दंभ - १

Submitted by ऑर्फियस on 6 September, 2019 - 19:45

प्रा.डॉ. कुमार आज फार खुशीत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनारचा आज शेवटचा दिवस होता. समाजशास्त्रात कुमारांचा दराराच इतका होता की त्यांनी बोलावल्यावर अगदी देशोदेशीचे विद्वान रीसर्च पेपर वाचण्यासाठी आले होते. सारे काही सुरळीत पार पडले होते. काल कुमारांनी आपले अलिकडले संशोधन मांडले. त्यावेळी तर तूफान गर्दी झाली होती. मार्क्सवाद आणि अंतोनिओ ग्रामशीच्या हेजेमनीशी तूलना करीत त्यांनी सांस्कृतिक वर्चस्वाविषयी आपले मत दिले. टाळ्यांचा नुसता कडकडाट चालला होता. देशोदेशीचे बुजूर्ग संशोधक पसंतीने माना डोलवत होते. पेपर संपल्यावर प्रकाशनाबद्दलही विचारणा झाली. जागतिक दर्जाची प्रकाशन कंपनी त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी उत्सुक होती. त्यांचा प्रतिनिधी तेथे त्यांना भेटण्यासाठी आला होता. या आधी कुमारांची अकरा पुस्तके त्याच प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती. इतक्या प्रसिद्ध माणसाला शत्रू नसतील असे शक्य नव्हते. काल कुमारांना अडचणीचे प्रश्न विचारून त्यातल्या काहींनी घेरण्याचा प्रयत्न केला होता पण कुमार या विद्वानांवर वाघासारखे तुटून पडले होते. त्यांचे सारे आक्षेप त्यांनी चिंध्यांसारखे टरकावून फेकून दिले. विरोधक पूर्णपणे नामोहरम झाले होते.

अशावेळी त्वेषाने प्रतिपक्षावर हल्ला करणे कुमारांना आवडत असे. कुणालाही ते कसलिही दयामाया दाखवित नसत. एखाद्या योद्ध्याप्रमाणे त्यांचा आवेश असे. एखाद्या कसलेल्या वकीलाप्रमाणे ते बिनतोड युक्तीवाद करीत. काल तर कुणीतरी त्या सार्‍या घटनेचा विडियो काढून यू ट्युबवर टाकला होता आणि तो व्हायरल झाला होता. हे सारे कुमारांना आवडायचे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आदर, धाक, बरोबरीच्या प्राध्यापिकांच्या नजरेतील प्रशंसा, काही प्राध्यापकांच्या चेहर्‍यावरील असुया हे सारे त्यांना आवडायचे. त्यांना ती आपल्या हुशारीची पोचपावती वाटायची. आज शेवटच्या दिवशी एकच सेशन होते आणि त्यात महाराष्ट्रात अलिकडेच घडलेल्या बलात्कार प्रकरणाची चर्चा होती. कुमार त्याचे सूत्रधार असणार होते. त्या घटनेतील काही मंडळी, त्या भागातील काही प्राध्यापक चर्चेसाठी बोलावले होते. कुमारांनी या चर्चेसाठी आज खास भारतीय पोषाख चढवला होता. त्यात त्यांचे देखणेपण आणखिनच उठून दिसत होते. या चर्चेत बोलण्यासारखे फारसे नव्हतेच. कुमारांना ही चर्चा कुठल्या दिशेने जाणार आणि शेवटी आपण समारोप कसा करणार हे जवळपास ठावूक होते. कुमारांस नजरेमोर तीन महिन्यानंतर होणारी जर्मनीतील कॉन्फरन्स तरळत होती. फार महत्त्वाची माणसे तेथे येणार होती.

