“कालचक्र- एक आठवणीतली गोष्ट”

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 July, 2019 - 02:38

आम्ही चार भावंडे मी, गण्या, विण्या,आणि पप्या, पंधरा सोळा वर्ष्याची असू तेंव्हाचा हा प्रसंग. तेंव्हा मस्त पाऊस पडायचा, गावाकडचे डोंगर हिरवा शालू नेसून पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज असायचे. आमच गाव तस डोंगरांच्या मधोमध वसलेले, एक नदी गावाला वळसा घालून पुढे जायची, तिला बारमाही पाणी असायच. त्यामुळे दुष्काळ वगैरे काय भानगड असते आम्हाला ठाऊकच नव्हतं. डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यांवरून उड्या मारत मारत शाळा गाठायचो, चिखलाने माखलेल्या चपला शाळेच्या प्रांगणात सोडून एकदा वर्गात बसल की थेट संध्याकाळीच घरी, तशी शाळा मात्र दुपारीच सुटायची पण मित्रांसोबत इकडे तिकडे भटकत फिरायचो.
परी, आमच्या आत्याची मुलगी,अवघ्या पाच वर्ष्याची, इवलीशी, नाजूक, गोंडस अगदी तिच्या नावाप्रमाणेच. माझ्या खूप जवळची, एकदा का रडायला लागली की माझ्याजवळ आल्याशिवाय शांतच नाही होयची. नुसत्या खोड्या करणार, कधी भांडी पाडून दे, कधी माती खा, कधी काय तर कधी काय. खेळून दमली का माझ्या छातीवर येऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐकत गाढ झोपी जाणार. तीच स्वतःचच एक वेगळ जग होत, तीच तिथली महाराणी. माझी आजी म्हणायची ही पोर खूप मोठ्ठी होणार! मग आपण तिच्यासाठी एक राजकुमार पाहू!
एकदा असच पावसाळ्यात आमच्या शाळेची सहल जाणार होती. आमचे आबा म्हणजे मोठे काका, घरातले सगळे निर्णय तेच घेत. आमच्या कौलारू वाड्याचे आधारस्तंभ म्हणायचे त्यांना, हा माणूस गावासाठी कितीही दिलदार असला तरी आम्हा पोरासोरांना नुसता दापात ठेवायचा. आम्ही सांगितल त्यांना सहलीबद्दल, आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं, नाही! पण आम्हीही ठरवलं यावेळी आबाच काही एक चालू द्यायचं नाही, शेवटी हट्टालाच पेटलो आणि एकदाची परवानगी मिळवलीच.
आम्ही सहलीवरून आलो तेंव्हा पाऊस कुणालाच जुमानत नव्हता, गावाच्या वेशीतून प्रवेश केला पण आज पारावर कुणी नव्हतं, पारच नव्हता, ना कुठले घर दिसत होते, ना कुठली गुरेढोरे, सगळीकडे भयाण शांतता अन त्या शांततेला भंग करणारा पावसाचा आवाज. जिथे पाहाव तिथे पाणी, आणि चिखल. सगळा गाव पाण्याखाली. कुठेच सजीवाचा लवलेशही दिसेना. सगळे पोर पोर, काळजीने बेजार झाले, जो तो आपापल्या घराकडे, मायबापाला सापडायला धावू लागला. आम्ही चौघेही वाड्यामध्ये पोहोचलो पाहतो तर सगळीकडे पाणी तुडुंब भरलेलं. भिंतीवरचे व्रण पाहता पाणी बरच भरलेल असाव. कमरेच्या वर असलेल्या पाण्यात आम्ही, “आईss...आजीss... आत्याss...” सगळ्यांना आवाज द्यायला लागलो, तितक्यात, तितक्यात विण्याचा त्याच्या खोलीतून आवाज आला, आवाज कसला तो किंचाळलाच जोरात, “आजेssss, ए आजे ssss, काय झालं तुला, उठ ना sss...” आम्ही पळतच तिकडे गेलो अन समोर पाहतो तर काय, वाड्याच्या मागच्या भिंतीखाली दबलेल्या आजी चा रक्ताळलेला मृतदेह! आम्ही भेदरलेल्या अवस्थेत मागे सरकलो अन गण्या धडपडून पाण्यात पडला, तो उठला अन पाहतो तर काय,...आई! आमच्यावर वीज कोसळावी तसा एक एक धक्का आम्हाला मिळत होता, अस वाटत होत पळून जाव तिथून, पावलंही अंगणाकडे वळाली, आबा शहाराकडे गेले होते ते पण येणार होते आज म्हणून घाबरलेल्या आमच्या जीवाला तेवढाच आसरा होता. मी वेशिकडे जायच ठरवल, आमच्या चौघांचे हाल आम्हालाच माहीत. मी जसा अंगणात गेलो तसा माझ्या पायाला काहीतरी जाणवल. मी पाण्यात हात घालून त्या वस्तूला बाहेर काढल आणि,.....आणि काळजात कुणीतरी चिर पाडावी, अंगावरच सालट सोलून त्यात मीठ मिर्ची भरावी, इतक्या जोरात एकच शब्द माझ्या तोंडातून निघाला....“परीsssssss” आणि मी शुद्ध हरपलो.
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

shocking...
हि खरी कथा आहे ? फारच वाईट
वाचुन २६ जुलै ची आठवण झाली.

म्हणूनच मी माझा प्रतिसाद बदलला होता. तो असा होता. हे जर काल्पनिक असेल तर इतक्या मोठ्या पुरात मुलं घरी पोहोचू शकले नसते, वाडा नेहमी उंचावर बांधलेला असतो व अशा वेळी सगळ्यात अगोदर लहान मुलांना जपतात.