काल एका मुलीने माझा फोटो काढला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2019 - 16:54

उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....

असो, तर ईथे विस्तव तिथे शेकोटी. मधले लोणी पार विरघळून ताक झाल्यास नवल नाही. ज्यांना हे रोजच्या सवयीचे आहे त्यांचे ठिक असते, पण नसते एखाद्याला सवय तर नाही जमत. आज अशीच अग्नीपरीक्षा माझ्यातल्या रामाला द्यावी लागली. पण हे मोबाईलयुग असल्याने भलतेच रामायण घडले.

तर झाले असे,
मीटर रिक्षाची एक रांग होती आणि शेअर रिक्षाची एक रांग होती. मीटरची रांग मोठी होती आणि शेअरची रांग छोटी होती. मी जरा घाईत असल्याने शेअरने जायचे ठरवले. एका रिक्षात मागे तीन प्रवासी आणि पुढे ड्रायव्हर, आणि त्याच्या मांडीला मांडी लाऊन आणखी एक प्रवासी. असे एका रिक्षात टोटल पाच रहिवाशी. बहुधा रिक्षाचा पुढे होणारा निमुळता आकार लक्षात घेता, तिचा गुरुत्वमध्य आणि पॅसेंजरचा गुरुत्वमध्य यातील eccentricity कमीत कमी राखायला अशी पाच-तीन-दोन व्यूहरचना गरजेची असावी. तसेच सारे रिक्षावाले ईथून तिथून मिथुन किंवा गेला बाजार येण्णा रास्कला रजनीकांत असल्याने स्टेअरींगच्या उजव्या बाजूला बसून रिक्षा चालवणे त्यांच्या डाव्या हाताचे काम असावे. बहुधा रिक्षावाल्यांना लायसन देताना अश्या अवस्थेत रिक्षा चालवायची चाचणी मस्ट असावी.

असो. तर आम्हा पाच जणांचे लगेज भरताच लगेच ती रिक्षा भरघाव सुटली. जेवढ्या कमी वेळात एक फेरी पुर्ण तितका धंदा जास्त असे काळ काम वेगाचे साधेसोपे गणित असावे. रिक्षावाला ना सिग्नल पाळत होता. ना खड्डे टाळत होता. हातात दही घेऊन बसलो असतो तर ताक झाले असते, केळी घेऊन बसलो असतो तर शिकरण झाले असते, वांगी घेऊन बसलो असतो तर भरीत झाले असते. मी मुठीत जीव घेऊन बसलो होतो. त्याचे पाणी पाणी होत होते. रिक्षा वाशीची होती आता आम्हीही रिक्षावासी झालो होतो. बाजूने सानपाड्याचा रेल्वेट्रॅक दिसत होता. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर गुलाम चित्रपटातील आमीर खान आणि मंडळी दस दस ची दौड हा खेळ ईथेच खेळले होते. कदाचित रिक्षासोबत स्पर्धा करायची हिंमत नसल्याने त्यांनी ट्रेनचा सोपा पर्याय निवडला असावा. पण चक्राऊन तर मी तेव्हा गेलो जेव्हा वाशीहून सुटलेल्या ट्रेनला आमच्या समांतर चाललेल्या रिक्षाने केव्हाच मागे टाकले होते.

आता रिक्षाने वळसा घेत मेन रोड पकडला होता. आजूबाजूच्या अवजड वाहनांशी स्पर्धा करत रिक्षा पळत होती. शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो तसे तिकडची मुलगी अंगावर खेकसली. मी पुन्हा सावधपणे मधोमध बसलो.
रिक्षावाल्याला म्हटलं, जराआतल्या रस्त्याने घे राजा.
त्यावर तो म्हणाला भाऊ तिथे ट्राफिक असतो. आणि ट्राफिक हवालदार सुद्धा असतो. चौथा पॅसेंजर पकडला जाईल.
मी म्हटलं हमम, मी यातला एक्स्पर्ट तर नाही. पण.....
जर ट्राफिक असेल तर त्याचा एक फायदा सुद्धा आहे, आपण ट्राफिक हवालदाराला दिसणार नाही.
तसे त्याने एकवार मागे पाहिले. माझी खिल्ली उडवली. आणि पुन्हा रिक्षा भरघाव सुटली.

