मॅरेज Mystique ! ( भाग १३ )

Submitted by र. दि. रा. on 16 May, 2019 - 02:21

ह्या पूर्वीचे सर्व भाग, 'भाग १२' मध्ये उपलब्ध आहेत.
मागील भाग १२ : https://www.maayboli.com/node/69952

भाग १३ :

दुसरे दिवशी सकाळी केदारला आठवले की जग्गुने त्याचे व्हिजीटिंग कार्ड दिले होते.त्याने ते कार्ड शोधायला सुरुवात केली.पण ते सापडत नव्हते. खर म्हणजे केदारला रूमाला पासून बँक पास बुक पर्यंत सगळ हातात आणून द्यायची सवय मिनाक्षीनेच लावली होती .पण बदलेल्या परिस्थितीत ती शक्यता नव्हती. त्याला अर्धा तास धडपडताना पाहून ती म्हणाली...

“काय सापडत नाहीय ?”

“जग्गुने त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते मी कुठे ठेवले काही आठवत नाही”

“ते बुक शेल्फमध्ये कसे असेल ? कोटाच्या खिशात ठेवलय का बघा.”

खरच लग्नात घातलेल्या कोटाच्या खिशात कार्ड सापडले. त्याने लगेच जग्गुला फोन लावला. जग्गू त्यावेळी रेवतीबरोबर चर्चा करत बसला होता. जवळच अण्णा साहेब त्यांचे काम करत बसले होते. केदारचा फोन येताच जग्गू अण्णासाहेबाना म्हणाला...

“केदार भैयाका फोन है’’

रेवती म्हणाली “काट दो”

अण्णासाहेब म्हणाले...

“घेउ दे ना. फोन का केलाय ते तरी कळले पाहिजे.”
जग्गुने फोन रिसीव्ह केला...

“हा.बोलो केदार भैया” त्याने लाउड स्पिकर ऑन केला .
“कमाल है ! मेरा नंबर आपके पास सेव्ह है ?”

“आपका नंबर तो सेव्ह रखनाही चाहिये. बोलो क्या बात है “

“ अण्णासाब या रेवती वहॉ है क्या ? मुझे ऊनके साथ बात करनी है”
दोघांनी हात हलवून आम्हाला फोन देऊ नको अशी खुण केली. जग्गू फोनमध्ये म्हणाला...

“मै अभीतक बंगलेपर पहूचा नही हू. बोलिये ना क्या बात है.मै आपका संदेश ऊन तक पहूचा दुंगा.”

“मै सोच रहा था,मै रहेनेकेलीये वहॉ आ जाऊ.”

रेवतीने...
”नको नको” आणि अण्णासाहेबांनी “येऊ दे” अशी खुण केली.

जग्गू फोनमध्ये म्हणाला...

“तो आ जाव ना. उसमे क्या पुछ्नेका ?”

“अच्छा .फिरभी मुझे रेवातीका नंबर एसएमएस करना.”

“करुंगा.आप कब आ रहे हो”

“दिवालीकेबाद आ जाउंगा”.

“ठीक है ! मै अण्णासाबको बोल देता हू . बाय” जग्गू ने फोन कट केला.

रेवती म्हणली...
“अहो अण्णा, ते इथे येतो असे कसे म्हणू शकतात ? .तुम्ही तरी नका येऊ असे सांगायला पाहिजे होते”
लहान मुलीला अवघड गणित समजून सांगावे अशा स्वरात अण्णासाहेब म्हणाले...

“हे बघ,आपण नांदवत नाही म्हणून त्याच्यावर केस केली आहे की नाही ?.पण तू काही नांदायला त्याच्या घरी जाऊ शकत नाहीस. म्हणून केदारनेच समंजसपणे इथे येण्याचा निर्णय घेतला. आता आपण त्याला येऊ नको असे म्हणालो तर तो contempt of the court होतो.”

“अहो पण माझी किती कुचंबणा होईल. रोज उठून एकमेकाची तोंडे बघावी लागतील”

”एवढे मोठे घर आहे .राहील एखाद्या खोलीत . तुला काय एवढे अवघड वाटतंय.”

तिकडे केदार मीनाक्षीला म्हणाला...
“जग्गू अजून बंगल्यावर पोहोचला नाहीय. पण तो ‘या’ म्हणाला”

“तुमचा जग्गू खोटे बोलतोय”.

“म्हणजे ?”

