भाग २
https://www.maayboli.com/node/69486
भाग ३ चालू
दिवस चौथा
जिसका मुझे था इंतजार, वो घडी आ गयी (अशी ओळ वगैरे लिहिणं म्हणजे किती गरीब ना कल्पना दारिद्र्यच एकदम )
सकाळची आन्हिके आटोपली. आज ट्रेक सुरु होण्यापूर्वीचा हॉटेलातील शेवटचा दिवस त्यामुळे उद्यापासून कुठले टॉयलेट आणि कुठले वॉश बेसिन असा विचार मनात आलाच. काही जणांना वाटत होते ह्या खोल्या आता आपल्याच आहेत आणि आपण ट्रेक करून परत येईपर्यंत आपापले सामान खोल्यांमधे तसेच राहू द्यावे. पण निघायच्या आधी खोल्या रिकाम्या करणे गरजेचे होते कारण आम्ही ट्रेक करत असताना त्या दुसऱ्यांना वापरायला देणे शक्य व्हावे. शिवाय परतल्यावर ह्याच खोल्या तर जाऊ देत पण ह्याच हॉटेलात रहायचे की कसे हे ही नक्की नव्हते. त्यामुळे लेह मध्ये ठेवायचे सामान आयोजकांकडे सुपूर्त केले. ते आमच्या म्हणजे वरच्याच मजल्यावर ठेवायचे असल्याने, बरीच मंडळी आपापले बोजे वर घेऊन येताना कुरुकुरुती झाली. त्यांना लगेच बघा आम्ही तर रोजच असं वर खाली करतोय वगैरे म्हणून भाव खाऊन झालं. रोज म्हणजे काय तर आल्यापासून रोज म्हणजेच फक्त दोन-तीन दिवस :p . वरच्या मजल्यावर राहण्याचा आणिक एक फायदा हा झाला की काही खालच्या मजल्यावरच्या लोकांना पाणी गोठल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबण्याचा आणि खोल्यामध्ये ओल जाणवण्याचा अनुभव आला तो आम्हाला कधीच आला नाही. वरचा मजला आणि दोन बाजूंना खिडक्या असल्याने जेव्हा केव्हा ऊन पडत असे तेव्हा खोल्या उबदार होत असत, ओलावा नाहीसा होत असे म्हणजे आम्हाला तो जाणवलाच नाही. (अर्थात हे सगळे बाकीच्यांशी बोलल्यानंतर कळले.) तर प्रचंड खटाटोप केल्यानंतर, लेह मधे ठेवायचे सामान वर आणि बरोबर न्यायाचे सामान खाली अशी विभागणी करून झाल्यावर खाली डायनिंग हॉल मध्ये नाश्ता करायला जमलो. मला फारशी भूक नव्हती आणि पोह्याकरता दीडशे रुपये द्यायचे जीवावर आले होते त्यामुळे मी फक्त बरोबर आणलेल्यातले काही पदार्थ बिस्किटे वगैरे खाल्ले. न्याहारी आटोपून डायनिंग हॉल मधून बाहेर येतोय न येतोय तोवर आम्हाला न्यायला गाड्या येऊन थांबलेल्या दिसल्या. एकूण तीन गाड्या होत्या, त्यातल्या दोन आम्हा ट्रेकर्स करता आणि एक गाडी आमचे सगळ्यांचे तंबू, स्लीपिंग बॅग्स, जेवण खाण्याबनवण्याचे सामान, काही पोर्टर्स इत्यादी वाहून नेण्याकरता अशी योजना होती. मग सामान चढवले सगळी माणसे बस मधे बसली आहेत ना हे तपासले गेले आणि मग गणपती बाप्पा मोरया चा गजर करून निघालो आमच्या बस मध्ये चिंतामणी, प्रथमेश आणि काही मुंबईकर मंडळी असल्याने मोरया चा आवाज जोरदार होता. आज आम्हाला अंदाजे ७० किमी अंतर बसने पार करायचं होतं आणि मग तिलाद डो ह्या ठिकाणापासून आमचा ट्रेक चालू होणार होता.
निघाल्यानंतर थोडेच अंतर पार केल्यावर एका ठिकाणी काही मुले बर्फ़ावरती हॉकी खेळताना दिसली. आम्हाला दोन दिवसांमागे भेटलेल्या ताशी आणि अंगशुक यांनी सांगितले होते त्याची आठवण झाली. सध्या बरीच मुले हा खेळ खेळायला पुढे येत आहेत आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांना ह्या खर्चिक खेळाकरता साधन सामग्री पुरवण्यात येत आहे शिवाय काही पुरस्कर्ते देखील पुढे येताना दिसत आहेत. लवकरच आपला देश ह्या खेळात हिवाळी ऑलिम्पिकमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे. परत एकदा चरचरून जाणवले की आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही पण सुयोग्य संधी आणि व्यापक दृष्टिकोन हवा.
