शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक ४

Submitted by हर्पेन on 22 April, 2019 - 03:08

भाग - ३
https://www.maayboli.com/node/69590

भाग ४ चालू....

दिवस पाचवा -

आदल्या रात्री लवकर जेवण झाले होते म्हणून की काय पण मला पहाटे चार वाजताच जाग आली. निसर्गाची मोठी हाक. सुदैवाने रात्रभर छोटी हाक न आल्याने अर्ध्या रात्री अर्ध्या झोपेतून उठावे लागले नव्हते. थंडीमुळे उठायचे जीवावर आले होते पण मोठ्या हाके पुढे काय चालणार मग उठलो आपला. मोठ्या हाकेला ओ देताना लडाख मध्ये राहत आहोत तर लडाखी खड्डा पद्धतीचा अवलंब करावाच लागणार अशी मानसिक तयारी करून (स्वत:ची) आणि करवून (मित्रांची) झाली होतीच. तंबूच्या आतल्या दोन झडपा उघडल्या, पाय कसे बसे गमबुटात खुपसले आणि बाहेरची झडप उघडली. उघडली मात्र माझ्या डोळ्यावरची होती नव्हती ती झोप खाडकन उडाली. केवळ थंडीने नाही तर समोर जे दृश्य पहायला मिळाले त्यामुळे. हिमवर्षावामुळे यत्र तत्र सर्वत्र पांढरा शुभ्र रंग. सगळीकडे सफेद रंगाचा आणि अर्थातच हिमाचा मुलामा. आधीच पहाटेचे चार वाजताची अर्धवट अंधार उजेडाची वेळ, अजून जाग पूर्ण आलेली नाहीये, प्रचंड थंडीमुळे संवेदना बधीर झाल्यात, त्यातून हे अत्यंत अनपेक्षितपणे अजिबात आवाज न करता पडत असलेले बर्फ, काल रात्री झोपेपर्यंत आजूबाजूला असलेल्या तपकिरी मातकट रंगावर चढलेले शुभ्रतेचे आवरण, गुंग होऊन बघत राहाण्याशिवाय दुसरे काही करूच शकत नाही आपण. भान आले तेव्हा पहिल्या प्रथम अरण्याला उठवले अरे बघ काय अप्रतिम नजारा आहे. खालून बर्फ वर बर्फ बर्फ बाजूने... एक इंचभर जागा देखील वाचली नव्हती हिमवर्षावापासून अजून नाट्यमय रीतीने सांगायचे झाले तर ज्यावर हिम वर्षाव झाला नाही अशी सुईच्या अग्रावर मावेल इतकी भुई देखील उरली नव्हती. तो ही अर्धवट झोपेत होता वा छान वगैरे म्हणून झाल्यावर पापा आप जलदी जाके आओ म्हणून परत स्लिपींग बॅगेत गुडूप झाला.

