लव्ह इन ट्रबल भाग- १४

Submitted by स्वरांगी on 28 June, 2019 - 05:40

लव्ह इन ट्रबल भाग-१४
“ आपल्याकडे कोणताच ठोस पुरावा नाहीये ज्यामुळे सिद्ध होईल की तो निर्दोष आहे…त्याने आपल्याला जे जे सांगितलं तिथे तिथे तो गेला होता याचा काहीच पुरावा नाहीये… तुझा त्याच्यावर विश्वास बसला???” थोड्या वेळाने जेव्हा अनु आणि अभिजित पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले,तेव्हा अभिजितने विचारलं…
“ मीही तेव्हा सेम कंडिशनमध्ये होते…माझ्याही निर्दोष असण्याचा कोणताही पुरावा नव्हता..” अनु म्हणाली..
“ हे बघ तुझ्या फिलिंग्स यात involve होऊ देऊ नकोस..” अभिजित तिला समजावत म्हणाला..
“ मला वाटतं की आपण वकील आहोत आणि आपण त्याच्या बाजूनेही विचार करायला हवा..” अनु तिची बाजू मांडत म्हणाली..
“ म्हणूनच मला कुणाची वकिली करायला आवडत नाही..आरोपीच्या विरोधात आपण केस घेतली की पुरावे सादर करून त्याला शिक्षा करून आपण मोकळे राहतो..आरोपीच्या बाजूने केस लढायची म्हणजे ही सगळी नाटकं येतात..” अभिजित कंटाळून म्हणाला..
“ मग का आलात तुम्ही इथे?” अनुने थेटच विचारलं..
“ मी तुझ्यामुळे आलोय…” अभिजित चिडून म्हणाला.. त्याचा आवाज वाढला होता..आता अनु गप्प बसली..तिचा चेहरा पाहून अभिजित वरमला.. आणि म्हणाला..
“ मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू आरोपीच्या बाबतीत उगाच हळवी होऊ नको..”
“ मी फक्त ज्यांच्यावर चुकीचे आरोप होतात त्यांचा इमोशनाली विचार करते…खऱ्या गुन्हेगारांचा नाही!!” अनुने स्पष्ट केलं…
“पण अजून त्याच्यावर खोटे आरोप झालेत हे सिद्ध व्हायचंय..” अभिजित ठामपणे म्हणाला..
“ पण मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास नाही ठेवलाय!!!फक्त तो खरं बोलतोय की नाही हे तपासून जर असं कळलं की तो निर्दोष आहे,मग मी त्याला सोडवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणार आहे…” अनुही ठामपणे म्हणाली..
“ पण तुझ्याकडे बघून तर मला असंच वाटतंय की तो जे काही म्हणाला ते तुला सगळं पटलंय!!” आता अभिजित वैतागला..
“ सर आपण वकील आहोत त्याचे!!!” अनुही वैतागुन म्हणाली..
“ म्हणूनच मला वकिली करायला आवडत नाही!!” अभिजित धुसफुसत पुन्हा तेच म्हणाला..
“ परत तेच!!” अनु वैतागुन म्हणाली…
“ पोलीस स्टेशनपासून इथपर्यंत मी एकच गोष्ट repeat करतोय तुझ्यामुळे!! का?? तर तुझ्या डोक्यात शिरावं!!!” अभिजित आता भांडायला लागला…
“ माझ्यामुळे?? माझ्यामुळे नाही सर, तुमच्यामुळे!!तुमच्यामुळे चाललंय हे सगळं!!!” आता अनुही तावातावात भांडू लागली आणि तणतणत गाडीकडे निघाली..
“ का??? माझ्यामुळे का??मी काय केलं??” अभिजीतही भांडत भांडत तिच्या मागे निघाला ..
“ आsssssss!!!! मला काही ऐकू येत नाहीये!!!” आता अनुने कानात बोटं घातली..आणि तीने जोरात आssss करून तान घेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं…
“ तुझ्यावर अज्जिबात विश्वास नाहीये माझा!! कुणाशी कसं वागशील काही सांगता येत नाही!!!” अभिजित तावातावाने बोलत होता…आणि दोघेही भर रस्त्यात जोरजोरात भांडून गाडीकडे निघाले…

