समाधान

Submitted by मोहना on 14 October, 2019 - 22:53

"न्यायाधीशांना दिवसभरात तुमची कधीही गरज भासू शकते त्यामुळे पाचवाजेपर्यंत थांबणं जरुरीचं आहे. इमारतीबाहेर फक्त जेवणासाठी जाता येईल. तुमची निवड झाली तर कदाचित एकाच दिवसात काम संपेल, कदाचित कितीतरी दिवस लागतील. काम सुरु व्हायच्याआधीच तुमच्या अडचणी तुम्ही न्यायाधीशांना सांगू शकता..." ज्युरीड्युटीसाठी आलेल्या साधनाला ते ऐकताना आता आठ ते पाच इतका वेळ बसून काय करायचं हा प्रश्न पडला, तसा तो तिथे असलेल्या १५ - २० जणांनाही पडलेला होताच. हळूहळू सगळेच फोनमध्ये डोकं खूपसून बसले, इमारतीत भटकून आले. एकमेकांच्या ओळखी करुन घेणं भागच होतं. नाहीतर करायचं काय इतक्या वेळाचं? हिजाब घातलेल्या स्त्रीकडे अधूनमधून तिचं लक्ष उगाचच जात होतं पण ती मात्र चायनीज बाईशी बोलण्यात गर्क होती. साधना कुणाशी नजरानजर झाली की बोलायचा प्रयत्न करत होती पण कितीवेळ बोलणार आणि काय? ठराविक विषय झाले की बोलणं संपत होतं. अलिप्त वाटणार्‍या, हिजाब घातलेल्या त्या स्त्रीकडे पुन्हापुन्हा तिचं लक्ष जात होतं. तिचं चायनीज बाईशी बोलणं कधी संपतं याची ती वाट बघत राहिली. मुलाबाळांचा विषय काढला की कुणीही खुलतं हे अनुभवाने ठाऊक होतं. चायनीज बाई तोंड फाटेस्तोवर आपल्या मुलांची स्तुती करत होती ते कानावर पडत होतंच. साधनाने त्या दोघींच्या संभाषणात सरळ उडीच मारली.
"माझा मुलगा ठाम होता. नोकरी करायची नाहीच..." साधना मुलाबद्दल कौतुकाने सांगत राहिली. त्याचं यश स्वत: अनुभवल्यासारखा तिचा चेहरा खुलला होता. दोघींच्या चेहर्‍यावर तिच्या मुलाबद्दलचं कौतुक पाहताना तिला बरं वाटत होतं. तिचं बोलणं संपल्यावर शांतता पसरली. एकदम साधनाच्या लक्षात आलं आपण ओळख करुन दिलीच नाही.
"मी साधना." तिने स्वत:ची ओळख करुन दिली.
"मेहेर."
"विनी." एकदा ओळख झाल्यावर मात्र विषयातून विषय निघत गेले. मेहेर दहावर्षापूर्वी ज्युरी ड्युटीसाठी आली होती. त्यावेळेस तिला दिवसभर वाट बघून घरी जायला लागलं होतं. आजही पुन्हा तेच होईल असं तिला वाटत होतं. ज्युरी ड्युटीत बदल कसे करता येतील यावर चर्चा करण्यात तिघी रंगल्या. अचानक साधनाच्या लक्षात आलं की अजूनपर्यंत मेहेर स्वत:च्या मुलांबद्दल काहीच बोलली नव्हती.
"मेहेर, तुझी मुलं केवढी आहेत?" तिने कुतुहलाने विचारलं.
"एक मुलगा." शांत स्वरात मेहेर उत्तरली.
"काय करतो तो?"
"काहीच नाही." मेहेर निर्विकार स्वरात म्हणाली. चमकून साधनाने विनीकडे पाहिलं. दोघींची नजरानजर झाली पण मेहेरच्या उत्तरावर नक्की आपण काय प्रतिक्रिया द्यायची ते दोघींना समजेना. साधनाच नेटाने म्हणाली,
"मला समजलं नाही."
"आर्मीत होता. त्याला आर्मीतच जायचं होतं. आम्हीही विरोध केला नाही. त्याच्या आर्मीत असण्याचे परिणाम आम्हीही भोगतोय. मानसिक स्थिती फार नाजूक आहे त्याची. कुठेतरी बारीक सारीक नोकर्‍या करतो, सोडून देतो. २८ वर्षाचा आहे. नैराश्याने ग्रासलंय त्याला." तुटक स्वरात त्रोटक माहिती दिली आणि निर्विकार मुद्रेने मेहेर बसून राहिली. साधनाच्या मनात खूप प्रश्न होते पण विचारायचं धाडस तिला झालं नाही. मेहेरच्या अलिप्तपणाची मीमांसा तिचं मन करत राहिलं. पुढचे तीन - चार तास सगळीजणं कंटाळल्यागत बसली होती. मेहेर उठून कुठे गेली ते कळलंच नव्हतं. साधनाला उठून जावं, तिच्याशी मोकळेपणाने बोलावं असं वाटत होतं. पण ती तशीच बसून राहिली. मेहेरचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा तिच्या मनात तिने उभा केला. त्याच्यावर काय उपचार केले असतील, काय करता येईल, आई म्हणून मेहेरला काय वाटत असेल, तिचा नवरा कसा असेल अशा मनात आलेल्या असंख्य प्रश्नांना साधना स्वत:च उत्तरं देत होती. साधनाच्या मनाला मेहेरच्या मुलाने घेरुन टाकलं. ती भानावर आली तेव्हा चहाची वेळ झाली होती.

