मण्यांची टोपी (भाग-१)

Submitted by विनीता देशपांडे on 15 June, 2019 - 02:23

सुखदाचा फोन आला आणि रत्नाचा जीव कासावीस झाला.
"नीट जा, जपून जा, काळजी घ्या...पोहचल्यावर फोन करा, अंतराची काळजी घ्या......." रत्ना वारंवार दोघांना फोनवर सांगत होती.
"आई पण न....खूप काळजी करते" सुखदा
"का ग काय झालं?" जयेश
"काही नाही रे परवा शाळेतून परस्पर जाऊनच आईला सांगणार होते. जाणं झालं नाही रे. अपण दिवेआगरला जातोय हे फोनवर सांगितले तर इतक्या इंस्ट्र्कशन्स देत होती की काय सांगू." सुखदा
"साहजिकच आहे" जयेश
"हो रे, एक तर अंतराची पण भेट झाली नाही म्हणून चिडली असावी बहुधा." सुखदा
"कित्ती सुचना.....मी लहान नाही ... चक्क आई आहे एका मुलीची" सुखदा
"आणि ती तुझी आई न म्हणून.....काळजी स्वाभाविक आहे ग" जयेश

गाडी दिवेआगरच्या दिशेने संथपणे चालली होती. "मैं फिक्र को धुंएंमें उडाता चला गया...गाणं सुरु होतं. त्या ठेक्यावर जयेश शिट्टी वाजवत होता. अंतरा आईच्या मांडीवर झोपली होती. तर सुखदा आठवणीत हरवली होती. .
"काय झालं राणी...?" जयेशने विचारले
"काही नाही रे. आम्ही होतो फार पूर्वी दिवेआगरला. पण काही आठवत नाहीया." सुखदा
"इतुकशी होतीस तेव्हा तू. काय आठवणार. डोन्ट स्ट्रेस योअरसेल्फ. रिलॅक्स. जस्ट एन्जॉय अवर वेकेशन" जयेश
"ताम्हणी घाटात थांबू नकोस रे" सुखदाला आईच्या इंस्ट्रक्शनस आठवल्यात.
"ओके डियर" म्हणत जयेशने गाडीचा वेग वाढवला.
खिडकीबाहेरच्या हिरव्या निसर्गात सुखदाचा स्मृतीपलीकडच्या खुणा शोधत होती.
खरच, काहीच कसं आठवत नाही....तिलाही आश्चर्य वाटत होत.
दिवेआगर सोडलं तेव्हा ती चार-साडेचार वर्षाची असेल. पण नेमकी त्याच आठवणी तिला जणु हुल देत होत्या.
अंतराच्या चुळबुळीमुळे सुखदा भानावर आली.
दोन तीन बिस्कीटं खाऊन झाल्यावर अंतराची मस्ती पुन्हा सुरु झाली.
माणगाव क्रॉस करेपर्यंत अंतरा कंटाळली होती.
तिला खेळवत दोघेही दिवेआगरला तिन्हीसांजेला पोहचले.
आकाश पाटिलच घर शोधायला थोडा वेळ लागला, थोड्या वेळाने सापडलं. खिशातून किल्ली काढत जयेशने सुखदाला इशारा केला.
दोघांनाही सुट्टी साठी हवी तशी जागा होती ती. बांबूनी वेढलेला संपूर्ण परिसर, भवताल नारळ, सुपारीच्या झाडांची गर्दी. आणि मध्यभागी टुमदार कौलारु घर.

शेजारच्यांनी अंगणात सडा टाकला असावा, त्याचा ओलसर गंध श्वासात खोलवर घेत जयेशने गाडीतून सामान काढायला सुरवात केली. कॅमेरा नुकताच घेतला होता आणि फोटोग्राफीची आवडही होतीच. झालं सामान उतरवून होत नाही की तो लागला फोटो काढायला.
घरात गरजेचे सर्वच सामान होते. जुजबी किराणा त्यांनी सोबत आणला होता. दुध व पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय करायची होती.

