माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

Submitted by मार्गी on 2 May, 2019 - 10:44

७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

नोव्हेंबर २०१७ मध्ये चांगल्या टायमिंगमध्ये सोलो हाफ मॅरेथॉन पळाल्यानंतर फुल मॅरेथॉनची इच्छा होती. पण त्यावेळी माझी एका सायकल मोहीमेची तयारी सुरू होती. त्यामुळे काही काळ छोट्या रन्सवर भर दिला. फुल मॅरेथॉनसाठी सात तासांची कट ऑफ मर्यादा असते, त्यामुळे वाटायचं की, जर अडीच तासांमध्ये अर्ध अंतर पार होत असेल, तर उरलेलं अंतरही वेळेत पूर्ण होईल. पण हा एक भ्रम होता. फुल मॅरेथॉनसाठी अद्याप खूप मोठी वाटचाल करणे बाकी होतं. जानेवारी २०१८ मध्ये ज्या सायकल मोहीमेचं नियोजन केलं होतं, ती ऐन वेळी काही कारणाने रद्द करावी लागली. पण त्या मोहीमेच्या तयारीमध्ये बरंच काही शिकायला मिळालं होतं. आणि हे रनिंगही त्याचाच भाग होतं. जेव्हा ती मोहीम रद्द झाली, तेव्हा पहिली हाफ मॅरेथॉन ईव्हेंट करण्याचा विचार केला आणि लवकरच ११ फेब्रुवारी २०१८ च्या हाफ मॅरेथॉनसाठी नोंदणी करून टाकली. त्यासाठी काही क्वालिफिकेशन नव्हतं (काही ईव्हेंटसला असतं, हे नंतर कळालं). तयारीसाठी माझ्याकडे वीस दिवस आहेत.

रनिंग ठीक जमतंय, पण त्यामध्ये अद्याप तितका नियमित नाही आहे. आठवड्यातून जेमतेम दोनदा व महिन्यातून सात- आठ वेळेस रनिंग करतो. पण त्याबरोबर सायकलिंग- योगही करतो व त्याचा रनिंगमध्ये उपयोग होतो. जेव्हा हाफ मॅरेथॉनची नोंदणी केली, तेव्हा रनिंगमध्ये नियमितता आली. काही छोटे रन केले आणि मग परत एकदा हाफ मॅरेथॉनसाठी निघालो. हाफ मॅरेथॉन ईव्हेंटच्या पंधरा दिवस आधीची ही धाव वेगळीच राहिली. अनेक चुका केल्या. नंतर लक्षात आलं की, हाफ मॅरेथॉनला बरंच कमी लेखत होतो. नियमितता कमी होती, त्यामुळे बराच त्रास झाला. हाफ मॅरेथॉनचा कट ऑफ टाईम- २:४५ च्या ऐवजी २:४८ इतका वेळ लागला, ज्यामुळे वाईट वाटलं. तसंच शेवटी वेगही कमी झाला होता आणि शेवटचे चारशे मीटर तर चालावं‌ लागलं होतं. त्यानंतर बराच विचार केला. माझे रनिंगचे गुरू आणि मित्र संजय बनसकर सरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी हाफ मॅरेथॉन दोन तासांमध्ये केलेली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करताना अनेक गोष्टी कळत गेल्या.

पहिली गोष्ट माझी कमी असलेली नियमितता ठीक केली. आता मोठे रन सोडून रोज १० किंवा ५ असे छोटे पण रेग्युलर रन सुरू‌ केले. चालायलाही जास्त लागलो. प्रोटीन डाएटसाठी अंडी सुरू केली. लवकरच फरक दिसायला लागला. अनेक दिवस सलग छोटे रन केल्यानंतर जेव्हा ११ किमी पळालो, तेव्हा आधीपेक्षा बराच कमी वेळ लागला. पहिल्यांदा जवळजवळ ९ किलोमीटरची स्पीड म्हणजे सुमारे ६.४ मिनिट/ किमी हा पेस मिळाला! ११ फेब्रुवारीला निगडीमध्ये रनेथॉन ऑफ होप होती, त्याच्या दोन दिवस आधी पूर्ण आराम केला. थोडा योग- प्राणायम करत राहिलो आणि थोडं अंतर चालतही राहिलो.