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर काही विचार करून प्रियाने पुष्करला फोन लावला.. मोबाईल व्हायब्रेट झाला म्हणून पुष्करने पाहिलं तर प्रियाचा कॉल होता…त्याने एकदा मोबाईल हातात घेऊन कॉल घ्यायचा विचार केला पण पुढच्याच क्षणी तो विचार झटकून त्याने कॉल कट केला...अभिजीतकडून निघाल्यावर पुष्कर 7.30 पर्यंत घरी पोचला…तोच त्याला पार्किंगमध्ये प्रिया फेऱ्या मारताना दिसली..ती त्याचीच वाट पहात होती..
“ कॉल का कट केलास माझा?? असं का वागताय तुम्ही दोघं माझ्याशी?? तुम्ही दोघे आता एका टीममध्ये झालायत का?? मीच मूर्खासारखी तुमच्या दोघांच्या मागे फिरतेय !!!!” समोर पुष्कर दिसताच तिने त्याला जाब विचारला..प्रिया खूप वैतागली होती..
“ सगळं तुझ्यामुळे झालंय!!! विचका झालाय माझ्या आनंदाचा!!” प्रिया अजूनही रागातच होती…तिचं लक्ष पुष्करकडे गेलं…तो शांतपणे तिची बडबड ऐकत होता..प्रिया थोडी वरमली..
“ मला माहितेय,तुम्ही दोघं माझा तिरस्कार करता!!! आणि मी मान्य करते की मी खूप वाईट आहे… पण तुसुद्धा वाईटच आहेस!!! तुला माहितेय अभिजीतची गर्लफ्रेंड आहे?? मी माहिती काढलीय तिची…अशा खूनी मुलीवर तो कसं प्रेम करू शकतो?? हे सगळं खूप त्रासदायक आहे!!” प्रिया तावातावात म्हणाली….
“ खुप दिवसांनी भेटतोय आपण..” प्रियाचं बोलून झाल्यावर पुष्कर एवढंच म्हणाला..मग प्रियाही शांत झाली आणि म्हणाली,
“ हम्म…खूप दिवसांनी भेटतोय….”
“ घरी जा आता, उशीर होईल तुला पोचायला…” पुष्कर शांतपणे म्हणाला..
“ हा??” काही न कळून प्रिया म्हणाली..
“ खूप दिवसांनी भेटलो असलो तरी, आपण नको भेटायला एकमेकांना…” पुष्कर तटस्थपणे म्हणाला..आणि घरी जायला लिफ्टकडे वळला…प्रिया हताशपणे त्याला जाताना पहात राहिली... तो दिसेनासा झाल्यावर ती सावकाश वळली आणि निघून जाऊ लागली…तिला तसं जाताना पाहुन गाडीआड लपलेला पुष्कर हताशपणे ती दिसेनाशी होईपर्यंत पहात राहिला…

