म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या लहानपणी खेड्यात पुढील वाक्ये विशिष्ट चालीत, हेल काढत विविध लोक येत.
भरायच्या का बांगड्या....
गारीगार वाले...
जाते टाकणार पाटे टाकणार....
तुंबडी लावणा...र
कान टोचणार...नाक टोचणार...
कल्हयी....वाले....
गोदडी शिवणार.....
गुबू गुबू गुबू.... ( नंदीबैल वाले)
भविश पाहणार ......जोतीश पाहणार....
गिर्र....गिर्र.... आवाज काढत भिरभिरे विकणाऱ्या बाया.
घंटी वाजवत बुढ्ढीके बाल / मिठाई / कुल्फी विकणारे.
खूप अवांतर झाले.

एकदा एका गावात एक म्हातारी रहात होती. इतकी डॅंबिस होती की गावातील कुणीही तिच्या नादाला लागत नसे.
तिला लोकांचं चांगले चाललेलं बघवतच नव्हतं. सगळे फटकून वागत तिच्याशी.
तिच्या शेजारी एक जोडपे रहात होते. एकमेकांवर खूप प्रेम करणारे नवरा बायको होते ते. म्हातारी त्यांच्यामध्ये भांडण कसं लावता येईल याचा नेहमी विचार करीत असे पण हुशार नवरा बायको तिला संधी मिळू देत नव्हते. तीने लोकांना सांगण्यास सुरुवात केली की मला मंत्रसिध्दी मिळाली आहे,मी लोकांच्या अडचणी सोडवते.
एक दिवस नवऱ्याला गाठून म्हातारी म्हणायला लागली अरे तुला माहित आहे का तूझी बायको गेल्या जन्मी कुत्री होती. तू झोपल्यावर तुझी पाठ चाटते. आज जागा राहून बघ. त्याचा विश्र्वास बसला व म्हणाला ठीक आहे व तो कामाला गेला. म्हातारी लगेच त्याच्या घरी जाऊन बायकोला हळूच सांगू लागली की तूझा नवरा मागच्या जन्मी कोळी होता. खोटं वाटत असेल तर रात्री त्याची पाठ चाटून पहा.
रात्री निजानीज झाल्यावर नवरा झोपेचं सोंग घेऊन पडून राहिला. बायकोला चैन पडेना हळूच पाठ चाटून पहायला लागली तर खारट. नवरा लगेच उठून तिला तु मागच्या जन्मी कुत्री होतीस म्हणून मारू लागला. बायको सुद्धा तू कोळी होतास म्हणत ओरडू लागली.
म्हातारी मस्त भजे खात खुषीत हसत होती.
आता या प्रसंगाला साजेशी म्हण/वाक्प्रचार सांगा बरं.

आपल्या शेतातील थोडा भाजीपाला, फळे वा धान्य भेटीदाखल इतरांना देणे म्हणजे वानोळा किंवा वानवळा.

वानोळा म्हणजे नमुना, उदाहरण.

मार्मिक जी धन्यवाद.
घोडं मेलं ओझ्यानं अन् शिंगरू मेलं हेलपाट्यानं.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. या म्हणींचा अर्थ समजावून सांगा.

घोडं मेल ओझ्याने

एका धोब्याकडे एक घोडा होता त्यावर तो कपडे लादून नदीवर जात असे. एकाच वेळी जास्त कपडे नेता यावेत म्हणून तो जास्तीत जास्त वजन टाकून घोडे नेत असे. याचा परिणाम होऊन एक दिवशी घोडे वजनाने मटकन खाली पडते आणि मरते.
आता धोब्याकडे एक शिंगरू शिल्लक असते पण घोड्याच्या बाबतीतला अनुभव म्हणून तो कमीत कमी वजन देतो पण त्यामुळे शिंगरू घर ते नदी असे हेलपाटे मारून मारून थकून जाते आणि तेही एक दिवस मरून जाते

Chhan

धन्यवाद. चुकलं. बुद्धिमान माणसाची तारिफ केल्याने त्याचा हुरुप वाढतो असा अनुभव आहे. थांबतो. परत तुम्हाला पर्सनल वाटायचं नाहीतर. धन्यवाद.

धन्यवाद
तुमचे बुद्धिमत्तेबद्दलचे निकष तुमच्यापाशीच ठेवा
ही नम्र विनंती

पुन्हा एकदा धन्यवाद

घोडं मेल ओझ्याने शिंगरू मेलं हेलपाट्याने >> घोडं नव्हे गाढव
गाढव मेलं ओझ्यानं शिंगरू मेलं हेलपाट्यानं
वजन गाढवाच्या पाठिवर लादतात, घोड्याच्या नव्हे.

इतक्या दिवसांनंतर या म्हणीचा अर्थ समजावून सांगण्यामागचा कार्यकारणभाव माझ्या कधीच लक्षात आला होता.‌ री ओढणारांची ओळख करून द्यायची होती दक्षिणा जी.

हातावर तुरी देणे म्हणजे फसवून पळून जाणे. पण या म्हणीचा उगम कसा झाला कोणास ठावूक आहे का? तुरीचा आणि फसवण्याचा काय संबंध असावा? (उत्तर जालावर शोधले पण मिळाले नाही)

गाढव मेलं ओझ्यानं शिंगरू मेलं हेलपाट्यानं
गाढव (गाढवीण) ओझं वाहताना तिचे शिंगरू तिच्या मागोमाग चालतं. गाढव ओझ्याच्या कामाने थकते , तर शिंगरु हेलपाट्याने थकते. कामा न काजाचं एखाद्याच्या मागे फिरणे अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते.

Pages