सांस्कृतिक भांडवल, भाषा आणि असमानता

Submitted by अतुल ठाकुर on 13 April, 2019 - 01:09

bourdieu.jpg

समाजशास्त्रात भाषेबद्दल ज्या विचारवंतांनी काही मांडणी केली आहे त्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ बोर्द्यु हे एक महत्त्वाच नाव. भाषा हे सांस्कृतिक भांडवल (कल्चरल कॅपिटल) आहे हा विचार त्याने मांडला. हे भांडवल ज्यांच्याकडे असते त्या माणसांना समाजात जास्त संधी उपलब्ध असतात. आणि हा वारसा अनेकदा त्यांच्या पुढल्या पिढीकडे सोपवला जातो त्यामुळे काहीवेळा हे भांडवल समाजातील प्रथितयश व्यक्तींच्या पुढच्या पिढीला आपोआपच मिळण्याची शक्यता वाढते. ज्यांच्याकडे ही भांडवल नाही त्यांना हे कमावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यांना हे नेहेमी साधतेच असे नाही. ज्यांच्याकडे हे भांडवल आहे त्या माणसांना संधी जास्त आणि ज्यांच्याकडे हे भांडवल नाही त्यांना या संधी कमी असे घडत असल्याने सामाजिक असमानता यामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाषा हे भांडवल आर्थिक भांडवलाप्रमाणे तत्काळ परिणाम दाखवणारे किंवा फायदा देणारे नाही. त्याची फळे मिळायला वेळ लागतो. किंबहूना त्याची फळे मिळावीत यासाठी फार कौशल्याने भाषेचा वापर करावा लागतो असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ही मांडणी जेव्हा प्रत्यक्ष पाहावीशी वाटली तेव्हा माझ्यासमोर शेक्षणिक क्षेत्र उपलब्ध असल्याने तेथेच या गोष्टीचे निरिक्षण करण्याचा प्रयत्न केला.

सर्वप्रथम सेमिनार्समध्ये भाषेचा प्रभाव खुपच जाणवला. विशेषतः गावाकडून आलेले संशोधक ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खुप काही असतं, ज्यांचा अभ्यास प्रचंड असतो मात्र इंग्रजीभाषा कमकुवत असल्याने मुद्दा नीट मांडता येत नाही अशांची वेळोवेळी कुचंबणा झालेली पाहिली. अनेकदा फारसा दम नसलेले मुद्देसुद्धा भाषेवर प्रभुत्व असल्याने नावाजले गेलेले पाहिले. काही जणांनी मुद्दाम आक्रमक भाषा वापरून सखोल व्यासंगाचा आभास निर्माण केलेला पाहिला तर काहींनी सोप्या गोष्टी भाषा येत असल्याने मुद्दाम गुंतागुंतीच्या करून मांडल्या आणि लोकांनी माना डोलावल्या. समाजशास्त्राच्या सेमिनार्समध्ये निदान मला तरी तुम्ही तुमचा मुद्दा तुम्हाला येते त्या भाषेत मांडला तरी चालेल असे कुणी म्हटल्याचे आठवत नाही. हे सारे जरी असले तरी याचा अर्थ प्रयत्नपूर्वक इंग्रजीचा अभ्यास करून, आपल्या भाषेच्या कमकुवतपणावर मात करून या परिस्थितीतून बाहेर येणारी मंडळीही आहेतच. मुद्दा इतकाच की ज्यांना भाषा हे भांडवल म्हणून लहानपणापासून कुटुंबातून उपलब्ध झालं आहे त्यांच्यासाठी पुढे काही गोष्टी इतरांच्या तूलनेत सोप्या झालेल्या असतात.

हे भांडवल आपल्या मुलांना उपलब्ध व्हावं म्हणून कष्ट करून, वेळप्रसंगी कर्ज काढूनसुद्धा पालक मुलाला इंटरनॅशनल स्कूल्समध्ये घालतात. भाषेचा दुसरा प्रभाव कला क्षेत्रात जाणवला. विशेषतः कलाकृतीचा आस्वाद घेताना जर चर्चा घडत असेल तर ज्या व्यक्तीकडे त्या विशिष्ट क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या शब्दांचा संग्रह जास्त आहे ती व्यक्ती चर्चेच्या प्रमुख स्थानी असलेली आढळते. अनेकदा ती काय सांगते यापेक्षा ती कुठले शब्द वापरून सांगते याचा प्रभाव जास्त आढळतो. सर्वसाधारण भाषेवर प्रभुत्व असणे आणि काही विशिष्ट क्षेत्रातील वापरल्या जाणार्‍या भाषेवर हुकुमत असणे यात फरक आहे. अनेकदा असं वाटतं की काही वर्षांनी एकूण एक मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकु लागलं तर हा संस्कृतिक भाषिक भांडवलाचा फरक बहुधा मराठी माध्यम, सेमी इंग्रजी, इंग्रजी, कॉनव्हेंट स्कूल, इंटरनॅशनल स्कूल अशा स्तरांवर जाणवेल. समजा पुढे सर्वजण कॉनव्हेंट किंवा इंटरनॅशनल शाळांमध्ये शिकू लागले तर हा फरक घरी या भाषिक भांडवलाचे पुष्टीकरण किती होते आहे यावर बहुधा मोजले जाईल. त्यामुळेच घरी मुलाशी मराठीत न बोलता जास्तीत जास्त इंग्रजीत बोला असा सल्ला अनेक पालकांना दिला जातो.