त्या तिघी एकत्र चहा प्यायला गेल्या पण कटाक्षाने मुलांचा विषय तिघीही टाळत होत्या. एकमेकांच्या देशाबद्दल बोलताना कितीतरी वेगळे विषय बोलण्यात येत गेले. खाद्यपदार्थांवर, खेळांवर गप्पा रंगल्या आणि कुणाकडेच काही बोलण्यासारखं उरलं नाही तेव्हा तिघीही शांत बसून राहिल्या. आता फक्त वाट पाहायची होती घरी जाण्याची. पाच वाजले आणि सगळ्यांच्याच मनातली खदखद बाहेर पडली. नाहक सर्वांचा वेळ का फुकट घालवतात, रजा वाया गेली. स्वत:चाच खर्च करुन यायचं...मनात साठलेलं सगळीच बोलत होती. एकेकाचा निरोप घेऊन बाहेर पडत होती. तिघींनी एकमेकींना निरोप दिला. साधना गाडीच्या दिशेने निघाली आणि अचानक मागे वळली.
"मेहेर" तिने एकदम मेहेरचे दोन्ही हात हातात घेतले. मेहेर गोंधळली.
"मला मूल नाही मेहेर. मी तुला खोटं सांगितलं. का विचारु नकोस. माझ्या मनाचं समाधान समज. मला मूल असतं तर ते कसं असतं याचं चित्र मी रंगवते. तेच मांडते परक्या व्यक्तींसमोर. ओळखतात त्या सार्‍यांनाच ठाऊक आहे त्यामुळे मला कधीच कुणी मुलांबद्दल विचारत नाहीत, आपल्या मुलांबद्दल बोलत नाहीत. मूल हा विषयच मी आजूबाजूला असले की टाळतात. फार लागतं ते मनाला. मग माझ्या मनातलं माझ्या मुलाचं चित्र मी तिर्‍हाईतासमोर उभं करते..." तिला बोलायचं होतं ते धाडधाड ती बोलत राहिली. आणि एकदम तिने पाठ फिरवली. मेहेरला बसलेला धक्का पाहायलाही ती थांबली नाही. झपाझप पावलं टाकत ती तिच्या गाडीकडे वळली. गाडीत बसल्यावर तिने मोकळा श्वास घेतला. आरशातून मागे पाहताना संथ पावलं टाकत येणार्‍या मेहेरला ती निरखीत राहिली. मेहेरच्या चेहर्‍यावरचे काळे ढग विरुन गेल्यासारखं तिला वाटलं.

