सूर्यास्ताच कोडं

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 02:00

संध्याकाळ झाली का गच्चीत जाऊन सूर्यास्त पहायचा त्याने पायंडाच घातला होता. एकदा त्याला मित्राने विचारल काय करतोस रे तो सूर्यास्त पाहून?
तो म्हणाला, “ कोडं सोडवत असतो मी एक”
मित्र : “कसलं कोडं ?”
तो, “ तू कधी निरखून पाहिल आहेस सुर्यास्ताला? जाता जाता का होईना किती रंगांची उधळण करून जातो तो, मी जेंव्हा तो सूर्यास्त बघत असतो ना, तेंव्हा तो सूर्य क्लाउडे मोनेट बनतो आणि त्या क्षितिजावरच्या मोकळ्या कॅनव्हास वर किरणांच्या कुंचल्यातून रंग सांडून स्वतःच एक मस्त सूर्यास्ताचा लँडस्केप चित्तारतो.
त्या उंच उंच उडणाऱ्या पाखरांना जशी एकच ओढ लागलेली असते, घरट्याकडे परतण्याची, तशीच ओढ लागलेली असते मला तो सूर्यास्त पाहण्याची. दिवसभराच्या धावपळीनंतर तो सूर्य थोडा वेळ का होईना माझी वाट बघत थांबलेला असतो जाता जाता समाधानाचे थोडेफार क्षण देऊन जायला. खूप आपुलकीने रोज नवीन नवीन कलाकृती सादर करून जातो आणि त्यातून जगण्याची नवीन उमेद भेटते मनाला. अशे अगणित सूर्यास्त बंदिस्त केलेत मी माझ्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये. असाच या सुर्यास्ताप्रमाणे एकदिवस माझाही अस्त होईलच की, पण मी ते रंग, ते पोट्रेटस नाही देऊ शकणार, कितीही प्रयत्न केले तरी नाही जमणार मला ,कारण ते सगळे माझ्यात सामावलेले आहेत, माझाच एक भाग बनले आहेत. मी ते शब्दात सुद्धा नाही चित्तारू शकत इतके अदभूत आहेत ते. जितकं त्या लिओच्या “मोनालीसा” मधलं गूढ सगळ्यांना कोड्यात टाकत नसेल ना तेवढं सूर्यास्ताच्या सुंदरतेच कोड मला पडत. रोज तोच सूर्य, तेच रंग, तोच आभाळाचा कॅनव्हास, तरीही ते सगळं रोज नवीन का भासावं? याचेच उत्तर शोधता शोधता सूर्यास्त होऊन जातो आणि मी पुन्हा नवीन दिवशी त्याच संध्यासमयी पुन्हा तेच कोड सोडवायला सूर्यास्त बघत बसतो. दररोज गच्चीतून खाली येताना मला फक्त एवढच उत्तर मिळालेलं असत काही गोष्टींचा अंत सुद्धा किती सुंदर असतो”
( एव्हाना सगळं ऐकून मित्रालाच कोडं पडलं हा आपलाच मित्र आहे ना?)
© प्रतिक सोमवंशी
इंस्टा @शब्दालय

Group content visibility: 
Public - accessible to all site users