त्यांची पांढरीशूभ्र कार कॉलेजच्या दिशेने धावु लागली आणि कुमार विचारात बुडाले. आजच्या दिवसाचा विचारही त्यात नव्हता. त्यांच्या मनात पुढची आखणी होती. आणखि दोन वर्षांनी निवृत्त व्हायचे होते. आधीच अमेरिका आणि युरोप मधून तीन ऑफर्स आल्या होत्या. दोन्ही मुले सिलिकॉन व्हॅलित सेटल झाली होती. मालती बॅंकेतील मॅनेजरची नोकरी सोडून आपल्या बरोबर आरामात येईल. कुमार मनोमन हसले. मालतीने आपल्या कुठल्याही इच्छेला आजवर नकार दिला नाही. कुमारांकडे प्रशंसेने पाहणार्‍या स्त्रिया, कुमारांच्या देखणेपणावर आणि बुद्धीमत्तेवर भाळलेल्या स्त्रिया या मालतीबाईंच्या नेहेमीच्या चिंतेचा विषय होता. त्यामुळे कुमारांचा कुठलाही शब्द त्या खाली पडू देत नसत. कुमारांनीही ही परिस्थिती बदलण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. मालतीबाईंना या तणावाखाली ठेवणे त्यांना आवडायचे. त्यामुळे ते आपल्याला हवं तसं वागु शकत. कॉलेज जवळ येऊ लागले तसा कुमार पुन्हा भविष्याचा विचार करु लागले. अमेरीकेला अनेकदा जाणे आणि राहणे झाले होते. मुलांकडे तर जाणे नेहेमीचे होते. पण व्याख्यानाच्या निमित्ताने, सेमिनार्सच्या निमित्तानेही अमेरिका कुमारांनी पालथी घतली होती. युरोप मात्र पूर्णपणे हिंडून झाला नव्हता. तेथेच जावे काही वर्ष. गाडी कॉलेजमध्ये शिरली.

आज सेमिनारचा शेवटचा दिवस होता. गर्दी जबरदस्त होती. बलात्कार प्रकरणी चर्चा होती. पोलिस बंदोबस्त होता. गाडीतून उतरून कुमार थेट सेमिनार हॉलकडेच चालु लागले. समोर समोरच प्रिंसिपॉल कुलकर्णी होते. नावाचेच प्रिंसिपॉल. कुमार मनातून या कणा नसलेल्या माणसाची कीव करीत. मॅनेजमेंट,विश्वस्त, सारेजण कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी कुमारांचा सल्ला घेत. कुलकर्णीं फक्त रबरस्टॅम्प होते. "वेल डन डॉक्टर" कुलकर्णींनी कुमारांशी हात मिळवला. "काल भेटू शकलो नाही. काल तुम्ही जबरदस्त बोललात. रात्री पुन्हा घरी जाऊन विडियो पाहिला. ब्रिलियंट." "थॅंक्यु" कुमार नेहेमीचे ठेवणीतले सराईत हसले. आणि हॉलकडे चालु लागले. कुमार हॉलमध्ये शिरताच टाळ्यांचा कडकडाट झाला. माणसे उभी राहिली. सार्‍यांच्या चेहर्‍यावर आदर, प्रशंसा होती. कुमारांनी आधी गर्दीकडे पाहिले. बरीचशी मंडळी खेडेगावातली दिसत होती. कुमारांचे मन पुन्हा नव्याने विटले. त्यांनी चेहर्‍यावर ते न आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पॅनलमध्ये तर खेडवळ प्राध्यापकच दिसत होते. काय तो ड्रेस, काय ते तेल लावलेले चपचपीत केस. आंतरराष्टीय सेमिनार्समध्ये यायचं तरी कळकटपणा तसाच.

कुमारांच्या मनात या जमातीवियषी एकंदरच मूक तिरस्कार होता. आधी इंग्रजीची बोंब आणि पुन्हा शहरातली माणसं आम्हाला संधी देत नाही असं ही माणसे ओरडणार. अरे देवा यांच्या बरोबर दोन तास घालवायचेत. कुमारांनी निश्वास सोडला आणि सेशनची औपचारिक सुरुवात केली. एकेक वक्ते उठून बोलु लागले. कुमारांना यात रस नव्हता. हे बलात्कार प्रकरण त्यांना माहित होते. अशी असंख्य प्रकरणे त्यांनी पाहिली होती आणि असंख्य व्याख्याने त्यांनी ऐकली होती. ही माणसे काय बोलणार याचा अंदाज त्यांना होताच. उच्चवर्णीयांना शिव्या, पोलिसांना शिव्या, सरकारला शिव्या. आणखि काय असणार त्यात? तेच सारं समाजशास्त्रीय भाषेत आणि अत्यंत सफाईदार इंग्रजीत कुमार शेवटी मांडून सेशनचा समारोप करणात होते. अधून मधून एखाद दुसरे वाक्य ऐकून ते कागदावर काहीतरी लिहित. बाकीवेळ त्यांच्या मनात युरोपच घोळत होता. शेवटी पुन्हा टाळ्या वाजल्यावर कुमार भानावर आले. ते बोलण्यासाठी उठल्यावर एवढ्या मोठ्या हॉलमध्ये अगदी शांतता पसरली. कुमारांनी एकेका वक्त्याचे नाव घेत त्याचे आपल्याला काय पटले, काय पटले नाही हे थोडक्यात सांगितले. जाणकारांच्या माना पसंतीने हलू लागल्या.

