म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो बुंद से गयी वो हौद से नही आती
हिंदी म्हण आहे पण आपल्याकडे बऱ्याचदा वापरतात . अकबर-बिरबल कथांमध्ये ह्या म्हणीचा उगम आहे बहुतेक.

सध्याची राजकीय परिस्थिती

भाजप - तेल ही गेलं अनं तुपही गेलं, हाती आले धुपाटण

शिवसेना - घर फिरले की घराचे वासेही फिरतात

फडणवीस & राऊत - उथळ पाण्याला खळखळाट फार

राष्ट्रवादी - पादऱ्याला पावट्याचं निमित्त

काँग्रेस - धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय

मीडिया - चहापेक्षा किटलीच जास्त गरम

विविध पक्षांचे समर्थक - पाटलाचं लग्न अन ***ला भूषण

मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी - ऊपर वाला जब भी देता.....

मेगाभरतीवाले - आग रामेश्वरी बम्ब सोमेश्वरी

सामान्य जनता - आधीच दुष्काळ त्यात फाल्गुन मास, बिनपैशाचा तमाशा .... वगैरे वगैरे बऱ्याच लागू होतील

>>> हरभरीच्या झाडावर चढवणे याच्या मागे कोणती गोष्ट आहे?

मला वाटते 'हरभऱ्याच्या झाडावर चढवणे' अशी म्हण आहे. याचा अर्थ खोटी स्तुती करुन एखाद्याला शेफारुन ठेवणे.

आणखीन काही म्हणी....

आपला तो बाब्या, लोकाचं ते कारटे. ( आपलं जे काही असेल ते चांगले, पण तेच जर दुसऱ्याचं असेल, तर ते वाइट).

दुश्काळात तेरावा महीना (कठीण परस्थीती असताना, additional संकटे येणे).

हरभरीच्या झाडावर चढवणे याच्या मागे कोणती गोष्ट आहे? उगम कसा झाला? की हरभरीच्या झाडाचा काही गुणधर्म असतो
>>> इंटरेस्टिंग प्रश्न... जाणकार देतीलच उत्तर...उत्तराच्या प्रतीक्षेत...

हरभरीच्या झाडावर चढवणे >> बहुदा हरभऱ्याच्या झाडाच्या कमी उंचीशी निगडित आहे.
जो बुंद से गयी वो हौद से नही आती
हिंदी म्हण आहे पण आपल्याकडे बऱ्याचदा वापरतात . अकबर-बिरबल कथांमध्ये ह्या म्हणीचा उगम आहे बहुतेक. >> हो ..अकबर एक थेंब जमिनीवर पडलेलं अत्तर उचलतो, जे बिरबल बघतो आणि मग ओशाळलेला अकबर हौदभर अत्तर राज्यात वाटतो

माझ्या आजी च्या वापरातील काही Happy -
१. शेम्बडात माशी घुटमळणे (ईईईई ) : नुसतीच चर्चा
२. एकसष्ट तिथे बासष्ट : थोडक्यात होऊ दे खर्च
३. पडतील मघा आणि चुली पुढे हगा (परत ईईई) : असं तिच्या कडे प्रत्येक नक्षत्रासाठी कहितरी होतं
४. पडतील स्वाती तर पिकतील मोती
५. तू राणी -मी राणी मग पाणी आणायचं कुणी

पडतील मघाचे दोन अर्थ ऐकलेत. 1) मघा नक्षत्र चांगले बरसले तर इतके अमाप पीक येते की कुठल्याच गोष्टीसाठी धडपड करावी लागत नाही. जागच्याजागी बसून आळशीपणा केला तरी चालतो. २)ह्या नक्षत्रात पाऊस भरपूर पडला तर पीक हातचे गेलेच म्हणून समजा. मग उद्वेगाने माणूस काहीही करू शकतो.
आणखी दोन म्हणी:
पडेल हस्त तर पीक येईल मस्त.
पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा.

