सांस्कृतिक भांडवल, भाषा आणि असमानता

Submitted by अतुल ठाकुर on 13 April, 2019 - 01:09

bourdieu.jpg

समाजशास्त्रात भाषेबद्दल ज्या विचारवंतांनी काही मांडणी केली आहे त्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ बोर्द्यु हे एक महत्त्वाच नाव. भाषा हे सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल) आहे हा विचार त्याने मांडला. हे भांडवल ज्यांच्याकडे असते त्या माणसांना समाजात जास्त संधी उपलब्ध असतात. आणि हा वारसा अनेकदा त्यांच्या पुढल्या पिढीकडे सोपवला जातो त्यामुळे काहीवेळा हे भांडवल समाजातील प्रथितयश व्यक्तींच्या पुढच्या पिढीला आपोआपच मिळण्याची शक्यता वाढते. ज्यांच्याकडे ही भांडवल नाही त्यांना हे कमावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यांना हे नेहेमी साधतेच असे नाही. ज्यांच्याकडे हे भांडवल आहे त्या माणसांना संधी जास्त आणि ज्यांच्याकडे हे भांडवल नाही त्यांना या संधी कमी असे घडत असल्याने सामाजिक असमानता यामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाषा हे भांडवल आर्थिक भांडवलाप्रमाणे तत्काळ परिणाम दाखवणारे किंवा फायदा देणारे नाही. त्याची फळे मिळायला वेळ लागतो. किंबहूना त्याची फळे मिळावीत यासाठी फार कौशल्याने भाषेचा वापर करावा लागतो असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ही मांडणी जेव्हा प्रत्यक्ष पाहावीशी वाटली तेव्हा माझ्यासमोर शेक्षणिक क्षेत्र उपलब्ध असल्याने तेथेच या गोष्टीचे निरिक्षण करण्याचा प्रयत्न केला.

सर्वप्रथम सेमिनार्समध्ये भाषेचा प्रभाव खुपच जाणवला. विशेषतः गावाकडून आलेले संशोधक ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खुप काही असतं, ज्यांचा अभ्यास प्रचंड असतो मात्र इंग्रजीभाषा कमकुवत असल्याने मुद्दा नीट मांडता येत नाही अशांची वेळोवेळी कुचंबणा झालेली पाहिली. अनेकदा फारसा दम नसलेले मुद्देसुद्धा भाषेवर प्रभुत्व असल्याने नावाजले गेलेले पाहिले. काही जणांनी मुद्दाम आक्रमक भाषा वापरून सखोल व्यासंगाचा आभास निर्माण केलेला पाहिला तर काहींनी सोप्या गोष्टी भाषा येत असल्याने मुद्दाम गुंतागुंतीच्या करून मांडल्या आणि लोकांनी माना डोलावल्या. समाजशास्त्राच्या सेमिनार्समध्ये निदान मला तरी तुम्ही तुमचा मुद्दा तुम्हाला येते त्या भाषेत मांडला तरी चालेल असे कुणी म्हटल्याचे आठवत नाही. हे सारे जरी असले तरी याचा अर्थ प्रयत्नपूर्वक इंग्रजीचा अभ्यास करून, आपल्या भाषेच्या कमकुवतपणावर मात करून या परिस्थितीतून बाहेर येणारी मंडळीही आहेतच. मुद्दा इतकाच की ज्यांना भाषा हे भांडवल म्हणून लहानपणापासून कुटुंबातून उपलब्ध झालं आहे त्यांच्यासाठी पुढे काही गोष्टी इतरांच्या तूलनेत सोप्या झालेल्या असतात.

