठलं. आजी इतकी चकित झाली हा माझा अभूतपूर्व चपळपणा पाहून की बाहेरच्या मोरीवर हातपाय न धुताच अस्मादिक आत आले होते हेही तिच्या लक्षात आले नाही. अर्थात नंतर हे आठवलंच तिला.. तर तो कुत्रा दाराबाहेर भुंकत घुटमळत राहिला. माझं काळीज धाडधाड उडत होतं भीतीनं. आत्ते येऊन कुत्र्याला घेऊन गेली तेव्हा तो तिचा नवीन डॉबरमॅन कुत्रा असल्याचा उलगडा झाला.
एरव्ही कुत्र्यावर माया करणाऱ्यांबद्दल मला कुतूहलमिश्रित आदर आहे, पण त्यावेळी त्यास निषेधाची झालर लागली, एवढी मी घाबरून गेले होते. (अजुनही कुत्र्याची भीती वाटते)
तेव्हापासून गावी वास्तव्य असताना 'परसाकडला' जाणं म्हणजे आधी परसाची /अंगणाची टेहळणी मस्टच होती.
आईच्या माहेरी नागाव येथेसुद्धा 'परसाकडे' जात तिच्या लहानपणी. निसर्गाच्या सान्निध्यात.. ऐकूनही मला कसंसंच वाटत असे. तसंच दांडेकरांच्या 'मृण्मयी' मध्ये कोकणात राहणाऱ्या मनूचे सासरे - तिला नवरा मारत असतो तेव्हा इतके हतबल होतात, की बर्‍याच वेळा 'परसाकडे' जाऊन येतात. आणि त्यामागची अपराधी भावना नंतर मनूपुढे व्यक्तही करतात.
नंतर कधीतरी एका वर्तमानपत्रात एक विडंबनात्मक कविता वाचल्याचं आठवतं. ब्रिटिश साहेब भारतीय गावाला राहिला असताना परसाकडे जाण्याचा अनवस्था प्रसंग त्याच्यावर ओढवला. मग त्याची प्रतिक्रिया, गावकऱ्यांना त्याच्याबद्दल असलेलं कुतूहल इ. विषय असावा.
आताही माझ्या आजोळी परस तेच आहे.. अधिकच बहरलेलं. पण' परसाकडला ' हा शब्द वापरणारी माझी आजी मात्र नाहीये. अर्थात परसाकडची सोय घरातच झाली आहे आता.
या संदर्भात एका ठिकाणी ऐकलं होतं. वक्ते म्हणाले की "आताशा आपण घराबाहेर ठेवण्याची गोष्ट म्हणजे टॉयलेट्स घरात आणली आहेत आणि घरामध्ये करण्याची गोष्ट म्हणजे जेवण घराबाहेर करतो, त्यामुळे आरोग्याचा तोल जात आहे.." ह्यात तथ्य आहे का, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो ; पण 'परसाकडे जाणं' ह्याचे स्थलकालसंदर्भ बदललेत एवढं नक्की.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परसाकडे हा शब्द मी मुंबईतंच जास्त ऐकलाय; गांवी सहसा वापरत नाहित (माझा अनुभव तोकडा आहे). गांवी म्हणतांत (म्हणायचे) - झाड्याक जाउन इलंय (म्हणजे यज्ञकर्म करुन आलो)... Happy

