खोटं न बोललेला माणूस -आफ्रिकन लोककथेचा स्वैर अनुवाद

Submitted by रमणी on 5 September, 2019 - 15:10

कोकणे एखडके काकरळी एखडक मामाद नामवाचा अमाकत्यंत हुकाशार माकणुस...

काय म्हणालात? कळलं नाही! अरे हो! विसरलेच. मराठीतून सांगते ही झुलू लोककथा.

तर, कोणे एके काळी एक ममाद नावाचा अत्यंत शहाणा माणूस आफ्रिकेच्या दक्षिण भागात राहायचा. 'कधीही खोटं न बोलणारा माणूस' अशी त्याची देशभरात ख्याती होती. अगदी आपल्या धर्मराज युधिष्ठिरासारखीच. लोक आपण खरं बोलतो आहोत असं सिद्ध करण्यासाठी 'कधीही खोटं न बोलणाऱ्या ममादची शपथ' असं म्हणत. आणि अशी शपथ घेतली तर समोरचा माणूस खरं बोलत आहे अशी ऐकणाऱ्याची खात्रीही पटायची, इतका ममाद सत्यवचनी होता.

ममाद त्याच्या देशातील राजाकडे मंत्री म्हणून काम बघायचा. अत्यंत चोख कारभार आणि सदैव सत्यवचनी अश्या आपल्या मंत्र्यांवर राजा खुश नसेल तरच नवल. राजा नेहमीच आपल्यासोबत ममादला घेऊन जायचा. त्याचा सल्ला राजाला खूप महत्त्वाचा वाटे.

एके दिवशी राजाला वाटले की आपल्या सत्यवचनी ममादच्या शहाणपणाचीही परीक्षा घ्यावी.
राजाने त्याला विचारलं, "मित्रा ममाद, तू नेहमीच खरं बोलतोस ना?"

" अलबत हुजूर!" ममाद चटकन उत्तरला.

" तुझी खात्री आहे का, प्रत्येक परिस्थितीत तू खरंच बोलत राहू शकतोस? कारण असत्य नेहमी लबाड कोल्ह्याप्रमाणे असते. अगदी हलक्या पावलांनी ते तुमच्या डोक्यात प्रवेशते, बुद्धी नासवते आणि जिभेवरून उतरते. त्याची चाल समजणं खूप मुश्किल असतं रे!", राजाने परत प्रश्न केला.

"आपण सावधगिरीचा सल्ला दिलात त्याबद्दल आभारी आहे खाविंद. ज्याप्रमाणे राजहंस पाणी आणि दुधाच्या मिश्रणातील फक्त दूधच पितो तशीच निरक्षीरविवेक बुद्धी मी सत्य आणि असत्य जाणून घेण्यासाठी माझ्यात नेहमीच जागृत ठेवतो." ममाद नम्रपणे म्हणाला.

"भले तर! तुझा निरक्षीरविवेक नेहमीच जागृत राहो!" आकाशातल्या देवाकडे हात उंचावीत राजा म्हणाला खरा, पण त्याच्या डोक्यातला शंकेचा किडा काही केल्या वळवळ थांबवेना.

काही दिवसांनी राजाने ममादची परीक्षा बघायचे ठरविले. त्याने राज्याच्या सीमेजवळच्या जंगलात शिकारीसाठी जायचे ठरविले. त्याप्रमाणे रात्री सगळा जामानिमा घेऊन जंगलाबाहेरील वनमहालात राजा, राणी, ममाद आणि इतर काही मंत्री पोहोचले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा आणि मंत्री आपल्या सेवकांसह शिकारीसाठी तयार होऊन पागेपाशी आले.

राजाने आपल्या आवडीच्या घोड्याचा लगाम त्याच्या मोतद्दाराकडून आपल्या हातात घेतला, घोड्याच्या मानेवर एक थाप मारली. त्यासरशी घोड्याने फुरफुरून राजाकडे पाहिले. सगळे उद्गारले, " वाह चांगला शकुन!"

मग राजाने घोड्यावर आरूढ होण्यासाठी आपला डावा पाय रिकेबीत अडकविला, उडी मारून तो घोड्यावर बसणार तोच कसलासा विचार मनात येऊन तो थांबला.

