युगांतर - आरंभ अंताचा भाग ४

Submitted by मी मधुरा on 20 July, 2019 - 12:13

पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे?

संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला?
शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण.... या नयनरम्य दृश्याकडे पाहत त्याची नजर पैलतटावर तिला शोधत होती. नदी तटावर तो स्वतः, रथ आणि रथअश्व सोडून बाकी कोणीच नव्हते. तो किनाऱ्यावर बसून त्या नदीच्या प्रवाहाकडे पाहत होता. पाण्यातले काळे, पिवळे, सोनेरी मासे प्रवाहात इकडून तिकडे मनसोक्त विहार करत होते.

सारा परिसर आनंदात होता पण शंतनूचे कान मात्र पैंजणांची किणकिण ऐकायला तरसले होते. नेत्र तिच्या दर्शनासाठी असूसले होते.

कोण होती? कुठल्या नगरीची रहिवाशी? हे तर सोडाच, पण त्या सुंदरीचे नावही माहित नव्हते त्याला. आज का आली नसेल? काही विपरीत तर घडलेले नसेल ना, या चिंतेने तो अस्वस्थ झाला.

सुर्यदेव मध्यभागी आले, पश्चिमेला कलले. सांजेचा प्रहर सुर्यदेवांच्या अभिमुख दर्शनाने तप्त झालेल्या सृष्टीला शितलता देउ लागला. शंतनू किनाऱ्यावर बसूनच होता. अजूनही ती आली नव्हती. काल आपल्याला एका मनमोहक सुंदरीचा भास झाला असावा असही त्याला वाटले. पण तिच्या शिवाय आपल्या जगण्यात रस नाही असही एक मन सांगत होते. त्याने विचार करता करता हातातला खडा नदीत फेकला.

.....आणि त्याच्या कानांवर तो हवाहवासा नाद पडला. त्याने पैलतिरावर पाहिले. नेत्र तृप्तावणारे ते रुप त्याच्या समोर उभे होते. चातकाची तहान पावसाच्या आधीन असते तसाच तो तिच्या दर्शनाचा तहानलेला. हर्षभरित होऊन तो सरळ नदीत उतरून पल्याडच्या नदी तटापर्यंत गेला. प्रवहाच्या उदरापर्यंत पाण्यात उभ राहूनच त्याने तिला संबोधले, "हे सुंदरी, आपण माझ्याशी विवाह कराल?"
ती नुसतीच हासली आणि जाऊ लागली. त्याने हात जोडून आर्त आवाजात तिला हाक मारली, "सुंदरी! थांबा ! ही चेष्टा नाही. मला खरचं तुम्ही धर्मपत्नी म्हणून हव्या आहात. मला तुमच्याशिवाय जगण अशक्य वाटू लागले आहे. "
ती थांबली. त्याला डोळ्यांनीच नदीच्या प्रवाहातून बाहेर येण्याचा संकेत केला. तो किनाऱ्यावर चढून तिच्याकडे उत्तराच्या आशेने पाहत उभा राहिला.
"राजन्, " तिच्या मंजूळ वाणीचा स्वर त्याच्या कानी घुमला. "तुमच्या प्रस्तावाला माझी अनुमती आहे. पण...."
" पण? "
"माझ्यासोबत तुमच जीवन कठीण होईल, असे भय वाटते मला."
"हे सुंदरी, तुम्ही सोबत असाल तर हा शंतनू विष प्राशन करावयासही तयार आहे."
"मग मला एक वचन हवे आहे, राजन्!"
"दिले. हवे ते मागावे!"
"मला महाराजांनी कधीच कुठलाही प्रश्न विचरायचा नाही."
"नाही विचारणार! वचन!"
"पुन्हा एकदा विचार करावा."
"आवश्यकता नाही." तो ठामपणे म्हणाला तस ती त्याच्या कडे साशंकतेने पाहू लागली.
ते जाणून शंतनू उत्तरला, "या महाराज शंतनूने दिलेला शब्द आजवर कधी मोडला नाही."

तिच्या चेहऱ्यावर स्मित पाहून तो असिम आनंदात हरवून गेला. तिने रथाकडे जायला सुरवात केली. तोही तिच्या मागे मंत्रावल्या सारखा चालू लागला. ती रथावर चढली आणि शंतनूला वाटत असलेला अधूरेपणा कुठल्याकुठे निघून गेला. त्याने रथावर चढून अश्वांना चाबूकाने संकेत केला तसे ते महालाच्या दिशेने धावू लागले. सगळ्यात त्याला हेही लक्षात आले नाही की, पैलतिरीचा प्रवास करताना जलप्रवाहात त्याचे वस्त्र भिजले होते. महत्वाचे हे, की फक्त त्याचेच वस्त्र भिजले होते....

©मधुरा

Note: Picture found on net.

#Yugantar_Part4
#Mahabharat
#Yugantar_Aaramb_Antacha
Part 3
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2540685042657523&id=10000148...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मन्याजी! Happy
धन्यवाद च्रप्सजी! Happy

शंतनू फुल ठरकी निघाला .. >>>> Lol