”जग्गू बंगल्यावरच आहे.त्याने फोन लाउडस्पीकरवर टाकला होता .आणि रेवतीने येऊ देत असे खुणेने सुचवले म्हणूनच तो या म्हणाला.तो बाहेर
असता तर विचारून कळवतो असे म्हणाला असता.”

“मी त्याला रेवतीचा नंबर मागीतला आहे. उद्या डायरेक्ट तिलाच फोन करून तिच्या कडून वदवून घेतो.”

--------------------------------------------------------------------------------------

दिवाळी दोन दिवसावर आली. मिनाक्षी स्वयंपाक घरात तळण करत होती. केदार म्हणाला तू कशाला तळत बसलीस. मी कम्युनिटी किचन मधून फराळाचे लाडू ,चकली सगळे आणतो ना”

“फराळ खायला इथे मूड कोणाला आहे ? लक्ष्मी पूजनापुरत्या पाच करंज्या करणार आहे”.

“बाकी काही आणायचे आहे का ? पणत्या, आकाश कंदील ?”

“मागच्या वर्षीच्या पणत्या सापडल्यात. त्या धुऊन ठेवल्यात. आकाश कंदील पाहिजेच असे काही नाही. लाईटिंगची माळ आहेच. ती लावली की झाले”

केदार बाहेरच्या खोलीत आला ,अश्विनला म्हणाला...
“चल आपण फटके आणू”

“मला नकोत फटाके .मला धुराचा त्रास होतो.”

मिनाक्षी समंजस होतीच पण अश्विनने ही इतका समजूतदारपण दाखवावा ?
केदारच्या मनाचा क्षोभ झाला आणि या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत या विचाराने त्याला गदगदून आले . तो फिरायला जायच्या निमित्त्याने घराबाहेर पडला. दिवाळी आली आणि गेली.रानडे कुटुंबासाठी तर ही दिवाळी फारच यथा तथा गेली. तरी मीनाक्षीने एक दिवस घरीच दूध आटवून बासुंदी केली.एक दिवस साखरभात केला.पण चित्त थाऱ्यावर नसल्याने कशातच आनंद वाटत नव्हता. केदारला चिंता वाटत होती आपण नसताना मिनाक्षी एकटी कसे मॅनेज करणार. तर मीनाक्षीला वाटत होते हा इतका भिडस्त माणूस लोकाच्या घरात कसा रहाणार ? त्यामुळे एकमेकाची काळजी करण्यात दिवाळी गेली. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी एक दिलासा देणारी गोष्ट घडली. रंगराव शिपाई साडेपाच लाखाचा चेक घेऊन आला. संचित रजेचा पगार आणि ग्रचुईटी मंजूर झाली होती. पीएफ़चा प्रस्ताव पाठविला होता. पैसे मिळाल्यामुळे रिलीफ मिळालाच पण तो एक शुभ शकून वाटला . दिवाळी झाल्यावर केदारने लग्झरी बसचे तिकीट काढून आणले.
मिनाक्षी म्हणाली...

“अण्णासाहेबां बरोबर बोलणे झाले का ?”

“जग्गुने नंबर कळविलाच नाही.”

“त्याचा एसेमेस तर आला होता?”

“त्याने फक्त लँडलाईन नंबर कळवला आहे.”

“तुम्ही लँडलाइनवर फोन करा.”
केदारने नाराजीने फोन लावला. शिवरामने फोन उचलला.

”हॅलो मी केदार बोलतोय.अण्णासाहेब आहेत का ?”
”नाही. ते सकाळीच बाहेर गेलेत”

“बर.रेवती आहे का ?”

“दिदीच्या एक्सटेनशनवर जोडून देतो”

त्याने फोन रेवतीला जोडून दिला पण नो रिप्लाय झाला. केदार म्हणाला...

“राहू दे , तू त्यांना एक निरोप दे . मी आज रात्री इथून निघतोय . उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत बंगल्यावर पोहोचेन.”
“ हा ! .या साहेब.जग्गू साहेब म्हणाले होते तुम्ही येणार आहात म्हणून.”

“हो का !.अण्णासाहेबाना निरोप दे. ठेवतो”.

----------------------------------------------------------------------------------

केदारला बसवर सोडायला रमाकांत आला होता. सांभाळून रहा, पोहोचल्यावर फोन कर वगैरे बोलून झाले. बस सुटली. ग्रामीण भागात एक पद्धत आहे.बस मार्गी लागली की सह प्रवाशी ओळखीचा असो नसो गप्पा सुरू करायच्या. केदारच्या सह्प्रवाश्याने तोच कित्ता गिरवला.