हे भांडवल आपल्या मुलांना उपलब्ध व्हावं म्हणून कष्ट करून, वेळप्रसंगी कर्ज काढूनसुद्धा पालक मुलाला इंटरनॅशनल स्कूल्समध्ये घालतात. भाषेचा दुसरा प्रभाव कला क्षेत्रात जाणवला. विशेषतः कलाकृतीचा आस्वाद घेताना जर चर्चा घडत असेल तर ज्या व्यक्तीकडे त्या विशिष्ट क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या शब्दांचा संग्रह जास्त आहे ती व्यक्ती चर्चेच्या प्रमुख स्थानी असलेली आढळते. अनेकदा ती काय सांगते यापेक्षा ती कुठले शब्द वापरून सांगते याचा प्रभाव जास्त आढळतो. सर्वसाधारण भाषेवर प्रभुत्व असणे आणि काही विशिष्ट क्षेत्रातील वापरल्या जाणार्‍या भाषेवर हुकुमत असणे यात फरक आहे. अनेकदा असं वाटतं की काही वर्षांनी एकूण एक मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकु लागलं तर हा संस्कृतिक भाषिक भांडवलाचा फरक बहुधा मराठी माध्यम, सेमी इंग्रजी, इंग्रजी, कॉनव्हेंट स्कूल, इंटरनॅशनल स्कूल अशा स्तरांवर जाणवेल. समजा पुढे सर्वजण कॉनव्हेंट किंवा इंटरनॅशनल शाळांमध्ये शिकू लागले तर हा फरक घरी या भाषिक भांडवलाचे पुष्टीकरण किती होते आहे यावर बहुधा मोजले जाईल. त्यामुळेच घरी मुलाशी मराठीत न बोलता जास्तीत जास्त इंग्रजीत बोला असा सल्ला अनेक पालकांना दिला जातो.

मात्र असे जरी असले तरी घरात पालकांचा व्यवसाय काय आहे यामुळे कदाचित बराच फरक पडू शकेल. समजा ज्या मुलाचे आईवडिल दोघेही डॉक्टर आहेत त्याला उपलब्ध होणारे भाषिक भांडवल आणि ज्याचे आईवडिल इंजिनियर आहेत त्याला उपलब्ध होणारे भाषिक भांडवल सारखेच असेल का? अशा तर्‍हेने अनेक व्यवसायांबद्दल बोलता येईल. त्यातूनही शहरात राहाणारे विद्यार्थी आणि गावातील विद्यार्थी यामुळे भाषिक भांडवलात फरक पडेल का हादेखिल एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे सर्वसाधारणपणे म्हणण्याची पद्धत आहे. ग्लोबल व्हिलेजबद्दल माणसे बोलत असतात. पण जग जवळ आल्याने, प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने किंवा इंटरनेटचा वापर करून गुगलवर सारे काही शोधण्याची व्यवस्था उपलब्ध असल्याने माणसांना उपलब्ध होणारे भाषिक भांडवल सारखेच आहे का हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. कारण भाषा ही शिकावी लागते. तिची अभ्यासपूर्वक जोपासना करावी लागते. ज्यांना लहानपणापसून घरातून हे बाळकडू मिळतं त्यांच्यासाठी पुढे काही गोष्टी या सुकर होतात आणि बाकिच्यांसाठी हा मार्ग काहीसा कठीण झालेला असतो असे वाटते. आणि तसे असेल तर एकविसाव्या शतकातदेखिल बोर्द्युची कल्चरल कॅपिटलची मांडणी लागु ठरते असेच म्हणावे लागेल.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.

योग्य तितके भाषिक भांडवल जवळ असणे सध्याच्या जगात खूप महत्वाचे आहे, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा.

रोज ऑफिसात त्याच त्या पाट्या टाकणाऱ्यांना वर्षाच्या शेवटी apraisal साठी आकर्षक व भपकेदार रुपात पाट्या किती टाकल्या हे मांडावे लागते. कित्येकदा असे होते की वर्षभर पाट्या टाकणे टाळणारे कामचुकार लोक भाषिक भांडवलाच्या आधारावर भरपूर पाट्या टाकल्याचा आभास निर्माण करतात व ज्यांनी खरोखर पाट्या टाकल्या ते त्या नीट मांडू न शकल्याने मागे पडतात.

हा लेख सकाळीच वाचला. विषयाशी पूर्ण सुसंगत असा नाही पण भाषिक भांडवल गोळा करण्यात काय अडथळे येतात हे सांगणारा वाटला म्हणून इथे देतेय.

https://www.loksatta.com/chaturang-news/suttadguttad-article-aboutauthor...

