उदक राखिले युक्तीने - दख्खनच्या आद्य कालव्याची गोष्ट

Submitted by वरदा on 24 April, 2019 - 01:37

(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्‍या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)

एक ओकंबोकं गाव आहे...
उजाड आहे...
वैराण आहे...
गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्‍याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी.

लिखित इतिहासकालापेक्षाही प्राचीन अशा त्या दख्खनच्या आद्य शेतकरी समाजाने मागे सोडलेल्या गावांची, वाड्या-वस्त्यांची ओळख पटवणार्‍या पांढरीच्या - खापरांच्या पाउलखुणा पश्चिम दख्खनमध्ये अनेको ठिकाणी उमटलेल्या दिसतात. जवळजवळ दोनशेहून अधिक वसाहतींची पुरातत्वाने आजवर नोंद केलेली आहे. १९४७ साली प्रथम प्रकाशात आलेल्या प्रवराकाठच्या जोर्वे गावच्या उत्खननापासून ते थेट अगदी अलिकडे सांगली जिल्ह्यात चिकुर्डे मध्ये झालेल्या सर्वेक्षणापर्यंत सुमारे पासष्ट सत्तर वर्षे सतत या वसाहतींवर, कालखंडावर अनेक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. वीसपेक्षा जास्त ठिकाणी उत्खनने झालेली आहेत. त्यामुळे एकूणच या समाजाच्या, कालंखंडाच्या जीवनपद्धतीविषयी आपल्याला बर्‍यापैकी सखोल माहिती मिळालेली आहे. या माहितीत सगळ्यात मोलाची भर टाकली ती इनामगाव येथील सतत १३ वर्षे चाललेल्या उत्खननाने आणि त्याच बरोबर दायमाबाद, प्रकाश, कवठे, वाळकी आणि अशाच इतर छोट्यामोठ्या उत्खननांनी.

कसं होतं हे दख्खनमधल्या आद्य शेतकर्‍याचं जीवन?
सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला या दख्खनच्या आद्य वसाहती आढळायला लागतात. सुरुवातीला बहुदा हंगामीच असणारी छोटी छोटी गावं, वाड्या पुढच्या हजार वर्षांत व्यवस्थित स्थिरावतात. पूर्ण दख्खनभर अशी अनेक स्थायी गावे, त्यांना संलग्न/ स्वतंत्र अशा हंगामी वाड्या-वस्त्या पसरलेल्या होत्या असे दिसते. नदीनाल्यांच्या काठाला, काळ्याकरंद सुपीक जमिनीच्या सान्निध्यात, चराऊ कुरणांच्या जवळपास, कधीतरी गारगोटीचे दगड जिथे विपुल प्रमाणात मिळतात त्या ठिकाणाच्या आसपास अशा विविध प्रकारच्या परिसरांमध्ये या लोकसमूहांचा वावर होता. पण दख्खनचे पर्यावरण, पाऊसमान तेव्हाही आजपेक्षा फार वेगळे नव्हते. तेव्हाही दख्खन अर्धदुष्काळीच होता. त्यामुळे बहुतेक गावं वसवताना साहजिकपणेच जलस्रोतांशी सान्निध्य हा एक महत्वाचा निकष होता असे दिसून येते.
लोखंड गाळायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. तांबे आणि दगड यांची हत्यारं औजारं वापरली जात असत. म्हणूनच त्यांना पुरातत्वात ताम्रपाषाण युग असे म्हणले जाते. शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, जंगलातून फळे कंदमुळे इत्यादि गोळा करणे यावर या समाजांची उपजीविका होत असे. आपसात देवाणघेवाणही होतच असे. पार कर्नाटक आणि गुजरात राजस्थानपर्यंतच्या प्रदेशांशी यांचे देवाणघेवाणीतून संपर्क होते. मात्र नाणी नव्हती, चलनव्यवस्था नव्हती, शहरे नव्हती, राजसत्तेची चौकट नव्हती आणि बांधीव शासनयंत्रणाही नव्हती. फक्त कुटु़ंब आणि कुल यांच्या चौकटीत वावरणारे हे समाजगट होते आणि आपसातच गावप्रमुखांद्वारे कारभार चालत असे.

