प्रयत्नांती चंदग्रहण

Submitted by _तृप्ती_ on 29 August, 2019 - 02:13

आमच्या घरी सकाळी इतकी गडबड, धावाधावी असते की भारताचे पंतप्रधान जरी आले ना तरी त्यांना सुद्धा चहा मिळण्यासाठी थांबावं लागेल. माझी शाळा, चिंत्याची शाळा, बाबांची कामाला जायची गडबड. यात आजी ठरलेल्या वेळेस आप्पाना देवपूजेला बसवणार म्हणजे बसवणारच. खरं म्हणजे आप्पाना काही घाई नसते पण ते तरी आजीपुढे काय करतील. एकदा ते म्हणाले, " अगं देव काही पळून नाही जात. त्यांना सावकाश आंघोळ घालू." तर आजीने हे काही मोठे डोळे केले की आप्पा म्हणाले, "अगं असं मला स्वप्न पडलं ग. मी बसतोच आहे पूजेला. तुझी पूजेची तयारी झाली ना?" मग आजी तोऱ्यात विजयी मुद्रेने आत निघून गेली. जाता जाता म्हणाली, “तयारी केव्हापासून पुजाऱ्याची वाट बघते आहे. पुजारी आला म्हणजे ते देवचं धन्य होतील हो माझे." त्यात आई बिचारी सगळ्यांचा स्वयंपाक करत असते. कोणाचा नाश्ता, कोणाला दूध, कोणाचा डबा. मी आणि चिंत्या शाळेत जाताना रोज वरणभात खाऊन जातो. कधी कधी इतका गोधळ होतो आईचा की, मला दोनदा तूप वाढते आणि चिंत्याला तुपचं वाढत नाही. त्यात ताराबाई आल्या की मग त्या गोधळात अजून भर. त्या एकदा अंगण झाडतात, मग बाहेर भांडी घासतात आणि अजून काही काही करत असतात. पण हे करताना त्या इतक्या इकडून तिकडे येडछापसारख्या फिरत असतात. आई तर म्हणते यांची मदत कमी आणि बडबड जास्त. आणि त्याच वेळेस जर कोणी ओसरीवर आलं तर मग झालंच. त्या माणसाला आम्ही सगळे म्हणजे त्या मुंग्यासारखे वाटत असू, सारखे इकडून तिकडे काहीतरी नेणारे. पण मुंग्या तर एका रांगेत चालतात आम्ही तर दाही दिशांना फिरत असतो. मला आपलं आम्ही सगळे मुंग्यासारखे एका रांगेत चालायला लागलो तर कसे दिसू ह्याने गंमतच वाटली. पण हे विचार करत बसणं काही खरं नाही. माझं हे असंच होतं. काहीतरी सुचलं की मी येडछापसारखी कुठेतरी तंद्री लावून, मान तिरकी करून, केसांशी खेळत कितीतरी वेळ अशीच बसून राहते. आणि असं चित्र बघत बसते. किती वेळ वाया जातो आणि मग कोणाचे तरी ओरडे खावे लागतात. पण काय करणार मला कळतच नाही, माझी मान कधी तिरकी होते आणि मी कधी केसांशी खेळत बसून राहते. आई तर इतक्या वेळा पकडते मला आणि म्हणते, " सरु, आता केस हातात येतील बघ." आणि सगळे हसतात. आत्ता अशीच तंद्री लागणार होती पण तेवढ्यात आईची हाक आली म्हणून बरं.
