उशी

Submitted by प्रिती मोरे on 10 May, 2018 - 02:14

उशी...
कोणाला लागते... कोणाला नाही...
असेच ते दोघेही...
.
तिला उशी शिवाय झोप नाही यायची...
आणि त्याला उशीची कधी गरजच नाही भासायची...
.
रोज रात्री उशी सोबत, हितगुज ती करायची...
सर्वात जवळच्या मैत्रिणी सारखी, उशी तिला वाटायची...
दिवसभर काय काय झालं, हे न-बोलताच उशीला सगळं सांगायची...
का झालं, कसं झालं, हे उशीलाच पुन्हा पुन्हा विचारायची...
.
पण तो, अगदी शांत झोपायचा रोज...
कारण त्याला कधी उशीची गरजच नाही भासायची...
.
कधी डोक्याखाली, कधी मिठीत घेऊन उशीला ती झोपायची...
कधी मिटलेल्या, तर कधी उघड्या डोळ्यांनी,
याच उशीसोबत ती सारी स्वप्ने रंगवायची...
.
मनातली सारी गुपीतं,
उशीला अबोलपणेच सांगायची...
चांगल्या, वाईट सगळ्या आठवणी,
रात्रभर आठवायची...
.
नको नकोत्या विचारांनी, झोप जेंव्हा उडायची...
उशीवरती तोंड दाबुन, हुंदके देउन ती रडायची...
.
आयुष्यातील चढ-उतारांचा, विचार करत बसायची...
सुजलेल्या डोळ्यांनी, अश्रुंनी भिजलेल्या उशीवर, रात्र रात्र ती जागायची...
.
आईसारखी उशी तिला, मायेने जेंव्हा थोपटायची...
तेंव्हा कुठे नकळत, ती हळुवार डोळे मिटायची...
.
आठवणींच्या कापसाने भरलेल्या, उशीशिवाय झोपायची ती कल्पना देखील नाही करायची...
पण तो, अगदी शांत झोपायचा रोज...
कारण... त्याला कधी उशीची गरजच नाही भासायची...
त्याला कधी उशीची गरजच नाही भासायची...
.
- प्रिती ✍️❤️

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults