उदक राखिले युक्तीने - दख्खनच्या आद्य कालव्याची गोष्ट

Submitted by वरदा on 24 April, 2019 - 01:37

(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्‍या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)

एक ओकंबोकं गाव आहे...
उजाड आहे...
वैराण आहे...
गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्‍याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी.

लिखित इतिहासकालापेक्षाही प्राचीन अशा त्या दख्खनच्या आद्य शेतकरी समाजाने मागे सोडलेल्या गावांची, वाड्या-वस्त्यांची ओळख पटवणार्‍या पांढरीच्या - खापरांच्या पाउलखुणा पश्चिम दख्खनमध्ये अनेको ठिकाणी उमटलेल्या दिसतात. जवळजवळ दोनशेहून अधिक वसाहतींची पुरातत्वाने आजवर नोंद केलेली आहे. १९४७ साली प्रथम प्रकाशात आलेल्या प्रवराकाठच्या जोर्वे गावच्या उत्खननापासून ते थेट अगदी अलिकडे सांगली जिल्ह्यात चिकुर्डे मध्ये झालेल्या सर्वेक्षणापर्यंत सुमारे पासष्ट सत्तर वर्षे सतत या वसाहतींवर, कालखंडावर अनेक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. वीसपेक्षा जास्त ठिकाणी उत्खनने झालेली आहेत. त्यामुळे एकूणच या समाजाच्या, कालंखंडाच्या जीवनपद्धतीविषयी आपल्याला बर्‍यापैकी सखोल माहिती मिळालेली आहे. या माहितीत सगळ्यात मोलाची भर टाकली ती इनामगाव येथील सतत १३ वर्षे चाललेल्या उत्खननाने आणि त्याच बरोबर दायमाबाद, प्रकाश, कवठे, वाळकी आणि अशाच इतर छोट्यामोठ्या उत्खननांनी.

कसं होतं हे दख्खनमधल्या आद्य शेतकर्‍याचं जीवन?
सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला या दख्खनच्या आद्य वसाहती आढळायला लागतात. सुरुवातीला बहुदा हंगामीच असणारी छोटी छोटी गावं, वाड्या पुढच्या हजार वर्षांत व्यवस्थित स्थिरावतात. पूर्ण दख्खनभर अशी अनेक स्थायी गावे, त्यांना संलग्न/ स्वतंत्र अशा हंगामी वाड्या-वस्त्या पसरलेल्या होत्या असे दिसते. नदीनाल्यांच्या काठाला, काळ्याकरंद सुपीक जमिनीच्या सान्निध्यात, चराऊ कुरणांच्या जवळपास, कधीतरी गारगोटीचे दगड जिथे विपुल प्रमाणात मिळतात त्या ठिकाणाच्या आसपास अशा विविध प्रकारच्या परिसरांमध्ये या लोकसमूहांचा वावर होता. पण दख्खनचे पर्यावरण, पाऊसमान तेव्हाही आजपेक्षा फार वेगळे नव्हते. तेव्हाही दख्खन अर्धदुष्काळीच होता. त्यामुळे बहुतेक गावं वसवताना साहजिकपणेच जलस्रोतांशी सान्निध्य हा एक महत्वाचा निकष होता असे दिसून येते.
लोखंड गाळायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. तांबे आणि दगड यांची हत्यारं औजारं वापरली जात असत. म्हणूनच त्यांना पुरातत्वात ताम्रपाषाण युग असे म्हणले जाते. शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, जंगलातून फळे कंदमुळे इत्यादि गोळा करणे यावर या समाजांची उपजीविका होत असे. आपसात देवाणघेवाणही होतच असे. पार कर्नाटक आणि गुजरात राजस्थानपर्यंतच्या प्रदेशांशी यांचे देवाणघेवाणीतून संपर्क होते. मात्र नाणी नव्हती, चलनव्यवस्था नव्हती, शहरे नव्हती, राजसत्तेची चौकट नव्हती आणि बांधीव शासनयंत्रणाही नव्हती. फक्त कुटु़ंब आणि कुल यांच्या चौकटीत वावरणारे हे समाजगट होते आणि आपसातच गावप्रमुखांद्वारे कारभार चालत असे.

