गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

Submitted by कुमार१ on 8 April, 2018 - 21:51

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

आजाराचा इतिहास:
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई. तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.

संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.

कारणमीमांसा:
गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अ‍ॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अ‍ॅसिड तयार होते. तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.

इथे युरिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अ‍ॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.

जीवनशैलीशी संबंध :
१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते.

गाऊट आणि अनुषंगिक आजार :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अ‍ॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.

ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.

१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात

२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.

गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.

दीर्घकालीन गाऊट
:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे खडे (tophi) साठतात.

chr gout.jpg
अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.

रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.
२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अ‍ॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.
३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.
२. दीर्घकालीन उपचारात युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अ‍ॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अ‍ॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.

पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.

३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.

तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

जाता जाता .....

युरिक अ‍ॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अ‍ॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.

मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अ‍ॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:

१. युरिक अ‍ॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.
२. युरिक अ‍ॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अ‍ॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.
...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अ‍ॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
***************************************************************************************************
(लेख व प्रतिसादातील चित्रे : जालावरुन साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, शुभेच्छांसाठी आभारी आहे. आनुवंशिक नसावं कारण आजी आणि आई बाबा एकदम फिट होते / आहेत.

तुमच्या इन्स्टंट प्रतिसादाने छान वाटतं Happy

मीरा,
तुमचा TG व कोलेस्टेरॉल रिपोर्ट जाणून घेण्यास उत्सुक.
बघूया, पुस्तकाबरहुकूम असतंय का !

डॉ कुमार, तुम्ही दाखवलेल्या उत्सुकतेसाठी आभार. अनोळखी पेशन्ट्ससाठी सुद्धा आणि आजाराचा अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात ते दिसुन येतं. खरंच कौतुक आहे. आणि तुमचे पेशंट्स लकी आहेत. मी रिपोर्ट्सचे आकडे नक्कीच शेअर करेन.

काल नेटवर रिसर्च करण्याचा मोह टाळला, कारण प्रचंड वेदना होत असताना जेवढं कमी माहीत असेल तेवढं बरं असं वाटलं. पण पेन कमी होण्यासाठी 3 ते 10 दिवस लागतात असं ऐकलं होतं. कालच्या अतीव वेदना काही तासही सहन होणार नव्हत्या त्यामुळे 3 ते 10 दिवस हा वेळ आठवून खूप टेन्शन आलं होतं. पण thanks to my doctor. मी त्यांना गाऊट नाही हे पटवण्यासाठी किती तरी भरकटवल होतं, पण त्यांनी अचूक निदान केलं. 'Goutnil' made wonders. सकाळपर्यंत वेदना 80% कमी होत्या. आता अजिबात नाहीत.

परवा सकाळी डावा पाउल ला गाउट अ‍ॅटॅक आला. युरिक अ‍ॅसिड लेव्हल ९.१९ . फेब्युस्टॅट ४० चालू केली. डोलोमॉक्सिन पण घेतली. ऑर्थोकडे गेलो नाहि. ४-५ वेळा जाउन आता माहित झालय. सुरवात, पिक व उतरती कळा असा प्रवास २-३ दिवस होतो. स्वतःच मॅनेज करतो आहे.

३ वर्षा पुर्वी डिटेक्ट झाले तेव्हा १०.७ गेली होती. त्यामुळेच गाउटवर शिक्का मोर्तब झाल. नंतर वेळोवेळी चेक करत गेलो तर ५-६ असायची जेव्हा दुखत होते तेव्हा चेक करायचो तर ती मिनिमम ३.५ पर्यंत देखील असायची. पण डॉ म्हणाय्चे विदिन रेंज असली तरी मिनिमम लेव्हल ला असावी. मी अजऊन र्हुमेटोलॉजिस्ट कडे गेलो नाही. ओर्थो डॉ सराफ यांचेकडेच जातो. पण ते फारच बिझी असतात. निरिक्षणांच टिपण ठेवतो. त्यामुळे कोणत्याही डॉ ला माझी आरोग्य केस पाच मिनटात समजू शकते. व डॉचा ही वेळ वाचतो.
मध्यंतरी डॊ अजय ब्रह्मनाळकर यांचे आहार विहारावर व्याखान इसेन्स सीकर्स ग्रुपने ठेवले होते. दीक्षित की दिवेकर हा गोंधळ लोकांच्या मनात असतो म्हणून. त्यांना मी हे गाउटचे निदान सांगितले. व डॊ ने प्रोटीन वर्ज्य सांगितले आहे. नो ड्रिंक्स वगैरे तर आहेच. मानसोपचारवाले म्हणतात प्रोटीन आहारात भरपूर असू द्या हे म्हणतात डाळ कडधान्य खाउच नका करायच काय नेमक? डॊ ब्रह्मनाळकरांच्या मते मायटोकॊन्ड्रियातील दोषामुळे प्रोटीनचे युरिक ऎसिड मधे जादा रुपांतर होते. साखर कार्बोहायड्रेट लो ठेवा. मूळ कारण ते आहे. हल्ली ते नॊन डायबेटीकज पेशंटला सुद्धा साखर व कार्बोहायड्रेट कमी करायला सांगतात.