मात्र असे जरी असले तरी घरात पालकांचा व्यवसाय काय आहे यामुळे कदाचित बराच फरक पडू शकेल. समजा ज्या मुलाचे आईवडिल दोघेही डॉक्टर आहेत त्याला उपलब्ध होणारे भाषिक भांडवल आणि ज्याचे आईवडिल इंजिनियर आहेत त्याला उपलब्ध होणारे भाषिक भांडवल सारखेच असेल का? अशा तर्‍हेने अनेक व्यवसायांबद्दल बोलता येईल. त्यातूनही शहरात राहाणारे विद्यार्थी आणि गावातील विद्यार्थी यामुळे भाषिक भांडवलात फरक पडेल का हादेखिल एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे सर्वसाधारणपणे म्हणण्याची पद्धत आहे. ग्लोबल व्हिलेजबद्दल माणसे बोलत असतात. पण जग जवळ आल्याने, प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने किंवा इंटरनेटचा वापर करून गुगलवर सारे काही शोधण्याची व्यवस्था उपलब्ध असल्याने माणसांना उपलब्ध होणारे भाषिक भांडवल सारखेच आहे का हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. कारण भाषा ही शिकावी लागते. तिची अभ्यासपूर्वक जोपासना करावी लागते. ज्यांना लहानपणापसून घरातून हे बाळकडू मिळतं त्यांच्यासाठी पुढे काही गोष्टी या सुकर होतात आणि बाकिच्यांसाठी हा मार्ग काहीसा कठीण झालेला असतो असे वाटते. आणि तसे असेल तर एकविसाव्या शतकातदेखिल बोर्द्युची कल्चरल कॅपिटलची मांडणी लागु ठरते असेच म्हणावे लागेल.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ॲमी - पोस्ट आवडली.

महाराष्ट्राचा भौगोलिकदृष्ट्या विचार करून, जर महाराष्ट्र मध्यबिंदू मानला, तर काहीअंशी खानपान वगळला, उत्तर भारताशी महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या जास्त जोडला गेलेला दिसतो, दक्षिण भारताशी मात्र जरा फटकूनच आहे, असं का असावं?

मला उलट वाटते. महाराष्ट्र हा दक्षिणेशी अधिक जोडलेला आहे. आपली कितीतरी मोठी सीमा साधारणतः समान अशा दक्षिणी संस्कृतीशी जोडली गेली आहे. कर्णाटक आणि निझामीतला बराचसा भाग युगादि किंवा नववर्ष पाडवा साजरा करतो. आताआतापर्यंत तमिळनाडू केरळा सोडून नऊवारी नेसण्याची पद्धत तिथे आपल्यासारखीच होती. वऱ्हाडात उत्तरी प्रभाव थोडासा हिंदी भाषेमुळे जाणवतो पण मध्यप्रदेशात त्याहून अधिक मराठी प्रभाव भाषावार राज्यपुनर्रचनेपर्यंत होता. शहाजीराजे भोसले यांची मूळ जहागीर सुपे हुल्याळ येथेही होती. महाराष्ट्रातील अनेक सोयरिका कर्णाटक आंध्रप्रदेश तेलंगण येथे होत होत्या. पुष्कळ लिहिता येईल. विंध्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात भिन्न संस्कृती नांदतात असे म्हणता येईल. आपल्यावरच्या काही राजवटी कन्नड होत्या.

अतुल मी ह्या बद्दल विचार करतच होते. मला सांस्कृतिक वारसा हा शब्द जास्त योग्य वाटतो. एकेका समु हाची जीवन पद्धती. त्यांच्या बिलीफ सिस्टिम्स, देव देवता चाली रिती, स्वैपाकाच्या पद्धती. कल्चरल आयडेंटिटी. राइट ऑफ पॅसेज रिचुअल्स असे सर्व मिळून हे वारसा धन बनत असावे. हे व्यक्तीचे तसेच समुहाचे पण मिळून असे आहे. एक वाइट व दुसरे चांगले असा फरक कराय्ची काही गरजच नाही सर्व जसे आहे तसे स्वीकारण्यात काय प्रोब्लेम असू शकतो. वर्चस्व कोणाचेच नाही, नसावे.

आजच सी एन एन वर हे खालील आर्टिकल वाचले. रशियाची साखालिन बेटे व जपानचा होकाइडो प्रांत इथे ही ऐनू जमात राहते. पण जपान्यांनी त्यांच्यावर आपले संस्कार लादले. जपानी वे ऑफ लाइफ स्वीकारायची सक्ती केली तसे कायदेच केले. ह्यात ऐनू लोकांचे सर्व सांस्कृतिक कॅपि टल हरवून गेले नष्ट झाले. आता त्याचे पुनरुज्जीवन करायचे प्रयत्न चालू आहेत. पण ऐनू लोकांना आपले सांस्कृतिक प्रदर्शन मांडून ठेवले आहे असेच वाट्ते आहे. संगीत, गाणी ओव्या कथा हा खरा वारसा आहे.
https://edition.cnn.com/2019/04/20/asia/japan-ainu-indigenous-peoples-bi...

तामिळ ब्राम्हण स्त्रिया आजही नऊवारी नेसतात, खास कार्यक्रमांना. उत्तर भारतात कुठेही ह्या तर्हेचे नेसणे दिसत नाही. मलाही महाराष्ट्र दक्षिणी जास्त वाटतो.

एक वाइट व दुसरे चांगले असा फरक कराय्ची काही गरजच नाही सर्व जसे आहे तसे स्वीकारण्यात काय प्रोब्लेम असू शकतो. वर्चस्व कोणाचेच नाही, नसावे.
हे नुसते धन नसून कॅपिटल आहे आणि ते जास्त नफा मिळविण्यासाठी गुंतविले जाते.

बोर्द्युच्या सिद्धान्तात एखाद्या गोष्टीला महत्व का व केव्हा येते याचे स्पष्ट उत्तर मार्केट हे आहे. भाषेच्या बाबतीत त्याने "लिग्विस्टीक मार्केट" हा शब्द वापरला आहे. ज्या भाषेला मार्केटमध्ये किंमत आहे ती भाषा लोक शिकतात. उच्चभ्रू माणसे एखादी भाषा बोलत असतील तर तो उच्चभ्रूपणा भाषेलाही आपोआपच चिकटवला जातो. याउलट जिला बंबईया हिन्दी म्हटले जाते तसे "मेरेको, तेरेको, कायको, मंगता है क्या" अशी भाषा बोलणारा आपोआपच अडाणी ठरतो.
अनेकदा हिन्दी चित्रपट ज्यात श्रीमंत माणसे दाखवतात तेथिल मोलकरीण ही बहुधा मराठी असते आणि ती असलं हिन्दी बोलताना दाखवतात.
हा मार्केटचा व्यवहार आणि त्याला लागून असलेल्या समजूती भाषेव्यतिरिक्त इतर गोष्टींनाही तशाच लागु होतात का ते पाहवं लागेल.

हे बघा:
कोणीही कधीच फारशी वापरत नसलेल्या भाषिक भांडवलाच्या जोरावर विकसीत देशात कामाच्या संधी उपलब्ध करायचे प्रयत्न आयआयटी कानपूरचा एक प्रशंसनीय उपक्रम Angry

अॅमी - <मी सध्या Daisy Jones & the Six पुस्तक वाचतेय. '७०च्या दशकात उदयास आलेला, अतिशय प्रॉमिसिंग रॉक बँड आणि त्याचा अचानक झालेला अस्त' हे कथानक आहे. तुमचा लेख वाचताना मनात विचार आला की रॉक, पॉप सारखा काही नवीन संगीत प्रकार आपल्याकडे नजीकच्या भूतकाळात निर्माण झालाय का? त्याला लोकाश्रय मिळाला का? प्रस्थपितानी त्याकडे कशा दृष्टीने पाहिले? नवीन सांगीतिक उपकरणं आली का? जुन्यामधे इंप्रुव्हमेंट झाली का?>
अतुलनी आधीच एका प्रतिसादात म्हटले आहे की लेखात त्यांचा भर वैयक्तिक भांडवलावर आहे. तुमचा रोख सामुहिक भांडवलावर वाटत आहे. वैयक्तिक भांडवलाच्या रोखाने विचार करायचा म्हटल्यास सुरेखा पुणेकर, संभाजी भगत, वेसावकर पार्टी ही लोककलेतली आणि राहुल देशपांडे, महेश काळे हे शास्त्रीय संगीतातली उदाहरणे चटकन आठवतात. त्यांच्या कलेला आपण मधल्या काही वर्षात विसरलो होतो किवा डाऊन मार्केट समजत होतो. पण त्यांनी त्यांच्या कलेत पुरेसे नाव कमावले आहे. त्यात थोडा भाग त्या कलेचा आणि उपलब्ध माध्यमांचा आहेच पण बराचसा भाग त्यांनी स्वतःला कसे प्रदर्शित केले हा ही आहे आणि ते त्यांच्या भाषिक भांडवल आणि ते वापरण्याच्या कौशल्यानेच साध्य झाले आहे.
आणि तुम्ही उपस्थित केलेला नजीकच्या भूतकाळातील नवीन संगीत प्रकार - नाट्य संगीत हा प्रकार भारतीय संगीताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात बऱ्याच अलीकडचा म्हणावा लागेल असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यात ही गेल्या २५-३० वर्षात तो ही लयाला जात होता आणि अचानक सुबोध भावे, राहुल देशपांडे, महेश काळे सारखी नवी पिढी त्यात उतरली आणि नाट्य संगीताचे पुनरुज्जीवन झाले.

Pages