तूऽऽ मेनी पीपल्स...!!

Submitted by ललिता-प्रीति on 30 September, 2019 - 11:33

मित्रमंडळींच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर एकाने ताजमहालाचे स्वतः काढलेले काही अप्रतिम फोटो पोस्ट केले. आम्ही सारे फोटोंचं कौतुक करत असताना तो म्हणाला, ‘साडेचार तास रांगेत उभे होतो, खूप गर्दी होती’... ते वाचून माझ्या पोटात गोळाच आला...
गर्दी पर्यटनाचे आमचे एक-एक अनुभव डोळ्यांपुढे यायला लागले...

६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अमृतसरमध्ये होतो. सकाळी लवकर उठून सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग दोन्ही ठिकाणांवर टिक-मार्क करून, दुपारी जरा आराम करून मग वाघा बॉर्डरला जायचं असा विचार होता. पण आम्ही ठरवलेल्या जीपचा ड्रायवर म्हणाला, दुपारी लवकर निघू, नंतर खूप गर्दी होते. गर्दी होते म्हटल्यावर काय, आमचं बोलणंच खुंटलं. जेवल्या-जेवल्या निमूट निघालो.

दुपारी दोन-अडीच वाजता वाघा बॉर्डरनजिकच्या वाहनतळापाशी आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे जवळपास शुकशुकाट होता. आम्ही आलो तोच हमरस्ता पुढे जात होता; मात्र तो एका मोठ्या फाटकाने बंद केलेला होता; तिथून पुढे वाहनं न्यायला परवानगी नव्हती. रस्त्याच्या एका कडेला मालवाहू ट्रक्स रांग लावून उभे असलेले दिसत होते. वाटलं, गर्दी म्हणजे हीच असावी.
ते मोठं फाटक उघडेपर्यंत हाताशी तब्बल दीड-दोन तास होते. इकडे-तिकडे करत तो वेळ काढला. १-२ ट्रकवाल्यांशी उगीचच जरा गप्पा मारल्या. जीपने येताना जराशी मागे एका ठिकाणी ‘लाहोर २३ किमी’ची पाटी दिसली होती. तिथपर्यंत चालत जाऊन त्या पाटीचे फोटो काढले. (नकाशा पाहिला तर आम्ही उभे होतो तिथून अमृतसरपेक्षा लाहोर जवळ होतं.) एकीकडे पार्किंगमध्ये एक-एक करून खाजगी वाहनं, ग्रूप टूरच्या बसेस येऊन थांबत होत्या. वर्दळ वाढली होती. पण आम्हाला चिंता करण्याचं कारण नव्हतं; आम्ही तर लवकर आलो होतो!

चार वाजत आले तसे आम्ही त्या फाटकापाशी जाऊन उभे राहिलो. आसपास इतर पर्यटक गोळा होत होते. अधिकाधिक गाड्या येतच होत्या. तिथे ‘कृपया रांगेत उभे राहावे’टाईपच्या कुठल्याच सूचना नव्हत्या. त्यामुळे मला वाटत होतं, की फाटकाजवळ लॉग-बुकात एन्ट्री वगैरे करायला लावून एकेकाला आत सोडतील; आफ्टर ऑल, भारत-पाकिस्तान बॉर्डर का सवाल था! बघताबघता फाटकाजवळची गर्दी वाढायला लागली; बाया, बाप्ये, पोरंटोरं, म्हातारी माणसं; मागून गर्दीचा रेटा जाणवायला लागला. मागे वळून पाहिलं, तर ‘पेरिफेरल व्हिजन’सकट जिकडेतिकडे माणसंच माणसं होती. आधी दोन माणसांत फूटभर अंतर होतं, ते वीतभर झालं; मग बोटभर; त्याचं इंचभर. फाटकाच्या पलिकडे काही जवान अगदी शांतपणे उभे होते. त्यांनी गर्दी नियंत्रित करावी असं मनात वाटत होतं. गर्दीने त्या जवानांचं गपगुमान ऐकलं असतं. पण त्याची काही चिन्हं दिसत नव्हती. आता गलका खूप वाढला होता. आपांपसांत बोललेलं ऐकू जात नव्हतं. दोन पायांवर कसाबसा तोल सावरून उभं राहावं लागत होतं. एकदा फाटकातून पुढे गेलो की मग फारशी चिंता नसावी असं दिसत होतं; पण ते फाटक पार करणंच मुश्कील वाटत होतं; कारण त्या रस्ताभर प्रशस्त फाटकाचं एक लहानसं दारच तेवढं उघडलं जाणार हे एव्हाना स्पष्ट झालेलं होतं. इतक्या गर्दीला आत जाण्यासाठी इतकंसंच दार का, का, असा जाब विचारण्याचा काहीही उपयोग नव्हता; उत्तर मिळालं नसतं.