IMG_20190207_150857.jpg

मला आता वेगळीच काळजी वाटू लागली. अंधारात बाहेर जावे लागले तर म्हणून काल दिवसाउजेडी मारे पाहून ठेवली होती संडासाकडे जाणारी वाट कुठून कशी जाते ते पण आता ताजे बर्फ पडल्यामुळे सगळ्या पायवाटा दगड धोंडे झुडुपं गवत सगळे काही पांढऱ्या थराखाली झाकून गेलेलं. त्यात संडासापर्यंत पोचण्याकरता एक छोटा का होईना पण चढ चढून जायचे होते. हिंमत बांधली आणि गेलो. वेट अँड ड्राय टिश्यू पेपर, सॅनिटाइजर, हेडटॉर्च असं सगळं काही घेऊन गमबूट आणि अंगावरच्या वर खाली घातलेल्या कपड्यांच्या थरांनिशी निसर्गाच्या मोठ्या हाकेला ओ द्यायची हे माझ्यामते जगातले सगळ्यात अवघड काम आहे. काही विचारू नका कार्यभाग कसा उरकला. कार्यभाग उरकल्यानंतर मात्र उतारावरून स्वतःला सांभाळत खाली आलो. तंबूजवळ आल्यावर मात्र एकीकडे अजिबात आवाज न करत भुरुभुरु पडणाऱ्या बर्फ़ाकडे बघायला बाहेरच थांबावे असे वाटत होते आणि एकीकडे अत्यंत गारठ्यामुळे कधी एकदा तंबूत शिरतोय असे झालेले. थोडा वेळ त्या स्वर्गीय वातावरणाचा आनंद घेतल्यावर मात्र परत तंबूत येऊन झोपलो. पुन्हा एकदा तेच सगळे टप्पे. तंबूची, स्लीपिंग बॅगची चेन उघडा बंद करा वगैरे वगैरे नंतर साधारण तास दीड तास तंबूत पडून राहिलो थोडी झोप लागत्ये न लागत्ये तोवर सकाळ झालीच मग बाहेर आलो. बर्फ पडतच होता उजाडल्यामुळे अजूनच सुंदर दृष्य होतं ते. दात घासून झाले तरी बर्फ पडायचा थांबला नाही आता त्या दृश्याची सवय झाली होती आणि लोकांची कुजबूज सुरु झाली होती की बर्फ़ातच चालू पडायचे आहे की बर्फ पडणे थांबल्यावर. शिवाय असेही बोलणे चालले होते की बर्फ़ पडला की तपमान जरा वाढते ज्यामुळे नदीवरील बर्फ़ाचे आवरण वितळू शकते. त्यामुळे जरा मनाची चलबिचल होऊ लागली. पण वाटले थांबेल हिमवर्षाव पण मग तर नाश्ताही करून झाला तरीही बर्फ पडतच होता. शेवटी मग ईश्वरने जाहीर केले की आपल्याला बर्फ पडत असतानाच निघायाचे आहे त्यामुळे सर्व मंडळींनी आपापल्या अंगावर वॉटर प्रूफ जॅकेट अंगावर चढवा आणि निघायला सज्ज व्हा. माझ्याबरोबर आलेल्या तिघाही जणांकडे वॉटर प्रूफ जॅकेट नव्हते. आता आली का पंचाईत. माझ्याकडे शॅनॉन ने दिलेले असे एक वॉटरप्रूफ जॅकेट आणि वॉटरप्रूफ पँट होती. पण आम्हाला adventure nation कडून आलेल्या ईमेल मध्ये ह्याचा उल्लेख नसल्याने राजा, अरुण आणि संदीप कडे हे नव्हते. मी सुद्धा शॅनॉनने दिलेच आहे तर न्यावे म्हणून आणले होते. आम्ही आपले धरून चाललो थंडीत उणे तपमानात पाऊस पडणार नाही त्यामुळे वॉटरप्रूफ जॅकेट काही लागणार नाही. शिवाय अशीही एक गैर समजूत (का कोणास ठाऊक) होती की डाऊन जॅकेट मधून बर्फ / बर्फ़ाचे पाणी आत जात नाही. अर्थात आमची ही समजूत अत्यंत चुकीची होती हे आम्हाला कळले आणि आम्ही किती अडाणी आहोत हे बाकीच्या सगळ्यांना.

आता या ठिकाणी थोडे आम्ही घालत असलेल्या कपड्याच्या थराविषयी लिहिले तर अस्थानी ठरणार नाही. ह्यावर आम्ही निघायच्या आधीपासून ह्या विषयावर इतकी चर्चा केली होती की ज्याचे नाव ते. एकाच तपमानाला प्रत्येकाला वाजणारी थंडी वेगवेगळी असूच शकते म्हणजे असतेच. त्यामुळे दोन तीन आयोजकांच्या वेबसाईट वरून माहिती काढून मी चक्क एक कंपॅरिटिव्ह बनवले होते. आम्हा चौघांची खरेदी त्यानुसार केलेली होती काही गोष्टी प्रत्येकाकडे आधीच होत्या त्या घरातल्याच घ्यायच्या असे ठरले होते. त्या नुसार आम्ही अंगात चढवत असू ते कपडे सर्वसाधारणपणे असे होते. वर घालायचे थर आणि खाली घालायचे थर. खाली घालायचे दोन थर पुरतात. ह्याचे एक कारण वरती घातलेले कपडे आपल्या मांड्यापर्यंत येतील इतपत मोठे असतातच. वरच्या कपड्यात सर्वात आत थर्मल वेअर त्यात दोन प्रकार एक ऍक्टिव्ह थर्मल वेअर जे डिकॅथलॉन नावाच्या दुकानात मिळते ह्या थर्मल चे वैशिष्ट्य असे की त्यात आलेला घाम सुकण्याकरता तशी व्यवस्था त्यात असते म्हणजे काखेत जरा वेगळे जाळीदार कापड वगैरे शिवाय ह्याचे कापड ड्रायफिट सदृश्य असते. हे दिवसा चालताना वापरायचे. रात्री झोपताना घाम येण्याची शक्यता नसल्याने त्यावेळी जनरल कुठल्याही दुकानात मिळणारे थर्मल वेअर चालून जाते. त्यावर दुसरा थर टीशर्ट हा ही खास सूचनेनुसार सिंथेटिक कापडाचा वापरण्यास सांगितला होता. त्यावर फ्लीस चे जाकीट आणि मग त्यावर डाऊन जॅकेट. सुरुवातीस हे सगळे घालून नुसते वावरताना देखील अवघडलेपण येत असे. पण मग नंतर हे इतके कपडे मग त्यावर सॅक हातात काठी रात्री आवर्जून हेड टॉर्च असं फिरायची सवय होऊन जाते.

