गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

Submitted by कुमार१ on 8 April, 2018 - 21:51

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

आजाराचा इतिहास:
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई. तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.

संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.

कारणमीमांसा:
गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अ‍ॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अ‍ॅसिड तयार होते. तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.

इथे युरिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अ‍ॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.

जीवनशैलीशी संबंध :
१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते.

गाऊट आणि अनुषंगिक आजार :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अ‍ॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.

ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.

१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात

२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.

गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.

दीर्घकालीन गाऊट
:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे खडे (tophi) साठतात.

chr gout.jpg
अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.

रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.
२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अ‍ॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.
३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.
२. दीर्घकालीन उपचारात युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अ‍ॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अ‍ॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.

पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.

३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.

तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

जाता जाता .....

युरिक अ‍ॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अ‍ॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.

मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अ‍ॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:

१. युरिक अ‍ॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.
२. युरिक अ‍ॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अ‍ॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.
...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अ‍ॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
***************************************************************************************************
(लेख व प्रतिसादातील चित्रे : जालावरुन साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ससु
धन्यवाद
लेख चार वर्षे जुना झाल्यामुळे चित्र गायब झाली !

चिन्मय तुमची पोस्ट आज पाहिली.

हा प्रश्न आधी एके ठिकाणी मला विचारला त्यावर दिलेले तेव्हाचे उत्तर पोस्ट करत आहे.

हा सल्ला नाही. मी काय करतो एवढेच सांगतो आहे.
प्रत्येकाचे यावर अनुभव वेगळे असू शकतात.

मी युरीक ऍसिड कमी ठेवण्यास purines जास्त असलेले चरबी जास्त असलेले आणि प्रोटीन्स खुप जास्त असलेले, आणि डाययुरेटिक असलेले पदार्थ टाळतो / खूप कमी करतो. काही थोड्या प्रमाणात घेतो.
टाळायच्या भाज्या: पालक, लेट्युस, फ्लॉवर, मूळा, टोमॅटो. पैकी टोमॅटो पूर्ण टाळणे शक्य नाही, थोडे घेतो (आठड्यातून 3 मध्यम टॉमटो.).

मटार, वाटाणे थोड्या प्रमाणात कधीतरी (महिन्यातून दोनदा).
नॉनव्हेजमध्ये टाळायचे: मटण, मासे.
थोड्या प्रमाणात: चिकन, अंडी (अंडी पिवळा बलक टाळणे, आठवड्यातून जास्तीत जास्त दोन पिवळे बलक, पांढरा भाग आठवड्यातून १० -१२ सरासरी होतात.)
दूध: स्किम्ड मिल्क घेतो. दूध पीत नाही पण दिवसातून चहा दूध आणि दही सगळे मिळून पाव लीटर स्किम्ड मिल्क पेक्षा होऊ देत नाही.
दही: स्किम्ड मिल्कचे लावून ते घेतो.
पनीर: लो फॅट पनीर तयार मिळत नाही आमच्याकडे त्यामुळे नेहमीचे पनीर महिन्यातून दोन दा घेतो, इतर वेळी पनीर ऐवजी टोफु घेतो.

या व्यतिरिक्त तेव्हा कच्च्या पपईचे १"x १" ८-१० तुकडे पाण्यात उकळुन ते पाणी प्यायचो. ब्लू बेरीज खायचो वाटीभर. यामुळे कितपत मदत झाली की झालीच नाही हे सांगता येणार नाही.
पण या सर्वांमुळे माझे ८ च्या घरात असलेले युरीक ऍसिड ६ च्या आसपास रहात होते, कुठल्याही औषधाविना.

पुढे पालक, मासे, पनीर नियमित खाणे, टोमॅटो जास्त (आमच्याकडे टोमॅटोचे प्रमाण खूप जास्त आहे स्वयंपाकात) वगैरे मुळे युरीक ऍसिड वाढुन 7 - 7.2 गेले. ७ च्या वर गेले की मला अंगठ्या मध्ये ते जाणवते (काहींना ९ - १० पर्यंत गेले तरी काहीच जाणवत नाही.) तेव्हा होमिओपॅथी औषध घेतले त्याने परत ६.२ एवढे खाली आले, ६.२ ते ६.४ राहिले. कीतीही महिने घेतले तरी त्या पेक्षा अधिक फरक नाही. होमिओपॅथी औषध बंद केले की पुन्हा ७ च्या घरात.

मग मी परत पूर्वी सारखा आहार सुरू केला आणि परत युरीक ऍसिड ६ च्या आसपास कुठल्याही औषधाविना.

मानव
एकदम नियोजनबद्ध आहार !
छान प्रगती.