धन्यवाद साधना Happy
मला वाटतं तुम्ही दिलेला लेख हा माझ्या लेखाशी सुसंगतच आहे. एका विशिष्ट क्षेत्राच्या बाबतीत लेखकाने आपले विचार मांडले आहेत. मला यात पुढे कुठेतरी "पॉवर आणि कंट्रोल" यांचे संकेत आढळतात.

अप्रतिम लेख. धन्यवाद.

उत्तम मराठी भाषेचे कल्चरल कॅपिटल मला घर व शाळेतून मिळाले. आई वडील आजी शेतकरी कुटुंबातून खे डेगावातून आलेले त्यामुळे म्हणी वाक्प्रचार ह्यांनी अति शय रिच अशी भाषा घरी बोलली जाई. वडील कॉलेजा त प्रोफेसर असल्याने घरी मराठी संगीत नाटकांची पुस्तके, लायब्ररीतून आलेली पुस्तके व दिवा ळी अंक अशी रेलचेल असे. भा षिक विनोद व प्रयोग करायला परवानगी होती. पुणेरी साहित्यिक मराठी,
सार्वजनिक कार्य क्रमात बोलले जाणारे मराठी हे ही असेच तिथे राहून व घरच्याच आयोजित कला संगीत कार्यक्रमांत जाउन पक्के झाले.

इंग्रजी मी दहावी नंतर रीडर्स डा यजेस्ट वाचोन लोकल भाषा अमेरिकेत इंग्लंड मध्ये कशी वापरतात त्यातील फरक तपासून आत्मसात केली.
हैद्राबादी हिंदी व दक्खनी ही तिथे राहून मिसळून व काम करून यायला लागली. ह्या भाषेत तुम्ही प्रबंध सादर करू शकत नाही पण जनतेशी संवाद उत्तम रीत्या साधू शकता. उत्तरेतले शुद्ध हिंदी पण आत्मसात केले आहे. भा षा उत्तम यायला त्याचे सांस्कृ तिक संदर्भही समजावे लागतात.

मी आता ऑलमोस्ट रि टायरमेंट ला आलेले आहे. पण ऑफिसात छान फिट व्हावे म्हणून तरूण लोक घालतात तसे ड्रेसिंग आत्मसात केले तो सर्व उद्योग मला असामी असामी मध्ये जे बाबा आहेत ते एक दिवस सूट बूट मोजे टाय घालून ऑफिसात जातात तसे वाटले ते फार मस्त विनोदी लेखन आहे. पण हा संदर्भ कोणालाच समजला नाही. ब्लँक लुक देउन मुले मुली गायब होतात समोरुन. अब क्या करना...

बोलायची भा षा बदलली की व्यक्तिमत्व पण सबकॉन्शसली बदलत राहते असे म्हणतात हे मी अनुभवले आहे.

सध्या राखेचा बघुन मालवणी शिकते आहे. मुंबईत उपयोगी पडते. होयतर!!

लेख अतिशय आवडला.

> अनेकदा फारसा दम नसलेले मुद्देसुद्धा भाषेवर प्रभुत्व असल्याने नावाजले गेलेले पाहिले. काही जणांनी मुद्दाम आक्रमक भाषा वापरून सखोल व्यासंगाचा आभास निर्माण केलेला पाहिला तर काहींनी सोप्या गोष्टी भाषा येत असल्याने मुद्दाम गुंतागुंतीच्या करून मांडल्या आणि लोकांनी माना डोलावल्या. > हे मराठीआंजावरपण दिसतेच की! शब्दबंबाळ भाषेत कायतर साधंच लिहलेलं असतं आणि लोकं त्यावर छानछान म्हणत माना डोलावत असतात Uhoh