१० फेब्रुवारीची रात्र बरीच कठीण गेली. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ईव्हेंटमध्ये सहभाग घेतोय. त्यामुळे झोप जवळजवळ लागलीच नाही. मध्ये मध्ये सतत जाग येत होती. आणि असं होणं स्वाभाविकसुद्धा आहे. कारण पहाटे जर २१ किमी पळायचं असेल व अशी ईव्हेंट पहिल्यांदाच करायची असेल, तर झोप कशी नीट येणार. एक प्रकारे हे असं आहे- जर एखादा खूप मोठा दिवा असेल तर तो दूर असला किंवा झाकलेला असला, तरी प्रकाश पसरतोच. त्यामुळे एक प्रकारची सजगता रात्रभर राहिली. पहाटेच्या ईव्हेंटची जाणीव रात्रभर होत होती. सकाळी ६ ला हाफ मॅरेथॉन सुरू होणार होती. त्याच्या किमान अर्धा तास आधी तिथे पोहचायचं होतं. त्यासाठी जवळपास चाळीस मिनिट बाईक ड्राईव्ह केली. गमतीची गोष्ट म्हणजे निघताना बाईकची किल्लीच सापडत नव्हती. घरभर शोधल्यावर वाटलं की बाईकलाच विसरलो असेन आणि ती तिथेच होती! पहाटेच्या अंधारात हाफ मॅरेथॉनच्या जागी पोहचलो.

सुरुवातीला स्ट्रेचिंग झालं. साग्रसंगीत डान्स सुरू होता. हा सीन बघून १६ डिसेंबर चित्रपटातल्या म्युझिक कार्यक्रमाचा प्रसंग आठवला! मोठ्या संख्येने धावपटू आलेले दिसले. आकाशात ढगही आहेत. लवकरच 'धाव' सुरू झाली. सुरू होण्याआधी किंचित टेंशन वाटत होतं, पण तो 'माहौल' बघून ते नाहीसं झालं. सुरुवातीला काही मिनिट गर्दीमुळे हळु पळावं लागलं. पण लवकरच लोक पांगले. पहिले दोनदा हाफ मॅरेथॉन सोलो पळण्याचा अनुभव असल्याने माझं गणित तयार आहे. आठ किलोमीटर अंतरावर चिक्की खाईन, थोडं थोडं पाणी पीईन. आरामात पळत राहिलो. हे वातावरण, मध्ये मध्ये चीअर अप करणारे व्हॉलंटीअर्स आणि वाटेत असलेला सपोर्ट- सगळं नवीन आहे! सुरुवातीला थोडा वेळ वाटेत व्यवस्थेसाठी असलेल्या पोलिसांना गूड मॉर्निंग म्हणत गेलो. पण लवकरच हाश- हुश्श झाल्यावर ते थांबवलं!