ते दार उघडलं आणि एकत्र चिकटलेली गर्दी ‘कायनेटिक’ व्हायला सुरूवात झाली. झुंबड रेटारेटी, ढकलाढकली सुरू झाली; मध्ये काही वेळ चेंगराचेंगरीचीही भीती तरळून गेली. आमच्यानंतर आलेले अनेकजण आमच्याआधी दारातून घुसून पलिकडे जाताना दिसायला लागले. मी ‘ये कहाँ का न्याय है...’ असा चेहरा केला. पण कुणालाही काहीही देणंघेणं नव्हतं. आम्ही कसाबसा जीव मुठीत धरून दारातून घुसलो. पलिकडे मोहोळ फुटल्यासारखी गर्दी वाहत होती. आम्ही घरचे पाच जण होतो; गर्दीत एकमेकांपासून असे पांगलो, की त्यानंतर थेट दोन-एक तासांनी आम्हाला एकमेकांची तोंडं दिसली!
पुढे काही अंतर चालत गेल्यावर एका ठिकाणी मध्यम आकाराच्या स्टेडियमसारखी रचना होती; तिथे गर्दी ओतत होती. आधी पन्नास माणसं बसली असतील, तर ती सरकून शंभर बसली; त्याची दोनशे झाली; पाचशे झाली; तरीही आणखी माणसं येतच होती, येतच होती. मग दोन्ही देशांचे ध्वज उतरवण्याचा तो सुप्रसिद्ध दैनंदिन कार्यक्रम झाला. गर्दीत तोल सावरत एकीकडे मी उत्सुकतेपोटी अधूनमधून पाकिस्तानच्या स्टेडियमकडे बघत होते. त्याचा आकार तुलनेने लहान होता; शिवाय ते अर्धं-अधिक रिकामंही होतं. इकडे मात्र चहूबाजूंनी खाऊ की गिळू अशी गर्दी अंगावर येत होती...

आजही वाघा बॉर्डर म्हटलं की मला फक्त आणि फक्त ती गर्दीच आठवते! केवळ वाघा बॉर्डरचंच नाही; सर्व प्रसिद्ध पर्यटनस्थळांचं हेच झालंय. माऊंट आबू म्हणू नका, कन्याकुमारी म्हणू नका, गुलमर्ग म्हणू नका, कॉर्बेट पार्क म्हणू नका; फक्त गर्दी, गर्दी म्हणा; बाकी काही म्हणूच नका! त्यादिवशी वाघा बॉर्डरपाशी दीड-दोन तास आधी पोहोचण्याचा खराखुरा उपयोग केवळ आमच्या जीपच्या ड्रायव्हरला झाला. त्याला पार्किंगची मोक्याची जागा मिळाल्यामुळे आम्हाला परतीच्या रस्त्याला लागायला प्रयास पडले नाहीत. आजवर पर्यटकी-गर्दीचे जे जे म्हणून अनुभव घेतले त्यांत आमच्या खाती जमा झालेली तेवढी एकच बरी गोष्ट. बाकी ‘कहाँ का न्याय’, ‘का? का?’ अशांनीच पोतडी भरलेली!