“ इथेच कुठेतरी असलं पाहिजे ते हॉटेल…पत्ता तर याच एरियातला आहे…” अनु स्वतःशीच बोलत इकडे तिकडे पहात पत्ता शोधत होती..काळोख पडला होता...तोच समोरच तिला हॉटेलचं नाव आणि arrow असलेला बोर्ड दिसला..म्हणून ती गल्लीत आत शिरली…ती जातेय तोच त्याच रस्त्याने अप्पासाहेब त्यांच्या गाडीतून जात होते..त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली..
“ याच एरियात कुठेतरी केकशॉप होतं ना??” अप्पासाहेबांनी विचारलं..
“ हो!! माझ्या लक्षात आहे ..मी आणून देऊ का साहेब??” ड्रायव्हरने विचारलं…
“ नको मी स्वतःच जातो दुकानात…” अप्पासाहेब हसून म्हणाले..ते दुकानात वेगवेगळे केक पहात होते..तोच तिथल्या फ्रुटकेक कडे त्यांचं लक्ष गेलं..
“ आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे!! त्याला फ्रुटकेक खूप आवडतो!!” अप्पासाहेब खुश होऊन म्हणाले..
“ मी तुम्हाला केक पॅक करून देते..” काउंटरवरची मुलगी हसून म्हणाली आणि केक घेऊन आत गेली.. अप्पासाहेब इकडे तिकडे पहात होते तोच त्यांचं लक्ष दुकानाबाहेर गेलं..अनु मोबाईलमध्ये काहीतरी पहात आनंदाने गल्लीतून बाहेर पडली…
अनु खुशीत चालत होती..आजूबाजूला वर्दळ नव्हती..तोच तिच्यासमोर अप्पासाहेब उभे राहिले…
“ अप्पासाहेब??” अनु त्यांना अचानक समोर पाहून गडबडली..आणि दोन पावलं मागे सरकली..
“ तुझी हिंमत कशी झाली हसायची??” अप्पासाहेबानी दात ओठ खात विचारलं..
“ हा??” अनुने काही न कळून घाबरून विचारलं..
“ तुला माहितेय आज कोणता दिवस आहे ते?!!!” अप्पासाहेब तिच्यावर ओरडून म्हणाले.
“ आज तो जिवंत असता तर आत्ता यावेळी तो केक कट करत असता..आणि मी स्वतः त्याला घास भरवला असता!! माझं मन तडफडतंय की मी आता माझ्या मुलाला माझ्या हाताने घास भरवू शकत नाही…आणि तू!! नालायक मुलगी!! त्याचा खून करून स्वतः मजेत जगतेयस!!” अप्पासाहेब रागाने थरथरत होते..
“ अप्पासाहेब, त्याच्याबद्दल मी तुम्हाला…” अनु घाबरत घाबरत बोलणार तोच त्यांनी अनुचा गळा पकडला..अनु दोन्ही हातांनी त्यांचा हात सोडवायचा प्रयत्न करू लागली..हाताने जोरात गळा आवळून ते म्हणाले,
“ असं वाटतं की मी राजकारणात नसतो आणि चोर किंवा गुंड असतो तर बरं झालं असतं!! कायद्याची भीती नसती तर तुला याच वेळी जिवंत जमिनीत गाडली असती!!!” अप्पसाहेब त्वेषाने म्हणाले…त्यांनी अनुचा गळा जोरात दाबला..अनुला आता श्वास घेता येईना..तोंड उघडून कसाबसा श्वास घेण्याचा आणि त्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न ती तडफडून करू लागली…काही वेळाने अप्पासाहेबांनी तिचा गळा सोडला..अनु घाबरून कशीबशी मागे सरकली..ती धापा टाकत होती..तिचे हात गळ्याभोवती आले..अनु धक्क्यातून सावरली नव्हती..अनुचे डोळे पाण्याने डबडबले होते..अप्पासाहेब चरफडत तिथून निघून जाऊ लागले..
“ मी खुनी नाहीये..” अनु थरथरत्या आवाजात म्हणाली..त्यांनी वळून मागे पाहिलं..
“ तुम्हाला खरं वाटो किंवा खोटं वाटो, मी काहीच केलेलं नाहीये…तुम्ही मला हजार वेळा विचारलं तरी मी हेच सांगेन की मी निर्दोष आहे..” अनु कसंबसं म्हणाली..
“ मग सिद्ध करून दाखव की तू निर्दोष आहेस!!!” अप्पासाहेब खेकसले..
“ खऱ्या गुन्हेगाराला माझ्या समोर आण!!! पण तिथपर्यंत माझ्या लेखी तूच खुनी आहेस!!!” अप्पासाहेब गरजले…आणि एवढं बोलून ते निघून गेले..
अनु हातापायात त्राण नसल्याने खाली बसली..आणि तिथेच बसून तिने जोरजोरात रडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली..

अभिजित त्याच्या टेबलवर बसून काम करत होता..तोच अनुने त्याच्यासमोर हातातला मोबाईल धरला..
“ हा आहे मंदार खरं बोलत असल्याचा पुरावा..” अनु हसून म्हणाली..अभिजीतने मोबाईल स्क्रीनवर पाहिलं..
“ मी हॉटेलच्या मालकांना मंदारचा फोटो दाखवून विचारलं, पण त्यांना नक्की बघितल्याची खात्री नव्हती..त्यामुळे काही कळलं नाही..पण मला हे मिळालं..” अनु मोबाईल दाखवत म्हणाली..हॉटेलमध्ये एका भिंतीवर स्टीकी नोट्स आणि काही फोटो चिकटवले होते..आपल्या मनातल्या गोष्टी शेयर करण्यासाठी तिथे एक नोटीस बोर्ड लावला होता..बऱ्याच जणांनी आपल्या आठवणी तिथे लिहून चिकटवल्या होत्या..फोटो लावले होते..अनुचं लक्ष तिकडे गेलं..आणि अनुने मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला..
“ ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी रात्रीचा, एका कपलच्या anniversary चा फोटो आहे हा… मंदारने जे सांगितलं ते खरं आहे..” अनु आनंदाने म्हणाली..
“ पण फक्त ही गोष्ट त्याला निर्दोष सिद्ध करायला पुरेशी नाहीये..” अभिजित अनुला समजावत म्हणाला..
“ हो पण निदान आता त्याच्यावर आपण थोडातरी विश्वास ठेवू शकतो!!” अनु समाधानाने म्हणाली..आणि हसून आपल्या रूममध्ये जायला वळली..
पण वळताच तिचा चेहरा गंभीर झाला आणि बाहेर जे झालं ते आठवून ती शांतपणे रूममध्ये गेली..अभिजितला काहीतरी वेगळं वाटलं तिच्या वागण्यात..पण काही न बोलता तो तिला जाताना पहात राहिला..