मी, ताशी आणि अंगशुक सोबत
लडाख मध्ये फिरायला येणाऱ्या लोकांमधे आवडत्या असलेल्या पत्थर साहिब नावाचे गुरुद्वार, मॅग्नेटिक हिल, सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम अशा अनेक स्थळांचा समावेश आमच्या ट्रेक करता जायच्या मार्गावर असणार होता तरीपण वेळेअभावी आम्ही कुठंही थांबलो नाही. गुरुद्वारात प्रवेश करताना पाय धुवावे लागतात त्यामुळे ईश्वरने बाकी कुठे नाही थांबता येणार गुरुद्वाऱयापाशी थांबायचे असे तर थांबू असे मुद्दाम सुचवले जे अर्थातच सर्वांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. केवळ एका ठिकाणी आमच्या सगळ्यांना दिलेले आयकार्ड तपासणी करता आणि बरोबरच्या सर्व पोर्टर लोकांची नोंदणी करण्याकरता थांबलो होतो. गाडीत एका जागी बसून परत जास्त थंडी वाजायला लागली होती. मग खाली उतरून फोटो सेशन उरकले. फोटो काढायला लागताच जे न उतरणारे होते ते ही बस मधून उतरते झाले. एका बाजूला बाहेर दिसणारे नयनरम्य नजारे तर दुसरीकडे अशक्य बोचरी थंड हवा. त्यावेळी नाही म्हटले तरी परत एकदा इकडे यायचा निर्णय घेतला ते चूक तर नाही ना ठरणार असा विचार मनात येऊ घातला होता मग परत एकदा कोण ते ज्याच्यामुळे इकडे यायचा निर्णय घेतला असा विषय निघाला आणि परत एकदा माझ्यावर बिल फाटले. पण अर्थात त्यावेळी एकामेकांना आपण इथे कोणामुळे आलो हे सांगताना आपल्या इतकेच टेन्शन समोरच्यालाही आले आहे हे जाणवून आम्हा सगळ्याच जणांना जे काही हसू आले त्यामुळे अंगात जरा ऊब आली. बघता बघता पहिल्यांदा गुरुद्वारा गेले मॅग्नेटिक हिल तर गेल्यावर पत्ता लागला मग रस्ता बऱ्याच वळणावळणाचा असल्याने सिंधू आणि झंस्कार संगम मात्र बराच काळ दिसत राहिला. त्याच सुमारास कधीतरी थोड्याच वेळात आम्ही लेह श्रीनगर हमरस्ता सोडला आणि जरा अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमणा चालू झाली. आता रस्ताही नदीच्या काठाकाठाने जाणारा होता. पण रस्ता फारच वर तर नदी पार खाली दरीतून वाहत होती. रस्ता अरुंद होता आणि अचानक एका ठिकाणी भूस्खलन झालेले आढळले अर्थात पुढे जायचा रस्ता बंद झालेला होता. हे किती वेळापूर्वी झाले ते कळायला मार्ग नव्हता पण तिथला राडारोडा हटवायला जे सि बी हजर होता. आम्ही बस मधून उतरून एखादा फोटो काढतोय ना काढतोय तोवर रस्ता मोकळा झाला देखील. ह्या भागातले सगळे रस्ते, महामार्ग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने तयार केलेले आहेत आणि त्यांची डागडुजी देखील त्यांच्यातर्फेच होते. पडलेला बर्फ जास्त झाला असता तो बाजूला करणे, हिमस्खलन, भूस्खलन होता राडारोडा बाजूला करणे ई. सर्व कामे ह्या कडक भर हिवाळ्यात ही चालू असतात. रारंगढांग पुस्तकाची आठवण झाली. सिव्हील इंजिनियर होताना कधीकाळी मी देखील अशा ठिकाणी काम करायला मिळेल अशी स्वप्ने पाहिली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर BRO मधे नोकरीकरता अर्ज केला होता त्याची आठवण झाली. निसर्ग जितका सुंदर तितका खडतर हे सूत्र इथेही लागू होतच होते. इतकं खडतर जीवन आपल्याला झेपलं असतं का असा विचार मनात आलाच.