त्या पोतडीतली अशीच एक सतत रेटा देणारी आठवण गुलमर्गची. गुलमर्गचं सुंदर गोल्फ-मैदान, तिथून वर बर्फाळ पर्वतावर घेऊन जाणारी गंडोला राईड, ती चुकवायची नाही असं आमचं घरून निघतानाच ठरलेलं होतं. लवकर जाऊ, म्हणजे भरपूर वेळ हाताशी मिळेल, असं ठरवून श्रीनगरहून सक्काळी निघून ९ वाजताच आम्ही त्या जागी पोहोचलो होतो. हा जो काही आशावाद आहे की नाही- ‘सक्काळी लवकर जाऊ, म्हणजे...’ - तोच गर्दीत सगळ्यांना सगळ्यांचे धक्के खाण्याचं बळ देत असावा. तर, गंडोलाचं तिकीट काढायचं, फारफारतर अर्धा तास थांबावं लागेल, (कारण आपण तर लवकर जातोय!) आणि मग बर्फ आणि आपण; दिन बन जाएगा; असे मांडे मटकावून झाले. पण गर्दी कुणाचं कशाला ऐकतेय... तो दिन चांगला कासराभर वर आला, तरी आम्ही आपले गंडोलाच्या रांगेत ‘तपचर्या लावून’ उभे! आजकाल मे महिन्यात काश्मीरचं ऊनही अजिबात आल्हाददायक वगैरे नसतं हे त्यादिवशी समजलं. मी शाळेत असताना मे महिन्यातच गुलमर्गला गेले होते, तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती; त्या थंडीच्या आठवणी बाकीच्यांना सांगत दीड-दोन तास काढले. रांग जमिनीला समांतर होती ती डोंगराला समांतर केली असती तर शिखरापर्यंत गेली असती, असे विनोदही करून झाले. रांग सरकायची तशीच पुढे सरकली. पुढे गंडोला राईडमधून शिखरावर पोहोचलेली गर्दी तर काय, अशी माजली की विचारू नका. पायथ्याला किमान रांगेची थोडीफार शिस्त होती; वरती ते ही नाही. इतक्या तपश्चर्येनंतर मिळालेलं बर्फफळ सर्वांनाच ओरबाडायचं होतं. भरपूर माणसं भरपूर बर्फ बघून किती वेड्या-वेड्यासारखं करू शकतात, हे तिथे पाहायला मिळालं.

आपल्या देशात थंडी, बर्फ याचं नाविन्य आहे म्हणून या प्रकाराला अनुकंपा तत्वावर एकवेळ माफीही देता येईल. पण युरोपमध्येही तोच प्रकार. स्विट्झर्लंडमध्ये आल्प्सचं सर्वोच्च शिखर आहे. दरवर्षी सुट्ट्यांच्या मोसमात तिथे बेदम, बेफाम गर्दी होते आणि त्यात सर्वाधिक गलका चिन्यांचा असतो. चिन्यांना भारतीयांइतकं थंडी-बर्फाचं अप्रूप नसावं अशी आपली माझी समजूत होती. स्विट्झर्लंडमध्ये आलेल्या चिन्यांनी ती सपशेल हाणून पाडली. इतका कलकलाट, इतका गोंगाट; त्यात त्यांची बोलण्याची पद्धतही जरा आवाजीच; चार जण बोलत असतील तर दहा जण तावातावाने भांडत असल्यासारखं वाटतं. अर्थात केवळ चिनी पर्यटकांना नावं ठेवून काय उपयोग! कारण भारतीय पर्यटक त्यांच्याहून फार काही मागे नसतात. पर्यटन मोसमात स्विट्झर्लंडमधलं ते ‘टॉप ऑफ द युरोप’ रेल्वे स्टेशन, तिथलं रेस्टॉरंट, आसपासचा परिसर सगळीकडे गर्दीमुळे नुसती बजबजपुरी माजलेली असते!
आम्ही तिथल्या बर्फात जरा निवांत उभं राहण्याइतपत जागा मिळते का शोधत होतो. तेवढ्यात एका कोपर्‍यातून कुणीतरी जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला. घाबरून वळून पाहिलं, तर एक चिनी तरूण अंगातलं जाड जॅकेट, आतला टी-शर्ट, सगळं काढून, उघडा होऊन, बेंबीच्या देठापासून चित्कार करत, शक्य तितक्या वेड्यावाकडया उड्या मारत, बर्फात नाचत होता आणि त्याच्याबरोबरची तरुणी फोनवर त्याचा व्हिडिओ काढत होती. आता बोला! मौजमजेच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात, हे मान्यच; मात्र इतक्या वैविध्याला तोंड देण्याची माझ्या मनाची तयारी नव्हती. एकट्या-दुकट्याचाच असा उन्माद; मग समूहाचं तर काही विचारायलाच नको.