अनु रूममध्ये आरशासमोर बसली..तिने हळूहळू आपल्या मानेभोवती गुंडाळलेला रुमाल सोडवून बाजूला ठेवला..आणि मान वर करून ती आरशात पाहू लागली…तिच्या मानेवर अप्पासाहेबांच्या हाताचे वळ उमटले होते..मानेवर लाल बोटं उमटलेली दिसत होती..अनुच्या डोळ्यात पाणी तरळलं..
“ शांत हो अनु!! बरं झालं सरांना काही कळलं नाही!!” ती स्वतःशीच म्हणाली..तोच अभिजीने दारावर knock केलं आणि तो दार उघडून आत आला..त्याला अचानक आलेलं पाहून अनु गडबडली आणि तिने एक हात मानेवर ठेवला..अभिजित तिच्यासमोर आला आणि त्याने थोडं वाकून तिच्याकडे पाहिलं…अनु थोडं मागे सरकली…अभिजीतने तिचा हात धरला आणि मानेपासून बाजूला केला, पण तोच अनुने तिचा दुसरा हात मानेशी धरला..अभिजितने सावकाशपणे तिचा दुसरा हात बाजूला केला आणि त्याला तिच्या मानेवर उमटलेले हाताच्या पंज्याचे वळ दिसले..अनु शांतपणे उभी होती..
“ काय झालंय??” अभिजितने शांतपणे विचारलं..
“ काही नाही…” अनु त्याची नजर चुकवत म्हणाली…
“ इट्स ओके!! तू सांगू शकतेस मला!!” अभिजित आश्वस्तपणे म्हणाला..हे ऐकून अनुने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं..तो तिच्याकडेच पहात होता..त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसली तिला..
“ मला याबद्दल काही बोलायचं नाहीये…” अनु शांतपणे म्हणाली..
“ ठीक आहे…” अभिजित तिचा हात सोडत शांतपणे म्हणाला..
“ तू ठीक आहेस??” अभिजितने विचारलं..
“ हम्म…” अनुने मान हलवली..
“ ओके..एवढंच हवं होतं मला..” एवढं बोलून तिच्याकडे एकवार पाहून अभिजित रूममधून बाहेर पडला..तिला आत्ता तिची स्पेस देणं अभिजीतला गरजेचं वाटलं..तो गेल्यावर अनुने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि ती स्वतःच्याच विचारात हरवली…

दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र बसून चर्चा करत होते..सगळेच जोमाने काम करत होते..
“ फुटप्रिंट्स आणि DNA सॅम्पल हे दोन एविडन्स मी कलेक्ट केलेत, त्याचा स्टडी सुरू आहे..” झेंडे म्हणाले..
“ बाय द वे!! मी असं ऐकलं की मंदारला पाहिलेला साक्षीदार एक म्हातारी बाई आहे..तिला दिसत असेल का एवढ्या लांबचं??” बर्व्यांनी शंका काढली..बाकीच्यांनाही प्रश्न पडला..
“ आपल्याला साक्षीदाराचं स्टेटमेंट चेक करून पहायला हवं..” अभिजित म्हणाला..
“ मी सध्या दुसऱ्या केसवर काम करतोय, पण वेळ मिळेल तशी मी या केससाठी मदत करेन..” पुष्कर हातातले कागद चाळत म्हणाला..
“ मिस. नो एविडन्स!! जा मला प्यायला पाणी आणून दे!!” बर्व्यांनी ऑर्डर सोडली..अनुने तिकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती नोट्स काढू लागली..
“ मला पेन दे अनघा..” अभिजित हातातले कागद चाळत म्हणाला..ते ऐकून अनुने लगेच आपल्या हातातलं पेन पुढे केलं..
“ ए मिस. नो एविडन्स!! ऐकू आलं की नाही तुला??” बर्व्यांनी परत विचारलं..पण अनु ती मी नव्हेच अशा अविर्भावात बसली..
“ तुला मी सोडून बाकी सगळ्यांचं बोलणं ऐकू येत का??” बर्वे अनुवर खेकसले..
“ हो..त्यांना फक्त शांतपणे बोललेलंच ऐकू येत..” झेंडे त्यांची मस्करी करत म्हणाले..
“ मीच जाऊन घेतो पाणी..” टेबलावर हात आपटत बर्वे उठले आणि निघून गेले.. सगळे शांतपणे आपापलं काम करत बसले…सगळे दिवस कामात जात होते..