***ते नॊन डायबेटीकज पेशंटला सुद्धा साखर व कार्बोहायड्रेट कमी करायला सांगतात.>>>सहमत.

साखर ही पोषणासाठी जीवनावश्यक नाहीच; ती जिभेच्या सुखासाठीच आहे. ☺️

@ प्रकाश घाटपांडे,

>>>फेब्युस्टॅट ४० चालू केली. >>>
सर, तुम्हाला या गोळीचे काही साईड इफेक्टस जाणवतात का?
मध्ये या गोळीवर काही वाद असल्याचे वरील चर्चेत आले आहे.

डॉक्तरांनी वेळोवेळी दिलि होति युरिक अ‍ॅसिड लेवल कमि कराय्ला. आन ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्त अस्तोच. मला जाणवला नाही

कुमार सर,
बरीच वर्षे गाऊट असलेल्यांना एखादे vaccine टोचल्यास गाऊटचा त्रास वाढतो, हे खरे आहे का ?

साद,

प्रश्न चांगला आहे आणि त्याचे उत्तर वादग्रस्त आहे. गाऊट च्या रुग्णांत एकंदरीत दाहप्रवृत्ती असते. त्यामुळे एखाद्या लसीकरणा नंतर ती वाढू शकते.

अशा काही वृद्ध रुग्णांत Herpes या विषाणूजन्य लसीकरणानंतर मूळ त्रास वाढल्याचे आढळले आहे. पण असे पुरेसे शास्त्रीय प्रयोग अजून झालेले नाहीत. त्यामुळे सरसकट मत देता येत नाही.

माझ्या नवर्‍याला हा त्रास १-२ झाला आहे म्हणजे मागे २ वर्षापुर्वी एक्दा झाला तेव्हा वाटलेले हायकिन्ग करताना पाय दुमडला की काय मग टेस्ट केल्यावर कळल गाउट असाव आणी आता रिसेन्टली झाला.
कौतुक करतेय अस वाटेल पण त्याच सगळ काटेकोर प्रमानबद्ध आहे, ड्रिन्क्स घेत नाही (सॉफ्ट ड्रिक्स पण नाही), ९९ % शाकाहारच आहे क्वचित चिकन खाल्ले जाते तेही बाहेर बफेच्या १०-१२ आयटेम मधले , सालमन कीवा तिलापिया मी घरी बनवते तेही महिन्यातुन एकदा वैगरे , बाकी उसळी,भाज्या,वरण-भात-पोळी फळ असाच आहार असतो.
जनरलच फार फुडी नसल्याने अवातर खाणे पण नसते, चहा फक्त एकदा अस सगळ असताना का त्रास झाला असेल.
अनुवशिक आहे हे कस ओळखायच?