मी पटकन दप्तर भरायला घेतलं आणि मटकन खालीच बसले. एकदम आठवलं. विज्ञानाच्या बाईनी दिलेला गृहपाठ मी पूर्णपणे विसरले होते. आता मला समोर दिसायला लागलं होतं सगळा वर्ग भरला होता. एकेकजण आपली वही बाईना देत होतं. माझ्याकडे वहीत गृहपाठच नाही. मग सगळ्या वर्गात मी एकटीच उभी. सगळेजण माझ्याकडे वळून वळून बघत होते. एवढ्यात आईची हाक आली आणि मी तिला घाईघाईने सांगितलं, "आई, मला वरणभात नकोय आज." मग काय बसले गृहपाठ करायला. ताराबाई म्हणतात तसं मला पण वाटलं, माझं नशीबच फुटकं. नेमका आजचा गृहपाठ इतका अवघड. दोन दिवसापूर्वी बाईनी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण शिकवलं होतं. त्याची आकृती काढायची होती. मला तर वाटलं सगळ्या वहीवर नुसते तारे चमकायला लागले आहेत आणि सूर्य, चन्द्र सगळे लपाछपी खेळतायत. तरी मी पुस्तकात डोकं घातलं आणि त्या पुस्तकातलं माझ्या डोक्यात काही जातंय का ते पाहील. पण डोकं पुस्तकावर आपटण्याशिवाय माझ्या डोक्यात काही जाईचना. तरीही मी पेन्सिल घेऊन फराफरा काहीतरी काढलं. मला ते अजिबातच जमलं नव्हतं. आणि आमच्या देशमुखबाईना तर ते अजिबातच पटलं नसतं. पण आता जर वेळेत पोचले नसते तर शाळेत उशिरा येण्याबद्दल छड्या खायला लागल्या असत्या. त्यामुळे होतं तसं दप्तर भरलं आणि आमच्या वाड्याच्या अजस्त्र दारातून मी धुमचकाट धावत सुटले. धावत धावत शालूच्या घरापाशी पोचले. ती थांबलीच होती वाट बघत. "काय ग. किती उशीर. मला तर वाटलं छड्याच पडणार आज." आम्ही दोघीही मनातल्या मनात देवाचा धावा करत, धावतच सुटलो. वाटेत बघणाऱ्या लोकांना वाटत असेल की आमच्या मागे वाघचं लागला आहे. त्या मधल्या बोळात तर आम्ही दोघी शिरायला आणि एक सायकलवाला पलीकडून यायला एकच वेळ. मग काय पडला तो धाडकन. येडछापच होता. दिसलं नाही का त्याला दोन बिचाऱ्या मुली, एवढं दप्तर घेऊन, धावत धावत शाळेत चालल्या आहेत ते. कश्याबश्या शाळेपाशी पोचलो आणि पटकन प्रार्थनेच्या मुलींच्या रांगेत उभ्या राहिलो. शाळा अजून भरतच होती. जेमतेम पोचलो होतो. मला तर धावून धावून इतकी धाप लागली होती की असं वाटलं आता श्वासच घेता येणार नाही, तर प्रार्थना कशी म्हणणार. खरं तर मला मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणायला खूपच भारी वाटतं. म्हणजे एरवी कोणी इतक्या मोठ्याने काही बोलू देत नाही. पण आज माझा आवाजच फुटेना. म्हणजे मला तर शंकाच आली की मी मुकी वगैरे झाली की काय. अरे बापरे हे काय झालं. पण जरा बरं वाटलं. कारण मुक्या मुलीला देशमुखबाई काही ओरडणार नाहीत. नको नको. असं कसं चालेल. मग मी मधल्या सुट्टीत गोष्टी कश्या सांगणार. एवढ्यात कानावर आवाज आला, "जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे." हे दोनदा आलं म्हणजे संपली की प्रार्थना आणि तरी मी काहीच शब्द तोंडातून काढला नाही. म्हणजे मी खरंच मुकी झाले की काय? आता मला भीतीच वाटायला लागली. मला बोलता येत नाहीये हे सांगायचं तरी कसं. आता प्रार्थना झाल्यावर राष्ट्रगीत. तोपर्यँत माझं काय होणार? पण रांगेतून जरा सुद्धा हलायची सोय नव्हती. जरा जरी हललं तरी लोखण्डे सरांना नक्की दिसतं. मला वाटतं त्यांना शंकरासारखं तिसरा डोळा आहे किंवा असे अजून ७ तरी डोळे असतील. सगळंच कसं दिसतं त्यांना? "भारत माता की" आणि "जय" असं म्हटलं की मी मोठयांनी. म्हणजे मी मुकी नाहीये. मग मी परत एकदा उगीचच "जय" असं म्हणून पाहिलं. तर सगळे माझ्याकडे काय येडछापच आहे, असे बघायला लागले. असू देत पण म्हणजे मला बोलता येत होतं आणि सगळयांना ते ऐकू पण जात होतं. पण म्हणजे देशमुखबाई आज ओरडणार. मला एकदम कसतरीच व्हायला लागलं. असं वाटलं पोटात काहीतरी वळवळत आहे.
