दंभ - २ (अंतिम)

Submitted by ऑर्फियस on 9 September, 2019 - 11:58

...टाळ्यांचा कडकडाट झाला. कुमारांनी हे सारे आपल्यासाठी अगदी सहज आहे अशा अविर्भावात किंचित हसत हा मान स्विकारला. आणि समोरचा एक कळकट माणूस उठून उभा राहिला.

म्हणाला " मला एक शंका आहे साहेब"

कुमारांनी वर पाहिले. साधे शर्टपँट घातलेला प्रौढ गृहस्थ होता. त्याने त्याची ओळख समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून करून दिली. आडगावच्या का होईना पण कॉलेजचा प्राध्यापक. कुमारांनी त्याला न्याहाळले. प्राध्यापक इतका गबाळा राहतो? त्यानी आपला सारा तिटकारा बाजूला सारला. इथे आता मराठीतच बोलावे लागणार. निश्वास सोडून कुमारांना त्या माणसास बोलण्यास सुचवले.

"साहेब, उद्योगीकरणाचा मुद्दा काही पटला नाही. मार्क्सचे भारताबद्दलचे भाकीत तसे चुकलेच. भारतात कारखानदारी येऊनसुद्धा जातीव्यवस्था दूर झाली नाही. जनातून जाऊन आता ती मनात गेली आणि तिथे तिने ठाण मांडलंय बघा. आता दलितांना शिवतात. त्यांच्या बाजूला बसतात. कारण गाडीत, कामावर, गर्दीत दुसरा पर्यायच नसतो. पण एरवी कामावर त्यांना कसं वागवलं जातं तुम्हाला माहीत असेलच." तो बोलत होता. सेमिनारमधील मंडळी या गबाळ्या माणसाला कुमार कसे गुंडाळणार याची मजा बघायला सावरून बसली होती. कुमारांनी त्याला मध्येच थांबवले. " तुम्हाला काय म्हणायचंय? उद्योगीकरणाने काहीच फरक पडला नाही?"

"अहो खरंच काही फरक पडला नाही. अगदी आंबेडकरांच्यावेळी कपडा गिरणीत दलित नको म्हणून इतर कामगर अडून बसले होते त्यावेळी मार्क्सवादी युनियननी काहीच केलं नाही" तो पोटतिडकीने बोलत होता. " का? तर धागा चो़खून बॉबिनमध्ये भरावा लागतो आणि दलितांची थुंकी त्या धाग्याला लागते." मुद्दा तर बिनतोड होता. कुमारांना लगेच काही बोलायला सुचले नाही. पण त्यांनी किंचित हसून म्हटले " तुम्ही शंभरवर्षापूर्वीच्या गोष्टी करताय. त्यानंतर भारत स्वतंत्र झालाय. आपली घटना आहे. दलितांना संरक्षण आहे. त्यांना सवलती आहेत. आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वीच्याच गोष्टी किती उगाळत राहणार?"

"मी पण तेच म्हणतोय ना साहेब. तुम्ही तरी पूर्वीच्या सवर्ण विरुद्ध दलितांच्या गोष्टी किती उगाळत राहणार आणि लोकांची दिशाभूल करत राहणार? तो म्हणाला फक्त आणि हे ऐकता क्षणी सेमिनारमध्ये गदारोळ उसळला. कुमारांवर असा थेट आरोप आजवर कुणीही केला नव्हता. पण कुमार कच्चे नव्हते. त्यांनी लोकांना शांत होऊ दिले. "जातीव्यवस्था आणि ब्राह्मण्य याबद्दल तुम्ही बाबासाहेबांचे अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण ऐकले असेलच. त्यात त्यांनी काय म्हटलंय माहित आहे ना?

"माहित आहे ना" तो लगेच उत्तारला. "पण या प्रकरणात ते लागु नाही होत. इथे बलात्कार सवर्णांनी केलाच नाहिय ना. तो त्यांच्याच लोकांनी केलाय. हे तरी तुम्हाला माहित आहे का?" त्याचा आवाज आता किंचित चढु लागला. कुमारांना याची माहिती नव्हती. त्यांना हे नेहेमीचं प्रकरण वाटलं होतं. "हे कुटुंब शिक्षणामुळे सधन होऊ लागलं. त्यांच्याकडे काही चांगल्या वस्तु येऊ लागल्या. त्यांच्या जागा जमिनी झाल्या. घरं मोठी झाली. हे त्यांच्यातल्याच काहींना पाहवलं नाही." त्याचा आवाज आता जाणवण्याइतका वाढला. "इथे कुठे आल सवर्ण? कुठे आली जातपात? कुठे आले औद्योगीकरण?" कुमारांना आता हे प्रकरण हाताबाहेर जाईल असे वाटु लागले. आता त्यांनी आपले हुकमी एक्के बाहेर काढायला सुरुवात केली. त्यांनी फर्ड्या इंग्रजीत सुरुवात करून आपण फॅक्ट फाईंडीग टिम कडून आधी कधी सविस्तर माहिती मिळवली वगैरे सांगितले. या प्रकरणात कुठले सामाजिक सिद्धान्त लागु होतात तेही इंग्रजीतच सांगितले.