सहप्रवाशी: - ‘”कुठे दौरा ?मुंबईला ना.”

केदार:-“होय”

स.प्र.:- ‘मी पण मुंबईलाच चाललोय.

माझा व्हीसासाठी इंटरव्ह्यू आहे.

केदार:-“अच्छा “

स.प्र.:-“तुमचे ऑफिस काम का खाजगी?”

केदार:-“खाजगी”

स.प्र :-“मुंबईत कुठे जाणार”

केदार:-“बांद्रा”

स.प्र.:- “मी बांद्र्याला येणार आहे पण उद्या रात्री. तुम्ही बांद्र्यात कुठे जाणार ?’

केदार:- “कलानगर.ईप्सित बंगला”

स.प्र :- “अच्छा रेवतीला पाहायला जातंय का? खरच मी पण रेवतीचा जबरा फॅन आहे . मी नेहमी ठरवतो की एकदा रेवतीला बघून यायचेच.पण एकट्याला नको वाटते.कंपनी पाहिजे हो. उद्या तुमच्या बरोबर आलो असतो पण नेमके महत्वाचे काम आले.”

केदारने जांभई देत देत हुंकार दिला .स.प्र.च्या लक्षात घेतले नाही . त्यांनी रेवती दर्शन चा किस्सा सुरु ठेवला...
“ माझा एक मित्र एकदा तिच्या बंगल्यावर गेला होता. त्या दिवशी तिला वेळ होता ती झोपाळ्यावर बसली होती सगळ्याना बागेत बोलावले.त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्व:तच्या करिअर बद्दल बोलली. मित्र म्हणाला रेवतीला बघण्या इतकीच ऐकण्यात मजा आहे. मित्र म्हणाला आयुष्याचे सार्थक झाले.मी पण एकदा नक्की जाणार”.

केदारला खरोखरच झोप लागली.

---------------------- ----------------------------------------------------------------

केदार बॉम्बे सेन्ट्रलला उतरला. त्याने TAXI पकडली. टॅक्सी रस्त्यावर आल्यावर ड्रायव्हरने पत्ता विचारला केदारने सांगितले बांद्रा कलानगर ईप्सित बंगला. ट्राफिकमध्ये मार्गी लागल्यावर ड्रायव्हरने विचारले...
”आपको रेवतीके घर जाना है ”

“हा “

“कुछ सामानकी डिलिव्हरी देनी है क्या?’

“हा. मेक ओव्हरका सामान देना है .

” आप उनके मेकअप मन है क्या?”

“मेकअप नही. मेकओव्हर “

“बहोत पैसा मिलता होगा?”

“अभीतक तो कुछ नही मिला. उनकी पसंद्गी का काम करुंगा तब मिलेगा”

“आपको अच्छा पैसा मिलेगा साब. आप इतने इमानदारीसे काम कर रहे हो तो आपको उसका ईनाम जरूर मिलेगा.”
ड्रायव्हर थोडा वेळ शांत राहीला पण ट्राफिक सुरळीत झाल्यावर तो म्हणाला -

“एक बात बोलू साब? आप बुरा तो नही मानोगे?”

“हा,बोलोना ”

“उसने शादी करके बडी गलती की .अपने यहा शादीशुदा हिरोईने नही चलती .अब उसका मार्केट डाऊन होगा.”

“मै उनको बोलुंगा.आइंदा शादी मत करना” ड्रायव्हर हसला .
सुदैवाने रेवतीचा बंगला आला आणि त्याची ड्रायव्हरच्या तावडीतून सुटका झाली.
--------------------------------------------------------------------------------------------
केदार taxi मधून उतरला.बंगल्याचे गेट बंद होते. केबीनमध्ये वॉचमन पेंगत बसला होता. शेजारी छोटे विकेट गेट होते केदार त्या गेटमधून आत गेला. वळणदार रस्त्यावरून बंगल्याकडे निघाला. तो अर्धा रस्तापार करून गेल्यावर वॉचमनला दिसला. वॉचमन ओरडला...