त्यातल्या त्यात बरं वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे वॉटरप्रूफ जॅकेट नसणारे अजूनही दोन जण निघाले पण अर्थात त्यामुळे ईश्वरची काळजी अजून वाढली. मग जाहीर आवाहन करण्यात आले की ज्या कोणाकडे जास्तीचे जाकीट असेल त्यांनी ते नाहीये गटाला द्यावे अशा आवाहनानंतर दोघं तिघांची सोय झाली पण अपराजिता आणि अरुण ह्यांची सोय लागायची राहिलीच होती त्यामुळे मग ईश्वर त्यांच्याकरता काळ्या पॉलीथीन पिशव्या असतात त्यांच्यापासून तात्पुरती व्यवस्था करण्याच्या मागे लागला. तितक्यात अपराजिता ला देखील कोणाकडून तरी जॅकेट मिळाले राहता राहिला अरुण मग शेवटी त्याच्या करता तात्पुरती व्यवस्था करून झाली आणि आम्ही मार्गस्थ जाहलो. तितक्यात आमच्या इंटरनॅशनल युथ क्लब चा परत जाणारा गट आम्हाला भेटला त्यांच्याकडून एक रेन पोंचो मिळाला आणि मी हुश्श केले माझीही हिवाळ्यातल्या ट्रेक ची पहिलीच वेळ असली तरी माझ्या मित्रांची एकंदरीतच हिमालयातल्या पहिली वेळ होती आणि ते माझ्या भरोशावर तिकडे आलं होते मला त्या दिवशी फार कानकोंडे वाटत होते. म्हणजे इतके सगळे महागातले कपडे खरेदी केली तर हे तुलनेने स्वस्त आणि वजनाला हलके असे जॅकेट कसं काय राहून गेले.

तात्पुरत्या व्यवस्थेतल्या अवस्थेत अरुण
IMG_20190207_080632.jpg

ह्या सगळ्या गडबडीत अजून एक प्रकरण झाले ते म्हणजे दुबईहून एकत्र आलेल्या हिमांशू दिनेश आणि राहुल ह्या तिघांपैकी राहुलला परत पाठवण्याचे ठरले. कालच्या त्याच्या तपासणीत त्याच्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी आढळले होते. त्याला एक रात्र जाऊ दे त्याही नंतर म्हणजे सकाळीही ते वाढले नाही तर परत जावे लागेल असे सांगितले होतेच. त्यानेही अवास्तव हट्ट न करता त्यास मान्यता दिली होती. आज सकाळीच तो ही तपासणी करून आला होता आणि आजही त्याचे रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढले नव्हते. ज्या गटाकडून अरुण करता पोंचो घेतला त्या गटासोबत राहुलला परत पाठवले. फार वाईट वाटले पण काही इलाज नव्हता. त्याच्या शुभेच्छा स्वीकारून आम्ही मार्गस्थ झालो.