असे असले तरीही या गावांचीही आपसात एक उतरंडीची व्यवस्था असावी असा संशोधकांचा कयास आहे. म्हणजे काही मोठी गावे प्रादेशिक केंद्रे आणि पर्यायाने त्या त्या प्रदेशातील गावांच्या सामाजिक-आर्थिक-धार्मिक जीवनाचे केंद्र असावीत असे दिसते. ही गावे म्हणजे तापी खोर्‍यातील प्रकाश, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातील दायमाबाद आणि भीमा खोर्‍यातील इनामगाव.

भीमेची उपनदी घोड. अगदीच तीव्र उन्हाळा सोडला तर एरवी बर्‍यापैकी पाणी असणारी. तिच्या एका वळणावर इनामगाव वसले आहे. पांढरीचा एकूण परिसर पंचवीस एकरांच्या आसपास. इ.स.पू. १६००च्या सुमारास इथे प्रथम माणसं कायमस्वरूपी वस्तीला आली असे दिसते. ते थेट पुढची जवळपास हजार वर्षे. किती पिढ्या आणि जीवनाच्या नदीची किती वळणे गावाने बघितली असतील ते फक्त त्या पांढरीलाच ठाऊक. आपल्याला माहित ते फक्त त्यांच्या घरांबद्दल, कारागिरीबद्दल, भांड्याकुंड्यांबद्दल; कुठली धान्ये पिकत, कुठले प्राणी पाळत, कुठली शिकार करत यांबद्दल. पुरातत्वीय तांत्रिक परिभाषेत त्याचे तीन सांस्कृतिक उपकालखंड पडतात - माळवा, पूर्व-जोर्वे आणि उत्तर-जोर्वे कालखंड. त्यातील पूर्व-जोर्वे कालखंड हा सगळ्यात भरभराटीचा सुबत्तेचा होता.
थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात.

इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार.

मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्‍या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्‍यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.

हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता?

पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार.
बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.

गावाच्या बाहेर काही अंतरावर दगडांचे ढिगारे उत्खनकांनी बघितले होते, ते नक्की कशाचे आहेत ते बघायला त्यांनी तिथे पद्धतशीर चाचणी उत्खनन केले. त्यातून लक्षात आले की ते गावाभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आहेत. तब्बल २४० मीटर म्हणजेच जवळपास ८०० फूट लांबीची आणि दहा फूट जाडीची ती भिंत होती. एवढेच नव्हे तर या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला जवळपास समांतर असे एक ओढ्याचे/नाल्याचे पात्र असावे असा पुरावा मिळत होता. गावपरिसराच्या सम्यक भूगोलाचा विचार करताना दिसून आले की लांब गावाच्या पूर्वेला नदी आणि उत्तरेला एक छोटा नाला आहे. आणि हे पात्र त्या उत्तरेच्या नाल्याला मिळत असणार. तसेच हे नैसर्गिक जलौघाचे पात्र नाही. एकुणात पुरावा दर्शवतो की हा मुद्दाम खणलेला कालवा आहे. जवळजवळ २८ ते ३० फूट रुंद आणि साडेतीनशे फुटापेक्षा लांब असा तो कालवा होता. शिवाय त्याचा मध्यभाग आणखी खोलगट केलेला होता. अभ्यासकांच्या मते या कालव्याची किमान संधारण क्षमता सुमारे ५४००० घनफूट पाणी साठवणुकीची होती.

घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला.

या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्‍यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.

हे समाजसमूह राजसत्तेने नियंत्रित नव्हते तर ज्याला मानववंशशास्त्रात चीफडम (chiefdom) म्हणतात तसे, गावप्रमुखांच्या आधिपत्याखाली सहकारी तत्वाने जगणारे समूह होते. जन्माधारित सामाजिक भेदाभेदही इथे असल्याचा पुरावा नाही. तेव्हा अशी सार्वजनिक पातळीवरची कामे ही गावप्रमुखाने केलेल्या नियोजनावर आधारित पूर्णपणे सहकारी तत्वावर पार पाडली गेली असणार हे उघड आहे. दख्खनमधील ही आद्य पाणी-पंचायत मानायला हरकत नसावी. अशा व्यवस्था कदाचित इतरही समकालीन वसाहतींमध्ये असू शकतील, परंतु आपल्याला तसे पुरावे मिळालेले नाहीत.

मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्‍या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.

पुढची चारपाचशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये फारशा वसाहती मिळत नाहीत. मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. सातवाहनकालीन शहरीकरणाबरोबर आता लोहतंत्रज्ञानाचाही सर्वत्र शिरकाव येथे होतो. आणि मग साहित्यात, शिलालेखांत विहिरी-तलाव-बांधबंधारे-टाकी यांचे उल्लेख आढळायला लागतात. बौद्ध लेण्यांमध्ये पुण्य कमवायला म्हणून अनेकांनी दान देऊन दगडात कोरून घेतलेल्या पोढि किंवा टाकी दिसू लागतात. आपण ज्याला पारंपरिक जलसंधारणाचे मार्ग म्हणतो त्याचा उदय पहिल्यांदा या काळात दिसतो.

मात्र इनामगावची पांढर ओसाडच राहिली. परत तिथे कधीच माणूस वसला नाही. तिथले गावकरी कुठे पांगले, भटकत भटकत कुठे गेले, सातवाहनकाळात त्यांचे वंशज समाजात कसे मिसळले हे आजही आपल्यासाठी अज्ञातच आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी केलेला दख्खनचा पहिल्या पाणी-पंचायतीचा प्रयोग विस्मृतीच्या नदीत विलीन झाला.

आजही इनामगावच्या पांढरीवर उभं राहिलं की अर्धदुष्काळी - गाव सोडून जगायला बाहेर पडायला लावणारा - दख्खन म्हणजे काय हे आसपासच्या परिसरावरून नीटच उमजतं. पण त्याचवेळी आपल्या पायाखाली बुजलेला कालवा असतो. प्रगत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक!
संस्कृती आणि तंत्रज्ञान म्हणजे तरी आणखी काय वेगळं असतं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान लेख वरदा. मुळात म्हणजे तू फार सोप्या आणी सहज समजेल अशा पद्धतीने लिहीतेस. अशीच सोपी मांडणी शालेय इतिहासात असेल तर लहान मुले सुद्धा आवडीने इतिहासात रुची दाखवतील, नाहीतर सनावळ्या बघुन मुलांचा इतिहास या विषयातला रस कमी होतो.

तुझा लेख आधी पाहूनच आनंद झाला आणि मग वाचूनही आवडलाच. पाणी प्रश्न सहकारी तत्त्वावर आधारित काम केल्याने सुटू शकतो, गाव करील ते राव काय करील, हे परत एकदा लक्षात येते आहे

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख.
ओघवती शैली, Simple but not simpler. आणि विचार करायला भाग पाडणारा शेवट.
नकाशे देता येतील का?

या प्रकारचे पाट जुन्नर आंबेगाव तालुक्यांमधील गावात 60 वर्षांपूर्वी पर्यंत होते. आता कोणी वापरत नसल्याने निरुपयोगी झालेत. अश्या प्रकारच्या पाटांमध्ये काही कुटुंबांची हिस्सेदारी असे. पाऊस बंद झाल्यावर ओढ्याला किंवा नदीला दगड मातीचा बांध घालून पाणी वळवले जायचे व रब्बी पिकाला पाणी दिले जायचे. पाटामधील हिस्सेदार सामूहिक काम करून पाट दरवर्षी दुरुस्त करत. जुन्या वाटप पत्रामध्ये अश्या प्रकारच्या पाण्याच्या हिश्यांचेही वाटप होत असे. 3600 वर्षे अशी शेती केल्यानंतर आता गेली 20 वर्षे बोरवेल आणि पंप वॉटर टेबल पूर्ण रिकामा करताहेत.

अभ्यासु.लेख..म्हणजे मेंढपाळांची परंपरा ईतकी जुनी...काळाच्या प्रचंड रगाड्यात काही शिल्लक रहात नाही...हे खरच.....छानच लीखाण

>>गत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक!
शेवट फारच छान केला आहे. लेख वाचायला सोपा आणि गुंतवून ठेवणारा आहे.

