आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.
आजाराचा इतिहास:
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई. तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.
पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.
त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.
संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.
कारणमीमांसा:
गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अॅसिड तयार होते. तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.
इथे युरिक अॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.
जीवनशैलीशी संबंध :
१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अॅसिडची पातळी वाढवते.
गाऊट आणि अनुषंगिक आजार :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.
युरिक अॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.
ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.
१. युरिक अॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात
२. युरिक अॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.
गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.
दीर्घकालीन गाऊट:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अॅसिडचे खडे (tophi) साठतात.

अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.
रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.
२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.
३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.
उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.
२. दीर्घकालीन उपचारात युरिक अॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.
पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.
३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.
तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.
जाता जाता .....
युरिक अॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.
मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:
१. युरिक अॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.
२. युरिक अॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.
...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
***************************************************************************************************
(लेख व प्रतिसादातील चित्रे : जालावरुन साभार)
युरिक ऍसिडची पातळी घटु लागली
युरिक ऍसिडची पातळी घटु लागली की गाउटचा झटका येण्यामागे काय कारण असावे?
अँजिओग्राफी केल्यावर त्यात वापरलेल्या डाय मुळे उच्च युरिक ऍसिडचा कायमस्वरूपी त्रास होऊ शकतो का?
मानव,
मानव,
दोन्ही प्रश्न चांगले आहेत स्वतंत्रपणे बघू.
१. निव्वळ वाढलेल्या यूरिक ॲसिडमुळे गाऊट- अटॅक येत नाही.
किंबहुना, अचानक खाडकन वाढलेली किंवा कमी झालेली पातळी ही अटॅकची कारणे आहेत.
अचानक झालेला चढ असो किंवा उतार असो, त्यामुळे युरिक ऍसिडचे स्फटिक एकतर एकदम' एक्सपोज' होतात किंवा 'शेड ऑफ' होतात.
त्यातून एकदम सांधेदुखीचा ठणका लागतो.
२. ऍन्जिओग्राफीसाठी जे डाय
२. ऍन्जिओग्राफीसाठी जे डाय वापरले जातात ते बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. परंतु सुमारे दोन टक्के लोकांच्या बाबतीत त्यांच्यामुळे मूत्रपिंडावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
• जर मूत्रपिंडावर परिणाम झाला, तर यूरिक ॲसिड चे रक्तातून उत्सर्जन होण्यात अडथळा निर्माण होतो आणि म्हणून ते वाढू शकते. आता असे होऊ नये म्हणून डाय वापरण्यापूर्वी खालील काळजी घेतली जाते :
• प्रथम रुग्णाची क्रिएटिनिन पातळी आणि गरजेनुसार अन्य काही तपासण्या करून हे ठरवले जाते की त्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालू आहे. तसे असेल तर काळजीचे काही कारण नसते.
• समजा, अशा रुग्णात मूत्रपिंडाचे कार्य फारसे चांगले नाही. पण तरीसुद्धा प्रोसिजर करायची आवश्यकता आहे. तर अशा परिस्थितीत जो डाय वापरला जातो तो कमी प्रमाणात आणि पातळ केलेल्या स्वरूपात वापरला जातो. त्यामुळे मूत्रपिंडांना होणारा धोका कमीत कमी होईल हे पाहिले जाते.
• डाय मुळे मूत्रपिंडांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याचे प्रसंग खूप दुर्मिळ असतात
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
चांगली माहिती दिलीत डॉक.
चांगली माहिती दिलीत डॉक.
गाउटची औषधे करोनाच्या पेशंटसाठी उपयोगी आहेत हे कितपत खरं आहे ?
गाऊट साठी 'कोल्चिसी' न नावाचे
गाऊट साठी 'कोल्चिसीन' नावाचे जे औषध वापरले जाते त्याचे प्रयोग कोविडच्या काही रुग्णांवर काही महिन्यांपूर्वी करून झालेले आहेत.