आकाश तसा दोन-तीन महिन्यातून एखादी चक्कर टाकायचा. ऐन वेळेवर सुट्टी कॅन्सल झाल्यामुळे तो जयेश सोबत न येता दहा दिवसांनी येणार होता. तसा शेजारच्या नारु अण्णा आणि निर्मलाकाकूंना आकाशने फोन करुन जयेश व सुखदा येणार असल्याचं कळवलं होतं.
गाडी बघताच नारुअण्णा तिथे हजर झाले. त्यांच्या सुचना आणि माहिती देणं सुरु झालं. ते थांबत नाही बघून थोड्यावेळाने जयेशने सुखरुप पोहचल्याचा फोन करायला घेतले तेव्हा कुठे नारु अण्णांच्या बोलण्याला ब्रेक लागला.
तेवढ्यात अंतराचं रडणं सुरु झालं आणि सुखदाही तिथून बाजूला झाली.
नारु अण्णा मात्र जयेशचं फोनवर बोलणं आटपेपर्यंत पायरीवर बसून होते. अंधुक अंधार हळुहळु गडद होत होता.
"चला, जवळच दुकान आहे, दुध अंडी वैगरे तुम्हाला काय हवंय ते घेऊन येऊ. हो म्हणजे दुकान दाखवून देतो. नंतर त्रास नको." जयेशने फोन ठेवताच त्यांनी फर्मान सोडलं
"हो, चला की. सुखदा....आलोच ग दहा मिनटात" जयेशने चप्पल अडकवत म्हंटलं
सुखदाने घराचा ताबा घेतला. किचन तसं स्वच्छ होतं, ओटा धुवून अंतरासाठी आणलेले अन्न गरम करुन तिला जेवायला घातलं. अंतरा शांत झाली.

उद्दा कमल नावाची पोरगी साफसफाईसाठी येईल गं. जयेशने सामान ओट्यावर ठेवत सांगितले.
रात्री ब्रेड ऑमलेट खाऊन थकलेले तिघेजण झोपी गेले.
ते सकाळी कमलच्या दरवाजा ठोठवण्यानेच त्यांना जाग आली.
कमल, तीशीतली सडसडीत बांध्याची सावळीशी बाई, न बोलताच तिने भरभर अंगण आवरलं, पाण्याची काम आटोपली. ओसरीवर बसून अंतराला खेळवायचा तिचा प्रयत्न फसला. अंतरा तिच्याजवळ जायला तयार होईना.
शेवटी स्वयंपाकघरातील काम सांगून सुखदा अंतराला अंगणात खेळवत बसली.
जयेश जॉगिंगकरुन आला. सुखदाला हायस झाल.
"घे रे हिला, काहीच सुचु देत नाही. खेळायचं हिच्याशी...." सुखदाने वैतागून अंतरा त्याच्या कडेवर देत म्हंटल

चल चिमणे, आपण भुर्रर्र जाऊ..... बाय आई...करत दोघे फिरायला निघाले
कमल... सुखदाने बोलायचा प्रयत्न केला ....ती फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती.
तिला कामं सांगून सुखदाने आईला फोन केला.
कुठे उतरलात, जागा कशी....आईची प्रश्नावली सुरु झाली.
एकटी दुकटी खूप इकडे तिकडे, दूरवर जाऊ नको. आईने तिला हे किमान दहा वेळा सांगितले असावे.
आई एवढी का काळजी करतेय? सुखदाला कळेना
"आई मी लहान असतांना आपण दिवेआगरला एकदा चिन्मय मामाकडे आलो होतो न. काही आठवत नाहीया ग मला" हे वाक्य ऐकताच रत्नाने रात्री फोन करते म्हणत फोन ठेवला.
आईच उत्तर टाळणं, पुण्याहून निघाल्यापासून तिच्या सतत सुचना देणं, तिला आश्चर्य वाटत होतं. आई असं का बोलत असेल या विचारात सुखदा ओसरीवर येऊन बसली.
वीस-बावीस वर्षापूर्वी ती चिन्मयमामाकडे लग्नाला आली होती. नको असं काही तरी तेव्हा घडलं होतं. तिला फक्त एवढच आठवत होतं. नंतर या विषयावर आई व बाबा चर्चा करण्याचे टाळत होते. नंतर बाबांच्या अचानक जाण्याने हा विषय फारसा बोलला गेला नाही. काहितरी नक्की घडलं होतं. काय ते तिला त्या क्षणी आठवत नव्हतं. नेमकी हीच गोष्ट तिला अस्वस्थ करत होती. काही बाबतीत आई तिच्या खूप पझेसीव होती तिला जणवत होतं. तिला पिकनीकला कधीच जाता आले नाही. आई तिला सहजासहजी एकटं राहू देत नसे. आज ती या सगळ्या गोष्टींचा का विचार करत होती हे तिला ही त्या क्षणी कळत नव्हतं. आईच्या अशा वागण्याचा आत्ता तिला अर्थ का शोधायचा हे ही तिला उमगत नव्हते.
"ताई, पाणी भरुन घेऊ का?" कमलच्या हाकेने ती भानावर आली
कमलने सगळी कामं उरकली होती.
मम्मा......रंगबेरंगी फिरती चक्री घेऊन अंतरा तिच्याकडे झेपावली.
"काय उरकलेत न कामं." जयेशने ओसरीवर शेजारी बसत विचारले.
"मग, फिश फ्राय तय्यार आहे. सोबत सोलकढी पण हं" सुखदाने अंतराला मांडीवर घेत म्हंटलं