शब्दबंबाळ भाषेत कायतर साधंच लिहलेलं असतं आणि लोकं त्यावर छानछान म्हणत माना डोलावत असतात.
-->> +१११११११११११
माझा अनुभव असा आहे की मातृभाषेतील वृत्तपत्रे, लेखकांच्या कादंबऱ्या, प्रवासवर्णने, आत्मकथन इतर ललित लेखन यांच्या वाचनाने माणूस बहुश्रुत होतो. तसेच जगण्यासाठी देशाटन करताना वेगवेगळ्या प्रांतातील ज्ञान आपोआप मिळत जाते. मात्र परकीय भाषा शिकणे व
त्यांची गोडी लागावी म्हणून मुळातच आवड, चिकाटी, व्यासंग अंगी असावे लागतात. फार काळापासून गुलामी केल्याने मातृभाषेला कमी लेखण्याची परंपरा कायम झाली आहे. इतर भाषेमुळे भाकरी मिळते म्हणून आपल्या मातृभाषेवर प्रेम करु नये असे थोडेच आहे. आज अनेक देशांची भाषा इंग्रजी नाही तरीही ते विकसित राष्ट्रांत मोडतात.
ता. क. माबोवरील एक मोहतरमा अशी इंग्रजी झाडते की बस...

चांगला लेख.
भाषेखेरिज अजून कोणकोणत्या गोष्टी सांस्कृतिक भांडवल म्हणून गणल्या जातात / जाऊ शकतात.

लेख काही फारसा पटला नाही.

<< हे भांडवल ज्यांच्याकडे असते त्या माणसांना समाजात जास्त संधी उपलब्ध असतात. आणि हा वारसा अनेकदा त्यांच्या पुढल्या पिढीकडे सोपवला जातो त्यामुळे काहीवेळा हे भांडवल समाजातील प्रथितयश व्यक्तींच्या पुढच्या पिढीला आपोआपच मिळण्याची शक्यता वाढते.>>
हे समाजशास्त्रज्ञ बोर्द्यु चे मत आहे की सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल)बद्दल वाचून झालेले मत आहे?

<<< हे भांडवल आपल्या मुलांना उपलब्ध व्हावं म्हणून कष्ट करून, वेळप्रसंगी कर्ज काढूनसुद्धा पालक मुलाला इंटरनॅशनल स्कूल्समध्ये घालतात. >>>
याचे कारण वेगळे आहे. चांगल्या शाळेमुळे/कॉलेजमुळे एक ब्रँड मिळतो आणि त्यामुळे फायदा होऊ शकतो.

<<< ज्यांना लहानपणापसून घरातून हे बाळकडू मिळतं त्यांच्यासाठी पुढे काही गोष्टी या सुकर होतात आणि बाकिच्यांसाठी हा मार्ग काहीसा कठीण झालेला असतो असे वाटते. आणि तसे असेल तर एकविसाव्या शतकातदेखिल बोर्द्युची कल्चरल कॅपिटलची मांडणी लागु ठरते असेच म्हणावे लागेल.>>>
मुळात भाषेचा मूळ उद्देश म्हणजे स्वतःचे विचार समोरच्यापर्यंत पोहचवणे. त्यासाठी साधी-सरळ-सोपी भाषाच नेहमी उपयोगी पडते. जिथे मार्केटिंग करायचे असेल, स्वतःचा माल विकायचा असेल (उदा. तुम्ही दिलेच आहे. कला क्षेत्रात, सेमिनार्समध्ये. अजून एक उदाहरण म्हणजे संपादकीय लेख) तिथेच अशी क्लिष्ट भाषा वापरली जाते, ज्याला सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल) असे गोंडस नाव दिले आहे.

हे समाजशास्त्रज्ञ बोर्द्यु चे मत आहे की सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल)बद्दल वाचून झालेले मत आहे?
बोर्द्युचे मत आहे.

> भाषेखेरिज अजून कोणकोणत्या गोष्टी सांस्कृतिक भांडवल म्हणून गणल्या जातात / जाऊ शकतात. > खाद्य आणि वस्त्र संस्कृती? कदाचीत संगितदेखील.

छान लेख... आवडला.

