माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

Submitted by मार्गी on 31 March, 2019 - 04:11

४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

ऑगस्ट २०१७ मध्ये हर्षद पेंडसे जी अर्थात् हर्पेन लदाख़मध्ये खर्दुंगला चॅलेंजमध्ये ७२ पळणार होते आणि एक सामाजिक उपक्रमही करत होते. त्यामध्ये सहभाग घेताना मलाही किमान २१ किलोमीटर तरी पळायला पाहिजे असं वाटलं. ह्या निमित्ताने रनिंगमध्ये थोडी नियमितता आली. अनेक वेळेस ११ किलोमीटर पळालो आणि छोटे ५ किमीचे रन्स केले. शेवटी परभणीत २७ ऑगस्टला २१ किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन पळण्याचं ठरवलं. माझ्यासोबत परभणीचे संजयराव बनसकर सर अर्थात इथले संजूबाबाही तयार झाले. त्यांचेही एक मित्र तयार झाले. ऑगस्टमध्ये आठ- नऊ रन केल्यामुळे रनिंगचा थोडा मूमेंटम तयार झाला होता. २६ ऑगस्टला परभणी विद्यापीठ परिसरात ५.५ किमी पळालो. ह्यावेळी पहिल्यांदाच मला ८ किमी प्रति तास अशी स्पीड मिळाली! आता २१ किमी पळू शकेन, असा उत्साह वाटला.

त्या दिवसांमध्ये रनिंग खूप नवीन असल्यामुळे छोट्या पाच किलोमीटरच्या रनसाठीही पाणी सोबत ठेवायचो. आणि आता इतकी मोठी हाफ मॅरेथॉन (तोपर्यंत ती "इतकी मोठीच" होती!) पळायची, तर सोबत दोन लीटर पाणी, चिक्की, केळं, इलेक्ट्रॉल हेही‌ ठेवावसं वाटलं. म्हणजेच पाठीवर एक सॅक घेऊन पळायचं ठरवलं. सोबतच्या मित्रांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी म्हंटलं की, आपण पाणी- चिक्की- इलेक्ट्रॉलची‌ व्यवस्था करून ठेवू. मध्ये मध्ये ते मिळेल, अशी व्यवस्था करू. पण तरीही मी सोबत सॅक घेतलीच. एक प्रकारची अनौपचारिक हाफ मॅरेथॉन असल्याने काही दबाव वाटत नव्हता. पहाटे साडेपाचला ठरलेल्या जागी पोहचलो. बेसिक स्ट्रेचिंग केलं आणि निघालो! मी बनसकर सरांना म्हंटलं होतं की, तुम्ही माझ्या वेगाने म्हणजे स्लो पळा, नाही तर आपण सोबत पळूच शकणार नाही. दुसरे होते तेही अनुभवी रनर होते. पहाटेच्या अंधारात सुरुवात केली. मोबाईलमध्ये गाणी लावून मस्त चालू केलं पळायला.

सुरुवातीचे किलोमीटर खूप सोपे गेले. थांबण्याची गरजच पडली नाही. सात- आठ किलोमीटरवर चिक्की खाल्ली, पाणीही घेत राहिलो. ह्या वेळेपर्यंत जवळपास साडेआठ किमी/ तास अशी स्पीड मिळत होती. अर्धं अंतर येण्याच्या थोडं आधी बनसकर सर क्रॉस झाले. ते एक- दिड किलोमीटर पुढे असतील. त्यांनी चीअर अप केलं. दुसरे मित्र थोडे पुढे होते. आणि जवळपास अकरा किलोमीटरनंतर टर्न केला. इथून हळु हळु थकवा सुरू झाला. स्पीडही कमी होत गेली आणि जास्त ब्रेक्स आवश्यक होत गेले. असं असं करता करता १९ किमीनंतर मात्र रनिंग फारच अवघड झालं. थोडं रनिंग केलं की थांबावं लागत होतं. मग मात्र सरळ चालत उरलेलं अंतर पूर्ण करण्याचं‌ ठरवलं. चालायला सुरू केलं की लगेच बरं वाटलं. शेवटच्या टप्प्यात बनसकर सरही माझ्या सोबतीला उलटे परत आले. त्यांचे २१ किमी पूर्ण होऊन, थोडे कूल डाऊन होऊन ते चालत चालत परत आले. शेवटचा दिड किलोमीटर त्यांच्यासोबत चालत गेलो. त्या दिवसांमध्ये मी जे रंटॅस्टिक app वापरत होतो, त्यामध्ये २२ किलोमीटर अंतर दिसलं आणि लागलेला वेळ होता- ३.१७- ३ तास १७ मिनिट! वेळ फारच लागला, पण २१ किलोमीटरचा रन तर झाला! रनिंगच्या विश्वातली माझी पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन पूर्ण झाली! आणि मी पाठीवर सॅक घेऊन पळत होतो, त्यामुळे मी तर आणखी दोन किलोमीटर जास्तच धावलो आहे, असं सांगून सरांनी माझी 'पाठ' थोपटली!

अर्थातच ह्या पहिल्या वेळी अनेक चुका झाल्या होत्या. सगळ्यांत पहिली व सगळ्यांत मोठी चूक ही की, तुलनेने रनिंगचा सराव नवीन होता, कमी अनुभव होता, ऑगस्टच्या आधी अजिबात नियमित नव्हतो; त्यामुळे २१ किलोमीटर पळणं तितकं बरोबर नव्हतं. त्यामध्ये थोडी जोखीमही होऊ शकली असती. पण सायकलिंगचा माझा सराव व तिथे आलेला एंड्युरन्स उपयोगी पडला. त्यामुळे नंतर काही‌ त्रास झाला नाही. पाय मात्र दोन दिवस दुखत राहिले. तेव्हा योग्य स्ट्रेचिंग, स्ट्रेचिंगच्या विविध पोझिशन्स, रिकव्हरी रन, रिकव्हरी वॉक हे माहितीच नव्हतं. त्यामुळेही थोडा त्रास झाला. पण शेवटी विशेष काही त्रास न होता पहिली हाफ मॅरेथॉन पूर्ण झाली! आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे १९ किमी मी पळू शकलो ह्यामुळे खूप आत्मविश्वास आला! रनिंग एंजॉय करता यायला लागलं. आणि ह्या 'हाफ मॅरेथॉन' ची आणखी एक खूप मोठी गोष्ट म्हणजे फक्त माझ्या सोबतीसाठी बनसकर सर परत उलटे तीन किलोमीटर चालत आले! ही गोष्टच खूप मोठी आहे! त्यानंतर तर माझी जणू बनसकर सरांसोबत रनिंगची भागीदारी बनली! आणि जेव्हा स्ट्रायकर एंडवर खूप चांगला बॅटसमन असतो, तेव्हा दुस-या नॉन स्ट्रायकर एंडवरच्या बॅटसमनचाही आत्मविश्वास वाढतो! बनसकर सरांसोबत रनिंग व सायकलिंगबद्दल शेअरिंग सुरू झालं, त्यामध्ये खूप काही शिकायला मिळत गेलं. हळु हळु रनिंगचा रंग चढत गेला! आणखी मजा येत गेली. आणि रनिंगमुळे जो स्टॅमिना वाढला होता, त्याचा उपयोग सातारा- महाबळेश्वर सर्किटमध्ये केलेल्या सायकलिंगमध्येही झाला!

पुढील भाग- माझं पलायन ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults