Wow!

Submitted by अभि_नव on 15 August, 2019 - 00:00

१५ ऑगस्ट १९७७.

बिग इअर रेडिओ दुर्बीनीच्या व परग्रहवासीय शोधमोहीमेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस. ओहियो स्टेट युनिवर्सिटीमधे ही बिग इअर दुर्बीन १९६३ ते १९९८ या काळात कार्यरत होती. कोलंबस, ओहियो, अमेरीका इथे पर्किन्स ऑब्झरवेटरीच्या प्रांगणात असलेल्या या दुर्बीनिचे मुख्य काम परग्रहवासीयांकडुन आलेल्या रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवणे असे होते. १५ ऑगस्ट १९७७ या दिवशी ०२:१६ UTC वाजता बिग इअर रेडिओ दुर्बीनिला एक नेहमीपेक्षा वेगळा रेडिओ सिग्नल मिळाला.

Perkins Observatoryपर्किन्स ऑब्झरवेटरी, ओहियो स्टेट युनिवर्सिटी, कोलंबस, ओहियो, अमेरीका.

काही दिवसांनी , दुर्बीनीला मिळालेला डेटा बघत असताना खगोलशास्त्रज्ञ जेर्री आर. एहमन (Jerry R. Ehman) यांना, त्यादिवशी मिळालेल्या रेडिओ संदेशांच्या डेटामधे वेगळेपण जाणवले. अशाप्रकारचा विशेष रेडिओ संदेश बघुन, अत्यानंदाने त्यांनी डेटाच्या प्रिंटआउटवर लाल अक्षारत, ईंग्रजी "Wow!" हा शब्द लिहिला. पुढे हा रेडिओ संदेश, Wow Signal म्हणुन ओळखला जाऊ लागला. दुर्बीनी मधे पन्नास वेगवेगळ्या चॅनेल वर, प्रत्येकी १० किलोहर्ट्झ ध्वनी तीव्रता ऐकु शकेल असे एक रिसिवर होते. खालील प्रिंटआउटमधील प्रतेक रकाना हा एक चॅनेल आहे. यात क्रमांक व अक्षर यामधे ध्वनी तीव्रता नोंदवलेली आहे. यातील एकाच रकान्यात वॉव सिग्नलची नोंद झालेली आहे.

जेर्री एहमन यांच्या हस्ताक्षरातील, Wow! शब्द. लाल लंबवर्तुळात विशेष ध्वनी तीव्रतेचे (Intensity) अंक व अक्षरी रुपांतर.

या संदेशात , परग्रहवासीय शोध मोहिमेच्या दृष्टीकोनातुन काय विशेष होते? की हा केवळ पृथ्वीवरचाच मानवनिर्मित एखादा संदेश होता? त्यासाठी हा संदेश काय आहे व बिग इअर दुर्बीन कशी काम करत होती ते बघु.

जर परग्रहवासीयांना आपल्याशी संपर्क करायचा असेल, तर (त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार) रेडीओ लहरी वापरणे सर्वात योग्य पर्याय आहे. पण हा संदेश नक्की कोणत्या रेडिओ फ्रिक्वेन्सी वर पाठवायचा? यासाठी अशी वारंवारता निवडली पाहिजे जी, विश्वातल्या इतर कोणत्याही ग्रहावर उत्क्रांत होणाऱ्या बुद्धीमान प्रजातीला अगदी सहज माहीत असेल. म्हणजे आपण जर अशी वारंवारता निवडली जी, या विश्वात सर्वात मुबलक व सामान्यपणे नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थाची वारंवारता असेल, तर त्या वारंवारतेवर एखादी बुद्धीमान प्रजाती संदेश ऐकत असण्याची शक्यता जास्त आहे.

विश्वात सर्वात जास्त सहज व नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे हायड्रोजन. आवर्तसारणी ( Periodic Table) मधे तो सुरुवातीलाच आहे. या सर्वात जास्त सामान्यपणे उपलब्ध असणा-या हायड्रोजनची नैसर्गीक वारंवारता १४२० मेगाहर्ट्झ इतकी आहे. इतर ग्रहावर जेव्हा बुद्धीमान जीव असतील, तेव्हा त्यांचेही भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र या प्राथमीक पदार्थांच्या बाबतीत आपल्यासारखेच असू शकते. तेव्हा त्यांना हायड्रोजन व त्याची वारंवारता नक्कीच माहित असेल. म्हणुन त्याच वारंवारतेवर जर रेडिओ लहरी पाठवल्या तर कदाचीत कोणीतरी बुद्धीमान जीवजंतुही (म्हणजे आपण), त्या वारंवारतेवर एकत असेल.