बर्फ पडत असताना चालण्याची मजाच काही और
IMG_20190207_142920.jpg

आज आम्हाला तिब्ब स्थित गुहांपर्यंत चालत जायचे होते. एकूण अंतर अंदाजे १५ किमी होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर खरा ट्रेक आज चालू होणार होता. त्यात हा पडणारा बर्फ. म्हणजे जरा टेन्शन आले होते की आता कसं काय होईल वगैरे. पण चालत असतानाच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ताज्या पडलेल्या बर्फ़ावर चालताना अजिबात घसरायला होत नाहीये. शिवाय साधारण तास दोन तासात बर्फ पडायचा देखील थांबला त्यामुळे सुरुवातीस चाचपडत चालणारी कालची ती काही मंडळी परत एकदा जोरात चालू लागलेली. दोन माणसांच्या अंतर पडले की काही वेळा पुढचा नक्की कुठून गेला, तिकडे निसरडे होतं का काही कळायला मार्ग नसे. पुढचे खूप पुढे गेले की त्यांना शिट्ट्या वाजवून थांबायला सांगितले जाई मग असे (मागचे येईपर्यंत) थांबले की त्या वेळी गार वाऱ्यामुळं जीव नको नको व्हायचं. मग ईश्वरने रीतसर त्या विशिष्ठ प्रकारची शिट्टी वगैरे वाजवून सर्वाना एकत्रित केले आणि ज्या कोणाला जोरात चालायला जमत नव्हते त्यांना सगळ्यात पुढे राहायला सांगितले. त्याच बरोबर पुढच्या गाईडला मागे आणि मागच्या गाईडला पुढे चालायला सांगितले.

पाऊले चालती बर्फातली वाट
IMG_20190207_125633.jpg

त्याने घेतलेला हा निर्णय अत्यंत सुयोग्य ठरला. आपोआपच सगळ्यांचे चालणे सावकाश पण न थांबता एका लयीत होवू लागले. चालताना सगळे जवळपास राहू लागले त्यामुळे एकमेकांना म्हणजे आपापल्या मागच्यांना रस्त्याबद्दल सावध करणे जमू लागले. वाटेत काही ठिकाणी घोट्याएवढे तर काही ठिकाणी त्याहून थोडे जास्त पाणी होते खरेतर पाणी असे नाही पण चुरलेला बर्फ ज्यातून चालताना पाय रुतत होते आणि ते ही घोट्यापर्यंत. पण त्यातूनही आम्ही सगळ्यांनीच व्यवस्थित मार्ग काढला. अशा ठिकाणे पडलं तर लागले नाही तरी ओले होण्याची भीती जास्त. त्या हवेत ओले होणे हे जास्त खतरनाक. अशा वेळी ओले कपडे बदलून लवकरात लवकर सुके कपडे अंगावर चढवले नाहीत तर हायपोथर्मिया होण्याची भीती असते. त्यामुळे पुढचे मागचे गाईड आमच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून होते. मात्र आजही पडण्याची परंपरा सर्वानीच चालू ठेवली होती. काही काही वेळा घसरण्याची नुसती हूल मिळायची म्हणजे पाय थोडासा सरकायचा पण त्यावेळेही हृदयाची धडधड आपली आपल्याला ऐकू येईल इतकी वाढत असे. नंतर नंतर तर मला वाटायला लागले होते की ह्या पेक्षा पडलेले बरे Wink पण असं झालं की मोठा श्वास घ्यायचा आणि पुढे चालत राहायचे. अर्थात असे प्रसंग वारंवार निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाटेत दिसणारी अप्रतिम दृष्ये. काही ठिकाणी छोट्या गुहा कपारी दिसत होत्या त्याशिवाय अनेक छोटे छोटे गोठलेले धबधबे पाहून मन हरखून जात होते आणि नेरकचा, शेवटच्या ठिकाणचा धबधबा कसा असेल ह्याचे उत्कंठा वाढली जाई.