पडतील मघा आणि चुली पुढे हगा <<< या नक्षत्रात पडला तर इतका पाऊस पडतो, बाहेर पडणे अवघड होते. ओढे, नाले, नद्याही दुथडी भरून वाहतात. गारठा वाढतो. चुलीची ऊब हवीहवीशी वाटू लागते. अगदी नैसर्गिक हाक आली तरी बाहेर पडणे जीवावर येते. Proud

नाय पडल्या मघा तर टकामका बघा
हा उत्तरार्ध पण ऐकला आहे. म्हणजे बहुतेक पावसाच्या आशेने आकाशाकडे बघणं असावं

काही ग्रामीण मराठी म्हणी/वाक्प्रचार:

"कावळा कारभारात गू दरबारात"
=> योग्यता नसलेली व्यक्ती कारभार पाहू लागली तर त्यातून योग्य गोष्टींची अपेक्षा करणे व्यर्थ

"माझ्या गाईची माया भारी, चाटून चाटून वासरू मारी"
=> अपत्यांची अतिकाळजी केली कि ती कमकुवत बनतात

"बिनडोक शेतकरी दुहेरी राबं, बसून बघं आणि उभ्याने हागं"
=> जी गोष्ट जशी करायला हवी तशी न करता चुकीच्या पद्धतीने केल्याने कष्ट जास्त व नुकसानच अधिक होणार

"भरल्या गाड्याला चिप्पाडाचं काय ओझं"
=> ज्याची खूप कार्य करण्याची क्षमता आहे त्याला अजून एखाद्या किरकोळ कामाचे काही वाटत नाही

"शहाणा उठला आणि लोट्क्यात मुतला"
=> अतिशहाण्या व्यक्तीकडून भलताच सल्ला मिळणे

"खेड्यातनं आलं येडं आणि भज्याला म्हणतंय पेढं"
=> नीट माहिती न घेता नवीन गोष्टीबाबत अंदाजाने काहीही अर्थ लावणे

"करून गेल गाव आणि नानाचं आलं नाव"
=> एखादी (चुकीची वा बेकायदा) गोष्ट अनेकजण करतात पण नेमका सापडतो मात्र एखादाच

"देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला"
=> कोण देत असेल भरभरून पण आपल्याकडे ते घेण्याची ऐपत नसेल तेंव्हा

"तुला न मला घाल कुत्र्याला"
=> दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ या अर्थाने

"दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वाती"
=> या वाक्प्रचाराचा नक्की अर्थ माहित नाही. पण भरपूर वेळ हाती असताना तो वाया घालवणे आणि ऐनवेळी धावपळ करणे अशा अर्थाने असावा.

"तुला न मला घाल कुत्र्याला"
=> दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ या अर्थाने
किंवा भांडणात वाया जाणे आणि कुणालाच न मिळणे .

"दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वाती"
दिवस गेला उठाउठी पण म्हणतो आम्ही.
=> या वाक्प्रचाराचा नक्की अर्थ माहित नाही. पण भरपूर वेळ हाती असताना तो वाया घालवणे

अर्थ दिवसा उजेडाचा वेळ वाया घालवून अंधारात कामं करणे ...असा माझ्या माहिती प्रमाणे ..तुमचाही अर्थ जवळपास तोच आहे.
वरच्या दोन्ही वापरातल्या आहेत. बाकी नवीन म्हणी आवडल्या.

>>>>"दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वाती"
दिवस गेला उठाउठी पण म्हणतो आम्ही.
=> या वाक्प्रचाराचा नक्की अर्थ माहित नाही. पण भरपूर वेळ हाती असताना तो वाया घालवणे

"दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वेची" अशी म्हण आहे.

अजुनी काही म्हणी.

(१) सात साडे, तरी भागुबाईचे कुल्ले उघडे.
अर्थ: सगळं असताना देखील काही नसल्या सारखे वागणे/ आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग न करणे.

(२) ताका पुरते रामायण.
अर्थ: आपले काम होइ पर्यत interact करणे.

(३) ताकाला जाउन भांडे लपवणे.
अर्थ: मुळ हेतु लपवणे/काय हवे आहे ते न सांगणे.

(४) अडला हरी, गाढवाचे पाय धरी.
अर्थ: गरजे पोटी आपल्याहुन कमी शहाण्या माणसाला किंमत देणे.

(५) गाढवाला गुळाची चव काय (hindi version: बंदर क्या जाने अदरक का स्वाद).
अर्थ: एखादी गोश्ट appreciate करायला योग्यता लागते (अयोग्य व्यक्ती ते शक्य नाही).