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे १
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे २
पुढचा प्रवास चालू झाला. गोठलेलं नदीपात्र दिसायला सुरु झाले होते, राखाडी डोंगर, गोठल्या नदीचा पांढरा शुभ्र मधेच वाहत्या पाण्याचा पट्टा वेगळ्या रंगामुळे उठून दिसत होता आणि आता आपली चालण्याची वेळ अगदी जवळ येत आहे असं जाणवायला लागले. अखेर एका ठिकाणी आमच्या गाड्या थांबल्याच. तिलाड दो म्हणजे काही गाव / वस्ती असेल असे वाटलेले पण तशी काही खूण जवळपास दिसली नाही. आम्ही बहुदा त्या गावाच्या हद्दीत पण गावाबाहेर थांबलो असणार. आम्ही जिथे उतरलो त्या काठाच्या बाजूचा खूप मोठा पट्टा गोठलेला होता. राखी करड्या दगडमाती च्या मधेच असलेला पांढरा शुभ्र पट्टा उठून दिसत होता. तिथून गोठलेल्या नदीपात्रात जाण्याकरता दोन-अडीच मजल्याइतकं अंतर उतरून जायचे होते. आणि मग अखेरीस आम्ही सगळे त्या गोठलेल्या नदीपात्रात उतरलो. सगळ्यांचे चेहरे उजळले होते घर सोडून तब्बल ३-४ दिवस लेह घालवल्यावर, लेहमधील वैद्यकीय तपासणी / चाळणी मधून सही सलामत पास झाल्यावर आज कुठे प्रत्यक्ष ट्रेक चालू होणार होता. उतरता उतरताच सगळे जण खोंडासारखे उधळले. आधीच लडाख भागातले सृष्टी सौंदर्य अलौकिक त्यात मी आता गोठलेल्या नदीपात्रात होतो. दोन्ही बाजूला उंच असे डोंगर, मधे गोठलेले नदीपात्र त्यात आणि परत वाहत्या पाण्याचा रंग रस्त्यावरून दिसत होता त्यापेक्षा अजूनच वेगळ्या छटेचा भासत होता. अगदी अद्भुत रम्य वातावरण होते आणि काळावेळाचे भान हरपून जायला झाले, मन दूर कुठे तरी जाऊन पोचले, तंद्री लागली. किती वेळ गेला माहीत नाही भान आले ते मित्रांच्या आरड्याओरड्याने अक्षयने मून वॉक चालू केला होता आणि सगळे त्याला चीअर करत होते. अक्षय मूनवॉक काय भारी करत होता आणि तेही अगदी विनासायास. मग थोडी भीड चेपली जाऊन आम्ही इतर मंडळींनी देखील थोडा प्रयत्न करून बघितला तर जमल्यासारखे वाटले. पण लगेच मनात विचार आला जास्त नको करायला उगाच पहिल्याच दिवशी पडायला व्हायचं त्यामुळे मग आवरते घेतले. थोडा वेळ गेल्यावर आम्हाला एकत्र जमा व्ह्यायला सांगण्यात आले आणि आम्हाला आमच्या ट्रेकगाईडस ची ओळख करून देण्यात आली. आमच्या दोन्ही गटासोबत प्रत्येकी दोन गाईड असणार होते एक जण सुरुवातीला राहून लीड करणार तर दुसरा सगळ्यात शेवटच्या माणसासोबत राहून सगळ्यांना घेऊन येणार. आमच्या बरोबर येणार असणारे गाईड डोडूल आणि अमीन नावाचे होते. त्यांनी आमची बर्फावर कसे चालायचे ह्याची शिकवणी घेतली. लांब ढांगा टाकायच्या नाहीत, पाय जवळजवळ टाकायचे, जास्त उचलायचे नाहीत आणि जमिनीला समांतर म्हणजे खरंतर बर्फ़ावर पाय घासतच चालायचे वगैरे वगैरे. ही शिकवणी झाल्यावर आम्ही सगळे फुरफुरत निघालोच होतो की आम्हाला सांगण्यातले की आधी जेवून मग निघायचे आहे. आज फार कमी अंतर चालायचे असल्याने आणि पहिलाच दिवस असल्याने हे अंतर सावकाश काटायचे आहे हे ही सांगण्यात आले. मग स्वयंपाक बनत असल्या कारणाने आम्ही नुसतेच इकडे तिकडे टिवल्या बावल्या करत फिरत असताना अर्पितने पडायची बोहोनी केलीच.
स्वयंपाक तयार झाला त्यावेळी आम्ही बहुतेक सर्व जण सुरुवातीचा उत्साह ओसरून काठावरच्या दगडांवर येऊन बसलो होतो. एका ठिकाणी थांबल्यावर लागणारे वारे टाळण्याकरता राजाने एका मोठ्या दगडाचा आडोसा शोधून काढला होता तिथं बसून राहिलेलो असताना जेवण वाढण्यात आले म्हणजे प्रत्येकाला एका खोलगट ताटलीत वाढून जाग्यावर आणून देत होते. एकच ताटली होती त्यामुळे हा नाश्ता आहे की काय असे काही जणांना वाटले तर उलगडा झाला की हे वन डिश मिल होते. त्यामुळे आम्हे सर्वानी हेच भरपेट खाणे अपेक्षित होते. त्यादिवसापासून एक वाक्य ट्रेक संपेपर्यंत कानी पडत राहिले ते म्हणजे दबादबाके खाओ आणि दबादबाके चलो. आमचे स्वैपाकी हेच एरवी पोर्टर म्हणूनही काम करत असत. त्यामुळे आमच्या मागून निघून पुढच्या मुक्कामी आमच्या आधी पोहोचताना वाटेत आम्हाला ओलांडून जात असताना ते म्हणत दबादबाके चलो आणि जेवण वाढताना घरचे घेणार नाहीत इतकी काळजी घेऊन आग्रह करकरून म्हणत दबादबाके खाओ. हे इतकं प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले की ह्या आरोळ्या नंतर पुरा ट्रेकभर आमच्यातल्या कोणाच्याही तोंडून वेळीअवेळी ऐकू यायला लागल्या.