गोठलेले छोटे धबधबे १
IMG_20190207_095134.jpg

गोठलेले छोटे धबधबे २
IMG_20190207_100245.jpg

गोठलेले छोटे धबधबे ३
IMG_20190207_140916.jpg

गोठलेले छोटे धबधबे ४
IMG_20190207_141109.jpg

अखेरीस सुरु केल्यानंतर पाचेक तासांनी आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो अर्थात हा लागलेला वेळ, वाटेत ठिकठिकाणी थांबत दुपारचे जेवणखाण करून मजल दरमजल प्रकारे वाटचाल केल्यामुळे लागला होता. पोचल्यावर कुठे आहेत तिब्ब च्या गुहा म्हणून विचारणा केली असता आपण त्या ओलांडून साधारण अर्धा किमी पुढे आलो आहोत असे कळले. आज आम्ही पोचलो तर सगळे तंबू ठोकून झाले नव्हते मग परत जाताना तिब्ब च्या गुहा नक्की दाखवा असे बजावून आम्ही आमचा निळा तंबू ठोकायला आणि सामानातून स्लीपिंग बॅग्स आणायला जरा मदत केली. सामान आत लावले. आपापल्या तंबूत शिरलो. अंघोळ केली. घाबरू नका पाण्याने नव्हे अँटीफंगल पावडरीने अंग माखून घेणे हीच अंघोळ. कपडे बदलले. जरा वेळाने एकत्र जमून गुळपोळी खायचा कार्यक्रम आजही पार पाडला. त्या हवेत गुळपोळी इतकी हिट्ट ठरली की एरवी फार गोड न खाणाऱ्या अरण्याने देखील आपल्या वाटची गुळपोळी इतर कोणाला द्यायला नकार देण्यास सुरुवात केली. माझ्याकरता ही फारच आश्चर्यजनक बाब होती. परत थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर बाहेर पडून जेवायच्या तंबूत एकत्र जमलो. गप्पा टप्पा वाढीव ओळखी करून घेणे असं सगळं चालू होते. गारठ्यामुळे बाहेरून कोणी आले की लगेच तंबुची झडप बंद करायला सांगितले जाई. काही ना करता एका जागी थांबल्यावर थंडी जास्तच वाजते. मग त्यावर उतारा म्हणून माशा किचन टेंट मध्ये पोळ्या शेकायला गेली. किचन टेंट कायमच उबदार असे. इतक्या सगळ्यांचा नाश्ता, स्वयंपाक, गरम पाणी ह्यामुळे एक स्टोव्ह सतत चालू असेच.

जेवायला बसायच्या आधीच परत एकदा हिमवर्षाव चालू झाला. वातावरण नाही म्हटले तरी एकदम गंभीर. कोण काय म्हणे तर कोण काय. ह्या हिमवर्षावाचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता, अजून दोन दिवस बर्फ पडणार आहे. असाच बर्फ पडत राहिला तर काही खरं नाही. हिमस्खलन होऊ शकते जास्त बर्फ पडल्यामुळे चादरीवरचे वजन वाढून ती तुटण्याची शक्यता असते. कुठे तुटल्ये हे ही ताज्या बर्फामुळे नीट दिसत नाही अशा काय काय संभाव्य गोष्टी लक्षात घेता उद्या परतही फिरावे लागेल ह्याची मानसिक तयारी करून ठेवा म्हणून सांगितले गेले. अर्थात ईश्वरने होता होईल तो नेरक पर्यंत जाण्याचे संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील आणि आमच्या स्थानिक वाटाड्यापाशी सल्ला मसलत करून काय ते ठरवण्यात येईल हे ही सांगितले. इतक्या दूरवर आल्यावर हातातोंडाशी आलेला घास न खाताच परत फिरावे लागते की काय ह्या शंकेने मन पोखरू लागले. लेहमध्ये भेटलेले मुंबईचे जोडपे ज्यांनाही शेवट पर्यंत जाता आले नव्हते ते आठवले. असं सगळं वातावरण उदास झालं असताना झोपायकरता तंबूत शिरलो आणि म्हटले जे होईल ते सकाळी पाहू.

शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक ५
https://www.maayboli.com/node/69736

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय हाही भाग, फोटो कातिल आहेत..
एक मात्र खरं, हे प्रकरण मला झेपेलस वाटत नाही, येथे वाचून आनंद घेईन Happy

खिळवून ठेवले तुमच्या वर्णन शैलीने. एक क्षणही लेख वाचण्याचे थांबवले नाही. अराराराssssरा खतरनाक .... लय भारी

निव्वळ अप्रतिम वर्णन करत आहात तुम्ही.
फोटो तर भारीच पण सुंदर नाही म्हणनार. अशी करडी पांढरी रंगसंगती पाहुन वेड लागेल मला. सगळे फोटो पाहिल्यावर टेंटचे पिवळा आणि निळा रंग किती मोहक वाटायला लागले.
खिडकीतुन पाऊस पहावा तसे घरी अॉफिसमध्ये बसुन हिमालय पाहतो आहे तुमच्यासोबत.
सुंदर लेखमाला.

रक्तामध्ये, ह्या ट्रेकसाठी प्राणवायूचे प्रमाण किती हवे असते?
वाचते आहे. पांढरे, पांढरे गार गालिचे ( शब्दशः) दिसत आहेत इकडे तिकडे चोहीकडे!