पुढच्या सिग्नलला मात्र त्याने गाडी आतल्या गल्लीत घेतली. आधी माझी तो कसोटी घेत होता, आता गल्ली क्रिकेट सुरू झाले. तिथे क्रिकेटमध्ये एकच आफ्रिकेचा एबी डीविलिअर्स मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जातो. ईथे दर दुसर्‍या गल्लीतील तिसरा रिक्षावाला त्यासाठी प्रसिद्ध असतो. जो जागच्या जागी पुढचे चाक ३६० अंशात वळवू शकतो. कमालीचे हातपाय अ‍ॅण्ड आय कोऑर्डीनेशन. आपल्याला देखील आपली आय आठवते. मलाही माझी आठवली. त्या रिक्षाच्या मागे "आईचा आशीर्वाद" असे कोणासाठी लिहिले होते त्याचा उलगडा झाला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अचानक एका बेसावध क्षणी रिक्षा उसळली आणि मी डावीकडच्या मुलीवर हलकेच कोसळलो...

तिने एक तुसडा कटाक्ष टाकला तसे मी घाबरून उजव्या बाजूला सरकलो. एक कोपरखळी तिकडून पोटात बसली.
ठिक से बैठा करो, बीच के सीट पे क्यू बैठे हो, एक साईडमे नही बैठ सकते थे..
हायला! हे असे सुद्धा असते का? मी रांगेत जसा मान खाली घालून आय मीन मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभा होतो तसाच आत चढलो होतो. पुढच्यामागच्या डावीउजवीकडच्या जगाची पर्वा करायची असते हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी जितके अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होतो तितके रिक्षा मला जास्त उसळवत होती. थोडा ओळखीचा भूभाग दिसताच मी रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घ्यायला लावली. शेअरचेही वीस रुपये झाले होते. कसली महागाई वाढली आहे. मीटररिक्षाने एकट्यादुकट्याने प्रवास करायलाच नको.

मी रिक्षातून खाली उतरून पाकिटात हात घालून पैश्यांची जमवाजमव करत असताना सहज माझे लक्ष रिक्षात बसलेल्या मुलीकडे गेली. तिच्या मोबाईलचे तोंड माझ्या दिशेने वळलेले, मुद्दामच वळवलेले मला स्पष्ट दिसत होते. काय करत असावी? माझा फोटो? माझा फोटो काढत असावी? वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्‍यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्‍यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट.! काय असेल? रिक्षात खुलेआम छेडछाड करणार्‍या एका मवाल्याचा मुलीने चपळाईने प्रसंगावधान दाखून टिपला फोटो. मग तीच पोस्ट कसलीही शहानिशा न करता छोट्यामोठ्या वृत्तपत्रात बातमी म्हणून झळकणार. काही स्वयंघोषित हौशी पत्रकार माझ्या घरी टपकणार. त्या मुलीची जात निघणार, माझा धर्म निघणार, रिक्षावाल्यांचा प्रांत निघणार, खाया पिया कुछ नही पण ईज्जतीचे वाभाडे निघणार. प्रकरणाला राजकीय वळण लागले तर मायबोलीवरही धागे झळकायला वेळ लागणार नाही. ती वेळ यायच्या आधीच आपणच का नाही धागा काढून आपली बाजू क्लीअर करावी म्हणून हा लिखाणप्रपंच !

थॅंन्क्स अ‍ॅण्ड द रिगार्ड
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावना गोवेकर, कर्रेक्ट आणि धन्यवाद.
हा वाहतुकीचा नियम आहे आणि हे फॅक्ट आहे. हे कोणाला सांगितले तर बरेच लोकं याचा चुकीचा अर्थ घेतात की हा आला मोठा मुंबईवाला फुशारक्या मारणारा. पण ईथे सांगायचा मुद्दा हा की घर शाळा कॉलेज आणि तिथवरचे सारे आयुष्य दादरच्या पलीकडे न गेल्याने रिक्षाचा अनुभव मला तिथवर काहीच नव्हता.

अगदी आजही जिथे ज्या अंतराला बसचे तिकीट १० रुपये असेल तिथे लोकं शेअर रिक्षाचे १५ रुपये मोजत चौथ्या सीटवर रिक्षावाल्याच्या मांडीला मांडी लाऊन बसून का जातात हा प्रश्न मला पडतो Happy

अर्थात ते त्यांच्यादृष्टीने योग्यही असेल, माझ्याच ते सवयीचे नसल्याने वेगळे वाटत असावे ईतकेच.

रुन्मेष,लेख काहीही आहे,पण लिखाण शैली मात्र लय भारी आहे,मला तर खरच खूप आवडते नेहमीच,आणि सगळ्यात जास्त आवडते ते तू प्रत्येक प्रश्न,संशय वगैरे वगैरे चे खूपच छान उत्तर देतोस ते,
शब्दांचा खेळ तू इतक्या सुंदर पद्धतीने करतोस की कधी कधी तुझे नुसते प्रतिसादच वाचावे असे वाटतात
हे खरच कौतुकास्पद आहे

अरे वा ऋन्मेऽऽष आलास परत, मस्त! missing you.