पर्यटनामुळे जग जवळ येतंय आणि जिथे एकवटतंय तिथला इंच न् इंच असं व्यापून टाकतंय. पर्यटन कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये ‘सोबत घेऊन जा प्रवासाच्या सुंदर आठवणी’ अशा अर्थाचं वाक्य हमखास असतं. पण त्या सुंदर आठवणींना गर्दीचा रफार लागल्याशिवाय आजकाल कुठल्याही प्रसिद्ध ठिकाणचं पर्यटन सुफल संपूर्ण होतच नाही.

जी गत स्विट्झर्लंडमध्ये, तीच आयफेल टॉवरपाशीही. आयफेल टॉवरच्या माथ्याशी नेणार्‍या लिफ्टचं तिकीट काढण्यासाठी रांगेची गर्दी, मग त्या लिफ्टमध्ये शिरण्यासाठी गर्दी; टॉवरच्या माथ्याशी वावरायला आधीच पायथ्यापेक्षा कमी जागा, गर्दी तेवढीच; परतताना लिफ्टमध्ये शिरण्यासाठी अशी रेटारेटी, की वाटावं ती लिफ्टची अखेरची फेरी आहे आणि ती चुकवली तर पुढच्या टूरिस्टी-सीझनपर्यंत तुम्ही तिथेच अडकून पडणार. झुंडीने जायचं, झुंडीने परतायचं; काय बघायला गेलो होतो ते या पर्यटकीय जीवनाच्या झटापटीत विसरायलाच होतं.
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला कुठल्याशा किल्ल्यावर माजलेल्या गर्दीचे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते. तशीच आणि तेवढीच गर्दी आम्ही व्हॅटिकन, सिस्टीन चॅपलपाशी पाहिली. इतकी अप्रतिम कलाकुसरीची ती वास्तू, पण आज डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला तर केवळ तिथली गर्दीच आठवते. त्या गर्दीत घुसण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता; कारण नाहीतर भोज्यापर्यंत जाऊन भोज्याला न शिवताच परतावं लागलं असतं.

असं भोज्याला शिवण्यासारखं फिरणं हेच अशा गर्दीच्या मुळाशी आहे. पर्यटन कंपन्या ‘अमुक दिवसांत तमुक भोज्ये’ असली गाजरं दाखवतात; बहुतेकांना त्याची भुरळ पडते. ‘Fifty places in the world you must visit before you die’ असल्या याद्या त्यात तेल ओततात. अशा याद्यांमधली ठिकाणं पाहिली नाहीत तर मोक्ष कठीण, अशी समजूत पक्की होत जाते. असे भोज्ये-पर्यटन करणारे ते ‘टूरिस्ट’ आणि मनःपूत भटकणारे ते ‘ट्रॅव्हलर’ असा जातीभेदही करण्याची पद्धत आहे. इन्स्पायरिंग कोट्स इत्यादी तयार करण्यासाठी असे भेद कामी येतात.
मागे कधीतरी असंच एक वाक्य वाचलं होतं- ‘You know it is time for a vacation when you start looking like the person on your driving license!’ आता असं आहे, की आपल्याकडची सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी कामावरून रात्री घरी परतताना रोजच त्यांचा अवतार या वाक्यातल्यासारखा झालेला असतो. कधी एकदा रजा टाकतोय आणि फिरायला जातोय, असं त्यांना रोजच वाटत असतं. असं वाटण्याचं आणि सुट्ट्या मिळण्याचं प्रमाण कायमच व्यस्त असतं. त्यामुळे मग मिळालेल्या माफक सुट्टीत जास्तीत जास्त फिरून घ्यायचं, ही मनोवृत्ती आपोआप तयार होते. पर्यटन कंपन्यांच्या जाहिरातींपासून सुरू झालेलं वर्तुळ असं पूर्ण होतं. त्यातही कोंबडी आधी, की अंडं आधी, हा मुद्दा आहेच. म्हणजे, लोकांना असं फिरायचं असतं म्हणून पर्यटन कंपन्या तशा जाहिराती करतात; की त्या जाहिराती पाहून लोकांना ‘१५ दिवसांत ९ देश आणि १२ शहरं बघायला हरकत काय आहे’ असं वाटायला लागतं; याचं एकच एक उत्तर देता येणं अवघड असतं. काहींना असं भोज्ये-पर्यटन मनातून शंभर टक्के पटलेलं नसतं; पण कधीतरी त्यांनाही प्रवाहातलं एक व्हावं लागतं.