त्या दिवशी मिळालेला हा विशेष डेटा, १४२० मेगाहर्ट्झ (+-५० किलोहर्ट्झ) या फ्रिक्वेन्सीवरुन आलेला आहे. बिग इअर रेडिओ दुर्बीनीकडुन आलेला हा ध्वनी तीव्रतेचा (Intensity) डेटा, ध्वनी गुणोत्तर (Signal to Noise) या प्रकारात नोंदवला जात होता. हे ध्वनी गुणोत्तर कमीतकमी ० व जास्तीतजास्त ३६ या श्रेणी मधे आहे. या श्रेणीसाठी कोणतेही एकक वापरलेले नाही. १५ ऑगस्ट १९७७ ला मिळालेल्या विशेष रेडिओ सिग्नलचा ध्वनीगुणोत्तर तक्ता खाली दिला आहे. एक्स अक्ष वेळ दर्शवते. ही वेळ, प्रत्येक १२ सेकंदामधे विभागलेली आहे. वाय अक्षावर आधी, ० - ९ पर्यंतची ध्वनी तीव्रता आहे. त्यापुढे १० - ३१ मधील तीव्रतेची प्रत्येक जोडी दर्शवणारे एक ईंग्रजी अक्षर आहे. उदा. १० ते ११ साठी "A". ११ ते १२ साठी "B". या प्रमाणे. शेवटचे अक्षर "U", ३०-३१ श्रेणी दाखवते. जिथे उभ्या निळ्या खुणा केल्या आहेत , ते म्हणजे स्पेस कॅरॅक्टर आहे. ही मोकळी जागा ० ते १ मधील ध्वनी तीव्रता दाखवते.

बिग इअर दुर्बीनचे रेडिओ लहरी ऐकणारे कान वर खाली फिरवता येत होते. पण आडवे फिरवता येत नव्हते. त्या आडव्या डेटासाठी, पृथ्वीच्या परिवलनकक्षेवर अवलंबून रहावे लागत होते. पृथ्वीचा व्यास व परिवलनाचा वेळ या गुणोत्तरामुळे, आकाशातील कोणतीही एक जागा व पर्यायाने तिथुन आलेला संदेश वाचण्यासाठी, दुर्बीनीकडे ७२ सेकंद फक्त एवढाच वेळ होता. त्यामुळे जेव्हा शास्त्रज्ञ तो डेटा बघतील तेव्हा त्यांना एक ७२ सेकंदाचा वेगळा आलेख दिसेल ज्यात सुरुवातीचे ३६ सेकंद क्रमाक्रमाने चढता आलेख असेल व त्याच समप्रमाणात खाली येणारा आलेख दिसेल.

वरील आलेखामधील 02:16 UTC वाजता मिळालेला "6EQUJ5" हा भाग या निकषामधे बसतो. इथे "6EQUJ5" हा, प्रत्यक्ष परग्रहवासीयांकडुन आलेला संदेश नसुन, केवळ त्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी त्यांच्यापुरत्या ठरवुन घेतलेल्या ध्वनी गुणोत्तराच्या आलेखामधील (Signal to Noise Graph) ध्वनी तीव्रतेची श्रेणी आहे. (Range of Intensity)

या दुर्बीनीला दोन फीड हॉर्न्स होते. फीड हॉर्न म्हणजे असे उपकरण जे प्रत्यक्ष रेडिओ लहरी पकडते. हे दोन्ही फीड हॉर्न्स दोन वेगळ्या दिशेने रेडीओ संदेश ऐकत होते. त्यातील एकाच फीड हॉर्नला हा संदेश मिळालेला आहे. पण त्या दोनपैकी तो फीड हॉर्न नक्की कोणता ते सांगता येत नाही. तसेच साधारण आकाशातील कोणत्या नक्षत्रामधुन तो संदेश आला हे माहिती असले तरी, अचूक जागा माहिती नाही.

१५ ऑगस्ट १९७७ या दिवशी, दुस-या कोणत्याही रेडिओ दुर्बीनीवर किंवा इतर एखाद्या खगोलशास्त्रीय प्रकल्पामधे या संदेशाची नोंद झालेली नाही. जर खरेच हा परग्रहवासीयांकडुन आलेला संदेश असेल, तर तो दीपगृह प्रकारचा किंवा एकदाच दिला गेलेला या प्रकारचा असण्याची शक्यता आहे. बिग इअरला एलियन संदेश मिळाला तर तो कसा असेल, या निकषात जरी हा डेटा बसत असला तरी, एलियन जर हा संदेश पाठवत असते तर तो जसा एनकोड केलेला व मॉड्युलेटेड असेल, तसा तो पूर्णपणे नाही. किंवा, बिग इअर दुर्बीनीच्या मर्यादेमुळे, आपल्याला पूर्ण संदेश वाचता आला नाही.

खुद्द जेरी एहमन यांनी अशी शक्यता वर्तवली होती की, हा रेडीओ डेटा पृथ्वीवरुनच आलेला असू शकतो. पण नंतर आणखी पडताळणी केली असता, हा संदेश पृथ्वीवरुनच निर्माण झालेला असण्याची शक्यता नगण्य आहे असे कळले. १४२० मेगाहर्ट्झ' ही संरक्षीत वारंवारता आहे. या वारंवारतेवर रेडिओ संदेश पाठवणे निषिद्ध आहे. त्यामुळे जर हा संदेश पृथ्वीवरुनच आलेला असेल, तर तो एखाद्या गुप्त सैनीकी कारवाईचा भाग असू शकतो किंवा चुकुन पाठवलेलाही असु शकतो. हा संदेश अवकाशातुनच आसेला असावा पण तो परग्रहवासीयांनी पाठवला असेल याची खात्री नाही.