आमच्याकडे गावी, ‘ परसाकडला‘ हाच शब्द असायचा.
ह्या लेखाने स्मृती उजळल्या Proud
तर ते असं व्हायचं,
हे ८५-८६ काळाच्या आसपास,
आधी खास डब्बा ( टमरेल) विहिरिवर जावून आजीला सांगा भरायला. ती ओरडायची, तो डब्बा इथे आणू नको.
मग चालत, विहिरीपासून लांब जावून उभं राहून ती पाणी ओतणार डब्ब्यात मात्र दोणीतलं. पार परसाकडच्या एका टोकाच्या भागात चालत जा. तिथे झावळ्या लावून बनवलेलं तात्पुरतं स्वछताग्रूह गाठा. आणि पावसात तर छत्री, डब्बा आणि चाल वगैरे टायमिंग जुळायला वेळ लागायचा, गावी गेल्यावर.
भरभर चालले की, पाणी डचमळुन कमी व्हायचं आणि ती ‘काटकसर’ सवयीची नसल्याने चिडचिड वाढायची कारण शहरात नेहमीच आमच्या घरात २४ तास पाणी. .. आणि घरातच सोय त्यामुळे आळशासारखं उठायचं आणि पळायचं. कसलीच कसरत नाही आणि ताण..
नंतर मग मी माझ्या गावात रहाणार्‍या मामे बहिणीशी डिल केली की, तिने दोन एक्स्ट्रा डब्बे घ्यायचे माझ्याबरोबर आणि मला मदत करायची आणि मी तिला तिच्यावेळी. तर ती बोलली, तिचे एकाच डब्ब्यात भागतं , त्यामुळे मी तिला मोबदला द्यावा डबा हमालीकरता. ती एकदम पक्की निघाली. मी १० पैसे घे म्हणाले , तर २५ पैसे दे म्हणाली दर दिवसाचे. वर माझे फ्रॉक्स वगैरे ती पाहिजे तेव्हा घालणार वगैरे.
सकाळची आमची ती वरात अशी असायची,
मी त्रस्त होवून एक डब्बा घेवून घाईत चालतेय, माझ्या मागून माझ्यासाठी दोन डब्बे घेवून माझी मामेबहिण असा जोक होता. परसाच्या त्या बाजूला जाताना आजूबाजूच्या बाया-माम्यांना माझ्याकडे बघून. काय ते, ‘ शहरातलं ध्यान‘ असे हसत.

नंतर लाईटस आले, पंप बसले. आधुनिक टॉयलेट्स पण ना ती लोकं राहिली...

शहरी भागात वाढलेल्या मुलांना 'परसाकडे' जाणे हा किती मोठा सांस्कृतिक धक्का आणि त्यांच्या कोमल मनावर आघात असतो हे गावाकडे वाढलेल्या लोकांना नाहीच समजणार ! Proud

माझ्या एका नातेवाईकांकडे वाडीत संडासाची जागा (खड्डा भरला की) बदलत असत. हे माहीत नसल्यामुळे मागच्या सुट्टीत जवळ असलेला संडास अचानक दूर जाई आणि मग सगळे अंदाज कोलमडत. वर त्याला दरवाजा देखिल नसे मग कोणी आल्याची चाहूल लागली की गाणे गावे लागे. अजून एकावेळी घाटावरच्या नातेवाईकांकडे गेलो असताना संडासात मागच्या बाजूने डुक्कर आत शिरेल की काय अशी भिती निर्माण झाल्याने उडालेली भंबेरी आठवते आहे.

ह्याउलट गावाकडची मुले शहरात आल्यावर 'घरातल्या संडासात' गेल्यावर शंकराची उलटी पिंड आणि पादुकांना नमस्कार करून आल्याचे विनोदही माझ्या लहानपणी प्रसिद्ध होते.

तो तिचा नवीन डॉबरमॅन कुत्रा असल्याचा उलगडा झाला.>> खेडेगावात डॉबरमन सारखे महाग ब्रीड, ह्याला नॉनव्हेज खायला द्यावे लागते , व ट्रेनिन्ग इत्यादि पण फार स्पेसिफिक लागते पाळणे हे मला जरा अवघड वाट्ते. साधा कोणतात री स्ट्रे असावा. कुक त कुक.

पण अ‍ॅडमिन ह्या असल्या बाफं साठी एक वेगळा गृप करून द्या उत्साही लेखकांना ही परत एकदा नम्र विनंती.

हर्पेन Lol
आम्च्या कोकणात डुक्कर नाहीत. पण गुरांचा असा अनुभव आहे लहानपणचा.
आता गावीही घर तिथे शौचालय आहे.

>>> शहरी भागात वाढलेल्या मुलांना 'परसाकडे' जाणे हा किती मोठा सांस्कृतिक धक्का आणि त्यांच्या कोमल मनावर आघात असतो हे गावाकडे वाढलेल्या लोकांना नाहीच समजणार ! Proud<<<
आणि गावतल्यांची तक्रार असायची, ‘बूच लागलेय.. हितं व्हत नाय ब्बराबर’ ( शहरी स्वच्छतागृह घरातच पाहून). Proud

सस्मित, (आपल्या) कोकणात डुक्करे नाहीतच तो घाटावरचाच किस्सा आहे. आधीच लिहिलंय तसं.

हो. वाचलं मी.
सहज लिहिलं.
(आपल्या) कोकणात Happy