परंतु त्यांचे निष्कर्ष समाधानकारक नाहीत.
( या औषधाला दाह- प्रतिबंधक गुणधर्म असल्याने तसे प्रयोग करून पाहण्यात आले).
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
गाऊट आटोक्यात राहण्यासाठी दूध
गाऊट आटोक्यात राहण्यासाठी दूध व दुधाचे पदार्थ कमी खावेत हे खरं आह का ?
गाऊट आटोक्यात राहण्यासाठी दूध
..
दूध व दुधाचे पदार्थ
दूध व दुधाचे पदार्थ
>>>
नाही. हे कमी करण्यासंबंधी काही शिफारस नाही.
बाकी आहारातील बंधनबाबत लेखात दिलेच आहे.
व्हिटामिन सी चा गाऊट साठी
व्हिटामिन सी चा गाऊट साठी काही फायदा होतो का ?
गाऊट झालेल्या रुग्णांना क
गाऊट झालेल्या रुग्णांना क जीवनसत्व देऊन तसा काही उपयोग होत नाही.
प्रतिबंधात्मक स्वरूपात ते द्यावे का यासंबंधी काही प्रयोग झालेले आहेत. परंतु अजून मोठ्या संशोधनाची गरज आहे.
धन्यवाद डॉक.
धन्यवाद डॉक.
दिशाभूल करणारे शीर्षक आणि
दिशाभूल करणारे शीर्षक आणि अयोग्य माहिती :
यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार
https://www.loksatta.com/lifestyle/what-are-the-effects-of-low-uric-acid...
मुळात युरिक ऍसिड ची पातळी जर कमी असेल तर तो काही महत्त्व असलेला आजार नव्हे.
“युरिक ऍसिड ची पातळी कमी असल्यास खालील आजार होतात” असे त्यांनी विधान केले आहे ते चूक आहे.
मुळात ते जनुकीय आजार आहेत.
युरिक ऍसिड 'कमी झाल्याने' ते निर्माण होत नाहीत.
त्यांच्यामध्ये युरीक ॲसिड कमी असू शकते परंतु त्याची मोजणी ही काही त्या रोगांच्या निदानाची चाचणी नाही.
त्यातले पहिलेच वाक्य:
त्यातले पहिलेच वाक्य:
.
<<"खराब आहार आणि तुमच्या काही चुकीच्या सवयी यूरिक अॅसिड कमी होण्यास कारणीभूत आहेत.">>>
तो खराब आहार आणि चुकीच्या सवयी कोणत्या हे सांगा म्हणाव म्हणजे आम्ही वाढलेले युरीक ऍसीड कमी करून घेउ
जोक्स अपार्ट:. Allopuriniol च्या सतत वापरामुळे यूरिक ऍसीड कमी होणे आणि औषध बंद केल्यावरही कमी यूरीक ॲसीड ची समस्या रहाणे होऊ शकते का? तसे वाचनात आले होते.
. Allopuriniol च्या सतत
. Allopuriniol च्या सतत वापरामुळे यूरिक ऍसीड कमी होणे
>>
बरोबर. त्या औषधाच्या दीर्घकाळ वापराने यूरिक ॲसिडचे शरीरातील उत्पादन कमी होते त्यामुळे रक्तपातळीही कमी होऊ शकते.
एका आजार साठी पळलेल आहाराची
एका आजार साठी पाळलेल आहाराची पथ्य दुसऱ्या आजाराचे आमंत्रण देवू शकतात.
समजा gout साठी प्रथिन आहारात कमी घेणे हे त्या साठी चांगले असेल.
पण शरीरात प्रथिनांची कमी होवून त्या वर आधारित दुसरे आजार होवू शकतात.
Chemo हा कॅन्सर वर चा उपचार आहे पण chemo मुळे बाकी शरीराचे नुकसान तर होतेच
hla b27 test positive येणे
hla b27 test positive येणे म्हणजे गाउट का? त्यामुळे सांधेदुखी होतेय, कृपया मार्गदर्शन करावे...