तर सरते शेवटी जेवणखाण झाल्यावर सगळे चंबूगबाळे आवरून आम्ही मार्गस्थ झालो. निघण्यापूर्वी सूचनांची उजळणी झाली. सुरुवातीस असलेल्या गाईडला ओलांडून पुढे कुणी जायचे नाही, एकमेकांमध्ये योग्य तितके (म्हणजे आपल्या समोरचा घसरून पडलाच तर त्यामुळे आपण पडणार नाही इतके) अंतर तर ठेवायचे पण जास्त गॅप पडू द्यायची नाही वगैरे वगैरे. ईश्वर ने बरोबर काही शिट्ट्या आणल्या होत्या त्यापैकी एक माझ्या वाट्याला आली. मला वाटले अशी शिट्टी सगळ्यांनाच देताहेत की काय पण तसे नव्हते. पुढच्या आणि मागच्या गाईडकडे एकेक, ईश्वरकडे एक आणि मधल्या दोघांकडे एकेक. आम्हाला शिट्टी वाजवण्याचे रीतसर ट्रेनिंग देण्यात आले. निघा सांगायला, थांबा सांगायला, मदत हवी आहे सांगायला अशा खूणा ठरवण्यात आल्या. वाटेत काही झाले तरी पुढच्या आणि मागच्या भिडूमधे जास्त अंतर पडता कामा नये. जर का अंतर वाढायला लागले तर शिट्टी वाजवायची अशा कायकाय सूचना देऊन झाल्यावर अखेर एकदाचे आम्ही चालू पडलो.
वाटेत दिसलेले बर्फाचे नानाविध नमुने
नमुना १
नमुना २
नमुना ३
नमुना ४
मला शिट्टी दिल्यामुळे मध्यातच राहून मार्गक्रमणा करायची सूचना होती. उत्साहाच्या भरात पुढचा गाईड आणि त्याच्या बरोबरचे अक्षय, अपराजिता, सागर वगैरे मंडळी जोरजोरात चालत होती. मग काय बऱ्याच जणांची दमछाक होवू लागली. शिवाय मागची मंडळी येईपर्यंत पुढच्या मंडळींना एका जागी थांबावे लागत होते त्यावेळी चालणे थांबवल्यामुळे हवेतला गारवा अचानक जास्त जाणवत असे. पण असे करता करता आमची मुक्कामाची जागा म्हणजे एकदम येऊनच ठेपली. त्या जागेचे नाव शिंगरा कोमा. लक्षात राहे पर्यंत मी त्याला शिरकुरमा म्हणत होतो. आज तसेही चालायचे अंतर फार जास्त नव्हते त्यामुळे तशी दमछाक झाली नाही / थकवा जाणवला नाही. तिथे कॅम्प वर पोचल्यावर प्रत्येकाला तंबू वाटून देण्यात आले. एकेका तंबूत २ किंवा ३ जण राहतील अशा प्रकारे योजना केलेली होती. आम्ही एकूण चार जण सोबत आलो असलो आणि लेह मध्ये एकाच खोलीत राहत असलो तरी इथे तसे होणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही दोन तंबूत प्रत्येकी दोघे असे राहायचे ठरवले. त्याप्रमाणे मी आणि अरुण एका तंबूत राहायचे ठरले. दुसऱ्या एका तंबूत राजा आणि संदीप राहणार होते. आपापला तंबू ताब्यात घेतला. निळ्या रंगाचा एकमेव तंबू आम्हाला मिळाला होता. हा तंबू इतर दोनजणांकरता असलेल्या तंबूच्या मानाने जरा मोठा होता त्यामुळे उघड्यावर गारठ्यात भेटायच्या ऐवजी गप्पा मारायला म्हणून राजा आणि संदीप देखील आमच्या तंबूत आले आणि मग बरोबर आणलेले खायचे सामान रोज खाऊन संपवले नाही तर तसेच राहते त्यामुळे ते खायला सुरु केले.