यूरिक अ‍ॅसिड लेवल अनेकदा तपासली आहे. कधीही ३ पेक्षा अधिक नसते. तरीही गुढगे अचानक सुजले. गाउट्निल, फेब्युरिक ४० वगैरे सुरू केले डॉक्टरांनी. त्यांच्या मते यूरिक अ‍ॅसिड प्रेसिपिटेट होते, डिपॉझिट होते म्हणून रक्तात दिसत नाही. आता कडधान्ये वर्ज्य. डाळी (साल काढलेले कडधान्य) अगदी थोड्या चालतील म्हणाले. तीनदा साय काढलेले दूध कधी कधी पाव कप चालेल. टोमॅटो सूप अतिशय आवडत असे. आता वर्ज्य करायला सांगितले आहे. कच्चे सॅलड (बीट, काकडी, गाजर, कान्दा, मुळा) खावे की नाही असा प्रश्न पडला आहे. कार्ब्सवरच भिस्त आहे. लो कार्ब डाएट कसा घेणार? प्रत्येक अन्नपदार्थाचे सर्व तर्‍हेचे उपद्रव मूल्य गूगलवर सापडेलच असे नाही. तीन डायेटिशिअननी वेगवेगळा डाएट लिहून दिलाय. एकाने रोज एग व्हाइट खाल्ले तरी चालेल, किमान प्रमाणातली प्रोटीन्स शरीराला मिळालीच पाहिजेत वगैरे सान्गितलेय. (किमान ४५ ग्रॅम आणि कमाल आपल्या वजनाच्या प्रमाणात) इतके रोजचे प्रोटीन कशातून मिळवायचे आणि ते इतके खायचे का असा प्रश्न पडला आहे. गहू नको, संकरित गहू नको (फॅटी लिवर), खपली चालेल, ज्वारी उत्तम वगैरे नेहेमीचे ऐकून कंटाळा आला. डाळ नसेल तर भात तरी कसा खाणार?
आमचे डॉक्टर नामांकित र्‍हुमॅटॉलॉजिस्ट फिजिशिअन आहेत. गर्दी खूप असते आणि प्रत्येक अन्नपदार्थाच्या बाबतीत हे खाउ का, ते खाऊ का असे विचारण्याइतका वेळ नसतो.
ता. क. गाउट आणि नेफ्रोपथी यांचे कॉझ आणि इफेक्ट अथवा इफेक्ट आणि कॉझ असे नाते आहे का?

प्राजक्ता व हीरा,
तुमच्या शंका रास्त आणि चांगल्या आहेत.
सविस्तर उत्तरे काही वेळाने देतो.

प्राजक्ता,

१. अस सगळ असताना का त्रास झाला असेल ? >>>

अगदी नैसर्गिक प्रश्न ! तुमच्या मते त्यांची जीवनशैली 'सुयोग्य' आहे. बरोबर, पण एक लक्षात घ्या. जर खालीलपैकी काही मुद्दे लागू असतील तर गाऊट व्हायची शक्यता वाढते:

मधुमेह, उच्च रक्तदाब,
मूत्रपिंड कार्य बिघाड,
TG व कोलेस्टेरॉल वाढणे
स्थूलता ,
हिमोग्लोबिन कमी असणे
आणि…..
अर्थातच जनुकीय घटक !

२. अनुवशिक आहे हे कस ओळखायच? >>>>

याचे अंतिम उत्तर सखोल जनुकीय चाचण्या (GWAS) करून मिळते. पण त्या उठसूठ करत नाहीत; त्यांचे महत्त्व संशोधनात असते. तूर्त तुम्ही त्यांच्या सख्ख्या नात्यांची युरिक A पातळी फार तर बघू शकता.
….
शेवटी, अमुक आजार का झाला याची खंत करण्यापेक्षा उपचार करणे महत्वाचे !
शुभेच्छा .

हीरा,

१. दोन डॉ. , दोन आहारतज्ञ इ. ची मते जुळतीलच असे नाही !

२. खाण्याचे पदार्थ ठरवताना त्यांत प्रोटीनपेक्षा Purinesचे प्रमाण पाहणे महत्वाचे. माझ्या मते डाळी, अंडे योग्य आहे. बीन्स व मांसाहार टाळावा.
पाणी भरपूर प्यायचे आणि आहाराचे फार मनावर नाही घ्यायचे.

३. गाउट आणि नेफ्रोपथी यांचे कॉझ आणि इफेक्ट अथवा इफेक्ट आणि कॉझ असे नाते आहे का?>>>

होय, दोन्ही बाजूंनी नाते आहे.
* मूत्रपिंड यंत्रणेतील जनुकीय बिघाडाने नेहमीचे युरिक उत्सर्जन कमी होते आणि त्यामुळे त्याची रक्तपातळी वाढते.

* दीर्घकालीन गाऊट मुळे युरेट नेफ्रोपथी होऊ शकते.

मधुमेह, उच्च रक्तदाब,>>> दोन्ही नाही
मूत्रपिंड कार्य बिघाड>> सध्या तरी तस काही वाटत नाहिये
TG व कोलेस्टेरॉल वाढणे>> कन्ट्रोल मधे आहे
स्थूलता >> अजिबातच नाही
हिमोग्लोबिन कमी असणे>> नॉर्मल आहे
आणि…..
अर्थातच जनुकीय घटक !>> बहुधा हेच असेल

प्राजक्ता, ☺️
ठीक आहे, ६३% लोक या गटात असतात , तेव्हा जाउद्यात !