>> "दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वाती"
>> => या वाक्प्रचाराचा नक्की अर्थ माहित नाही. पण भरपूर वेळ हाती असताना तो वाया घालवणे आणि ऐनवेळी धावपळ करणे अशा अर्थाने असावा.
>> Submitted by atuldpatil on 15 July, 2020 - 19:09

>> अर्थ दिवसा उजेडाचा वेळ वाया घालवून अंधारात कामं करणे ...असा माझ्या माहिती प्रमाणे ..तुमचाही अर्थ जवळपास तोच आहे.
>> वरच्या दोन्ही वापरातल्या आहेत. बाकी नवीन म्हणी आवडल्या.
>> Submitted by मी_अस्मिता on 15 July, 2020 - 19:26

>> "दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वेची" अशी म्हण आहे.
>> Submitted by Sumedha on 16 July, 2020 - 03:16

"चांदण्या रात्री" या शब्दाचे प्रयोजन कळले नव्हते. "कापूस वेची" मुळे कळले. म्हणजे दिवस अख्खा वाया घालवला आणि रात्री पांढरे शुभ्र चांदण्यात पांढरा कापूस वेचायचे जिकीरीचे काम करायचे.

या अजून काही ग्रामीण भागातील म्हणी/वाक्प्रचार.. यातले बरेच आज काळाच्या ओघात कालबाह्य झाले आहेत...

"पहिल्या दिवशी पाहूणा, दुसऱ्या दिवशी पई. तिसऱ्या दिवशी राहील त्याला अक्कल नाही"
=> एखाद्याकडे पाहुणा म्हणून गेल्यावर एक किंवा दोन दिवस राहणेच ठीक

"नकटं असावं, पण धाकटं असू नये"
=> पूर्वी कुटुंबातील सर्वात धाकट्या व्यक्तीला सर्वांच्या आज्ञेचे पालन करावे लागे. त्यातून हि म्हण जन्माला आली असावी.

"माय मरो मावशी उरो"
=> याचा नक्की अर्थ माहित नाही. आईपेक्षा मावशी अधिक लाड करते अशा अर्थाने आहे का?

"रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी"
=> पूर्वीच्या काळी केशकर्तनकार फावल्या वेळेत कमी महत्वाची कामे करीत. त्यातूनच, हाताशी बराच वेळ असेल तेंव्हा नसते उद्योग करत राहणे या अर्थाची हि म्हण आली.

"मी नाही त्यातली अन कडी लाव आतली"
=> दाखवायचा स्वभाव एक पण प्रत्यक्षातले व्यक्तिमत्व निराळेच अशा अर्थाने.

"आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून"
=> हि खूप जणांना माहित असलेली म्हण आहे. आपल्याविषयी फार न सांगता इतरांच्या नसत्या चौकशा करणे.

"तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या"
=> कधीकधी वय जास्त असलेल्या व्यक्तीची कार्यक्षमता वयाने कमी व्यक्तीपेक्षा अधिक असते. त्या अर्थाने.

>> (१) सात साडे, तरी भागुबाईचे कुल्ले उघडे.
>> अर्थ: सगळं असताना देखील काही नसल्या सारखे वागणे/ आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग न करणे.
>> (२) ताका पुरते रामायण.
>> अर्थ: आपले काम होइ पर्यत interact करणे.
>> Submitted by Sumedha on 16 July, 2020 - 03:45

१) याचीच ग्रामीण भागात "सतरा लुगडी, तरी गांX उघडी" अशी एक आवृत्ती आहे. अर्थ तोच. खूप सारी साधने असूनही उपयोग कसा करायचा न कळणे.

२) याचेच अजून एक रूप "कामापुरता मामा आणि ताकापुरती आज्जी" यावर एक गाणे सुद्धा आहे मराठीत

ग्रामीण भागात अजून एक वाक्प्रचार आजही बोलला जातो: "लाज कुणाला, हागणाऱ्याला का बघणाऱ्याला?"
अर्थ: असभ्य वर्तन जरी कोणी केले तरी सभ्य माणसांनी तिकडे कानाडोळा करणेच उत्तम

<रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी>
ह्याचं आणखी एक व्हर्शन ऐकलंय:

रिकामा सुतार काय करी, बायकोची टेरी ताशी!

पाचावर धारण बसणे >> मी असं वाचल्याचं आठवतं की ह्याचा संबंध खूप घाबरल्यामुळे पंचेंद्रिये काम करेंनाशी होण्याशी आहे.

'हडळी ला नाही नवरा आणि खविसाला नाही बायको' याचे पण दोन version ऐकले आहेत
हडळी ला मिळाला नवरा आणि खविसाला मिळाली बायको - दोन दुष्ट व्यक्ती एकत्र येणे

बडोदा संस्थानात मराठी बायका सुंदर सुंदर नऊ वारी लुगडी नेसून फलकारत जायच्या तेव्हा गुजराती बायका त्यांच्यासाठी ही म्हण वापरत असत : नऊ वार लुगडी अने बन्नी तंगडी उघडी.

Pages