असे असले तरीही या गावांचीही आपसात एक उतरंडीची व्यवस्था असावी असा संशोधकांचा कयास आहे. म्हणजे काही मोठी गावे प्रादेशिक केंद्रे आणि पर्यायाने त्या त्या प्रदेशातील गावांच्या सामाजिक-आर्थिक-धार्मिक जीवनाचे केंद्र असावीत असे दिसते. ही गावे म्हणजे तापी खोर्‍यातील प्रकाश, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातील दायमाबाद आणि भीमा खोर्‍यातील इनामगाव.

भीमेची उपनदी घोड. अगदीच तीव्र उन्हाळा सोडला तर एरवी बर्‍यापैकी पाणी असणारी. तिच्या एका वळणावर इनामगाव वसले आहे. पांढरीचा एकूण परिसर पंचवीस एकरांच्या आसपास. इ.स.पू. १६००च्या सुमारास इथे प्रथम माणसं कायमस्वरूपी वस्तीला आली असे दिसते. ते थेट पुढची जवळपास हजार वर्षे. किती पिढ्या आणि जीवनाच्या नदीची किती वळणे गावाने बघितली असतील ते फक्त त्या पांढरीलाच ठाऊक. आपल्याला माहित ते फक्त त्यांच्या घरांबद्दल, कारागिरीबद्दल, भांड्याकुंड्यांबद्दल; कुठली धान्ये पिकत, कुठले प्राणी पाळत, कुठली शिकार करत यांबद्दल. पुरातत्वीय तांत्रिक परिभाषेत त्याचे तीन सांस्कृतिक उपकालखंड पडतात - माळवा, पूर्व-जोर्वे आणि उत्तर-जोर्वे कालखंड. त्यातील पूर्व-जोर्वे कालखंड हा सगळ्यात भरभराटीचा सुबत्तेचा होता.
थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात.

इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार.

मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्‍या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्‍यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.

हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता?

पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार.
बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.

गावाच्या बाहेर काही अंतरावर दगडांचे ढिगारे उत्खनकांनी बघितले होते, ते नक्की कशाचे आहेत ते बघायला त्यांनी तिथे पद्धतशीर चाचणी उत्खनन केले. त्यातून लक्षात आले की ते गावाभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आहेत. तब्बल २४० मीटर म्हणजेच जवळपास ८०० फूट लांबीची आणि दहा फूट जाडीची ती भिंत होती. एवढेच नव्हे तर या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला जवळपास समांतर असे एक ओढ्याचे/नाल्याचे पात्र असावे असा पुरावा मिळत होता. गावपरिसराच्या सम्यक भूगोलाचा विचार करताना दिसून आले की लांब गावाच्या पूर्वेला नदी आणि उत्तरेला एक छोटा नाला आहे. आणि हे पात्र त्या उत्तरेच्या नाल्याला मिळत असणार. तसेच हे नैसर्गिक जलौघाचे पात्र नाही. एकुणात पुरावा दर्शवतो की हा मुद्दाम खणलेला कालवा आहे. जवळजवळ २८ ते ३० फूट रुंद आणि साडेतीनशे फुटापेक्षा लांब असा तो कालवा होता. शिवाय त्याचा मध्यभाग आणखी खोलगट केलेला होता. अभ्यासकांच्या मते या कालव्याची किमान संधारण क्षमता सुमारे ५४००० घनफूट पाणी साठवणुकीची होती.

घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला.

या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्‍यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.

हे समाजसमूह राजसत्तेने नियंत्रित नव्हते तर ज्याला मानववंशशास्त्रात चीफडम (chiefdom) म्हणतात तसे, गावप्रमुखांच्या आधिपत्याखाली सहकारी तत्वाने जगणारे समूह होते. जन्माधारित सामाजिक भेदाभेदही इथे असल्याचा पुरावा नाही. तेव्हा अशी सार्वजनिक पातळीवरची कामे ही गावप्रमुखाने केलेल्या नियोजनावर आधारित पूर्णपणे सहकारी तत्वावर पार पाडली गेली असणार हे उघड आहे. दख्खनमधील ही आद्य पाणी-पंचायत मानायला हरकत नसावी. अशा व्यवस्था कदाचित इतरही समकालीन वसाहतींमध्ये असू शकतील, परंतु आपल्याला तसे पुरावे मिळालेले नाहीत.

मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्‍या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.