हे कुमारांसाठी अगदी सहज होते. ज्यांनी समस्येच्या आर्थिक बाजूकडे लक्ष दिले नसेल त्यांना मार्क्सवाद सांगून आर्थिक बाजू महत्त्वाची कशी हे ते सांगत. ज्यांनी फक्त आर्थिक बाजूच मांडली असेल त्यांना ते सांस्कृतिक मुद्दा या समस्येत किती महत्त्वाचा आहे ते सांगत. ज्यांनी दोन्ही गोष्टी मांडल्या असतील त्यांच्याबाबतीत कुमार त्यांच्या संशोधनात स्त्रियांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाले आहे असा आक्षेप घेऊन फेमिनिझमचे गोडवे गात. सार्‍या भूमिका संतूलितपणे मांडणारा अगदी दुर्मिळ असे. आणि असा कुणी एखादा असला तरी ऐनवेळी कुमार बारीकसा मुद्दा काढून आपला आक्षेप नोंदवित असत. आक्षेप मांडला की विद्वत्तेला झळाळी येते हे त्यांना पक्के ठावूक होते. सगळंच मान्य असेल तर का मजा? असा एकेकाचा समाचार घेतल्यावर त्यांनी स्वतःचे मत मांडायला सुरुवात केली. त्यांनी भारतातील प्राचिन जातीव्यवस्था आणि बाह्मणांच्या वर्चस्वाचा उल्लेख केला. त्यानंतर ते जमिनदारीकडे वळले. पुढे कारखानदारीच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला. जेथे बलात्कार झाला होता तो भाग कसा मागासलेला आहे याचे विश्लेषण त्यांनी केले. त्या भागात कारखानदारी नसल्याने प्रगती कशी नाही हे सांगितले. औद्योगिक भरभराट नसल्याने जातीव्यवस्था अजूनही कशी बळकट आहे यावर तर त्यांनी जास्त भर दिला. शेवटी या सार्‍याचे खापर थोडेसे सरकारवर, थोडेसे पोलिसांवर आणि बरेचसे उच्चवर्णियांवर फोडून ते खाली बसले. खरं तर यातले बरेचसे मुद्दे आधी बोलणार्‍या वक्यांच्या पेपरमध्ये आले होते. पण कुमारांची बोलण्याची हातोटी अशी होती की हे विश्लेषण सर्वांना अगदी नवे वाटले. टाळ्यांचा कडकडाट झाला. कुमारांनी हे सारे आपल्यासाठी अगदी सहज आहे अशा अविर्भावात किंचित हसत हा मान स्विकारला. आणि समोरचा एक कळकट माणूस उठून उभा राहिला.

म्हणाला " मला एक शंका आहे साहेब"

(क्रमशः)

ऑर्फियस

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप आभार. दुसरा भाग टाकला आहे. हा अंतिम भाग आहे. माझ्या यापुढील कथा बहुधा आणखी दीर्घ होत जाणार असे वाटते. कारण मला थोडक्या शब्दात लिहिताच येत नाही. या कथा कदाचित कंटाळवाण्या आणि रटाळही होतील. मंडळी वाचतील तोपर्यंत लिहेन येथे.

> माझ्या यापुढील कथा बहुधा आणखी दीर्घ होत जाणार असे वाटते. कारण मला थोडक्या शब्दात लिहिताच येत नाही. या कथा कदाचित कंटाळवाण्या आणि रटाळही होतील. मंडळी वाचतील तोपर्यंत लिहेन येथे. > दीर्घ कथादेखील आवडतात लोकांना, पण जास्त उशीर न करता नियमीतपणे भाग येत राहावेत आणि कथा पूर्ण करावी ही अपेक्षा असते. लिहीत रहा. छान लिहता तुम्ही.

माझ्या यापुढील कथा बहुधा आणखी दीर्घ होत जाणार असे वाटते. कारण मला थोडक्या शब्दात लिहिताच येत नाही. कथा कदाचित कंटाळवाण्या आणि रटाळही होतील. मंडळी वाचतील तोपर्यंत लिहेन येथे.>>>

मोठ्याच लिहा हो. शशक प्रकरण न झेपणारे आहे. काही एनलाईटनड लोक कथा उलगडून सांगत नाहीत तोवर काहीही कळत नाही. तुम्ही 10 भाग टाकले तरी चालतील, फक्त ते पटापट टाकावेत ही अपेक्षा. Happy Happy

सुरुवात मस्त!!

तुम्ही लिहा हो ओरफियस, 22 प्रकरणाच्या कादंबऱ्या आहेत इकडे.