कमलपक्षिणीचा कॅटवॉक

Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 11:04

Pheasant_tailed_jacana_2016.jpg
(Image Credit: Dasari. Vijay on https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/27/Pheasant_tailed_jaca...)

कमलपक्षिणीचा कॅटवॉक

सडपातळ शरीरयष्टी
नाजूक लांब पाय
गळ्यात सुंदर सोनेरी नेकलेस
लांब कोयत्यासारखी मिरवणारी शेपूट
मी श्वास रोखून बघत राहतो.
डोळ्याला बायनॉकुलर लावायचे सुध्दा विसरून.
पुष्करीणीतील तरंगत्या कमळाच्या पानांवर ती कमलपक्षिणी
अलगद हलक्या पावलांनी कॅटवॉक करत राहते.
****
पक्षीजगतातील अनेक अपवादांपैकी एक असलेली कमलपक्षिणी !
पक्षीजगतात निसर्गाने नरांवर सौंदर्य उधळलं असताना
हिला मात्र ‘वर’ लाभलाय
अनेक ‘वर’ मिळतील ह्याचा
बहुपतित्व लाभायचा
ह्याचाच फायदा घेत
आपल्या सौंदर्याची मोहिनी घालत
ती मात्र लचकत मुरडत कॅटवॉक करत राहते.
****
प्रत्येक नराला मीच तुझी जीवाभावाची सखी
असे आश्वस्त करीत ती संसार मांडत राहते
त्याला पितृत्व बहाल करणारी अंडी घालून
त्याच्याच सुपूर्द करून
दुसऱ्या नरासोबत संसार थाटायला
ती मात्र अलगद कॅटवॉक करत राहते.
****
पुष्करीणीतील तरंगत्या कमळाच्या पानांवर
घातलेली तिची अंडी
तो जीवापाड सांभाळत राहतो
त्याची भिरभिरती नजर
तिची कमनीय आकृती शोधत राहते
वेळप्रसंगी आरडाओरडा करून
तो तिचे लक्ष वेधू पाहतो
ती मात्र नजाकतीने कॅटवॉक करत राहते.
****
पाण्यावर तरंगणारी कमळाची पाने
आणि पाण्यावर तरंगणारी तिची अंडी
तो सांभाळत उबवत बसतो
बाप बनण्याची स्वप्ने उराशी घेऊन
संकटाची चाहूल लागताच अंडी चोचीत उचलून
सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारा
पिल्लांना मायेच्या पंखांखाली काखेत लपवून ठेऊन
तरंगत्या पानांवरून दुडूदुडू धावणारा बाप मी बघत असतो
ती मात्र तुरुतुरु कॅटवॉक करत राहते.
****
कमलपक्षिणीने दुसऱ्या नराला
स्वतःच्या सौंदर्यपाशात अडकवून
कधीचेच स्वप्नगर्भार केलेले असते
त्याला स्वतःवर बेतलेल्या प्रेमळ संकटाची जाणीव होण्यापूर्वीच
ती दूर निघून गेलेली असते
दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात
त्याचीही नजर तिची कमनीय आकृती शोधत असते
ती मात्र हळुवार कॅटवॉक करत राहते.
****
आटत चाललेले तलाव
उपसा झालेल्या बोड्या, पुष्करिणी
कंद-फुलांसाठी कमळ वेलींचे होत चाललेले समूळ उच्चाटन
सुंदर जांभळ्या फुलांचे हास्य ल्यायलेल्या राक्षसी बेशरमीने
कधीचेच पुष्करीणीला आपल्या मगरमिठीत आवळलेय!
पुष्करीणीचा गुदमरलेला श्वास
आणि गळयाभोवती शिंगाळ्याच्या वेलींनी घातलेला फास
हिरव्या कवकांनी पाण्यावर पसरलेली चादर
पुष्करिणीच्या मृत्यूची घंटा वाजवत राहते.
उध्वस्त होत चाललेल्या अधिवासापासून अनभिज्ञ
ती मात्र हळूवार कॅटवॉक करत राहते.
****
(पूर्वप्रसिद्धी: आपलं पर्यावरण)

Group content visibility: 
Use group defaults