“अहो थांबा. तिकडे कुठे निघाला. केदारने मागे वळून त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिले आणि तो पुढे निघाला. वॉचमन केबिनमधून बाहेर आला आणि “अहो,थांबा,थांबा” असे म्हणत त्याच्या मागे घावत आला. केदार अचानक मागे वळला त्याच्या हातातली सुटकेस वॉचमनच्या गुडघ्याला लागली. तोल जाऊन वॉचमन कडमडला. जवळच माळी बागेत काहीतरी काम करीत होता. त्याने वॉचमनला हात देऊन उठवले. आणि केदारला म्हणाला...

“वॉचमनला ढकलून बंगल्यात घुसता होय?”

केदार खेकसला...
“तुम्ही मला ओळखले नाही का ? मी केदार रानडे .मी येणार म्हणून फोन करून कळविले होते?” ‘आम्हाला कोणी सांगितले नाही. तुम्ही गेटवर चला. मी फोनकरून आत विचारतो.मग तुम्हाला सोडतो”

”आता परत गेटवर कशाला जायचे.मी इथे थांबतो. तुम्ही आत जाऊन विचारून या”

“अहो,गेट सोडून आत का आला म्हणून वटका करतील तुम्ही दोन मिनिटे गेटवर चला.”
दारात काहीतरी गलका चाललेला ऐकून शर्मिष्ठा बाहेर आली

“अरे काय झालाय,काय गडबड आहे.अय्या,जीजू तुम्ही ? नाथा भाऊ तुम्ही यांना ओळखले नाही का?हे जीजू,दिदीचे मिस्टर”.
नाथाभाऊ...

“अरारा , खरच नाही ओळखले. माफी करा. साहेब,चला आत चला.”
केदारची सुटकेस नाथाभाउनी घरात नेऊन ठेवली.केदार आणि शर्मिष्ठा एका सोफ्यावर बसले.

शर्मिष्ठा म्हणाली...

“सरप्राईज ह जीजू ”
केदार “तसे काही नाही मी येणार म्हणून कळविले होते.”

“ हो?मला कोणीच बोलले नाही जीजू इतका त्रास कशाला घेतलात ? , बसमधून उतरल्यावर फोन करून गाडी मागवायची.”

“ ते काही सुचलेच नाही मला ”.
एवढ्यात रेवती आली. केदारकडे पाहून माफक हसत म्हणाली...

“तुम्ही केंव्हा आलात.”

“हा काय आत्ताच येतोय.”

शर्मिष्ठा म्हणाली...
“ दिदी , जीजू येणार हे तुला माहित होते?”

रेवती..
“जग्गू म्हणाला होता की दिवाळीनंतर येणार आहेत, पण आज येणार असे माहित नव्हते”.

शर्मिष्ठा...
“आज तुला लवकर जायचे आहे का?’”

“हो, एलिफंटा केव्हजवर शुटींग आहे. जायला दोन तास लागतील.”

“एलेफंटा केव्ह्ज ? किती जुने लोकेशन आहे”.

” थोडच काम आहे.एक patch लावायचा आहे”.

एवढ्यात रेवतीला फोन येतो. ”हा बोलिये त्रिलोकभाई ------- मै अभी निकलनेमे हू ---------ये तो आपने पहेले सोचना चाहिये था --------तो मै कहा आऊ लोकेशनपर या स्टुडीयोमे --------हा ठीक है”

रेवतीने फोन कट केला.ती केदारला म्हणाली...
“येते मी ,संध्याकाळी उशीरच होइल”

रेवती गेल्यावर केदार शर्मिष्ठाला म्हणाला...
“तुलाही कॉलेज असेल ना?”.

”हो आणि अजून सगळच आवरायचे आहे”

“ठीक आहे जा तू”

“जिजू तुम्ही तुमच्या रुममध्ये जा. वॉश घ्या .मी चहा पाठवते”.

------------------------------------------------------------------------------------------------------

लग्नाच्या दिवशी कपडे बदलायला केदार ज्या रूममध्ये गेला होता ती आपली रूम असे गृहीत धरून तो त्या रूम मध्ये आला. त्याच्या डोक्यात तिडीक गेली.ही या लोकांची वागायची पद्धत ? यांनी साध वॉचमनला सांगून ठेवले नाही? पाहुणे येणार आहेत त्यांना सन्मानाने घेऊन यायचे तर राहिलेच, उलट तो बाहेर व्हा म्हणतो ! रेवतीला एक कप चहा बरोबर घ्यावा असे वाटत नाही ? कसे राहणार आपण इथे ?
तरीही उसने अवसान आणून त्याने सुटकेसमधले कपडे कपाटात लावले.तेवढ्या छोटया कृतीनेही त्याला हक्क बजावला असे वाटू लागले..
एवढ्यात शिवराम चहा घेऊन आला. केदारने त्याच्याशी जवळीक साधत विचारले...