असेच प्रवाहातले एक होऊन आम्ही आजवर कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉकला जाणार्‍या बोटीच्या रांगेतल्या रेटारेटीत, मसुरीच्या फलाण्या व्ह्यू-पॉइंटच्या रस्त्यावरच्या किलोमीटरभर पार्किंगच्या गर्दीत, माऊंट आबूच्या सनसेट-पॉइंटच्या ढकलाढकलीत, लंडनमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या रांगेतल्या गलबल्यात ताटकळत, चरफडत, हात चोळत, तिष्ठत उभे राहिलेलो आहे. मादाम तुसाँ म्युझियमबद्दल आजवर आपण इतकं ऐकलं आहे, की लंडनला जाऊन ते पाहिलं नाही तर काय उपयोग, असं वाटायला लागतं. त्यात तथ्यही आहेच. त्या चार मजली म्युझियममधल्या एका बारक्याशा दालनात पुतळे तयार करण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहता येते. पण कुणाला त्यात रसच नसतो. कारण सर्वांना पुतळा सलमान खानच्या गळ्यात हात टाकून, पुतळा अमिताभच्या दाढीला हात लावून, पुतळा माधुरी दीक्षितला फ्लाइंग-किस देऊन सेल्फी काढायचे असतात. तिथल्या गर्दीचा तो उन्मादक गलका बघून एका क्षणी उबग येतो. पूर्वी मला वाटायचं या म्युझियममध्ये पुतळा उभारला जावा असं त्या-त्या व्यक्तीचं काहीतरी कर्तृत्व असणं अपेक्षित आहे. पण म्युझियमवाल्यांनीही पर्यटन मोसमातल्या कमाईकडे डोळा ठेवून व्यक्तींची निवड करायला सुरूवात केली. ज्या काळात ज्या प्रदेशातल्या पर्यटकांचा ओघ, त्यानुसार ते-ते पुतळे मांडले जात असणार; दरवर्षीचे मे-जून सरले की आम्ही पाहिलेले अमिताभ, सलमान, माधुरी, ऐश्वर्या कुठेतरी स्टोअररूममध्ये बंद करून ठेवले जात असणार; हे मला त्या दालनात शिरेपर्यंत ध्यानात आलं नाही; आणि ज्या क्षणी ते आलं त्या क्षणी त्या म्युझियममधला माझा रसच संपून गेला...

अशा अनेक गर्दी-अनुभवांनंतर ठरवलं- टूरिस्ट सीझन आणि पॅकेज टूर टाळून कुठेतरी छान ठिकाणी भटकायला जायचं; आणि न्यूझीलंडची निवड केली. त्या दिशेला जाणारे बहुतेकजण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड असे फिरून येतात. आम्ही निक्षून ऑस्ट्रेलियावर फुली मारली. २०-२२ दिवस न्यूझीलंडमध्ये मस्त भटकलो. गर्दी टाळण्याचा आमचा बेत बहुतांश सफल झालेला होता.
परतीच्या प्रवासादिवशी ऑकलंड विमानतळावर पोहोचलो; तर सामान सुपूर्द करण्याची हीऽ लांबलचक रांग दिसली. आपला पुढचा किमान तासभर त्या रांगेतच मोडणार हे स्पष्ट दिसत होतं. रांगेतल्या शेवटच्या माणसाला विचारून खात्री करून घ्यावी म्हणून मी त्याच्या जवळ जाऊन चौकशी केली. तो एकदम चकाचक कॉर्पोरेट वेषातला चिनी होता. तो माझ्या प्रश्नाला आधी होकारार्थी मान हलवत, आणि मग भुवया ताणत, हतबल आवाजात म्हणाला- ‘तूऽ मेनी पीपल्स... तूऽऽ मेनी पीपल्स!!’
एक चिनी आणि एक भारतीय, दोघं ऑकलंड विमानतळावरच्या गर्दीविषयी एकमेकांकडे तक्रार करत होते, हाच मोठा गंमतीशीर विरोधाभास होता!