ह्या हाफ मॅरेथॉनमध्ये फक्त एकच ब्रेक घेतला- दहा किलोमीटरवर. आणि नंतर पाणी- एनर्जाल घेतलं आणि पळत राहिलो. थांबलो नाही. जवळजवळ अगदी आरामात पळू शकलो. शेवटच्या काही किलोमीटरमध्ये थोडा चढ होता, तिथे वेग थोडा कमी झाला, पण तरी तसं सहजच पुढे जात राहिलो. शेवटी फिनिश लाईनच्या आधी बँड- बाजा वाचत होता, मुलं स्वागत करत होते! त्यामुळेही उत्साह वाढत गेला आणि शेवटचा किलोमीटरही सोपा गेला. आणि जेव्हा फिनिश लाईन क्रॉस केली, तेव्हा वेळ व टायमिंग बघितलं तर काही वेळ विश्वासच बसला नाही! आयोजकांच्या मोजमापाप्रमाणे मला फक्त २ तास १३ मिनिटं लागली होती. आणि माझ्या मोबाईलवर २ तास १४ मिनिट दिसत होतं (कारण app काही सेकंद आधी सुरू केलं होत). किमान अडीच तास लागेल, अशी कल्पना असताना फारच कमी वेळ लागला! कारण आधी त्याहून कमी वेळ लागला नव्हता आणि रात्री जवळजवळ जागाच होतो. पण तरीही बरंच फास्ट म्हणजे जवळपास साडेनऊ किलोमीटर/ तास वेगाने हे अंतर पार केलं! बनसकर सर म्हणाले होते, तसंच झालं- त्या 'माहौलमध्ये' - त्या वातावरणात माझा परफॉर्मंस २०% इंप्रूव्ह झाला!

आणि तुपात साखर म्हणजे माझे रनिंगचे दिग्गज मित्र हर्षद पेंडसेजी अर्थात् हर्पेनसुद्धा तिथे मला भेटले! तेही इथे पळाले होते. त्यांच्यासोबत आणखी एक मित्र भेटले- सुधाकर शिंदे जी. ते माझ्या लिखाणामुळे मला ओळखत होते! आणखीनच छान वाटलं! थोडा वेळ त्यांना भेटलो आणि निघालो. फारच जबरदस्त अनुभव राहिला माझ्यासाठी! माझी ही पहिलीच स्पोर्टस ईव्हेंट होती! खूप जास्त एंजॉय केलं. माझी तयारी कुठवर आहे, ह्याचा चांगला अंदाज आला. आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे माझ्या ह्या टायमिंगमुळे मी फुल मॅरेथॉनसाठी क्वालिफाय झालो! अजून काय हवं! त्यामुळे त्यानंतर मला हाफ मॅरेथॉन ईव्हेंटमध्ये भाग घेण्याची गरजच उरली नाही. हाफ मॅरेथॉन तर पळेनच, २१ किमीच्या पुढेही पळेनच, पण ईव्हेंटमध्ये कशाला जावं, असं वाटलं. कारण जर मी सकाळी उठून कधीही इतकं पळू शकतो, तर त्यासाठी ईव्हेंटमध्ये पैसे का खर्च करावेत! काही लोका म्हणतात की हिल मॅरेथॉन कर, बीचवरची मॅरेथॉन कर इ. पण मग मी सिंहगडावर कधीही पळू शकतो. किंवा कोकणातही पळू शकतो. त्यासाठी ईव्हेंटची काय गरज आहे! कदाचित माझ्या सोलो सायकलिंग स्वभावामुळे मला असं वाटत असेल. इतरांना वेगळं वाटू शकतं व त्यांच्यासाठी ते योग्यही असेल. अर्थात् मला जाणवलं की, एकदा हाफ मॅरेथॉन ईव्हेंट नक्की करायला हवी, त्यात खूप काही‌ शिकायला मिळालं. पण जेव्हा मी इथे पळून हाफ मॅरेथॉनचा 'फिनिशर' बनलो, तेव्हा एक ईव्हेंट म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट फिनिश झाली. आणि कधी वाटलं, तर व्हॉलंटीअर म्हणून नक्की सहभाग घेईन! इथून माझ्या रनिंगचा पुढचा टप्पा सुरू झाला. फुल मॅरेथॉनची‌ तयारी सुरू झाली!

पुढील भाग- माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान आणि अभिनंदन. _/\_ नेमका आजच माझ्या डॉक्टरकडे गेलो होतो, तेव्हा तिथे त्याच्या आयर्नमॅन स्पर्धेची वेळ बघितली १३:०१:४३ आणि थक्क झालो होतो. हा लेख वाचून नेमकी त्याची आठवण झाली.