तंबुतली खादाडी
चितळ्यांच्या गूळपोळीचे रेशनिंग करायला सुरुवात पहिल्याच दिवसापासून झाली. खाणे उरकल्या नंतर तंबूतून बाहेर पडलो असता इकडे तिकडे करत असताना कळले की आज ही एक वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि ते ठिकाण अजून थोडे पुढे आहे निदान अर्धा किमी तरी असेल. तिथे जायला म्हणून निघालो असता, लगेचच तिकडून परत आलेली मंडळी भेटली त्यांनी सांगितले की आता थोडा वेळ तपासणी बंद केली असून परत काही वेळानंतर तपासण्याचे काम चालू होईल मग काय आम्ही आपले परत पावली आलो आणि डायनिंग तंबूत थोडा टाईमपास केला.
एक मजा सांगायचीच राहिली. मुक्कामाची जागा अगदी जवळ आली असतानाच सोबत येऊन ठेपलेल्या अर्पितची विचारपूस करत होतो की तो अगदी सुरुवातीलाच पडला होता तर त्याला जास्त काही लागलं नाहीये ना वगैरे तर त्याने काय सांगावे; तो त्यानंतर एकूण पाच वेळा पडला पण सुदैवाने त्याला फार काही लागले नाही. मी विचार करताच होतो बर झालं आपला निदान पहिला दिवस तरी बिन पडता गेला असा विचार करून झाला नाही झाला तोच मी ही घसरलो आणि डावे कोपर बर्फावर आपटले. ईश्वर जवळच होता त्याने मला, बखोटं धरतात तशी माझी सॅक धरून उठवले. उठवत असताना एक प्रात्यक्षिकच दिले कोणी पडले असता त्याला उठवायला जाताना स्वतःला ना घसरवता समोरच्याला कसे उठवावे. पण त्यामुळे आम्हा चौघात सगळ्यात पहिल्यांदा पडण्याचा मान मला मिळाला
जेव्हा वैद्यकीय तपासणी करता म्हणून गेलो तेव्हा आम्हाला लेहला वैद्यकीय तपासणीच्या वेळी भेटलेली काही मंडळी परत एकदा भेटली. तो एक कबिलाच होता एक कुटुंबकबिला. तो पूर्णच्यापूर्ण गट म्हणजे बहुतेक सर्व एकाच कुटुंबातले आणि उरलेले काही त्यांचे मित्र होत. जे बरेचदा असे ट्रेक करतात. त्याशिवाय जे विमा योजना राबवताहेत त्या कंपनीचे एकजण तिथे भेटले. तिकडे आत जायच्या आधी जनरल गप्पा चालू असताना आम्हाला विचारण्यात आले की महाराष्ट्रातून कोण कोण आलंय आम्ही आपले खूष होऊन हात वर करणारच होतो (कारण सहा जण तर पुण्याहून गेलो होतो तीन चार मुंबईचे होते ) तर त्यांनी सांगितले ह्या वर्षीच्या हंगामात हाड मोडलेली सर्वात जास्त माणसे महाराष्ट्राची होती आणि तेही मुंबईची त्यामुळे त्यांनी काळजी घा. तेव्हा ईश्वर किंवा अर्पित सोबत नव्हते त्यामुळे मग मी ही आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागलो. वैद्यकीय तपासणी देखील एका तंबूतच होत होती. आत जातो तर जे डॉक्टर तिथे होते ते मराठी निघाले नागपूरचे डॉ. वाईकर म्हणून. नागपूर चे म्हटल्यावर त्यांना उर्दू भाषेचे सुप्रसिद्ध अभ्यासक आणि आस्वादक डॉ. विनय वाईकरांबद्दल विचारले तर हे त्यांचे पुतणे निघाले. बाकीच्या लोकांना तपासायचे असल्याने फार काही बोलता आले नाही पण मला डॉ विनय वाईकर माहीत आहेत हे पाहून ह्यांना बरे वाटल्याचे जाणवले. सुदैवाने वैद्यकीय तपासणीत माझ्यात आणि बाकी कोणाच्यातही कसलीही कमतरता आढळली नाही आणि मग परत कॅम्प वर आलो.
आमच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून घेतलेला फोटो दूर उजव्या कोपर्यात ठिपके दिसत आहेत तिथे बाकीचे कँप्स आणि वैद्यकीय तपासणीचे ठिकाण आहे.
कॅम्पची जागा बाकीच्या लोकांनी कॅम्प ठोकले होते त्यापासून जरा दूर होती पण त्यामुळे आमच्या समोर दिसणारा नजारा अप्रतिम होता. तो स्पॉट निवडायचे अजून एक कारण ईश्वरकडून कळले की तिकडे तंबू टोकले असता रात्री जोरात वाहणारे वारे मागच्या टेकाडामुळे अडले जातात. पण म्हणून ते ठिकाण निवडलं होतं तिथे जरा मागे बघितले तर भीती वाटावी अशी परिस्थिती होती. खालच्या बाजूचा एखादा दगड निखळला तर वरचे सगळे दगड किंबहुना आख्खा ढीगच्या ढीग ढासळेल अशी परिस्थिती होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सगळे जमले होते तिकडे डायनिंग टेंट मध्ये जमलो.