<< भाषेखेरिज अजून कोणकोणत्या गोष्टी सांस्कृतिक भांडवल म्हणून गणल्या जातात / जाऊ शकतात. > खाद्य आणि वस्त्र संस्कृती? कदाचीत संगितदेखील. >>
------- कला, संगित

<<< भाषा ........ हे सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल) आहे हा विचार त्याने मांडला. हे भांडवल ज्यांच्याकडे असते त्या माणसांना समाजात जास्त संधी उपलब्ध असतात. >>>

माहाराष्ट्रीयन जेवण करता येते किंवा तमाशाचा उत्तम नाच करता येतो म्हणून कुठल्या जास्त संधी उपलब्ध असणार आहेत?

कुणाला चुकून पाय लागला किंवा पुस्तकावर पाय पडला तर नमस्कार करायचा शिष्टाचार आहे. त्याने काय संधी मिळतात?

रांग पाळणे, कुठेही कचरा न टाकणं, स्वत: ला निटनेटकं ठेवणं म्हणजे दुसऱ्याला सुसह्य होईल असे रहाणे, मचामचा न खाणे, सार्वजनिक ठिकाणी फुकट गोष्टींसाठी हावरेपणा न करणं, हळू आवाजात बोलणे ( ब्राह्मणांकडून खरंच शिकण्यासारखे आहे) , दुसऱ्यांचा आदर करणं, बायांकडे टक लावून बघत लाळ न गाळणं हे शिष्टाचारात मोडत नाही का?

सुसंस्कृत मनुष्याला कुठेही गेले तरी तिथले लोक सहज सामावून घेतात. इतरांना आदर देण्याची सवय असणारांना आदरच मिळतो.

जपानी माणसाने नम्र वागणुकीने व सचोटीने वागून छोटं राष्ट्र असून नेत्रदीपक प्रगती साधली एवढेच सांगायचे होते.

माहाराष्ट्रीयन जेवण करता येते किंवा तमाशाचा उत्तम नाच करता येतो म्हणून कुठल्या जास्त संधी उपलब्ध असणार आहेत?
>> यातून आपला कुत्सित स्वर लपत नाही. वेगळ्या शब्दांत सांगता येत नसेल तर आपल्या मांजरीला बोचकारत बसावं.

> माहाराष्ट्रीयन जेवण करता येते किंवा तमाशाचा उत्तम नाच करता येतो म्हणून कुठल्या जास्त संधी उपलब्ध असणार आहेत? >
मराठी भाषा हे शाब्दिक भांडवल ज्यांच्याकडे आहे त्यांना मराठी खाद्य, नृत्य/लोककला/संगीत याबद्दल ममत्व वाटत नाही, त्यामुळे ते त्याचा प्रसार करत नाहीत, त्यामुळे नवीन संधी निर्माण होत नाहीत. असे म्हणता येईल का?
===

खाद्य, वेशभूषा, संगीत यांना संस्कृतिक भांडवल म्हणताना मी थोडा वेगळा विचार करत होते.

गोरे लोक रोज जेवढं मांस खातात त्यामुळे त्यांच्यात आणि रोज मांस न खाणाऱ्या भारतीयांच्या शारीरिक जडणघडणीत किती फरक पडला असेल.

आऊटलँडर, पोल्डार्क, गॉन विथ द विंड बघताना दिसणारी वेशभूषा आणि आताची पाश्चात्य वेशभूषा.
भारतीयांची १०० वर्षांपूर्वीची वेशभूषा आणि आता नवीन पिढीने आत्मसाद केलेली पाश्चात्य वेशभूषा. किंवा ७०एक वर्षापूर्वी कॉलेजला जाणाऱ्या मराठी स्त्रियांचा काय पेहवार असायचा? साडी? उत्तरेकडच्या सलवार-कमीजने त्याला कधी रिप्लेस केलं?

तरुणाईला आवडेल असं संगीत भारतात, महाराष्ट्रात आहे का? शाब्दिक भांडवल असलेले लोक त्याच्याकडे नाक मुरडून बघतात का?

मला असं जाणवतंय की कुठल्याही प्रकारची कला किंवा कौशल्य (खाद्य संस्कृती / पाककला, वस्त्रालंकार, संगीत /नृत्यप्रकार, कोरीवकाम ) म्हणजे सांस्कृतिक भांडवलच होय. फक्त तसा समज रूढ करायला करायला भाषा ह्या भांडवलाची गरज पडते.