पुढची चारपाचशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये फारशा वसाहती मिळत नाहीत. मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. सातवाहनकालीन शहरीकरणाबरोबर आता लोहतंत्रज्ञानाचाही सर्वत्र शिरकाव येथे होतो. आणि मग साहित्यात, शिलालेखांत विहिरी-तलाव-बांधबंधारे-टाकी यांचे उल्लेख आढळायला लागतात. बौद्ध लेण्यांमध्ये पुण्य कमवायला म्हणून अनेकांनी दान देऊन दगडात कोरून घेतलेल्या पोढि किंवा टाकी दिसू लागतात. आपण ज्याला पारंपरिक जलसंधारणाचे मार्ग म्हणतो त्याचा उदय पहिल्यांदा या काळात दिसतो.

मात्र इनामगावची पांढर ओसाडच राहिली. परत तिथे कधीच माणूस वसला नाही. तिथले गावकरी कुठे पांगले, भटकत भटकत कुठे गेले, सातवाहनकाळात त्यांचे वंशज समाजात कसे मिसळले हे आजही आपल्यासाठी अज्ञातच आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी केलेला दख्खनचा पहिल्या पाणी-पंचायतीचा प्रयोग विस्मृतीच्या नदीत विलीन झाला.

आजही इनामगावच्या पांढरीवर उभं राहिलं की अर्धदुष्काळी - गाव सोडून जगायला बाहेर पडायला लावणारा - दख्खन म्हणजे काय हे आसपासच्या परिसरावरून नीटच उमजतं. पण त्याचवेळी आपल्या पायाखाली बुजलेला कालवा असतो. प्रगत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक!
संस्कृती आणि तंत्रज्ञान म्हणजे तरी आणखी काय वेगळं असतं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सोप्या भाषेत लिहिलंय. तुझे लेख म्हणूनच आवडतात.

लेक सहावीत गेलाय. इतिहासाच्या पहिल्याच धड्यात आर्किओलॉजिस्ट चा उल्लेख होता. तुझी लगेच आठवण झाली. त्याच्या पण लक्षात होतं माझी माबो मैत्रीण आर्किओलॉजिस्ट आहे हे.
हा लेख त्याला पण वाचून दाखवला. आवडला त्यालाही.

मस्त माहिती. यावर काही पुस्तकं, रेफेरन्सस असतील (खासकरून मराठीत) तर धाग्यात जरूर जोडा, अजून वाचायला आवडेल .

त्या काळातले (म्हणजे ताम्रयुगातले) कुठले शिलालेख सापडलेत का, ज्याच्या आधारावर तेव्हाच्या समाजव्यवस्थेवर थोडा उजेड पडेल ? मराठी/प्राकृतचा उगम फार फार तर १२०० वर्षांपूर्वी झालाय. मग त्या काळात कुठली लिपी वापरात होती ?

आणि एक , तेव्हाच्या पांढरी आणि आत्ताच्या पंढरीत नावाशिवाय काही दुसरे दुवे आहेत का ? विठ्ठल सुद्धा पहिल्यांदा पशुपालक, भटक्या जमातींकडून पुजला गेला अशी वंद्यता आहे. त्या विठ्ठलाच्या उत्पत्तीचे मूळ पांढरीतून निघालेल्या भटक्या टोळ्यांत असू शकतं, असे काही पुरावे मिळालेत का?

शाली,
हिस्टरी चॅनेल बघून मतं बनवू नका.
धन्यवाद. कृपया.

नाही हो चिनुक्स. मते बनतातच ना. आणि ते जे दाखवतात ते सगळेच कसे नाकारता येईल? पुराव्यासहित मांडतात ते. आलं मनात आणि केले विधान असे नसते ते. हिस्ट्री चॅनेल सोडु आपन पण डॉ. सुरेश नाडकर्णींने जे मांडलय त्याचाही विचार करावाच लागेल ना? हे सगळं अगम्य आहे. ज्याची उत्तरे मिळतात त्यावरच चालायचे, ज्याची उत्तरे मिळत नाही तो विषय बाजुला टाकायचा असं नाही करता येत.

लेख निव्वळ अप्रितमच आहे. ज्या पध्दतीने लिहिलाय त्यावर तर मी जाम खुष आहे. आर्कीऑलॉजीमध्ये रस निर्माण होईल असं लेखन.
वरदा एक सांगा, एखादा दागिना हाताशी लागला तर त्याला स्पर्ष करताना काय काय विचार येतात मनात? हे कुणी वापरले असतील? कसे असेल तिचे आयुष्य? कशी असेल ती? हे सगळं मनात येतं की फक्त एक ऑर्किऑलॉजीकल पुरावा एवढच पहाता तुम्ही? कसा असतो तो अनुभव?