पण मध्यंतरी एका इंग्रजी पेपरच्या पुरवणीतल्या एका लेखात याच पर्यटकी गर्दीच्या संदर्भात एक जरा वेगळा मुद्दा वाचायला मिळाला. त्या लेखात प्रवाहपतित पर्यटकांची जवळपास शाळाच घेतली गेली होती, की देशा-परदेशातली प्रसिद्ध ठिकाणं आटापिटा करून पाहिलीच पाहिजेत असा काही नियम नाहीये. It is okay if you don’t see the Taj Mahal असंच काहीसं त्या लेखाचं शीर्षक होतं. डोळ्यांवरची पर्यटकीय झापडं काढा आणि बाकीचं बघा, अनेक रत्नं गवसतील आणि ती वेचायला तिथे झुंबड गर्दीही नसेल, असं पटवून देण्याचा त्या लेखकाचा प्रयत्न होता.
वास्तविक, किमान आपल्या देशात अजून तरी पर्यटकीय झापडं लावून जे जे दिसतं तिथेच त्यातल्या त्यात पर्यटनाच्या सोयीसुविधा उपलब्ध असतात; उरलेल्या ठिकाणी सोयींची पुरती वानवा; तिथे जाणार कोण आणि रत्नं शोधणार कोणती!...
तरीही असा सार्वत्रिक दृष्टीकोन विकसित झाला तर कदाचित अशी रत्नं तयार होतीलही; फक्त तेवढी ती ‘ताजमहालला काय एवढं मोठं सोनं लागून गेलंय’ असं स्वतःलाच ठणकावण्याची हिम्मत गोळा करता यायला हवी.

... नाहीतर आहेच मग सुट्ट्या, पर्यटन आणि ‘तूऽऽ मेनी पीपल्स’!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचला आणि एक मोठ्ठा निश्वास टाकला - हे असले अनुभव दुर्दैवाने मीही घेतलेत. यावर काहीही ईलाज नाही.

"..... एक चिनी आणि एक भारतीय, दोघं ऑकलंड विमानतळावरच्या गर्दीविषयी एकमेकांकडे तक्रार करत होते ...."
:-)))

छान लिहिलय .

It is okay if you don’t see the Taj Mahal १००% सहमत

गुलमर्ग च्या त्या गंडोला / रोप-वे चं अ‍ॅड्व्हान्स बुकिंग करून सुद्धा त्या गाईडनं ज्या पद्धतीनं त्याच्या एजंट्समार्फत कुठून कुठून मार्ग काढून आम्हाला 'घुसवलं' होतं ते आठवून सुद्धा अंगावर शहारा येतो.

स्वित्झर्लंड मधे तर रेस्टॉरंट मधे ऑर्डर देऊन पैसे देईपर्यंत, मी आणी समोरचं काऊंटर इतक्याश्या जागेत एक बाई मुसंडी मारून घुसली होती. थक्क झालो होतो मी! (वर तिची प्री-पॅकेज्ड सँडविच, रॅपर मधून काढून मायक्रोवेव्ह मधे गरम करून देण्याची अजब मागणी ऐकून त्यी काऊंटरपलिकडची मुलगी चक्रावून गेली होती तो भाग आणखीन मनोरंजक होता Happy )

असलाच भयंकर अनुभव नथुला पास आणी त्या बाबा हरभजनसिंग मंदिराचा.

गर्दीपेक्षा त्यातली बेशिस्त, नियम तोडण्याची गुर्मी आणी त्यातून निर्माण होणारी अस्वछता असह्य असते.

मस्त लिहिलंय
आम्ही एकदा सुट्टयाना जोडून आलेल्या ख्रिसमस ला भीमाशंकर ला जायचा घोर अपराध केला होता.अबब.लोक कल्याण, गुजरात सगळीकडून आले होते.गर्दी इतकी की गाडया वाले कंटाळून आहे तिथे वाहत्या ट्रॅफिक मध्ये गाडी पार्क करून चालत जात होते त्यामुळे गोंधळ वाढत होता.अश्याच एका काकूंना लिफ्ट देऊन पुढे चालणाऱ्या त्यांच्या कुटुंबात सोडलं.1 किलोमीटर असं रांगत आल्यावर पुढे पार्किंग ला पण जागा नव्हती.एकाने गाडीत बघून दुसऱ्याने दर्शन घ्यावं तर फोन रेंज नव्हती नंतर संपर्क साधायला.शेवटी लांबून कळस दर्शन करून वळून निघालो.परतताना चालणाऱ्या 85 वर्षाच्या वारकरी आजोबांना खाली गावापर्यंत लिफ्ट दिली.त्यांचं त्या गावात समोरच मोठं घर होतं.पण परत जायची घाई असल्याने थांबलो नाही.आजोबांनी एक हिरड्याचं पाकीट दिलं.आणि जंगलात झाडं काशी ओळखायची ते सांगितलं.
वारकऱ्याच्या रूपाने देव भेटला.