या घटनेनंतर, एहमन यांनी दुर्बीनीच्या इतर डेटामधे काही वेगळे मिळतेका ते शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही. इतर अनेक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्र संशोधनसंस्था यांनी खूप वेळेला वेगवेगळी आधुनीक उपकरणं वापरुन , अनेक वर्षे याच अवकाशातल्या जागेवरुन तसा एखादा संदेश मिळतो का हे बघण्याचा प्रयत्न केला, पण काहीही सापडलेले नाही.

बिग इअर दुर्बीनीची १९९५ मधे, सर्वात जास्त परग्रहवासीय संशोधनाचा कार्यकाळ असलेली दुर्बीन म्हणून गिनीज बुकात नोंद झाली.

लेखक या विषयातील तज्ञ नाहीत. चु.भु.दे.घे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow...

इंटरेस्टिंग! इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

>>एलियन जर हा संदेश पाठवत असते तर तो जसा एनकोड केलेला व मॉड्युलेटेड असेल, तसा तो पूर्णपणे नाही. >> एलिअन मॉड्युलेटेड आणि एनकोडेड्च सिग्नल पाठवतात असा अर्थ लागतोय. तुम्हाला नक्कीच तसं म्हणायचं नसेल.
लेख वाचला तर पटकन "6EQUJ5" हा संदेश आहे असा समज झाला. पण आणखी वाचलं तेव्हा 6EQUJ5 हे फक्त सिग्नल इंटेसिटीचं त्या ग्राफ पेपर वरच्या कोडनुसार (तुम्ही वर एक्स्प्लेन केलंय त्या प्रमाणे ०-९ A-U) व्हेरिएशन आहे. मिळालेला सिग्नल हा प्युअर सायनोसॉयडल आहे.
हा लो फ्रिक्वेंसी अन मॉड्युलेटेड सिग्नल आहे.. डिस्टॉर्ट नाही का होणार धनू (सॅजिटेरिअस) नक्षत्राकडून आला असेल तर? असं मनात आलं. बर्‍यापैकी अनडिस्टॉर्टेड वाटला मला.

एलिअन मॉड्युलेटेड आणि एनकोडेड्च सिग्नल पाठवतात असा अर्थ लागतोय. तुम्हाला नक्कीच तसं म्हणायचं नसेल.
>>
बरोबर. एलियन मॉड्युलेटेड व एनकोडेडच सिग्नल पाठवतील, असे काही नाही, पण विकिपीडीयावर वाचल्याप्रमाणे, त्यांनी असा सिग्नल पाठवण्याचे चान्सेस जास्त आहेत, व जर एखादा सिग्नल मॉड्युलेटेड एनकोडेड नसेल तर तो एलियन असण्याची शक्यता त्यामानाने कमी आहे. अर्थात हे काही नियम नाहीत , तर केवळ ठोकताळे आहेत.
संदर्भासाठी वाक्ये:
Although the Wow! signal was unmodulated and had no encoded information, it remains the strongest candidate for an alien radio transmission ever detected.

A common misconception is that the Wow! signal constitutes some sort of message. In fact, what was received appears to be an unmodulated, continuous wave signal with no encoded information; essentially a flash of radio energy. The string "6EQUJ5" is merely the representation of the expected variation of signal intensity over time, expressed in the particular measuring system adopted for the experiment.

https://en.wikipedia.org/wiki/Wow!_signal
---
लेख वाचला तर पटकन "6EQUJ5" हा संदेश आहे असा समज झाला. पण आणखी वाचलं तेव्हा 6EQUJ5 हे फक्त सिग्नल इंटेसिटीचं त्या ग्राफ पेपर वरच्या कोडनुसार (तुम्ही वर एक्स्प्लेन केलंय त्या प्रमाणे ०-९ A-U) व्हेरिएशन आहे.
>>
होय, "6EQUJ5" हा प्रत्यक्ष संदेश नसुन, त्या प्रयोगशाळेत, ध्वनी तीव्रता मापण्याच्या आलेखामधील श्रेणी आहे. ती ही एककाशिवाय. १४२० मेगाहर्ट्झ वारंवारतेवर, त्यादिवशी "6EQUJ5" या श्रेणीमधे ध्वनी तीव्रता दिसुन आली. (याप्रमाणे लेखात बदल करत आहे.)
---
हा लो फ्रिक्वेंसी अन मॉड्युलेटेड सिग्नल आहे.. डिस्टॉर्ट नाही का होणार धनू (सॅजिटेरिअस) नक्षत्राकडून आला असेल तर? असं मनात आलं. बर्‍यापैकी अनडिस्टॉर्टेड वाटला मला.
>>
शक्यता आहे. यासोबतच दुर्बीनीच्या स्वतःच्या मर्यादाही होत्या त्यामुळेही कदाचीत, खरेच सिग्नल असुनही, आपल्याला तो नीट वाचता आलेला नाही.