“काय शिवराम कसे चाललेय ?”

“हाय,ठीक आहे”

“अण्णासाहेबांचा काही नवीन प्रोजेक्ट “

“ पहिलीच चार ठिकाणी कामे चालू आहेत तीच लोड झालीत. नव आणि कुठे सुरु करताय?’”

“रेवतीचे काय चालेय?”

“दिदीची दोन का तीन शुटींग सुरु आहेत. त्यांना रात्री घरी यायला दहाच वाजतात”

“ जग्गू साहेब केंव्हा येतात ?”

“ रोज काय येत नाहीत .काय काम असले तरच येतात ”

“आणि काय विशेष “

“ चहा घ्या. गार होइल “

शिवरामने काढता पाय घेतला ? केदार बेडवर पाय पसरून आरामात बसला. चहा फक्कड झाला होता.त्याने सावकाशीने चहाचा आस्वाद घेतला. प्रवासाचा शीण होता. कोर्ट केसचे टेन्शन संपल्यामुळे रिलॅक्स वाटत होते. पडल्या पडल्या त्याला गाढ झोप लागली
केदारला जाग आली तेंव्हा दुपारचा एक वाजलेला होता .तो दाढी अंघोळ उरकून इस्त्रीचा झब्बा पायजमा घालून खाली आला . डायनिंग टेबलावर अण्णासाहेब एकटेच जेवत होते तो त्यांच्या शेजारी बसला . अण्णासाहेबांनी विचारले...

“केंव्हा आलात”

“सकाळी आलो आठच्या सुमारास”.

”जेवण व्हायचं ना?’”

“होय खूप भूक लागली आहे”

“शिवराम यांचे ताट वाढ”.

शिवरामने एक ताट दोन वाट्या आणून दिल्या. केदारने स्व:त वाढून घेऊन जेवायला सुरुवात केली अण्णासाहेबांचे जेवण झाल्यावर ते म्हणाले...

“मी उठतो तुम्ही सावकास जेवा.”

अण्णासाहेब सोफ्यावर पेपर वाचत बसले. जेवण झाल्यावर केदारही दुसऱ्या सोफ्यावर बसून पेपर चाळू लागला. थोड्या वेळाने त्याने विचारले...

“फोन लावू का?मीनाक्षीला पोहोचल्याचे कळवायचे आहे.”

“फोन ? लावा ना. टू झिरो दाबा म्हणजे डायल टोन येइल मग तुमचा नंबर डायल करा”
केदारने फोन लावला .मिनाक्षीने लगेच उचलला...

“हा बोला बोला.केंव्हा पोहोचलात?”

”सकाळी आठला पोहोचलो.पण नंतर मला झोप लागली म्हणून फोन करायला उशीर झाला ”

“जेवलात का?’”

“हो आत्ताच जेवलो आणि तुला फोन केला”

“तिथल वातावरण कसे आहे?”

“इकडे अजून थंडी पडली नाही “

“ते नाही म्हणत मी. घरातले वातावरण कसे आहे?”

“घर लगेच सापडले.”

“मी विचारते काय तुम्ही बोलता काय?”’

“होते असे कधी कधी”

“आले लक्षात .कोणी आहे का तिथे?”

”हो. आहेत ”

“बर बर नंतर निवांत करा”

“ ह !”

अण्णासाहेब मोबाईलवर काहीतरी पाहत होते . त्यांचे केदारकडे लक्षही नव्हते.केदार म्हणला...
“मी रूम मध्ये जातो .आराम करतो”.

“ ह ! ”

“ नंतर पुन्हा फोन केला तर चालेल ना?’”

“हो. तुम्हाला वाटेल तेंव्हा करा”

--------------------------------------------------------------------------------------

दुसरे दिवशीची सकाळ.केदारला लवकरच जाग आली.त्याची खोली बंगल्यात एका बाजूला होती. त्यामुळे त्याला बंगल्यामध्ये काहीच हालचाल जाणवत नव्हती.त्याला वाटले चहासाठी सगळे एकत्र बसले असतील.तो खाली आला तर तिथे कोणीही नव्हते नोकर मंडळी आपापल्या कामात व्यग्र होती.त्याची कोणीही दखल घेतली नाही.त्याने एका नोकराला विचारले...