राजा त्याच्या तंबुच्या तोंडाशी, मागे डायनिंग टेंट.
पाणी आणताना आमचे मदतनीस
जेवण बनवून होईपर्यंत जरा अंताक्षरी खेळलो. मग दबादबाके जेवलो आणि आपापल्या तंबूत येऊन झोपलो. परत एकदा हे दोन ओळीत आटोपले पण भरपूर मोठं काम आहे हे तंबूत येऊन झोपायचे म्हणजे. कितीही जिवाभावाचे मित्र असाल तरी ते काम कोणी करायचे यावरून भांडण होऊ शकते इतकं अवघड काम. सुदैवाने मला टेंटमेट म्हणून अरण्या लाभला असल्यामुळे सगळे सुरळीत पार पडले.
तंबूत आत शिरताना एक चेन बाहेरच्या झापडाची आणि दोन चेन आतल्या झापडाच्या उघडायला लागायच्या अर्थातच आत गेल्यावर बंदही करायला लागायच्या त्याआधी पायातले बूट काढणे हे ही मोठे काम. गमबूट एकमेकात खुपसून त्यात पाणी प्राणी असं काहीही जाणार नाही याची तजवीज करायची. झोपायकरता दोन स्लीपिंग बॅग दिलेल्या होत्या त्या एकात एक अशा ठेवलेल्या असतील तर फारच छान नाहीतर त्या तशा एकात एक घालायच्या मग त्यात स्वतःला अर्धे घुसवायचे आपली मर्मेड झाली की मग उरलेला भाग अंगाभोवती लपेटून घेऊन आडवे व्हायचे आणि त्या दोन्हीं स्लीपिंग बॅगच्या एकावेळी एक अशा प्रकारे चेन्स वर ओढून घ्यायच्या अर्थात मग एक ओढताना दुसरी चेन उघडली जाणे वगैरे प्रकार घडतातच. तर असं खूप काम करून मग दमायला होतं तेव्हा कुठे जाऊन झोपायला मिळतं पण तेही कसं तर शवपेटीत पडून राहावे तसे. कुशीवर वळता येत नाही. हात पाय हलवता येत नाही चेहऱ्याच्या कुठल्याही भागाला खाज सुटली तर येणारी मजा अजूनच वेगळी. इतकं सगळं करून झाले की जाणवते आपल्याला काहीतरी टोचतंय; अंगाखाली कुठेतरी बारीकसा उंचवटा गेलाबाजार छोटासा खडा वगैरे आहे, पण ह्यातच खरी मजा आहे. थंडीमुळे झोप फार गाढ अशी लागत नाही पण एक मात्र खरे उठल्यावर मरगळ वगैरे कधीच वाटत नाही त्यामुळे झोप लागत नाही म्हणून काळजीत पडलेल्या माझ्या मित्रांना मी माझी थियरी सांगितली ती म्हणजे आपल्याला त्या वातावरणात कमी विश्रांती पुरते. तर अशा रीतीने गोठलेल्या नदीवरचा तंबूतला हा माझाही पहिला मुक्काम.
क्रमशः
शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक ४
https://www.maayboli.com/node/69652
भारी! खूपच छान लिहिताय हर्पेन
भारी! खूपच छान लिहिताय हर्पेन! अगदी तिथे असल्यासारखं वाटतं आहे. शैली खूपच मस्त , अगदी चित्रदर्शी!
पडण्यावरून गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतली एक गंमत आठवली. पन्हाळगड ते पावनखिंड ट्रेक करताना बाकी सगळ्यांना जळवा लागल्या. एकटे बाबासाहेब पुरंदरे राहिले होते. ते म्हणाले, ' जे पुण्यवंत असतात त्यांना जळवा चावत नाहीत ' जरा वेळाने बरोब्बर त्यांनाच जळू चावली. गोनिदांनी तिरकसपणे विचारलं, ' पुण्यवंत काय म्हणताहेत? '
जरा वेळाने गो नी दांडेकरांना दुर्बुद्धी सुचली ते सोडून बाकी सगळे एकदातरी चिखलात घसरून आपटले होते. म्हणून ते म्हणाले, ' जे पुण्यवंत असतात ते चिखलात पडत नाहीत' अर्थात जरा वेळाने त्यांनाही सचैल चिखलस्नान झाले
अप्रतिम ! सध्या हा एकच शब्द
अप्रतिम ! सध्या हा एकच शब्द सुचतोय. सगळं वर्णन जरा सिंक झालं मनात की लिहिते सविस्तर.
वाचतेय!
वाचतेय!