जेवणं झाली तशी कमल आवरुन निघाली. निघतांना तिने अंतराला बाय केलं. अंतराने बाबांच्या मागे लपत तिला हळूच बाय केलं.
"ओळख वाढली की गट्टी जमेल तिची तुझ्याशी" सुखदाने अंतराला घेत म्हंटलं
"आज नको हरिहरेश्वरला जायला. उद्दा जाऊ या का. सकाळी लवकर आवरते मी." सुखदा
"ओके, एज्ज यू से मॅम’ जयेश
"एनी वे आकाशशी बोललो आज. अरुंधती आणि तो पुढच्या आठवड्यात येतील. तो आला की पार्टी मग दोन तीन दिवस राहून आपण निघु. चालेल?" जयेश
"यप्प! मला काय शाळेला सुट्ट्या आहेत तोवर मला पण. तुझच बघ रे" सुखदाने चिडवत म्हंटले
"या आधी निघायच्या ऐन वेळेवर दोनदा तुझ्या सुट्ट्या कॅन्सल झाल्यात म्हंटलं" सुखदा
"सोड न यार." जयेशने खजिल होत म्हंटलं.
"य़ा वेळेस म्हणून तर जास्त सुट्ट्या घेतल्या.....सगळ्याची भरपाई...." जयेश लाडात आलेला बघून तिने जेवायला चलायचा आग्रह धरला.
जेवण झालं. ओटा आवरता आवरता सुखदा परत त्याच विचारात हरवली. काय झालं असेल?
"काय ग राणी, मी तर इथेच आहे, तू कुठे हरवलीस." तिला विचारात मग्न बघून जयेशने थट्टेनं विचारलं
तरीही तिचा चेहरा गंभीरच. काही केल्या तिच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता.
जयेशने तिला जवळ घेताच तिला रडू आवरले नाही. सर्व ऐकून जयेश सुन्न झाला. त्याने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला की हा तिच्या मनाचा खेळ आहे. ती उगिचच विचार करतेय वैगरे वैगरे. त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरलेत.
जयेश जेवढ तिला समजवत होता, ती तिच्या मतावर ठाम होत होती. शेवटी त्याने आईला फोनवर विचारु का म्हणताच ती चिडली जोरात नाही..... म्हणून ओरडली.
तिला अंधुकस आठवलं की एकदा तिला ताप आला होता, शेजारी आई आणि चिनूमामा बोलत होते. आई त्याला शपथ घ्यायला सांगत होती...तो कधीच काही सांगणार नाही म्हणून. गुंगीत असल्यामुळे कशाबद्दल बोलत होती दोघं, ते तिला उमगलं नव्हतं.
आता मात्र जयेशचा बांध सुटला. पुरे कर हे मनाचे खेळ. आणि यात काही तथ्य असलं, तरी कारण असेल म्हणूनच आईने सांगितले नसेल. त्याला चिडलेला बघून सुखदा तेवढ्यापुरती शांत झाली.
तिच्या डोक्यातून तो विचार बाजूला झालेला नाही हे जयेशच्या लक्षात आलं होतं. आईशी बोलण्यापेक्षा सध्या तिला या विचारांपासून
डायवर्ट करणं गरजेच होतं.
संध्याकाळी अंतराला घेऊन दोघेही फिरायला बाहेर निघाले. दोघेही निशब्द होते. झाला प्रकार विसरुन जायचा. आपण सुट्टी घालवायला आलो आणि काय वेडेपणा करतोय हा विचार सुखदाच्या मनात आला. खरच हा माझ्या मनाचा खेळही असू शकतो. बाबांच छत्र हरवलं आणि आई आपल्या बाबतीत पजेसीव झाली असावी. मी कुठे आईला सगळं सांगत होती. न सांगण्यासारख असाव म्हणूनच नसेल सांगितलं. ती स्वत:ला समजवत होती. तिची घालमेल जयेशला लक्षात आली.
"सॉरी, मी मघाशी ओरडून बोललो" जयेश
"मीच सॉरी, नको त्या गोष्टीचा उगाच हट्ट धरुन बसले" सुखदा

बीच वरून दोघेही रुपनारायणाच्या मंदिरात आले. मंदिराच्या पायरीवर दोघांच्या मनातील मळभ सरलं होतं.
तिन्ही सांजेच तिघांना परत येतांना बघून नारु अण्णांनी चहासाठी आवाज दिला.
चहा आणि गप्पा झाल्यात. दोघही घरी आले.
"उद्दा हरिहरेश्वर नक्की न. आवारायला घेते." सुखदाने असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही हे मनोमन ठरवलं आणि तयारीला लागली.

सकाळी कमल आली तर तिच्या सोबत एक लहान मुलगी होती "कुमुद". अंतराहून थोडी मोठी..पाच वर्षाची असेल.
अंतरा आणि तिची छान गट्टी जमली. तिच्यामुळे का होईना आज कामं पटपत आवरता आली.

नाश्ता झाला. अंतराच सामान चेक करत सुखदाने कमलला सुचना दिल्यात. "संध्याकाळी नको येऊस. उद्दाच ये. हरिहरेश्वरहून यायला उशिर होईल."
"चला बसा गाडीत" जयेशने सामान डिक्कीत ठेवत म्हंटल
"कुलुप लावलय, दिवे बंद आहेत, गीजर बंद, खिडक्या बंद. यप्प, चल निघू या" सुखदा

नारु अण्णांनी हात दाखवला तसं जयेशनी गाडी थांबवली, काच खाली केली.
"भाऊ सिरियस आहे. चार दिवस गावी जाऊन येतो. तुम्ही कुठे निघालात?" नारु अण्णा
"हरिहरेश्वर" सुखदा
"चला, तुम्हाला बस स्टॉप वर सोडतो" जयेश
"निर्मल, निघ ग लवकर, जयेश सोडतो आपल्याला." नारु अण्णा
तेवढ्यात दाराला कुलुप घालून पिशवी सांभाळत काकू गाडीत येऊन बसल्या.
नारु अण्णांची बडबड एकदा सुरु झाली की थांबतच नसे. काकूंनी दोन-तीनदा सुखदाशी बोलण्याचे प्रयत्न केला. पण नारु अण्णा बोलू देतील तर शपथ.
"काय हो तुमच्या बोलण्याच्या नादात हिला निरोप द्दायचा राहिला हो" निर्मला काकू
"नंतर बोल, गाडी लागलीय होय. पुढची गाडी दोन तासानी आहे. चल लवकर" नारु अण्णानी काकूंना घाई केली
"असो, यांच्या गडबडीत विसरले ग मी काय सांगणार होते" काकू निघतांना म्हणाल्या.

कमल सकाळी सकाळी यायची. मदत करायची, आवारायची आणि अंतरा छोट्या कुमुदशी खेळायची.
सकाळी नाश्ता करुन निघायचं. रात्री परतायचं.
हरिहरेश्वर,मुरुड जंजिरा,श्रीवर्धन, बाणकोट किल्ला, फणसड अभयारण्य, फिरण्यात आठवडा निघून गेला.
अप्रतिम निसर्ग बघून जयेश वेड्यासारखे फोटो काढत होता.

दोघं रात्री ओसरीवर बसून आकाशात पसरलेलं चांदण बघत होते. या पाच वर्षात नुसतच धकाधकीच आयुष्य जगत होते. ट्रॅफिक, गोंगाट, जीवघेण्या गर्दीपासून दूर शांत समुद्र किनार्‍यावर फिरायचं, खूप भटकायच, फोटो काढायचे. अंतराला पुर्ण वेळ द्दायचा. आज दोघांच हे स्वप्न पुर्ण झालं होतं. पूढच्या काही वर्षांसाठी त्यांनी उर्जेचा हा स्त्रोत ओतप्रोत भरुन घेतला होता.
आकाशच्या फोनमुळे दोघेही भानावर आले.
अरुंधतीच्या बहिणाला अपघात झाल्यामुळे आकाश आणि अरूंधतीचं येणं रद्द झालं होतं.
"काय करायचं, थांबायचं की जायचं?" जयेश
"इथून निघायची इच्छा तर नाहीया." सुखदा
"ह्म्म. जायला तर हवं ना" जयेश
"आपण उद्दा निघालो तर. शुक्रवार- शनिवार बॅंकेचे आणि इतर कामं आटपून रविवारी एज युजवल सोमवारची तयारी. ऍंड देन बॅक टू रुटीन" जयेश
"वीद न्यू ऎनर्जी, न्य़ू ड्रीम्स ऍंड न्य़ू लाइफ." सुखदा
"ओके. ओके. आईकडे पण एक दिवस जाता येईल. तिची नाराजीही दूर होईल." सुखदा