आम्ही सगळे रांगेने वर्गात गेलो. मला आज का कोणास ठाऊक शाळा सुरूच होऊ नये असं वाटतं होतं. मी दप्तर पण जागेला ठेवलं आणि बाकावर डोकं ठेवून बसले. पहिला तास मराठीचा होता, मग गणित, इतिहास मग मधली सुट्टी आणि मग तो दुष्ट विज्ञानाचा तास होता. मला तर पोटात एकदम कळच आली. आज सगळी मुलं मुली किती दंगा करत होती. तो ढोल्या तर किती जोरात बोलत होता. म्हणजे त्याचं खरं नाव आहे जगदीश. पण जगदीश म्हटलं तर कुणाला कळतच नाही. आज काय तर म्हणे त्याने विमान केलं होत आणि विज्ञानाच्या तासाला ते विमान पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार का? या विषयावर तो आणि चिक्या किती बोलत होते. बोलत कसले भांडत होते. ती पुढच्या बाकावरची शुभी आज इतकी नटून का आली होती काय माहित. कशी सारखी तो अबोलीचा गजरा इकडून तिकडे करत हसत होती. आणि त्या सुमीला काय झालाय एवढं? केव्हाची कुठलीतरी वही सगळयांना दाखवत फिरते आहे. शालू म्हणाली, कसली तरी पानं गोळा केली आहेत आणि वहीत चिकटवून आणली आहेत. आज बाईना दाखवायला आणली आहे. शालू म्हणे, "अगं कसं छान अक्षर काढून पानांची नावं लिहिली आहेत. बघ एकदा." शालूला तरी काय त्यात कौतुक. आमच्या अंगणात तर पालाच पडलेला असतो. एवढ्यात बाई आल्या. त्यांनी हजेरी घेतली. मला तर वाटत होतं की मी आज घरीच थांबायला हवं होतं. इतकं पोटात दुखत असेल तर कशाला यायचं नं शाळेत. बाईनी कविता शिकवायला घेतली आणि वेळ कसा भुर्रकन निघून गेला. मी विसरूनच गेले की माझ्या पोटात दुखतंय ते. वेळ इतका पटकन गेला की मधली सुट्टी पण झाली. मी शालूला म्हटलं, “काय गं, आज देशमुखबाई दिसल्या नाहीत ना गं? मला तर वाटत आज काही विज्ञानाचा तास होणारच नाही." ती म्हणे, " वेडीच आहेस. अगं प्रार्थनेच्या वेळेस होत्या की पुढेच उभ्या. दिसल्या नाहीत का तुला." माझ्या पोटात अचानक गडबडच सुरु झाली. खरं तर मला आता डबा सुद्धा खायची मुळीच म्हणजे मुळीच इच्छा नव्हती. पण शालू म्हणाली आज तिने आळूची वडी आणली आहे. मग सगळ्याजणी बसलो आणि कसाबसा डबा खाल्ला. लंगडी पाणी खेळलो आणि मधली सुट्टी संपली. सगळे पटापट वर्गात आले. परत दंगा करायला लागले. जणू काही लढाईच सुरु होती. आमच्या वर्गातले मुलं, मुली सगळे आज मावळे असल्यासारखे इकडून तिकडे धावत होते. एका जागी त्यांना कधी बसताच येत नाही. शिवाजी महाराजांना जर हे मावळे मिळाले असते तर त्यांनी औरंगजेबाला कधीच पळवून लावलं असतं आणि या सगळयांना एक एक गड बक्षीस म्हणून दिला असता. असलं हे सैन्य होतं आमच्या वर्गाचं. एकदम येडछाप. एवढ्यात मला खिडकीतून औरगंजेब येताना दिसला. मला वाटलं आता आमच्या सैन्याला सावध करायला हवं. पण हे काय? हा औरंगजेब तर माझ्याकडे बघून हसत होता. मग माझ्या लक्षात आलं की या तर देशमुखबाई आहेत. आमचं वर्गातलं सैन्य पण गायब झालं होतं आणि एक साथ नमस्ते करून आपल्या आपल्या जागेवर बसलं होतं. बाईनी पुस्तक टेबलवर ठेवलं आणि खडू हातात घेतला. "दोन दिवसांपूर्वी आपण काय शिकलो?" मग आमच्या वर्गातली ४-५ हुशार मुलं लगेच हात वर करून "मी सांगू", "मी सांगू" करायला लागली. शुभी तर सारखी पहिल्या बाकावर बसते आणि दुसऱ्या कुणाला बोलूच देत नाही. पण बाईनी मागच्या बाकावरच्या चंदूला उभं केलं, " चंद्रकांत, तू सांग." चंद्याचं लक्ष खिडकीतून बाहेरच्या ग्राऊंडवर. त्याला काय कळलंच नाही. तो येडछापसारख, " बाई, मी नाही काही म्हटलं. मी गृहपाठ पण केला आहे. " सगळे फी-फी करून हसायला लागले. चंद्याला काय कळेचना. त्यानं शेजारच्या बगळ्याकडे पाहिलं.बगळ्यानं नाकावर घसरलेला चष्मा सांभाळत, चंद्याला खाणाखुणा करायला सुरवात केली. आमच्या सगळ्या वर्गाला कळलं बगळ्या काय सांगतॊय पण चंद्याला नाही म्हणजे मुळीच कळेना. एवढयात आमचा औरगंजेब पोचला ना चंद्याजवळ. सगळा वर्ग पुन्हा फी-फी करायला लागला. मग औरंगजेबाने म्हणजे देशमुखबाईनी बगळ्याला उभं केलं. "तुम्ही आता सगळ्या वर्गालाच सांगा." मग बगळ्या सुरु. त्याने जसं ग्रहण हा शब्द उच्चारला तसं माझ्या पोटात पुन्हा काहीतरी वळवळायला लागलं. पुढे काही ऐकूच येईना. मग शालू कोपराने ढकलून ढकलून मला खुणा करत होती. मी तिला "काय आहे" म्हणून ओरडले. तर देशमुखबाई माझ्याकडेच बघत होत्या. आत्ता मला कळलं शालू कोपराने का ढकलत होती. "सरस्वती, वर्गातल्या खिडक्या या हवा येण्यासाठी आहेत. सतत बाहेर बघण्यासाठी नाही. सगळया वर्गाने गृहपाठ जमा केला. आपली वही कुठं आहे?" मला परत मी मुकीच झाली आहे असं वाटलं. मी पटकन दप्तरामधून वही काढली आणि बाईना द्यायला गेले. गठ्ठयात मधेच वही घातली म्हणजे बाई आत्ता बघणार नाहीत, असा विचार मी केला. पण आमच्या देशमुखबाईना, त्या महाभारतातल्या संजयसारखी दिव्यदृष्टी आहे. कुणाचं काय चुकलं आहे ते त्यांना बरोबर कळतं. "वरच ठेव वही. सगळा गठ्ठा पडेल." मी वही ठेवली आणि जायला निघाले. "सरस्वती, तू थांब. तो खडू घे आणि फळ्यावर चंद्रग्रहणाची आकृती काढ." माझे तर हातच थरथरायला लागले. काही सुचेचना. तरी चिऊने म्हणजे आमची इरावती. पण सगळे तिला चिऊचं म्हणतात. तिने पटकन विज्ञानाचं पुस्तक दिलं आणि खुणा करत होती. “हे बघून काढ." मी ते घ्यायला जाणार, तर आमचा औरंगजेब फार चलाख. "बघायचं असेल तर तुझीच वही घे. तेच काढलं आहेस ना." आता मात्र माझ्या डोळ्यात पाणीच जमा झालं. पण मी ते निग्रहाने दाबून ठेवलं आणि वही घेतली. खडू घेतला. पण माझ्या वहीत तर नुसती खाडाखोड. त्यात काही नीट काढलंच नव्हतं. आणि खरं तर मला हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काय ते मुळीच म्हणजे मुळीच कळलं नव्हतं. या विज्ञानाच्या आकृती माझ्या डोक्यात कधी आकारच घेत नाहीत. माझं काही तरी चुकतंच नेहमी. या सगळ्या आकृत्यांमध्ये ती प्रकाशाची दिशा चुकते नाहीतर ते दिशादर्शक बाण चुकतात. नाहीतर चन्द्र मोठा आणि सूर्य लहान असं काहीतरी होतं असतं. ते पाणी आणि काहीतरी रसायनांचे प्रयोग. त्यात तर माझी नावामध्ये हमखास चूक. आणि मग नुसता गोंधळ. आज पण चंद्रापुढे, सूर्य का पृथ्वी. का पृथ्वी काढायचीच नाहीये? असा सगळा घोळ डोक्यात