अद्वितीय अनुभव आहे हा नक्कीच.
भारी! खूपच छान लिहिताय हर्पेन
भारी! खूपच छान लिहिताय हर्पेन! अगदी तिथे असल्यासारखं वाटतं आहे. शैली खूपच मस्त , अगदी चित्रदर्शी!>>>+९९९९
भारीच! दुसरा शब्द नाही.
मस्त चालू आहे.. पुलेशु.
मस्त चालू आहे.. पुलेशु.
एक अतिबालीश प्रश्नः अश्या जागी जाताना, दाढी मिशा राखल्याने थंडी जरा कमी वाजत असेल ना
फोटो आता टाकलेत का?
फोटो आता टाकलेत का?
ह्यात पेंडसे कोणचे?
मस्त ! हाही भाग खूप छान.
मस्त ! हाही भाग खूप छान. हर्पेन, खरच छान लिहीतोस तू. उलट आम्ही तुझ्याबरोबर २४ तास आहोत असे वाचतांना वाटत होते. फोटो भन्नाट आहेत. गोठलेली नदी काय दिसतीय !
ब्लु जॅकेटमधले हर्पेन.
ब्लु जॅकेटमधले हर्पेन.
ओके. शाली धन्यवाद.
ओके. शाली धन्यवाद.
अप्रतिम !
अप्रतिम !
खूपच छान लिहिताय.....
बर्फाची नमुने भारीच.
बर्फाची नमुने भारीच.
ह्यावरुन चालायचं आहे का?
धन्यवाद वावे, गोनिदा,
धन्यवाद वावे, गोनिदा, बाबासाहेबांचा किस्सा भारी. मी पुण्यवंत आहेच
धन्यवाद ममो, सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
धन्यवाद सस्मित, शाली, मित, रश्मी, pravintherider
अश्या जागी जाताना, दाढी मिशा राखल्याने थंडी जरा कमी वाजत असेल ना >>
मित , हो अशी सर्वसाधारण धारणा तर आहेच शिवाय एखाद्याने दाढी करायचे जरी ठरवले तरी ते शक्य होऊ शकत नाही त्यामुळे नंतर दाढी वाढतेच.
सस्मित,
फोटो हळूहळू वाढवतोय.
पहिल्या फोटोत मधे आहे तो मी
सगळ्या नमुन्यांमधून वाट काढायची. अगदी त्याच्यावरून चालायचे असे नाही पण बर्फाचे असे नमुने अगदी आजूबाजूलाच असतात आपल्या. चालण्यायोग्य रस्ता शोधण्याच्या नादात अनेकदा नदीच्या ह्या किनार्यावरून त्या किनार्यावर आणि परत असे करायला लागायचे
अप्रतिम वर्णन...भन्नाट अनुभव
अप्रतिम वर्णन...भन्नाट अनुभव !
नमुना-३ काय सुरेख आणि वेगळाच
नमुना-३ काय सुरेख आणि वेगळाच फोटो आहे. अप्रतिम.
कॅम्पचे ठिकाणही अगदी रम्य तरीही रौद्र आहे.
झ का स !!!
झ का स !!!
भारीच ! अगदी अपेक्षित असे
भारीच ! अगदी अपेक्षित असे सविस्तर वर्णन चालू आहे .. आम्ही पण ट्रेक करतोय असं वाटतंय ! खूप छान !
फोटो असले अप्रतिम आहेत . नमुना ३ आणि तपासणीच्या ठिकाणाचे फोटो खरंच सुंदर !
शुभ्र काही जीवघेणे हे अगदी पटतंय .. खूपच छान लिहिताय! पु भा प्र
भारीच !! तो कॅम्प आणि
भारीच !! तो कॅम्प आणि वैद्द्यकीय टेंटचा फोटो कसले भव्य पर्वत आहेत याची कल्पना देतो !
अप्रतिम.. लेख वाचताना सगळं
अप्रतिम.. लेख वाचताना सगळं कसं घडलं असेल त्याचा चित्रपट डोळ्यासमोरून गेला.. फोटो च्या आणि निसर्गाच्या प्रेमात पडलेय मी तर...
हे माझं पहिलं long distance वि बा सां (फोटोतील पर्वत , नदी आणि मी)
फोटो आणि वर्णन दोन्हीही
फोटो आणि वर्णन दोन्हीही अप्रतिम!
काय अनुभव असेल हा! असा नुसता विचार करूनच छान वाटतंय.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
मस्तच हर्पेन.
मस्तच हर्पेन.
छान लिहिताय. मागच्या वर्षी
छान लिहिताय. मागच्या वर्षी इथे ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये एक मिनी ग्लेशियर ट्रेल केला होता त्याची आठवण तुमचे बर्फाचे फोटो पाहून आली. अर्थात आम्ही तिथे उन्हाळ्यात होतो त्यामुळे थंडीचा ताप नव्हता. अशा ठिकाणी चालायला वेगळ्या काठ्या मिळतात, त्या नाही का वापरत घसरू नये किंवा आधार म्हणून?
