माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

Submitted by मार्गी on 30 April, 2019 - 05:00

६: हाफ मॅरेथॉनची नशा!

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

सिंहगडाच्या घाटामध्ये रनिंग केल्यानंतर उत्साह वाढला. हळु हळु तांत्रिक गोष्टीही शिकायला सुरुवात झाली. रनिंगमध्ये सुधारणेला खूपच वाव आहे. जेव्हा हर्षद पेंडसेजींना भेटलो होतो, तेव्हा मला पळताना बघून त्यांनी म्हंटलं होतं की, हे पोस्चर तर वॉकिंगचंच आहे. त्यांनी मग इतरही गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्यामुळे हळु हळु रनिंगमध्ये सुधारणा होत गेली. आणि आता सहजपणे ११, १५ किमी असं पळता येतं आहे. आता कट ऑफ वेळेच्या आत पूर्ण करेन अशा पहिल्या हाफ मॅरेथॉनची प्रतीक्षा आहे. ह्या दिवसांमध्ये एका वेळेस पहाटे रनिंग करताना खूपच सुंदर अनुभव आला. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याची झालेली सुरुवात. पहाटेच्या अंधारात पळत असताना मोठं धुकं लागलं. इतकं दाट धुकं की वीस पावलांवरचं मागचं आणि पुढचं काहीच दिसू नये! जे दिसतंय ते जेमतेम वीस पावलांवरचंच!

एका अर्थाने हा अनुभव अगदी अध्यात्म किंवा ध्यानासारखा वाटला! कारण अध्यात्म किंवा ध्यानामध्ये आपली सजगता फक्त 'आत्ता आणि इथे' अशीच थांबलेली असते. भूतकाळ आणि भविष्य- कशाचाच संबंध राहात नाही. फक्त 'इस क्षण की सच्चाई' उरलेली असते, लक्ष तिथेच असतं. म्हणजे ध्यानाच्या परिभाषेत आगासुद्धा नसतो आणि पीछासुद्धा नसतो. ध्यान म्हणजे फक्त वर्तमानाचा क्षण, वर्तमानाचं स्थान! दाट धुक्यातून जाताना व हातातल्या मोबाईलच्या मंद प्रकाशात पळताना अगदी हेच जाणवलं. मागे वळून बघितल्यावर आणि पुढेही काहीही नाही! अवाक् करणारा अनुभव!

हळु हळु आता रनिंग करताना बाकीच्या गोष्टीही दिसत आहेत. सुरुवातीला तर सगळं 'लक्ष' रनिंगकडेच असायचं- लागलेली धाप, पायांवर आणि थकण्याकडे लक्ष असायचं. पण आता रनिंगची सवय झाली तसं ध्यान बाकीच्या गोष्टींकडेही देता येतंय. नवीन कार ड्रायव्हिंग शिकताना जसं सुरुवातीला फोन वाजला तरी त्रास होतो, कोणासोबत बोलणंही जमत नाही. पण हळु हळु सवयीने ड्राईव्ह करता करता फोन उचलता येतो, बोलता येतं, गाणंही सुरू करता येतं. तसंच आता रनिंगच्या बाबतीत होतंय. अर्थात् अजून एक कमतरता आहे. रनिंग करताना गाणी लावावी लागतात. गाणी न ऐकता पळणं कठिण वाटतं. ह्याचं उत्तर सद्गुरू ओशोंच्या एका प्रवचनात मिळालं. त्यांनी म्हंटलं आहे की, जेव्हा आपण एखाद्या अनोळखी रस्त्यावरून जातो, तेव्हा आपण एक तर स्वत:शी बोलतो किंवा शिट्टी वाजवतो. कारण मनात भिती असते! कदाचित त्यामुळेच रनिंग करताना गाणं लावावं लागतंय! हळु हळु रनिंगसोबत मैत्री होईल, तसं हे सोपं होत जाईल.