सविस्तर माहितीसाठी धन्यवाद, मानव..
माझी युरिक acid लेव्हल जास्त असते (~ ९.५) पण पेन २-३ वेळाच झालाय. त्याचे triggers शोधायचा प्रयत्न करतोय..
धन्यवाद !

दीर्घकालीन गाऊटचे मेंदूवरील परिणाम या विषयावरील संशोधन चालू आहे. एका संशोधनात असे दिसून आले, की या रुग्णांमध्ये मेंदूचे आकारमान कमी होते. त्यामुळे कालांतराने मानिसक र्‍हास व Parkinson या आजारांच्या शक्यता बऱ्यापैकी वाढतात. या बिघाडांच्या मागे विशिष्ट जनुकीय बदल असण्याची शक्यता आहे.
भविष्यात यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

परत एकदा गाऊट अटॅक आला. यावेळी जरा लवकर म्हणजे दोन महिन्यात आला. कोणताही (गाउट संदर्भात) चुकीचा पदार्थ खाल्लेला आठवत नाही.
या वेळी निग्रह करून औषध घ्यायचं नाही ठरवलं. गुगल वर home remedies शोधल्या. त्यानुसार -
दर रोज तीन cups black coffee प्यायली.
मखाना दररोज तीन दिवस खाल्ले (anti inflammatory असतात कळलं म्हणुन)
दिवसातुन दोन तीन वेळेस Cold pack वापरला.
आज चौथा दिवस आहे आणि वेदना अगदीच न जाणवण्या इतपत कमी आहेत. सकाळी जॉगिंग करून आले, एवढी ठीक आहे.
हे सगळे उपाय सुरुवात झाल्या दिवशी लगेच चालु केले होते. इतर वेळेस तिसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येण्याइतपत दुखतं आणि औषध घेतली तरच आराम मिळतो.
Disclaimer - इतरांना हे उपाय सुचवत नाही. फक्त माझा अनुभव शेअर केला. मला सतत औषध घेऊन बरं व्हायचं नव्हतं. थोडं prevention आणि थोडे घरगुती उपाय करून बरं होता आलं तर हवं होतं. वेळ पडली तर औषध आणुन ठेवलेली होतीच. या वेळी तरी टाळता आली.

मीरा,
असे अनुभव जरूर लिहावेत. तुम्हाला आराम पडला हे चांगलेच झाले.
असे अनुभव जरी व्यक्तीसापेक्ष असले तरी ही निरीक्षणे महत्त्वाची असतात.
अशा अनेक जणांच्या निरीक्षणातून पुढील संशोधनासाठी एक वेगळी दिशा मिळू शकते.

प्रतिबंधात्मक पातळीवर जर उपयोग झाला तर ते चांगलेच राहील.
शुभेच्छा !

डॉ कुमार, तुमच्या तत्पर प्रतिसादासाठी आभार. केवळ यासाठी तुमचे धागे कधीच miss करत नाही, कारण तुमचे प्रतिसाद देखील माहितीपूर्ण आणि उत्साहवर्धक असतात. इथे येऊन आवर्जुन update द्यावासा वाटतो.

गाऊट : नवे संशोधन आणि निरीक्षणे
१. गेल्या 30 वर्षात समाजातील या आजारात 100 टक्क्यांनी वाढ झालेली आहे; अविकसित देशांमध्ये त्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.
२. या रुग्णांपैकी फक्त एक तृतीयांश जणांना योग्य ते उपचार दिले जातात.

३. उपचार चालू केलेल्यांपैकी 50 टक्के रुग्ण एक वर्षानंतर उपचार सोडून देतात.
४. गाऊटचे निदान झाल्यानंतर रुग्णांच्या चिंता आणि नैराश्यात भर पडते.

५. आजार नियंत्रणात न राहिल्यास वारंवार अटॅक येत राहतात. प्रत्येक अटॅकगणिक हृदय आणि मेंदूवर देखील विपरीत परिणाम होत राहतो.
६. जो आजार वैद्यकशास्त्राला चांगल्यापैकी समजलेला आहे त्याच्या उपचारांच्या बाबतीत मात्र समाजात दुर्लक्ष आणि हेळसांड जाणवते.

एक अज्ञ आणि बालिश शंका

"मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली."

हे uricase एन्झाइम कृत्रिमरीत्या बनवण्याचे काही प्रयत्न झाले आहेत का ? जेणे करून ज्यांना गाऊट चा त्रास आहे अशा रुग्णांना ते देऊन त्यांची युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकेल.

अ बा
प्रश्न अज्ञ नसून सूज्ञपणाचा आहे.

होय, हे enzyme या उपचारांसाठी इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे दोन-तीन प्रकार देखील आहेत.
ज्या गाऊट रुग्णांना पारंपारिक औषधांनी गुण येत नाही अशांसाठी ते वापरतात.
हे औषध बरेच महाग आहे.

Pages