वर जे कुणी म्हणतात की दोन मुलींच्यामध्ये बसून देत नाहीत वैगरे तर असे काही नसते. दोन मुलींच्यामध्ये मुलगा, दोन मुलांमध्ये मुलगी, तीन पुरुष एक स्त्री अशा वेगवेगळ्या प्रकारे शेअर रिक्षात माणसे बसलेली पाहिले आहेत.

लेखाबद्दल बोलायचे तर ऋन्मेऽऽषचा लेख आहे एव्हढी अतिशयोक्तीतर असणारच की Happy

माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांच्याईथे (वेस्टर्न मुंबई) कॉलेजच्या पोरी रिक्षावाल्याच्या बाजूलाही चौथा पॅसेंजर म्हणून बिनधास्त बसतात. >> हे मात्र काहिही आहे., तुझा मित्र त्याच्यु बनवतोय.

बाकी तुझा जड वाहन फोबिया वगैरे वाचुन नवल नाही वाटले, ते स्पष्टिकरण आले नसते तर मात्र वाटले असते

मोठी गाडी जसे की truck ,bus बाजूने जाते आणि आपले लक्ष त्यांच्या मोठं मोठ्या चाकांकडे जाते तेव्हा थोडी भीती वाटतेच

@भावना गोवेकर आणि ऋन्मेऽऽष
अभ्यास वाढवा. रिक्षा कुठून सुरू होते आणि कुठे संपते, यावरून मुंबईची हद्द ठरवत नाहीत.
हे बघा: http://dm.mcgm.gov.in/ward-maps

निल्सन Happy
आणि मी आनंदी झालो की झपाझप ईतके प्रतिसाद वाढले म्हणून ...
तब्येत आणि पर्सनल प्रॉब्लेम.. ब्रेक झाला मोठा... पण आता जमेल तसे असेल Happy

उपाशी बोका,
तुम्ही बृहनमुंबई महानगरपालिकेबद्दल बोलत आहात. ज्यात मुंबई अधिक उपनगरे येतात. मी मुंबई कुठवर आणि उपनगरे कोणती याबद्दल भाष्य करत आहे. त्याबद्दल काही नकाशा वगैरे असेल तर आणा Happy

चिवट,
शक्य आहे माझा मित्र मला फसवतही असेल. पण त्याने जे सांगितले ते ईथे लिहिले. कोणी पाहिले असेल तर खरेखोटे करेल. बाकी दोन महिलांमध्ये एक पुरुष हे पुरेसे कॉमन आहे. तसेच प्रसंगी दोन पुरुषांमध्ये एक महिला हे चित्रही दुर्मिळ नाही. हे मात्र मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. कुठल्या मित्राचे सांगणे नाहीये.
फक्त हं, फोटो टाकायची विनंती करू नका. नाहीतर माझ्या मार खाता खाता वाचलो धाग्यावर एक किस्सा अजून वाढेल Happy

बाकी तुझा जड वाहन फोबिया वगैरे वाचुन नवल नाही वाटले, ते स्पष्टिकरण आले नसते तर मात्र वाटले असते
Submitted by चिवट on 18 May, 2019 - 18:29

<<<

यावर वेगळा धागा काढणे उत्तम राहील

समजा कधी वेळ आली दोन ladies chya मध्ये बसायची तर त्यांना पाठी टेकून आरामात बसायला सांगायचे आणि आपण पुढे सरकून पुढे झुकून बसल की काही अडचण येणार नाही
थोडा त्रास होईल पण तेच योग्य

हल्ली साला हा ट्रेंड झाला आहे. एखाद्याच्या साध्या चूकिमुळे, गैरसमजुतीमुळे किंवा मनाविरुद्ध झालेल्या वागणुकिवरुन कोणिहि उठतो आणि विडिओ रेकॉर्डिंग सुरु करतो आणि वर धमकि देतो कि सोशल मिडियावर क्लिप टाकुन तुम्हाला एक्स्पोज करेन वगैरे वगैरे. हा अर्बन नाझी/सायबर बुलिंग सारखाच एक प्रकार आहे...

ऋन्म्या, हा नविन धाग्याचा (खोल) विषय आहे रे बाबा...

ऋन्मेssष ला खोल विषयावर धागा काढायला सुचवतात कोण? तर राज...... ठिणगी ठिणगी चा देव अवतरला जणु
हा धागा निघू दे
तिथे ऍमी, च्रप्स चे सखोल आणि नानबा चे नुसतेच कमेंट्स येऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे।

वेलकम बॅक सर...आता कसं मायबोलीवर असल्यासारखं वाटलं...नायतर इतक्या दिवस काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं होतं..