लेख अगदी १००% पटला. सविस्तर आणि पोटतिडीकीने लिहीला आहे. लेखनशैली आवडली. आम्ही केरळला गेलो तेव्हा गर्दीची ठिकाणे टाळली होती. खूप खादाडी केली होती.

मस्त लिहीले आहे! गर्दी हा एक वैताग आहेच पण गर्दी+बेशिस्त हा अनेकपट जास्त वैताग आहे.

भरपूर माणसं भरपूर बर्फ पाहून काय वेड्यासारखं करतात, अनुकंपा तत्त्व वगैरे उपमा धमाल आहेत Happy

भारतातल्या गर्दीत आणि युरोप मधल्या गर्दीची तुलनाच होऊ शकत नाही.
तिकडे कितीही गर्दी असली तरी सर्व लोक अतिशय शिस्तबद्धपणे रांगेतून पुढे जातात. कुठेही घाई - धक्काबुक्की असले काही नसते.
कोणीही कागदाचा कपटा देखील खाली टाकत नाही. अतिशय हळु आवाजात एअमेकांशी सम्भाषण करतात.
पण तुमच्या दुर्दैवाने त्याच वेळेस केसरीची टूर तिथे आली तर त्या स्थळाचे क्षणार्धात भारतीय स्थळात रूपांतर होते. कलकल , आरडाओरडा , पुढे जाण्याची धडपड , या सार्याने आसामांत दुमाडुमतो.
आपणही भारतीय असल्याची लाज वाटू लागते.

पशुपत, 100% सहमत. युरोपमधल्या गर्दीत आणि भारतीयांच्या आलेल्या ट्रिपमुळे झालेल्या गर्दीत जमीन आस्मानाचा फरक आहे. अशावेळी भारतीय असण्याची लाज वाटते.

मला देवळात अगदी गाभाऱ्याजवळ दर्शनासाठी जी रेटारेटी असते ती सोडल्यास सहसा गर्दीचा त्रास होतं नाही. सगळेजण किती आनंदी असतात, आपापल्या कुटुंबाबरोबर मजेत असतात, मी पण मजेत असते. प्रत्येकजण महत्त्वाच्या माणसांबरोबर वेळ घालवत असतो. त्रास होऊ शकतो, वैताग येऊ शकतो हे अगदीच मान्य! मी पण त्या गर्दीचा एक भाग असते Happy I belong. मी मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी राहात म्हणून मला असं वाटतं असेल कदाचित. अगदीच शांतता हवी असेल तर कुठल्यातरी मस्त हॉटेल/रिझोर्ट/स्पा मध्ये जाऊन बॅटरी चार्ज करुन घेते.

पशुपत यांच्याशी सहमत

माझाही आयफेल चा अनुभव बिलकुल सुखद नव्हता. थोडाफार मुंबई तल्यासारखा बकालपणा जाणवला. आत्ता एक वर्षा नंतर ही मला लक्षात राहिली आहे ती दुपारी उन्हातली गर्दी व त्यामुळे वैतागून मी अतिउत्साही नवर्यावर गंजलेला टाँवर बघायला लगेज घेऊन उभे राहायला लागल्याने केलेली चिडचिड !

छान लेख. मला तर आजकाल कुठे जायचं म्हटलं की गर्दी किती असेल हाच विचार आधी डोक्यात येतो. Long weekend टाळूनच जाणं उत्तम. शहरात असेल तशीच गर्दी बाहेर गेल्यावर लागली तर घरीच बसलेल्ं काय वाईट असंही वाटतं.

मस्त लिहिलंय. एक-एक उपमा आणि एक्स्प्रेशन अशक्य जमली आहेत.
शक्य तितक्या ठिकाणी गदीचे सिझन टाळून जायचं बघतो. इकडे गर्दी आणि शिस्त हे कॉम्बिनेशन बर्‍यापैकी दिसल्याने फार त्रास जाणवत नाही. पण बेशिस्त आली की एकदम डेडली आणि फ्रस्ट्रेटिंग होतं.
मजा आली वाचताना. धन्यवाद. Happy

मस्त लिहिलंय.