“ बर्वे म्हणाले तसं एवढ्या लांबून त्या वयस्कर बाईला तो मंदार आहे हे कसं ओळखता आलं??” झेंडे म्हणाले..
“ जर व्यक्ती ओळखीची असेल तर लांबूनही ओळखता येऊ शकतं..आणि मंदार त्या एरियात कुरियर सर्व्हिस देतो त्यामुळे कदाचित त्या बाईंनी लांबूनही ओळखलं असेल.. ” अनु म्हणाली..
“ काहीतरी चुकतंय…पण काय ते नक्की कळत नाहीये…” अभिजित डेड बॉडीचे घटनास्थळी काढलेले फोटो पहात म्हणाला..
“ चोरी गेलेलं सामान शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत पोलिसांचे..” झेंडेंनी माहिती दिली..
“ जर चोरीच्या उद्देशाने हा खून केला असेल तर गुन्हेगाराने मिस्टर शहांवर एवढे वार का केले??” अभिजितने मुद्दा मांडला..अनुने फोटो नीट निरखून पाहील्यावर तिच्याही ते लक्षात आलं..
“ हत्यार मिळालं??” अभिजितने झेंडेंना विचारलं.. झेंडेंनी नकारार्थी मान हलवली..

“ मी कोर्टात जातेय..आज पहिला दिवस आहे मिस्टर शहांच्या केसचा..” मोनिका म्हणाली..तिच्या समोरच प्रिया बसली होती..तिची तब्येत बरी वाटत नव्हती..प्रिया आणि मोनिका दोघी मिळून या केसवर काम करत होत्या..प्रिया मोनिकाला सिनिअर होती…मोनिकाने तीच फर्म जॉईन केली होती..आणि आज केसची सुनावणी होणार होती…त्यातच मोनिकाला कळलं होतं की विरुद्ध बाजूला अनघा आहे..त्यामुळे तर तिला अजूनच जोर आला होता..
“ थांब, मीपण येते..” प्रिया खुर्चीतुन उठत म्हणाली..
“ मी जाऊ शकते एकटी!! मी सगळं व्यवस्थित हँडल करेन!! तुमची तब्येत बरी वाटत नाहीये..तूम्ही आराम करा...” मोनिका तिला समजावत म्हणाली..
“ नको..मलापण यायचंय..” असं म्हणून प्रिया कशीबशी उठली..