सकाळी नाश्ता करुन निघायचं ठरलं. सगळं सामान आवरुन अंतराच खाण्या-पिण्याचं सामान घेतलं. तिला कुमुदसोबत खेळतांना बघून सुखदाने भराभर पॅकिंग केले. जयेश एकेक सामान गाडीत भरत होता.
"कमलला किती पैसे द्दायचे?" जयेश
"हजार दे न. खुप मदत झाली रे तिची. आणि हो निघतांना दे" सुखदा
"ऐक ना, एवढे फोटो काढलेत, आमचा एक कमल आणि कुमुद सोबत काढ ना. आठवण राहिल रे" सुखदा
"ओके. एज यू से मॅम" जयेश
ओसरीवर फोटो काढले. अंतराच्या पाठीवर ट्विटी ची छोटी बॅग असायची. तिथल्या मार्केट मधून तिने कुमुदसाठी तशीच एक बॅग घेतली. ती तिला दिली. कमलला पैसे देऊन गाडीत बसलेत. तेवढ्यात अंतरानं जायच नाही म्हणून खूप गोंधळ घातला. जाता जाता नारु अण्णा आणि काकूंचा निरोप घ्यायचा म्हणून त्यांच्या घरासमोर गाडी थांबवली. सोपस्कार म्हणून जयेश उतरला. सुखदा अंतराला घेऊन गाडीतच बसून होती. निरोप झाला. जयेश गाडीत बसणार तोच निर्मला काकू पदराला हात पुसत गाडी जवळ आल्यात.
"निघालात. या परत. आकाशला खुशाली कळवा" निर्मलाकाकू
जयेशने गाडी सुरु केली. सुखदाची काच बंद बघून जयेशकडे वळल्या आणि म्हणाल्या " अहो, तुम्हाला थोडा त्रास झाला नं"
"कशाचा हो काकू? आम्ही तर मस्त भटकलो. पुढच्या खेपेला तुमच्या घरी नक्की येऊ" जयेशने गाडी सुरु करत म्हंटले.
"अरे, वय झालाय न हल्ली विसरायला होतं. सुखदाला खुप काम पुरलं असेल रे. मी सांगितले कमल येईल कामाला. ती नेमकी आजारी पडली आणि येता नाही आले. मी ही गावी निघून आले. त्या दिवशी सांगणार होते पण राहून गेलं." निर्मला काकू
"काय रे काय म्हणत होत्या काकू?" सुखदाने गाडी वळताच विचारले
"ऐकू नाही आलं ग. एक तर अंतराच जोर जोरात रडणं त्यात मी काचही वर केलेला. काकूंच शेवटचं वाक्य ऐकु नाही आलं. मी म्हंटलं त्यांना पुढच्या खेपेस नक्की घरी येऊ." जयेश
"आईला फोन केला का?" जयेश
"हो रे. वाट बघतेय ती. घरी स्वैंपाक करुन ठेवते म्हणाली." सुखदा
"आईकडेच जाऊ थेट. अंतरा, ती बॅग ठेऊ दे ग मागे. रुततय मला त्यातलं काही तरी" सुखदा
हे ऐकताच अंतराने खचकन बॅग ओढली. त्यातून एक जुनाट मण्यांची छोटीशी टोपी बाहेर पडली.
"काय अंतरा. आता ही टोपी कुठे सापडली तुला?" सुखदा
एक सेकंद ती टोपी सुखदाला ओळखीची वाटली खरी. पण तिने निरखून बघायच्या आत अंतराने ओढून बॅगेत टाकली.
"सुरु झाल्या का तुम्ही मायलेकी." जयेश मिस्कीलपणे म्हणाला

"मैं फिक्र को धूँए में उडाता चला गया.... " गाण्याच्या तालावर गाडी वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली.

क्रमश:

विनीता देशपांडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलीये कथा, पण काही वाक्यांनी गोंधळ होतो असं वाटतंय.
सुटसुटीत असती तर वाचायला अजून मजा आली असती.