"देवा, मला क्षमा कर. मी खोटं बोलले. पण काही क्षण का होईना एका बाईला मी तिच्या इतर चिंता विसरुन निदान ती आई असल्याचा आनंद दिला. एवढंच हवं होतं. दिवसभरात न पाहिलेलं समाधान काही क्षण का होईना एका आईच्या चेहर्‍यावर पाहता आलं मला." डोळ्यातले अश्रू रोखत तिने गाडी सुरु केली आणि हसतमुखाने निरोपाचा हात हलवणार्‍या मेहेरला तितक्याच उत्साहाने निरोपाचा हात हलवून ती मार्गाला लागली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुमच्या कथा नेहमी आवर्जून वाचते, पण बहुतेक कधी प्रतिक्रिया देत नाही.
परंतु कथा वाचल्यावर डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. मग कधी कधी कथेतल्या पात्रांचं वागणे पटत नाही (कारण त्या पात्रांच्या जागी आपल्याला ठेवलेले असते.) म्हणजेच कथा मनाला भिडलेली असते.

खोटे बोलून का होईना, समोरच्याला अल्पसे समाधान दिले, बरे वाटले. निदान मेहेरची व्यथा थोडी कमी झाली. Happy

आवडली कथा.. Happy
समोरच्या माणसाला खरं बोलुन दुःख देण्यापेक्षा खोट बोलुन सुख देण्यात मनाला समाधान मिळते.. फक्त त्यामागे काहीतरी मिळण्याची अपेक्षा असता कामा नये..

आवडली कथा हाताळणीसकट. ज्युरी duty ची जागा वापरण्याचे काही खास कारण होते का ? कुतूहल म्हणून विचारतोय.

'असत्यं ब्रुयात अप्रियं ब्रुयात' याने कुणाच्या जखमेवर फुंकर घालता येते हा विचारच किती भारी आहे. दोन नकारांनी बनलेला एक सकार!

सुंदर गोष्ट!

सर्वांना धन्यवाद.
मनस्विता, तुम्ही माझ्या कथा वाचता याचाच आनंद वाटतो कारण माझंही तसंच होतं, प्रतिक्रिया द्यायच्या असतात जे वाचते त्यावर पण...
पात्रांचं वागणं पटत नाही... खरं आहे. यातली साधना खरंच असं खोटं बोलेल की नाही ठाऊक नाही पण तिने तसं बोलून मेहेरला काही क्षण आपलं दु:ख विसरायला लावावं असं मला वाटलं.

@माधव, तुमची प्रतिक्रिया भावली. खरंच दोन नकारांनी बनलेला सकार.

@मन्या, अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते.

@असामी, या कथेचा जो शेवट केलाय मी तशा शेवट असलेल्या कथा आलेल्या आहेत यापूर्वीही. मी ज्युरीड्युटीला जाऊन माशा मारत बसले होते तेव्हा आजूबाजूची लोकं न्याहाळताना ही कथा मनात शिजली म्हणून तीच पार्श्वभूमी वापरायचं ठरवलं.

कथा वाचली की उत्स्फूर्त प्रतिक्रिया 'छानेय आवडली' अशी होती. पण नंतर मनस्विताने लिहलंय तस झालं > परंतु कथा वाचल्यावर डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. मग कधी कधी कथेतल्या पात्रांचं वागणे पटत नाही (कारण त्या पात्रांच्या जागी आपल्याला ठेवलेले असते.) > झालं. त्यामुळे आता एकंदर गोंधळलेली मनस्थिती आहे Happy

खूप छान... खोटे बोलली पण साधनाने मेहेर चे दुःख कमी करून चांगलेच काम केले....छानच आहे कथा मनाला भिडली..वाचताना ही खिळवून ठेवली

सुंदर....