सुरु होता. मला तर ते सगळे तीन गोळेच वाटत होते. मग यातला कुठला मोठा आणि कुठला लहान? बाकी काहीच नाही तरी, माझ्या आकृतीला गोळाच गुण मिळणार येवढं आणि येवढंच मला कळत होतं. या आणि असल्या विचारांच्या गुंत्यात मी अडकले असताना, बाईंचा आवाज, " सरस्वती, नुसतीच काय फळ्याकडे बघत उभी राहिली आहेस. काढ आकृती." असं म्हणत औरंगजेब माझ्यावर चाल करून आला. आणि माझी वही बघून औरंगजेब प्राणच सोडणार होता पण मग एकदम स्फुरण चढून माझी वही औरंगजेबाच्या हातात. “अग, ही कसली आकृती आहे? वहीलाच ग्रहण लागलं आहे. हे काय? या चंद्रग्रहणाच्या आकृतीमध्ये पृथ्वी कुठे आहे? अरे अरे. हे असं शिकलो का आपण? आकृतीला नावं नाहीत. शिकवलेलं काही कळलं आहे का नाही?". हा अगदी शेवटचा हल्ला होता. आता मी मान खाली घालून गप्प उभी. अश्या वेळेस माझे डोळे इतके टप्पोरे आहेत याचा मला इतका म्हणजे इतका राग येतो. कारण आता आख्या वर्गाला दिसलं असणार की माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं आहे. बाईचं पुढे सुरूच. "सरस्वती, आपल्याला दोन दिवस दिले होते दोन आकृत्या काढायला. तरीही हे असं? ही वही घेऊन जा परत. आणि उद्या येताना दोन्ही आकृत्या तीन वेळा काढून आण. “ मी तरी म्हटलं, " तीन वेळा?" औरंगजेब फुत्कारला, " हो. तीन वेळा काढल्याशिवाय डोक्यात शिरणार नाही. जा बस आता." त्या पुढचं मला काही ऐकूच आलं नाही. कसेबसे पुढचे तास केले आणि धावत घरी आले.
तरातरा जिना चढून माडीवर आले. दप्तर फेकलं आणि खिडकीत जाऊन बसले. मला सारखा सारखा विज्ञानाचा तास आठवत होता. आता एखाद्याला नाही येत विज्ञानाच्या आकृती काढायला. तर काय बिघडलं? मला काही कळतच नाही. म्हणजे रांगोळी काढायला सांगितली की कितीही अवघड ठिपके असले ना तरी मला येतात. आजी म्हणते सरुची रेष पहा किती एकसारखी येते. पण या विज्ञानाच्या आकृतीचं काही जमत नाही. आणि आज तर असं सगळ्या वर्गासमोर ओरडायला काय झालं होतं बाईना. म्हणे दोन दिवस होते दोन आकृत्या काढायला. पण त्यांना काय माहिती की आज सकाळपर्यंत माझ्या हे मुळी म्हणजे मुळीच लक्षात नव्हतं. म्हणून तर मला दहा मिनिटांमध्ये दोन आकृत्या काढायला लागलया होत्या. आता उद्या काय करायचं? मला ते ग्रहण अजिबात कळलेल नाही. पण बाई त्याशिवाय गृहपाठाची वही घेणारच नाहीत. काय तर म्हणे “तीन वेळा काढल्याशिवाय डोक्यात शिरणार नाही." मलाच का इतकी शिक्षा. एकदा काढलं तरी चाललं असतं ना. सरूला आता खूप राग, रडू आणि भूक असं सगळंच होतं होत. आईने हाक मारली, "सरू, खायला येतेस ना?” “नकोय मला". आई खालूनच म्हणाली, “काय झालाय काय या पोरीला? सकाळी पण न जेवता गेली. सरू, अग खाण्डवी केल्यात ग." आता आईने खाण्डवी केल्यात म्हणजे जायलाच हवं. आई त्या इतक्या म्हणजे इतक्या भारी करते. मग मी असंच ग्रहण लागलेलं तोंड घेऊन खाली आले. आमच्या स्वयंपाकघरातून हसण्याचे, बोलण्याचे आवाज येत होते. आजी तर देवळात गेली होती. मग आई कोणाशी बोलते आहे. आत्ता मला आमच्या घरात कोणी म्हणजे कोणीच नको