रच्याकने ठाण्याला एकदा मला अशर आयटी पार्कजवळ जायचं होतं...आलोक हाॅटेलसमोर शेअर ऑटो मिळतात ...तर मी वाट बघतच होतो इतक्यात एक लेडी रिक्क्षा ड्रायव्हर "अशर अशर" ओरडत होती मी पटकन जाऊन बसणार तर तीन सीटा आधीच फुल झालेल्या...मला बावचळलेल्या अवस्थेत पाहून ती म्हणाली पुढे बसा...तिने पटकन सेल्फ स्टार्ट मारला आणि थोडं तिरकं होऊन बसायला जागाही दिली...

मलातर खरचं ऑड वाटत होतं पण ठीक आहे त्या ताईने मला व्यवस्थित सोडलं..

येस अजय, आमच्या ठाण्याला हे चित्र बर्याच वेळेस बघायला मिळते. आणि पुरुष ड्रायव्हरशेजारी मुलगी हे सुद्धा पाहिले आहे मी नितीन ते लोकमान्यच्या दरम्यान. पण इथे रुन्मेष सांगतोय म्हणजे फेकतच असेल हेच ग्रृहित धरले जाते.

'जाडूबाई जोरात' मध्ये पण निर्मिती सावंत रिक्क्षात रिक्क्षावाल्या शेजारी बसून स्टेशनला जात असते.

राज धन्यवाद
आणि या प्रसंगानंतर एक्झॅक्टली याच विषयावर धागा काढायचा होता. पण लिहीता लिहीता फोकस रिक्षावर गेला. अर्थात ते देखील काही पाप नाही झाले. त्यावरही चांगली चर्चा होतेय. लोकांच्या ज्ञानात भर पडतेय.
वरील विषयावरही धागा एक दोन दिवसात काढूच Happy

अजय येस्स, महिला रिक्षा ड्रायव्हरसुद्धा पुरुषांना आपल्या शेजारी बसवतात. मनात असो वा नसो, शेवटी धंदा आहे, करावा तर लागणार.

मागे एकदा मलाही असेच नंबरनुसार महिला ड्रायव्हरच्या बाजूला बसायचा योग आलेला. पण मी संकोचून गेलो. मागे पाहिले तर एक मुलगी होती, तिला तिथे बसायला सांगून मागच्या रिक्षात गेलो. पण त्या मुलीलाही असे पुढे ड्रायव्हरशेजारी बसायचे नसावे म्हणून तिनेही नकार दिला. परीणामी तिच्याही मागचा पुरुषच जाऊन बसला. ते पाहून नंतर मला संकोचल्याबद्दल वाईट वाटले. जर ती जागा एखद्या काय कसा आहे माहीत नसलेल्या पुरुषालाच जायची होती तर त्यापेक्षा मीच तिथे बसायला हवे होते असे वाटले.

मागे माझ्या एका फेसबूक मैत्रीणीने त्यांच्या विभागातील पहिल्या आणि एकमेव महिला ड्रायव्हरसोबत सेल्फी काढून अभिमानाने अपलोड केला होता.

निल्सन, मला कल्पना होतीच माझा मित्र फेकत नसावा आणि हे फोर्थ सीटवर मुलीचेही बसणे खरे असावे.

खरे तर आपल्या समाजात आजही स्त्री पुरुष नात्याबद्दल मेंटल ब्लॉक आहेतच. त्यामुळे ज्यांनी हे प्रत्यक्ष पाहिले नाही त्यांना पचनी पडणे जड जाणे स्वाभाविक आहे.

पुरुष ड्रायव्हरशेजारी मुलगी>>
हे कलकत्त्यात मी १९९५ पासून (तेव्हा पहिल्यांदा गेलो इथे) पहात आहे.

रच्याकाने: ऋन्मेष मुंबईला विमानतळ नाही?

वेलकम बॅक सर...आता कसं मायबोलीवर असल्यासारखं वाटलं...नायतर इतक्या दिवस काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं होतं.. >>> +११

निल्सन, मला कल्पना होतीच माझा मित्र फेकत नसावा आणि हे फोर्थ सीटवर मुलीचेही बसणे खरे असावे.
असावे नाही खरेच आहे पण
सर्रास असे दिसत नाही क्वचित
अजुन स्त्री आणि पुरुष ह्यामधील भेदभाव कमी होण्यास वेळ लागेल

Pages