काही रन्स नियमित केल्यानंतर २१ किलोमीटर पळण्याची इच्छा झाली. हाफ मॅरेथॉनचं अंतर पळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे मी एका सायकल मोहीमेवर जाणार आहे; त्यासाठी चांगला स्टॅमिना पाहिजे. त्यामुळे लांब अंतर पळण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जितकं जास्त व लांब पळू शकेन, तसा सायकल चालवण्याचा स्टॅमिनाही वाढेल. २१ किमी पळण्याच्या आधी दोन दिवस आराम केला. स्ट्रेचिंगचे योग्य पोस्चर्सही शिकतोय. बाकीही तयारी केली. नकाशात १०.५ किमी अंतर कुठे पूर्ण होईल,, ते बघून घेतलं, रूटही निवडला आणि निघालो. पहाटे अंधारात मोबाईलमध्ये गाणे लावले व गरजेपुरता मोबाईल टॉर्च सुरू केला. पंधरा किलोमीटर तर अनेकदा पळालो आहे, त्यामुळे खरी कसोटी त्यानंतरच असणार आहे.

ह्या रूटवर जाताना जास्त उतार आहे. दहा किलोमीटरवर इंद्रायणी पार करून अर्धा किलोमीटर पुढे यु- टर्न घ्यायचा आहे. येताना चढ आणि थकल्यामुळे वेळ जास्त लागणार हे नक्की. निघाल्यावर अंधारात पहिले काही किलोमीटर पार केले. एका जागी कुत्राही‌ भुकला! पाच किलोमीटरनंतर थोडा उजेड यायला सुरुवात झाली. पहिला ब्रेक सुमारे आठ किलोमीटरवर घेतला. इलेक्ट्रॉलयुक्त पाणी आणि चिक्की खाल्ली. छोटे टप्पे करून जात राहिलो जसं- पुढे तीन किलोमीटर गेल्यावर अर्धं अंतर पूर्ण होईल, नंतर चार किलोमीटरनंतर ब्रेक घ्यायचा आहे असं. रनिंग करताना सोबत गाणी असलेली फार उपयोगी वाटतात (हेड फोन न लावता). अंतर पार होत जातं. पंधरा किलोमीटरला थोडा थकवा जाणवायला लागला. एक लिक्विड एनर्जाल घेतलं. थोडं स्ट्रेचिंगही केलं. त्यामुळे जरा बरं वाटलं. एक गोष्ट खूप चांगली ही आहे की, १५ किमी मी खूप चांगल्या वेळेत पूर्ण केले आहेत- सुमारे १ तास ४५ मिनिटांत. त्यामुळे पुढच्या सहा किलोमीटरसाठी माझ्याकडे पूर्ण एक तास आहे!

येतानाचा चढ चांगला जाणवतोय. हळु हळु वेग कमी होतोय. जास्त थांबावंही लागतंय. काही वेळ वाटलं की, कदाचित मला कट ऑफ पेक्षाही जास्त वेळ लागणार! पण दुसरं एनर्जाल घेतलं व जेव्हा त्याचा पूर्ण प्रभाव जाणवला, तेव्हा मी वेळेतच पोहचेन हे नक्की झालं! त्यामुळे शेवटचे दोन- तीन किमी खूप सोपे गेले. उरलेलं अंतर आरामात पार झालं आणि २१ किमी पूर्ण झाले! तेही चालण्याची वेळ न येता रनिंग करता करता. आणि वेळ बघितला तर तो खूपच चांगला आला- २ तास ३३ मिनिट! आज सुरुवातीला मला वाटत होतं की, २ तास ४४ मिनिट लागले तरी मस्तच असेल! अशा प्रकारे कट ऑफ टाईमच्या वेळेतली ही पहिली हाफ मॅरेथॉन राहिली!

रनिंगच्या ह्या दिवसांमध्ये हळु हळु स्पीडच्या ऐवजी 'पेसची' भाषा शिकत गेलो. घड्याळात ७ वाजून १४ मिनिट वाजलेले असताना ७.१४ अशी पेस आठवते! जेव्हा २१ पळता आले, तेव्हा ४२ पळण्याची इच्छा मनात आली. त्यामुळे फुल मॅरेथॉनची माहिती घेणं सुरू केलं. आणि २१ पळाल्यानंतर आता ४२ च पळण्याची इच्छा आहे. आता हाफ मॅरेथॉन कशाला पळायची? शिवाय सोलो २१ पळणं हे हाफ मॅरेथॉन ईव्हेंटहून जास्त कठीण आहे. पण जेव्हा नीट माहिती मिळाली, तेव्हा कळालं की, ४२ किमी पळण्यासाठी आधी २१ किमी पळावं लागेल. एक हाफ मॅरेथॉन ईव्हेंट पळावी लागेल. फक्त फुल मॅरेथॉनसाठी क्वालिफाय होण्यासाठी...

पुढील भाग- माझं पलायन ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

छान!