वा वा ... सुंदर फोटो आणि
वा वा ... सुंदर फोटो आणि वर्णन.
फार मस्त हर्पेन
फार मस्त हर्पेन
फोटो तर अप्रतिमच आहेत !
पुढील भाग लवकर टाक
मस्तच आहे हा पण भाग. मुंबईतले
मस्तच आहे हा पण भाग. मुंबईतले लोक जास्त पडायचं काय कारण बुवा? आता तर मेट्रोच्या ठिकठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे उखडून टाकलेल्या फूटपाथवरून आडव्यातिडव्या सिग्न्ल तोडून येणार्या गाड्यांशी, बाईक्सशी आट्यापाट्या खेळत कसरत करत चालायची सवय लागली असली पाहिजे.
भारीच!
भारीच!
धन्यवाद स्वप्ना, आदित्य,
धन्यवाद चनस, स्वप्ना, आदित्य, सुनिधी, वेका, सायो, अनया, किल्ली, धनि, अन्जली, केश्विनी, रेव्यु
शाली - बर्फाचे फोटो अक्षरशः नमुने म्हणूनच फोटो काढलेत. जे बघितले त्याच्या एक शंभरांश. कित्येक सुंदर फोटो मिळाले असते पण एक तर चालताना मधेच थांबायची परवानगी नव्हती आणि वर थंडी. थंडी खूप असल्याने हातमोजे काढायचे जीवावर येत होते पण शेवटी एकदा हिंमत केलीच आणि संधी साधून हे फोटो काढलेत. काही दृष्य डोक्याच्या कॅमेर्यात कैद आहेत. साधारण दिड दोन फूट जाडीचा थर असेल बर्फाचा पण पुर्णपणे पारदर्शक इतका की त्याच्या खालचे दगड गोटे दिसत होते. स्फटीकासारखा बर्फ. मला आत्ताही डोळे मिटले की दिसतो
अन्जली - शुभ्र काही 'जीवघेणे' हे कुठल्या कवितेतली ओळ आहे हे माहित नाही परंतु ती ओळ अंबरीष मिश्रा यांच्या एका पुस्तकाचे नाव म्हणून वापरली आहे ते पुस्तक वाचल्याअसून ती लक्षात होती. इथे अगदी चपखल बसते आहे ही ओळ.
बर्याच जणांना हे शीर्षक आवडते आहे हे वाचून मला खूप छान वाटतंय.
किल्ली, एकदम प्रेमत्रिकोण हा, पती पत्नी और वोह सारखं वाटलं
वेका, काठ्या घेऊनच चालत असू पण तरी चादर वर एकदाही पडलाच नाही असा कोणीही उरत नाही. सतत काठी टेक त चालण्याची सवय नसते आणि जरा नजर हटली की घसरायला झालंच म्हणून समजा. शिवाय पुढचा न घसरता गेलाय ही हमी नसते आपणही घसरणार नाही याची. अर्थात हे नंतर आलेले शहाणपण.
स्वप्ना - मुंबईतले लोक जास्त पडायचे असे नव्हे पडायचे सगळीकडचेच पण ज्यांची ज्यांची हाडं मोडली त्यात मुंबईकरांनी बाजी मारली. डाबर लाल तेल कमी वापरले असावे
मुंबईकरांचे D3 कमी पडत असणार
मुंबईकरांचे D3 कमी पडत असणार
मी काय म्हणते हर्पेन, असंही भरपूर कपडे घालावे लागत होतेच ट्रेकर्सना, मग बाहेरचा थर गुबगुबीत घातला जरा पातळ गादीसारखा तर पडल्यावर फ्रॅक्चरचं प्रमाण कमी होईल ना? फक्त बेंगरुळ दिसायला होईल
केश्वे - आपण ढीग बेंगरूळ
केश्वे - आपण ढीग बेंगरूळ दिसलो तरी चालेल म्हणत अंगावर गुबगुबीत गादी घेऊ पण ते वजन आपल्यालाच उचलायला लागेल ना आणि उणे तपमानात चालताना चक्क घामही येतो तो त्रास वेगळाच
उणे तपमानात चालताना चक्क
उणे तपमानात चालताना चक्क घामही येतो तो त्रास >>>> कठिण आहे! असं कसं पण?
>>डाबर लाल तेल कमी वापरले
>>डाबर लाल तेल कमी वापरले असावे
मुंबईतल्या हवेत काय तेल लावणार डोंबल.....रच्याकने, त्या वैद्यकिय चाचण्या काय असतात थोडी माहिती द्याल काय? हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही हे मला माहित आहे तरी उत्सुकता आहे.
Pages