छान!

' वरदा' हे नाव पाहूनच लेख वाचायला घेतला. अर्थातच आवडला. दोन किरकोळ शंका आहेत. एक म्हणजे भिंतीचे दगड घडीव आहेत की स्वयंभू पाषाण? ताम्रपाषाण काळात इतक्या मोठ्या प्रमाणात दगड चिरे घडवणे शक्य नसावे. ओबडधोबड असमान आकारांच्या दगडांची भिंत बांधताना मजबूत जोडलिंपणाची गरज भासली असणार. मातीच्या लिंपणाने पत्थर व्यवस्थित जलनिरोधकरीत्या जोडले जात होते का? मातीची धरणे आजही बांधतात हे खरे. पण सदैव पाण्यात भिजत असणारी माती त्या काळात अनघड दगड जोडून धरण्याचे आणि जलनिरोधाचे काम करू शकत होती काय? तेव्हा चुना उपलब्ध अथवा ठाऊक होता का? दुसरे म्हणजे कालव्याचा आकार पाहाता ते एक शेततळे असावे आणि त्याचा गावाकडच्या दिशेचा ओवरफ्लो अडवण्यासाठी ती भिंत असावी. शेतात खणणे ताम्रपाषाणाच्या हत्यारांच्या साहाय्याने शक्य असावे. तळ्याचा ओवरफ्लो नाल्याच्या दिशेने वळवला असावा.
धन्यवाद . किरकोळ शंका उपस्थित केल्याबद्दल क्षमस्व.

लेख मस्तच आहे. अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक.
मलाही हीरा यांच्याप्रमाणे एक शंका आहे. त्यांनी कालवा कसा खोदला असेल? ताम्रपाषाण हत्यारांनीच का?

प्रतिसादांबाबत सगळ्यांना धन्यवाद. Happy
@ ShashankP - इनामगावची पांढर आजही अस्तित्वात आहे, तिथे जायला कुणालाच मज्जाव नाही. पण तिथे आता उत्खननाच्या खुणा शिल्लक नाहीत. फक्त वरती खापरे व इतर पुरावशेष मिळतात. इनामगाव उत्खननातून मिळालेले सर्व महत्वाचे पुरावशेष पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वस्तुसंग्रहालयात बघायला मिळतील.
@ चिडकू - तुमच्या माहितीबद्दल फार आभारी आहे. याचाच अर्थ हे तंत्रज्ञान गेले साडेतीन हजार वर्षे दख्खनमध्ये वापरले जात होते. परंतू त्याची जाणतेपणाने नोंद घेतली गेली तर नाहीच पण राजस्थानात जसे जोहडवर काम झाले तशा पद्धतीने या व्यवस्थांचे पुनरुज्जीवनही झाले नाहीये. महाराष्ट्रात ज्या काही छोट्यामोठ्या स्थानिक पारंपरिक जलसंधारण पद्धती होत्या त्याचं डॉक्युमेन्टेशन व्हायची फार गरज आहे. भवताल ही संस्था सध्या हे काम करत आहे. जर या भागात अशी व्यवस्था अजूनही कुठे शिल्लक असेल तर तुम्ही त्यांना फेसबुकवर कळवू शकाल.
@आशुचॅम्प, लसावि - फोटो उत्खनन अहवालात आहेत पण काळे पांढरे आहेत आणि त्यातून काहीही बोध होण्यासारखा नाहीए - फक्त दगड आणि माती दिसत आहेत Proud - एक आरेखन आहे माझ्याकडे कुठेतरी पण आत्ता सापडत नाहीये. उत्खनन अहवालात जो आरेखन नकाशा आहे तो जमलं तर इथे टाकेन - त्यात थोडा अंदाज येईल
@हीरा - घडीव, चिर्‍याचे दगड अर्थातच वापरले नव्हते. कारण लोखंडी औजारे उपलब्ध नव्हती. एरवीचे दगडच मातीचं/चिखलाचं लिंपण करून बसवले होते. चुना त्यांना माहित होता, इनामगावात चुन्याचे उत्पादन करणारे लोणारीही होते असं पुरावा आपल्याला सांगतो पण या बांधकामात चुना वापरलेला आढळून आलेला नाहीये.
ते शेततळे नक्की नव्हते. कालवाच होता. बर्‍याच अंतरा पर्यंत ट्रेस केला गेला आहे.
खणाखणी अर्थातच कठीण टोकेरी दगडी हत्यारांनी झालेली असणार