कोर्टात सगळेजण वेळेत हजर झाले.. एका बाजूला प्रिया आणि मोनिका बसल्या होत्या..तर दुसऱ्या बाजूला अभिजित आणि अनघा बसले होते.. दोघही सगळे documents नीट आहेत की नाही याची खात्री करून घेत होते..प्रियचं लक्ष अभिजीतकडेच गेलं..तो अनुसोबत डिस्कशन करण्यात बिझी होता..मंदारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं..judge साहेब आल्यानंतर कोर्टाच्या कामकाजाला सुरवात झाली..
“ आरोपी ‘ मि.मंदार जाधव’ हे २० मे २०२० रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास माझे अशील ‘मि. जितेंद्र शहा’ यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले.. त्यानंतर आरोपीने माझ्या आशिलाला ते बेसावध असताना चाकू खुपसून मारलं आणि घरातील सगळ्या किमती वस्तू, रोकड व दागिने घेऊन पसार झाला…म्हणूनच माझ्या आशिलाचा निर्घृणपणे खून करून चोरी केल्याप्रकरणी कलम- ३९० नुसार आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावावी अशी मी कोर्टाला विनंती करते..” मोनिकाने तिची बाजू मांडली आणि ती खाली बसली..
“ आरोपीला त्याच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य आहेत??” judge साहेबांनी विचारलं..
“ नाही युअर ऑनर!! माझे अशील ‘मि.मंदार जाधव’याच्यावर जे आरोप झालेत ते खोटे आहेत.. माझ्या आशिलाचा ‘ मि.शहा’ यांचा खून करण्याचा काहीही उद्देश नव्हता, किंवा तसं कारणही नव्हतं..” अभिजीत म्हणाला..
“ पण जेव्हा व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसते तेव्हा त्याला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्याला कोणत्याही कारणांची किंवा उद्देशाची गरज नसते!!” मोनिका ठामपणे म्हणाली…
“ मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे..पण चोरी हाच मूळ मुद्दा आहे खून झाल्याचा..आणि ती चोरीच माझ्या आशिलाने केलेली नाही..” अभिजितने मुद्दा मांडला..
“ पण घटनास्थळापासून सर्व किमती ऐवज चोरीला गेलेला आहे !!” मोनिका म्हणाली..
“ अगदी बरोबर!! घटनास्थळापासून सगळ्या किमती वस्तू चोरीला गेल्यात!! पण त्या वस्तू माझ्या अशिलाने चोरल्या याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे??” अभिजितने प्रश्न विचारला…मोनिका यावर गोंधळली..
“ युअर ऑनर , चोरीला गेलेल्या मालाचा शोध अजूनही सुरू आहे..चोरीला गेलेल्या ऐवजातली एकही वस्तू माझ्या अशीलाच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी सापडलेली नाही!!! त्यांच्या बँक बॅलन्स मधेही कोणत्याही प्रकारचे changes झालेले नाहीत.. जर माझ्या अशिलाने चोरी केली असती तर यापैकी काहीतरी सापडण्याची शक्यता होती..जर चोरीचा माल विकला गेला असता तर ते पैसे रोख रकमेत घरी किंवा बँक बॅलन्स मध्ये तरी मिळाले असते…पण तसं काहीही मिळालं नाहीये…” अभिजित ठामपणे म्हणाला..मंदार ऐकत होता..अभिजित त्याची बाजू व्यवस्थित सांभाळत होता..अनुही लक्षपूर्वक अभिजितचं बोलणं ऐकत होती…अभिजीतच्या या बोलण्यावर मोनिका निरुत्तर झाली आणि खाली बसली..
“ तुम्हाला असं म्हणायचंय का की चोरीच झालेली नाही??” judge साहेबांनी विचारलं…
“ येस युअर ऑनर.. फिर्यादीच्या वकिलांनी कलम-३९० नुसार खून आणि चोरीसाठी सांगितलेली जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी आधी चोरी झाली, हे सिद्ध होणं आवश्यक आहे.. त्यामुळे माझ्या अशिलावर झालेला चोरीचा आरोप, आणि खून हा चोरी करण्यासाठी केल्यामुळे, खुनाचा आरोप..हे दोन्हीही आरोप valid नाहीयेत कारण माझ्या अशिलाने चोरी केलीच नाही..आणि त्यानेच खून केल्याचा कोणताही पुरावा नाहीये!! त्यामुळेच माझ्या अशिलावर झालेले दोन्हीही आरोप मी फेटाळून लावतोय!! That’s all your honour!!” एवढं बोलून अभिजित खाली बसला..अनुने मंदारकडे पाहिलं आणि हसून त्याला धीर दिला.तिने अभिजीतकडे पाहिलं..तो ज्या दिशेने पहात होता त्या दिशेला तिने पाहिलं आणि अनु गंभीर झाली..अभिजित प्रियाकडे पहात होता आणि थोड्या वेळाने त्याने नजर फिरवली...अनुने आळीपाळीने दोघांकडे पाहिलं आणि सुस्कारा सोडला..
Judge साहेबांनी पुढची तारीख दिली आणि कोर्टाचं कामकाज थांबवण्यात आलं..