तुमचा प्रश्न चांगला आहे व
ज क
तुमचा प्रश्न चांगला आहे व रुग्णास गोंधळात टाकणारा देखील आहे
जरा वेळाने सविस्तर उत्तर लिहितो
HLA-B27 antigen
HLA-B27 antigen
>>
ही एक विशिष्ट चाचणी असून ती ऑटोइम्युन प्रकारच्या दाह-आजारांसाठी केली जाते. यामध्ये सांधे व डोळ्यांच्या अनेक आजारांचा समावेश आहे. मुख्यत्वे त्यात हे आजार येतात :
Ankylosing Spondylitis (AS), reactive arthritis, and psoriatic arthritis
AS च्या काही रुग्णांमध्ये गाऊट हा सह-आजार सुद्धा असतो असे दोन आजार एकत्र असणाऱ्या रुग्णात निदानाची गफलत होऊ नये म्हणून ही चाचणी केली जाते.
स्वतंत्रपणे गाऊटचा या चाचणीशी संबंध नाही.
मला Ankylosing Spondylitis
मला Ankylosing Spondylitis होता / आहे. त्यावर काहीसे उशिराच उपचार सुरू केले. बाबांना वाटलं की काही फरक पडत नाहीए. म्हणून डॉक्टरांनी ही HLA-b27 टेस्ट करायला सांगितली. ती निगेटिव्ह आल्यावर," चांगलं झालं," असं डॉक्टर म्हणाले होते.
मला pauliarticular arthritis होता. सुरुवात पायाच्या टाचा दुखण्यांपासून झाली. मग गुढघे आणि कंबर. हे दुखत नसतं , पण हालचाल करायला त्रास होई. कंबरेतून हालचाली मर्यादित झाल्या. फार वाकता येत नसे. अजूनही गुढघे न दाखवता जमिनीवरची वस्तू उचलता येत नाही.
गाउटला मराठीत अमवात म्हणतात का?
ती निगेटिव्ह आल्यावर," चांगलं
ती निगेटिव्ह आल्यावर," चांगलं झालं," >>
होय, चांगलं झालं. शुभेच्छा !
..
आमवात >>> ? RA .
पान १ वर ती चर्चा आहे.
नक्की संदर्भ पूर्वी शोधून मिळाला नाही.
म्हणून मी मराठीत गाउटच ठेवले.
धन्यवाद कुमार,
धन्यवाद कुमार,
ऑटोइम्युन प्रकारच्या दाह-आजारांसाठी उपाय फार कमी आहेत, तसेच त्याबद्दल फारशी माहीती पण उपलब्ध नाहीये,
या विषयावर स्वतंत्र चर्चा होउद्या...
ज क
ज क
बघूया, पण २०२३ मध्ये
तुम्हाला शुभेच्छा !
...
अरेच्या,
तुम्ही सोळा वर्षे इथे आहात !
कधी भेटला नाहीत पूर्वी .
गाउटला मराठीत अमवात म्हणतात
गाउटला मराठीत अमवात म्हणतात का?>>>नाही.. वातरक्त म्हणतात..
आमवात म्हणजे Rheumatoid arthritis
अच्छा! धन्यवाद.
अच्छा!
धन्यवाद.
अच्छा! वेगळाच आहे ..
अच्छा! वेगळाच आहे ..
धन्यवाद.
>>AS च्या काही रुग्णांमध्ये
>>AS च्या काही रुग्णांमध्ये गाऊट हा सह-आजार सुद्धा असतो >>>> नवी माहिती . धन्यवाद.
@मानव
@मानव
तुम्ही आहारबदलाने uric acid नियंत्रणात आल्याचे वर लिहिले आहे. तुम्ही नक्की काय मुख्य बदल केलेत कृपया सांगू शकाल का ?
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. गाउट, युरीक असिड या बद्दल अतिशय थोडी आणि ऐकीव माहिती होती. तीत चांगली भर पडली.
चित्रे दिसत नाहीत.
Pages