मला ही गर्दी च खूप टेन्शन येतं. मूळ ठिकाणाची मजा सगळी निघून जाते . आपल्याकडे गर्दीला शिस्त नसतेच त्यामुळे चेंगराचेंगरीची खूप भीती वाटते.

जास्त करून एखाद्या प्रसिद्ध देवळाच्या गाभाऱ्यात हे फीलिंग जास्त येत. गाभारे परकीय आक्रमणा पासून संरक्षण मिळवण्यासाठी खूप छोटे आणि कोंदट ही असतात. गर्दी खूप असते. एकदा लायनीत उभं राहिलं की मागची वाट बंद होते. त्यामुळे आत जाऊ की नको ह्या द्विधा अवस्थेत असते मी नेहमीच.

बुवा तिथे बाया आणि बाया तिथे बाप्या
देवस्थान म्हटले की उत्स्फुर्त गर्दी
पण गर्दी नाही खेचू शकत तो देव कसला
बिकता है वही टिकता है
हे देवालाही लागू

लेखातील भावनांशी अगदी सहमत.

<< असं भोज्याला शिवण्यासारखं फिरणं हेच अशा गर्दीच्या मुळाशी आहे. >>> +१
आम्ही इतक्या ठिकाणी जाऊन आलो, ही चेकलिस्ट आणि सोशल मिडियावर फोटो दाखवण्याचा अट्टाहास सगळ्यात घातक आहे.

<< टूरिस्ट सीझन आणि पॅकेज टूर टाळून कुठेतरी छान ठिकाणी भटकायला जायचं >> +१
It's the journey that teaches you a lot about your destination.

छान लेख.

>>असं भोज्याला शिवण्यासारखं फिरणं हेच अशा गर्दीच्या मुळाशी आहे. >> याच्याशी थोडे असहमत. पुर्वापार बहुतेक पर्यटक भोज्या शिवणे प्रकारातलेच आहेत. फक्त ७०-८०च्या दशकांपर्यंत ते बहुतेकरून युरोप व इतर प्रगत देशातले असत (ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे. अमेरिकेतले लोक कधीच अमेरिकेबाहेर फिरत नव्हते Happy ). आता डिस्पोजेबल इन्कम वाढल्यामुळे जगभरातून पर्यटक येत आहे. त्याने ही गर्दी वाढते आहे.

सुट्टीचे दिवस टाळून, अनवट जागी फिरायला जाणे हेच यावर उत्तर.

Happy छान आहे. आवडला.
पर्यटनातील गर्दी कमी करायची असेल तर सोशल मिडियावर पर्यटन स्थळांचे फोटो टाकायला फी हवी. उदा: ताजमहाल फोटो फेसबुक इ वर टाकला तर $१०० फी, आयफेल टॉवर टाकलं तर $२००. आपसूक लोक घरी बसतील Wink कुणी घरी आल्यावर चहा, नाश्ता दिल्यावर मग प्रिंटेड अल्बम कपाटातून काढावा लागेल तेव्हा फिरायचा उत्साह कुणाचा किती ते कळेल :).

मस्त शैली. लेख आवडला, विषाद पोचला. हा अनुभव सिमला मनालीला आला होता. काळ्या बर्फात खेळावे लागले होते.
न्ञुझिलंडला २० दिवस म्हणजे मस्तच. गर्दी नाहीका लागली तिथे? दोन्ही बेटं केली का?

मस्तच लिहिलंय. लेखिका सुध्दा गर्दी करणाऱ्यांमध्ये मोडते. इतरांना नावं ठेवून काय उपयोग? बकेटलिस्टमधील त्याच प्रसिद्ध पर्यटनस्थळी स्वत: भेटी द्यायच्या. मग इतरही लोक आले की त्यांना गर्दी म्हणत स्वत:ला मात्र दर्दी म्हणवून घेणे कितपत योग्य आहे?

मस्त लेख. हल्ली खरंच पटेल पॉइंट्स, तीर्थस्थळं अशी ठिकाणं टाळून फारशा माहित नसलेल्या पण तरीही सोई सुविधा असलेल्या ठिकाणी जाऊन रहावं.

Pages