@वरदा परवाच घोडनदीच्या कडेने जाताना असा छोटा बांध घातलेला दिसला. पण त्यावर इलेक्ट्रिक पंप होता. जुने पाट आता कुठे दिसत नाही. शेतांच्या नावांमध्ये संदर्भ उरलेत. कुठेतरी एखाद्या शेताला पाटाखालचे शेत असे नाव राहिलंय फक्त.

@हिरा असे बांध पक्के नसतात. नदीतलेच दगड गोटे, गवत आणि काळी माती यांनी बांधत. कालवा देखील काळ्या मातीने लिंपत असावेत. खोदण्यासाठी इंग्रजी 7 च्या आकाराच्या फांदीला टोकदार दगड बांधून तोच वापरत असावेत. त्या काळात धातू फारच दुर्मिळ असणार. कमीत कमी कष्टात काम कसे होईल हेच पाहत असणार. शेती सुद्धा बैल नांगर न वापरता फक्त हाताने केली जात होती.

काय सुंदर लिहीले आहे!, शीर्षक, सुरूवात आणि शेवट - यातील कल्पकतेमुळे लेख आणखीनच वाचनीय झाला आहे. केवळ पुराव्यांवरून जे अनुमान निघते त्यावरून लिहीलेल्या लेखांमधे एक कोरडेपणा असतो, तसा इथे अजिबात नाही.

मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. >> अशा वाक्यांमुळे लेख एकदम जिवंत होउन समोर येतो. परदेशातील विविध कालखंडांवर अशा 'रिच' डॉक्युमेण्टरीज असतात तशी आपल्याच या भागाबद्दल पाहायला काय जबरी वाटेल.

बाकी घोडनदीच्या उल्लेखामुळे थोडा नॉस्टॅल्जिकही Happy लहानपणी मंचर च्या आसपास खूप वेळा राहिलो आहे.

मस्त आणि माहितीपूर्ण !
परदेशातील विविध कालखंडांवर अशा 'रिच' डॉक्युमेण्टरीज असतात तशी आपल्याच या भागाबद्दल पाहायला काय जबरी वाटेल. >+१

झकास! वाचायला काय मजा आली !!

शिवाय सध्या 'सेपियन्स' वाचते आहे, त्यामुळे मनानं पुरातत्व काळात आणि त्या प्रकारच्या संशोधनातच असते... :स्वप्नाळू बाहुली:

अप्रतिम लेख.
एक शंका. मानवाला लोखंडाचा शोध लागला नव्हता त्या काळात येथे अप्रतिम बांधकामे केली गेली ती कशाच्या आधारावर?

हो, इनामगाव म्हणजे न्हावरे फाट्यावरचं. वांगदरी च्या समोरच्या तीरावरचं

शालि - नक्की कुठल्या काळातील कुठली बांधकामे तुम्हाला अभिप्रेत आहेत? मला नीटसं कळलं नाही

नक्की काळ मलाही सांगता नाही येणार वरदा. माझी माहीती टिव्हीवरच्या शोवर आधारीत. पण त्यांचे म्हणने असं आहे की तांबे वगैरे राहूद्याच, धातुचाच शोध मानसाला लागला नव्हता तेव्हाही लेझर कट करावे तसे काम पृथ्विवर केले गेले होते. मोहंजदारो सारखी शहरे अणूस्फोटामुळे नाहीशी झाली. वगैरे. असो.
तुम्ही प्रत्यक्ष साईटवर काम करता असं गृहीत धरुन एक विचारतो. साधं मडक्याचं खापर सापडलं किंवा मातीची बांगडी सापडली तर त्याचा ईतीहास शोधन्यात तुम्ही मग्न होत असाल, पण पहिल्यांदा त्या वस्तुला हात लावताना काय वाटतं हो?

Pages