शाली, नंतर लॅपटॉपवरून येऊन सविस्तर उत्तर लिहेनच, पण माझे मत चिनूक्ससारखेच आहे. ही अत्रंगी मते मांडणारे कुणीही प्रशिक्षित आर्किऑलॉजिस्ट्स नाहीत हे तोवर कृपया लक्षात ठेवा. विषयाच्या बाहेर बसून अशी सनसनाटी विधाने करणे खूप सोपे असते.
मी पुरातत्वाशी संबंधित मायबोलीवर इतरही काही लिखाण केले आहे, ते तुम्ही जर डोळ्याखालून घातलेत तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा आहे. ते वाचून होईपर्यंत मी इथे शांतपणे तपशीलात उत्तर लिहेनच.

रावी- धान्ये उत्खननात सापडतात ती जळलेल्या स्वरूपातलीच. कारण नाहीतर कुजून कधीच नष्ट झाली असती की... जळल्यामुळे त्यांचा बाह्याकार टिकून राहतो आणि मग त्याची ओळख पटवायला सोपं जातं. अर्थातच हे करण्यासाठी बॉटनीमध्येही वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांची गरज असते.

हिस्ट्री चॅनलवर काहीही दाखवतात. अजंठा लेणी एलियन्सनी तयार केली आहेत असंही दाखवलं गेलेलं आहे. आता जिथे या लेण्यांचा पक्का काल माहित आहे, कुठल्या राजघराण्याच्या काळात, पंथाच्या आधिपत्याखाली कुठली लेणी कधी खोदली गेली हे सगळं सगळं अनेको वर्षांपासून माहित आहे आणि ही माहिती पब्लिक डोमेनचा भाग आहे तिथे हिस्टरी चॅनल असं धडधडीत खोटं दाखवतं आणि आपण शालेय पाठ्यपुस्तकात शिकलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता अशा 'माहिती'पटांवर विश्वास ठेवायचं म्हणतो?
आपण शालेय शिक्षणाला, शालेय-महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांना जर इतकं किरकोळीत काढणार असू तर समाजाच्या कलेक्टिव्ह बुद्धीमत्तेवर शंका घ्यावी का असा प्रश्न मला गेली काही वर्षे वारंवार पडतो आहे (इथे कुणावरही वैयक्तिक रोख नव्हे, कृपया नोंद घ्यावी) याची मला इथे परत एकदा नोंद करावीशी वाटत आहे....
मोहेन्जोदडो अणुस्फोटात उध्वस्त होण्याबाबत -
मी मूळ क्लेम चाळला. त्यात त्यांनी एकत्र मिळालेल्या सांगाड्यांचे पुरावे दिले आहेत. ते सांगाडे मुळात आता एका कालखंडातले नाहीत हे बरेच वर्षांपूर्वीच सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. अगदी सुरुवातीला मॉर्टिमर व्हीलर यांनी हे सांगाडे मिळाल्यावर 'इन्द्र स्टॅण्ड्स अक्यूज्ड' असं एक प्रसिद्ध विधान केलं होतं (१९४० च्या दशकात). यात आर्य आणि हरप्पन संस्कृतीच्या लढ्यात आर्यांनी जय मिळवला असा अर्थ अभिप्रेत होता तसंच इंद्राच्या पुरंधर या वैदिक विशेषणाला उद्देशून हे वाक्य होते. मात्र शास्त्रीय चिकित्सेनंतर जेव्हा हे सांगाडे नैसर्गिक मृत्यू दर्शवतात तसेच विविध कालखंडातले आहेत हे सिद्ध झाल्यावर त्यांनी हे विधान मागे घेतले होते. तेव्हा ते सांगाडे वगैरे इंटरप्रीटेशन निव्वळ बोगस आहे. रेडिओअ‍ॅक्टिव सांगाडे तर निव्वळ बाजारगप्पा आहेत. कुठेही ठोस शास्त्रीय चि कित्सेचा, त्याच्या प्रकाशनाचा संदर्भ नाहीये. या विषयात जे लोक सध्या काम करतात त्यांनाही मी याविषयी विचारून घेतलेलं आहे. जोपर्यंत तुमचे विश्लेषण, डेटा हे प्रकाशित नाही, ते इतरांनी स्वतंत्रपणे तपासून बघण्यासारखे डॉक्युमेन्ट केले गेलेले नाही तोवर त्याला संशोधनात शून्य किंमत आहे.
आणखी एक पुरावा दिला आहे की विटा वितळल्या, इ. इ.
आता मोहेन्जोदडोवर अनेको दशके उत्खनन व संशोधन झालेले आहे, ते तपशीलवार अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात कुठेही अशा क्रेटरची, वितळलेल्या विटांची नोंद नाहीय. मी ऑनलाईन बघितलं तेव्हा जे फोटो दिसले वितळलेल्या विटांचे त्या विटा नसून एकतर मेटल स्लॅग्ज (धातू गाळल्यावर उरलेला अशुद्ध भाग ) आहेत किंवा मग व्हिट्रिफाईड सँड (वाळू) आहे जी खापरे भाजण्यात व फ्रिट (खापरांना काचेरी झिलई किंवा ग्लेझ द्यायच्या पूर्णत्वाच्या आधीचा एक टप्पा) तयार करण्याच्या प्रक्रियेतून वितळून गार झालेली आहे. वाळूपासून काच करायचे तंत्रज्ञान हडप्पन लोकांना अवगत करता आले नसले तरी त्या आधीचा एक टप्पा म्हणजे फ्रिट त्यांना करता येत असे. आता ज्यांना मुदलात ती स्लॅग आहे का व्हिट्रिफाईड सॅण्ड आहे का व्हिट्रिफाईड वीट आहे हेच कळायची मारामार, त्यांनी त्याचं इंटरप्रीटेशन करून असे अचाट दावे करावेत यापरता विनोद नाही.. त्यांच्या बुद्धीमत्तेला माझा साष्टांग प्रणिपात!
मोहेन्जोदडोच्या आसपास इतरही अनेको साईट्स आहेत. फक्त मोहेन्जोदडोचा विध्वंस झाला आणि बाकीचे सहीसलामत वाचले? असं होऊ शकतं?
वेद आणि महाभारतातले पुरावे लोक कुठेही आणि कसेही वापरतात. त्यावर लिहायला बसलं तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. आत्ता हे सगळं करायला वेळ नाहीय. पण वेदात असे कुठलेही दूरदूरहूनही उल्लेख नाहीत आणि महाभारतातील ब्रह्मास्त्र वगैरे कविकल्पना आहेत हे त्यावर संशोधन करणार्‍या साहित्यविषयक विद्वानांचे आ णि प्रशिक्षित व्यावसायिक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचे मत आहे.

सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे मोहेन्जोदडोवर काही लिखाण असल्याचे आठवत नाहीये. त्यांनी बहुतेक सगळं स्यूडो-आर्किऑलॉजि (छ्द्म-पुरातत्व) ची एरिक वॉन डॅनिकेन किंवा चार्ल्स बर्लिट्झ वगैरे पुस्तकांचे भाषांतर करून स्वत:ची पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्याकडे पुरातत्वाची कुठल्याही प्रकारची तज्ज्ञता नव्हती.

तथागत गौतम बुद्ध यांच्या राज्याच्या मालकिचा असाच एक कालवा होता, त्याचे पाणी विरोधकांना मिळू नये असे त्यांच्या राज्यातील नागरिक म्हणत होते पण भगवान गौतम बुद्ध सर्वांचा पाण्यावर अधिकार आहे हे न्यायाचे तत्त्व मांडत होते. गृहत्याग करण्याचे हे कारण होते असे बोलले जाते. पुर्वी पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून दगडी भिंती ज्याला धक्के म्हणतात ते बांधत असत. सडेतोड, विज्ञानवादी व वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारित लेख. धन्यवाद. पुलेशु.

नेहेमीप्रमाणेच अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण लेख.
वरदा मला एक विचारायचंय. एकंदरित लेखाचा रोख हा पर्यावरणामुळे त्याकाळात झालेला सर्वांगीण बदल असा आहे असं मला वाटतंय. जसा मार्क्सचा रोख आर्थिक परिस्थितीवर होता. तसा पर्यावरण हा केंद्रबिंदू मानून प्राचीन काळातील बदलांची संगती लावणे अशी काही सुस्पष्ट अशी थियरी किंवा सिद्धान्त पुरातत्वशास्त्रात आहे काय? मला त्यात खुप रस वाटतो. आणि तसा सिद्धान्त असल्यास त्याला विरोधी अशीही काही मते आहेत काय?

खुपच सुंदर लेख. अगदी नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण. बहुतेक पुणे ट्रीप मध्ये डेक्कन कॉलेजला भेट द्यायचा प्रोग्राम बनवावा लागेल.

Pages