रिकेबितला पाय तसाच वर ठेऊन मिशीला पीळ भरत त्याने ममादकडे पाहिले. ममाद पुढे आला आणि मुजरा करून तो म्हणाला, " बोला सरकार!"

"मला वाटतं, आज उत्तम शिकार होणार आणि आज दुपारपर्यंत आम्ही परत येणार खास. तेव्हा ममाद, तू आमच्या राणीसरकरांना कळव की आम्ही आज रात्री त्यांच्या आणि सगळ्या मंत्र्यांसमवेत जेवण घेऊ. तर त्यांना शाही मेजवानीची तयारी करावयास सांग. आणि तू स्वतः शिकारीस न येता मेजवानीच्या आयोजनात राणीसाहेबांना मदत कर." राजाने आपला निरोप सांगितला.

"अवश्य सरकार." ममाद म्हणाला आणि महालाकडे जाण्यासाठी मागे वळला.

ह्यांनातर राजाने मनाशी विचार केला, 'आता मी शिकार करण्यात संध्याकाळ होऊ देईन आणि जंगलातच राहुटी लावून आम्ही सारे राहू. उद्या सकाळीच वनमहाली परत येऊ. म्हणजे ह्या खेपेला ममादकडून खोटे बोलण्याचा प्रमाद नक्की घडणार.' गालातल्या गालात हसत त्याने घोड्यावर मांड टाकली.

इकडे ममादने राणीची भेट घेतली. तो तिला म्हणाला, " राणी सरकार, राजन आज उत्तम शिकार होण्याच्या उमेदीने दुपारपर्यंतच परत येण्याचे मनसुबे रचित होते. त्यांचा निरोप आहे की आपण दोघांनी मिळून शाही मेजवानीची जय्यत तयारी ठेवावी. ते वेळेत परतले तर रात्री मेजवानी होऊ शकेल आणि आपण केलेली तयारी उपयोगी पडेल. ते परतले नाहीत तर आज रात्री मेजवानी होणार नाही . "

" ममाद, मला नक्की सांग आज रात्री शाही मेजवानी होणार आहे की नाही?" राणीने गोंधळून जाऊन विचारलं.

"मला ठाऊक नाही महाराणी. मला त्यांनी निरोप देऊन पाठविले तेव्हा त्यांनी डावा पाय रिकीबेत अडकविला होता. त्यांनतर त्यांनी घोड्यावर मांड टाकून जंगलात धडक मारली की नाही, त्यांना उत्तम शिकार मिळणार आहे की नाही आणि जंगलातच उशीर होऊन ते राहुटीत राहणार आहेत की नाही हा सगळा शक्यतांचा खेळ आहे. कारण प्रत्यक्ष बघितल्याखेरीज ह्या गोष्टींची खातरजमा होऊ शकत नाही." ममाद उत्तरला.

"ठीक आहे, आपण मेजवानीची कच्ची तयारी ठेऊ, बाकी तयारी महाराज आल्यावर एक दोन तासांत आवरू. आज रात्री वा उद्या रात्री कधीही मेजवानी होवो." राणीने आज्ञा दिली.

दुसरे दिवशी सकाळी आपल्या गुप्त बेताप्रमाणे जेव्हा राजा परतला, तो उत्सुकतेने आपल्या राणीवशात गेला. राणीला गाठून म्हणाला, " ममादच्या खोट्या निरोपाने काल आपला अन्ननियोजनात अगदीच विचका झाला असेल नाही?"

"छे छे! हुशार ममाद! उलट आज रात्रीच्या मेजवानीचे नियोजन मला अगदी सोपे होईल त्याच्या नेटक्या निरोपामुळे." राणी उत्तरली. पुढे तिने मामादने तिला नेटका निरोप कसा सांगितला ते राजाला ऐकवले.

राजा मनात आपल्या ह्या मंत्र्यावर अगदी खुश झाला आणि समजून गेला, "खोखरा हुकाशार लोटरकोक कदारधी खोमखोटा बोखलात नाकारहीत."

तुम्हाला पण समजलंच असेल ना?
बरोब्बर!
"खरे हुशार लोक कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलत नाहीत."

Group content visibility: 
Use group defaults

पाषाणभेद, Biggrin
अमी, वावे, अमर धन्यवाद _/\_