मार्गीजी व हर्पेनजी आपला फिटनेस कळण्यासाठी काही मेडिकल टेस्ट कराव्या का? असे कुणी डॉक्टर माहिती आहेत काय? वजन थोडं जास्त असेल तर पळण्यानं त्रास होईल का?

@ शक्तीवान जी मी ह्या विषयातला तांत्रिक तज्ज्ञ नाहीय. त्यामुळे मी सांगू शकणार नाही. पण माझ्या अनुभवाने इतकंच सांगू शकेन की, फिटनेस प्रत्येकामध्ये असतो व वाढवता येतो. वजन जरी जास्त असेल तरी असे लोकही पळताना दिसतातच. माझ्या अनुभवानुसार सांगेन की, तुम्हीही पळू शकता फक्त दोन ठोकताळे हवेत. पहिली गोष्ट म्हणजे अचानक काहीही न करता जे करायचं ते ग्रॅज्युअली आणि शरीराला 'सहज जमेल' त्या मर्यादेत राहून. म्हणजे जर तुम्ही चालत असाल तर चालण्याचं अंतर हळु हळु वाढवून, फास्ट वॉक वाढवून हळु हळु वॉक- जॉग सुरू करू शकता. त्यातून कालांतराने हळु हळु पळालात तर त्रास असा होण्याची शक्यता कमी राहील. आणि काही प्रमाणात पाय दुखणे इ. गोष्टी होतात, त्यासाठी स्ट्रेचिंग असतंच. अर्थात् हे केवळ माझं मत आहे. तज्ज्ञाचं मत घ्याल आणि मग स्ट्रेचिंग करूनच अगदी हळु- टप्प्या टप्प्याने लाँग वॉक- ब्रिस्क वॉक- वॉक- जॉग असं पुढं जाऊ शकता. आपल्या रनिंग व इतर व्यायामांना खूप शुभेच्छा!

@ शक्तीवान जी मी ह्या विषयातला तांत्रिक तज्ज्ञ नाहीय. त्यामुळे मी सांगू शकणार नाही. पण माझ्या अनुभवाने इतकंच सांगू शकेन की, फिटनेस प्रत्येकामध्ये असतो व वाढवता येतो. वजन जरी जास्त असेल तरी असे लोकही पळताना दिसतातच. माझ्या अनुभवानुसार सांगेन की, तुम्हीही पळू शकता फक्त दोन ठोकताळे हवेत. पहिली गोष्ट म्हणजे अचानक काहीही न करता जे करायचं ते ग्रॅज्युअली आणि शरीराला 'सहज जमेल' त्या मर्यादेत राहून. म्हणजे जर तुम्ही चालत असाल तर चालण्याचं अंतर हळु हळु वाढवून, फास्ट वॉक वाढवून हळु हळु वॉक- जॉग सुरू करू शकता. त्यातून कालांतराने हळु हळु पळालात तर त्रास असा होण्याची शक्यता कमी राहील. आणि काही प्रमाणात पाय दुखणे इ. गोष्टी होतात, त्यासाठी स्ट्रेचिंग असतंच. अर्थात् हे केवळ माझं मत आहे. तज्ज्ञाचं मत घ्याल आणि मग स्ट्रेचिंग करूनच अगदी हळु- टप्प्या टप्प्याने लाँग वॉक- ब्रिस्क वॉक- वॉक- जॉग असं पुढं जाऊ शकता. आपल्या रनिंग व इतर व्यायामांना खूप शुभेच्छा! >>> + १

आपला फिटनेस कळण्यासाठी काही मेडिकल टेस्ट कराव्या का? असे कुणी डॉक्टर माहिती आहेत काय? वजन थोडं जास्त असेल तर पळण्यानं त्रास होईल का? >> असं न भेटता मोघम माहितीवर नाही सांगता येणार. फिटनेस, वजन, जास्त, कमी हे खूप सापेक्ष असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला प्रत्यक्ष गाठून हे प्रश्न विचाराल तर बरे.

@ हर्पेन, इनपुटसबद्दल, धन्यवाद! @ शक्तीवान जी, सुरुवातीला तर मला १०० मीटर जॉग केलं तरी चालावं/ थांबावं लागत होतं. तुम्ही तर १५ मिनिट पळू शकताय. हळु हळु वाढवता येऊ शकेल. आणि दीड तास फास्ट वॉक म्हणजे मस्तच!