"पण तुम्ही चुकलात" तो गृहस्थ पुन्हा ठामपणे म्हणाला. " तुमचे स्पष्टीकरण चुकीचे आहे"

असं तुम्हाला का वाटतं? "आता कुमारांचा आवाज तापु लागला. याला आपलं इंग्रजी कळलं असेल?

"कारण बलात्कार करून जिचा खून झाला ती माझी बहिण होती" तो जोरात ओरडला" आणि त्याबद्दल खोटी माहिती देणारे तुम्ही ढोंगी आहात. तुम्हाला या प्रकरणाची काहीच माहिती नाही. तुम्ही पुस्तकी किडे आहात. गाडाभर पुस्तकं वाचून सेमिनारमध्ये बोलणारे आर्मचेयर स्कॉलर्स तुम्ही. तुम्हाला ग्रासरूटलेव्हलवर काय चाललंय याची काहीच कल्पना नाही." संताप आणि हतबलता यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. "तुम्ही अजुनपर्यंत मार्क्समध्येच अडकलात. फुको वाचलात ना? की नाही?"

"त्याचा काय संबंध?" कुमारांनी बोलण्याचा क्षीण प्रयत्न केला. या कळकट माणसाने फुको वाचलाय? त्यांना खरेच वाटेना. पण त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब साचु लागले होते. सेमिनारमधील मंडळी हळुहळु त्याच्या बाजुने होऊ लागली होती.

"अहो त्याचाच तर संबंध आहे. त्याने सांगितलेली पॉवरची कंन्सेप्ट. आता जातीपातीपेक्षा महत्त्वाची आहे पॉवर. ती स्वतः मिळवायची. दुसर्‍याला मिळू द्यायची नाही. त्याला दाबायचं. त्याला कंट्रोल करायचं. हेच तर चाललंय. आमच्या वाट्याला हेच तर आलं. शाळेत शिक्षिका असलेली माझी बहिण. तिने काय कुणाचं वाकडं केलं होतं? फक्त नीटनेटकी राहायला लागली होती. घरात चार वस्तु घेतल्या होत्या. ते बघवलं नाही." पुढे त्याने फुकोच्या एका पुस्तकातला पॉवरबद्दलचा एक परिच्छेद इंग्रजीत घडाघड म्हणून दाखवला. सभा आवकच झाली. कुमारांना आता पायातली ताकद गेल्यासारखे वाटु लागले. समोर कुणीतरी हे सारे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते.

"हे इतकं साधं सोपं नसतं" कुमारांनी आणखी एक गुळमुळीत प्रयत्न करून पाहिला" जात पात या गोष्टी बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या असतात. त्या अशा सोप्या करून पाहता येत नाहीत. त्याला अनेक पदर असतात"

"गप बसा वो तुमि" अचानक गावरान भाषेत तो उसळला "पुस्तकं वाचून आयवरी टॉवरमदी बसून लेक्चर द्यायला जातंय काय तुमचं? आमच्या गावात तुमी आला का? आमच्याशी दोन सबुद बोलला का? कूटनंतरी माहिती मिळवली. आणले त्यात मार्क्स आणि जातपात. ठोकलं लेक्चर. खर्‍याशी याचा कायबी संम्बध न्हाई. समदा ढोंगाडेपना...." त्याचे शब्द अर्धवटच राहिले. कुमारांना चक्कर आली होती. ते मटकन खुर्चीवर बसले होते.

काही मिनिटातच या घटनेचा विडियो युट्युवर आला आणि व्हायरल झाला.

सेमिनार संपले. दुसर्‍याच दिवशी कुमारांनी आपल्या नोकरीचा राजिनामा दिला. अलिकडे ते कुणालाच फारसे भटत नाहीत.

ऑर्फियस

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली होती. कपड्यांवरुन माणसाची परिक्षा करु नये हेच खरं.
शेवट जरा घाईघाईत गुंडाळलात असं वाटलं.