पुष्कर कोर्टासमोर टॅक्सीतुन उतरला..समोरूनच त्याला प्रिया येताना दिसली..हळूहळू पावलं टाकत ती चालत होती..तिचा चेहरा उतरला होता.. तिच्या मागूनच अभि आणि अनु येत होते..
“ आज जसं आपण विरोधी वकिलाला निरुत्तर केलं तसं पुढच्या सुनावणीला केलं की मंदारला सोडवणं सोपं जाईल आपल्याला..” अनु उत्साहात बोलत होती..पण अभिजीतचं लक्ष नव्हतं..
“ सर!! ऐकताय ना तुम्ही??” अनु पुढे बोलणार तोच तिचं लक्ष प्रियाकडे गेलं .. प्रिया कशीबशी पाय ओढत गेटपाशी आली..पण तिला मधूनच चक्कर आल्यासारखी वाटली म्हणून तिने शेजारच्या खांबाला धरून ठेवलं..ते पाहून अभिजित मोठमोठी पावलं टाकत तिच्यापर्यंत पोचला..
“ प्रिया!!” तिच्या दंडाला धरत अभिजितने तिला सावरलं..तिने वळून पाहिलं..
“अभिजित??” प्रियालाही आश्चर्य वाटलं..
“ तू ठीक आहेस??” अभिजीतने विचारलं..
“ हो मी ठीक आहे..” प्रिया म्हणाली..तिचा आवाज मलूल झाला होता..
“ मला नाही वाटत तू एकटी घरी जाऊ शकशील!!” अभिजित न राहवून म्हणाला..
“ नको!! मी जाईन अरे..” प्रिया कसंबसं म्हणाली..
“ थांब..मी सोडतो तुला घरी..गाडीत बस…” अभिजितने तिला पार्किंमधल्या आपल्या गाडीचा दरवाजा उघडून दिला आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसणार तोच त्याचं लक्ष अनुकडे गेलं..ती त्यांच्याकडेच पहात होती..अभिजितने तिच्याकडे पाहताच तिने त्याला शांतपणे जायची खूण केली..नजरेनेच अनुचा निरोप घेत तो गाडीत बसला..त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला..त्याला गेलेलं पाहून अनु सावकाश चालत गेटकडे निघाली तोच तिला समोर पुष्कर दिसला..तिने पुष्करकडे पाहिलं..त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने तिच्याकडे कसंनुसं हसून पहात खांदे उडवले..
पुष्कर आणि अनु दोघे टॅक्सीने घरी निघाले..दोघही गप्प गप्पच होते..
“ मला माहितेय मी जे बोलतेय ते तुम्हाला बलिश वाटेल, पण मला कधीकधी आजारी पडणाऱ्या मुलींचा खूप हेवा वाटतो!!” अनु खिडकीतून बाहेर बघत म्हणाली..
“ माझ्या आईने एका हेल्दी मुलीला जन्म दिला!! त्यामुळे मी सहसा आजारी पडत नाही..” अनु निर्विकारपणे म्हणाली..त्यावर पुष्करला काय reaction द्यावी ते कळलं नाही म्हणून तो नुसतंच हाहाहा!! करून खोटं हसला..
“ तुम्हाला खोटं हसण्याची गरज नाही सर!!” अनु शांतपणे म्हणाली..यावर पुष्करने तिच्याकडे पाहिलं..आणि स्वतःशीच हसून तो खिडकीबाहेर पाहू लागला..

अनु घरी पोचली तेव्हा काळोख पडला होता..दार उघडून तिने सगळे दिवे लावले आणि घरावरून नजर फिरवली..रिकामं घर बघून तिला कसंतरीच झालं..आणि ती सावकाश पावलं टाकत आपल्या रूमकडे गेली..इकडे पुष्करही घरी पोचला तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते..त्याने डोळे पुसले आणि आवरायला आत निघून गेला..
दुसरीकडे प्रिया हळूहळू चालत आपल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोचली..तिच्या मागेच अभिजित सावकाश चालत होता..
“ घरी जा सावकाश, मी निघतो आता..तू ठीक आहेस ना??” अभिजित तिला लिफ्टपाशी सोडत म्हणाला..
“ हो..घरी जाऊन गोळी घेतली आणि झोप काढली की बरं वाटेल मला..” प्रिया शांतपणे म्हणाली..
“ ठीक आहे..मग निघतो मी..” असं म्हणून अभिजित जायला निघाला तोच प्रियाने त्याचा हात धरला..अभिजित आता गंभीर झाला..
“ घरात नाही येणार तू??” प्रियाने विचारलं..अभिजीने तिच्याकडे वळून पाहिलं..
“ कॉफी तरी घेऊन जा!!” प्रिया आशेने म्हणाली..
“ नको असं वागू…” अभिजित गंभीरपणे म्हणाला..
“ मी प्रेम केलंय तुझ्यावर अभि!! जेव्हापासून आपण वेगळे झालोत, तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझाच विचार केलाय अभिजित!! आणि पुढेही तुझ्यावरच प्रेम करत राहीन!!” प्रियाचे डोळे पाण्याने डबडबले होते..
“ मी एकटी पडलेय रे तुझ्याशिवाय!! मला फक्त तू हवायस अभिजित, बाकी काही नको!!” प्रिया आता रडू लागली..अभिजितचेही डोळे आता पाणारले होते..पण तरीही तो रोखून तिच्याकडे पहात होता..