“घरात कोणी नाही का?”

तो म्हणाला...
“शिवराम बाजारात गेलाय. नाथा भाऊ बागेत आहे ,या शेवंताबाई लादी पुसातायत, शांताबाई स्वयंपाक करतायत, दीदींचे काम आवरून गीता आत्ता गेली रघु रात्र पाळीला आहे.”

”अरे मला नोकरांचे कशाला सांगतोयस. मी घरातल्या माणसाबद्दल म्हणत होतो.”

“असे होय, काहो शेवंताताई, दिदी आणि अण्णासाहेब आहेत का गेले हो?”
शेवंताबाई कुत्सितपणे म्हणाली..

“मी माझे काम करू का कोण आले कोण गेले हेच्यावर नजर ठेवू? ”

नोकर म्हणाला...
“मी गेटवर विचारून येतो. वॉचमनला माहित असेल ”

केदार म्हणाला “अरे मी सहज विचारले. तेवढ्यासाठी वॉचमनची साक्ष काढायची गरज नाही.मला फक्त चहा हवाय”.
नोकर म्हणाला...

“ते शांताबाईना सांगावे लागेल”

“अरे मग सांग ना.”

“मला पण एक कप सांगू ?”

”हो!अवश्य सांग”

तो चहा आणायला गेला. शेवंताबाईनी डोक्याला बोट लावून त्याचा स्क्रू लूज आहे अशी खुण केली. केदारला वैताग आला. घरी असो की ऑफिसात असो, केदारला चहा कधी मागवा लागत नसे. केदारला चहा हवा असला की घरी मीनाक्षी आणि ऑफिसात रंगाला अपोआप कळत असे. इथे सगळा उलटा प्रकार होता”.

चहा झाल्यावर केदार बागेत गेला.बाग पाहून तो म्हणाला...

“नाथाभाऊ ,तुम्ही बाग छान ठेवली आहे.”

नाथाभाऊ...
“मला आहे आवड बागकामाची .माझा सारखा हात फिरत असतो .”

“ घरात कोणी दिसत नाही.”

बड्या लोकांच्यात असेच असतंय . बेडरूमला जोडून बाथरूम असतंय. चहा नाश्ता घेऊन जायला गडी माणस आहेत. कुठे बाहेर जायचे असेल तरच खाली येणार.”

“ पण सकाळी सगळे एकत्र बसून गप्पा मारत चहापाणी करत नाहीत ?.”

“ कधी कधी सगळे बसतात एकत्र . पण रोज काय नाही.”

“शिवराम मॅनेजर आहे का ?”

“ कुठला ? आमच्या सारखा घरगडी आहे. पण अण्णासाहेबांचे पुढे पुढे करून मुख्य झालाय. सगळ्यावर गाजवत असतो.मी नाही त्याला भिक घालत”.

“ मी काल येणार हे त्याला मी फोनवर सांगितले होते.पण त्याने कुणाला सांगितलेच नाही”

“कुणाला ठाऊक .मी आतल्या गोष्टीत लक्ष घालत नाही.मी आत गेलेले शिवरामला खपत नाही.”

“चला.अंघोळ उरकतो.दिवसभर काय करायचे प्रश्नच आहे?”

“आवरून या.बसू गप्पा मारत”

केदार रूममध्ये आला.पण मनातून तो खूप नाराज झाला.कुणी त्याची साधी चौकशी केली नाही.? त्यांना आपण इथे आलेलो आवडले नाही का? मग येऊ नको म्हणून कळवायचे ना. अश्या परिस्थितीत इथे राहणे अवघड आहे .

------------------------------------------------------------------------------------------------

( क्रमशः )

पुढील भाग १४ चा धागा.

https://www.maayboli.com/node/69963

Group content visibility: 
Use group defaults

वाचतेय , कथा आवडली , पुढे कसं आणि काय होतंय ह्याची उत्सुकता आहे, रोज भाग येत आहे त्यामुळे लिंक लागली आहे Happy

मस्त रंग घेतेय कथा.
मी रोज पुढच्या भागाची वाट बघत असते.याची वेब सिरीज बनणार असेल तर नाव वगैरे कळवा.

मस्त रंग घेतेय कथा.
मी रोज पुढच्या भागाची वाट बघत असते. >>> +१११

जर तुम्ही आधिच सगळी लिहीली आहे तर रोज किमान २-३ भाग टाका

पुभाप्र.