पहिला भाग वाचून अपेक्षा उंचावल्या होत्या. त्या मानाने दुसरा भाग तेवढा नाही आवडला. पुलेशु.

चांगली होती, अजून थोडी फुलवायला हवी होती असे वाटले. पहिल्या भागाच्या मानाने यात थोडी निराशा झाली शेवट खरेच गुंडाळल्यासारखा वाटला

सायो माझ्या कथांमध्ये धक्कातंत्र नेहेमी असेल असे वाटत नाही. कदाचित अगदी पहिल्या ओळीपासून तुम्हाला शेवटी काय होणार याचा अंदाज येईल. आधीच्या एकदोन कथांमध्ये काहींनी अंदाज वर्तवले होते. तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. माझ्या कथेचा शेवट कुणी ओळखला तर मला हिरमुसल्यासारखं होत नाही. पण ओळखा पाहु कोण अशी स्पर्धा असल्याच्या थाटात माणसे खास विपु करून अंदाज सांगतात आणि काय? ओळखलं कि नाही असा त्यांचा थाट असतो तेव्हा गंमत वाटते.
ही कथा जास्त तांत्रिक होईल असे वाटल्याने जरा लवकर संपवली आहे. अशी कथा मी यापूर्वी लिहिली नव्हती. काही सामाजिक सिद्धान्त आणि घटना कितपत आणि कशा स्वरुपात आणाव्यात याबद्दल आता अंदाज येऊ लागला आहे. ही कथा काहींना आवडली काहींना आवडली नाही. परंतू प्रतिसादासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

हम्मम.... कथा म्हणून याकडे पाहू शकत नाही. हे वास्तव आजूबाजूला दिसते आहे. खैरलांजी प्रकरणात जे झाले ते यापेक्षा वेगळे नव्हते. आजवर जो सामाजिक उतरंडीवर खाली होता तो आपल्या पायरीवर येऊ पाहतोय, वर जाऊ पाहतोय हे सहन होत नाही. ही आपली पायरी आपण स्वकर्तृत्वाने मिळवलेली नसूनही तिच्याबद्दलची घमेंड अंगात इतकी मुरलेली आहे की ती संपवणे कठीण वाटते.

माणूस ज्याला प्रगती म्हणतोय ती फक्त भौतिक पातळीवर राहिली. मनाने माणूस दिवसेंदिवस जास्त मागास होत चाललाय. जेव्हा तो जंगलात राहून इतर प्राण्यासारखा स्वतःला टिकवणे व वंश वाढवणे ह्या दोनच गोष्टी करत होता तेव्हाची मानसिकता आणि सर्व प्रकारची भौतिक सुखे असतानाची मानसिकता ह्यांची तुलना करता तेव्हाची मानसिकता खूप प्रगत आणि आजची अतिमागास म्हणायला हवी.

पण ओळखा पाहु कोण अशी स्पर्धा असल्याच्या थाटात माणसे खास विपु करून अंदाज सांगतात आणि काय? ओळखलं कि नाही असा त्यांचा थाट असतो तेव्हा गंमत वाटते.>> Happy

सत्य आणि वस्तुस्थिती धरून शेवट केला आहे. दलितांमध्ये ब्राह्मण असे नवश्रीमंत दलितांना काही लोक संबोधतात. फक्त स्वत:च्या, मुला बाळांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन समाजबांधवांविषयी उदासीन असणं आजकाल ठळकपणे समोर येते आहे. आपली मुले परदेशात शिकायला पाठवून मागास लोकांना अन्याय होतो म्हणून भडकवायचे कामही काही मंडळी करत असतात.

आवडली Happy

अजून फुलवता आली असती ह्याच्याशी सहमत!

पहिल्या भागावर प्रतिसाद दिला नाही कारण लगेच दुसराभग दिसल्यावर वाचायची उत्सुकता थांबवता आली नाही. दीर्घ कथा आवडली. प्रो कुमारांचं व्यक्तिचित्रण मस्त जमलं आहे. एवढ्या सगळ्या प्रतिसादात माझाच एकमेव अपवाद..... मला नाही वाटत की अजून फुलवायची आवश्यकता आहे. जेवढं लिहिलं तेवढ्यात प्रसंग आणि त्यातल्या व्यक्ती छान चित्रित केल्या आहेत. मुद्दा व्यवस्थित समजला.

जेवढं लिहिलं तेवढ्यात प्रसंग आणि त्यातल्या व्यक्ती छान चित्रित केल्या आहेत. मुद्दा व्यवस्थित समजला.
धन्यवाद मीरा Happy