अनु घरी हॉलमध्ये फेऱ्या मारत अभिजीतची वाट पहात होती.. रिकामं घर तिला खायला उठलं होतं..मधूनच ती स्वतःच्या टेबलवर जाऊन बसली आणि उगीचच कोणतीतरी फाईल घेऊन कागद चाळू लागली..तिथे स्वस्थ बसवेना म्हणून ती किचनमध्ये ओट्यापाशी गेली..सगळं नीट आवरून ठेवलेलं होतं..
फ्रिज उघडून पाहिलं..सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवलेल्या होत्या..बाकीच्या गोष्टी जागच्या जागी होत्या.. अनु पुन्हा बाहेर आली..वेळ जाता जात नव्हता..मधूनच ती अभिजीतच्या रूमकडे जायला जिना चढू लागली..पण मधूनच खाली उतरली..ती अस्वस्थपणे हॉलमध्येच येरझाऱ्या मारू लागली..मधूनच तिला काय वाटलं कुणास ठाऊक पण ती अभिजीतच्या टेबलापाशी गेली..त्यावर त्याची नेम प्लेट ठेवलेली होती..’ advocate अभिजित कुलकर्णी’.. ती पाहून तिला गहिवरून आलं.. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं..अभिजित अजूनही आलेला नव्हता..

आता अनु गेटबाहेरच अभिजितची वाट पहात उभी राहिली..तिला राहवेना..ती जरा पुढे जाऊन त्याची गाडी दिसतेय का ते पाहून आली..
“ अजून कसे आले नाहीत सर!!” अनु अस्वस्थपणे गेटबाहेरच फेऱ्या मारत होती..तिने हातातल्या घड्याळात पाहिलं..तोच अभिजित सावकाशपणे पावलं टाकत हातात ऑफिस बॅग घेऊन गेटकडे येत होता..अनुने घड्याळात पाहून मान वर केली तोच तिला अभिजित दिसला..तोही अनुकडे पहात दोन पावलं पुढे आला आणि तिला बाहेर उभी राहिलेली पाहून तिथेच उभा राहिला..अभिजीतला पाहून अनुचं हृदय जोरात धडधडू लागलं…
तिला काय वाटलं कुणास ठाऊक पण त्याला आलेलं पाहताच ती त्याच्या दिशेने निघाली आणि धावतच जाऊन तिने अभिजीतला मिठी मारली…..
“ मला वाटलं की तुम्ही आज येणारच नाही!!!”अनु थरथरत्या आवाजात म्हणाली..अभिजित शांतपणे उभा होता..
“ आय लाईक यु!!! मला तुम्ही आवडता कुलकर्णी सर!!” अनु सावकाशपणे एक एक शब्द उच्चारत म्हणाली..अभिजीतच्या डोळ्यांत पाणी तरळलं…अनुला थोपटण्यासाठी त्याने हळूहळू हात वर उचलला..पण काही विचार करून त्याने आपला हात हळूहळू खाली घेतला…
“ डोन्ट लाईक मी…” अभिजित शांतपणे उत्तरला..
“ सगळ्याच गोष्टींची सुरवात आपल्या हातात नसते…आणि काही गोष्टींचा शेवटही आपल्या हातात नसतो…पण अनु आणि माझ्या नात्याची सुरवात होण्याआधीच मला ती सुरवात थांबवली पाहिजे..कारण याच सुरवातीची मला भीती वाटतेय..” अभिजित मनातल्या मनात म्हणाला..
क्रमशः
टीप- कथेच्या सुरवातीला मी शुभमचा खून 11 मार्च 2019 ला झाल्याचं टाकल्यामुळे त्यापुढील कथा जवळपास वर्षभर पुढे गेलेली आहे..म्हणूनच मला या भागात 2020 हे साल टाकावं लागलं.. Lol नाहीतर मागच्या सगळ्याच तारखा बदलाव्या लागतील.. कृपया माबोकरांनी समजून घ्यावं..

Group content visibility: 
Use group defaults