धन्यवाद मऊमाऊ, शैलजा, प्राचीन, सोनाली ०४, शाली, सस्मित, अनघा, दत्तात्रय, किल्ली

शैलजा - पल्स ऑक्सिमिटरव्दारे तपासले असता दिसणारा आकडा किमान ९० किंवा त्याच्यावर असायला हवा.
शाली - मी पण इकडेच आहे ह्या उन्हाळ्यात. मलाही त्या फोटोंकडे नुसते पाहूनही गारेगार वाटतंय. Happy

सुरूवातीपासून सगळे भाग वाचले पण प्रतिसाद आता देतेय. तुमची लेखनशैली आणि सुंदर प्रचि यामुळे वाचताना मीच ट्रेक अनुभवतेय असं वाटलं.
पुभाप्र.

व्वा! सुरेख ! हर्पेन, फोटो बरोबर लेख पण रंगतदार बनत आहे. छोटे धबधबे काय गोग्गोड दिसतायत. २ रा व तिसरा फोटो ( मार्ग क्रमतांना ) हिमालयाची भव्यता दाखवुन देतो. साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची हे गाणे आठवले.

वा… काय अनुभव असेल हा!!! सुंदर फोटो पुन्हा एकदा. डायपर्स घेण्याचा सल्ला मिळाला नव्हता का? निदान छोट्या हाकेसाठी? अर्थात ते डायपर टाकायचे कुठे म्हणा.

मागच्या भागापर्यंत थोडी धुगधुगती आशा होती की कदाचीत मी पण हा ट्रेक करू शकेन. या भागाने ती पूर्णपणे मावळली Happy भर बर्फात कपडे बदलायचे? कल्पनेनेच हुडहुडी भरली. extreme adventure आहे हे Happy

गोठलेला छोटा धबधबा क्र. १ : सुंदर फोटो! बाकी फोटोही झकासच! मालिका अ१ !

कसला भारी चाललाय ट्रेक ...खडतर आहे खरंच पण मला इतकी इच्छा होतेय हा ट्रेक करायची ...
काय अप्रतिम फोटो आहेत सगळे !!
गोठलेल्या धबधब्याच्या निळ्या छटेचा रंग किती सुंदर आहे .. मोहक आहे खरंच! .. ते पाण्यावर तरंगणाऱ्या हिमनगाचा असतो तसा दिसतोय ..
आजूबाजूच्या बारीक धारा गोठल्यावर स्पाईक सारख्या दिसताहेत ..लवणस्तंभ असतात तसे .. भारी एकदम

रक्तामध्ये, ह्या ट्रेकसाठी प्राणवायूचे प्रमाण हव्या त्या पातळीत राहण्यासाठी काही उपाय नाही का ? प्राणायाम वगैरे सारखं काहीतरी ?
साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची हे गाणे आठवले.>> अगदी मलाही ..
हा ट्रेक २०२० नंतर भारत सरकार बंद करणार आहे असं वाचलं ते खरं असेल का ?
मस्त चाललीये मालिका .. पुभाप्र

धन्यवाद किट्टु२१, रश्मी.., मित, सुनिधी, माधव, अन्जली, वावे
सुनिधी, डायपर्स... रियली? बिग नो Happy

माधव - जर पाण्यात पडून भिजलो तर बर्फात कपडे बदलायचे ते ही आजारी पडू नये म्हणून. इट्स नॉट अ रुटीन. मी केला तर कोणीही ह ट्रेक करु शकेल.

रक्तामध्ये, ह्या ट्रेकसाठी प्राणवायूचे प्रमाण हव्या त्या पातळीत राहण्यासाठी काही उपाय नाही का ? प्राणायाम वगैरे सारखं काहीतरी ? >>> हो प्राणायामाने नक्कीच फायदा होतो (अंगात ऊब राखायलाही). प्राणवायुची किमान पातळी राखायला तर निव्वळ दीर्घ श्वसनाने ही फायदा होतो.

हा ट्रेक २०२० नंतर भारत सरकार बंद करणार आहे असं वाचलं ते खरं असेल का ? >>> मला तरी नाही वाटत तसे. कारण याच वर्षीपासून आता बरेच नॉर्म्स लागू केले आहेत. ट्रेकर्सची सुरक्षितता आणि पर्यावरणा चे संरक्षण ह्या करता वाढीव निधी घेतला जातोय. त्या च्या मुळे हा ट्रेक बंद होईल असे वाटत नाही. कारण नाही म्हटले तरी ह्या ट्रेक मुळे हंगाम नसतानाही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय.

या उन्हाच्या तल्खलीत बर्फाचे फोटो बघूनही गारगार वाटतं आहे - वावे, अगदी खरे Happy