मला असं जाणवतंय की कुठल्याही प्रकारची कला किंवा कौशल्य (खाद्य संस्कृती / पाककला, वस्त्रालंकार, संगीत /नृत्यप्रकार, कोरीवकाम ) म्हणजे सांस्कृतिक भांडवलच होय. फक्त तसा समज रूढ करायला करायला भाषा ह्या भांडवलाची गरज पडते.

हार्पेनजी तुम्ही म्हणताय तसं आहे. पण मला वाटतं तुम्ही सामुहिक भांडवलाबद्दल बोलत आहात. सध्या तरी लेखात माझा भर हा वैयक्तीक भांडवलावर आहे. सामुहीक भांडवल हा आणखिनच गुंतागुंतीचा विषय आहे.

तरुणाईला आवडेल असं संगीत भारतात, महाराष्ट्रात आहे का? शाब्दिक भांडवल असलेले लोक त्याच्याकडे नाक मुरडून बघतात का?

अ‍ॅमी खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणखि सविस्तर लिहु शकाल का प्लिज?

शिवाय जेव्हा आपण भांडवल म्हणतो तेव्हा तो नुसताच साठा नसून गुंतवणूक करून नफा मिळविण्यासाठी केलेला साठा आहे हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. येथे भांडवल हा शब्द खर्‍या अर्थाने कॅपिटल म्हणूनच वापरला आहे.

प्रतिसाद "मागे" म्हणजे नक्की कुठे "घेत" आहात आपण?

ही टिपिकल पलटी मारणे स्टाईल आजकाल सर्वाधिक पापिलवार सरकारने अनेकदा वापरलेली आहेच. भक्त आहात का हो तुम्ही?

मला संगीतातलं ओ कि ठो कळत नाही त्यामुळे अधिक लिहण्यास असमर्थ आहे Sad
पण ती वाक्यं लिहताना मनात काय विचार चालले होते ते सांगू शकते.

मी सध्या Daisy Jones & the Six पुस्तक वाचतेय. '७०च्या दशकात उदयास आलेला, अतिशय प्रॉमिसिंग रॉक बँड आणि त्याचा अचानक झालेला अस्त' हे कथानक आहे. तुमचा लेख वाचताना मनात विचार आला की रॉक, पॉप सारखा काही नवीन संगीत प्रकार आपल्याकडे नजीकच्या भूतकाळात निर्माण झालाय का? त्याला लोकाश्रय मिळाला का? प्रस्थपितानी त्याकडे कशा दृष्टीने पाहिले? नवीन सांगीतिक उपकरणं आली का? जुन्यामधे इंप्रुव्हमेंट झाली का?
नवीन काहीच झाले नाही तरी एकवेळ ठिकंय पण जर तरुणाईला झिंगाट किंवा गढुळाचे पाणी आवडत असेल तर त्याकडे भाषिक भांडवल असलेले लोक कसे बघतात? भा.भां. असलेले, मध्यमात वर्चस्व असलेले, माध्यमांचा ऍक्सेस असलेलं, जास्त लोकांपर्यंत पोहचू शकणारे लोक कधी हे असलं संगीत एंडॉर्स, प्रमोट करतील का? ते जे प्रमोट करतात त्याला वैश्विक तर जाऊदेत लोकल अपिलतरी आहे का?

खाद्यसंस्कृती बद्दल:

इडली, डोसा, उत्तपा यांनी न्याहरीचे पदार्थ म्हणून महाराष्ट्रात पाय कसे पसरले?
दक्षिण भारतातील सगळ्या जातीचे, वर्गाचे लोक हीच न्याहरी करायचे का? कि ती एका ठराविक जातीची &/ वर्गाची पद्धत होती?
उत्तरेतले लोक न्याहारीला काय खायचे? आता काय खातात?
पराठे, पंजाबी चिकन/पनीर, माह कि दाल वगैरे खाणारे लोक पंजाबात कोणत्या जाती, वर्गातले होते?

Pages