होतं. पण आमचं घर ते कसलं. सारखं कोणी तरी येतंच असतं. मी जवळ गेले आणि नलूच्या आई दिसल्या. आमच्या आईची मैत्रीण. "कुसुम, सरू आली ग. खाण्डवी दे तिला." मी पाटावर बसले. आईने मला खायला दिलं. आईचं हे असंच असतं. नलूची आई आली की तिला मुळी दुसरं काही दिसतच नाही. तिचं मुळी लक्षचं नाहीये माझ्याकडे. किती बोलतायत दोघी. आई नलूच्या आईशी बोलत होती. " नलूची आई, खाण्डवी खाल्लीस का? जमलीये ना? “जमलीये ना काय? आईची खाण्डवी कसली भारी होते. आई पण आज असं काय विचारते आहे. नलूची आई हसायलाच लागली. "आता जमते हो तुला." तर आई काय म्हणे, "हो बाई. तुझ्यामुळेच जमल्या खाण्डवी. मला तर अजून नवीन लग्न झालेलं तेव्हा, पहिल्यांदा खाण्डवी केल्या तोच दिवस आठवतो. मला वाटलं, पिठलं जमतं तर हे पण जमेल. कसलं काय? नुसता गोळा. सगळं वाया गेलं ग बाई. मला तर इतकं कानकोंडं झालं होतं.” नलूची आई बघत होत्या आईकडे. "अगं कुसुम, आठवतंय की मला. याच अंगणात उभी होतीस. या तुझ्या टपोऱ्या डोळ्यात एवढ पाणी भरलं होतं. ए, सरुचे डोळे अगदी तुझ्यासारखे आहेत नाही?" आणि दोघी माझ्याकडे पहायलाच लागल्या. त्यांना पण कळलं की मी त्यांच्याच गप्पा ऐकते आहे. मी आपली मला काही कळलंच नाही अशी खात बसले. तर नलूची आई कसल्या. त्या आल्या ना की आमच्या घरातला आवाज एकदम दहा माणसं घरात आल्यासारखा वाढतो. त्या आपल्या बोलतच होत्या. “सरू, मग आवडल्या का खाण्डवी?" मी मान डोलवली. कारण नलूची आई बोलायला लागल्या की, मध्ये बोलायला जागाच नसते. "मग, होणारच चांगल्या. मीच शिकवल्या तुझ्या आईला. तुझी आई बसली होती एव्हडंस तोंड करून. पहिल्याच प्रयत्नांत सगळं कसं जमणार? काही वेळेस काही गोष्टी जमायला वेळ लागतो. म्हणून काय तोंड पाडून बसायचं का? मी म्हटलं तुझ्या आईला. काही रडत बसू नकोस. एकदा प्रमाण समजून घेतलं, ४-५ वेळा केलं की न जमायला काय झालं? प्रयत्न केला न की या विश्वात काही अवघड नाही बघ. मग तुझ्या आईकडून चांगल्या ३-४ वेळा खाण्डवी करून घेतल्या. बघ, कशी छान करते आता. काय ग कुसुम? “आई हसत होती आणि मला अजून खाण्डवी वाढत होती. आणि आई काय म्हणे, “खर बाई. प्रयत्नांती परमेश्वर. सरू, अजून देऊ का?" मी आईकडे बघतच बसले. आत्ता मला कळलं, बाईंनी मला तीन वेळा आकृति काढायला का सांगितली. मी पटकन आईला म्हटलं, "मला नको. मी जाते अभ्यासाला." "अगं, अजून एक तरी खाऊन जा." मी म्हटलं,” नको नको. प्रयन्तांनी चंदग्रहण." आईला काही कळलंच नाही. मी पटकन माडीत आले आणि दप्तर ओढून बसले. खाली अजून नलूच्या आईचा आवाज येत होता. पण मला मात्र त्याचा आता अजिबात त्रास होत नव्हता.

Group content visibility: 
Use group defaults

आवडली.
पण किति वेळा तो येडछाप शब्द.

छान! प्रतिसादांमध्येपण येडछाप शब्दाचा अतिरेक झालाय Wink

पण या अशा प्रकारच्या कथांमध्ये असतो काही शब्दांचा जास्त वापर. कोसलामधलं उदाहरणार्थ, शाळामधले इमानदारीत, अर्थात हे शब्द, बहुतेक लंपनच्याच गोष्टींंमधला mad हा शब्द ही आठवलेली उदाहरणं.

Pages