बरेच जणांच्या बाबतीत असे होते. आहार व जीवनशैली सुयोग्य असते, निर्व्यसनी असतात. तरी पण एखादा दीर्घकालीन आजार मागे लागतो.
मग वैतागून अशी व्यक्ती विचारते, " मलाच का हा आजार व्हावा ?"
… यावर ठराविक उत्तर हेच की "जनुकीय घटक". ☺️

या संदर्भात 'Body at war' या पुस्तकातील एक संवाद उद्बोधक आहे.
आजाराने त्रासलेला एक मुलगा देवाला हाच प्रश्न चिडून विचारतो.
… त्याचा व 'देवाचा' संवाद मुळातून असा होतो :

He stood up and asked the God "Oh ,Lord ! What shall I do to lead a healthy life ?

"Choose your parents carefully , my son " was the reply !
. ☺️☺️

रोग जंतू मुळे होणारे आजार सोडले तर
जनुकीय बदलामुळे होणारे आजार किंवा बाकी गोष्टीमुळे अवयवात होणारा बिघाड हे बरे न होणारे आजार आहेत.
ह्यात आजार बरा करणे हा उपचाराचा उद्येष नसतो तर असलेला बिघाड स्थिर रहावा हाच हेतू असतो .
जनुकीय बिघाड आणि अवयवात होणारे बिघाड ह्याला खूप गोष्टी कारणीभूत असतात .
फक्त दारू,तंबाखू,हेच कारणीभूत नसतात .
आपला आहार,विहार,मानसिक स्वास्थ,स्वच्छ हवा,भेसळ युक्त अन्न,शारीरिक हालचाल खूप फॅक्टर आहेत .
दारू आणि तंबाखू आणि बाकी व्यसन हे सर्व बाकी घटकांचे नेते आहेत एवढंच .
काहीच व्यसन नाही मग आजार कसा झाला हा प्रश्न चुकीचा आहे .
हे माझे मतं आहे
चुकीचं सुद्धा असू शकत

मन हे चिंतामुक्त असेल तर बरेच आजार होणारच नाहीत

राजेश,
काही आजारांचे बाबतीत तुमचे म्हणण्यात तथ्य आहे.

बरेच जणांच्या बाबतीत असे होते. आहार व जीवनशैली सुयोग्य असते, निर्व्यसनी असतात. तरी पण एखादा दीर्घकालीन आजार मागे लागतो.
मग वैतागून अशी व्यक्ती विचारते, " मलाच का हा आजार व्हावा ?"
… यावर ठराविक उत्तर हेच की "जनुकीय घटक".
>>
हे ठरावीक उत्तर असलं तरी हे आनुवंशिकच असतं का?
Epigenetic बदल असू शकत नाहीत का?

मानव,
अगदी बरोबर. ते जरा वरच्या पातळीवरचे उत्तर आहे !
सामान्य जनांना आता 'जनुकीय' समजू लागले आहे.

आणि 'जनुकीय घटक' चा अर्थ नेहमीच आई/वडिलांना असलेला आजार असा नाही. विशिष्ट mutation पिढीत असू शकते, पण त्याचा दृष्ष्य आजार काही पिढ्यानंतरही दिसू शकतो.

न्यवाद.

धन्यवाद डॉ.
बरीच नवीन माहिती मिळाली. जनुकीय चा अर्थ नीट समजला.
पु ले शु

मागील महिन्यात rheumatologist डॊ नागनथ खडके यांची ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी febustat 40 व Goutnil दिवसातून 2 ची ट्रीटमेंट चालू केली.एका महिन्यानी ESR आणि SUA अशा टेस्ट केल्या. ईएस आर 10 व युरिक ऎसिड लेव्हल 5.8 अशी नॊर्मल आहे. मात्र गाउटनिल या गोळ्यांमुळे पोट बिघडते.डायरियल टेंडन्सी वाढते. आता परत गेलो तेव्हा गाउटनिल दिवसा 1 अशी केली आहे. दोन महिन्यासाठी. त्यांना हा लेख पाठवला आहे.

प्रकाश,
धन्यवाद आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !
युरिक असेच नियंत्रणात राहो.

Pages